Haravlela Prem books and stories free download online pdf in Marathi

हरवलेलं प्रेम

यंदा पाऊस वेळेवर पडला होता. गेल्या सहा-सात महिन्यांपासून पारुशा असणाऱ्या झाडांना पावसानं अंघोळ घातली होती. त्यामुळे झाडं टवटवीत, ताजेतवाने दिसत होते.पाखरं मंजुळ आवाज करत इकडून-तिकडे बागडत होते. शेतकरी, कष्टकरी आनंदून गेले होते. ते लगबगीनं पेरणीच्या कामाला लागले होते. सगळं शिवार माणसांनी फुलुन गेलं होतं. एरव्ही माणसांनी फुलून गेलेली चावडी पोरक्यासारखी भासत होती. सचीनच्या रानात पण कापूस लावण्याचं काम जोरानं सुरु होतं. एकलगट असणाऱ्या पंधरा एकरात सचीनच्या आबानं कापूस लावायचा ठरवलं होतं. कापूस लावायला रोजंदारीवर बाया लावल्या होत्या. सचीनची आई त्या बायांबरोबरच सकाळी रानात जायची. एकेदिवशी सकाळी सचिन जेवायला बसला तेव्हा त्याची आई त्याला खवळत होती.

“आता मोठा झालास, जरा बापाला रानात काम करु लागत जा.”

त्याला माहित होतं, आईला काही बोलावं तर ती जास्तच कुरकुर करेल, त्यामुळे तो तिला काही न बोलता गुमान खाली मान घालून जेवत होता. त्याच्या आईनं पटकन चिरगुटात भाकरी बांधून घेतली अन् म्हणाली, “जेवण झालं की,रानात ये बघ. आता बास झालं फिरणं जरा कामधंद्याला लागा आता.” त्यानं मान डोलावली.

परत ती वळून म्हणाली,

“अन् हो, घराला कुलुप लाव अन् किल्ली तुळशीतल्या महादेवाच्या खाली ठेव बघ. शाळा सुटल्यावर गोटया घरी यीन,सांगीतलं तिथंच ठिवून ये”.

त्यानं परत मान डोलावली. तिनं पाटी उचलली आणी ती रानाच्या वाटाला लागली. गोटया घरात सगळयात लहान होता म्हणून त्याचा खूप लाड व्हायचा. कधी-कधी सचीनच्या मनात यायचं मी लहान असतो तर बरं झालं असतं.

त्याला रानात जायचा खुप कंटाळा आला होता. पण नाही जावं तर परत रात्री आईचे बोलणे खावे लागले असते. म्हणून तो नाईलाजानं रानाकडे निघाला. तो रानात आला. कापूस लावण्याचं काम वेगात चालु होतं. बाहेरच्या चार-पाच बाया कामाला आल्या होत्या. जवळ गेल्यावर त्याला त्या बायांमध्ये माया दिसली. तो मनोमन खुष झाला. माया त्याची गल्ली सोडून चांभार वाडयाच्या पलीकडच्या गल्लीतच राहत होती. तिचे वडील वारले होते. तिची आई मोलमजुरी करुन तिला शिकवत होती. आईला हातभार लागावा म्हणूनच ती आई सोबत रानात कामाली आली होती.

तिला पाहून सचिनलाही हुरुप आला. त्यानंही कापूस लावायला सुरुवात केली. त्यानं मुद्दामच तिच्या शेजारचीच पात धरली होती. ते दोघेही आता चढाओढीने कापसाच्या बिया जमीनीत रोवत होते. ते दोघेही आता दुसऱ्या बायांच्या बरेच पुढे आले होते. कापूस लावता-लावता दोघांची नजरा नजर होत होती. सचिन काम करता-करता तिचं विलक्षण सौंदर्य चोरटया नजरेने पाहत होता.काळयाभोर रानात तिचं गोरंपान अंग उठून दिसत होतं. त्याला तिच्यावरील नजर हटवावीशी वाटत नव्हती. पण मागे वडीलधारी माणसं असताना असं करणं बरं नव्हतं, म्हणून तो सगळयांचा अंदाज घेवूनच तिच्याकडे पाहत होता. दुपारची वेळ झाली,विहीरीच्या कडेला आंब्याच्या झाडाखाली सगळेजण जेवायला बसले. सगळयांनी आपापल्या भाज्या एकमेकांना दिल्या. सचिनने विहीरीतून पाण्याचा हंडा भरुन आणला.सगळयांनी आपापले डबे सोडले. प्रत्येकाने आपापल्या कडील पदार्थ एकमेकांना वाटले. ज्वारी, बाजरीच्या भाकरी, चटणी, बटाटयाची भाजी, ठेचा सोबत तोंडी लावायला लुसलुशीत पात, लोणी, आंब्याचं लोणचं अशा गावरान पदार्थांची मेजवानी झाली,सर्वांची जेवणं आटोपली. थोडावेळ विसावा घेवून सगळेजण परत कामाला लागले. मायाच्या आईनं सोबत शेळी आणली होती. तिला शेवरीच्या झाडाला बांधून थोडं खायला टाकून परत ती कामाला लागली.

दोन दिवस होवून गेले. सुरुवातीला माया आणी सचिन एकमेकांना लाजत होते. पण नंतर हळुहळु बोलु लागले. रोजच्या सारखेच ते दोघे आजही इतरांच्या पुढेच होते.

सचिनने तिला विचारले,

“ आज तुझी आई कशी आली नाही?”

तेव्हा ती म्हणाली,

“ती आजारी आहे म्हणून घरीच राहीली.”

आज तिची आई नव्हती. सचिनचे वडील पण काही तरी कामा निमित्त तालुक्याला गेले होते. त्याची आई पण मागे बायांमध्ये कामात, बायांसोबत बोलण्यात गुंग झाली होती. म्हणून ते दोघेही काम करता-करता एकमेकांशी मनमोकळया गप्पा मारत होते. ते दोघेही एकमेकांच्या सहवासात आले होते. त्यातच ते दोघेही भर तारुण्यात होते. त्यामुळे नकळतपणे ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

तेवढयात सचीनच्या आईने मायाला हाक मारली,

“अगं, शेळी सुटली बघ,धर लवकर नाहीतर जाईल कुठं तरी.” माया शेळीकडं पळाली, तिनं शेळी पकडली आणी परत झाडाला बांधली. तोवर सचिनचं कामात लक्षच नव्हतं. माया परत आली आणी ते दोघे परत कामाला लागले.

सायंकाळचे साडे पाच वाजले होते. आभाळ भरुन आले होते. बाया घरी जाण्याची गडबड करु लागल्या. वारं शांत होतं, आभाळ डोक्यावर येवून थांबलं होतं. आता कोणत्याही क्षणी मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता होती.

सचिनची आई बायांना म्हणाली,

“मी सचिन बरोबर गाडीवर पुढं जाते, तुम्ही पण बिगीनं निघा”. सचिन आईला घेवून गावात आला.दहा मिनीटातच मुसळधार पाऊस सुरु झाला. आभाळ असल्यानं सगळीकडे काळोख पसरून त्या काळोखानं सगळा गाव आपल्या कवेत घेतला होता. तेवढयात लाईटपण गेली. जोरदार पावसानं घरावरील पत्रे तडाम ताशासारखे तडातडा वाजत होते.विजाचा कडाडम,कडकड आवाज मनात धडकी भरवत होता.विजा कुठेतरी जवळच पडल्यासारख्या भासत होत्या. सचिनला मायाची काळजी वाटत होती. ती घरी पोहचली असेल का? तिला मध्येच पावसानं गाठलं असेल, या विचारात सचिन पडत्या पावसाकडे पाहत होता. तेवढयात मायाची आई पोत्याचा घुमटा पांघरून तशा मुसळधार पावसात त्यांच्या घराकडेच येताना त्याला दिसली.

तिनं आत येउुन विचारलं,

“माया नाही का आली तुमच्यासोबत?”

माया अजून घरी आली नव्हती. तिच्या आईला वाटलं होतं ती सचिनच्या आईसोबत त्यांच्याच घरी आली असावी. त्यामुळे ती मायाला पाहण्यासाठी आली होती.

सचिनची आई म्हणाली, “माझ्या बरोबर तर नाही आली. तिच्या सोबत चव्हाणाच्या बाया होत्या ना.”

माया तिथेही नाही म्हणल्यावर तिच्या आईच्या अंगातलं अवसानच गेलं,ती मटकन खाली बसली.तिला मायाची काळजी वाटु लागली.तेवढयात सचिनच्या आईनं तिला धीर दिला. सचिन छत्री घेवून मायाच्या सोबत थांबलेल्या बायांच्या घरी गेला. तेथे जावून चौकशी केली असता, त्यांनी मायाची शेळी सुटली होती, म्हणून ती शेळीला सापडण्यासाठी गेली होती. तेवढयात जोराचा पाऊस सुरु झाला म्हणून आम्ही निघून आलो असे सांगीतले. सचिनला त्यांचा खुप राग आला एकटीला तशा परिस्थतीमध्ये त्यांनी तिला सोडायला नव्हते पाहिजे. पण आता बोलण्यात आणी थांबण्यात काही अर्थ नव्हता. तेव्हा सचिन कोणाला काही न सांगताच मायाला शोधायला भर पावसात, काळोखात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रानाकडे निघाला.

जसा पावसानं जोर धरला होता. तसाच वाऱ्यानंही जोर धरला होता. वाऱ्यामुळे हातातील छत्री उलटी-पालटी हेावू लागली. त्यामुळे त्याने छत्री बंद केली व पँट चांगली गुडघ्या पर्यंत दुमडून तो अंधारात अंदाजानंच चालु लागला. मसणवाटा जवळ आला तशी त्याच्या काळजात धडधड वाढली. त्याच्या मनातल्या विचारांनी त्याला मध्येच काहीतरी असल्याचा भास होत होता. त्याला तेथून परत जावं असं वाटु लागलं. पण त्याला मायाला शोधायचं होतं, त्यामुळं त्यानं मन आणखी घट्ट केलं आणी तो मनाला धीर देत चालु लागला. वावरात खुप चिखल झाला होता. चप्पल चिखलात रुतु लागली,चालणे अवघड झाले. घोटया इतका पाय चिखलात जात होता. चिखलात रुतलेला पाय वर काढायला खुपच जोर लावावा लागत होता. रुतलेली चप्पल काढण्यासाठी त्याने थोडा जोर लावला त्यामुळं चप्पलचा बंदच तुटला. त्यानं तुटकी चप्पल तेथेच टाकली व तो पुढं चालु लागला. पावसाने आणखीनच जोर धरला होता. मध्येच विज चमकून गेल्यानं त्या विजेच्या प्रकाशात पुढचे थोडे दिसत होते.पायाखालची वाट असल्यामुळे तो अंदाजाने चालत होता. तितक्यात त्याच्या पायामध्ये सुई बाभळीचे काटे घुसले. त्याला असंख्य वेदना झाल्या. त्यानं तो पाय अलगद वरच धरला आणी रुतलेले दोन काटे काढले. त्यानं पुन्हा दुसरा पाय पुढं टाकला आणी दुसऱ्या पायातही टचकन काटा मोडला. त्यानं परत तो पाय अलगद वर उचलून काटा काढला आणी त्याच्या लक्षात आलं काळयाच्या बाबुनं रान तुडवतयं म्हणून काटाडी टाकून सकाळीच ही वाट अडवली होती. आता पुढचं पाऊल सावधगिरीनं टाकणं गरजेचे होतं. त्यानं अंदाज घेतला, काटाडी जिथपर्यंत टाकली होती. त्याला वळसा घालून त्यानं पुढची वाट धरली.

पायात काटे मोडल्यामुळे त्याच्या पायाची चांगलीच आग होत होती.वरुन पाऊस चांगलाच झोडपत होता. पण तो मायाच्या प्रेमापोटी तसाच पुढे निघाला. चालत-चालत तो नदीजवळ आला. त्याने अंदाज घेतला,नदीला पुर आलेला होता. तो नदीच्या कडेला असणाऱ्या लिंबाच्या झाडाजवळ होता. तिथं गुडघ्या इतकं पाणी होतं. पुढे नदीपात्र खोल होतं. त्यावरुनच त्याला पाण्याचा अंदाज आला. इथून पलीकडे जाणे अशक्य होते. पण मायाला शोधण्यासाठी कसंही करुन पलीकडे जायचचं असं त्यानं ठरवलं. आणी त्याला म्हसोबाच्या मंदिराजवळचा बंदारा आठवला. बंदारा उंच असल्यामुळे बंदाऱ्यावरुन थोडेच पाणी वाहत असणार, त्यामुळे बंदाऱ्यावरुन सहजच पलीकडे जाता येईल असा त्याने मनाशी तर्क बांधला. त्याच्यापासून बंदारा डाव्या बाजूला अजून एक कि.मी.अंतरावर होता. तो झपाझप पावलं टाकत त्या दिशेला निघाला.

वाऱ्यानं आणखीनच जोर धरला होता. पाऊस उघडायचं नाव घेत नव्हता. तो अर्ध्या रस्त्यामध्ये आला होता.तेवढयात त्याला आकाशात भयंकर कडकडाट ऐकु आला,वीज चमकली, त्या विजेच्या उजेडात त्याला त्याच्यापासून ३०-४० फुट अंतरावर असलेले खोबऱ्या आंब्याचे झाड दिसले. क्षणार्धात वीज त्या खोबऱ्या आंब्याच्या झाडावर कोसळली. त्याच्या काळजाचं पाणी-पाणी झालं. क्षणभर त्याचं सगळं शरीर बधीर झालं. डोळयापुढं काजवे चमकु लागले,कान बधीर झाले. तो थोडावेळ जागेवरच थांबला. थोडयावेळानं तो भानावर आला आणी परत आपल्या प्रेमाच्या शोधात निघाला.

तो आता म्हसोबाच्या त्या छोटयाशा मंदिराजवळ आला होता. तितक्यात त्याला वातावरण भेदून टाकणारी किंकाळी ऐकु आली. तो आवाज मायाचाच होता. तो पटकन मंदिराकडे पळाला. मंदिरात दिव्याचा उजेड होता. पाहतो तर काय? दोन-तीन माकडं मायाला चापटा मारत होते. तिचे केस ओढत होते. एक माकड तिच्या हाताला चावत होते. त्याने मोठया शिताफीनं हातातील छत्रीने त्या माकडांवर हल्ला चढवला.अशा अचानक झालेल्या हल्याने ती माकडं बिथरली आणी पळून गेली. त्यानं पटकन मंदिराचं छोटंसं लोखंडी गेट लावून घेतले. माया झालेल्या प्रसंगाने खुप भेदरली होती, तिचं सर्वांग थरथरत होतं. तो तिच्याजवळ गेला ती त्याला पण भिऊ लागली. शेवटी त्याने धीर दिल्यावर तिनं बारकाईनं पाहीलं, सचिन आहे असं तिच्या लक्षात आलं,तिनं त्याला घट्ट मिठी मारली.

“तु इकडे कशी आलीस?” असे सचिनने तिला विचारले.

तिच्या डोळयात पाणी आलं होतं,तिनं सचिनकडे पाहिलं, ती म्हणाली,

“मी शेळीच्या मागे गेले होते. पण वारं आल्यामुळे डोळयात माती चालली म्हणून मी डोळे झाकून एका जागेवर थांबले. तेवढया वेळात शेळी बरीच पुढं गेली होती आणी लगेच पावसाला सुरुवात झाली. तरीही मी शेळीच्या मागे गेले, पण मला शेळी सापडली नाही. थोडयाच वेळात खुप पाउुस सुरु झाला. मी एका झाडाच्या आडोशाला थांबले, पण पाऊस उघडणार नाही असं वाटून मी नदीकडे आले. त्यावेळी मला नदीमध्ये पुर आलेला दिसला. मग मी या बंधाऱ्याकडे पाणी कमी असेल म्हणून आले. आणी पाऊस जास्त वाढल्यामुळे आणी अंधार पडल्यामुळे मी या मंदिरातच थांबले. येथील काडीपेटी घेऊन देवाच्या समोर तेलवात लावली. थोडया वेळात ही माकडं पण निवाऱ्याला इथेच आली. मी गेट लावायचं विसरले होते, मी दिसताच त्यांनी माझ्यावर हल्ला चढवला तितक्यात तु आलास. तु नसता आला तर माझं काय झालं असतं?”

एवढं बोलताना तिच्या डोळयात पाणी आलं होतं. पावसानं भिजल्यानं, दिवसभराच्या कामानं आणी जेवण केलं नसल्याने ती थकून गेली होती. सचिनने तिला खाली बसवले,तिचं डोकं मांडीवर घेवून तिला झोपवलं.आणी तिच्या डोक्यावरुन तो हात फिरवु लागला. सचिन आल्यामुळे तिला आता सुरक्षित वाटत होतं. तीही सचिनच्या मांडीवर निर्धास्त होवून झोपली.

माया सचिनच्या मांडीवर शांत झोपलेली होती आणी सचिन दिव्याच्या उजेडात तिचं निरागस सौंदर्य न्याहळत होता.आता त्याला पावसाची, वाऱ्याची विजांची अन् अंधाराची कसलीच फिकीर नव्हती. ही रात्र अशीच रहावी असं त्याला वाटत होतं.कारण त्याला त्याचं हरवलेलं प्रेम परत मिळालं होतं.

-संदिपकुमार

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED