सूर्यनारायणाने बुडी मारली त्यानंतर थोड्याच अवधीत काळोखाचं साम्राज्य पसरलं. काळोखाचं साम्राज्य म्हणजे- ज्यांचा प्रेमभंग झालाय त्यांच्यासाठी-दुःखाच साम्राज्य. काळोखाच्या साम्राज्यात सुख फुलत नाही अशातला भाग नाही पण ते सुख फुलवण्यासाठी सोबत असावा लागतो- जोडीदार! सोबत असावं लागतं-प्रेम! आणि सोबत असाव्या लागतात-भावना! एकट्याने जिणं जगायचंच त्या व्यक्तीसाठी काळोखाचं साम्राज्य हक्काची जागा बनवून देतं. जग जेव्हा निश्चल पडलेलं असतं तेव्हा 'ती' जागा दु:खी जीवांना सुखाच्या राज्यात नेऊन सोडण्यासाठी सज्ज झालेली असते. रात्री या जीवांना तिथेच जावं लागतं. जर तुम्ही दुःखी असाल तर तुम्हाला तिथे जावं लागतं आणि जर तुम्ही अति-आनंदी असाल तरीपण तुम्हाला तिथेच जावं लागतं. जर तुम्हाला एकांत हवा असेल तर तिथे जावं लागतं आणि जर तुम्हाला माणसांची गर्दी हवी असेल तरीपण तिथेच जावं लागतं. जर तुम्हाला प्रेमाची आठवण येत असेल तर तिथे जावं लागतं आणि जर तुम्हाला प्रेमाला विसरायचं असेल तरीपण तिथेच जावं लागतं. जीवन नकोसं झाल असेल तर तुम्हाला तिथे जावं लागतं आणि जर जीवनात नवीन सुरुवात करण्याचं धैर्य हवं असेल तरीपण तिथेच जावं लागतं-मद्यालय!
डिसेंबरच्या थंडीमुळे अंगावरच्या कपड्यांच्या विसर पडत होता. मधूनच येणारी वार्याची झुळूक हाडात शिरशिरी आणत होती. घड्याळ दहाच्या पुढे स्थिर झालेलं होतं. अशातच रस्त्याच्या कडेला-असणाऱ्या डांबावरील दिव्याच्या मंद पिवळसर प्रकाशात-एक तरुण शांतपणे चालत निघालेला होता. त्याला निश्चितच कुठेतरी पोहोचायचं होतं; पण घाई नव्हती. दोन्ही हात छातीला घासून काखेत बांधले होते. मधूनच एखादा दीर्घ श्वास घेऊन शरीरात गरमी आणण्याचा त्याचा निष्फळ प्रयत्न चालू होता. पंचविशीतला तो तरुण-सामान्य तरुण. साधा शर्ट, फॉर्मल पॅन्ट, ईनशर्ट, मोठं बक्कल असणारा पट्टा, व्यवस्थित कापलेले आणि एका बाजूला वळवून भांग पाडलेले केस आणि पायात बूट. सर्व गोष्टी तो तरुण कॉर्पोरेट विश्वात कामाला असण्याची ग्वाही देत होत्या. गल्लीबोळातून, चिंचोळ्या मार्गातून जाऊन तो मुख्य रस्त्याला लागला. थोडसं चालून एका वळणानंतर पुन्हा त्याची पावले छोट्या आडरस्त्यावर पडू लागली. दूरवर सप्तरंगी दिवे चमकायला लागले तसं त्याने दोन्ही हात मोकळे सोडले आणि त्याची पावले झपाझप पडु लागली.
'हॉटेल प्यासा-परमिट बियर बार अँड लॉजिंग.' तरुण प्यासा जवळ पोहोचला. आतमध्ये हळू आवाजात चालणाऱ्या गाण्यांचा आवाज घुमत होता. दरवाजाला लावलेल्या कोलॅप्सिबल गेट मधून हलका दूर ओघळत होता. गेट मधून-एका माणसाला जाण्यापुरत्या चिंचोळ्या जागेतून-तो तरुण आत शिरला. तरुण आत शिरताच डाव्या हाताला असणाऱ्या उभ्या फ्रीजर मधून वेटर दोन शीतपेयाच्या बाटल्या आणि बर्फाचं पाकीट घेऊन गेला. तरुणाचा अंगात थंडीने भरलेली हुडहुडी फ्रिजर मधील गार झुळकेने आणखी वाढली. पटकन त्या तरुणाने स्वतःला काऊंटरपाशी उभ केलं. पुढे डाव्या हाताला गडद खाकी रंगाचा भलामोठा काउंटर होता. त्यामागे उभ्या मांडणीत छोट्या-छोट्या कप्प्यांतून मद्याच्या तऱ्हेतऱ्हेच्या बाटल्या ओळीने उभ्या केलेल्या होत्या. काऊंटर मागे मध्य पन्नाशीतला एक जाड माणूस कडक इस्त्रीची कपडे घालून बसलेला होता, तो मोबाईल मध्ये गुंतलेला असल्याने तरुणाने त्याला त्रास दिला नाही.
तरुणाची नजर जागा शोधण्यासाठी भिरभिरत होती. निळ्या-जांभळ्या, गुलाबी-पिवळसर प्रकाशात प्यासा न्हाऊन निघालं होतं.
उंचीला थोटका असणारा वेटर. साधारण पन्नाशीच्या आसपास वय, दाढी-मिशी गायब झालेली, रोडावलेली तब्येत, केसाला चपचपीत तेल चोपून केशरचना व्यवस्थित ठेवलेली. प्यासा मधील कोणत्याही कोपर्यातून-केसाला लावलेल्या तेलामुळे-वेटर चमकून दिसायचा. अंगावर साधी ढगळी कपडे, पायात साधी चप्पल मात्र चेहऱ्यावर दांडगा अनुभव. प्यासा च्या एकमेव वेटरने काऊंटर च्या टोकाला असणाऱ्या स्टॅन्ड मध्ये-अंगठ्याएवढी जाड आणि फूटभर लांब असणारी-धुपाची गोळी खोवली आणि मग प्यासा मधील धूर आणखीनच गडद झाला.
खरंतर त्या धुपाच्या गोळीला स्वतःचा सुगंध काही नव्हताच. त्या धूराड्यात जेव्हा आतल्या वेगवेगळ्या मद्यांचा दर्प, बीड्यांचा उष्टा धूर आणि बाहेरचा गारवा मिसळत होता तेव्हा कुठे त्या धूराड्याला नवीन 'सुवास' मिळत होता.
'गाणी लावणं हे फक्त प्यासा-वाल्यांनाच जमतं. इतरांच ते काम नाही.' तरुणाने स्वतःशीच विचार केला. 'इथे असणाऱ्या प्रत्येकाच्या भिन्न भावनांना एकाच गाण्याने न्याय द्यावा ही गोष्ट साधी नाहीयेच.' त्यानेपण स्वतःच्या भावनांना गाण्यात मिसळून टाकलं.
तेरा मेरा प्यार अमर
फिर क्यों मुझको लगता है डर
मेरे जीवनसाथी बता
क्यों दिल धडके रह रह कर . . .
गायिकेच्या आवाजातील जादूने तरुणाला स्वतःत सामावून घेतलं. तरूण-पण मनातच गायिकेसोबत गाऊ लागला.
क्या कहा है चाँद ने जिसको सुनके चाँदनी
हर लहर पे झूम के, क्यों ये नाचने लगी
चाहत का है हरसू असर, फिर क्यों मुझको . . .
कह रहा है मेरा दिल अब ये रात ना ढ़ले
खुशियों का ये सिलसिला ऐसे ही चला चले
तुझको देखू देखू जिधर, फिर क्यों मुझको . . .
मधेच त्या असणार्या एकमेव वेटरने तरुणाच्या हातावर थाप मारली. त्याने डोळ्यांनीच तरुणाला 'काय हवंय?' असं विचारलं.
"जागा खाली होण्याची वाट पाहतोय. जागा खाली झाली की देईन ऑर्डर."
है शबाब पर उमंग, हर खुशी जवान है
मेरी दोनों बाहों में जैसे आसमान है
चलती हूँ मैं तारों पर, फिर क्यों मुझको . . .
तरुणाने डोळे अलगद उघडले. अद्यापही कोणताच टेबल रिकामा झालेला नव्हता. असाच वेळ सरला, गाणी बदलत राहिली. मधेच तरुणाने समोरून जाणार्या वेटरच्या दंडाला पकडलं.
"एक ब्लॅक-लाईट."
वेटरने मान डोलावली आणि दुसर्याच मिनिटाला हातात ट्रे घेऊन तरुणाच्या समोर उभा राहिला. वेटरने डोळ्यांनीच शर्ट च्या खिशाकडे पाहिलं आणि डावा खांदा पुढे केला. त्याच्या खिशातील सिगारेट काढून घेतल्यावर तरुण म्हणाला. "धन्यवाद!" निवांत चालत जाऊन तरुणाने काऊंटरच्या कोपऱ्यावर भिंतीला लटकवलेल्या एका डबड्याचं बटन दाबलं आणि तिथे विजेची ठिणगी तयार झाली. त्या ठिणगीवर टेकून ओठांमधली सिगारेट शिलगावली आणि त्या डबड्याचं बटण सोडून तरुण पुन्हा त्याच्या जागी येऊन उभा राहिला.
मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया . . .
बर्बादियों का सोग मनाना फिजूल था
बर्बादियों का जश्न मनाता चला गया . . .
जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया
जो खो गया मैं उस को भुलाता चला गया . . .
गम और खुशी में फ़र्क न महसूस हो जहाँ
मैं दिल को उस मक़ाम पे लाता चला गया . . .
सिगारेटचं थोटकं पायाखाली चेंगरल्यावर तरुणाने पुन्हा मोकळ्या टेबलचा वेध घेतला. डाव्या कोपऱ्यातला शेवटचा टेबल मोकळा झालेला होता. वेटरने येऊन टेबल पुसण्याच्या आधीच तरुणाने खुर्चीवर मांड ठोकली. पाचव्या मिनिटाला वेटर आला. टेबल वरच्या ताटातच त्याने उरल-सुरलं जिन्नस भरलं आणि टेबल स्वच्छ केला. नंतर एकावर एक रचलेली ती सर्व भांडी त्याने पुन्हा टेबल च्या कोपर्यावर ठेवली आणि खिशातून एक छोटीशी डायरी काढली. प्यासा मध्ये वेटरच्या औपचारिकतेला फारसं स्थान नाहीये. वेटरच्या वागण्यावर इथे कोणी आक्षेपही घेत नाही!
"काय आणू साहेब?" वेटर म्हणाला.
"दोन ओल्ड-मंक वनएटी, सोडा बॉटल."
"अजून काही?"
"तुझ्या मनाने-सोबतीला काय आणायचय ते-आण."
ऑर्डर घेतली आणि वेटर निघून गेला. तरुण आरामात गाणी ऐकत होता. मधूनच त्याने संपूर्ण प्यासाच निरीक्षण केलं. बराच वेळ सरला. टेबलवर निवांत, दोन्ही कोपरे टेकून, तळहातात चेहरा धरून गाण्याचा आनंद घेणारा तरुण-टेबलवर आपटलेल्या बाटलीच्या आवाजाने जागा झाला.
"धन्यवाद." तरुणाने पुन्हा एकदा वेटरचे आभार मानले.
वेटर गेला तसं त्या तरुणाने उलटा ग्लास सरळ केला.
बर्फाच्या खड्यांची पिशवी फोडली, ग्लास मध्ये दोन खडे टाकले, थोडा सोडा ओतला आणि एक संपूर्ण ओल्ड-मंक ग्लासात रिकामी केली. शर्टच्या उजव्या बाहीने-हात पोहोचेल तेवढा-टेबल पुन्हा एकदा पुसला. मग शर्टच्या दोन्ही बाह्या वर दुमडल्या, उठून पॅन्टच्या खिशातल्या दोन चिठ्ठया टेबलवर आपटल्या. शर्टच्या खिशातील पेन त्या चिठ्ठयांवर ठेवला. एकतर मोठं कोर पान होतं दुसरी व्यवस्थित घडी केलेली चिठ्ठी होती. ती 'चिठ्ठी वाचल्याच्या खुणा' चिठ्ठीवर स्पष्ट दिसत होत्या.
मेरा प्यार वो है के मरकर भी तुम को
जुदा अपनी बाहों से होने ना देगा
मिली मुझको जन्नत तो, जन्नत के बदले
खुदा से मेरी जां तुम्हें माँग लेगा . . .
तरुणाने गाणं ऐकलं आणि स्वतःच काम थोडावेळ थांबवलं. गाणं आणि भावना समरस झाल्या की वेळ काढावा लागतो!
जमाना तो करवट बदलता रहेगा
नये ज़िन्दगी के तराने बनेंगे
मिटेगी ना लेकिन मोहब्बत हमारी
मिटाने के सौ सौ बहाने बनेंगे
हक़ीकत हमेशा हक़ीकत रहेगी
कभी भी ना इसका फसाना बनेगा . . .
तुम्हें छीन ले मेरी बाहों से कोई
मेरा प्यार यूँ बेसहारा नहीं है
तुम्हारा बदन चाँदनी आ के छू ले
मेरे दिल को ये भी गँवारा नहीं है
कोई भी अगर तुमसे आ के मिले तो
तुम्हारी कसम है मेरा दिल जलेगा . . .
तरुणाने डोळे झाकून गाण्यात स्वतःला झोकून दिलेलं होतं. गाणं संपलं तसा तो भानावर आला. ग्लासात ओतलेल्या ओल्ड-मंकचे दोन घोट घशाखाली ढकलले. वेटरने न सांगता आणलेले काजू तोंडात टाकले. थोड्या वेळाने पुन्हा ओल्ड-मंक घशात ओतली. ग्लास निम्मा झाला तेव्हा-त्याने पेनच्या खाली ठेवलेली आणि आधीच वाचलेली-चिठ्ठी उचलली. हळुवारपणे तिची घडी उघडली, चिठ्ठीवर ना लिहिणाऱ्याचं नाव होतं ना ज्याला चिठ्ठी लिहीलीये त्याचं नाव होतं.
कदाचित मी तुला लिहिलेली ही शेवटचीच चिठ्ठी असेल. चिठ्ठीवर जाणून-बुजून आपल्या दोघांचीही नावे लिहिलेली नाहीयेत. खरंतर तुला या भावना चिठ्ठीतून सांगायच्या नव्हत्या. मात्र, पुन्हा तुझ्या समोर उभं राहण्याचं धैर्य मी गमावून बसलेय. तुझ्यासोबत जगलेला प्रत्येक क्षण आता अवास्तवी वाटायला लागलाय. स्वप्नातून जागं झाल्यावर जशी अवस्था होते-अगदी तशीच अवस्था आता माझी झालीये. यापूर्वीच संपूर्ण जीवन आभासी वाटायला लागलय!
खूप बोलायचय, मोकळे व्हायचय, माफी मागायचीये आणि तुझ्यावर चिडायचय सुद्धा! पण सुरुवात कोठून करू कळतच नाही. कदाचित मी मनातले सर्व भाव शब्दांत मांडूही शकणार नाही मात्र, तू सर्व भाव जाणून घेशीलच, तितका विश्वास तू कमावला आहेस.
'आपलं' भूतकाळातील आयुष्य भूतकाळातच ठेव आणि नवीन सुरुवात कर इतकच मला तुला सांगायचय.
लग्न झालं की मुलीचं नवीन आयुष्य सुरू होतं. लग्न म्हणजे मुलीच्या आयुष्यातील स्त्री-पर्वाची सुरुवात! पुन्हा एकदा पुनर्जन्मच! माझा हा पुनर्जन्म तुझ्या कुशीत व्हावा हे एकच स्वप्न मी गेली सहा वर्षे पाहत होते. अर्ध्या तपाची माझी ही तपश्चर्या नियतीने मोडीत काढलीये रे! सुखी आयुष्याला आता नियतीनेच खीळ घातलीये. अशा काही परिस्थितीत तीने मला अडकवलय की मलाच माझ्या दिशा कळेनाशा झाल्यात. आणि अजाणतेपणीच मी हा लग्नाचा निर्णय घेऊन बसले आहे. मला खात्री आहे तू मला समजून घेशील, फक्त तूच मला समजून घेशील.
'प्रेम त्याग मागतं' हे वाक्य बोलायला खूप सोपं वाटतं; पण जेव्हा त्याग करायची वेळ येते त्यावेळी प्रसंगी जीव देणं बेहत्तर वाटतं.
डोळ्यांत दाटलेल पाणी खाली गालांवर ओघळू नये म्हणून त्या तरुणाने छताकडे नजर टाकली. बर्याच वेळाने डोळ्यातल पाणी आटलं तसं त्याने कोरडा पडलेला घसा दोन घोट पेयाने ओला केला.
आपण दोघेही हरलोय. प्रेमात असंच होतं, नाही का? एकजण हरला तर दुसऱ्याजवळ ती हार स्वीकारण्याशिवाय पर्यायच नसतो. माझी हार आता तुला स्वीकारण्याची वेळ आलीये, माफ करशील मला?
नवं आयुष्य वाईटच असेल असं मी म्हणणार नाही परंतू तुझ्यासोबत जगण्यात जो 'जिवंतपणा' मिळाला असता तो आता तेवढ्या प्रमाणात मिळणार नाही, इतकच. माझ्या आयुष्याची सुरुवात झाली की तूपण नवीन सुरुवात कर. भूतकाळ बदलण्याचा निष्फळ प्रयत्न करू नकोस आणि त्या भूतकाळाशी झुंजत देखील राहू नकोस हेच मला सांगायचय. तुझ्याजवळ बोलून दाखवलेली शेवटची इच्छा पूर्ण करशील?
येणाऱ्या आयुष्यात आपली भेट होईलच याची शाश्वती मी तुला देऊ शकत नाही. तू मात्र आपली भेट घडण्यासाठी योगायोग निर्माण करू नकोस! माझं असं बोलणं ऐकून तू मला गुन्हेगार ठरवशील-ठीक आहे. कारण, माझ्या लग्नानंतरच्या-आपल्या भेटीतून जे निष्पन्न होईल त्यापेक्षा आयुष्यभर मी गुन्हेगार बनून राहणं जास्त योग्य ठरेल. कदाचित तुला भेटून मला माझ्या गळ्यात-मंगळसूत्राच्या रूपात असणाऱ्या-दावणीचा विसर पडला तर? कल्पनाही करवत नाही.
शब्दांनीपण आता माझ्याकडे पाठ फिरवलीये. मनातल्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता शब्दांनीही नकार दिलाय. मी तुला जे सांगेन ते नाट्यमयी वाटेल, हास्यास्पद वाटेल आणि मी जे सांगणार आहे ते अशक्यही आहे; पण तरीही तू माझं ऐक-कारण, माझं ऐकल्याने तुझाच त्रास वाचणार आहे. तुला त्रासात सोडून मी तिकडे आनंदात राहीन असं तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे त्या गैरसमजाला मनात थारा देऊ नकोस आणि-विसरून जा मला!
ही चिठ्ठी तूच वाचतोएस याची मला खात्री आहे. कारण, मी चिठ्ठी अशा व्यक्तीपर्यंत पोचवलीये जी व्यक्ती ही चिठ्ठी फक्त तुझ्याच ताब्यात देईल.
शेवटच्या चिठ्ठीचा शेवट कसा करायचा हे माहीत नसल्यामुळे गेली दहा मिनिटे अशीच निश्चल बसून होते. त्यातूनच तोडका-मोडका शेवट मला मिळाला आहे.
तुझ्यासोबत जगताना मी संपूर्ण तुझीच होऊन राहिले त्यामुळे एकाही कृतीचा पश्चाताप आता माझ्या मनात नाहीये. पश्चाताप आहे तो फक्त माझ्या निर्णयाचा, मी घेतलेल्या लग्नाच्या निर्णयाचा . . . काळजी घे . . .
चिठ्ठी होती तशी घडी घातली. मग ग्लास मधील-बर्फाचं पाणी मिसळलेली-उरलीसुरली ओल्ड-मंक त्या तरुणाने घशात सारली. मनातल्या भावनांचा विस्फोट जणूकाही दारूच विझवणार होती. मात्र, दारू आग विझवत नाही तर आग भडकवते! तरुणांच्या मनातील अस्थिरता त्यालाच असह्य झाली होती. शरीराला कंप सुटला, भूतकाळ आठवायला लागला तसं डोळ्यातलं पाणी बाहेर येण्याची धडपड करू लागलं. या अवस्थेपासून सुटका करून घेण्यासाठी तरुणाने गायकाच्या सुरात-सूर मिसळला.
दिल के झरोखे में तुझ को बिठाकर
यादों को तेरी मैं दुल्हन बनाकर
रखूगा मैं दिल के पास, मत हो मेरी जान उदास . . .
कल तेरे जलवे पराए भी होंगे
लेकिन झलक मेरे ख़्वाबों में होगी
फूलों की डोली में होगी तू रुखसत
लेकिन महक मेरे साँसों में होगी . . .
अब भी तेरे सुर्ख होठों के प्याले
मेरे तसव्वुर में साक़ी बने हैं
अब भी तेरी जुल्फ़ के मस्त साये
बिरहा की धूप में साथी बने हैं . . .
मेरी मोहब्बत को ठुकरा दे चाहे
मैं कोई तुझसे ना शिकवा करूँगा
आँखों में रहती है तस्वीर तेरी
सारी उमर तेरी पूजा करूँगा . . .
दीर्घ श्वास घेतला. उरलेले बर्फाचे गोळे ग्लास मध्ये टाकले आणि तरुणाने ग्लास मध्ये दुसरी ओल्ड-मंक रिकामी केली. दोन घोट घशाखाली सारले. दोन्ही कोपरे टेबलवर टेकून, डोळे झाकून, दोन्ही हातांच्या तळव्यावर हनुवटी टेकवली आणि तो तरुण भूतकाळात रमला.
तिचं हसणं, तिचा लटका राग, भीतीचं नाटक, वेंधळेपणा, राग, खादाडपणा! सगळं काही आठवायला लागलं. आठवणी दाबण्यात आता काही मजा नव्हती, तो तीच्या आठवणीत बुडतं गेला. तिचे लांबसडक, कमरेपर्यंत असणारे कुरळे केस-काळेभोर. 'तिची वेणी घालताना तिच्या आईला किती त्रास होत असेल!' या विचारावर त्या तरुणाच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. साधेच डोळे; पण बुबुळातल्या काळेपणात एक करारीपणा होता, निश्चय होता, धैर्य होतं. लांबसडक-अगदी साच्यात घडवल्यासारखं-सरळ नाक आणि कोरीव हनुवटी. गरजेपेक्षा जास्त दाट असणाऱ्या भुवया आणि रुंद असलेलं कपाळ. गोरापान रंग मात्र त्या रंगात कृत्रिमता नव्हती. कायमच अस्थिर असणारी मान. तरुणाने पुन्हा ग्लास तोंडाला लावला. तिची सुंदरता एका पारड्यात आणि तिचा आवाज दुसऱ्या पारड्यात! तिच्या स्पष्ट आणि धावत्या आवाजात पुरुषी आवाजाची एक छटा होती. जेव्हा ती रागात बोलायची तेव्हा तिच्या आवाजातील पुरुषीपणा ठळकपणे जाणवायचा. कायमच तिचं त्याला पाठमोरं उभं राहणं, उंची पोहचत नसताना खांद्यावर हात टाकण्याचा प्रयत्न करणं, सहवासात राहण्यासाठी मुद्दामच अवाजवी कारणे सांगणं किंवा मध्येच अतिशक्ती-पणा आल्यासारखं त्याला धरून ठोकणं! सगळं काही आठवू लागलं.
घड्याळाच भान आलं तसं त्या तरुणाने कोरं पान उघडलं.
वक्त ने किया क्या हसीं सितम
तुम रहे ना तुम हम रहे ना हम . . .
बेकरार दिल इस तरह मिले
जिस तरह कभी हम जुदा न थे
तुम भी खो गये हम भी खो गये
एक राह पर चल के दो कदम . . .
जायेंगे कहाँ सूझता नहीं
चल पड़े मगर रास्ता नहीं
क्या तलाश है कुछ पता नहीं
बुन रहे हैं दिल ख्वाब दम-ब-दम . . .
तुझ्यापर्यंत ही चिठ्ठी पोहोचणार नसल्याने या चिठ्ठीवर नाव लिहिण्यात काही अर्थच नाहीये. मनातले भाव मनातच दाबले तर संवेदना बोथट होऊन जातात. माझ्या संवेदनांच संवर्धन म्हणून ही चिठ्ठी लिहितोय.
स्वप्नांचा महाल भुईसपाट झाला तेव्हा लक्षात आलं कि त्या महालाचा पायाच मजबूत नव्हता.
'जात' किती विखारी शब्द. या एकाच शब्दाने माझा स्वप्नमहाल जमीनदोस्त केलाय, माझं भविष्य छिन्नविच्छिन्न केलय. जर करतानाच जात बघून प्रेम केलं असतं तर हा अपेक्षाभंग, हे दुःख वाट्याला आलं नसतं. नियतीच्यापुढे किंबहुना प्रेमाच्या पुढे कधी कोणाचे काही चालले आहे का?
नियतीला दोष देण्यातही काहीच अर्थ नाहीये. कारण, मला वाटतय की मीच कुठेतरी कमी पडतोय. अडचणींना न जुमानता स्वतःच्या प्रेमाला न्याय देण्यात मी चुकलोय. चूक लक्षात आलीये परंतु आता खूप उशीर झाला आहे, हो ना?
जगरहाटीच्या विशाल सागरात पोहत असताना-मी तर म्हणेन बुडत असताना-अनपेक्षितरीत्या बुडणाऱ्याला अचानकच फळीचा आधार मिळावा तशी तू माझ्या आयुष्यात आलीस. मला किनाऱ्यावर आणलंस आणि आता तूच निघून चाललीये! तू निघालीस तेव्हा कळालं की या किनार्यावर मी एकटाच राहणार आहे. जगरहाटीच्या विशाल सागराच्या मधोमध-एकटाच. यापेक्षा तर बुडून मरणं चांगलं नव्हतं का?
खूप लिहायचय; पण मनातल्या भावना मेंदूला सरळ विचार करू देत नाहीयेत. यामुळेच कदाचित माझी संपूर्ण अवस्था तुझ्यापर्यंत पोहोचवूही शकणार नाही. आयुष्य इथून पुढे-आधी होतं तसं राहणार नाहीये इतकं मात्र मला कळून चुकलय. तू म्हणालीस तशी मी नवीन सुरुवात करेन देखील; पण पुढे काय? तुझ्यासोबत पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचं दुःख त्यामुळे कमी होणार आहे का? अजिबात नाही.
मी तर आता आपण 'आपल्या' मुलांसाठी ठरवलेली नावे-माझ्या मुलांना ठेवून, त्यांना तुझ्या समोर आणून, तुला यातना देऊन, त्या यातनांचा असुरी आनंद मिळवायचा असं ठरवलय.
ही ओळ लिहिली आणि तरुण भानावर आला. 'पोटातली दारू मनातील पवित्र प्रेमभावना कलुषित करायला लागलीये' हे त्याच्या लक्षात आलं. मग त्याने शेवटची ओळ खराखरा खोडून टाकली. अस्थिर हातांनी अक्षरे मिटेपर्यंत ओळ खोडल्यामुळे चिठ्ठीला मोठं भगदाड पडलं. चिठ्ठी फाटल्याचं दुःख असह्य झाल्यामुळे तरुणाने उरलेली ओल्ड-मंक आणखी दोन घोट आटवली.
जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला
हमने तो जब कलियाँ मांगी कॉटों का हार मिला . . .
खुशियों की मंज़िल ढूँढी तो ग़म की गर्द मिली
चाहत के नमें चाहे तो आहे सर्द मिली
दिल के बोझ को दूना कर गया जो ग़मख़्वार मिला . . .
बिछड़ गया हर साथी दे कर पल दो पल का साथ
किसको फुरसत है जो थामे दीवानों का हाथ
हमको अपना साया तक अक्सर बेज़ार मिला . . .
इस को ही जीना कहते हैं तो यूँ ही जी लेंगे
उफ़ ना करेंगे, लब सी लेंगे, आँसू पी लेंगे
ग़म से अब घबराना कैसा, ग़म सौ बार मिला . . .
'मन स्थिर झालय' असं समजून त्या तरुणाने परत पेन उचलला. एव्हाना दारुने तिचं काम केलं होतं. चिठ्ठीवरचं घाणेरडं अक्षर आणि मनातलं निर्मळ प्रेम यांच्यात विरोधाभासाची दरी-दारूने तयार केली.
मला या घडीला तू हवी आहेस, बाकी काहीच नको. या जगाची पर्वा मी सोडून दिलीये. मी हे आधीच करायला हवं होतं पण माझ्या मुर्खपणाची इतकी मोठी शिक्षा तू तरी मला देऊ नकोस. अजूनही वेळ गेलेली नाहीये जगाचा विचार सोडून आपण दोघेही स्वतःचं विश्व निर्माण करू शकतो हे ध्यानात घे आणि माघारी ये. येशील माघारी?
मला ना आता तुझ्यासमोर माझी बाजू मांडायचीये, ना माझ्या प्रेमाची कसोटी द्यायचीये, ना मला माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचवायच्यात. मला फक्त तु माझ्या आयुष्यात पाहिजे आहेस बास! बाकी काहीच नको!
मनातील भावनांचा विद्रोह पराकोटीला गेल्यामुळे तरुणाने थोडावेळ ओल्ड-मंक आणि काजूंशी मैत्री करणं इष्ट समजलं. बर्याच वेळाने तरुणाच्या डोळ्यांत निश्चय चमकला. मनातील भावना पुन्हा प्रामाणिक झाल्यावर मग त्या तरुणाने चिठ्ठी पूर्ण केली.
भविष्यातील आयुष्याची कोणतीच शाश्वती मी तुला देऊ शकत नाही, भविष्यात कोणत्या आणि किती अडचणी येतील याचीही शाश्वती नाहीये, भविष्यात आपल्या प्रेमाची तीव्रता हीच राहील का हे पण मी सांगू शकत नाही. मात्र, भविष्यातील सर्व प्रसंगात, सर्व अडचणीत, सर्व दुःखात -आणि जे काही थोडके सुखाचे क्षण वाट्याला येतील त्या- सुखाच्या क्षणात मी कायम तुझ्या सोबत उभं राहण्याचं आश्वासन तुला देऊ शकतो. तुझ्या पुढेही नाही आणि मागेही नाही-तुझ्यासोबत! जीवनभर! सांग येशील माझ्यासोबत?
फक्त एकदा होकार दे आणि नंतर अंतिम क्षणापर्यंत मी माझं आश्वासन फिकं पडू देणार नाही. सांग देशील होकार?
तरुणांच्या मनातील सर्व भाव कागदावर येणं शक्यच नव्हतं. त्यामुळे तरुण थांबला. असलेली ओल्ड-मंक एका घोटात संपवली आणि स्तब्ध बसून राहिला.
ये दुनिया, ये महफ़िल, मेरे काम की नहीं . . .
किस को सुनाऊँ हाल दिल-ए-बेकरार का
बुझता हुआ चराग़ हूँ अपने मज़ार का
ऐकाश भूल जाऊँ, मगर भूलता नही
किस धूम से उठा था जनाज़ा बहार का . . .
अपना पता मिले ना ख़बर यार की मिले
दुश्मन को भी ना ऐसी सज़ा प्यार की मिले
उनको खुदा मिले है खुदा की जिन्हे तलाश
मुझको बस एक झलक मेरे दिलदार की मिले . . .
सहरा में आके भी मुझ को ठिकाना ना मिला
गम को भूलाने का कोई बहाना ना मिला
दिल तरसे जिस में प्यार को, क्या समझू उस संसार को
एक जीती बाजी हार के, मैं ढूँढू बिछड़े यार को . . .
दूर निगाहों से आँसू बहाता है कोई
कैसे ना जाऊँ मैं, मुझको बुलाता है कोई
या टूटे दिल को जोड़ दो, या सारे बंधन तोड़ दो
ऐ परबत रस्ता दे मुझे, ऐ काँटों दामन छोड़ दो . . .
हळूहळू सगळे काजू संपवले, पाणी रिचवल. पोटात भर पडली तेव्हा मग खुर्चीवर स्तब्ध बसून राहणं अशक्य झालं. त्या तरुणाने टेबल वरचा पेन उचलून खिशात टाकला. टेबल वरच्या दोन्ही हातांमध्ये स्वतःला लपवून घेतलं. डोळ्यांना अंधार जाणवला तसे डोळे मिटायला लागले.
मेरी भीगी भीगी सी पलकों पे रह गए
जैसे मेरे सपने बिखर के
जले मन तेरा भी, किसी के मिलन को
अनामिका तू भी तरसे . . .
"नमस्कार साहेब. आत येऊ का?"
"बोल ना."
"साहेब मला आज घरी लवकर जायचय."
"का?"
"काम आहे."
"आधीच तुझी प्रगती नीट नाहीये. सहा दिवसातले प्रत्येकी आठ तास भरणं तुझ्या जीवावर येतय त्यात पुन्हा तुला लवकर जायचय!"
"माफ करा साहेब; पण खूपच निकडीचं काम आहे."
"अशी काय अडचण आहे सांग बघू. मलापण ऐकू दे-काम सोडून इतकं गरजेचं काय आहे ते?"
"साहेब वैयक्तिक कारण आहे. सांगू शकत नाही. प्लीज साहेब! मी उद्याच जास्तीचे तास भरून काढेन!"
"नाहीतरी असणाऱ्या तासात टाईमपास करतोच आहेस उद्या थोडासा जास्त वेळ चकाट्या पिटशील."
"प्लीज साहेब!"
"ठीक आहे. पण जाताना बायोमॅट्रिक लावू नकोस मी एचआर ला सांगून तुझा हाफ-डे टाकायला सांगतो."
"साहेब मी तर फक्त एक तासभर लवकर . . . ठीक आहे हाफ-डे चालेल; पण माझं जाणं गरजेच आहे. जाऊ का मी?"
तुझे बिन जाने, बिन पहचाने, मैंने हृदय से लगाया
पर मेरे प्यार के बदले में तूने, मुझको ये दिन दिखलाया
जैसे बिरहा की रुत मैंने काटी, तड़प के आहें भर भर के
जले मन तेरा . . .
"का रे भावा आज लवकर?"
"लव करायायलाच आलोय!"
"म्हणजे?"
"तिने भेटायला बोलवलय काल फोन करून. मग मी म्हणालो 'आज येतो.' "
"चांगलय-चांगलय!"
"पण बहुतेक ती नाराज झालीये वाटतं."
"का रे भावा?"
"फोन लागत नाहीये तिचा."
"मग त्यात काय एवढं? तिचा फोन आल्यावर जा ना!
"अरे तसं नसतं . . . जाऊ दे तुला काय कळणार? तुला मैत्रीणच कुठय?"
"जारे *** नीघ **** "
"अरे रागाला जाऊ नको दाद्या. म्हणजे ती काल म्हणाली होती 'महत्त्वाचं बोलायचय.' "
"लग्नाचं सांगणार असेल."
"लग्न? कोणाचं लग्न?"
"माहिती नाही तुला?"
"नाही-तर."
"चल *** मस्करी करू नको."
"मस्करी तू करू नको करूस. सांग कोणाचं लग्न?"
"तीचच लग्न ठरलय!"
"तीचं! लग्न? मी तर लग्नाबद्दल काही बोललो नाही अजून."
"अरे *** तुझ्या सोबत नाही! जाऊदे ना तसपण हे तुझं खरं प्रेम नाहीये ना!"
"मस्करी करू नको ** "
"का? लागली का आग *** "
"लागलीये आग; पण *** नाही मनाला लागलीये!"
आग से नाता, नारी से रिश्ता, काहे मन समझ न पाया
मुझे क्या हुआ था, एक बेवफा पे हाए मुझे क्यों प्यार आया
तेरी बेवफाई पे हँसे जग सारा, गली गली गुजरे जिधर से
जले मन तेरा . . .
"तू का घेतलीस चिठ्ठी?"
"तीच आली होती द्यायला-दुपारी तू कामाला गेला होतास ना तेव्हा-म्हणून मीपण घेतली."
"तुझ्या खांद्यावर ठेवून बंदूक चालवलीये तिने!"
"तिचं लग्न ठरलंय!"
"तुला कसं कळलं?"
"चिठ्ठी वाचलीये मी!"
"तुला कितीवेळा सांगितल 'पोराच्या प्रेम-चिठ्या वाचू नको' म्हणून; पण नाहीच!"
"त्या चिठ्ठीत जर माझ्या पोराला उद्ध्वस्त करणारं काही असेल तर मी ती चिठ्ठी मिटवने भाग आहे."
"तिने काय सांगितलं तुला?"
"काहीच नाही, फक्त रडत होती आणि जाताना चिठ्ठी देऊन गेली."
"तू विचारलं नाहीस का रडते म्हणून?"
"अशा लग्नाच्या गोष्टी लपून राहतात का? कालच तिच्या लग्नाची बातमी मला कळली होती."
"मग तू तरी मला सांगायचं होतं!"
"तूला माझ्या हाताने उद्ध्वस्त करायचं?"
"अजून काही म्हणाली का ती?"
"आल्यापासून जाईपर्यंत काहीच बोलली नाही. दरवाजात चप्पल घालताना एवढंच म्हणाली, 'त्याला सांगा काळजी घे.' "
एकच वाक्य! 'काळजी घे.'
मेरी भीगी भीगी सी पलकों पे रह गए
जैसे मेरे सपने बिखर के
जले मन तेरा भी, किसी के मिलन को
अनामिका तू भी तरसे . . .
वेळ कशी सरली? किती सरली? माहीत नाही. प्यासा मध्ये असणाऱ्या एकमेव वेटरने त्या तरुणाच्या खांद्याला धरून हलवलं.
"काही पराब्लेम आहे का साहेब? तुमचं झालं असेल तर टेबल रिकामा करा. पुढची माणसं वाट बघतायेत."
वेटरला देण्यासाठी तरुणाकडे कोणतेच उत्तर नव्हतं, कारणही नव्हतं. आता बाहेर पडायलाच हवं होतं.
"कैफियत माझी मी मांडू कोणापाशी,
त्यात सांगण्यासारखं काय आहे?
ऐकायची म्हणलं कोणी,
तरी त्यात ऐकण्यासारखं सारखं काय आहे?"
प्रेमभंग आणि मदिरा यांच मिलन झालं की कविता जन्माला येतात! तरुणाने उठून दोन्ही चिठ्ठया खिशात घातल्या आणि काउंटरकडे गेला. पाकिटातल्या क्रेडिट कार्डने बिल भरलं. जाण्याआधी एक शीतपेयाची बाटली घशात ओतली. बाहेर येईपर्यंत काहीच वाटल नाही; पण बाहेरची बोचरी थंडी अंगाला जाणवली तेव्हा शीतपेय पिल्याचा पश्चाताप व्हायला लागला.
ये रातें, ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा
कहा दो दिलों ने, कि मिलकर कभी हम ना होंगे जुदा . . .
ये क्या बात है आज की चाँदनी में
कि हम खो गए प्यार की रागनी में
ये बाहों में बाहें, ये बहकी निगाहें
लो आने लगा ज़िन्दगी का मज़ा . . .
सितारों की महफ़िल ने करके इशारा
कहा अब तो सारा जहां है तुम्हारा
मोहब्बत जवां हो, खुला आसमां हो
करे कोई दिल आरजू और क्या . . .
क़सम है तुम्हें, तुम अगर मुझसे रूठे
रहे सांस जब तक ये बंधन ना टूटे
तुम्हें दिल दिया है, ये वादा किया है
सनम मैं तुम्हारी रहूंगी सदा . . .
आवाज विरळ होत गेला. जमीन अस्थिर झाली होती! चालताना तोल सांभाळणं मुश्किल झालं होतं. आलेल्या रस्त्याचा अंदाज घेत दूरवर दिसणाऱ्या दिव्याचा प्रकाशाकडे तो निघाला. दातांचा कडकडाट सुरु झाला. पुन्हा दोन्ही हात बगलेत दाबले आणि जमेल तितक्या वेगात तो चालू लागला. मुख्य रस्त्यावर येऊन पोहचला तेव्हा तिथे रिक्षा उभी होती.
"चला बाॅस कुठे जायचय?"
दररोज रात्रीचे प्रवासी इथे मिळतातच शिवाय भाड्याला किरकिरपण करत नाहीत हे माहीत असल्यामुळे इथे रिक्षावाल्यांची गर्दी असतेच.
"नको. जातो मी चालत." असे म्हणून तरुण निघाला देखील.
रात्रीची 'भयाण शांतता' आणि 'मिट्ट काळोख' जवळचे वाटत असले तरी आता घराची ओढ लागली होती. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका डांबावरील दिवा लुकलुक करत होता.
शहरातल्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डांबावर चालू दिवे कमी आणि लुकलुकणारे दिवे जास्त असतात! त्या दिव्याच्या अंधुक पिवळसर प्रकाशात पोहोचला आणि तरुणाच्या अंगावर काटा आला. दारू पोटात असली तरीदेखील तरुण बऱ्यापैकी शुद्धीत होता. पुन्हा एकदा पावलांचा आवाज आला तसे त्या तरुणाच्या मानेवरचे केस ताठ उभे राहिले. त्या तरुणाने पटकन बगलेतले हात ढिले केले. भीतीने मागे बघण्याची हिंमत होत नव्हती, अनवाणी पावलांचा आणि मंजुळ पैंजणांचा आवाज क्षणाक्षणाला स्पष्ट होत होता. गर्भगळीत झालेला तरुण भोवळ येऊन पडणार तेवढ्यात त्याला कोणीतरी मिठी मारली. पैंजणांचा आवाज थांबला आणि काकणांचा मंजुळ आवाज घुमला. पाठीला बसलेल्या जोरदार धक्क्याने तरुण खाली पडणार तेवढ्यात त्या व्यक्तीने त्याला सावरलं.
तरुणाने तिला ओळखलं. "तू इथे?" पण प्रतिसाद आला नाही. तिचं नाक तरुणाच्या मनक्याला रुतत चाललं होतं. "बोल ना, माझी वाट पाहत होतीस? मला सोडून चाललीयेस हे सांगायला थांबली होतीस?" तरुणाचा स्वर कातर झाला होता.
तिने मानेनेच नाही म्हणल्याच तरुणाच्या पाठीला जाणवलं. आणि एक अस्पष्ट हुंदका बाहेर पडला. हळूहळू तिच्या मुसमुसनं जोर धरायला लागलं. स्फदनांचा आवाज घुमायला लागला. तिचं हमसुन-हमसुन रडणं तरुणाला अस्वस्थ करून गेलं.
"रडू नकोस आधी काय झालय ते तरी सांग. मी चुकलो का?" तिने पुन्हा नकारार्थी मान तरुणाच्या पाठीत घुसळली. "मग काय झालय?"
"आपण हरलोय रे!" तरुणी रडत सांगू लागली.
"काय हरलोय? अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू म्हणत असशील तर आता लगेच आपण निघून जाऊ या."
"निघून जाऊ या! कुठे?" तरुणीने विचारलं
"निघून जाऊया या जगापासून दूर कुठेतरी. आपल्या राज्यात-प्रेमाच्या राज्यात."
"प्रेमपण हरलय!"
"म्हणजे?"
"म्हणजे आपण प्रेमाचा जुगार हरलोय!"
"प्रेमाचा जुगार?"
"जगाविरुद्ध आपण खेळलेला प्रेमाचा जुगार. त्या जुगारात नियतीचे फासे आपल्या विरोधात पडलेत आणि म्हणूनच आपण हरलोय." असं म्हणून तरुणी पुन्हा रडू लागली.
"तुला माहितीये आपण का हरलो?"
तरुणीने नकारार्थी मान घुसळली आणि तीन-चार छोट्याछोट्या तुटक्या श्वासांनी बनलेला दीर्घ श्वास घेतला. "आपण हरलो कारण आपण पणाला काही लावलच नाही!" ती ऐकत होती. "आता पुन्हा जुगार खेळूया." तरुण बोलत होता. "प्रेमाचा जुगार 'नियतीच्या विरोधात आपण दोघे.' आणि यावेळी संपूर्ण जग पणाला लावायचं म्हणजे सगळ्या जगाचा त्याग करायचा आणि प्रेमाचा जुगार खेळायचा! मग बघू नियती कोणाच्या विरोधात फासे टाकतीये! बोल खेळशील हा प्रेमाचा जुगार पुन्हा एकदा? माझ्यासाठी? आपल्यासाठी?"
तिने नकारार्थी मान तरुणाच्या पाठीत घुसळली.
डोळ्यात आलेले अश्रू गालावरून ओघळू नयेत म्हणून त्याने लुकलुकणाऱ्या दिव्याकडे पाहिलं. "का?"
"वेळ गेलीये रे." इतकंच सांगून ती रडू लागली.
तरुणाच्या डोळ्यांना लुकलुकणारा दिवा अंधुक दिसत गेला. बराच वेळ गेला. त्याला दिवा दिसेनासा झाला होता. ती अजूनही त्याला घट्ट मिठी मारून तशीच उभी होती.
त्याला ती हवी होती. तिचा स्पर्श, तिच्या ओठांचा स्पर्श. त्याचं अंग शहारलं. तिला मिळवण्याची, तिच्यात हरवण्याची हीच संधी होती-कदाचित शेवटची!
तरुण गर्रकन मागे फिरला आणि . . . मागे कोणीच नव्हतं! भेदरलेल्या तरुणाने आजूबाजूला मान फिरवली; पण रात्रीचा काळोखा अंधार आणि लुकलुकणार्या दिव्याचा वर्तुळाकार प्रकाश याव्यतिरिक्त पाहण्यासारखं त्याला काहीच दिसलं नाही. 'भास, आभास, स्वप्न, चकवा, दारूची नशा, भुताटकी का मग प्रेम. काय होतं ते? सत्य काय आहे?'
तरुणाने गालावरून हात फिरवला. अश्रूंनी ओल्या झालेल्या गालावरून हात फिरला त्यामुळे हातपण ओला झाला. हेच या वेळेचं सत्य होतं-दुःख. हे दुःख आयुष्यभर टिकणार नव्हतं मात्र हेच दुःख आज रात्री हटणारही नव्हतं! दुःखाच्या विश्वात पुन्हा एकदा थंडीपासून बचावासाठी शर्टच्या दोन्ही बाह्या खाली घेतल्या, बगलेत दोन्ही हात कोंबले आणि तरुणाची पाऊले घराकडे वळाली.
दुरूनच एक भटकलेलं मांजराच पिल्लू तरुणाकडे त्याच्या घाऱ्या, चमकदार डोळ्यांतून पाहत होतं. पोटात दाटलेल्या भुकेमुळे मांजराने जाऊन त्या तरुणाच्या पायापाशी भेंडोळे मारण्याचा विचार केला; पण तरुणाचा विजनवास मोडणं त्या पिलाला योग्य वाटलं नाही. इतक्यात तरुणाच्या फाटक्या, रडक्या आवाजाने रात्रीची शांतता चिरत नेली.
बेकरार दिल तू गाए जा, खुशियों से भरे वो तराने
जिन्हे सुनके दुनिया झूम उठे और झूम उठे दिल दीवाने . . .
राग हो कोई मिलन का, सुखसे भरी सरगम का
युग युग के बंधन का, साथ हो लाखों जनम का
ऐसे ही बहारे गाती रहे, और सजते रहे वीराने . . .
रात यूँ ही थम जाएगी, रुत ये हसीन मुसकाएगी
बँधी कली खिल जाएगी, और शबनम शरमाएगी
प्यार के हो ऐसे नग्में, जो बन जाए अफ़साने . . .
दर्द में डूबी धून हो, सीने में एक सुलगन हो
साँसों में हलकी चुभन हो, सहमी हुई धड़कन हो
दोहराते रहे बस गीत नए, दुनिया से रहे बेगाने . . .
-समाप्त.
[ ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील पात्रे, स्थळ, काळ, वेळ अथवा इतर कोणत्याही गोष्टीचा वास्तवाशी काहीएक संबंध नाही. असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग आहे. सोबतच कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्ती, संघटना किंवा धर्माला दुखावण्यासाठी हे लेखन करण्यात आलेले नाही. असे आढळल्यास आधीच क्षमा मागतो. क्षमस्व.
लेखक कोणत्याही अमली पदार्थांचे किंवा शरीरास हानिकारक असणाऱ्या तत्सम पदार्थांचे सेवन, समर्थन अथवा प्रचार करत नाही.
कथा स्वरचित असली तरी कथेत 'फक्त वातावरण निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या चित्रपटातील गीतांवर लेखकाचा अधिकार नाही.' गीतांचे एकाधिकार संबंधीत व्यक्तींच्या अखत्यारीत येतात. ]