कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग करून ,कर्मेंद्रिये संयमित करून , नि:स्पृह जीवन व्यतित करणे , स्वामित्व भावनेचा त्याग करणे, हे आत्मनुभूतीकडे नेणारे मानवाचरण धर्म ग्रंथात विषद आहे. स्व -भान म्हणजे स्वतः च्या क्षमता , मर्यादा यांचे योग्य ज्ञान असणे , बुद्धी स्थिर असणे ,तटस्थपणे परिस्थितीचे अवलोकन करणे आदी संकल्पना मानसशास्त्राने मांडल्या आहेत . आध्यात्म आणि मनोविज्ञान या दोन्ही प्रवाहांचे स्वतंत्र अस्तित्व आणि महत्त्व मी शिरोधार्य मानून माझ्या आंतरिक जाणिवेनुसार " आत्म प्रचिती" हे सामायिक ध्येय ठरवून ,ते विषद करीत आहे . हा सर्वथैव माझा वैयक्तिक आत्मविष्कार असून , माझी तात्कालिक भावावस्था आहे . मी नित्य अध्ययनशील असल्याने माझ्या स्वानुभूती कालानुरूप परिवर्तित होणे, हे देखिल मी अमान्य करीत नाही. कलाकृतीस ज्ञातृनिरपेक्ष अस्तित्व असते . रसिकांचा कलास्वाद हा खास त्यांचाच असतो. सुज्ञ वाचकांनी आपल्या अनुभूती आणि बुद्धीची जोड देऊन ही लेखनकृती आपल्या मनः पटलावर परिपूर्ण करून सुफल करावी, असा विनम्र अनुरोध . तसाही माझा स्तंभलेखनाचा हा डोलारा सुज्ञ वाचकांनी आपल्या सहनशक्तीचा एककल्ली खांब देऊन तोलून धरला आहे.
एक व्यापारी जोडपे एक खेड्याचे छोट्या town मध्ये रूपांतर करून विकास घडवून आणते. छोटे मॉल्स ,रुंद रस्ते ,पूल, आणि सुखसोयीची साधने सहज उपलब्ध होतील अशी यंत्रांची दुकाने ,घरांची रचना , देवळांत , मठांत डिजिटल उपकरणे यांमुळे गाव आधुनिक बनतो . जनता आणि जनार्दनाची सेवा केल्याने पुण्य प्राप्ती होईल व मनातील इच्छा फलद्रुप होतील , असा त्यांचा मानस असतो . 6/7 वर्षांचा त्यांचा एकुलता एक मुलगा 10 वर्षांपूर्वी हरवलेला असतो . अनेक गावांत , वस्त्यांत ,शहरांमध्ये शोध घेवूनही तो सापडलेला नसतो. गरजूंना सुख साधनांची उपलब्धता करून देऊन अपल्याला आपल्या सुखाचा ठेवा सापडेल , अशी त्यांना आशा असते. खेड्याच्या नूतनीकरण सोहळ्याला एक सिद्धहस्त स्वामी आणि प्रगल्भ वैज्ञानिक यांना पाचारण करण्यात येते . स्वामी निर्मळ मनाचे आणि शुद्ध चारित्र्याचे आहेत. ज्ञानाच्या शोधार्थ अनेक धर्म ग्रंथांचे पठण करून त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या आहेत . अंतिम ज्ञानाच्या ,आत्म जागृतीच्या शोधात ते आहेत . शास्त्रज्ञ प्रगल्भ बुद्धीचा ,विनम्र आणि अनेक शास्त्रांचा जाणकार आहे. वृध्द जोडप्याच्या सेवेने आणि समाजकार्याने प्रसन्न होऊन , दोघेही हरवलेल्या मुलाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करेन ,असे अभिवचन देतात . आपली दिव्यशक्ती जागृत करून स्वामी समाधी लावतात .तेव्हा दिव्यचक्षूंनी ते जाणतात , की तो छोटा बालक आता 16/17वर्षांचा नवतरुण झालेला आहे . कोणत्याही गावात किंवा शहरात नसून एका निबिड अरण्यात तो राहतो . मानवी संस्कृतीचा संग नसल्याने तो एक वनमानुष झाला आहे. शिकार करून जेमतेम शरीर सरंक्षण करण्यापूरती पर्णवस्त्रे परिधान करून तो जीवन व्यतित करतो आहे . हे स्वामीं कडून जाणून घेतल्यावर , वृद्ध दांपतीच्या नेत्रांत आनंदाश्रू आणि गावकऱ्यांनाच्या डोळ्यात चिंतेची छटा दिसते. संस्कृती हीन असल्याने गावात हिंसक आणि अप्रिय वातावरण निर्माण करू शकणारा तो वन्यजीव गावात आणू नये ,असे गावकरी सुचवतात . परंतु पुत्रप्रेमासाठी व्याकुळ मात पिता स्वागतसमूह घेऊन त्याला आणण्यासाठी जंगलाकडे निघतात . घनदाट अरण्यात एका पर्वताच्या कपारीत हा गुहा मानव त्यांना सापडतो . लज्जेची जाणीव नसल्याने अल्पवस्त्रे परिधान केलेल्या त्याला पाहून भरजरी वस्त्रे ल्यालेली मंडळी लज्जित होतात. पण आई वडील मात्र वात्सल्याने त्याच्याकडे धाव घेतात. स्वागतार्ह फटाके, नागरे आणि वाद्ये वाजवली जातात . ह्या अचानक आलेल्या प्रगतिशील सभ्य समाजाच्या अभिनंदनाची रीत न समजलेला तो आदिमानव, चित्र विचित्र ध्वनी काढून गुहेत लपून बसतो. ते ध्वनी ऐकून आणि मानवाच्या सुमधुर वाद्यांमुळे भेदरलेले वन्य प्राणी स्वागत गटावर सपाटून हल्ला चढवतात . कसाबसा जीव वाचवून माता पिता , गावकऱ्यांसोबत गावात परततात . रात्री स्वामीजी आणि शास्त्रज्ञांसमोर सभ्य माणसांचा तो कळप फुत्कारलेल्या जीभानी त्या आई वडिलांवर शाब्दिक हल्ला चढवतो . उन्माद अवस्थेत गेलेल्या त्या समूहाला कोणत्या सिद्धीने अभिमंत्रित करावे हे साधूला आणि कोणती थेरेपी वापरावी हे वैज्ञानिकाला न उमगल्याने दोघेही शांत राहतात . तरीही दोघे दिलेल्या वाचनाला जागून त्या वनमाणसाला आपण स्वतः जाऊन मानवी सभ्यतेचे ज्ञान देऊ व तो माणसात येईपर्यंत गावातल्या आपल्या तात्पुरत्या निवासात ठेवू ,असे आश्वासन देतात.
दुसऱ्या दिवशी उंची गाड्यांचा ताफा , शिष्यगण सोबत न घेता स्वामी व शास्त्रज्ञ वनात जातात . आत्मसिद्धिच्या जवळ जाऊ पाहणारे, ते दोन बुद्धीजीवी त्या वन्यजीवाशी सहज जवळीक साधतात . स्वामी अभिमंत्रित करून आणि शास्त्रज्ञ थेरेपी वापरून त्याला मानवी सभ्यतेचे धडे देतात थोडेफार शास्त्र व भाषा ज्ञान ही देतात . अशाप्रकारे, त्याच्या मनोवृत्ती थोड्या शांत झाल्यावर त्या अज्ञ जीवाला सुज्ञ समाजात घेऊन येतात . येण्यापूर्वी जर आपल्याला ते राहणीमान आवडले आणि आपल्या मनातील उरलेल्या शंकांचे समाधान झाले, तरच आपण पुढारलेल्या जगाचा स्वीकार करू . अन्यथा वनात परत जाऊ अशी सोपी अटही तो दोघांसमोर ठेवतो . सोयीसुविधांनी झगमगणाऱ्या आधुनिक जगाची नवंतारुण्याला भुरळ न पडेल तर नवल! म्हणून दोघे अट मान्य करतात .
जंगलातून शहरापर्यंत दूरचा प्रवास करून थकलेल्या दोन गुरुंसाठी आधुनिक शहरात पाणवठा शोधण्यासाठी धावणाऱ्या , त्या अप्रगत जीवाला मॉलबाहेर छोट्या बाटल्यांमध्ये पाणी दिसते. तो असभ्य पणे त्याला हात घालणार , तोच दोघे त्याला अडवतात. पाणी असे घेता येत नाही . या शुद्ध पाण्याचे मूल्य द्यावे लागेल. निसर्गाकडून शुद्ध स्वरूपात मिळणारे नैसर्गिक स्त्रोत मानव अशुद्ध करून, पुन्हा शुद्धतेची प्रक्रिया करतो का ? आणि त्याचे मूल्य घेतो का ? या प्रश्नावर दोघेही निरुत्तर राहतात . त्याला उंची कपडे घ्यावेत , त्याचे रूप सुधारावे म्हणून विकतचे पाणी पिऊन तिघे मॉल मध्ये शिरतात. तेथे फिरणारी कमी कापड्यातली माणसे पाहून , आपण कपडे का खरेदी करत आहोत ,या प्रश्नावर देखील दोघे निरुत्तर राहिले.
मॉल मधील सरकते जिने , स्वयं चलीत सामान वाहक यंत्रे , उदवाहने(लिफ्ट) पाहून हे काय , या प्रश्नावर शास्त्रज्ञ ,मानवाचे श्रम वाचवण्यासाठी मानवाने केलेली ही प्रगती आहे , असे सांगतो . पुढे अत्याधुनिक जिममध्ये ट्रेड मिल , सायकलवर घाम गाळणाऱ्या माणसांना पाहून , हे श्रम कशासाठी, या प्रश्नावर मात्र दोघे विचारवंत मौन धरतात . मॉल बाहेरच्या झगमगाटी रस्त्यांवर आणि वस्त्यांमध्ये मनुष्य देहाची, स्त्री देहाची विटंबना पाहून द्रवलेला तो वन पुरुष हे काय, हा प्रश्न देखील विचारत नाहीं . भूक लागल्यावर उंची हॉटेलात अनेक मांसहाराचे पदार्थ display मध्ये प्रथमच पाहून , तो शिकारी मानव अवाक होतो . त्याचे ज्ञान वाढत आहे तो माणसाळत आहे , हे पाहून दोघे अतरंगी आनंदी होतात. अंती तो वन्य जीवन त्यागून मानवी संस्कृतीचा स्वीकार करेल व आपल्या वचनाची पूर्तता होईल, हे जाणुन दोघे सुटकेचा निःश्वास सोडतात . त्या नवतरुणाचा निर्णय ऐकण्यासाठी माता पित्यासह अक्खा गाव जमतो. सुसंस्कृत मानवी समाजासमोर तो वनवासी ठाम पणे उभा राहतो. मी तुमच्या मानवी समाजात राहू इच्छित नाही. कारण येथे आल्यावर माझ्या सिमीत असलेल्या इच्छा आणि गरजा अपरिमित होतील . जंगलात देहाची फक्त शारीरिक शिकार होते , पण येथे देहाची नाना प्रकारे हत्या आणि विटंबना होते. देह धारण आणि निर्वाह करण्यासाठी आपल्या क्षमता आणि मर्यादांचे भान राखुन निष्काम कर्म करणारा , विशुद्ध आत्मा इतकीच माझी ओळख वनवासात आहे ,अनेक उपाधी नाहीत . यापेक्षा जास्त प्राप्तीची लालसा नाही . मानवी जीवनाची सार्थकता याहून काही भिन्न असेल आणि ती मला तुम्ही पटवून दिलीत तर मी नक्की थांबेन.
अनासक्ती , सुख दुःखात स्थिर राहणे , अतरंगी आनंदाची अनुभूती हीच खरी आत्मजागृती हे अंतिम ज्ञान साधूला प्राप्त झाल्याने वनात परत जाणाऱ्या मुलाकडे पाहत साधू शांत पणे उभा राहतो.
मास्लोच्या उपपत्ती theory मधील महत्त् प्रयासानेही अप्राप्त अशी , स्व -जाणीव (self actualization ) आणि मानवी मनातील अबोध इदम आणि इदचे अव्यक्त केंद्र जाणणाऱ्या , खरा आत्मबोध झालेल्या, त्या मुलाला जाताना पाहून शास्त्रज्ञही स्तिमित राहतो .
सुखसोयी आणि समृद्धी म्हणजे मानवी सभ्यता नव्हे. सभ्य असणे ही मनोवृत्ती आहे . तिचा विकास आणि परिपोष ही संस्कृती . याची जाणीव माता पित्यांना आणि गावकऱ्यांना झाल्याने , तेही सुन्न होऊन मुलाच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत राहतात.
© पूर्णा गंधर्व