आज बऱ्याच दिवसांनी मी गावाकडं आलो होतो. चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो, तशीच माझी आई दारात माझी वाटच पाहत होती. मी आलेलो दिसताच तिला अगणीत आनंद झाला. माझ्या डोक्यावरुन हात फिरवून तिनं तिच्या डोक्याला कडाकडा बोटं मोडले. मी आल्यामुळे तिला काय करु अन् काय नाही असं झालं होतं. शेवटी आईच ती, तिच्यापुढं जगातले जेवढे प्रेम तेवढे एकत्र केले तरी फिकं पडणार.
आईनं माझ्यासाठी आंब्याचा रस अन् पोळया केल्या होत्या. कितीतरी दिवसानं आईच्या हातचं खायला मिळाल्यामुळं मी जेवणावर मनसोक्त ताव मारला. जेवण झाल्यानंतर आई-आबा सोबत बऱ्याच गप्पा मारल्या व नंतर अंथरुणावर अंग टाकले. बराच वेळ झालं तरी झोप येईना. शेवटी मुंबापुरीचे एक-एक चित्र डोळयासमोर येऊ लागलं.मुंबईत वेळेसोबत पळणारी माणसं, मुंग्या सारखी लोकांची गर्दी, जगण्यासाठी लोकांची चाललेली धडपड, पळत-पळतच पकडावी लागणारी लोकल हे सर्व चलचित्राप्रमाणे माझ्या डोळयासमोर भराभर आले. मला बराच वेळ झोप लागली नाही. शेवटी केव्हा डोळा लागला ते माझी मलाच कळलं नाही.
सकाळी आईनेच मला उठवलं. मी पटकन आवरलं. कारण मी बऱ्याच दिवसांपासून आमचं शेत पाहिलं नव्हतं. मला शेतात जायचं होतं. सकाळीच आईनं बनवलेली गरमा-गरम न्याहरी केली.आबा, मी उठायच्या आतच काहीतरी कामानिमित्त तालुक्याला गेले होते. बुलेट घरीच लावली होती. मी बुलेट घूवून पुसून काढली. आज बऱ्याच दिवसांनी बुलेट चालवण्याचा योग आला. गाडी चालु झाली तसं आई दरवाजात आली अन् मला म्हणाली,
“लवकर ये बघ, लई वेळ बसु नगं तिकडचं”, मी, हो म्हणून शेताकडे निघालो.
शेतात जायच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सात-आठ महिन्यापुर्वी पुष्कळ झाडं होती. पण आज रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे तोडलेली दिसत होती. तो रस्ता एखादया सुंदर स्त्रीचे सर्व डोक्याचे केस कापल्यानंतर ती जशी विद्रुप दिसेल त्याप्रमाणेच भासत होता. मे महिन्याचे शेवटचे दिवस चालु असल्यानं, सकाळी दहा-अकरा वाजताच ऊन मी म्हणत होतं. येणारा-जाणारा वाटसरु आता रस्त्याच्या बाजूला झाडं नसल्यामुळे उन्हानं त्रस्त होत होता. मी शेतात पोहचलो. शेतात गेल्या गेल्या विहीरीत डोकावून पाहिलं, पाणी पार तळाला गेले होते. विहीरीचा तळ स्पष्ट दिसत होता.माझी चाहुल लागताच एक धामण पटकन बिळात शिरली.मी इकडे-तिकडे पाहिले, शेतातला गडी कुठं दिसत नव्हता. बहुतेक तो कुठेतरी बाहेर गेला होता. मी गोठयाकडे गेलो, जनावरं तहानलेली दिसत होती. मी मोटार चालु केली. विहीरीजवळचा दगडी हौद पाण्यानं भरला. जनावरं सोडून त्या हौदावर आणली.जनावरांना मनसोक्त पाणी पाजलं. पुन्हा तळपत्या उन्हात सगळया रानात चक्कर मारली. आंब्याच्या झाडांना पाड लागलेले होते. मला माझं बालपण आठवलं, मी लहाणपणी नेम धरुन पाडाला पिकलेला आंबा पाडायचो. मी दगड घेतला पाडावर फेकून मारला. पण नेम काही लागेना. शेवटी बऱ्याच प्रयात्नानंतर एक पाड मी पाडून खाल्ला.विहीरजवळ आलो, पाणी प्यालो परत लिंबाच्या झाडाकडं आलो, गडयानं झाडाखाली बाज टाकलेली होती. मी बाजावर बसलो तशी झाडाच्या गार सावलीनं आणी रात्री उशिरा झोपल्यामुळे मला लगेच झोप लागली.
मला जाग आली तेव्हा आभाळ भरून आलं होतं. कुठे तरी दूर पडलेल्या पावसानं मातीचा सुगंध दरवळत होता. हा पहिल्या पावसाच्या सरीनं भिजलेल्या मातीचा सुगंध मला खुप आवडायचा. मी डोळे मिटून भिजल्या मातीचा सुगंध घेतला. पण ही वेळ तिथं थांबण्याची नव्हती. सोसाटयाचा वारा सुटला होता. वावटळीनं रानातला केर-कचरा फेर धरुन नाचत होता. गारपीट होण्याची दाट शक्यता होती. मी पटकन उठलो. गाडग्यातलं पाणी तोंडावर मारलं. गाडी चालु करून पटकन गावाकडे निघालो. वाऱ्याच्या वावटळीने धुळीचे लोट उठत होते. त्यामुळे डोळयात माती जात होती.गाडी चालवणं अशक्य झालं होतं. तेवढयात पावसानंही जोर धरला.पाऊस एवढा मोठा होता की, मी क्षणार्धात ओलाचिंब भिजलो. मी गडबडीतच एका झाडाजवळ थांबलो. गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणी पटकन झाडाकडे पळालो. मी झाडाखाली जाताच मला एक सुंदर चेहरा पावसात भिजू नये म्हणून झाडाच्या खोडाजवळ उभा असलेला दिसला.
अहाहा! काय विलोभनिय सौंदर्य होतं तिचं.मी तिच्याकडे पाहिले. तिनं माझ्याकडे पाहिले, आणी गपकन नजर खाली वळवली. पण मी मात्र खुळयागत तिचं सौंदर्य न्याहळू लागलो. सुवर्णागत गोरा रंग, हरीणीसारखे सुंदर डोळे, चेहरा असा जणु चंद्राचा तुकडा, चाफेकळी नाक, लाल चुटुक डाळींबी प्रमाणे ओठ, गुलाबी गाल, उठून दिसणारा तिच्या शरीराचा आकृतीबंध. तिला पाहणारा कोणीही क्षणार्धात तिच्या प्रेमात पडेल असं विलोभनीय सौंदर्य होतं तिचं.
विजाच्या कडकडाटानं मी भानावर आलो. पाऊस पडत असताना अनं विजा कडाडताना झाडाखाली उभा राहू नये हे मला माहित होतं.पण अशा सुंदरीच्या सहवासात मरण आले तर त्यापेक्षा कोणतं मोठं भाग्य? या विचारात परत मी तिच्याकडे पाहू लागलो. भिजल्यामुळे तिचा कमनीय बांधा आणखीनच उठून दिसत होता. तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. पावसानं आणखीनच जोर धरला होता. इतकी सुंदर स्त्री जवळ उभा असताना मला त्या पावसाची, सोसाटयाने वाहणाऱ्या वाऱ्याची अन् कडाडणाऱ्या विजांची काहीच भिती वाटत नव्हती. उलट हा पाऊस असाच पडत रहावा आणी मला तिचा सहवास लाभावा असं वाटत होतं.
तिला मी यापुर्वी कधील पाहिलं नव्हतं. ती कोण असावी याच विचारात मी तिच्याकडे पाहत होतो. मी तिच्याकडेच पाहतोय हे तिच्याही लक्षात आलं होते. आणी तिलाही माझं तिच्याकडं पाहणं आवडू लागलं होतं. तीही चोरटया नजरेने मला पाहत होती. त्यामुळे ती लाजेनं चूर झाली होती. लाजेमुळं तिच्या गालावर आलेल्या लालीनं ती आणखीनच सुंदर दिसू लागली. मी पावसात भिजलेलं तिचं मदमस्त सौदंर्य न्याहळू लागलो. अप्र्तिम सौंदर्याचं दर्शन त्यावेळी मला होत होतं. हा पाऊस असाच बरसत रहावा आणी हे सौंदर्य मी असच पाहत रहावं असं मला वाटत होतं.
मी तिच्या डोक्याच्या केसापासून तिचं सौंदर्य न्याहळत असताना माझी नजर तिच्या पायाकडे गेली ते वाकडे होते. तिचे ते वाकडे पाय पाहून क्षणभरापुर्वीच्या प्रेम भावनेची जागा भितीने घेतली. क्षणार्धात माझ्या लक्षात आलं, ही कोणी सुंदरी नसून ही एक चेटकीन किंवा हाडळ आहे. मी तसाच पडत्या पावसात घोटया इतक्या चिखलातून चप्पल आणी गाडी तेथेच सोडून घराकडे पळत सुटलो. तीही माझ्या मागेच पळत आहे याचा मला भास होत होता. त्यामुळे मी पुर्ण ताकदीने पळत होतो. पळता-पळता जेव्हा गाव दिसू लागले तेव्हा मी भानावर आलो. मला खुप धाप लागली होती. आता संकट टळलं होतं आणी धापाही खुप लागल्या होत्या.आता पळणं होणार नाही हे माझ्या लक्षात आलं आणी मी जागेवर थांबलो. माझं सर्वांग ओलं झालं होतं. बघतो तर काय? माझ्या अंगावर पावसाचा एक थेंबही पडलेला नव्हता. घामानं माझं अंग ओलं झालं होतं. माझे कपडे कोरडेठाक होते. पुढे रस्ता पण कोरडाच होता. मी घरी येवून आईला ही हकीकत सांगीतली, तेव्हा आईने मला सांगीतले, दोन महिन्यांपुर्वीच सावकाराच्या सुनेनं त्याच झाडाखाली सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. तेव्हा माझ्या सर्व लक्षात आलं, तीचाच अतृप्त आत्मा त्या झाडाखाली वास करतो आहे. तिनेच माझ्या भोवती गोवलेलं हे मायाजाल होतं.