अधांतर - २४ अनु... द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

अधांतर - २४

"या तो हम ज्यादा ही सिधे थे,
या किस्मत की मक्कारी थी।
हर बार तुमसे धोका खाया,
सच की हर उम्मीद हारी थी।"

चांगुलपणाच्या कितीही गोष्टी केल्या आणि चांगुलपणावर माझा कितीही विश्वास असला तरी या कलयुगात एक गोष्ट नक्कीच अनुसरण करावी, ती म्हणजे "जशास तसे वागणे"
....हो, अगदी खरं बोलते मी, कारण अतिजास्त सरळ चालण्याने धर्मराज युधिष्ठिर आपलं सगळंच गमावून बसले होते...बरं तेंव्हा त्यांना सगळं मिळवून द्यायला आणि त्यांना मार्गदर्शन करायला साक्षात लीलाधर तिथे होते, पण आता तस नाही ना..!! आताच्या काळात कोणी येत नाही मार्गदर्शन करायला, आणि तसा मार्गदर्शक भेटायला नशिबही लागतं... आणि नुसतं नशीब तसं असून चालत नाही, तर आपल्याला ती व्यक्ती ओळखता ही आली पाहिजे...

आपण विनाकारण किंवा नकळतपणे ही कोणाचं वाईट करू नये ही माझे तत्व...!! पण जर कोणी आपल्याला अति सहज समजून आपला फायदा घेत असेल तर तिथे आपणही कुटनिती वापरायला मागे पुढे पाहू नये असंही माझं स्पष्ट मत आहे...दुसऱ्यांसोबत चांगलं वागता वागता आपण स्वतःला तर हानी पोचवत नाही ना हे सुद्धा वेळोवेळी तपासून पाहावं...हे कधीच विसरू नये की आपण मनुष्य आहोत, देव नाही..त्यामुळे आपल्या सहनशक्तीचा ही बांध कधी तर फुटूच शकतो...अश्यावेळी आपले कर्म काय आहे किंवा काय असायला पाहिजे यावर लक्ष द्यावं.... जो व्यक्ती नेहमी स्वतःलाच खूप महान ठरविण्याचा प्रयत्न करतो, नेहमी स्वतःचेच गुणगान करत असतो, तो तर कधीच विश्वासपात्र नसतो...कारण फुल कधीही स्वतःहुन कोणाजवळ जात नाही त्यांचं सुगंध पसरवायला..तो त्याचा सुगंध असतो जो दरवळत राहतो...तसंच मनुष्याचं ही आहे, जर तुमचे कर्म चांगले असतील तर स्वतःहुन लोक तुमचे गुणगान करतील, तुम्हाला स्वतः हुन स्वतःची बढाई करावी लागणार नाही...

विक्रम असाच एक व्यक्ती होता जो स्वतःची महानता स्वतःहुन बोलुन दाखवायचा, स्वतःच स्वतःचे गुणगान करायचा..."निंदकाचे घर असावे शेजारी" हे त्याच्या महाणतेच्या विरोधात होतं.. आणि मी अतिजास्त सरळ, त्यामुळे प्रत्येक वेळी त्याला माफ करत गेली आणि त्याच्याकडून धोका खात गेली....अभय सर मात्र त्या सुगंधी फुलासारखे...!!! काहीही अपेक्षा न करता सुगंध वाटत फिरणारे...

माझ्या बाबतीत अभय सर खरंच माझ्या जीवनरुपी रथाचे सारथी होते हे मला कळलं होतं..पण जसा अर्जुन रणांगणात आपल्याच लोकांशी लढतांना विचलित झाला होता तशी कदाचित मी ही होणार होती..आणि यावेळी कदाचित मी विक्रमच्या कुटील योजनेत फसणार ही होती...हो, मला विचलित करायलाच विक्रम आला होता जे मला कळलं नाही...विक्रमला दारात बघून मला घामच फुटला, धडधड व्हायला लागली, कारण इतक्या दिवसांत मी माझा पत्ता कोणालाही कळवला नव्हता फक्त व्यतिरिक्त... माझ्या डोक्यात अचानक विचार चमकून गेला की याने घरी जाऊन आईबाबांना तर काही धमकवलं नसेल ना, ज्यामुळे आईने याला माझा पत्ता सांगितला, आणि हाच विचार करून मी त्याला बोलली..

"तुम्ही इथे काय करताय विक्रम?? यावेळी जर मला किंवा माझ्या आईबाबांना धमकवण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं खराब कोणीच राहणार नाही..."

आणि यावेळी कमालच झाली, मला काही प्रत्युत्तर न देता विक्रम सरळ हात जोडून आणि डोळयांत पाणी घेऊन माझ्या समक्ष्व उभा होता.. त्याला असं बघून मला आश्चर्य झालं..मला विक्रम बोलला,

"नैना, मला माहीत आहे तुझा माझ्यावर विश्वास नसेलच, मीच इतका खराब वागलो आहे तुझ्यासोबत, तू विश्वास ठेवणार तरी कसा माझ्यावर?? पण मला एक संधी दे, मी सगळं नीट करेल ग.."
विक्रम असं बोलतोय यावर माझा विश्वास पटला नाही अजिबात ही आणि सहजासहजी त्याच्या बोलण्यात फसणारी मी नव्हती,

"हे बघा, विक्रम, हा घटस्फोट झाला की सगळं नीटच होणार आहे आणि तुम्ही कसे वागले काय वागले याचा विचार मला नकोय आता.. भूतकाळात वाकून बघायचं नाही मला, जर पुढे जायचं असेल तर....तुम्ही निघा आता, आपण कोर्टात भेटू..."

"नैना, माझं ऐकून तर घे प्लिज, तुला मला जी शिक्षा द्यायची ती दे, पण माझ्या आईबाबांनी तुझं काय खराब केलंय ग, त्यांचा तर विचार कर ना, ते सध्या खूप त्रासात आहेत ग..." विक्रम खूप कळवळीने बोलला,
आणि ही लढाई माझ्या आणि विक्रमच्या मध्ये होती, त्यात त्याचे किंवा माझ्या घरचे भरडल्या जावे हा विचारही केला नव्हता मी, पण विक्रम असं बोलल्यावर मी त्याला बोलली,

"काय झालंय आईबाबांना??? कसे आहेत ते..?"

"नैना, माझ्या सस्पेंशन मुळे आधीच परेशान होते ते आणि त्यात हे घटस्फोट प्रकरण ऐकून तर आईला हार्ट प्रॉब्लेम झालेत, 70 टक्के ब्लॉकेज निघालं तिला...आता सगळं तूच ठीक करू शकते, सगळं तुझ्याच हातात आहे..."
मला ऐकून खरंच वाईट वाटलं की आमच्या दोघांच्या वादात आमच्या घरचे किती त्रास सहन करत आहेत..

"पण त्यांना मेडिकल ट्रीटमेंट हवी विक्रम, मी काय करू शकते त्यात, मी काही डॉक्टर नाही..."
मी चाचरतच बोलली...

"तूच करू शकते नैना...डॉक्टर बोलले आहे की जर तिला अजून स्ट्रेस दिला तर तिच्या जीवाला धोका आहे आणि जर आता तू कोर्टात त्या यवतमाळच्या डॉक्टर ला आणलं आणि त्याने माझ्या विरोधात स्टेटमेंट दिलं तर सगळंच विस्कळीत होईल.. डिपार्टमेंट ने आधीच नक्षली केस मध्ये माझ्या विरुद्ध ऍक्शन घेतली आहे आणि हे कळलं तर समाजात किती बदनामी होईल, आई हा अपमान सहन नाही करू शकणार ग, आणि मला आधार कोणाचा आहे आईबाबांशिवाय....."
आणि विक्रम गुडघ्यांवर बसून रडायला लागला, त्याला असं पाहून मला खूप वाईट वाटलं.. मी त्याला पाणी दिलं,
"पण मी काय करू शकते विक्रम आता?? आता ही केस इथपर्यंत आली आहे, आता कसं..."
माझं बोलणं मध्येच तोडत विक्रम बोलला,

"नैना, मला माझ्या चुकांच प्रायश्चित नाही करू देणार का? ती संधी पण नाही देणार का तू मला?? आपण कधीतरी एकमेकांवर खूप प्रेम केलं होतं, मी तर अजूनही तुला आठवून रात्र रात्र झोपू शकत नाही, प्लिज परवा माझ्यासोबत चल आणि त्या डॉक्टर ला बोल की कुठे काहीही स्टेटमेंट द्यायची गरज नाही, आणि ही केस वापस घे प्लिज...."
मी काहीही बोलत नाहीये हे पाहून त्याने अजून विनवण्या केल्या मला, आणि मलाही कुठेतरी वाटायला लागलं की हे सगळं करून जर माझ्यामुळे कोणाचा जीव धोक्यात जात असेल तर मला काय शांती मिळणार त्यातून आणि चुका सगळेच करतात पण जर कोणाला त्याचा पश्चाताप होत असेल तर आपण ही कठोर नको व्हायला...मला विचारात बुडालेलं पाहून विक्रम पुन्हा बोलला,

"काय झालं नैना?? मला एक शेवटची संधी ही नाही देणार का?? आईला नाही वाचवणार का?"

"विक्रम.....शेवटचं फक्त आणि तेही आईसाठी..."

"हो हो... मग परवा ये तू नागपूर ला दुपारी..."

"पण माझी परीक्षा आहे परवा दुपारी, यशदा ची..."

"अग काळजी नको करू, मी तुला परीक्षेच्या ठिकाणी वेळेवर पोचून देईल...."

आणि असं बोलून विक्रम निघून गेला, मी विचार करत राहिली की खरंच यावेळी विक्रमवर विश्वास ठेवावा की नाही पण राहून राहून मला हे पण वाटत होतं की आधीच समाजा समोर त्याच्या आणि माझ्या कुटूंबाची बरीच बदनामी झाली आहे आणि त्यात आमच्या आईवडिलांचा काय दोष?? पण तेंव्हा मी जे विसरली की नेहमी फक्त मीच विक्रम आणि त्याच्या कुटुंबाची काळजी केली आहे पण माझ्या आईवडिलांसाठी तर तो कुठेच नव्हता, मला दुःख देतांना त्याने कधी माझ्या घरच्यांचा विचार नाही केला...पण तेच ना, अतिसरळ वागण्याचे परिणाम...!! आंधळा विश्वास ठेवला की धोका तर निश्चितच होतो...

अभय सर कामात बिझी असल्यामुळे त्यांच्याशी काही बोलणं झालं नव्हतं, आणि मी पण स्वतःहुन त्यांना फोन केला नाही कारण सध्या तरी मला त्यांना माझ्या निर्णयाबद्दल काही सांगायचं नव्हतं...परीक्षेच्या दिवशी त्यांनी मला सकाळी शुभेच्छा द्यायला फोन केला आणि मी पण मोजकच बोलून फोन ठेवला आणि मी निघाली नागपूर ला जायला...आपण जर कुठे तरी फसत असलो तर त्याची जाणीव आपल्याला होत राहते फक्त आपल्याला आपली ती आंतरिक हाक ओळखता आली पाहिजे.. माझ्यासोबतही तसंच घडत होतं त्यादिवशी, वाटत होतं की काहीतरी चुकीचं आहे पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होती..

दुपारी दोन वाजता पेपर होता पण बारा वाजले होते तरी विक्रमचा पत्ता नव्हता, खूप वाट पहिल्या नंतर साडेबाराच्या सुमारास तो आला.. मला खूप घाई झाली होती त्यामुळे आम्ही लगेच त्या डॉक्टर ला भेटायला निघालो, माझ्या मनात काय आलं माहीत नाही आणि मी विक्रमला माझ्या वकिलांना बोलवते असं सांगितलं, ज्याचा त्याने विरोध केला.. मी त्याला वारंवार सांगत राहिली पण तो माझ्या वकिलांना बोलवायला मान्य करतच नव्हता आणि आमच्या या बाचाबाचीत अभय सरांचे फोन येऊन गेले मला तेही मी पाहिले नाही..माझ्या परिक्षेची वेळ ही निघून गेली आणि अजून त्या डॉक्टर चा काही पत्ता नव्हता...विक्रमला बोलली की आपण त्याला नंतर ही भेटू शकतो पण विक्रम बोलला नंतर तो येणार नाही आणि पुन्हा त्याने मला आईच्या तब्येतीची कारणं देऊन गप्प बसवलं आणि मी पण जास्त ते ऐकुन घेतलं कारण ही शेवटची हिअरिंग होती कोर्टची आठवड्या भरात...शेवटी तो डॉक्टर काही आलाच नाही, माझा दिवसही वाया गेला आणि मी परीक्षा ही देऊ शकली नाही...विक्रमच्या विनवण्या पाहून तरी असंच वाटत होतं की त्याला त्याच्या वागणुकीचा पश्चाताप होतो आहे पण ते अगदी खोटं होतं, त्याची चालाकी होती....आणि त्याच्या नीचपणाची शिकार मी पुन्हा एकदा झाली होती, त्याच्या खोट्या कहाणीत फसून माझी परीक्षा ही हातातुन निघून गेली आणि त्याचबरोबर माझ्या हातून जी थोडीशी आर्थिक मदत मिळण्याची एक शक्यता होती ती पण निघून गेली...
------------------------------------------------
मी निराश होऊन घरी यायला निघाली तर विक्रमचे मला खूप सारे मेसेजेस होते की मी त्याला पुन्हा चुकीचं समजली का? मी उद्या पुन्हा जाऊन केस परत घेईल का? वैगरे वैगरे...पण त्याने माझ्याबद्दल एकदाही विचारलं नाही की मी घरी पोहोचली का किंवा माझी परीक्षा माझ्यासाठी किती महत्त्वाची होती आणि मी ते देऊ शकली नाही माझ्या मूर्खपणा मुळे त्याबद्दल मला किती दुःख होतंय? हे सगळं त्याने काही विचारलं नाही, त्याला फक्त त्याच्या केसची पडली होती... मी घरी आली तर अभय सर घराच्या बाहेर माझी वाट पाहत उभे होते...त्यांना बघून मी काही विचारणार त्याआधी त्यांनीच प्रश्नांचा भडिमार सुरू केला,

"कुठे होतीस?? किती फोन करत होतो मी...परीक्षा कशी गेली? चार दिवसांपासून एक फोन ही नाही केलास स्वतःहुन?? आणि आज अशी गायब झाली???"

त्यांच्या या प्रश्नांची काय उत्तर देऊ काही कळत नव्हतं कारण माझ्यामागे त्यांनी इतका वेळ घातला, मला सर्वोत्तम मार्गदर्शन केलं आणि मी परीक्षाच दिली नाही हे कसं सांगणार होती मी त्यांना...

"मी...अंममम...ती परीक्षा...."

"....दिली नाही हो ना?"
आणि मी जे बोलू शकत नव्हती ते अभय सरांनी पूर्ण केलं, मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं की कसं कळलं असेल त्यांना, त्यावर ते बोलले...

"हे बघ, मला कसं कळलं ते महत्त्वाचं नाही, आधी हे सांग की विक्रमने काय पट्टी दिली तुला आणि तू हा मूर्खपणा केलास आज??"
अभय सर जरा चिडुनच बोलले, त्यांचा चिडलेला अवतार पाहून मी त्यांना सगळं काही खरं खरं सांगून दिलं की कसा विक्रम आला होता आणि त्याच्याकडे परिस्थिती काय आहे, ते ऐकून अभय सर बोलले,

"तुला काय वाटते विक्रमची कहाणी खरी असेल?? चार दिवसांपूर्वीच त्याच्याघरी रेड पडली आहे, माझ्या ऑफिसर्स नी सांगितलं मला, त्याच्या घरी कोणालाच काहीही झालेलं नाहीये सध्या तरी...त्याला फक्त त्याच्या अडचणी कमी करायच्या आहेत त्यामुळे त्याला वाटलं की तुला मूर्ख बनवून कमीतकमी ही एक गोष्ट तरी तो बरोबर करू शकतो आणि काही प्रमाणात तो त्यात यशस्वी ही झाला, पण मला आधीच शंका होती त्यामुळे त्या डॉक्टर ला मी आज नागपूर ला पोहचू दिलं नाही... आणि अजूनही हे खोटं वाटत असेल तर तू स्वतः त्याच्या घरी जाऊन बघून ये सगळं....तू ना खरंच, खूप खूप मूर्ख आहेस नैना.." अभय सर एका दमात बोलून गेले सगळं, पण त्यांच चिडणं कळत होतं मला.. त्यांचं ऐकून मी बाहेरच डोक्यावर हात देऊन बसली...मला कळत नव्हतं कोणत्या मातीचा बनला असेल विक्रम जी त्याला जराही लाज वाटत नाही इतकं खोटं बोलायला, आणि त्याच्या खोट्याला प्रत्येक वेळी खरं मानून मी स्वतःचं का नुकसान करून घेते...मी खूप निराशेने बोलली,

"असंच व्हायला पाहिजे माझ्यासारख्या मूर्ख मुलीसोबत.. प्रत्येक वेळी तो व्यक्ती विश्वासाच्या नावाखाली माझा खेळ करत आला आणि मी तरी त्याला संधी वर संधी देत आली... वाटलं होतं ही परीक्षा पास होऊन काहीतरी मदत होईल मला पण ती सुद्धा माझ्या बेअक्कली मुळे हातातून गेली.. काही नाही होऊ शकत माझं....." आणि मी हतबल होऊन रडायला लागली.. माझ्याकडे बघून अभय सरांना वाईट वाटलं असावं,

"नैना...मी चिडलो त्यासाठी खरंच माफ कर मला पण तू अशी हिम्मत नको हारू, मी तर यासाठी चिडलो कारण तुझी काळजी होती मला, तू गेल्या काही महिन्यांपासून किती मेहनत करत आहेस या परीक्षेसाठी तेही दिसतंय मला त्यामुळे मला वाईट वाटलं..पण ही परीक्षा हातातून गेली म्हणून तू UPSC करूच शकत नाही असं नाही होतं ना...मी स्वतः ही सिलेक्ट झालो नव्हतो यशदा मध्ये आणि UPSC क्लिअर करायलाही मला तीन प्रयत्न लागले, पण तरीही मी केलंच ना...तू तर नक्कीच करशील, हो पण जर तू आता इतक्यातच हात टेकले तर विक्रम त्याची लढाई जिंकला म्हणूनच समज तू...आणि तू असं नाही होऊ देणार याची खात्री आहे मला...हो ना?"
अभय सरांचं चिडणं पाहून मला थोडं खराब नक्कीच वाटलं होतं पण आता ज्या पद्धतीने त्यांनी मला सावरायला मदत केली ते अजूनच प्रेरणादायी होतं... खरंच आहे, वाट दाखवणारा असाच असला पाहिजे, जो आपल्याला आपल्या चुका ही दाखवेल पण तुला चुका दाखविताना नकळत आपल्याला नवीन मार्ग दाखवून प्रेरणा ही देऊन जाईल...अभय सर उत्तम मार्गदर्शक होते यात काही वादच नव्हता...

आता मात्र मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी विक्रमच्या जाळ्यात फसायचं नाही, त्या दिवसांनंतर मी विक्रमचा एकही फोन उचलला नाही, त्यालाही कळलं असावं की मला त्याची चलाखी कळली आहे...बघता बघता शेवटच्या हिअरिंग चा दिवस ही आला...आणि यावेळी माझं नशीब चांगलं आणि अभय सरांनी त्या डॉक्टर ला धमकवल्या मुळे त्याने सगळा गुन्हा कबूल केला आणि विक्रमने त्याला गप्प राहायला कस मजबूर केलं होतं ते ही सांगितलं...आता सगळ्या गोष्टी उघड होत्या, मला कायेदेशीर घटस्फोट मिळाला आणि विक्रमला योग्य ती शिक्षा...!! पण विक्रमची शिक्षा इतकी सहज नव्हती...

विक्रम त्याच्या डिपार्टमेंट च्या भानगडीतही खूप फसला होता, अभय सर स्वतः तपास करत होते आणि त्याने आपल्या कर्तव्यांच्या विरोधात जाऊन, नक्षल्यांना मदत केली होती, अवैध रॅकेटची अफरातफरी केली होती, त्यांना फंड पुरवले होते, सरकारला नक्षल्यांचे खोटे आत्मसमर्पण दाखवून घोटाळे केले होते आणि बरंच काही होतं...त्याच्या ह्या सगळ्या कारनाम्यांची एक साक्षीदार मी पण होती..ज्या दिवशी मी साक्ष देऊन बाहेर आली, तो माझ्या समोर उभा होता..मला बघून बोलला,

"शेवटी केलंच ना तू जे तुला करायचं होतं, तुझ्यासारखी स्त्री मी कुठेच पहिली नाही नैना, माझ्या त्रासाची माझ्या अडचणींची तुला कधीच पर्वा नव्हती, स्वतःच्या स्वार्थासाठी तू माझं आयुष्य बरबाद करायला निघालीस...तुझ्याशी लग्न करणं माझ्या आयुष्यातील सगळ्यांत मोठी चूक होती ...."

विक्रम असं बोलल्यावर मला 'चोर आणि वरून शिरजोर' हीच म्हण आठवली..म्हणजे हे बरं आहे पुरुषांचं, त्यांनी कितीही गुन्हे करावे आणि बायकांनी ते माफ करावे हीच अपेक्षा ठेवावी... आणि चुकून माझ्यासारखी जर त्याला त्याच्या कर्माची शिक्षा द्यायला निघाली तर आमच्या सारखी तुच्छ स्त्री नाही..वा रे समाज आणि वा रे ती पुरूषी मानसीकता... त्याला उत्तर तर मी देणारच होती...

"हम्म...चूक तर खरंच केली आहे तुम्ही विक्रम, माझ्याशी लग्न करून, कारण तुम्हाला नेहमी रडणारी, मितभाषी आणि सगळं निमूटपणे ऐकून घेणारी बायको दिसली होती, पण दुर्दैवाने मी तशी नाही, किंवा तशी राहिली नाही...आणि नाही दिसला मला तुमचा त्रास आणि मला तो बघायचा ही नाही, कारण तुम्ही ही कधीच माझा त्रास बघितला नाही...बरं त्रासाचं सोडा, तुम्ही तर खोटं बोलून नेहमी माझ्या भावनांचा खेळ करत आले, आणि जो व्यक्ती एका स्रीच्या भावनांचा खेळ करून तिला दुधातून माशी काढून फेकावी तशी वागणूक देत असेल तर तो माझ्यासमोर तडफडत जरी असेल तरी मी त्याच्या कडे बघणार नाही..मी आजही शिक्षा दिली आणि ते जोपर्यंत अशी वागणूक स्त्रियांना देणार तोपर्यंत मी शिक्षा देत राहणार... लक्षात ठेवा...आता आयुष्यात आपले मार्ग कधीही एक होणार नाहीत हीच प्रार्थना राहील माझी...."

"मार्ग तर एक होणारच नाहीत आपले आता, कारण तुझे मार्ग आता फक्त अभय सरांकडेच जातात, हो ना नैना?? मला कळत नाही, ते तुझी इतकी कशी मदत करत आहेत काहीही नातं नसतांना, काय लपवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही???"

"आमचं नातं काय आहे, हे तुमच्या अहंकाराने भरलेल्या बुद्धीला आणि मनाला कधीच कळणार नाही विक्रम, कारण कोणाला गुरू मानण्यासाठी आधी आपण स्वतःचा मी पणा, स्वतःचा अहंकार बाजूला ठेवावा लागतो..माझं आणि अभय सरांचं ही नातं तेच आहे, पण ते समजून घेण्याची तुमची लायकी नाही..."

त्यादिवशी मी विक्रमला सडेतोड उत्तर तर दिलं पण मनातून मला खूप दुःख झालं होतं.. म्हणजे हेच आयुष्य असावं का स्त्रियांचं??? माणसांनी काहीही केलं तरी चालेल पण स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःचा मान अबाधित ठेवण्यासाठी आम्ही थोडे कठोर पाऊलं उचलली स्त्रिया स्वार्थी, त्यांना संस्कार नाही... मला वाईट जरूर वाटलं होतं पण माझं मत किंवा माझा निर्णय बदलला नव्हता, मला तेंव्हाही आणि आताही हेच वाटते की जर पुरुष कोणत्याही प्रकारे स्त्रियांचा खेळ करत असतील तर त्यांना शिक्षा नक्कीच मिळावी....

त्यादिवसानंतर तरी मला अपेक्षा होती की बाबा मला घरात घेतील, त्यांना कोण चूक कोण बरोबर हे कळेल, पण माझ्या वाटेला निराशाच येणार होती..कारण आता त्यांना हे वाटत होतं की काहीही नातं नसतांना मी अभय सरांच्या घरात का राहते?? ते कोणत्या नात्याने मला भेटायला येतात?? आणि या सगळ्यांमुळे त्यांची समाजात नाचक्की होत होती, पण ते ही विक्रम सारखं समजू शकत नव्हते की अभय सर माझ्यासाठी फक्त अन फक्त माझे शिक्षक होते, गुरू होते, सल्लागार होते...यापेक्षा जास्त काहीही नाही, पण मी आता माझ्या आयुष्याच्या अश्या वळणावर होती जिथे मला कोणालाही माझ्या बद्दल काहीही स्पष्टीकरण देण्याची इच्छा नव्हती...

दिवसांमागून दिवस जात होते, माझी UPSC ची तयारी ही जोरात चालली होती, आणि एक दिवस कळलं की विक्रमच्या आईने या जगातून निरोप घेतला, मला खरंच वाईट वाटलं..मला जाऊन विक्रमला भेटावं वाटलं पण त्याने भेटायला नकार दिला...काही दिवसांनी बाबा ही त्याला सोडून गेले, तो मात्र स्वतःच्या बनवलेल्या व्यूहात फसला होता...घर, नाव, कुटुंब सगळं धुळीस लागलं होतं, तो आता एकटाच राहिला होता...एक दिवस जबरदस्तीने मी त्याला भेटायला गेली, त्याने मला फक्त एकच वाक्य बोलला,
"आज मला एकट्याला पाहून खुप खुश असशील ना तू नैना.. माझ्या त्रास पाहून मन भरलं असेल तुझं? पण एक लक्षात ठेव, जे मिळवायचं ते मिळवशील ही तू, पण आयुष्यात एकटीच राहशील... अगदी माझ्यासारखी....."
त्या दिवशी असं वाटलं मी काही चुकीचं केलं का?? माझ्यामुळे काही चुकीच झालं का? आणि हेच प्रश्न मला त्रास देत होते..अभ्यासात ही मन लागत नव्हतं...माझी चलबिचल अभय सरांना बोलून दाखवल्यावर नेहमीप्रमाणे त्यांनी अगदी सोप्या शब्दांत माझे शंका निरासन केले,
"नैना, आजपर्यंत मी कधीही तुझ्या आणि विक्रमच्या नात्याबद्दल काही बोललो नाही, किंवा त्यात हस्तक्षेप केला नाही, पण आज एकच वाटत मला, विक्रमची आज जी अवस्था आहे, तो त्याच्याच कर्माचे फळं भोगत आहे...त्याने जी क्रिया केली तशीच त्याला प्रतिक्रिया मिळत आहे...जो व्यक्ती स्वतः चांगला नसतो तो कोणतंच नातं टिकवून ठेवू शकत नाही... आणि राहिला प्रश्न तुझा तर एक लक्षात ठेव जेंव्हा आपण मनस्तापाच्या अग्नीत समोरच्याला जळवत असतो तेंव्हा त्याच्या झळा आपल्याला ही लागतातच..."
बरोबर बोलले अभय सर, जेंव्हा आपण चुकीच्या गोष्टी संपवण्यासाठी युद्ध करत असतो, त्याचे परिणाम तर थोड्या जास्त प्रमाणात आपल्यालाही भोगावेच लागतात आणि त्यासाठी मी आता तयार ही होती...पण त्यांचं बोलणं ऐकून माझा थोडा ताण कमी झाला आणि आता माझी परीक्षा ही जवळ होती त्यामुळे मी जोमाने अभ्यासाला लागली......
-----–-----------------------------------------------
आयुष्यात काय घडलं काय नाही याचा सगळा विचार सोडून मी खूप पुढे निघून आली होती..अभय सरांच्या मदतीने आणि स्वतःच्या मेहनतीने मी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीही चांगल्या मार्क्सने पास झाली होती...लवकरच मला मुलाखतीसाठी दिल्लीला जायचं होतं, पण इतकी भीती होती, असं वाटत होतं हे जे इतक्या सहजासहजी हातात आलं आहे, ते यश क्षणभंगुर तर असणार नाही ना, कारण काट्यांची वाट चालून आता जेंव्हा फुलांच्या पाऊल खुणा दिसत होत्या त्यावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं...मला मुलाखतीच्या काही विशेष टिप्स द्यायला अभय सर येणार होते, त्यांचीच वाट पाहत मी दरवाज्यात बसली होती, पण माझं लक्ष मात्र हरवलं होतं त्यामुळे त्यांच्या येण्याची चाहूल ही लागली नाही, आणि मला विचारात हरवलेलं पाहून ते बोलले,

"अंधाराचे साम्राज्य जरी,
नसेल सूर्यास्त हा अनंत।
उगवेल सूर्य क्षितिजावरी,
तोडूनी सारे साखळदंड।"

त्यांचा आवाज ऐकून की पाहिलं त्यांच्याकडे तर मला बोलले,
"या ओळी आठवतात ना नैना..."

"हो नक्कीच,पण तुम्ही त्यामागची कहाणी सांगितली नाही..."

"तुला माहितीये ते तिकीट मी जेव्हा पहिल्यांदा UPSC चा इंटरव्ह्यू द्यायला चाललो होतो तेंव्हाच आहे, खूप अडचणी पार करून मला ती संधी गवसली होती तेंव्हा त्या ओळी त्या तिकिटावर लिहिल्या होत्या मी...खर तर तो इंटरव्ह्यू मी पास झालो नाही, पण ते तिकीट मला नेहमी आठवण करून द्यायचं की आयुष्यातल्या प्रत्येक अडचनिंवर मात करून मी इथपर्यंत पोहोचलो आहे त्यामुळे इथून पुढे ही सगळं चांगलंच होणार... आणि झालंही...आता तू घाबरू नको, तुझंही सगळं चांगलंच होणार आहे, त्यामुळे कधीही जेंव्हा भीती वाटेल तेंव्हा त्या तिकीटवरच्या ओळी वाचून घेशील, भीती गायब होईल....."

आणि काय कमाल झालंही तसंच...!! प्रत्येक वेळी इतक्या सहज शब्दांत मला प्रोत्साहन देऊन जायचे अभय सर की काही क्षणांत निराशेची मरगळ दूर व्हायची..आणि तो होणारही होतीच कारण अभय सरांप्रमाने मी सुद्धा भरपूर अडथळे पार करून इथपर्यंत पोहोचली होती, हे पण एक प्रकारचं यशच होतं माझ्यासाठी त्यामुळे मी फक्त मला किती माझं बेस्ट देता येईल याचे प्रयत्न केले....

कधीही घराबाहेर एकटी न निघणारी मी, एकटी दिल्लीला जाऊन इंटरव्ह्यू देऊन आली आणि विशेष म्हणजे यावेळी मला अभय सरांनीही मला सोबत येऊ का विचारलं नाही... ते बोलले काही अनुभव स्वतःच घ्यायचे असतात, त्यात कोणाचा वाटा पडायला नको, आणि तेच अनुभव आयुष्यातले अनमोल ज्ञान देऊन जातात...आणि असं बोलून त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला...मी दिल्लीला जाऊन इंटरव्ह्यू देऊन आली... जितकं मी चांगलं करू शकत होती तेवढं केलं, काही प्रश्नांना जेव्हा मला वाटायचं की हे कदाचित बरोबर उत्तर नाही तेंव्हा मला अभय सरांचे शब्द आठवायचे, "सगळं काही एमदम परफेक्टच असायला हवं तसं नाही, पण जे आपण बोलतो जे करतो ते खरं मात्र असायला पाहिजे..कमतरता असली तर चालेल पण त्यात असत्य मिसळून, त्याला बनावटी बनवून कधीच परिपूर्णता देऊ नये, ते टिकत नाही.." आणि त्यांचे हेच प्रेरणादायी शब्द मला चांगला इंटरव्ह्यू द्यायला मदतीला आले...काही दिवसांनी निकाल आला आणि मी पहिल्याच प्रयत्नात पास झाली..माझी भारतात 168 वी रँक होती, मला तर आकाशाला गवसणी घटल्यासारखंच झालं आणि हो गवसणी घालण्यासाठी मला पंख मात्र अभय सरांनी दिले होते...त्यांना ही बातमी कळल्यावर ते लगेच मला भेटण्यासाठी निघाले...आज एवढी मोठीच सफलता मिळवल्यावर पहिल्यांदा बाबांना फोन केला आणि त्यांनी फोन उचलला ही, त्यांना जेंव्हा ही आनंदाची बातमी दिली, मला वाटलं की आता ते सगळं विसरून मला माफ करतील आणि नीट होईल परिस्थिती पण असं काहीही झालं नाही, बाबा मला बोलले,
"तुझं यश नक्कीच कौतुकास्पद आहे नैना, आणि आयुष्यात तुला असंच यश मिळो...पण नातं टिकवायला, माझा मान जपायला तू नेहमीच अपयशी ठरली हे पण सत्य आहे...एक अनोळखी माणसाच्या घरात राहताना तुला हे विचार आले नसतील पण आता तुला माझ्या घरात मी नाही घेऊ शकत..त्यामुळे तू भारत भ्रमण कर किंवा पूर्ण जगात फिर, माझ्या घरात तरी काही जागा नाही तुला...आणि हो, यानंतर फोन नको करू...."

त्यांचे शब्द ऐकून असं वाटलं की सगळं मिळवूनही मी माझी झोळी रिकामीच राहिली...पण तेच सत्य होतं...अभय सर खूप आनंदात मला भेटायला आले, आता त्यांना माझी निराशा दाखवून त्यांचा हिरमोड करायचा नव्हता..त्यामुळे मी पण त्यांना हेच दाखवलं की मी खूप आनंदी आहे...त्यादिवशी मला अभय सर बोलले,
"नैना, आज एवढ्या आनंदाचा दिवस आहे, शेवटी सगळे अडथळे पार करून तू तुझं अस्तित्व बनवलंच, त्यामुळे आता मला तुला काहीतरी सांगायचं आहे, म्हणजे विचारायचं आहे..."

"अरे बोला न मग, त्यात काय परमिशन हवी तुम्हाला..."

"हे बघ नैना, मी कविता करत असलो किंवा अलंकारिक बोलत असलो तरी काही गोष्टी सरळच बोलव्या मला असं वाटतं, आणि तुलाही तसंच आवडतं, त्यामुळे मी सरळ विचारतोय नैना, तुझ्या आयुष्याच्या प्रवासात मला सहप्रवासी बनवून जीवनसाथी चा दर्जा देशील?? लग्न करशील माझ्याशी???"

त्यांचे हे शब्द ऐकून मी स्तब्ध झाली काही क्षणांसाठी, पण स्वतःला सावरत बोलली,

"हे काय अचानक??"
माझी त्यांना नजर देण्याचीही हिंमत नव्हती, पण अभय सर बोलले,

"अचानक नाहीये नैना...तुला खूप आधीच विचारलं असत मी, पण पहिली गोष्ट ही होती की तुझा कायदेशीर घटस्फोट झाला नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे, मला माहित होतं, तुझ्यासाठी स्वतःची ओळख निर्माण करणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःचा सन्मान स्वतःच्या नजरेत होणं हे खूप गरजेचं होतं, आणि त्यासाठी मी थांबलो होतो, तुझ्यावर मी कोणतीही दया दाखवतो किंवा काही ही जाणीव मला तुला होऊ द्यायची नव्हती तेंव्हा...पण आता तू स्वतः एक उंची गाठली आहेस, तुझे लक्ष्य तू मिळवले आहेस, त्यामुळे माझा तुला अडथळा होणार नाही म्हणून आज स्पष्ट बोललो..."

अभय सरांची ही मागणी माझ्यासाठी अतिशय धक्कादायक होती, मी कधीही विचार केला नव्हता याचा, त्यामुळे उत्तर काय द्यावं हेही कळत नव्हतं, पण तरीही मला माझा निर्णय सांगायचा होता...मी बोलली,

"अभय सर, तुम्ही मला इतकं महत्व दिलं त्यासाठी मी आजन्म तुमची ऋणी राहील, माझ्या प्रत्येक चढत्या उतरत्या काळात तुम्ही साथ दिली हे मरेपर्यंत मी विसरू शकत नाही, पण जी मागणी तुम्ही करताय ती मी कधीच पूर्ण करू शकत नाही..मला माफ करा...असं करून मी मान कमी करू शकत नाही..."

"नैना, तुझा प्रत्येक निर्णय मला मान्य, माझी कोणतीही जबरदस्ती नाही तुला पण तू माझ्याशी लग्न करशील तर माझा मान कमी होईल का तुझ्या नजरेत??, की आपल्या वयात जे 10 ते 12 वर्षांचा अंतर आहे ते जास्त वाटते तुला?"

"असं काहीही नाहीये अभय सर...आणि तुमचा काही मान कमी होणार नाही, उलट तुम्ही तर माझ्या नजरेत देवाच्या बरोबरीने पुज्यनिय व्हाल, पण मी माझ्या नजरेतून उतरून जाईल त्याचं काय?? खरं तर माझ्या नजरेत तुम्ही असे व्यक्ती आहेत ज्याचा मी आदर करू शकते, तुमच्यासाठी माझ्या मनात नेहमी एक सन्मानयुक्त भावच होते आणि तसेच राहणार, त्यामुळे तुमच्या बद्दल हा विचारही कधी डोक्यात नाही आला...आणि दुसरं म्हणजे, तुमच्या उपकरच्या ओझ्याखाली मी आधीच खूप दबलेली आहे, आणि आता हे करून मी अजून लहान नाही होऊ शकत, बरं, ते ओझं मी संभाळू शकते पण स्वतःच्या नजरेतून जर उतरली तर तो भार मला शहन होणार नाही, तुम्हाला मी नेहमीच माझा गुरू मानलं आहे त्यामुळे प्लिज अस काही बोलून मला लज्जित नका करू...आणि मी माझ्या आयुष्यातील प्रेम अनुभवलंय, पण दुर्दैवाने ते मला चिरंतर मिळणार नाही, आता पुन्हा मला प्रेम होणार नाही...." मी हाथ जोडून उभी राहिली त्यांच्यासमोर...मला ते बोलले,

"तुझ्या निर्णयात मी आधीही खुश होतो,आताही आहे, तू नेहमीच प्रगती कर, खूप यशस्वी हो, खूप पुढे जा, पण या वाटा चालत असतांना जेंव्हा कधी मागे वळून बघशील मी नक्कीच उभा असेल तुझ्यासाठी...आणि हो, आज जो विषय झाला त्याच्या कोणत्याच दडपणात राहू नको तू, आपण आधी जसे होतो तसेच नंतर ही राहणार...खुश रहा...निघतो मी..."

आणि असं बोलून अभय सर निघून गेले, काही दिवसांनी मलाही ट्रेनिंग चं पत्र आलं आणि मी ही मसुरीला जायला निघाली..त्यादिवसानंतर अभय सरांशी बोलणं कमी केलं अनु त्यांनीही मला कामाव्यतिरिक्त कधी बोलले नाही...पण जेंव्हा कधी बोलायचे तेंव्हा असं दाखवायचे की काहीच बदललं नाही, तसेच मार्गदर्शन करायचे...मसुरीला जायच्या दिवशी मला स्टेशन वर भेटायला आले..मी काय करावं काय नाही याची सूचना देणं सुरूच होतं त्यांचं..जायची वेळ आली तेंव्हा मी जाऊन त्यांच्या पाया पडली तर ते त्यांना अजिबात ही आवडलं नाही, मला बोलले,

"नैना, हे मला अजिबात ही आवडलं नाही, आपण दोघेही समान आहोत, मला हे असं करून देव नको बनवू प्लिज..."

"देव नाहीच तुम्ही आणि तुम्हाला देव बनवणारही नाही मी, पण तुम्हाला मी माझा गुरू मानलंय आणि गुरू माझ्यासाठी तरी वंदनियच आहे.."

आणि असं बोलून मी अभय सरांचा निरोप घेतला...आणि माझ्या आयुष्याचा एक नवा प्रवास पुन्हा सुरू झाला...
--------------------------------------------------------------
क्रमशः

(Dear readers, अधांतरचा आणि नैनाच्या प्रवासाचा शेवटचा भाग सोमवारी रात्री प्रकाशित होईल...आजपर्यंत तुम्ही माझ्या लिखाणाला वाचलं, प्रेम दिलं, त्यासाठी मी मनापासून आभारी आहे तुमची...माझ्या या कथेचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा, तुमच्या समीक्षा मला नेहमीच प्रोत्साहन देतात...त्यामुळे मला नक्की कळवा.)

तुमचीच,
अनु...🍁🍁