श्रीमंती Prathamesh Dahale द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्रीमंती

शहरातील गर्दीने गजबजलेला परिसर..आजूबाजूला हॉटेल्ससह अनेक गोष्टींची दुकाने...आणि रस्त्यावर कर्णकर्कश गाड्यांच्या , रिक्षाचा हॉर्नचा आवाज..
एक सुशिक्षित उच्च घराण्यातील दिसणारा माणूस एका बंद असणाऱ्या हॉटेलजवळ येऊन थांबला..
" एक्स्क्यूज मी " हॉटेलशेजारी असणाऱ्या एका छोट्याश्या टपरी वाल्याला लांबूनच आवाज देतो..मात्र आजूबाजूच्या आवाजाने टपरीवाल्याला काही आवाज जात नाही. तो माणूस नाखुषीने टपरी जवळ जाऊन उभा राहिला..आणि पँटच्या मागील खिशातून रुमाल काढत तोंडाला लावला.
" बोला साहेब , काय देऊ ? मसाला पान ? " टपरीवाला त्याचा चेहरा निरखून बघत म्हणाला..
" अरे नाही नाही...हे..बाजूचे हॉटेल का बंद आहे ? आजूबाजूला कोणतेच हॉटेल का चालू नाही ? " त्या माणसाने त्याच्याकडे तुच्छतेने बघत विचारले.
" आज हॉटेल वाल्यांचा संप आहे साहेब , सगळी हॉटेल्स बंद असतील.." टपरी वाला दुसऱ्या माणसाचे मसाला पान बनवत म्हणाला.
यावर त्या माणसाने " शिट..." म्हणत तोंड वाकडे केले.
थोडावेळ काहीतरी विचार करून तो माणूस जाऊ लागला..तेवढ्यात टपरी वाल्याने त्याला आवाज दिला.
" ओ साहेब..."
त्याचा आवाज ऐकून तो माणूसाने थांबून मागे बघितले. त्याने अजून तोंडावरचा रुमाल काढलेला नव्हता..
" काही खायचे असेल तर बाजूला छोटी टपरी आहे तिथे जा..." टपरी वाला त्याच्या टपरीच्या उजव्या बाजूला हात दाखवत म्हणाला..त्या माणसाने काही प्रतिक्रिया न देता तोंडावरचा रुमाल बाजूला करत टपरीच्या उजव्या बाजूला गेला..काही अंतरावर त्याला एक छोटी टपरी दिसली.
' शिक्षा उपहार ' त्या टपरी वर लिहिलेले नाव वाचत तो टपरी जवळ पोहोचला..टपरी वाला वडे तळण्याचे काम करत होता..त्याचा दुसऱ्या साथीदार इतर गिऱ्हाईकांच्या ऑर्डर आणि पैसे घेण्यादेण्याचे काम सुरू होते.
तो माणूस हातातला रुमाल खिशात ठेवत शेजारी असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टीपजवळ गेला..टिपावरील ग्लास हातात घेताच त्याच्या चेहऱ्यावर संताप पसरला. तो ग्लास परत ठेऊन त्याने आपल्या पाठीवर लटकवलेली बॅग काढून त्यातून एक पाण्याची बाटली काढली...त्यातील उरलेले पाणी बाजूला ओतून देऊन..बाटली नळाला लावली..बाटली पाण्याने भरून झाल्यावर त्याने बाटली तोंडाला लावली..पाण्याचा घोट पिताच त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा संताप पसरला..तोंडातील पाणी थुकून द्यावे असे त्याला वाटले..मात्र कसेबसे त्याने पाणी गिळले. बाटलीचे झाकण लावून त्याने पुन्हा बाटली खिशात ठेवली..आणि पुन्हा नळाजवळ जात हात धुतले..
पुन्हा टपरी जवळ जात त्याने टपरीवर लावलेला मेन्यू पाहिला..काहीवेळ विचार करत त्याने ऑर्डर दिली.
" ओय , एक वडापाव दे " तो माणूस ऑर्डर घेणाऱ्याला आदेश देत असल्यासारखा म्हणाला..
" अरे तन्मय " एक व्यक्तीने मागून येऊन त्या माणसाच्या खांद्यावर हात टाकला...तसे तो माणूस त्याच्याकडे आश्चर्यकारक नजरेने बघत म्हणाला..
" काय....ओळखलं नाही का ? " ती व्यक्ती चेहऱ्यावर हसू अनंत म्हणाली..
" केदार...तू ? इकडे कसा ? " तो माणूस त्याला विचारत म्हणाला..
" अरे कामधंद्यासाठी यावं लागत...तू ? आज चक्क वडापाव खायला ? " केदारने त्याच्याकडे आश्चर्याने बघत विचारले..
" काय सांगू तुला....एकतर आज सगळे हॉटेल्स बंद आहेत..आणि भूक तर सहन नाही होत...आज नशिबात या भंगार टपरीवरचं खाणं आलं आहे " तन्मय नाराजीने म्हणाला..
" भंगार ? अरे खाऊन तर बघ हा वडापाव , तुझ्या त्या फाईव्ह स्टार स्टार हॉटेलपेक्षा कैकपटीने भारी आहे.." केदार म्हणाला..
" छे..." तन्मय उपहासाने हसत म्हणाला.
" घ्या साहेब " वडेवाला एका प्लास्टिकच्या ताटात दोघांना वडापाव देत म्हणाला..तन्मयने वडापाव हातात घेऊन खायला चालू केले..
" अजून काय चालू आहे तुझं ? " केदारने वडापाव खात तन्मय ला विचारलं..
" सध्या एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीत कामाला आहे...एका महत्वाच्या मीटिंगमध्ये इकडे आलो होतो.." तन्मय वडापाव खात म्हणाला.
" काय यार , चांगल्या कंपनीत कामाला लागला तर आम्हाला विसरला.." केदार त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला.
तन्मय काही बोलणार इतक्यात...त्याचे लक्ष ताटातील कागदावर गेले...एका शैक्षणिक अभ्यासक्रमातील पुस्तकातील एक पान फाडून त्यात वडापाव देण्यात आला होता..ते बघून तन्मयची तळपायाची आग मस्तकात गेली...केदार तन्मयकडे तो काही बोलणार या आशेने बघत होता..मात्र तन्मय संतापल्यासारखा पटापट वडापाव खात होता..केदारला काही कळेनासे झाले..तन्मय पटापट वडापाव संपवून हात धुवायला गेला..केदार त्याच्याकडे बघतच होता.
" लाज वाटते का तुम्हाला " तन्मय रखरखत्या डोळ्याने वडेवाल्याकडे बघत ओरडला..बाकीचे लोक त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.
" काय झालं साहेब ? " वडेवाल्याने हातातले काम थांबवत विचारले..तो मनातून घाबरला होता...कोणालाही काय झाले काही कळेना." काय रे ? अस अचानक काय झालं ? " केदारने तन्मयच्या पाठीवर हात ठेवत विचारले..
" तुम्ही अस शैक्षणिक पुस्तकच्या पानात वडापाव देता ? " तन्मय रागाने ओरडत होता.
" हो...साहेब...मग काय झालं ? " वडेवाला चाचरत म्हणाला.
" काय झालं म्हणजे ? अरे पुस्तक म्हणजे ज्ञानाचा भांडार असतो , माणसाला प्रगती करण्यासाठी ज्या ज्ञानाची आवश्यकता असते ते या पुस्तकातून मिळते...! आणि तुम्ही अशाप्रकारे पुस्तकांचा अपमान करतात ? छि..! लाज वाटली पाहिजे तुम्हाला " तन्मय रागाने फणफणत बोलत होता.
" अरे मग त्यात काय झालं ? पुस्तकांची पाने तर आहेत..." केदार त्याला समजावत म्हणाला.
" अरे जाऊद्या तुझ्यासारख्या बारावी केलेल्या आणि यांसारख्या अशिक्षित लोकांना काय कळणार शिक्षण काय ते..! तुमच्यासारख्या मंद बुद्धीच्या लोकांना पुस्तक के असते ते कळणार नाही..! " तन्मयने रागाच्या भरात भाषेची खालची पातळी गाठली होती...यावेळेस मात्र वडे वाल्याला ते सहन झाले नाही..तो तन्मय समोर येत त्याच्याकडे रागाने बघू लागला.
" तुम्ही जास्त शिकलेले आहात तर स्वतःला जास्त हुशार समजता का ? तूमचा सुशिक्षितपणा बाजूला ठेवा...पण तुमच्यात संस्कार नावाचा प्रकारच दिसत नाही.. ! " वडेवाला रागाच्या भरात बोलत होता..
" तू माझे संस्कार काढतो...आं...माझे संस्कार काढतो..तुझी काय लायकी आहे रे...कुठे तुझे वडे...आणि कुठे माझे करोडोचे पॅकेज..." तन्मय वडे वालाच्या डोळ्यात डोळे घालून बोलत त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला.
" अरे चल..वडापाव विकतो पण तुझ्यासारखा बेअक्कल नाही.." वडे वाला तन्मयच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला..यावर तन्मयने संतापाने हाताची मूठ आवळली..तो आता हात उचलण्याचा तयारीत होता..मात्र केदारने मध्ये पडत दोघांना लांब केले..
" थांब , मी याला याची औकातच दाखवून देतो.." तन्मय जाम भडकला होता...केदार त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत त्याला लांब घेऊन गेला..वडे वाला पुन्हा आपल्या कामाला लागला.
" जाऊदे ना यार , काय एवढ्या छोट्या गोष्टीवरून एवढा संतापतोय " केदार तन्मयला समजावन्याचा प्रयत्न करत होता.
" जाऊदे रे , मला परत बोलायला नको लावू , तुझ्यासारख्या अशिक्षित माणसाला काय कळणार " तन्मय अजूनही रागातच होता.
" तुला सुशिक्षित असल्याचा फार गर्व झाला आहे...चल माझ्यासोबत.." केदार त्याचा हात धरून घेऊन जाऊ लागला.
" कुठे ? हात सोड मला कुठे घेऊन चाललाय " टॅबमय हात सोडवण्याचा प्रयत्न करत होता..मात्र त्याचा काही उपयोग नव्हता.
केदार त्याला त्या वडापावच्या टपरी शेजारील एका छोट्याश्या बोळीत घेऊन गेला...तन्मय अजूनही त्याला विचारीतच होता.
" अरे सांग ना कुठे घेऊन चाललाय या भंगार बोळीत.." तन्मय त्याला सारखा विचारीत होता. मात्र केदार काही सांगायला तयार नव्हता..
केदार त्याला घेऊन एका गल्लीत आला..तेथील एका पडक्या घरासमोर येऊन केदार थांबला. त्याने तन्मय चार हात अजूनही पकडलेला होता.
" काकाSSS " केदारने मोठ्याने हाक मारली..
" आत ये " मधून आवाज आला..तसा केदार लगेच तन्मय चा हात धरून त्याला घेऊन आत गेला..
बाहेरून पडके दिसणारे घर आतून एकदम स्वच्छ आणि नीटनेटके होते...मध्ये काही लहान मुले हातात पुस्तक घेऊन वाचत होते..
" अरे हे कुठे घेऊन आला मला ? " तन्मय ने त्या लहान मुलांकडे बघत केदारला विचारले..केदार मात्र काही उत्तर न देता आतल्या खोलीत पाहू लागला..केदार तन्मय ला घेऊन आतल्या खोलीत जाणार तोच समोरून एक वृद्ध वयातील व्यक्ती समोर आली..चेहऱ्यावर सुरकुत्या...डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा..आणि डोळ्यात प्रेमळ भाव...त्यांना बघताच तन्मयला काहीतरी आठवले..त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरले..ती व्यक्ती ही तन्मय कडे बघून काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करू लागली..
" फडके काका...! " तन्मय त्यांच्याजवळ जात म्हणाला.
" कोण ? " त्या वृद्ध व्यक्तीने केदार कडे बघत विचारले..
" तन्मय पाटोळे , पुस्तकी किडा.." केदार त्या फडके काकांकडे बघत म्हणाला.
त्याच्या या वाक्यावर काकांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले..त्यांनी जवळ जात तन्मयचा चेहरा हातात घेतला.
" हो...आठवले...तन्मय.." काकांच्या डोळ्यातून अश्रू टपकले..
" काका...तुम्ही इथे कसे ? आणि ही मुले ? "
" काका पाहिलयासारखं आजही अनाथ मुलांना शिकवण्याचा काम करतात..तसेच , जसे यांनी तुला आणि मला दहावीपर्यंत सांभाळले.." केदारचे हे वाक्य ऐकताच तन्मय च्या चेहऱ्यावर हसू पसरले.
" काका " तन्मय काकांना मिठी मारत म्हणाला..काकांनीही त्याला मिठीत घट्ट आवळले.
" हा कुठे भेटला तुला ? " काकांनी केदारला विचारले.
" काका , याला जरा आपण दिलेल्या शिक्षेचा विसर पडला होता , म्हणून घेऊन आलो तुमच्याकडे..." केदार तन्मयकडे तिरस्काराने बघत म्हणाला. तन्मयने मान खाली घातली..त्याला बहुदा त्याची चूक कळाली असावी.
" म्हणजे ? " काकांनी केदारकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारले.
केदारने काकांना सर्व घडलेला प्रसंग सांगितला.
" तन्मय , अरे बाळा शिक्षण हे महत्वाचे असते हे मान्य आहे रे..पण तू सुशिक्षित झाला म्हणजे दुसऱ्याला कमी लेखायचे..ही शिकवण मी तुला दिली..! छे..! " काका अत्यंत दुखावले गेलेले दिसत होते.
" अरे तू ज्या वडे वाल्याला अशिक्षित म्हणाला , लक्षात ठेव..कधीतरी या वडेवाल्याच्या जागी मी होतो..खिशात पैसा नसतानाही तुम्हाला सांभाळले..आपण शिकू शकलो नाही...पण या अनाथ मुलांचे भले व्हावे म्हणून तुम्हाला वाढवले...आणि तुम्ही..!" काका डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाले.
" माफ करा काका...मला माफ करा...दहावी नंतर माझ्या चुलत मामाकडे जाऊन राहिलो...त्याने मला शहरातल्या अत्यंत प्रतिष्ठित शाळेत शिकवले...शिक्षण पूर्ण झाल्यावर लठ्ठ पगाराची नोकरी , गाडी , बंगले...यांमुळे मी स्वताला मोठे समजू लागलो काका...मी मान्य करतो...मला गर्व झाला माझ्या श्रीमंतीचा..आणि माझ्या शिक्षणाचा..मात्र खरं सांगतो मला पुस्तकांवर अजूनही प्रेम आहे..आणि म्हणूनच मी त्या वडेवाल्याशी हुज्जत घातली...माफ करा काका..." तन्मय ला आपली चूक कळाली होती..तो हात जोडून काकांसमोर उभा होता.
" माझी के माफी मागतो...त्या वडेवाल्याची माफी माग..मग मी तुला आनंदाने माफ करील." काका तन्मयच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला..
" हो मी आताच्या आता त्याची माफी मागतो...माझ्याकडून चूक झाली.." तन्मय काकुळतीने म्हणाला..त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप होत होता.

तन्मय धावत धावत त्या वडेवाल्याच्या टपरी जवळ पोहोचला. केदार त्याच्या मागोमाग आला..
" माफ करा..मला माफ करा..माझी चूक झाली..." तन्मय त्या वडेवाल्याला मिठी मारत म्हणाला..अचानक झालेल्या घटनेने वडेवाला थोडावेळ भांबावला..
" माफ करा..माझ्याकडून चूक झाली...खरतर मीच अशिक्षित आहे..मला एका गरिबाची व्यथा कळली नाही.." तन्मय हात जोडत म्हणाला.
" हा..पण.." वडे वाल्याला काही सुचत नव्हते.
तन्मय अजूनही त्याच्यासमोर हात जोडून उभा होता.
त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता.
" असू द्या..तुम्हाला तुमची चूक कळाली हेच चांगलं आहे...सुशिक्षित असो वा अशिक्षित माणसाला त्याचा गर्व होता कामा नये.." वडे वाला तन्मयचे जोडलेले हात खाली घेत म्हणाला.
तन्मयला पुढे काही बोलवले गेले नाही...त्याच्या डोळ्यात अश्रू होते..आज आयुष्यात त्याने फार मोलाचा धडा घेतला होता...सुशिक्षित आणि श्रीमंत असण्याचा त्याचा गर्व कोलमडून पडला होता..आपण पैशाने श्रीमंत असलो..तरी समोरचा मनाने श्रीमंत आहे..हे त्याला कळून चुकले.

समाप्त.