अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 28 भावना विनेश भुतल द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 28

मनवीचे वडील मनवीला घेऊन डॉक्टरांकडे येतात.. अगदी फेमिली डॉक्टर असल्यामुळे त्यांना मनवी बद्दल तिच्या जन्मापासूनच्या सर्वच गोष्टी माहिती होत्या.

डॉक्टर : "हॅलो बेटा.. कशी आहेस??"

मनवी : "मी मस्त मला काही झालेलं नाही.. पण डॅड ऐकत नाही अजिबात.. जबरदस्ती मला इथे घेऊन आलाय.. आता तुम्हीच समजवु शकता त्याला."

डॉक्टर : "अस्स आहे तर.. ठिक आहे.. मी तुझ्या डॅडशी थोडं बोलतो.. तु बाहेर बसशील.. डॅड शी बोलतो आणि मग तुझ्याशी.. चालेल..."

मनवी : "हम्मम.."

मनवी डॉक्टरांना सांगितल्यावर बाहेर जाऊन बसली..

मनवीच्या वडिलांनी दुपारी मनवी कॉलेजवरून आल्यावर घडलेला प्रकार सांगितला..

मला मनवीच्या काही टेस्ट कराव्या लागतील अस सांगुन डॉक्टरांनी मनवीला आत बोलावले व तिच्या वडिलांना बाहेर बसायला सांगितले..

मनवीला एका रूममध्ये नेलं..

डॉक्टर : "मनवी बेटा आपण खुप दिवस झाले गप्पाच नाही मारल्यात.. मला की नाही तुझ्याशी गप्पा मारायला आवडतील.. तुला आवडेल माझ्याशी गप्पा मारायला..??"

मनवी : "मग काय अंकल.. तुम्ही तर माझे अंकल फ्रेंड आहात.."

डॉक्टर : "अरे वाह.. मग चला आपण सुरुवात करूयात गप्पा मारायला. तुझा डॅड बोलला तु मुंबईला गेलेलीस?? मग तिथे तु एकटीच गेलेलीस की कॉलेज फ्रेंडसोबत.. "

मनवी : "एकटी कशी जाणार.. माझे फ्रेंड्स होते सोबत.. माझी एक फ्रेंड आहे समीरा तिच्या भावाच लग्न होत म्हणुन गेलेली.."

डॉक्टर : "अरे वाहss.. मग मज्जा पण केली असशील ना??"

मनवी : "खुप म्हणजे खूप.."

डॉक्टर मनवीला एक एक होऊन गेलेल्या गोष्टी विचारत होते.. आणि मनवी त्यांना प्रत्येक गोष्ट अगदी जशीच्या तशी सांगत होती. त्यांना फक्त शौर्य आणि रोहन ह्या दोघांबद्दल मनवीच्या मनात नेमकी काय फिलींग आहे हे फक्त जाणुन घ्यायच होत..

डॉक्टर : "आता तु एवढं सांगतेस.. मग मला सांग तुला रोहन आवडतो ना??"

मनवी : "हो खूप.. आम्ही लग्न पण करणार आहोत.."

डॉक्टर : "अरे वाहस.. पण त्या आधी स्टडी महत्वाची आहे की नाही.."

मनवी : "हो अंकल.. ते सगळं कम्प्लिट झाल्यावरच आम्ही लग्न करू.."

डॉक्टर : "बर मग मला सांग शौर्यबद्दल तुला काय वाटत.."

डॉक्टरांनी शौर्यच नाव काढताच मनवीचा बी पी थोडा हाय होतो.. डॉक्टरांनी तिला पाणी दिल.. तिला पूर्ण पणे नॉर्मल होऊन दिल ती जशी नॉर्मल झाली तस डॉक्टरांनी तिला पुन्हा सेम प्रश्न विचारला.. पण ह्या वेळेला मात्र तिचे डोळे तिला बंद करायला सांगितले..

मनवी : "शौर्यत मला एक गोष्ट आवडते ती म्हणजे त्याच्या गालावर खळी.. मी ती बघण्यात हरवुन जाते आणि त्याच्या प्रेमात पडते.. ती खळी बघितली ना की त्याला मिठी मारावीशी वाटते.. तसा मला शौर्य पण आवडतो.. त्याने मला प्रपोज सुद्धा केलं. पण मीच नाही म्हटलं.. त्याने मला गोल्ड ची चैन सुद्धा गिफ्ट केलेली.. रोज चॅटिंग करत असतो आम्ही.."

डॉक्टर : "जर त्याने तुझ्याशी चॅटिंग केली असेल अस तुझं म्हणण असेल तर तुझ्या मोबाईलमध्ये त्याने केलेले मेसेजेस असतील ना.. ते मला बघायला मिळतील.."

मनवी : "हो आहेत की अस बोलत मनवी खिशातून मोबाईल काढते.. पण त्यात शौर्यचा एकही मेसेज नसतो.."

बहुतेक मोबाईल फॉरमॅट झाला असेल..

डॉक्टर : "असेल कदाचित.. पण मी ऐकलंय की शौर्यला गर्लफ्रेंड आहे.."

मनवी : "त्याच माझ्यावरच प्रेम आहे.. त्याची गर्लफ्रेंड असण शक्यच नाही.. आणि मी त्याच्या आयुष्यात माझ्याशिवाय कुणालाच येऊ देणार नाही.. शौर्य फक्त माझा आहे.. फक्त नी फक्त माझा."

मनवी मोठ्यानेच ओरडते.. तिचा बी पी पुन्हा हाय होतो..

डॉक्टर : "बर.. तु एकदम शांत हो बघु आधी.. आपण आत्ता अजुन थोडं मागे जाऊयात.. ठीक आहे.."

डॉक्टर संपुर्ण तिच्या भूतकाळा विषयी तिला विचारतात.. तस त्यांना सर्व माहिती असत पण तरीही ट्रीटमेंटचा भाग म्हणुन पुन्हा विचारतात..

जवळपास एक दिड तासाने ते बाहेर येतात.. मनवीला बाहेर बसायला सांगतात आणि तिच्या वडिलांना आत बोलवुन घेतात..

सगळं ठिक आहे ना डॉक्टर मनवीचे वडील डॉक्टरांना विचारतात..

डॉक्टर : "अजिबात ठिक नाही... मनवीमध्ये मला delusional disorder ची लक्षण पुन्हा आढळून आलीत.. ह्या आधी ही ती तिच्या कल्पनांच्या जगात रमत होती पण तेव्हा हे सगळं इतर कोणाच्या जीवावर बेतेल अस नव्हतं.. पण आता तस नाही.. आता ती इतरांना ह्यामुळे इजा सुद्धा पोहचवू शकते.. खास करून शौर्य किंवा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला.. त्याआधी अजुन एक महत्वाची गोष्ट.. तुला माहीतच असेल रंजनाचे म्हणजेच तुझ्या बायकोचे लग्न बाह्य सबंध होते.. मनवीची मी जेव्हा न्यूरॉलॉगीकल आणि इतर काही टेस्ट करत होतो तेव्हा मला तिच्या कडुन अस कळलं की.. जेव्हा ती सहवीला होती तेव्हा तिने तिच्या मम्माला इतर कुणासोबत तरी फिजिकली असताना पाहिलं आणि ती त्या गोष्टीकडे आकर्षित झालेली कारण ती नुकतीच वयात आली होती आणि तिच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी न कळण्या इतपत नवीन होत्या.. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या गालावर खळी होती.. आणि मनवीने ज्या पद्धतीने शौर्यच वर्णन केले त्यानुसार त्याच्या गालावर सुद्धा तशीच खळी असावी. सो त्यामुळेतिला शौर्यकडे आकर्षण आहे.. शौर्यकडे आकर्षण आहे अस बोलण्यापेक्षा शौर्यच्या शरीराशी आकर्षण आहे अस बोललं तरी चालेल. मी काय बोलतोय ते येतय ना तुझ्या लक्षात.."

मनवीचे वडील मानेनेच हो बोलतात..

मनवीचे वडील : "रंजना ने स्वतःच आयुष्य उध्वस्त केलं पण सोबत माझ्या मुलीच पण आयुष्य बरबाद करून गेली रे.. आता कुठे पोर माझी हसत खेळत होती.. ह्या सगळ्यातून बाहेर पडेल ना ती... तु काहीही कर ह्यातुन माझ्या लेकीला वाचव. "

डॉक्टर : "आपण आजपासुनच सुरुवात करू.. आजपासूनच अँटिसायकोटिक्स, अँटिडिप्रेसंट्स आणि ट्रॅन्क्विलायझर्स तिला द्यायला सुरुवात करूयात.. पण तुला व्यवस्थित काळजी घेणं गरजेच आहे.. डोस चुकवता कामा नये आणि मुळात तिला एकट ठेवु नकोस.. कारण एकटी राहिली की पुन्हा ती तिच्या विश्वात रमुन जाईल.."

डॉक्टरांनी खुप साऱ्या सूचना दिल्या.. मनवीचे वडील त्याप्रमाणे तिची काळजी घेत होते.. मनवी घरी असेपर्यंत तरी ती नॉर्मल आहे असं दाखवत होती पण कॉलेजमध्ये आल्यावर ती पुन्हा तिच्या जगात रमत होती.. औषधांनी थोडा फरक जाणवत होता तिच्यात.. पण ती पूर्ण बरी झाली नव्हती..

★★★★★

जवळपास तीन दिवस झाले पण सुरज अजुन रूममधुन बाहेर आलाच नव्हता..कँपणीचे फोन सुद्धा विराजच सांभाळत होता.. विराजचा त्याच्या वडिलांवरचा रागसुद्धा बऱ्यापैकी शांत झाला होता.. तीन दिवस डॅड कंपनीत न जाता कसा काय राहू शकतो.. बहुतेक माझं बोलणं जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय डॅड ने.. विराज मनातच विचार करत होता. घरातील एका नोकराकडे त्याने त्याच्या डॅड विषयी चौकशी केली.. तेव्हा त्याला अस समजलं की सुरजने तीन दिवस झाले दरवाजा उघडलाच नाही.. जेवणासाठी सुद्धा तो त्याच्या रूम बाहेर आला नाही..

विराजने क्षणाचा विलंब न करता लगेच सुरजच्या रूममध्ये धाव घेतली.. दरवाजा आतुन लॉक होता..

विराजने डॅडला आवाज देतच जोरजोरात दरवाजा ठोकायला सुरुवात केलो..

"डॅड प्लिज ओपन दि डॉर.. डॅड आय एम सॉरी..", विराज बाहेरून डॅड ला विनवणी करत होता.. पण आतून काही आवाज येतच नव्हता..

विराजच्या आवाजाने अनिता सुद्धा बाहेर आली..

अनिता : "काय झालं विर."

"मम्मा बघ ना डॅड दरवाजा उघडतच नाही ग.. प्लिज त्याला बोल ना दरवाजा उघडायला..", विराज रडतच अनिताला बोलत असतो.

अनिता : "सुरज दरवाजा उघड बघु."

अनिता सुद्धा जोर जोरात दरवाजा ठोकू लागली.

शेवटी दरवाजा तोडण्याचा निर्णय झाला.. घरातील नोकरदार मंडळीने पक्कड व हातोडीच्या सहाय्याने दरवाजाच लोक तोडलं..

विराजने पकटन दरवाजा लोटला.. समोरच दृश्य बघुन डॅड म्हणून एक किंकाळी त्याच्या तोंडुन बाहेर पडली.. कारण सुरज त्याच्या पलंगाखाली बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या स्थितीत त्याला दिसला.. धावतच जाऊन त्याने त्याच डोकं आपल्या मांडीवर घेतलं..अनिता लागलीच सुरजचे हार्ट बिट्स चेक करत होती... हार्ट बिट्स जाणवत होते...

"कोणी तरी डॉक्टरांना बोलवा प्लिज.. ए डॅड उठणा प्लिज..", विराज रडतच बोलत असतो.

अनिता : "मला वाटत आपण सुरजला हॉस्पिटलमध्ये नेऊयात.."

सुरजला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.. डॉक्टरांनी सुरजला ICU मध्ये नेलं इतकी नाजुक स्थिती होती त्याची..

विराज आणि अनिता ICU रूमबाहेर फेऱ्या मारत डॉक्टर कधी बाहेर येत आहेत ह्याची वाट बघत होते.. डॉक्टर बाहेर येताच विराज आणि अनिता सुरज विषयी त्यांच्याकडे चौकशी करू लागले..

डॉक्टर : "त्यांना एटेक येऊन गेलाय.. परिस्थिती अत्यंत नाजुक आहे.. मी काहीच सांगु शकत नाही.. एवढं बोलुन डॉक्टर निघुनही गेले.."

विराज तिथेच असलेल्या बाकड्यावर बसला.. अनिता त्याला सावरत त्याच्या बाजुला बसली..

"विर काही होणार नाही.. बी पोजिटीव्ह..", अनिता विराजला धीर देतच बोलली..

विराज : "माझ्यामुळे झालय हे सगळं मम्मा.. मी त्याला थोडं जास्तच बोललो ग मम्मा.. पण तो चुकीच वागतोय ग.. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो समजतच नव्हता ग म्हणून मी रागाच्या भरात बोललो ग.."

विराज अनिताच्या मांडीवर डोकं ठेवुन रडु लागला..

अनिता : "तु शांत हो बघु आणि स्वतःला दोष देण थांबव.. काय झालं सांग बघु मला.."

विराज : "ते शौर्य मुंबईत..."

अनिता : "शौर्य मुंबईत काय??"

(प्लिज मॉमला नको सांगुस तुला माझी शप्पथ आहे... विराजला शौर्यच ते बोलणं आठवत आणि तो डोळे पुसून अनिता पासुन थोडं लांब उभं रहातो..)

"विराज शौर्यच काय..?? शौर्य मुंबईत आहे..??", अनितापुन्हा पुन्हा त्याला प्रश्न करते..

विराज : "काही नाही मी डॅडला बघुन येतो.. अस बोलत विराज सुरजच्या रूममध्ये शिरला.."

सुरज शुद्धीत नव्हता.. चेहऱ्यावर लावलेल्या ऑक्सिजन मास्कमुळे त्याचा चेहरा ही स्पष्ट असा दिसत नव्हता..

"आय एम सॉरी डॅड.. मला एक संधी दे रे तुझी माफी मागायची.. प्लिज.. डॅड..", विराज सुरजचा हात पकडतच रडु लागला..

अनिता विराजच्या बोलण्याचा अर्थ लावु लागली.. तीने लगेच शौर्यला व्हिडीओ कॉल लावला.. शौर्य त्याच्या रूममध्येच नोट्स लिहीत बसलेला.. एवढ्या रात्री अनिताचा व्हिडीओ कॉल बघुन तो खुश झाला..

शौर्य : "हॅलो मम्मा

अनिता : "तु हॉस्टेलवर आहेसना??"

शौर्य : "ह्या वेळेला हॉस्टेलवरच असणार ना.. तु अस का विचारतेस..??"

अनिता : "नाही काही नाही.. जेवलास??"

शौर्य : "हो... तु कुठे आहेस??"

अनिता : "मी कामा निमित्त थोडं बाहेर आलीय.. तु अभ्यासात लक्ष दे.. मग बोलूयात.."

एवढं बोलुन अनिता ने फोन कट केला...

"शौर्य तर दिल्लीलाच आहे.. मग विराज काय बोलत होता..",अनिता स्वतःशीच बोलते

अनिताच डोकं काही काम करत नव्हतं.. ती तिथे बाहेरच असलेल्या बाकड्यावर बसली.. भिंतीला डोकं टेकुन डोळे मिटुन गप्प बसून राहिली..

मम्मा तु घरी जाऊन आराम कर मी बसतो इथे डॅड जवळ..

अनिता : "मला तुझ्याशी थोडं बोलायच होत विर.. मला माहित नाही ही वेळ ह्या गोष्टी बोलायची आहे की नाही ते..पण तु मला चुकीच समजावं किंवा माझ्या बद्दल गैरसमज तुझ्या मनात निर्माण करून न ठेवावा हेच मला वाटत.."

विराज : "मम्मा तुला काय बोलायचं हे कदाचित मला माहिती आहे.. आय नो डॅड वेरी वेल.. बिकोज ऑफ हिम शौर्यला तु मनात असून सुद्धा तुझ्या जवळ ठेवू शकत नाहीस आणि मम्मा तुला मी कधी चुकीच समजेल हा समज तु तुझ्या डोक्यातुन काढुन टाक प्लिज. डॅड पेक्षा मी जास्त महत्व तुला दिलंय आत्तापर्यंत.. यु आर माय लाईफलाईन मम्मा.."

विराजच बोलणं ऐकुन अनिताला भरून येत.. तिला त्याला मिठी मारतच अश्रूंना वाट मोकळी करते.. विराज तिला घरी जाऊन आराम करायला सांगतो. पण ती काही ऐकत नाही.. ती सुद्धा विराज सोबत तिथेच बसुन रहाते..

★★★★★

दोन दिवसांनी रोहनचा बर्थडे असतो. पण ग्रुपमध्ये त्याबाबत कोणाला काही कल्पना नसते.. फक्त मनवी रोहनच्या जास्त जवळ असल्यामुळे तिला माहीत असत.. ती त्याच कारणाने शौर्यला फोन लावते..

शौर्य तसही अभ्यासच करत बसलेला असतो..

एवढ्या रात्री मनवीचा फोन बघुन खर तर त्याला कळत नव्हतं की फोन उचलू की नको ते. तो फोन न उचलण्याचा निर्णय घेतो.. काय असेल ते सोमवारी कॉलेजमध्ये भेटल्यावर विचारेल तिला असा तो विचार करतो..पण मनवी वारंवार फोन करत होती.. काही महत्वाचं काम असेल असा विचार करून शेवटी शौर्य फोन उचलतो..

"तु एवढा वेळ का लावलास माझा फोन उचलायला..", शौर्यने फोन उचलल्या उचलल्या मनवी त्याला विचारते..

शौर्य : "मनवी रात्रीचे दिड वाजुन गेलेत.. तु एवढ्या रात्री का मला फोन करतेस..??"

मनवी : "कामच तस आहे तर.. तु उद्या माझ्यासोबत शॉपिंगला येतोयस.."

शौर्य : "आर यु मॅड.. रोहनला घेऊन जा.. मी का येऊ..??"

मनवी : "त्याच्यासाठीच तर शॉपिंग करायचीय.. त्याला कस घेऊन जाऊ.. बर्थडे बॉयला अस घेऊन गेली मग त्याला त्याच गिफ्ट कळेल ना. "

शौर्य : "व्हॉट..!!!, रोहनचा बर्थ डे आहे?? कधी??"

मनवी : "पर्वा. मलाही आत्ताच कळलं.. त्याच्याशी बोलताना.."

शौर्य : "मग आपण सगळेच जाऊयात ना शॉपिंगला.."

मनवी : "मला काही प्रॉब्लेम नाही पण रोहनला कळायला नको."

शौर्य : "त्याची काळजी मी घेतो..आपण भेटुयात मग उद्या शॉपिंग मॉलमध्ये.."

दुसऱ्यादिवशी सगळेच रोहनच्या बर्थडेची शॉपिंग करण्यासाठी मॉलमध्ये जातात..

रोहनसाठी हा बर्थडे थोडा स्पेसिअल असायला हवा अस सगळ्यांनाच वाटत असत.. काही तरी वेगळं अस गिफ्ट त्याला द्यायला हवं असं वाटत असत पण काय द्यावं हे कुणाला सुचत नसत..

सगळेच मॉलमध्ये तर आलेले पण कोणत्या दुकानात जायच हेच बघत होते.. समीरा आणि शौर्य सगळ्यांच्या मागुन चालत होते..

शौर्य समीराचा हात पकडत तिला सगळ्यांपासून लांब नेत एका दुकानात घेऊन जातो..

समीरा : "सगळे शोधत असतील आपल्याला.."

शौर्य : "शोधु देत ना. त्याला काय होतंय.."

समीरा : "तु इथे का आणलंस पण मला..??"

शौर्य : "तुला छानसा ड्रेस घेण्यासाठी.."

समीरा : "बर्थडे माझा नाही रोहनचा आहे.."

शौर्य : "रोहनच्याच बर्थडे साठी बोलतोय मी.. ₹'

समीरा : "माझ्याकडे आहे रे ड्रेस."

शौर्य : "असा आहे का??"

शौर्य बाजुलाच असलेल्या पुतळ्याला घातलेला वन पीस समीराला दाखवतो..

समीरा मानेनेच नाही बोलते..

शौर्य : "ट्राय कर ना तुला कसा दिसतो ते तरी बघुयात"

समीरा : "प्लिज आता नको ना.. सगळे वाट बघत असतील.."

शौर्य : "काही नाही होत... प्लिज एकदा माझ्यासाठी.."

शौर्य अगदी लहानमुलासारखं तोंड करतच समीराकडे बघत होता..

"आलेच...",समीरा त्याचे गाल ओढतच ड्रेस ट्राय करण्यासाठी ट्रायलरूम मध्ये शिरते ..

समीरा येईपर्यंत शौर्य तिथेच तिची वाट बघत असतो..

समीरा ट्रायल रूममधुन बाहेर येते..

"कसा वाटतोय माझ्यावर..", समीरा शौयला विचारते..

"ड्रेस छानच होता पण तु तो घातलायस त्यामुळे अजुन छान दिसतोय..",शौर्यकडून अशी प्रतिक्रिया आल्यावर समीरा लाजुन एकदम चुरर होऊन जाते आणि पुन्हा चेंज करण्यासाठी ट्रायल रूममध्ये जाते..

"हा पॅक करा..",शौर्य दुकानदाराला सांगतो..

"तुला पण आवडला ना??", समीरा बाहेर येताच शौर्य तिला विचारतो..

समीरा : "हो खुप खुप आवडला... पण आपल्याला रोहनसाठी काही तरी घ्यायचं आहे.. त्याच्यासाठी अजून काहीच नाही घेतलय.."

शौर्य : "त्याच टेन्शन नको.. ते मी ठरवलंय सगळं.."

शौर्य आणि समीरा बोलत बोलतच एक्सलेटर वर चढत आपल्या मित्र मैत्रिणींना शोधत वर्ती जात असतात.. एका दुकानात त्याला राज दिसतो.. शौर्य समीराला सोबत घेत त्याच्या दिशेने जाऊ लागतो..

राज : "शौर्य तु सांगितलं नाहीस ते.."

शौर्य : "काय??"

राज : "हेच की समीराचा पण बर्थडे आहे ते.."

वृषभ : "नाही तर काय.. हॅप्पी बर्थडे हा समीरा.."

शौर्य : "समीराच्या बर्थडेला अजुन टाईम आहे.."

टॉनी : "ओहह.. मग आज पासुनच शॉपिंग का?? बर आहे.. मज्जा आजे एका मुलीची..."

समीराच्या हातात शॉपिंग बेग बघुन सगळेच शौर्य आणि समीराला चिडवु लागतात.. समीरा लाजतच तिथुन निघून सीमाजवळ गेली..

"एकच मिनिट थांबा तुम्ही..", शौर्य खिश्यातून फोन काढतच बोलला..

"रोहन का फोन करतोय??", रोहनच नाव स्क्रिनवर बघताच शौर्य बोलतो..

"हा रोहन बोल.. काय बोलतोस.."

रोहन : "अरे उद्या डॅडने छोटीशी पार्टी ठेवलीय सो तुम्ही सगळे या.. मी बाकीच्यांना कळवतो तस फोन वर.. पण तु नक्की ये"

शौर्य : "कश्याबद्दल रे पार्टी???"

रोहन : "ते कळेलच तुला उद्या आल्यावर.."

शौर्य : "बर मग भेटु उद्या तुझ्या घरी.."

रोहनला बाय करत शौर्य फोन ठेवतो..

मनवी : "काही ठरतंय का काय घ्यायचं ते.??"

शौर्य : "गाईज तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे रोहनचे पिक्स असतील ते सगळे मला सेंट करा मी एक छान व्हिडीओ करतो त्याचा.."

वृषभ : "गुड आयडिया पण गिफ्ट मध्ये काय द्यायचं.."

शौर्य : "आपण त्याला छानस लॉकेट देऊयाय.. एक आठवण म्हणुन तो नेहमी सोबत ठेवेल.."

राज : "अरे वा सगळंच ठरलं तर मग.."

शौर्यने सांगितल्या प्रमाणे सगळेच रोहनसाठी लॉकेट खरेदी करतात..

टॉनी : "ए पण हे पेकिंग करायच काम माझं आणि राजच.. काय राज....??"

दोघेही एकमेकांना हसतच बघतात..

सगळे हॉस्टेलवर येतात.. टॉनी आणि राज सांगितल्या प्रमाणे गिफ्ट पेकिंगच काम करतात.

शौर्य वृषभची मदत घेत रोहनसाठी व्हिडीओ बनवु लागला..

रोहनचे एक एक पिक्स क्रॉप करत त्यात थोडं फार एडिटिंग करत तो एका फोल्डरमध्ये ठेवत होता..

वृषभ : "उद्या बर्थडे आहे.. उद्या पर्यंत होईल का तुझं..??"

शौर्य : "रोहनसाठी काही पण रे"

"खुप कमी पिक्स आहेत रे.. अजुन हवेत.", शौर्य

वृषभ : "सगळ्यांनी दिलेत का??"

शौर्य : "मी चेक नाही केलं रे.. म्हणजे जेवढे मिळाले ना त्यावर काम चालु केलं.."

वृषभ : "मनवीला बघ ना कॉल करून तिच्याकडे असेल.."

शौर्य : "वेडा आहेस का वाजले बघ किती..??"

वृषभ : "त्यात काय झालं?? दे मी करतो.."

शौर्य : "नको राहू दे.."

शौर्य पुढे काही बोलणार तोपर्यंत वृषभ ने शौर्यच्या फोनवरूनच मनवीला फोन लावला..

एवढ्या रात्री शौर्यचा फोन बघुन मनवी खुप खुश झाली..

"ऐकणं रोहन मी तुला नंतर फोन करते.. शौर्यचा फोन येतोय.. बाय बाय.. " रोहन मनवीला काही बोलणार तो पर्यंत तिने फोन कट करून शौर्यचा कॉल रिसिव्ह केला..

एवढ्या रात्री कशी काय आठवण काढली..

वृषभ : "कामच तस आहे.. "

मनवी : "वृषभ तु?? तु शौर्यचा मोबाईल मधुन का फोन करतोस..??"

(मनवी थोडं नाराज होतच बोलली)

वृषभ : "माझा मोबाईल माझ्या रूम मध्ये आहे.₹ आणि ते महत्वाचं नाही ग.. महत्वाच हे आहे की मॉलमध्ये शौर्य बोललेला ना तुला की रोहनचे पिक्स दे म्हणुन अजुन तु सेंट का नाही केलेस..??"

मनवी : "ओहह.. सॉरी सॉरी.. मी विसरेलच.. मी लगेच फोन करते.."

एवढं बोलुन मनवी फोन कट करते..

इथे रोहनला मात्र खुप राग येत होता.. एवढ्या रात्री शौर्य कस काय फोन करु शकतो मनवीला. रोहनला पुन्हा मुंबईत घडून गेलेला प्रसंग आठवतो.. काहीही झालं तरी उद्या मी शौर्यला विचारणारच.. काय आहे त्याच्या मनात ते तरी कळेल मला.. मित्र म्हणुन मी अजुन शांत नाही बसु शकत..

शौर्य मनवीने सेंट केलेले फोटो एडिट करत बसलेला..

वृषभ : "मला झोप येतेय यार. दिड वाजला.."

शौर्य : "तु झोप.. मी हे बनवुन झालं की उठवतो तुला."

वृषभ : "आहे मी जागा..कर तु.."

वृषभ अस बोलला खर पण त्याचा डोळा कधी लागला हे त्याचं त्यालाच कळलं नाही.. शौर्यचे ही डोळे मिटत होते पण रोहनसाठी तो त्याच्या डोळ्यावरची झोप उडवत होता..पहाट सुद्धा झाली. तरी सुद्धा शौर्य तेच करत बसलेला...वृषभला जाग आली..

"ए शौर्य झोप न..", शौर्यचा मोबाईल हातात घेतच तो बोलला..

"पाच वाजले..", वृषभ स्वतःच्या डोळ्यावरची झोप उडवतच बोलला.. तु झोपलासच नाहीस..

शौर्य : "झोपलो असतो तर हे झालं नसत यार.. अजुन खूप काही बाकी आहे.."

वृषभ : "ए शौर्य झोप जरा डोळे बघ कसे झालेत.. "

वृषभ जबरदस्ती शौर्यचा लॅपटॉप बंद करत होतां पण शौर्यने त्याला कस बस समजवतच.. आपलं काम चालूच ठेवलं.

शौर्यने भरपुर मेहनत घेत रोहनसाठी सुंदर असा व्हिडीओ बनवला.. रात्रभर जागरण केल्याने त्याच डोकं जाम दुखत होत.. डोळ्यांवर भरपूर झोप येत होती.. सगळी मंडळी जायच्या तैयार होऊन शौर्यच्या रूममध्ये जमली..

शौर्य तैयार होऊन बसलेला..

"काल घेतलेलं गिफ्ट कुठेय???" शौर्य टोनी आणि राज ला विचारू लागला..

"ह्याच्यात..", एक मोठा बॉक्स दोघेही त्याला दाखवत बोलले..

शौर्य : "गिफ्ट खोलपर्यंत दमेल रे बिचारा.."

शौर्य आणि वृषभला गिफ्ट पेकिंग बघून हसु येत..

टॉनी : "तुझे डोळे का असे दिसतायत."

वृषभ : "साहेब झोपलेच नाही.. व्हिडीओ बनवत होते.. काल रात्रभर तर बनवत होते.. पण आज दिवसभर पण तेच काम केलं.."

टॉनी : "एवढं जागरण करून व्हिडीओ बनवायची काय गरज होती..? डोळे बघ कसे झालेत ते.."

शौर्य : "आता पार्टी वरून आल्यावर झोपेल रे.. आपण निघुयात रोहन वाट बघत असेल.."

"हम्मम..", बोलत सगळे रोहनच्या घरी जायला निघाले..

मनवी आधी पासुनच रोहनच्या पार्टीत हजर होती.. सोबत तिचा डॅड सुद्धा होता..

रोहन आणि मनवी दोघेही आपल्या बाकीच्या मित्रमंडळीची वाट बघत होता..

बाकीची मंडळी दिसताच रोहन त्यांना भेटतो.. हाय हॅलो करतो.. पण शौर्यला तो आज इग्नोर करत असतो.. रोहन आपल्याला टाळतोय ही गोष्ट शौर्यच्या लक्षात येत नाही.. वृषभ आणि टॉनी रोहनला बोलण्यात बिजी ठेवतात.. पण रोहनच लक्ष मात्र शौर्यकडे असत.. शौर्य ठरल्याप्रमाणे मनवीजवळ जातो व तिच्या हातात पेनड्राइव्ह देतो..

मनवी खुश होते व लगेच तो पेनड्राइव्ह घेऊन तिथेच म्युसिक सिस्टिम ऑपरेट करणाऱ्याला देते..

शौर्यने इशारा देताच टॉनी आणि राज रोहनला घेऊन व्हाईट बोर्ड जवळ उभे रहातात..

मनवी माईक घेऊन सगळ्यांना तिथे यायला सांगते..

"लाईट्स ऑफ प्लिज..", मनवीने अस बोलताच संपूर्ण लाईट बंद झाली..

रोहनला कळत नसत नक्की काय चालु आहे ते..

व्हाईट बोर्डवर रोहनचे फोटो.. काही फोटो त्याच्या कळत नकळत देखील काढलेले असतात आणि त्याच्या सोबतच बेकग्राऊंडला शौर्यने सुंदर गाणं वाजत असत.

¶¶तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना
याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफ़साना
तेरे जैसा यार कहाँ...

मेरी ज़िन्दगी संवारी, मुझको गले लगा के
बैठा दिया फ़लक पे, मुझे ख़ाक से उठा के
यारा तेरी यारी को, मैंने तो ख़ुदा माना
याद करेगी दुनिया...

मेरे दिल की ये दुआ है, कभी दूर तू न जाए
तेरे बिना हो जीना, वो दिन कभी न आए
तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना
याद करेगी दुनिया...¶¶

शौर्यने बनवलेला व्हिडीओ रोहनच्या हृदयात घर करत.. इतका त्याला तो व्हिडीओ आवडतो. त्याचे डोळे देखील भरून येतात.. सगळ्यांच्या नकळत तो डोळ्यांतील पाणी पुसतो.

शौर्य फक्त रोहनचे हाव भाव टिपत होता.. व्हिडीओ संपताच रोहनने त्याच्या मित्रांचे आभार मानले आणि केक कटिंगचा कार्यक्रम सुद्धा झाला..

मनवी तिच्या डॅड सोबत तिच्या मित्र मैत्रिणींची ओळख करून देत होती..

समीरा आणि शौर्य एकत्रच उभे राहुन बोलत होते..

समीरा : "शौर्य डोळे बघितलेस तुझे कसे झालेत.. डोकं पण दुखत असेल ना.."

शौर्य : "हम्मम... जाऊन झोपेल मी आता..."

समीरा : "पण व्हिडीओ खुप छान बनवलास.. रोहनचे एक्सप्रेशन बघता मला अस वाटत त्याला तो व्हिडिओ खुप आवडला हे नक्की.."

शौर्य : "मला ही तेच वाटत.. तु केलंस का त्याला विश.??"

समीरा : "हो आल्या आल्याचं.. तु नाही केलंस का??"

शौर्य : "नाही ना.. तो भेटलाच नाही मला.. "

समीरा : "मग कर जा.. तो बघ तिथे एकटाच आहे.."

"आलोच", अस बोलत शौर्य रोहनजवळ गेला..

शौर्य : "हेय रोहन.. तु मला भेटलासच नाहीस मित्रा.. "

शौर्य जवळ आलेला बघुन रोहन रागातच त्याचा हात पकडत त्याला लांब घेऊन जातो..

"काय झालं रोहन.. कुठे नेतोयस मला", शौर्य रोहनला प्रश्न करत असतो पण रोहन काहीच बोलत नसतो..फक्त त्याला आपल्यासोबत ओढतच कुठे तरी घेऊन जातो..

वृषभ : "हे दोघे कुठे चाललेत??"

"चल बघु", अस बोलत टॉनी, राज आणि वृषभ ही त्यांच्या मागे आले..

रोहन शौर्यला पार्टी पासुन थोडं लांब आणतो..

शौर्य : "काय झालं रोहन?? तु अस मला इथे का आणलस??"

रोहन : "शौर्य.. तुझा प्रॉब्लेम काय आहे??"

शौर्य : "मला काय प्रॉब्लेम आहे?? तु मला कळेल अस बोल.."

"तुम्ही लोक इथे काय करताय..", वृषभ रोहन आणि शौर्यकडे बघत बोलला..

रोहन : "तुम्ही लोक पण आलात इथे.. बर झालं.. तुमच्या समोर होऊन जाऊ दे आज.."

शौर्य : "पण झालं काय तर तरी सांगशील.."

रोहन : "शौर्य मी तुला एक चांगला मित्र मानत होतो. पण तु मनवी सोबत जे करतोस ना त्यामुळे मला तुला मित्र बोलायची सुद्धा लाज वाटते रे.."

शौर्य : "रोहन तु माझ्यावर डाउट घेतोयस.."

रोहन : "मी डाउट नाही घेत.. मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय शौर्य.. त्यावर तर मी विश्वास ठेवु शकतो ना आणि काल रात्री तु जवळपास दीड वाजता तिला फोन करतोस आणि इथे पार्टी मध्ये पण तु सारख सारख तिच्या मागे मागे का करतोस.."

शौर्य : "रोहन मी तुला आधीही सांगितलंय त्यादिवशी तु जे बघितलस ते तस नव्हतं जसा तु विचार करतोयस आणि काल रात्री मी मनवीला फोन केलाच नव्हता.."

"खोटं बोललेलं मला अजिबात आवडत नाही.. मित्र आहेस म्हणून शांत बसलोय नाही तर धक्के मारून इथुन हकलून दिल असत मी तुला.." रोहन शौर्यची कॉलर धरतच त्याला बोलतो.

"रोहन तुझा गैरसमज झालाय.. काल..", वृषभ पुढे काही बोलणार तोच शौर्यने इशाऱ्यानेच त्याला थांबायला सांगितलं..

शौर्य : "रोहन.. मला तुझा बर्थडे खराब करायचा नाही.. तु धक्के मारुन मला इथुन हकलवुन देण्याआधी मीच इथुन जातो.. वृषभ ह्याने रिटर्न गिफ्ट छान दिल मला.. आवडलं खुप.. थेंक्स रोहन.."

रोहनने पकडलेली कॉलर सोडवतच शौर्य तिथुन निघून गेला..

वृषभ : "शौर्य थांब ना."

टॉनी आणि राज सुद्धा शौर्यला थांबवायला त्याच्या मागे गेले पण शौर्य कोणाचही न ऐकताच तिथुन निघुन सरळ हॉस्टेलवर आला..

वृषभ : "तुला झालं काय आहे??? आणि कसली भाषा बोलतोयस यार तु.. हकलवुन देणार तु त्याला??"

रोहन : "खोट का बोलतोय तो मला.. रात्री दिड वाजता मनवीला कॉल करून नाही म्हणुन बोलतोय.. इथे पार्टीत काय चाललं होतं त्याच हे मी बघितलंय"

वृषभ : "शौर्य खोट नव्हता बोलत.. तो खरच बोलत होता. काल रात्री मीच मनवीला फोन केलेला.. माझा मोबाईल रूमवर होता.. म्हणुन शौर्यच्या मोबाईल मधुन तिला कॉल केलेला कारण आम्हाला तुझे फोटो हवे होते.. आम्ही काल सगळे तुझ्यासाठी गिफ्ट घ्यायला मॉलमध्ये गेलेलो.."

(वृषभ ने काल घडून गेलेला सगळं प्रकार रोहनला सांगितला..)

टॉनी : "तु आता जो व्हिडीओ बघितला ना तो कुठल्या स्टुडिओ वाल्याने नाही केला तर तो शौर्यने केलाय.. काल रात्री न झोपता..फक्त तुझ्यासाठी.."

राज : "आणि तो पेन ड्राइव्ह मनवीला द्यायचा होता ते ही तुझ्या नकळत..जेणे करून तुला अस वाटावं की हे सगळं मनवीने केलंय तुझ्यासाठी.. तुझा बर्थडे त्याला स्पेसिअल बनवायचा होता रोहन. "

वृषभ : "तु इतका घाणेरडा आरोप कस काय करू शकतोस त्याच्यावर आणि आत्ता तुझ्या मनवीला रात्री दिड वाजता मी कॉल केला म्हणून तुला माझा पण राग येत असेल.. मला सुद्धा धक्के मारून पार्टीतून हकलून द्यावंस वाटत असेल बट त्या आधी मीच निघुन जातो.. वन्स अगेन हॅप्पी बर्थ डे.. एन्जॉय"

वृषभ रागातच निघुन जातो.. सोबत बाकीची मंडळी सुद्धा..

रोहन त्यांना आवाज देत थांबवत असतो पण कोणीच थांबायला तैयार नसतात..

रोहनला आता काय बोलावे कळत नव्हतं..

खिश्यातून फोन काढत तो शौर्यला लावु लागला.. पण शौर्य आता फोन काही उचलत नव्हता..रोहनला काय करावे तेच कळत नव्हतं..

क्रमशः

(रोहन शौर्यला कस मनवेल??त्यासाठी वाट पहा पुढील भागाची.. आणि हा भाग कसा वाटला ते ही कळवा??)

©भावना विनेश भुतल