अधांतर - २० अनु... द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

अधांतर - २०

"कुछ तो जादू होगी, ठगने मे तुम्हारे,
इतना लूट गये की, भरोसा भी ना बचा।"


धन, संपत्ती, पैसा चोरीला गेला तर तो पुन्हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने परत मिळवू शकतो, आणि जो चोर आहे त्याला शिक्षा ही मिळते... पण विश्वास चोरीला गेला तर तो कसा मिळवायचा??? नाही माहीत याच उत्तर...पण एक नक्की सांगू शकते, जो विश्वास चोरतो त्याला तर काहीच फरक पडत नाही पण ज्याचा चोरल्या जातो तो मात्र सगळीकडूनच हरतो आणि असा हरतो की दुसऱ्यांवर सोडा स्वतःच्या अस्तित्वावरचा ही विश्वास उडून जातो...इतकी चलाखी, इतकी लबाडी करून आपण स्वतःचं प्रतिबिंब आरश्यात पाहू शकतो, स्वतःच्या नजरेत आपली काही किंमत असू शकते??? माझ्या समजण्या पलीकडच्या आहेत या गोष्टी कारण कोणाला धोका देणं माझ्या तत्त्वात नाही...पण आज एका स्त्रीचा, एका आईचा विश्वासघात झाला होता आणि हे सहन ती कदापी करणार नव्हती....

अश्या वेदना होत असताना ही खूप मुश्किलीने मी डोळे उघडले, माझ्या नजरा फक्त विक्रमला शोधत होत्या पण तो जवळ नव्हता...मला होणाऱ्या वेदना मला सांगत होत्या की माझं आईपण माझ्याकडून हिरावून घेतलंय पण तरीही वेडी आशा हे सांगत होती की विक्रम कसाही असला तरी असं कृत्य तो नाही करू शकत, तो तर ही बातमी ऐकल्यापासून किती आनंदी होता, किती बदल झाला होता त्याच्या वागणुकीत...आणि माझी बाजू कोणी ऐकत नव्हतं तरी मला हेच वाटतं की कोणाचं स्पष्टीकरण ऐकल्याशिवाय त्याला दोषी ठरवू नये आणि यामुळेच मला विक्रमला प्रत्यक्षात बोलायचं होतं... असे मानसिक युध्द नेहमीच नात्यांची कस काढतात आणि दुर्दैवाने आमच्या नात्याची त्या युद्धात पडती बाजू होती....

मोबाईल माझ्या जवळ नव्हता, मला उठायला त्रास होत होता, विक्रम जवळ नव्हता त्यामुळे नर्स ला आवाज दिला..दोन तीन हाका मारल्यावर ती आली, आणि येताच क्षणी मला विचारायला लागली, मला कसं वाटतंय, कुठे दुखते, त्रास होतो का वैगरे वैगरे, मला तिला ऐकण्याची किंवा तिला उत्तरं देण्याची मानसिकता अजिबातही नव्हती....मी तिला सरळ बोलली की माझा नवरा कुठे आहे, त्यावर तिचं उत्तर होतं तो बाहेर डॉक्टर सोबत बोलतोय..आणि असं बोलून ती जायला निघाली, माझ्या मनात काय आलं माहीत नाही, पण मी तिला थांबवलं आणि विचारलं,
"मला इतकं का दुखतंय पोटात? माझं बाळ तर ठीक आहे ना?? सोनोग्राफी नॉर्मल होती ना???"
आणि ती मला इतक्या आश्चर्याने बघत होती की मी काहीतरी चुकीचं बोलली किंवा मी मूर्ख आहे...काही सेकंद ती अनुत्तरित थांबली आणि मग माझ्याजवळ येत बोलली,

"एवढं टेन्शन नाही घ्यायचं, ही पहिलीच वेळ होती, पुढच्या वेळी नक्की मुलगाच असेल, विश्वास ठेवा...तुमचे मिस्टर बोलतायेत बाहेर डॉक्टर सोबत, हे डॉक्टर तशी पण ट्रीटमेंट देतात, मुलगा होण्यासाठी, महिन्यातून एकदा यायचं, बस..."

आता पुढे ती जे काही बोलत होती ते मला ऐकायला आलंच नाही..देवाचा दर्जा देतो आपण डॉक्टरांना, आणि हे असले डॉक्टर तर हैवान असावे जे थोड्याश्या पैश्यांसाठी निष्पाप जिवाच्या कत्तली करतात...पण कोणाला बोलून काय फायदा जेंव्हा त्या निष्पाप जीवाला मारणार खुद्द त्याचा बापच असेल तर, काही क्षणापूर्वी आभाळ भरून सुख माझ्या ओटीत टाकलं आहे देवाने असं वाटत होतं पण ते आभाळ बघत असतांना माझ्या पायाखालची जमीन ओढल्या गेली...आणि पोटातल्या वेदनेपेक्षा विश्वासघाताची वेदना आता मला जास्त मोठी वाटत होती...विक्रम माझ्या बाजूला येऊन कधी उभा झाला काही कळलं नाही, माहीत नाही कितीवेळेपासून तो मला बोलत होता पण त्याचे शब्द माझ्या कानापर्यंत पोहोचलेच नाही...शेवटी त्याने माझ्या गालाला हात लावून मला हलवलं तेंव्हा माझं लक्ष गेलं त्याच्याकडे,

"नैना...किती वेळचा बोलत आहे मी तुला, बरं वाटतं का?? दोन तासात आपण जाऊ शकतो, तुला जास्त दुखत असेल तर आताच सांग, मी डॉक्टर ला काही पेन किलर द्यायला लावतो...."

तो बोलत होता आणि मी फक्त त्याच्या निर्दयीपणाच निरीक्षण करत होती, मी काही बोलत नाही हे पाहून त्याने पुन्हा मला विचारलं..
"नैना...पेन किलर हवं का??"

"अम्म्म..हम्मम, हो, हवंय, कायमच...विक्रम...का केलं असं??"

विक्रम टेबलवरचे औषधं आणि सामान भरण्यात मशगुल होता, माझ्या प्रश्नाने कदाचित तो भानावर आला असावा आणि त्याला आठवण झाली असावी की त्याने मला कसं फसवलं आहे, सावरासावर करायला तो बोलला,
"नैना, तू टेन्शन घेशील म्हणून तुला सांगितलं नाही मी, पण बाळाची वाढ होत नव्हती बरोबर, ते..हां, सोनोग्राफी मध्ये ही दिसलं, भंडाऱ्यालाही मला डॉक्टर बोलले होते एकट्याला, पण तुला टेन्शन येईल म्हणून नाही बोललो आणि मला वाटलं एकदा इथेही कन्सर्ण करू, पण...जाऊदे, आता विचार नको करू, डॉक्टर बोलले सहा महिन्यांनी आपण पुन्हा प्रयत्न करू शकतो..."

माझ्याकडे शब्दच नव्हते बोलायला विक्रमला, कारण त्याचा खोटेपणा, त्याची ही हीन वृत्ती माझ्यासाठी इतकी धक्कादायक होती की मला त्यातून सावरता ही येत नव्हतं..मला उठून उभं राहण्याची ताकत नव्हती आणि त्याच दिवशी संध्याकाळी विक्रमला मला घेऊन परत जायचं होतं, मध्ये नागपुरात थांबू अशीही त्याची इच्छा नव्हती आणि ती यासाठी नव्हती की अश्या अवस्थेत मी माझ्या घरच्यांना भेटू नये आणि त्याचा कुठेही कमीपणा होऊ नये..ती वेळ अशी होती की मी सगळंच विसरुन बसली होती, किंवा मला इतका जबरदस्त मानसीक आघात होता तो की मला त्यातून सावरता येत नव्हतं त्यामुळे विक्रम जे बोलला ते गुपचूप ऐकत गेली मी...

त्या रात्री प्रवास करून आम्ही भंडाऱ्याला परत आलो, दोन पाऊलं चालणं ही जड जात होतं मला, कसंतरी घरात पोहोचलो...विक्रमने मला बेडवर नेऊन बसवलं आणि तो झोपी गेला, मी प्रयत्न केला झोपण्याचा पण जेव्हाही डोळे बंद केले मला हेच दिसलं की मी आज एका जीवाची हत्या करून आली आहे, शेवटी झोप लागलीच नाही...दुसऱ्या दिवशी पहाटे विक्रम उठला त्याने मला पाहिलं तर मी त्याचं अवस्थेत बसलेली होती जसं रात्री त्याने मला आणून सोडलं होतं...त्याला काय झालं काय माहीत अचानक आणि तो थोड्या रागातच मला बोलला,
"नैना...नैना, हे काय आहे, तू खरंच डोक्यातून गेलीयेस का ग?? उठ पटकन आणि हे सगळं साफ कर...मूर्ख कुठली एवढंही कळत नाही का, हे बघ जरा काय केलंस?"

आणि तो हाताने मला बेडवर काहीतरी दाखवत बोलला, मी तेंव्हा भानावर आली आणि बेडवर निरखून पाहिलं तर बेडशीट रक्ताने माखलेकी होती, आणि ते पाहून मला आठवण झाली की मी काय गमावून बसली आहे..आणि ते दृश्य पाहून माझं दुःख, माझा आक्रोश, माझा राग सगळा ज्वालामुखी बनून आता विक्रमवर बरसणार होता...मी रागात उठली आणि विक्रम जवळ जात बोलली,

"साफ करू?? काय साफ करू?? तुम्ही करून आणलंय ना साफ सगळं, काय बोलले तुम्ही बाळाची वाढ होत नव्हती बरोबर.. खरंच?? मुलगा आहे हे कळलं असतं तर झाली असती का वाढ बरोबर?? आणि आता तुम्हाला माझी ही अवस्था पाहून वाईट नाही वाटत आहे, किळस येत आहे, हो ना?? निचपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या तुम्ही...आता मला तुमची किळस येत आहे, तुमच्या सारख्या एका सुशिक्षित आणि स्वतः कायदा सांभाळणाऱ्या व्यक्तीला हे शोभते का विक्रम???"
माझा आक्रोश माझ्या डोळ्यांतून आणि माझ्या मनातून बाहेर पडत होता...

"तोंड सांभाळून बोल नैना, आणि काय चुकीचं केलं मी?? मुलगा कोणाला नको असते ग?? तुझ्या आईबाबांना विचार त्यांना नको होता का मुलगा, आणि मी असा कुठे बोललो की मला मुलगी नकोच, पण आधी मुलगा होऊ दे मग मुलगीही झाली तरी चालेल... आता हे नाटकं बंद कर आणि उठून आवर सगळं हा तमाशा...."

"तमाशा?? हा तमाशा वाटतो तुम्हाला?? एक जीव घेतलाय तुम्ही आणि त्यासोबतच माझ्या जीवाशीही खेळले तुम्ही, तुम्हाला काय कळणार माझ्या वेदना...तुम्हाला साधं खरचटलं तरी त्रास होतो, आणि इथे तर माझ्या शरीरातुन एक जीव जबरदस्तीने कापून काढण्यात आला आहे, विचार करा मला काय होत असेल...पण बस झालं आता, हा माझ्या सहनशक्तीचा अंत आहे, तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे विक्रम, खूप चुकीचं केलंय तुम्ही, आणि आता मी गप्प नाही बसणार...."

"हो का, काय करशील तू??? माझ्या सोडून जाशील?? आठवते ना, मागच्या वेळी कसं तुला आणि तुझ्या घरच्यांना झुकायला लावलं होतं मी माझ्यासमोर...हे बघ, आताही सांगतो, दोन दिवस आराम कर, शरीराला अन तुझ्या डोक्याला शांती दे जरा..."

"तुम्हाला कळत नाही मी काय बोलली?? मी इथे एक क्षणही थांबणार नाही, नागपूर ला जायचं आहे मला, तुमच्या सारख्या जनावरा सोबत नाही राहु शकत मी, अजिबात ही नाही...."

"तू खूप जास्त बोलत आहेस नैना, अजूनही सांगतो, आवर घाल स्वतःच्या तोंडाला, नाहीतर..."

"....नाहीतर?? माझा ही जीव घ्याल?? तुमच्या सोबत राहून जिवंत राहिल्या पेक्षा जीव दिलेला बरा, पण मी तस करणार नाही, तुम्हाला आणि त्या डॉक्टर ला आता शिक्षा मिळणार, मी जाणार आजच नागपूर ला...."

"हो का, जा, आता तर तू खरंच जा...नवऱ्याला सोडून तुझी काय इज्जत राहते मी पण बघतो आता.. तुला तर तुझे आईवडील ही पोसायला तयार होणार नाहीत, नाक रगडत माझ्याच जवळ यावं लागेल तुला नैना..."

"माझ्या आयुष्याचा शेवटचा क्षण जरी असेल ना विक्रम, तरी तुमच्या कडे जीवाची भीक मागायला येणार नाही.."

"एवढा घमंड, एवढा अहंकार कशाचा आहे ग तुला? कोण आहेस तू?? आणि जाशील कशी?? माझ्याकडे भीक मागणार नाही बोलते, पण फुकटात कोण नेणार आहे तुला?? चल, नाटकं बंद कर, अन कर हे साफ सगळं, मी निघतो ऑफिसमध्ये..."

आणि असं बोलून विक्रम निघून गेला, आणि खरं बोलून गेला तो, माझी स्वतःची कमाई काय होती?? आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं माझ्याकडे...माझा राग कितीही उफाळुन येत असला तरी हे सत्य होतं की मी आर्थिकदृष्ट्या मी दुर्बळ होती...कितीतरी वेळ मी तशीच बसून होती, शारीरिक अवस्था एवढी हलाखीची झाली होती पण मला ना जेवायचं भान होतं ना औषधं घ्यायचं...खूप विचार करून एक निर्धार केला, आणि सगळ्यांत आधी तर विक्रमच्या घरातली सगळी सफाई केली..आता मी विक्रम विरुद्ध लढाई करण्याचा मानस बनवला होता, आणि यावेळी विक्रमने मला नेहमीसारखी रडकी किंवा लाजरी बुजरी समजून खूप मोठी चूक केली होती...जस विक्रमने शांत डोक्याने माझ्यासोबत हा खेळ रचला होता तस मलाही शांत डोक्याने सगळं करायचं होतं, पण त्याच्यात आणि माझ्यात एक फरक हा होता की त्याने धोका दिला होता खोटं बोलून, मला फसवून पण मला त्याला कोणता धोका द्यायचा नव्हता, पण फक्त त्याला त्याच्या कर्माची शिक्षा द्यायची होती...घर आवरून झाल्यावर मी सगळ्यांत आधी त्या हॉस्पिटल ची फाईल सोबत घेतली, त्याचे काही बिल सापडतात का किंवा तो सोनोग्राफी चा रिपोर्ट आहे का तो शोधला विक्रमच्या बॅगेत...काही सापडलं, काही नाही सापडलं...पण जे काही होतं, ते घेऊन मी पोलिस स्टेशन ला जायला निघाली, मला यावेळी अभय सरांचे शब्द आठवले, "कायद्याची तरतूद सगळ्यांसाठी सारखीच असते, कायदा संभाळणार रक्षक जरी त्यावेळी अप्रामाणिक वाटला तरी, सगळेच तसे नसतात, त्यामुळे आपला अधिकार आपण मागायचा आणि कायद्याची मदत घ्यायची..."
हाच विचार करून मी घराच्या बाहेर निघाली, अंगात त्राण नव्हता, पण मनाने ठरवलं होतं त्यामुळे आता माघारी फिरणार नव्हतीच मी...आज मला कळत होतं की मी जेंव्हा NGO मध्ये जायची, तेंव्हा त्या स्त्रियांच्या हसणाऱ्या चेहऱ्यामागे किती किती दुःख लपलेली असतील...

एक एक पाऊल उचलायला जड जात होतं, पण तरीही मी स्वतःला जबरदस्तीने चालायला भाग पाडत होती, अगदी थोड्याच अंतरावर पोलीस स्टेशन राहिलं होतं पण आल्यामुळे मला आणखीनच थकवा जाणवत होता आणि मला गरगरायला झालं, घसा कोरडा पडला, माझ्या वेदना अधिक तीव्र झाल्या, आणि मी कोणाला तरी जाऊन धडकली...त्यानंतर काय झालं मला काहीच माहीत नाही...
------------------------------------------------------
माहीत नाही किती वेळ मी बेशुद्ध होती, आणि मी कुठे होती, पण जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा कळलं की मी हॉस्पिटलमध्ये आहे, बाजूला डॉक्टर होते, त्यांनी मला कसं वाटतंय विचारलं आणि माझे कोणी नातेवाईक बाहेर आहेत असं सांगून ते त्यांना बोलवायला गेले..मला वाटलं की नक्कीच आईबाबा असतील, कमीतकमी विक्रमने त्यांना कळवण्याचं कामं तरी केलं होतं, आणि मी डोळे उघडून दरवाज्यातून टक लावून पाहत होती...,आणि माझ्या कानात ओळखीचे स्वर पडले,
"आता कधीच भेटणार नाही म्हणून निघून जाते नेहमीच, आणि अशी अचानक भयानक येऊन धडकते मला, घाबरवते की सुखद धक्का देते तेच कळत नाही😀😂"

आणि तब्बल सात ते आठ महिन्यानंतर अभय सर आज माझ्या पुढे उभे होते..आवाज तसाच कणखर, बोलण्यात तोच रुबाब आणि वागण्यात तोच मिश्किलपणा...एका क्षणासाठी मला तर विश्वासच बसला नाही, आणि मी फक्त त्यांना पाहत होती, ते येऊन माझ्या बेडजवळ असलेल्या खुर्चीवर बसले आणि पुन्हा बोलले,

"आणि जेंव्हा आधीच आपली तब्येत बिमार असते तेंव्हाच बाहेर निघून तुला साहस का दाखवावे वाटते ग?? आणि काय अवस्था केलीये स्वतःची, कुठे जात होतीस??"

"काम होतं... अम्म्म, मला ते डॉक्टर ला विचारायचं आहे मी कधी जाऊ शकते, महत्त्वाच आहे जाणं माझं.."
आनंद नक्कीच झाला होता मला अभय सरांना भेटून, पण मला लगेच जाणीव झाली की मला त्यांना कोणताही त्रास द्यायला नको, हे माझं आणि विक्रमचं भांडण आहे आणि मी एकटीच ते लढणार...पण माझ्या शब्दांवर अभय सरांना विश्वास बसत नव्हता हे त्यांच्या हावभावावरून दिसत होतं..साशंक नजरेने माझ्याकडे पाहत बोलले,

"हम्म कामं होत तुला, नाही?? करा मग तुमचे कामं तुम्ही, पण वेळेतच बाहेर पडणं तुला जमलं नाही वाटते नैना??? अडजस्टमेंट करता करता, यावेळी काय गमावून बसलीस??? सांगून गेलो होतो, वेळेतच बाहेर पड, नाही पडता आलं ना...?"

"सर प्लिज, माझे प्रॉब्लेम आहे, मी बघून घेईल... तुम्ही मला इथपर्यंत आणलं त्यासाठी धन्यवाद, आता मी करेल सगळं मॅनेज....मला कोणाची गरज नाही"
मी अभय सरांना या सगळ्या पासुन दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण यात मी सफल होऊच शकणार नव्हती...

"तुझं मॅनेजमेंट तुझ्या चेहऱ्यावर दिसतंच आहे मला नैना, आणि तीन तासानंतर शुद्धीवर आली आहेस तू, तुला काय झालंय हे डॉक्टर ने सांगितलं मला, तुला कळतंय का, तुला रक्त चढवाव लागेल इतका रक्तस्त्राव झालाय तुला... आणि काय मॅनेज करणार आहेस तू?? हे सगळं कसं झालं ते मला माहित नाही, पण एक नक्की माहीत आहे की जे झालंय ते चुकीचं झालं...अन्याय करणाऱ्या पेक्षा ते सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो नैना...काहीच आत्मसन्मान बाकी नाही तुझ्यात?? की तो पण गहाण ठेवलास विक्रमच्या पायाखाली???"

त्यांनी असं बोलल्यावर मी लपवलेले अश्रू आणि माझं दुःख लगेच बाहेर पडलं, मला इतकं भरून आलं की शब्दच निघत नव्हते...पण त्याचं बोलणं लागलं मला,

"आहे, सगळंच जिवंत आहे माझ्यात आणि त्यासाठीच जात होती पोलीस स्टेशन मध्ये, मला ही नको झालंय हे तीळ तीळ मरणं..." मी खूप चिडून बोलली, पण यापेक्षा जास्त मला बोलता आलं नाही इतकं मला भरून आलं..माझी अवस्था पाहून मला पाण्याचा ग्लास देत अभय सर बोलले,

"आधी रडून घे, अन मग शांततेत सांग, मी बोललो होतो, या जगात प्रत्येक नातं कधी ना कधी साथ सोडते, पण सच्ची मैत्री नेहमीच सोबत असते..त्यामुळे मी आहे..नेहमीच..."

कितीतरी दिवसांनी फक्त माझं ऐकून घेणार मिळालं होतं, नाहीतर आजपर्यंत सगळ्यांनी ऐकवलंच होतं..आधी मनसोक्त रडून घेतलं, आणि अभय सरांना या सहा महिन्यांत काय काय घडलं सगळं सांगितलं... आणि त्यांनीही मला एकही प्रश्न न विचारता किंवा मला वागणुकीचे भाषण न देता माझं सगळं ऐकून घेतलं...माझं सगळं ऐकून घेतल्यावर ते बोलले,

"नैना, ही लढाई तुझी एकटीची आहे फक्त, आणि तू एकटीच लढणार, मी फक्त तुला मार्गदर्शन करणार यात, माहीत आहे तुला गरज नाही कोणाची, आणि मला तुझी गरज म्हणून सोबत नाही राहायचं, मी फक्त तुला साथ द्यायला आलोय...हे सगळं खूप कठीण आहे असं नाही पण तू पोलीस स्टेशन ला जाशील अन अपराध्याला शिक्षा मिळेल लगेच, इतकं सोप्प ही नाही, आणि त्यासाठी मला वाटते मी तुझ्या सोबत असावं, मैत्री केलीये तुला असं एकटीला सगळं सहन करायला सोडणं हे माझ्या मैत्रीच्या नियमात बसत नाही...."

"तुमच्या सोबतीची गरज तर मला तेंव्हाही होतीच, पण तेंव्हा मीच स्वतःची किंमत केली नाही, पण आता मला माझा मान परत मिळवायचा आहे, विक्रमला दाखवून द्यायचं आहे की ज्या नैनाला तो शोभेची बाहुली समजतो ती किती कणखर आहे....."

आता या युद्धभूमीत माझ्या रथाचे सारथी अभय सर होते, विक्रमला तर कल्पनाही नव्हती की ही नैना एक नवीन रुपात त्याच्या समोर उभी राहणात आहे...युद्धभूमीच होती ही माझ्यासाठी कारण यात मला माझा मान सगळ्यांशी लढूनच मिळणार होता, माझ्याच लोकांची मनं माझ्यामुळे दुखणार होती, पण यालाच युद्ध म्हणत असावे कदाचित की जर तुम्हाला जिंकायचं असेल आणि आपला हरवलेला सन्मान परत मिळवायचा असेल तर आपल्या लोकांची ही आहुती द्यावी लागेल...आता मी तरी तयार झाली होती सगळ्यांसाठी...एका स्त्रीचं कोमल रूप पाहिलं होतं विक्रमने फक्त आणि त्यामुळेच तो अनंत वेळा मला दुखवत गेला पण आता हेच कोमल मन दुखण्याची किंमत तर त्याला चुकवाविच लागणार होती.....
-------------------------------------------------------
क्रमशः