अधांतर - १५ अनु... द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अधांतर - १५


खोया था क्या जो,
आज मिलने लगा है?
उम्मीदों के उजालों मे,
खुशी का साया निकला है।


हरवलेलं नक्कीच सापडतं असं म्हणतात, मला याची प्रचिती येत होती अभय सरांना भेटून... त्यांच्याशी बोलल्यावर, त्यांच्या सहवासात मला ही वाटत होतं जो आत्मविश्वास मी कुठेतरी मागे सोडून आली होती तो आता मला पुन्हा नव्याने गवसतोय...तस लहानपणापासूनच घरच्यांनी खूप 'प्रोटेक्टिव्ह' वातावरणात ठेवलं त्यामुळे कधी लोकांच्या दुःखाशी किंवा त्यांच्या अडचणींशी जास्त गाठ पडलीच नाही...आणि तसही आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबात हेच शिकवतात की आपण भलं आणि आपलं काम भलं...त्यामुळे हे कोणाला जाऊन मदत करणं किंवा कोणाला शिकवणं हे समाजकार्य कधी केल्याच गेले नाहीत...जेंव्हा मी अभय सरांच्या NGO मध्ये काम सुरू केलं तेंव्हा कळाल दुःख काय असते आणि त्याची तीव्रता काय असते...आणि या सगळ्यामधून एक गोष्ट ही घडत होती की मला माझ्या स्वप्नांचा जो विसर पडला होता त्याची हळूहळू जाणीव व्हायला लागली होती, अर्थातच ही जाणीव मला अभय सरांनीच करून दिली....

माझा पहिला दिवस तर छान गेला तिथे, कोणाचं दुःख ऐकून मन भरून आलं तर कोणाची हिम्मत पाहून त्यांचं अप्रूप ही वाटलं...मला अपेक्षित होतं की विक्रम मला विचारेल की मला तिथे कसं वाटलं किंवा मी काय काम केलं, पण आम्ही घरी पोहोचल्यावर त्याने तो काहीच विचारलं नाही...रात्री जेवण वैगरे झाल्यावर मीच त्याला सगळं काही सांगण्याचा प्रयत्न केला...त्याने आधी ऐकून घेतलं माझं आणि नंतर बोलला,
"हे बघ नैना, कस आहे ना, तिथे आलेल्या बायका मुली कशा आहेत, कश्या नाहीत हे आपल्याला काही माहीत नाही आणि तुला त्यांचं कौतुक वाटावं अस त्यांनी आयुष्यात काहीही कमावलेलं नाही, तिथल्या अर्ध्या बायका तर नवऱ्याने सोडलेल्या आहेत..ज्यांना आपलं घर नाही संभाळता आलं त्यांचं काय कौतुक करावं...?"
तुडसटपणे विक्रम बोलला, पण मला ते चांगलं वाटलं नाही..

"अस कसं बोलू शकता तुम्ही? घर काय फक्त बायकांनीच बघायचं का? त्यांच्यावर जे त्यांच्या नवऱ्याने काही जाच केले असतील हे आपल्याला नाही माहीत ना, त्यामुळे त्यांना चुकीचं नाही समजू शकत आपण..."

"हे बघ, तिथे जाऊन, त्यांचं ऐकून तू जास्त झाशीची राणी बनण्याचा प्रयत्न नको करू, आणि अजून एक, चांगल्या घरातल्या मुली मरून जातील पण संसार तोडण्याची भाषा नाही करत आणि लक्षात ठेव आपली काही तरी ओळख आहे समाजात त्यामुळे हे असल्या फालतू लोकांच्या मागे लागू नको, टाईमपास करायला जाते, तो करायचा आणि यायचं गुपचूप घरी तू...त्यांच्या फालतू लफड्यात पडायची गरज नाही..."

"हम्मम.."

विक्रमचे शब्द ऐकून मला त्याला काही बोलायची इच्छा झालीच नाही...आणि काय बोलणार मी त्याला, आपण कोणाचं मत बदलू शकतो, कोणाची मानसिकता नाही बदलू शकत... आणि विक्रमची मानसिकता माझं मानसिक खच्चीकरण करत होती

"आणि अजून एक...ते अभय सर अधूनमधून येत असतात तिथे, त्यांच्या पासुन जरा लांब राहायचं..फार चलाख माणूस आहे तो.. त्यांच्यामुळे आपल्यात वाद होता कामा नये..कळलं ना.."

मी मान हलवली फक्त त्याच्या बोलण्यावर...कोण्या तिसऱ्याच ऐकून घरात वाद करणं हे चुकीचं असलं तरी
अभय सर चुकीचे नाहीत किंवा कोणत्या प्रकारची चलाखी त्यांच्यात आहे यावर माझा विश्वास नव्हता...हो, हुशारी मात्र खूप होती त्यांच्यात, दुसऱ्यांची मानसिकता ओळखण्याची प्रतिभा होती त्यांच्याकडे, आणि आपल्या कर्तृत्वावर लोकांना आपलंस करणं ही उपजत बुध्दी होती त्यांच्याकडे...आता या सगळ्या गोष्टी विक्रमकडे नव्हत्या अस नाही, पण यांच्या सोबत विक्रमकडे होता अभिमान आणि मी पणा...अहंकाराच्या शर्यतीत धावणारा जिंकुनही हरलेलाच असतो हे मात्र विक्रमला कधी कळलंच नाही...

दोन आठवडे उलटून गेले होते मला NGO जॉईन करून, विक्रम मला सकाळी सोडायचा आणि संध्याकाळी घ्यायला ही यायचा, पण तिथे काम करत असताना तिथल्या कोणत्याच मुद्द्यांवर बोलणं विक्रमला आवडायचं नाही...त्याच्या नजरेत जर एखादी स्त्री एकटी आहे किंवा तिच्या घरच्यांपासून विभक्त झाली आहे म्हणजे दोष तिचाच आहे..विक्रम सोबत राहून एक तर नक्की कळाल होतं की तो एवढा शिकलेला किंवा मोठ्या पोस्ट वर जर असला तरी त्याची मानसिकता एका 'टीपीकल भारतीय पुरूषप्रधान' संस्कृती मध्ये वाढली होती आणि त्यामुळेच काहीही झालं तरी फक्त दोष हा मुलींचाच हा निकाल त्याच्याकडून लावला जायचा...मी त्याला त्याच्या भलाई साठी दिलेल्या सूचना त्याला तथ्यहीन वाटायच्या, कधी तर त्याचा पुरुषी अहंकार ही दुखावला जायचा आणि ज्या दिवशी हे घडायचं तो दिवस...नव्हे, ती रात्र अशी असायची की माझं कितीही 'नाही' बोलेलेलं त्याला ऐकू यायचं नाही, ती एक प्रकारची शिक्षा असायची माझ्यासाठी...

एक दिवस मला बरं वाटत नव्हतं, खर तर त्यादिवशी मी तापाने फणफणत होती...विक्रमला संध्याकाळी फोन लावले मला बर वाटत नाही म्हणून तर त्याने त्याच्या ड्रायव्हर ला सांगून औषधं पाठवून दिली...तो मात्र रात्री बारा वाजेपर्यंत घरी पोहोचला नव्हता, मला काळजी वाटायला लागली, मी त्याला फोन करणार तेवढ्यात तो आलाच घरी...घरी आल्यावर त्याने एक भली मोठी बॅग माझ्या हातात दिली कपाटात ठेवायला, मी ती उघडून बघितली तर त्यात पैसे होते,

"इतके पैसे?? कोणाचे आहेत??" मी आश्चर्याने विचारलं..

"आहेत कामाचे..ठेवून दे.." विक्रम बोलला,

"कामाचे??? इतके?? मग ते बँकेत का नाही टाकले? घरी का आणलेत??" मी पुन्हा काळजीने विचारलं...

"बोललो ना कामाचे आहेत...ठेव ते..." विक्रम डोक्यावर हात ठेवून बोलला, त्याच्याकडे पाहून मला त्याची काळजी वाटली...

"एक विचारू?? तुम्ही काही चुकीचं तर नाही करत आहे ना?? किंवा तुमच्या कडून जोर जबरदस्तीने कोणी कोणी काही चुकीचं करवून तर घेत नाहीत ना? तस असेल तर आपण सिस्टिम ला सांगू शकतो, खूप मार्गाने मदत मिळू शकते तुम्हाला..." मी आपली भावनेच्या भरात आणि त्याची काळजी म्हणून बोलत असताना विक्रम माझ्यावर ओरडला...

"अग ये...तू ना तुझं घर आणि तुझं किचनच संभाळ, मला पहा अन फुलं वहा अशी तर गत आहे तुझी, तुला काय कळतं ग सिस्टिम वैगरे, माझ्या कामात तू काही बोलायची गरज नाही कळलं ना?? "

"पण मी चुकीचं काय बोलली तुम्हाला विक्रम? आणि हो, तुम्ही विसरले असणार तर एक सांगून देते मी पण एक टेक्निकल ग्रॅज्युएट आहे, मला ही कळते सगळं, प्रत्येक वेळी तुम्ही माझी लायकी काढायची नाही..."

एक तर तापेने माझं डोकं आधीच जड झालं होतं आणि त्यात नेहमी नेहमी विक्रमचे हे शब्द मला जिव्हारी लागत होते त्यामुळे मी पण तावातावात त्याला उत्तर देऊन रूम मध्ये निघून गेली झोपायला, पण माझं हे बोलणं विक्रमला फार झोंबल होतं...मी येऊन झोपलीच होती की मला विक्रमची चुळबुळ कळाली आणि त्याच्या स्पर्शाने मी बाजूला झाली,

"मला ताप आहे विक्रम, बरं नाहीये मला, मला झोपू द्या प्लिज..."

"तुला तर कळते ना सगळं, मग आता हे नाही कळत का मला काय हवंय? "

"हे बघा विक्रम, मला झोपायचं आहे, मी थकली आहे, सकाळी बोलूयात आपण, प्लिज..."

आणि विक्रम मला जबरदस्ती त्याच्याकडे वळवत आणि माझे दोन्ही दंड घट्ट पकडत बोलला,
"जास्त शहाणपणा नाही करायचा हां नैना, आणि थकायला काय मोठा तिर मारतेस ग तू दिवसभर? सगळं काही तर आयतं मिळतं तुला, मला आता तू हवियेस, कळलं ना?"

आणि त्यादिवशी मी वेदनेने विव्हळत असताना ही विक्रमला काही फरक पडला नाही, प्रत्येक वेळेस विक्रमने त्याची मर्जी माझ्यावर थोपवली होती पण आजच्या त्याच्या कृत्याने माझ्या मनात माझ्याच बद्दल किळस निर्माण केली होती...जर माझा बायको म्हणून हीच वागणूक मला विक्रमकडून मिळत असेल तर मला हे जीवन जगायचं तरी कसं हे विचार मनात डोकावत होते..पण जीवन तर जायचंच होतं मला आणि ते ही विक्रम सोबत आणि ते किती दिवस हे मात्र निश्चित नव्हतं...
--------------------------------------------------------------

विक्रमची दिवसेंदिवस बदलत चाललेली वागणूक, तो नक्कीच काहीतरी चुकीचं करतोय हे मला खुणावत होती...मनातून हे पण वाटत होतं की त्याने चुकीच्या गोष्टींपासून लांब राहावं किंवा तो अडचणीत येईल असं काही वागू नये पण मी त्याला ते सांगायचं टाळत होती, कारण त्याच्या नजरेत माझी किंमत फक्त त्याच घर सांभाळणारी आणि त्याच्या रात्री उफाळलेल्या भावना शांत करणारी बायको एवढीच होती...त्यापेक्षा जास्त किंमत त्याने माझी केली नाही आणि त्यामुळेच म माझा वेळ जास्तीत जास्त NGO मध्ये घालवत होती...या दोन आठवड्यात माझी आणि अभय सरांची ही भेट झाली नव्हती..

मला जेंव्हा एकटं वाटायचं मी त्या NGO च्या बाहेर जो बेंच होता वडाच्या झाडाखाली तिथे जाऊन बसायची...त्यादिवशी मी विक्रमचा वासनांध स्वभाव कसा झाला असेल याचा विचार करत असताना तिथे बसली, त्याचा बदलणार मूड, त्याचे जबरदस्तीचे स्पर्श मला तीळ तीळ मारत होते...माझी लायकी काढणारे त्याचे काटेरी शब्द माझ्या मनाला रक्तबंबाळ करत होते...मला यातून निघण्याची हिम्मत नव्हती आणि यामुळेच मी एक पिंजऱ्यात अडकली आहे ही भावना मला येत होती... हा सगळा विचार करत असताना मला मागून आवाज आला,

वेदनांचा गर्तेतले,
तुटतील पाश सारे।
आक्रंदाच्या लाटांना
शमवतील किनारे।


अभय सर माझ्या डोळ्यांत बघत होते...आजही अभय सरांना माझा भावना कल्लोळ कळाला असावा का? त्यांना चेहरा वाचता येतो का? हा विचार करत असताना अभय सर बोलले,

"हो...येतो.."

"हूं?? काय???"

"मला चेहरा वाचता येतो, आणि मला कळतंय तू काय विचार करत आहेस? टेन्शन मध्ये आहेस ना? माहीत आहे मला सगळं तू काय विचार करत आहेस..."

अतिशय गंभीर भाव होते त्यांच्या चेहऱ्यावर, एक एक पाऊल माझ्याकडे टाकत ते येत होते, त्यांना आता मी काय सांगू आणि काय नाही हे काहीच कळत नव्हतं...

"क्क..क्काय विचार करत आहे मी??"
मी चाचरतच विचारलं...

"तू...तू हाच विचार करत आहेस ना की या माणसाला पुन्हा तुला फुकटचा चहा पाजावा लागेल..🤣🤣🤣"
आणि नेहमीप्रमाणे ते जोरजोरात हसायला लागले...

"तुम्ही पण ना... घाबरवलं होत मला...😏"

"का?? मी काय घाबरवणार ग तुला?? लोकच घाबरत असतील तुला...तू तर..."

"...मी तर पोलासाची बायको ना...एवढीच ओळख राहिली आहे माझी आता...माझं स्वतःच काहीच अस्तित्व नाही ना?? हो ना??"
मी थोडी चिडतंच, अभय सरांचं वाक्य अर्ध्यातच मोडत बोलली, कदाचीत माझा साठवलेला राग मला त्यांच्यावरच काढायचा होता , माझे डोळे भरून आले होते....

"या जगात प्रत्येक कणाचं आपलं एक अस्तित्व आहे, मग तुझं का नसणार?? एक दिवस तुझ्या नवऱ्याला उपाशी राहू दे, आणि मग त्याला विचार तुझं अस्तित्व काय आहे?? कसं आहे ना नैना, मुलींचं एकच चुकतं, तुम्ही मुली दुसऱ्यांना महत्त्व देता देता स्वतःची ओळख विसरून जाता, आणि या जगात जर तुला वाटत असेल की कोणी तुला महत्त्व द्यायला पाहिजे तर तू आधी स्वतःला महत्त्व द्यायला शिक...तूच जर तुझं अस्तित्व नकारत असशील तर बाकीच्याना काय फरक पडणार आहे...?"

"........"

"काय??? नाही पटलं माझं?"

"काय बोलू??... अंधेरे का कोई पार नही
मेले के शोर में भी खामोशी का आलम है!!"

"अमृता प्रीतमच्या इतक्या पोसिटीव्ह कविता नाही लक्षात तुझ्या आणि हे नेगटीव्ह बरोबर लक्षात आलं ?? कोणीतरी म्हणतं, अंधार आहे म्हणून प्रकाशाचं अस्तित्व आहे....."

"तुमचा टी. एस. इलियट जर स्त्री असता तर त्यालाही सगळा अंधारच दिसला असता...."

"अंधार होता म्हणून एका स्त्रीला प्रकाश गवसला, आणि त्यामुळेच ती अमृता प्रीतम झाली...इस रात की सुबह जरूर आहे, हे लक्षात ठेव..."

"तुम्ही आज इतके यशस्वी आहात, तुमच्या मर्जीप्रमाणे तुमचं आयुष्य जगत आहात त्यामुळे हे बोलणं सोप्प आहे तुम्हाला..."

"तेच ना, तू फक्त माझी आजची स्थिती पाहत आहेस नैना, पण हे झगमगटणार यश मी कितीतरी अमावस्या पार करून मिळवलं आहे हे तुला माहीत नाही...त्यामुळे सांगतो, रडण्याचे चान्स आयुष्य तुला खूप देईल ग, पण आपण आनंदी राहून त्याला चपराक द्यायला पाहिजे...आणि तसही हे डोळ्यांतून पडणार पाणी इतकं स्वस्त नाही ठेवायचं की कोणत्याही गोष्टी साठी त्याला वाहू द्यायचं...जी गोष्ट आपल्याला त्रास देते त्याबद्दल नक्कीच बोलावं..."

"पण मग आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल बोललं तर अस नाही होणार का की आपण फक्त आपल्यापुरताच विचार करतो? किंवा आपण स्वार्थी आहे?"

"स्वार्थी होणं काही काही गुन्हा तर नाही ना? जोपर्यंत आपला स्वार्थीपणा दुसऱ्याला क्षती पोहचवत नाही तोपर्यंत स्वतःचा विचार करण्यात काहीही चुकीचं नाही, आणि स्वतःला आनंदी नाही ठेवू शकलो आपण तर दुसऱ्यांना सुख कस देणार?? आणि स्वतःला आनंदी ठेवणं हा मूलभूत अधिकार आहे त्यामुळे स्वतःचा विचार करणं नक्कीच चुकीचं मानत नाही मी...."

"हम्म...बरोबर..."

अभय सरांशी बोलून मन थोडं हलकं झालं होतं...कधी कधी आपली परिस्थिती बदलत नाही पण कोणीतरी समजवणारं असलं की त्या परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत जरूर मिळते, आणि अभय सरांना बोलून मला ही तेच वाटत होतं की मी स्वतःला असं दुःखात झोकून देणं चुकीचं आहे...

"मी बरोबरच असतो ग नेहमी..बघ तुला समजवण्यात माझा किती वेळ गेला, आता याची भरपाई तुला करावीच लागेल...प्रत्येक वेळी असंच करते तू..."

"मी...मी कशी करू भरपाई आता??"

"भूक लागलीये मला, कॅन्टीनमध्ये जाऊन चहा नाश्ता करून...😁😁"

"आणि तुमची ही झेड प्लस सेक्युरिटी??? त्याच काय?"
त्यांच्यामागे उभ्या असलेल्या दोन कॉन्स्टेबल वर नजर टाकत मी बोलली,

"तुझा तेंव्हाचा राग पाहून मला वाचवायला आले असतील😂😂, थांब त्यांना सांगतो मी सुखरूप आहे..."

"बाय द वे, थँक्स.."

"कॅन्टीनचं बिल तू देणार आहेस पण😂😂"

आता हळूहळू माझी आणि अभय सरांची मैत्री रंगत होती, दिवसातून एकदा तरी ते मला येऊन भेटून जायचे, आणि जेंव्हा कधी ते खूप व्यस्त असलें किंवा त्यांना NGO मध्ये यायला नाही जमलं तर ते आवर्जून फोन करायचे, त्यांच्या गोष्टी ऐकून मला हुरूप यायचा...प्रत्येक वेळी त्यांना बोलून मी काहीतरी नवीन शिकायची, आता घरीही मी जास्तीत जास्त वेळ वाचन करण्यात घालवायची, जेणेकरून विक्रम माझ्यासोबत जे काही चुकीचं करत आहे त्यात मी अडकून न राहता त्यातून बाहेर यावी यासाठी...तिकडे विक्रम मात्र कोणत्या दलदलीत फसत होता याची जाणीवही मला नव्हती, आणि विक्रमची स्थिती डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरी सारखी होती...त्याला वाटत होतं की कोणाला काहीही कळणार नाही पण अभय नावाचा माणूस त्याच्यासाठी काळ बनून येणार होता...पण मग या सगळ्यांमध्ये माझी फरफट होणार होती, विक्रम आणि अभयच्या वैरात माझं आयुष्य कलाटणी घेणार होतं....
-------------------------------------------------------
क्रमशः