लाल रंगाची स्विफ्ट डिझायर रस्त्यावर वेगाने धावत होती. मात्र, संध्याकाळच्या गर्दीमुळे अपेक्षित वेग तिला पकडता येत नव्हता. मिळेल त्या चिंचोळ्या जागेतून चालक त्याचं कसब पणाला लावून गाडी खेचत होता. कोणत्याही परिस्थितीत त्याला पंधरा मिनिटात दवाखाना गाठण्याशिवाय पर्यायच नव्हता. चौकातून पुढे ट्रॅफिकची भलीमोठी रांग जबडा वासून येणाऱ्या वाहनांना गिळत होती. गर्दीत एकदा का गाडी शिरली तर वीस मिनिटांचा रस्ता कापायला अर्धा-पाऊण तास लागणार होता. थोडीशी जागा मिळाली तशी ती स्विफ्ट बीआरटी मार्गात शिरली. आता तिच्यावर असणारा ट्रॅफिक चा अंकुश सुटला होता. . .
ट्रॅफिक मध्ये असतानाही संयमाने गाडी चालवणारा सुरज आज असंयमी झालेला होता. '५५ किमी प्रतितास' त्याने एक्सीलेटरवरचं वजन वाढवलं. डाव्या हातातुन येणाऱ्या रक्ताने गाडीचे स्टेअरिंग ओलं झालेलं होतं. जुनं रक्त गोठण्याइतका वेळ मिळण्याआधीच नवीन रक्त स्टेअरिंग वर सांडत होतं, सुरजला त्याची पर्वा नव्हती. 'पायात चप्पल विसरलोय' हे आता त्याच्या लक्षात आलं, एक्सीलेटर उजव्या पायाच्या पंजाला रुतत होता. हळूहळू गेअरवर पण रक्ताचे थेंब दिसू लागले. सुरजचं लक्ष फक्त समोर होतं. केएसबी उड्डाणपुलाखालून डाव्या हाताला वळण घेतलं कि दहाच मिनिटात दवाखाना मात्र, आज मिनिटे युगांसारखी भासत होती. जणूकाही अनादी काळापासून सुरज त्या रस्त्यावरच अडकला होता. डोळ्यांना अंधुक दिसायला लागलं कि डोळ्यातील पाणी पुसण्याच्या नादात गालावर रक्ताचे डाग उमटले. येणाऱ्या क्रोमामॉलच्या चौकातून उजव्या हाताला वळलं कि दवाखाना येणारच. अजून दहा मिनिटे. . .
बीप,बीप,बीप. . . गाडीतला बीपर शांतता भंग करत होता. सुरजने बीपरचं तोंड बंद करण्यासाठी सीटबेल्ट अडकवला पण; बीपरचं किंचाळणं सुरूच राहीलं. सुरजने मीटर मध्ये पाहिलं आणि मागे पाहिलं. हर्षिताच्या डाव्या बाजूचा दरवाजा पूर्ण लागलेला नव्हता. तिच्या मांडीवर तेजश्री निपचित पडलेली होती. तेजश्रीचा डावा हात हर्षिताने स्वतःच्या दोन्ही हातांनी गच्च बांधून ठेवला होता. हर्षिताच्या हुंदक्यांनी बीपरच्या कालव्यात भर घातली. 'दरवाजा लावून घे' सुरजने शब्दांची जुळवाजुळव केली होती मात्र, त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. मध्येच त्याने धाप लागल्यामुळे तोंडाने-प्राण शरीरात खेचायला सुरुवात केली. जून महिन्यातील संध्याकाळी पाऊस येणार हे निश्चित होतं. हळूहळू पावसाने जोर धरला आणि समोर लक्ष देण्याच्या नादात सुरजचं बीपर कडे व उघड्या दरवाज्याकडे दुर्लक्ष झालं. . .
नुकताच घडलेला प्रसंग पुन्हा एकदा सुरजच्या नजरेसमोरून धावू लागला. डायनिंग टेबल वर बोलता बोलता चुकून त्याचा रागावरचा ताबा सुटला आणि त्याने उठून उजव्या हाताला बसलेल्या तेजश्रीच्या कानफाटात वाजवली. पुन्हा एकदा सुरज हात उचलणार तेवढ्यात तनिष्काने पळत येऊन त्याचा हात धरला तेव्हा त्याच्या लक्षात आलं कि 'आपण चुकीचं वागलोय' पण; तेजश्रीने केलेल्या कृत्याचं हेच फळ तिला मिळायला हवं होतं.
सुरज डोकं थंड करण्यासाठी बाहेर जायला निघाला तेवढ्यात हर्षिता ओरडली, "अहो पकडा तिला,पळाली ती."
सुरजने मागे पाहिलं तेव्हा क्षणाच्या आत त्याला प्रसंगाचं गांभीर्य कळलं. नुकतीच हर्षिताने टेबल वर-लिंबू चिरण्यासाठी-आणून ठेवलेली सुरी गायब झालेली होती. हर्षिता आणि तनिष्का-खोलीकडे पळालेल्या-तेजश्रीच्या मागे धावले. भीतीने सुरजच्या अंगात विजेची चपळाई आली. त्याने आधी हर्षिताला मग तनिष्काला रस्त्यातून
बाजूला ढकललं आणि खोलीकडे पळाला. एका क्षणाचीच गोष्ट होती जर तेजश्रीने दरवाजा लावला तर खेळ संपणार होता. त्याने डावा हात दरवाजाच्या चौकटीत घातला. . .
सुरजच्या किंचाळण्याच्या आवाजामुळे हर्षिता घाबरली. त्याचा डावा हात-तेजश्रीने आतून जोरात ढकललेल्या दरवाज्याच्या आणि चौकटीच्या मध्ये सापडला होता. तेजश्री आतून दरवाजावर धक्का मारतच होती. क्षणासाठीच तेजश्री दरवाजाला पाठ टेकून उभी राहिली आणि. . .
ताकदीनिशी दरवाजा ढकलून सुरज आत आला तेव्हा तेजश्रीला भोवळ आलेली होती. असह्य भीतीमुळे थोड्या काळासाठी तिचा मेंदू बंद पडलेला होता. सुरजने लगेच स्वतःच्या डाव्या हाताने तिचा डावा हात करकचून आवळला आणि तिला उचलून घेतलं, पायाने खोलीचा दरवाजा बाजूला लाथाडला व दरवाज्याकडे धाव घेतली. तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट येण्यासाठी लागणारा वेळ-काळाला संधी साधण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा-खूप जास्त होता. चप्पलचं भान राहिलं नव्हतं,त्याने धडाधड एकेक पायरी सोडून जीना उतरायला सुरुवात केली.
हर्षिताने पटकन गाडीची चावी घेतली आणि तनिष्काला
म्हणाली, "घरीच थांब मी तुला फोन करते."
हर्षितानेपण जीना उतरायला सुरुवात केली.
पहिल्या मजल्यापर्यंत येण्याआधीच सूरजच्या आरोळीने तिला गाठलं, "हर्षिता चावी आण."
हर्षिताने लांबूनच गाडीचा दरवाजा उघडला. गाडीच्या डाव्या हाताला असणाऱ्या सुरजने गाडीचा दरवाजा उघडला आणि तेजश्रीला गाडीत झोपवलं. हर्षिता तिच्या शेजारी येऊन बसली. पळत जाऊन सुरजने चावी फिरवली आणि गाडी रस्त्याला लावली. गाडीच्या सीटला टेकला तेव्हा त्याच्या उजव्या खांद्यातून वेदनेची कळ उठली. दुसऱ्या मजल्यावरून उतरताना-तेजश्रीच्या वजनामुळे त्याला वेग सांभाळता आला नाही, जाऊन भिंतीला धडकणार त्याआधीच त्याने उजवा खांदा भिंतीवर आदळला होता. . .
संध्याकाळची वेळ होती. गाडी पार्किंगला लावण्याच्या फंदात न पडता सुरजने डाव्या हाताला असणाऱ्या दवाखान्यासमोर गाडी उभी केली. पळतच जाऊन दरवाजा उघडला, खाली डोकं घातलेल्या हर्षिताच्या डाव्या दंडाला पकडून तिला बाहेर खेचलं आणि तेजश्रीचा डावा हात पुन्हा स्वतःच्या हातात घट्ट दाबला.
"सर, हॅलो सर, सर, वील यू प्लीज स्टे काल्म?" दवाखान्यातील रिसेप्शनिस्ट अचानक झालेल्या प्रकाराने गोंधळून तिच्या जागेवरून बाहेर पळाली होती आणि ती सुरजला शांत राहण्यासाठी विचारत होती.
"इट्स अॅन इमर्जन्सी, फॉर गॉड्स सेक!" सुरज ओरडला. त्याला परिसराचं भान राहिलं नाही. "आता पटकन डॉक्टर बोलवा, प्लीज!" सुरज काकुळतीला आला.
तोंडात साडीच्या पदराचा बोळा घालून उभी असणारी हर्षिता काही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतीच. लवकरच एक स्ट्रेचर आणला गेला आणि तेजश्रीला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आलं. दुसऱ्याच मिनिटाला डॉक्टर आले आणि त्यांच्यासोबत चार-पाचजण भराभर ऑपरेशन थिएटरमध्ये शिरले.
अनवाणी पायांना थंड फरशी जमवून घेत नव्हती किंवा मनातील अस्वस्थता स्वस्थ बसू देत नव्हती. सुरज वेगात येरझाऱ्या घालत होता. तोंडात पदराचा गोळा घालून उभी असणारी हर्षिता त्याच्याकडे मूढपणे पाहत होती.
"मी बघतो बाहेर रिसेप्शनवर, तू इथेच थांब." सुरज जाता-जाता म्हणाला.
हर्षिताने सुरजचा डावा हात स्वतःच्या दोन्ही हातात घेतला.
सुरजच्या हातावरचं रक्त एव्हाना गोठल होतं पण त्याच्या हाताची विदीर्ण झालेली अवस्था पाहून हर्षितला कंठ फुटला. तिने हमसुन रडायला सुरुवात केली, सुरजला मिठी मारली आणि तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बराच वेळ दोघेही स्तब्धपणे एकमेकांना कवटाळून उभे होते. हर्षिता सावरली तसा सुरज रिसेप्शनकडे वळला.
'तेजश्री सुरज वाघिरे.' त्या कागदांवर काय लिहिलय आणि त्याचे परिणाम काय होतील हे समजण्याच्या भानगडीत न पडता सुरजने विचारलं, "माफ करा पण तुम्ही फक्त सही कुठे करायची ते सांगता का?"
"इथे,इथे,इथे. . ." सुरजकडून पुष्कळ ठिकाणी सह्या करून घेतल्या आणि रिसेप्शनिस्ट तरुणीने इशाऱ्यानेच सुरजला गालावरच्या रक्ताच्या डागांची आठवण करून दिली. " सर तुम्हाला अमाऊंट भरावी लागेल."
तिला पुढे बोलू न देता सुरजने खिशातील पाकिटातून डेबिट कार्ड काढलं, स्वाईपमशीन मधून आलेली रिसीट आणि कार्ड पुन्हा पाकिटात कोंबल. रिसेप्शनिस्ट फाईल बनवण्याच्या कामात गुंतून गेली.
प्रसाधनगृहात आला तरी सुरजच्या डोक्यात विचारांनी थैमान घातलेलंच होतं. विचारांच्या गर्दीमुळे त्याला हात धुताना-डाव्या हाताला पाणी कापल्याच्या-वेदना जाणवल्या नाहीत. . .
"दोन्ही मुलीच!" बाबांची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
"असू द्या ना बाबा. मुलगी म्हणजेपण बाळच असतं कि!" सुरज समजावत होता.
"तसलं मला समजावू नको,अजून एक बाळ होऊ दे. मुलगा झाला तर ठीकच होईल सगळं!"
"आज आई असती तर तुमचं असं बोलण्याच धाडस झालं नसतं बाबा." सुरज शांतपणे त्याची वास्तवी बाजू मांडत होता. "आणि आम्हाला तिसरं बाळ नकोय."
बाबा रागात म्हणाले, "मला शिकवू नको. सांगतोय तसं कर नाहीतर तुला काय करायचय ते कर आणि मला घालवून टाक गावाला. मी पडतो तिकडे एकटा!"
बाबांची ही मात्र यावेळी लागू पडणार नव्हती, "तुम्ही येताय का,बाळ पहायला? मी पाहिलय रात्रीच,आता तुम्हाला पहायचं असेल तर चला." सुरज.
"नाही येत! कर तुला काय करायचय ते!"
"मी करतो तुम्हाला गावाला पाठवण्याची व्यवस्था, उद्या!"
तेजश्रीला कडेवर घेऊन बाहेर निघताना सुरजने पाहिलं तेव्हा बाबा अस्वस्थतेने गुडघ्यावर बोटं आपटत होते.
सुरजच्या कडेवर बसलेली तेजश्री दोन्ही हातांचा चंबू करत सुरजला म्हणाली, "बाबा आपलं बाळ एवढं छोटं का आहे?"
"तू पण तेवढीच होतीस, छोटीशी आणि सगळी बाळे तेवढीच असतात."
"मी पण छोटी होते!" तेजश्रीने अविश्वासाने विचारलं, "किती छोटी?"
"इतकुशी, तीन किलोची,गोरीपान आणि सुंदर. . ."
सुरज बडबडत राहिला आणि तेजश्री आश्चर्याने ऐकत राहिली.
मधेच तीने सुरजच्या ओठांवर हात ठेवला,"बाळाचं नाव काय ठेवायच बाबा?"
"माहीत नाही तुला?" सुरजने तिला विचारलं,मानेनेच नकार देणाऱ्या तेजश्रीला सुरज म्हणाला, "बाळाचं नाव ठेवायचं-तनिष्का!"
"बाबा आज आमच्या कॉलेजमध्ये सर्वांची उंची चेक केली. पीटीची परीक्षा होती ना,म्हणून." तेजश्री सुरजला सांगत होती, "माझी उंची किती भरली माहीतीये?"
सुरजने जेवताना मध्येच थांबून उत्सुकतेने विचारलं, "किती?"
"पाच फुट-दोन इंच." तेजश्रीने सांगितलं तसं सुरजने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि सगळे जेवायला लागले.
वर्षभर आधीचाच प्रसंग. सतराव्या वर्षी अकरावीत गेलेली तेजश्री सुरजच्या समोर बसलेली होती. गोरा-गुलाबी छटा असलेल्या रंग, सुडौल तब्येत-अगदी तिच्या गोल चेहऱ्याला शोभेल अशीच, तेजश्रीची थोडीशी पसरट असणारी हनुवटी तिच्या काळ्या डोळ्यांत आणखी सौंदर्य भरत होती.
"बाबा मला केसपण वाढवायचे आहेत."
"मोठे तर आहेत." तेजश्रीच्या खांद्याएवढ्या केसांकडे पाहत सुरज म्हणाला.
"हिचे बघा कि!" समोर बसलेल्या तनिष्काकडे चमचा रोखून तेजश्री म्हणाली.
तेजश्री असं म्हणल्याबरोबर तनिष्काने तोऱ्यात तिची कमरेएवढी वेणी मागे झटकली. तनिष्काचा अचानक वाढलेला तोरा पाहून सगळे हसले आणि पुन्हा जेवू लागले. . .
मघाशी पुरुषी मानसिकतेने अडवून धरलेले अश्रू आता बाहेर पडू लागले. कितीवेळ प्रसाधनगृहातल्या बेसिन वर तोंड धरून सुरज रडत होता माहित नाही. दवाखान्यात कोणीतरी-म्हणजे प्रत्येकाने रडणे स्वाभाविक आहे किंबहुना आवश्यक आहे. कदाचीत तो अलिखित नियमच असावा, 'सर्वांना दुःखाची चव चाखायला लावणारी जागा?
दवाखाना!' सुरजने हातावरच्या रक्ताबरोबर तोंडदेखील धुतलं आणि तो प्रसाधनगृहातून बाहेर आला.
"तू ये आवरून,मी आहे इथे." हर्षिताच्या शेजारील खुर्चीवर बसत सुरज म्हणाला.
हर्षिताने सुरजला मोबाईल मागितला आणि घरी एकट्याच असणाऱ्या तनिष्काला फोन लावला. हर्षिता अजूनही सावरलेली नव्हतीच पण तनिष्का समोर धीट राहणं महत्त्वाचं होतं.
"काय झालं?" घाबऱ्या आवाजात तनिष्काने विचारलं.
"दवाखान्यात पोहोचलोय बाळा आम्ही आणि ताईला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलय. हर्षिता शांतपणे बोलत होती. "तुला यायचं असेल तर बाबांना घ्यायला पाठवू का?"
"नको-नको राहू दे तिला घरीच." सुरज म्हणाला. "आज रात्री सोबत झोपण्यासाठी पूजाला बोलव म्हणावं."
हर्षिता तनिष्काला म्हणाली,"नको येऊस तू आणि पूजाला बोलव तुझ्यासोबत झोपायला."
आधी सुरजकडून आणि नंतर हर्षिताकडून एकसारखाच प्रतिसाद ऐकल्यावर तनिष्काने विचारलं, "कोणत्या दवाखान्यात नेलय ताईला?"
"ई-हेल्थकेअर."
"डॉक्टर काय म्हणाले,ताई ठीक आहे ना?"
"अजूनतरी डॉक्टरांनी काही सांगितलं नाहीये पण तू काळजी करू नको." इतका वेळ खंबीर असणारा हर्षिताचा आवाज तुटायला लागला. "जेवण करून घे. ठेवू का फोन?" हर्षिता फार वेळ खंबीर राहणार नव्हती.
"बाबांचा हात बरा आहे ना?" तनिष्काच्या आवाजातली काळजी स्पष्ट जाणवत होती.
"हो बरा आहे." सुरजचा आवाज फोन मधून तनिष्कापर्यंत आला आणि फोन बंद झाला.
हर्षिता खुर्चीवरून खाली लटकत असणाऱ्या गुडघ्यांवर डोकं टेकवुन रडत होती आणि सुरज शांतपणे हाताची घडी घालून स्तब्ध बसला होता. या प्रसंगात काय बोलायचं? एकमेकांना कसा धीर द्यायचा? एकमेकांच सांत्वन कसं करायचं? किंवा काय म्हणून करायचं? याची कल्पना दोघांनाही नव्हती!
बराच वेळाने सुरज उठून म्हणाला,"मी गाडीचं बघून येतो काय झालय, उगीच इतरांना ट्रॅफिकचा त्रास नको!"
गाडी पार्किंगला घेतली. सुरजने खिशातला मोबाईल काढला, फोन लावला. थोड्या वेळानंतर फोन उचलला गेला.
"हॅलो सर. सॉरी ते जरा. . ."
समोरच्याचं बोलणं मध्येच तोडत सुरज म्हणाला, "तुला उद्या संपूर्ण ऑफिस एकट्यानेच सांभाळावे लागेल. सांभाळू शकशील?"
"काय झालं सर? सगळ ठीक तर आहे ना?"
"त्याविषयी मी आल्यावर सांगेन तुला." सुरज.
"ठीक आहे सर." सुरज फोन ठेवणार इतक्यात पलीकडून आवाज आला. "पण उद्याच्या मीटिंग्स? सर."
"पोस्टपॉन देम! मी परवा येण्याचा प्रयत्न करेन, जर कोणी विचारलच तर 'इमर्जन्सी फॅमिली मॅटर' आहे असं सांग आणि खरच एक मोठा अपघात झालाय पण त्याविषयी नंतर बोलूयात,ओके?"
"ठीक आहे सर." पलीकडून आवाज आला आणि सुरजने फोन ठेवून टाकला. . .
"मग कसं काय चाललंय कॉलेज?" सुरजने तेजश्रीला विचारलं. हर्षिता स्वयंपाकघरातून बनवलेल जेवण टेबल वर आणण्याची तयारी करत होती आणि तनिष्का तिला मदत करत होती.
"नथिंग सिरीयस." फोन मधून डोकं वर काढत तेजश्री
म्हणाली, "कॉलेज मध्ये काय होणार? मित्र-मैत्रिणींना भेटले थोडासा अभ्यास केला आणि आले माघारी!" तेजश्रीने दोन्ही पाय खुर्चीवर उचलून छातीजवळ बांधले आणि हनुवटी गुडघ्यांवर टेकवून पुन्हा मोबाईलमध्ये लक्ष घातलं.
"बारावीचं वर्ष आहे बाळा काळजी घे." सुरजने सावधानतेने विषयाला हात घातला. "बाकी काही नाही आणि या वयात होणारं प्रेम वगैरे सगळ्या कल्पना आहेत. त्या खोट्या प्रेमाच्या मागे धावण्यात मजा
नसते!" सुरज अगदी शांतपणे तेजश्रीला समजावत होता.
प्रेमाचा विषय निघाला तशी तेजश्री सावध झाली. "तुम्हाला सांगितल ना बाबा इट्स ओव्हर! माझं फालतू प्रेमप्रकरण अकरावीतच संपलय आणि तरीपण मी घेईन काळजी त्यामुळे तुम्ही काळजी करू नका." एका क्षणासाठी अजयचा चेहरा तेजश्रीच्या डोळ्यासमोर आला पण तिने विचार झटकला.
"तुला खरं सांगू का मला बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवायला अजिबात आवडत नाही, मग भले तो माझा जिवलग मित्र असेल तरीपण! निदान जेव्हा ते कुटुंबाबद्दल बोलतात तेव्हातरी मी कोणाचचं खरं धरत नाही." सुरज सांगत होता. "पण जर तू माझ्याशी खोट बोलत असशील तर मी तरी काय करू सांग बर?"
सुरजच्या बोलण्यातील आर्तता तेजश्रीच लक्ष वेधून घेण्यासाठी पुष्कळ होती. "काय खोटं बोलले बाबा मी? खरतर सांगतेय आणि तुम्हाला कशावरून वाटतय मी खोट बोलले म्हणून?"
"ते सोड मला विश्वास आहे तुझ्यावर आणि तू पुन्हा त्या मुलाच्या नादी लागणार नाहीस हे मलाही माहितीये." सुरज हर्षिताला म्हणाला, "झाली का जेवणाची तयारी?"
"आले-आले." स्वयंपाकघरातून हर्षिताने साद घातली.
सुरजच्या आवाजात पुन्हा एकदा झालेला बदल तेजश्रीने ओळखला. "बाबा काय झालय? खरं-खरं सांगा." तेजश्रीने हातातला मोबाईल टेबलवर ठेवला आणि दोन्ही पाय खाली जमिनीवर सोडले.
तेजश्री ऐकण्यासाठी जवळ सरकली तसं सुरजने बराच वेळ शब्दांची जुळवाजुळव केली आणि म्हणाला, "जोंधळे म्हणत होता त्याने पाहिलं तुला कॉलेज च्या बाहेर-म्हणजे शहरात-कोणत्यातरी मुलाच्या गाडीवर पण; त्याला पूर्ण खात्री नाहीये!
गाडीतून उतरून सुरज पुन्हा एकदा ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येऊन बसला. हर्षिता अजूनही शून्यात नजर लावून बसलेली होती.
"काय होतय?"
हर्षिताने मानेनेच नकार दिला,एक दीर्घ श्वास घेतला आणि सुरजच्या खांद्यावर डोकं टेकवलं. सव्वानऊ वाजून गेले होते.
"तुला भूक लागलीये का?" सुरजने विचारलं.
"नाही." हर्षिता म्हणाली, "पण डोकं दुखतय."
"एक काम कर,तू इथेच बस. मी मेडिकल मधून गोळी आणतो आणि कॅन्टीन मधुन तुला खाण्यासाठी काहीतरी आणतो."
सुरज जाण्यासाठी उठला तसं हर्षिताने त्याचं उजव मनगट पकडलं. बहुदा तिला अजून थोडा आधार हवा होता. तिच्या डाव्या हातातुन स्वतःच मनगट सोडवल आणि सुरज निघाला. हर्षिता त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत शांत बसली होती.
आधी सुरजने कॅन्टीन गाठलं तिथून पाण्याची बाटली घेतली, खाद्यपदार्थ घेतले मग मेडिकल गाठलं स्वतःसाठी पेनकिलर घेतली आणि हर्षितासाठी डोकेदुखीची गोळी घेतली. मेडिकलच्या बाहेरचं त्याने पाण्याची बाटली डाव्या हाताच्या बगलेत धरून उघडली मग पेनकिलर तोंडात टाकली.
सुरज माघारी आला तेव्हा हर्षिताच्या शेजारी जोंधळे उभा होता. हर्षिताने पुन्हा एकदा पदर डोळ्यांना लावलेला होता. सुरजने खाद्यपदार्थांची पिशवी व गोळ्यांच पाकीट हर्षिताकडे दिलं.
"ते बघ तिथे वेटिंगरूम आहे." हाताने दाखवत सुरजने सांगितलं. "जेवण केल्यानंतरच गोळी खा!"
हर्षिताने सुरजचा मोबाईल घेतला. "तनिष्काला बोलायचय." ती म्हणाली.
हर्षिता गेली तसं मग सुरज आणि जोंधळे खुर्चीवर बसले. बराच वेळ कोणीच काही बोललं नाही.
"ठीक होईल सगळं,घाबरू नकोस! पूजा गेलीये तनिष्कासोबत झोपायला. मीपण तनिष्काला दवाखाना विचारला आणि आलो लगेच."
सुरजने मानेनेच होकार दिला. जोंधळे पुढे बोलत राहिला बहुदा हर्षिताने त्याला प्रसंग सांगितला
असावा.
"माफ कर मला! जर कदाचित मी तुला तेजश्रीला पाहिल्याची गोष्ट सांगितली नसती तर आज आपण सगळे घरी असतो!" जोंधळे म्हणाला.
सुरज शांतपणे म्हणाला, "समज जर मी पूजाला पाहिल असतं आणि तुला सांगितलं असतं तर तू मला दोषी धरलं असतं का?"
सुरजचा मुद्दा बरोबर होता. सुरज आणि जोंधळेची मैत्री तरुणपणाच्या दिवसांपासून चालत आलेली होती, त्यात पुन्हा दोघांनी एकाच सोसायटीत घर घेतल्यामुळे मैत्री अजुनच घट्ट झाली. सुरज आणि जोंधळेच कुटुंब फक्त वेगळ्या मजल्यावर राहत होतं, त्यांचा परिवार मात्र एकच होता!
"संगीतापण नेमकी कालच माहेरी गेलीये, ती असती तर वहिनींना धीर देता आला."
"बरं पडल असतं तर वहिनी असत्यातर. खरंतर मीच स्वतःला मोठ्या मुश्किलीने जखडून ठेवलय, मग हर्षिताची काय अवस्था असेल?" सुरज असं म्हणाला आणि परत एकदा शांततेने तीचं राज्य प्रस्थापित केलं. . .
"सुरज मला तुझ्याशी थोडं बोलायचय,कुठे आहेस?" जोंधळे.
"आहे खालीच बागेत. आता जेवायला चाललोय,का रे? काय झालं?" सुरजने विचारलं.
"आलोच मी दोन मिनिटात,आल्यावर सांगतो."
जोंधळेने फोन ठेवला आणि खाली सोसायटीच्या बागेत आला. सुरज त्याची वाट बघत उभा होता.
"बोल ना." सुरज म्हणाला.
सुरुवातीला जोंधळे बराच वेळ शांत राहिला. एकतर शब्दांची जुळवाजुळव करत होता किंवा सांगाव कि सांगू नये या विचारांच्या कात्रीत सापडला होता-ही दोन्ही कारणे खरी होती.
"चल जातो मी. महत्त्वाचं नसेल तर नंतर बोलूया." सुरज जायला निघाला तसं जोंधळे त्याला बाकावर बसण्यासाठी घेऊन गेला. दोघे बाकावर बसले.
"तू मला चांगला मित्र मानतोस?" जोंधळे.
"हा काय प्रश्न झाला?" जोंधळेच्या अनपेक्षित आणि अर्थहीन प्रश्नाने चक्रावलेला सुरज म्हणाला पण; त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता जोंधळे प्रश्न विचारतच राहिला.
"मी तुला कधीच खोटं किंवा खोट्या भावनेने काही सांगणार नाही यावर तुझा विश्वास आहे ना?" जोंधळेच्या आवाजातील गंभीरतेने सुरजला उत्सुकतेच्या कोपऱ्यावर नेऊन सोडलं.
"बोल ना काय म्हणतोस,स्पष्ट बोल. तुझ्यावर विश्वास आहे माझा!" सुरजने जोंधळेच्या पाठीवर थाप मारली.
"म्हणजे बघ मलापण एक मुलगी आहे, तुझ्याच मुलीच्या वयाची त्यामुळे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण एकाच स्थितीत आहोत,आता कसं सांगू तुला. . ." जोंधळेला शब्द सापडत नव्हते.
"नमनाला घडाभर ओतू नकोस,सांग एकदम बिनधास्त." सुरज.
"मी तेजश्रीला पाहिल रे आज-कॉलेजच्या बाहेर-मुलाच्या गाडीवर! खरंतर मी ऑफिस मधून आमच्या दुसऱ्या शाखेत चाललो होतो तेव्हा, सिग्नल वर बऱ्याच पुढे मला त्यांची गाडी दिसली." जोंधळे म्हणाला, "मी तेजश्रीला लगेच ओळखलं पण ती मला ओळखेल म्हणून
मी-पुढे जाऊन-मुलाचा चेहरा पाहू शकलो नाही."
क्षणापूर्वीचा मिश्कीलपणा सुरज आता हरवून बसला.
काळजी, भय, प्रेम, राग सर्व भावनांचा स्फोट त्याच्या मेंदूत झाला होता.
"अरे तुला बोललो नव्हतो का,मागच्या वर्षी? हे तेच प्रकरण असणार बहुतेक! ज्या दिवशी मला कळालं तेजश्रीचे हे असले धंदे चालू आहेत त्याच दिवसापासून मला चिंतेने ग्रासून टाकलय. तिला सांगितलेलं कळत नाही पण जग वाईट आहे रे! तेजश्रीतर मला तेव्हाच म्हणाली होती कि आता ते प्रकरण थांबलय मात्र, तू वेगळच सांगतोयस!" सुरज बरळत होता.
त्याला शांत करत जोंधळे म्हणाला,"धंदे काय म्हणतोस? वयच आहे त्यांचं! आपल्या वयात आपली प्रेमप्रकरणे झाली नाहीत का? आणि अशा गोष्टी आता कोणीच टाळू शकत नाही, काळ पुढे सरकलाय.
अशा गोष्टींमध्ये चुकीच्या संगतीत पडल नाही तर आपणपण काळजी करण्याचं कारण नाही." जोंधळे समजावतच राहिला. "आणि अशा गोष्टी प्रेमाने हाताळायच्या असतात,रागाने नाही! कदाचित उद्या माझ्यावर असा प्रसंग आला तर तूपण मला हेच सांगशील कि 'मुलीवर राग धरू नकोस!' " जोंधळे शांत झाला.
बराच वेळ सरला तेव्हा सुरज बाकावरून उठून घरी निघाला.
"आत्ताच जाऊ नकोस घरी. आधी माझ्यासोबत थोडसं चाल, मन शांत करून घे आणि मगच घरी जा. हा विषय उद्यावर ढकल." जोंधळे काकुळतीला आला. "आज तू-निदान माझ्यासाठीतरी-तेजश्रीला या विषयावर काहीच बोलू नकोस!"
जोंधळेच्या या वाक्यावर सुरजने मानेनेच होकार दिला. बराच वेळ जोंधळे आणि सुरज गप्पा मारत-खरंतर जोंधळे एकटाच बोलत होता-बागेत फिरत राहिले. . .
जोंधळेनी सुरजचा डावा हात हातात घेतला आणि सुरजची तंद्री भंग पावली.
'काय झालय?' जोंधळेनी डोळ्यांनीच खुणावलं.
"काही नाही दरवाजात अडकलाय हात." सुरज जोंधळेला म्हणाला.
"तेजश्रीला जिन्यावरून घेऊन जाताना पाहिलं तुला आणि वहिनीला. मी खाली आलो तोवर तुम्ही निघून गेला होतात. जेव्हा तनिष्काने पूजाला बोलवलं तेव्हा मला दवाखाना कळाला." जोंधळे सुरजला सांगत होता.
हर्षिता बराच वेळ रिसेप्शन पाशी उभी होती. रिसेप्शनच्या शेजारीच गणपतीची छोटीशी मूर्ती ठेवलेली होती. मालिकांमध्ये दवाखान्यातील-कठीण प्रसंग येतात तेव्हा दाखवलं जाणारं-गणपतीच्या मूर्तीच नाट्य
हर्षिताला अवास्तवी वाटायचं. मात्र, आज जेव्हा ती मूर्तीकडे पाहत होती तेव्हा तिच्या श्रध्देला पारावार उरला नव्हता.
'माशाचं पाण्यात झोप घेणं त्यांच्या वंशाला जाईपर्यंत कळत नाही'-असंच काहीसं आज हर्षिताच्या बाबतीत घडत होतं. या दुःखाच्या घडीला तिचा आधार एकच होता, फक्त एक-देव! निसर्गातील एक अज्ञात, गुढ, सुप्त शक्ती! या शक्तीच्या पाठिंब्याची गरज तिला जन्मात कधीच वाटली नव्हती तेवढी आज वाटत होती. तेजश्रीची अवस्था आठवली तसे तिचे डोळे पुन्हा एकदा पाणावले. मनोमन तीने देवाला एकच प्रार्थना केली, मागणं मागितलं. तिची ही प्रार्थना, मागणं पूर्ण व्हावं म्हणून ती सर्वस्व पणाला लावायला तयार होती. मात्र, देवाच्या रूपात आपण ज्या शक्तीला पाहतो, अनुभवतो ती सुप्त शक्ती कधीच काही
मागत नाही त्या शक्तीला जे हवंय ते ती न मागता घेतच असते. तिथे आपली मर्जी चालत नाही!
हर्षिता माघारी आली तेव्हा साडेदहा वाजून गेले होते. अजूनही जोंधळे आणि सुरज खुर्च्यांवर तसेच बसून होते, निश्चल. हर्षिताने सुरजच्या शेजारची खुर्ची पकडली.
अकराच्या आसपास डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. सुरज, हर्षिता व जोंधळे तिघेही उठून उभे राहिले. डॉक्टरांचा चेहरा कशाचीच शाश्वती देत नव्हता.
"पालक?" डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरकडे बोट दाखवत विचारलं. सुरजने मानेनेच होकार दिला. "माझ्यासोबत या." डॉक्टर निघाले तसे सुरज आणि हर्षिता त्यांच्या मागोमाग चालू लागले.
'कॉन्फरन्स रूम' दारावरची पाटी वाचून सुरज आत शिरला.
"सर्जरी वेन्ट सक्सेसफुल!" हर्षिताच्या चेहऱ्यावर उमटलेलं प्रश्नचिन्ह पाहून डॉक्टर म्हणाले, "शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे! पेशंटला काहीच धोका नाहीये! मात्र. . ."
इतकं ऐकून आनंदाने फुललेला सुरजचा चेहरा पडला.
"मात्र काय डॉक्टर?" हर्षिता घाईत म्हणाली.
"पेशंटचा रक्तदाब अस्थिर झालेला आहे. सध्यातरी सिव्हीअर बिल्डिंग म्हणजे अतिप्रमाणात रक्तस्राव न झाल्याने घाबरण्याचे कारण नाहीये पण अजून काही तास आम्हालादेखील काहीच सांगता येणार नाही. पेशंटला बीपी सपेंट्स दिली आहेत आणि इतरही औषधे आम्ही देतोय. पेशंटला साधारण उद्या पहाटेपर्यंत तरी जाग येण्याची लक्षणे नाहीयेत. अजून एकदा-गरज वाटली तरचं-पेशंटला झोपेची औषधे देखील द्यावी लागतील. एकूणच काय तर पेशंट च्या जीवाला धोका नाहीये आणि आम्ही. . .
डॉक्टर बरच काही बोलत राहिले. शस्त्रक्रिया का करावी लागली? आता याचे परिणाम पेशंटच्या मनावर कसे होतील आणि खूप काही. मात्र, सुरजच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालेलं होतं. . .
"दुसरी कोणीतरी असेल जोंधळे काकांना दिसलेली!" तेजश्री म्हणाली.
"खरंच?" सुरजने तिच्या डोळ्यात पहात विचारलं, तेजश्री शांत राहिली. "खरंच तू गेली होतीस आज कॉलेज ला?" पुन्हा तेजश्रीची शांतता सर्व काही बोलून गेली.
"तुला हजार वेळा सांगितलय बाळा कि तो मुलगा चांगला नाहीये आणि या वयात असल्या गोष्टी नकोच आहेत. अनुभवांचे बोल ऐकायला शिका! मी तुला खोटं सांगणार नाहीये." सुरज प्रेमाने समजावत होता. "अभ्यासाचं वर्ष आहे या वर्षी अभ्यास केला तरं पुढच आयुष्य सुखात जाईल नाहीतर मग फार बिकट
परिस्थिती आहे!"
"हो माहितीये. मला समजतय सगळं." तेजश्री विषयाला
उडवण्याचा प्रयत्न करत होती. "मला पटतय बाबा सगळं. मी नाही करणार शिक्षणाकडे दुर्लक्ष, फक्त आजच गेले होते मी मित्र-मैत्रिणींसोबत-लेक्चर बंक करून! अजयचा आणि माझा काही संबंध नाहीये! सगळे मित्र-मैत्रिणी मिळून आम्ही पिक्चरला गेलो होतो. त्यावेळी फक्त थिएटर पर्यंत मी गेले अजयच्या गाडीवर! हे सगळं चालतं बाबा! त्यात काही नवीन नाहीये!"
"नवीन काय आहे आणि काय नाही ते तू मला समजावू नकोस." तेजश्रीकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने सुरज चिडला पण त्यांनी संयम बाळगला. "तुला जे सांगतो ते ऐकत जा, काळाच्या बरोबर चालणं गरजेचं नाहीये आणि वाईट गोष्टीत तर मुळीच नाही! आम्हालापण तरुणपण होतं-त्याच अनुभवावरून सांगतोय."
तेजश्रीच्या चेहऱ्यावरचे भाव तसूभर देखील हलले नाहीत. सुरजच दरवेळेसचं तेच-तेच 'प्रवचन' आता तिला ऐकवत नव्हतं. सुरज तरीही समजावत होता.
"उद्याच त्या मुलाचं प्रकरण बंद कर नाहीतर मला कॉलेज मध्ये भेटायला यावं लागेल!" सुरजची ही मात्रा बरोबर लागू पडली.
'कॉलेज मध्ये येणार' तेजश्रीने विचार केला. "त्याची काहीच गरज नाहीये मी करते हँडल बरोबर." थोडं थांबून ती म्हणाली, "तुम्हाला मार्क्स हवेत तर मिळतील मार्क्स!"
सुरजचा संयम सुटला. एव्हाना हर्षिता आणि तनिष्कापण येऊन उभ्या राहिल्या होत्या मात्र सुरजच्या रागात त्यांनी आडपाया घातला नाही.
"म्हणजे मार्कसाठी प्रेम करतो का आम्ही तुमच्यावर? मार्क साठी सांभाळलय का तुम्हाला? सांगितलेल ऐकायचं नसेल तर मलापण वेगळ्या भाषेत समजावता येतं!"
तेवढ्यात तेजश्रीचा मोबाईल वाजला आणि सुरजकडे दुर्लक्ष करून तेजश्रीने नकळतपणे मेसेज पाहिला. तेव्हा सुरजने रागात तिच्या हातातला मोबाइल हिसकावून मागच्या भिंतीवर भिरकावला!
"काय वेडे दिसतोय का आम्ही?" सुरज उठून उभा राहिला होता. "शिकू वाटत असेल तर शिकायचं नाहीतर जायचं राहायला आत्याकडे किंवा मामाकडे आणि तेपण मंजूर नसेल तर घरी बसून खावा दोन-तीन वर्षे! त्यानंतर बघता येईल लग्नाचं!"
"हा तुम्हाला तर मला हाकलायचचं आहे ना?" तेजश्री रागानेच चिरकली. "बरोबर आहे. . ."
तेजश्री पुढे काही बोलणार तेवढ्यात हर्षिताने दोघांना शांत केलं.
"जाऊद्या लहानच आहे ती! नंतर बोला, जेवण झाल्यावर." हर्षिता तेजश्रीला म्हणाली, "तूपण गप्प बस."
सुरज खुर्चीवर बसला. हर्षितापण खुर्चीवर बसणारच होती मात्र सुरी स्वयंपाकघरातच राहिली होती. तनिष्काला खुर्चीवर बसवून ती स्वयंपाकघराकडे वळली. हर्षिता माघारी येतच होती तेव्हा रागाने फणफणलेली तेजश्री हळू आवाजात पुटपुटली-खरंतर प्रसंगाचा आणि तिच्या निरर्थक बडबडीचा काहीच संबंध नव्हता. कदाचित मोबाईलचा
राग तिच्या डोक्यात असावा.
"सांभाळायचं नव्हतं तर काढायचचं कशाला?"
काय होतंय हे कळायच्या आतच सुरज खुर्चीवरून उठला आणि अनावधानाने त्याने संपूर्ण ताकदीनिशी उजव्या हाताला बसलेल्या तेजश्रीच्या कानफाटात वाजवली!
पळत येऊन हर्षिताने तेजश्रीच डोकं दोन्ही हातात धरल. "काही कळतं का नाही तुम्हाला? एवढ्या जोरात मारलं पोरीला आणि मारण्यासारखं झालय तरी काय?" हर्षिताच्या डोळ्यातून आसवं गळायला लागली.
तेजश्रीने रागानेच हर्षिताला दुर ढकललं. त्यामुळे चिडून सुरज आणखी एकदा हात उचलणार तेवढ्यात तनिष्काने पळत येऊन त्याचा हात धरला. तनिष्काचे भेदरलेले डोळे त्याला वास्तवात घेऊन आले.
पश्चातापात सुरज दरवाजाकडे वळला. . .
डॉक्टरांशी बोलून माघारी आल्यावर सुरज आणि हर्षिता पुन्हा एकदा खुर्चीवर बसले. हर्षिताने जोंधळेला डॉक्टर काय म्हणत होते ते-तीला आठवेल तेवढं-सांगितलं. पेशंट सुखरूप आहे,ठीक आहे या भावनेने तीघेपण थोडेसे निर्धास्त झाले. जोंधळे वेटिंगरूमकडे गेला.
हर्षिता सुरजला म्हणाली, "तुम्ही जाऊन हाताला पट्टी बांधून येता का? दुखत असेल ना फार?"
मानेनेच 'नाही' म्हणून सुरज तसाच बसून राहिला. थोड्याच वेळात त्याने निर्णय बदलला आणि हर्षिताला म्हणाला, "तू बस इथेच, नाहीतर वेटिंगरूममध्ये जाऊन आराम कर. मी येतो हाताला ड्रेसिंग करून." सुरज पुढे म्हणाला, "आणि उगाच जास्त काळजी करू नकोस होईल
सगळं नीट!"
सुरजकडून येणाऱ्या याच आधाराच्या शब्दांची ती वाट बघत होती मात्र थोड्या वेळापूर्वी सुरज स्वतःच भावनेच्या भोवऱ्यात फसलेला असताना तिला आधार कसा काय देऊ शकत होता?
"नको मी बसते इथेच,तुम्ही या जाऊन. तुम्ही काही खाल्लय का?" हर्षिता.
"भूक नाही." इतकंच बोलून सुरज रिसेप्शनकडे वळला
रिसेप्शनिस्टला विचारून तो नर्सिंगरुम कडे निघाला.
'पहिला मजला चढला कि डाव्या हाताची चौथी खोली.' तिथे जाऊन तिथल्या लोखंडी खाटावरच्या कडक गादीवर सुरज बसून राहिला. वस्तूंचे निरीक्षण करू लागला-खरंतर डोक्यातले विचार वळवण्यासाठी डोक्याला दुसऱ्या विचारात गुंतवण गरजेचं होतं. रिसेप्शनिस्ट तरुणीने सांगितल्याप्रमाणे दहाच मिनिटात एक पंचविशीतला तरुण त्याच्यासमोर उभा राहिला.
अंगावर ढगळी पांढरी कपडे घातलेल्या त्या तरुणाने
विचारलं, "ड्रेसिंग कुठे करायचय? सर."
सुरजने डावा हात त्याच्या हातात दिला. प्रसाधनगृहातल्या पाण्याने भिजून जखमेची अवस्था विचित्र झाली होती. हाताची अवस्था पाहून त्या तरुणाने पटापट औषधे आणून सुरजच्या शेजारी असणाऱ्या ट्रेमध्ये ठेवायला सुरुवात केली. त्या तरूणाने दुसरा खोलगट ट्रे घेतला, स्टूलवर तो ट्रे ठेवून स्टूल मधे ओढला, स्वतःला बसायला खुर्ची ओढली आणि कॉटवर बसलेल्या सुरजचा डावा हात त्याने खोलगट ट्रेवर धरला.
एकेक औषध जखमेवरून धावायला लागलं तसं सुरजच्या मेंदूला झिनझिन्या आल्या. त्याने डोळे करकचून आवळले, उजव्या हाताची मूठ तोंडावर दाबली. पटकन दुसरा विचार करणं गरजेचं होतं. . .
"बोल ना काय झालय?" हर्षिताचा फोन उचलण्यासाठी-काम सोडून कंपनीच्या टेलिफोन जवळ आलेल्या-सुरजने नाराजी व्यक्त केली.
"पटकन. . . पटकन घरी या. . ." हर्षिताला धाप लागली होती.
सुरज सावध झाला. "काय झालंय हर्षिता?"
"तेजूने नाकात नट घातलाय!"
'नाकात नट!'पुढचं काही ऐकण्याच्या आतच सुरजने रिसिवर आदळला. 'साहेबांशी हुज्जत नंतर घालता येईल.' या विचाराने सुरज धावतच कंपनीच्या बाहेर आला.
त्यावेळी तेजश्री दोन वर्षांची होती. शहराच्या मध्यवर्ती भागातच सुरजने भाडेतत्त्वावर छोटीशी खोली घेतली होती.
गाडीला किक मारून सुरज सुसाट घराकडे निघाला. डोक्यात विचार नव्हताच, फक्त पटकन घर गाठायचं होतं!
'तेजश्री-तेजश्री' सुरजला इतकी अनामिक भीती, इतकं दडपण कधी जाणवलं नव्हतं कारण तेजश्री इतकं प्रेम त्याने कोणावरच केलेलं नव्हतं! हर्षिताच्या निष्काळजीपणाला शिव्यांची लाखोली वाहतच अर्ध्या तासाचा रस्ता पंधरा मिनिटात कापून सुरज दारात उभा होता!
पायरीवर हर्षिता तेजश्रीला घेऊन बसलेली होती. रडत असणारी तेजश्री सुरजला बघताच हळूहळू पळत आली आणि तिने त्याच्या पायाला पकडलं. सुरजने तिचा छोटासा चेहरा वर धरला, नाक पाहिलं.
"काढलाय नट बाबांनी." हर्षिता शेजारच्या एका साठीतल्या माणसाकडे पाहून सांगत होती.
"धन्यवाद बाबा!" बाबांनी शेजारधर्म चोख बजावला होता.
"रडायला काय झालय?" सुरजने तेजश्रीला विचारलं.
"आईने माल्लय." तेजश्री बोबड्या बोलात म्हणाली.
"बरं झाल नट काढायच्या आधी नाही मारलं नाहीतर हुंदके देताना नट श्वासनलिकेत गेला असता!" बाबा मिश्किलपणे म्हणाले, "आणि घरी फोन असण्याचापण फायदा झाला म्हणायचा!"
"हो बाबा,त्यामुळे तर मी वेळेत पोहोचू शकलो." सुरजने तेजश्रीला उचलून घेतलं. . .
नाकात नट घालणाऱ्या तेजश्रीला सुरक्षित पाहून स्वतः निर्धास्त झालेला पूर्वीचा सुरज आठवला आणि सुरजच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.
"जखम दुखल्यावर तुम्ही कायम हसता का?" तरूणाने सुरजचा खांदा थापटून विचारलं.
सुरज भानावर आला. त्याने मानेनेच 'नाही' असं खुणावलं.
"अजून कुठे ड्रेसिंग करायचय का? सर.
ड्रेसिंग मध्ये गुंडाळलेल्या हाताकडे पाहत असताना सुरजला आठवलं. "एक मिनिट." शर्टाची बटणे काढत तो म्हणाला, "इथे कुठेतरी लागलय." त्याने उजवा खांदा तरुणाला दाखवला.
"इथे तर खरचटलय. ड्रेसिंग बांधता येणार नाही पण बॅन्डेड लावता येईल." जणूकाही स्वतःला आज्ञा देत असल्याप्रमाणे त्या तरुणाने जखम धुतली आणि मलम थापून बॅन्डेड लावलं.
"झालं सर."
"थँक्यू."
"धन्यवाद सर!" तरुण थांबून म्हणाला,"पण तुम्हाला काय लागलय सर? म्हणजे तुम्ही सांगू शकत असाल तर? मी कधीच अशी विचित्र जखम पाहिलेली नाहीये." तरूण सांगत होता. "मला प्रत्येक पेशंटची पूर्वकहाणी जाणून घ्यावीशी वाटते म्हणून विचारलं."
"त्याचं असं झालं कि. . ."
सुरज माघारी येऊन बसला तेव्हा घड्याळाच्या दोन्ही काट्यांच मिलन होऊन अर्धा तास उलटून गेला होता. हर्षिताच्या डोळ्यात झोप दाटलेली होती. थंडीपासून बचावासाठी तिने पदर ओढून घेतला होता. सुरज तिच्याशेजारी बसला तसा तिने तिचा डावा हात त्याच्या उजव्या हाताला गुंडाळला. तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि सुरजने तिच्या डोक्यावर!
वेळ टळली होती. सुरजच्या आयुष्यात दुसऱ्यांदा दाटलेल्या असह्य भीतीचा अंत जवळ येत होता.
सुरज भानावर आला आणि त्याने हर्षिताला उठवलं. चक्कर मारून सुरज पुन्हा येऊन बसला. बाहेर पावसाने जोर धरला होता. साडेचार. . .
सकाळी पाळी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची वर्दळ दिसायला लागली. जोंधळे उठून चहा-बिस्कीट घेऊन आला. हर्षिता आवरून आली आणि तिने तिघांसाठी चहा ओतला. साडेपाच. . .
डॉक्टरखोलीतुन बाहेर आले, तेजश्रीला तपासून ते पुन्हा सुरजकडे आले. "अभिनंदन!"
डॉक्टरांचा एकच शब्द सारेकाही सांगून गेला. हर्षिताच्या चेहऱ्यावर सकाळचं पहिलं हसू उमटलं. सुरज आणि जोंधळेनी डॉक्टरांशी हातमिळवणी केली. थोडसं भावनिक बोलणं झालं, थोडसं औपचारिक बोलणं झालं.
"डॉक्टर आम्ही भेटू तेजश्रीला?" हर्षिता.
"तेजश्री." डॉक्टर थांबून म्हणाले, "चांगलं नाव आहे. तेजश्रीला आत्ताच झोपेची औषधे दिली आहेत त्यामुळे तुम्ही तिला भेटू शकत नाही. तिची भूल उतरली कि अजून एकदा चेकअप होईल आणि मग तुम्ही तिला भेटू शकता." जुजबी बोलून डॉक्टर निघून गेले.
"तू कसा आला आहेस?" सुरजने जोंधळेला विचारलं,
अचानक आलेल्या प्रश्नाने जोंधळे गडबडला. "गाडीवर आलोय." जोंधळे म्हणाला, "चल मी येतो सुरज. माझी महत्वाची मिटींग आहे ती मीटिंग संपली कि लगेच येतो माघारी."
"त्याची आवश्यकता नाहीये! सगळं काम आटोपून संध्याकाळी पुजाला घेऊन ये. नाहीतर तू आराम कर, मी पूजाला घेऊन येतो."
जोंधळे निघाला तसा सुरज हर्षिताला म्हणाला, "मीपण घरी निघालोय, तनिष्काला घेऊन येतो. तुलापण यायचंय का?"
'नको.' हर्षिताने मानेनेच नकार दिला आणि सुरजच्या अनवाणी पावलांकडे बोट दाखवल.
"हो येतो बूट घालून!"
पावसाने उघडीप दिली होती. जोंधळेला गाडीवर रवाना केलं आणि सुरज पार्किंग लॉट कडे निघाला. गाडी बाहेर काढून रस्त्याला घेतली तेव्हा सिमेंटच्या गर्दीतून नारायणाच्या कोवळ्या किरणांनी त्याचं स्वागत केलं. आजची पहाट तेजश्रीच्या आयुष्यातील तिसरी सुवर्णपहाट होती-जन्मदिवस, नट प्रकरण आणि रात्रीचं दुर्दैव! या तिन्ही वेळी नकळतपणे सुरजच्या आयुष्यातपण सुवर्णपहाट झाली होती. गेल्या बारा तासात जो थरार सुरजने अनुभवला होता तो कधीच कोणाला कळणार नव्हता. सुरज किंवा हर्षिता कधीच त्यांच्या या यातना तेजश्रीपर्यंत पोहोचवणार नव्हते. कधीच! या बारा तासांपासून आणि
त्या तासांनी आई-वडिलांना आणलेल्या त्रासापासून तेजश्री जन्मभर अनभिज्ञच राहणार होती.
-समाप्त.
[ ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील पात्रे, स्थळ, काळ, वेळ अथवा इतर कोणत्याही गोष्टीचा वास्तवाशी काहीएक संबंध नाही. असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग आहे. सोबतच कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्ती, संघटना किंवा धर्माला दुखावण्यासाठी हे लेखन करण्यात आलेले नाही. असे आढळल्यास आधीच क्षमा मागतो. क्षमस्व.]