भुरळ संदिप खुरुद द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भुरळ

भुरळ

आज विकास खुप खुष होता. त्याच्या ऑफीस मधील माधुरीने त्याच्याकडे हसून पाहिले होते. आणि तिची ती नजर प्रेमळ होती हे त्याच्या लक्षात आले होते.

विकास व माधुरी एकाच ऑफीसमध्ये काम करत आहेत. साधारणत: पाच महिन्यांपुर्वी माधुरी त्याच्या ऑफीसमध्ये जॉईन झाली होती. पहिल्याच दिवशी ती ऑफीसमध्ये आली होती. ऑफीसमध्ये येताच ती पहिल्यांदा विकासलाच बोलली होती. लाल रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये तिचा गौर वर्ण उठून दिसत होतं. तिचा आवाज खूप मंजूळ होता. तिचे काळेभोर केस, मोत्यासारखे पांढरे शुभ्र दात, लिपिस्टीक न लावताही डाळींबासारखे लाल चुटुक दिसणारे ओठ, पाणीदार,रेखीव,सुंदर डोळे, तिचा उठून दिसणारा कमनिय आकृतीबंध पाहूनच विकास भान हरवून गेला. ती त्याला काही तरी विचारत होती पण तो तिचेच सौंदर्य न्याहळत होता.

तिने विकासला विचारले,

"सर! साहेबांची केबिन कोठे आहे?"

त्याने तिच्या चेहऱ्यावरील नजर किंचितही ढळु न देता साहेबांच्या केबिनकडे बोट दाखवले. 'थँक्स' म्हणून ती साहेबांच्या केबिनकडे गेली.

थोडा वेळाने ती बाहेर आली.तिने शिपायाला विचारले,

"विकास सर ?"

शिपायाने विकासकडे बोट दाखवले. ती विकासकडे आली. तिने विकासच्या हातात काहीतरी कागद दिला.

विकासने तो कागद न्याहाळला. आणि तो खूप खूष झाला. कारण ती सुंदरी आता त्याच्याच ऑफीसमध्ये जॉईन होणार होती. आणि तिचे सौंदर्य त्याला रोजच पाहता येणार होते.

ती,"साहेबांनी मला जॉईन करून घ्यायला सांगीतले आहे."

"हो. जॉईन करून घेऊ ना. पण पेढे आणले का?" विकासने तिला हसतच विचारले.

ती," ओ…सॉरी. गडबडीत आले. पण उद्या नक्की आणते."

इतका वेळ तिचे सौंदर्य पाहण्याच्या नादात विकासचे तिच्या सोबत आलेल्या इसमाकडे लक्षच नव्हते. तो इसमही तरुण होता. दिसायला देखणा होता. नक्कीच तो तिचा भाऊ किंवा पती असावा, असा कयास विकासने स्वत:च्या मनाशीच बांधला.

"हे कोण आहेत?" विकासने त्या इसमाकडे बोट दाखवून माधुरीला विचारले.

"हे माझे मिस्टर आहेत." तिने सांगीतले.

क्षणभर विकासच्या कपाळावर आठया पडल्या.पण त्याने स्वत:ला सावरले. त्या इसमाने विकासला नमस्कार करुन स्वत:चा परिचय करून दिला." हाय, मी योगेश." विकासनेही त्याला नमस्कार करत स्वत:चा परिचय करून दिला.थोडा वेळ थांबून योगेश तेथून निघून गेला.

माधुरीसाठी विकासने खुर्ची आणि टेबलची व्यवस्था करण्यासाठी शिपायाला सांगीतले. ऑफीसमधील इतर महिला मंडळ माधुरी जवळ जमा झाले. त्यांनी तिला प्राथमिक माहिती विचारायला सुरुवात केली. ऑफीसमधील वातावरण कसं मिळून मिसळून राहण्यासारखं आहे ते सांगीतले. ती इतर बायकांशी बोलत होती. काही पुरुष मंडळीही तिला नाव,गाव,शिक्षण विचारत होती. ती सर्वांना उत्तरे देत होती. ऑफीस मधील खेळीमेळीचे वातावरण पाहून तीही मनोमन सुखावली होती.

विकासचा त्या दिवशीचा पूर्ण दिवस फक्त तिचे सौंदर्य न्याहाळण्यात गेला. ती ऑफीसमधून गेली. तो दिवसही गेला पण त्याच्या मनातून ती गेली नव्हती. काही तरी हरवल्यासारखं त्याला वाटत होतं.आणि त्याच्या लक्षात आलं.त्याचं हदयच हरवलं होतं.कारण माधुरीच्या सौंदर्याची, तिच्या वागण्या-बोलण्याची जादू त्याच्यावर झाली होती. आणि स्वत:चे लग्न झाले असतानाही तो त्याचे हदय हरवून बसला होता.

घरी गेल्यावर फ्रेश होवून तो रुपाला काही न बोलताच बेडरुममध्ये गेला. तो बेडवर जावून शांत पडून राहिला. तेवढयात त्याचा चार वर्षाचा मुलगा 'वीर' त्याच्याजवळ आला.

"पप्पा! आज मला सायकल आणणार होता ना?"

"अरे हो. विसरलोच मी.उद्या नक्की आणतो हं." असे बोलून त्याने वीरचा गालगुच्चा घेतला.

तेवढयात तेथे रुपा आली.

रुपाला पाहून वीर रडक्या स्वरात बोलला, "मम्मा!बघ ना. आज पण पप्पाने सायकल आणली नाही."

विकास त्याला जवळ घेत बोलला, "उद्या नक्की आणतो बाळा."

रुपा वीरला उचलून घेत विकासला बोलली,

"आज आपण बाहेर जेवायला जाऊयात.आणि येताना वीरला सायकल पण घेऊ."

माधुरीला पाहिल्यापासून विकास आनंदातच होता. त्यानेही तिला लगेच होकार दिला.

तिघेजण डायमंड हॉटेलमध्ये जेवायला गेले. आणि काय आश्चर्य? माधुरी, तिचा पती व तिच्या दोन वर्षाच्या मुलीसोबत आली होती. ती विकासच्या बाजूलाच असलेल्या टेबलजवळ बसली. दोघांनी एकमेकांना पाहिले. नमस्कार घातला. जेवण होईपर्यंत विकासचे जेवणाकडे लक्षच नव्हते. तो चोरून माधुरीला पाहत होता. ती तिच्या फॅमीलीमध्ये गुंग होती. वीरला सायकल घेवून विकास आणि रुपा घरी आले. वीर खूप खूष होता. घरी येताना विकासला अस्वस्थ वाटत होतं. रात्रीचे दोन वाजले होते. तरी त्याला झोप येत नव्हती. बराच वेळ तो तिच्याच विचारात होता.

आता तिच्या सहवासात राहून त्याला तिच्यावर गहिरं प्रेम झालं होतं.तिच्या सौंदर्याची त्याला भुरळ पडली होती. तो ऑफीसमध्ये खूष असायचा.घरी आल्यावर अस्वस्थ व्हायचा. रात्री तो तळमळत असायचा. कधी एकदा सकाळ होते? आणि कधी मी ऑफीसला जातो? असे त्याला व्हायचे.

ऑफीसमध्ये असताना काम समजावून सांगण्याच्या बहाण्याने तो सतत तिच्या जवळ जायचा. तिला बोलण्याचा प्रयत्न करायचा. तिलाही नविन-नविन काम जमत नसल्याने कोणाची तरी मदत हवीच होती. आता त्या दोघांची जवळीक खूपच वाढली होती. ऑफीस स्टाफच्याही ही गोष्ट लक्षात आली होती. त्यांच्या मागे ऑफीसमधील इतर कर्मचाऱ्यांमध्ये कुजबुज असायची. विकास तिची खुप काळजी घ्यायचा. तिच्या सुख-दु:खात सहभागी व्हायचा. माधुरीलाही आता विकासचा स्वभाव आवडु लागला होता. तो आपल्याला सतत मदत करतो. आपली काळजी घेतो,या विचाराने माधुरीही त्याच्याशी जवळीक साधत होती.

समाजात काही पुरुष असे असतात, जे स्त्रियांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी जवळीक साधतात, त्यांची खूप काळजी असल्याचे दाखवतात. सहाजिकच स्त्रियांना तो परपुरुष आपल्या नवऱ्यापेक्षाही जवळचा वाटु लागतो. आणि त्यांना त्याची भुरळ पडते. माधुरीलाही विकासची भुरळ पडली. आणि ती विकासच्या प्रेमात पडली. आणि म्हणूनच विकासने थोडावेळापुर्वी तिच्या व्हॉटस्अपवर व्यक्त केलेल्या प्रेम भावनांना तिने त्याच्याकडे हसून पाहत उत्तर दिलं होतं.

आता ते दोघेही एकाच वेळी रजा टाकून फिरायला जाऊ लागले. सुट्टीच्या दिवशीही काम असल्याचा बहाणा करून ऑफीसला येऊ लागले. आपण विवाहीत असून आपल्याला मुल सुद्धा आहे. याचा पण त्या दोघांना विसर पडला होता.

माधुरीचा नवरा गावाकडे गेला होता. त्या रात्री ऑफीसला खूप काम असल्याचे रुपाला सांगून विकास माधुरीच्या घरी गेला. दोघेही आज पहिल्यांदाच एकमेकांच्या बाहुपाशात अडकले. लग्न करताना केवळ आपल्या पती-पत्नीशी एकनिष्ठ राहण्याचे वचन मोडून त्यांनी आपले सर्वस्व एकमेकांना अपर्ण केले. आपण आपल्या साथीदारांना धोका देवून अक्षम्य पाप करत आहोत. याचा त्या दोघांनाही विसर पडला होता. कितीतरी दिवसांपासून अतृप्त असलेले मन तृप्त झाल्यावरच विकास आपल्या घराकडे निघाला. रात्री सव्वाएक वाजता तो घरी आला. त्याने बेल वाजवली.

डोळे चोळत रुपाने दरवाजा उघडला. समोर विकास दिसताच ती बोलली.

"किती फोन केले मी तुम्हाला? फोन लागला नाही तुमचा."

"मोबाईल डिस्चार्ज झाला होता."

"मग मला कोणाच्या तरी फोन वरुन कॉल करून सांगायचे नाही का? किती काळजी करत होते मी?जेवण सुद्धा केले नाही तुमची वाट पाहत तशीच झोपी गेले."

विकासने माधुरीच्या घरीच जेवण केले होते. तरी तो म्हणाला, "हो ना. मला खुप भुक लागली आहे. पण आता खुप उशीर झाला आहे. चल झोपूयात."

विकासने जेवण केले होते. पण त्याच्यावर स्वत:च्या जिवापेक्षाही जास्त प्रेम करणारी रुपा तशीच उपाशी झोपली.विकास आपल्या पगारातील बरेचशे पैसे माधुरीसाठी खर्च करत होता.आपली प्रेमळ सुशील,सुंदर पत्नी व आपल्या गोंडस मुलाकडे तो दुर्लक्ष करू लागला.त्यांचे संबंध दोन-तीन महिने व्यवस्थित चालले. काही दिवसांतच माधुरी त्याला पैसे मागु लागली. विकासलाही आता तिच्यात पहिल्यासारखा इंटरेस्ट राहिला नाही. त्याने तिला बोलणे हळूहळू सोडले.

एके दिवशी योगेशचा विकासला फोन आला. त्याने विकासला एके ठिकाणी भेटायला बोलावले. विकास त्याने सांगीतलेल्या ठिकाणी भेटायला आला. योगेश तेथे येवून थांबलेलाच होता. विकासच्या मनात धाकधुक होत होती. त्याला वाटत होतं नक्की योगेशला माधुरीच्या व आपल्या प्रेमसंबंधा बद्दल माहित झालेले असणार. आणि त्याचा अंदाज खरा ठरला. योगेशला त्याबद्दल माहित झालं होतं. त्याने माधुरीचा मोबाईल सोबत आणला होता. माधुरी व विकास मध्ये हॉटस्अपवर झालेले संभाषण त्याने विकासला दाखवले.

विकास भितच त्याला म्हणाला, "सॉरी चुकलं माझं."

योगेश त्याला रागातच बोलला,"स्वारी म्हणल्याने माझ्या पत्नीचं झालेलं शीलहरण परत येणार आहे का?"

विकास, "मला माफ करा.हवे तर मी तुम्हाला खूप पैसे देतो."

"पैसे घेवून पत्नीच सौदा करायला मी काय दलाल वाटलो का तुला?" तो आणखीनच रागात बोलला.

आता मात्र विकास खूपच घाबरला.

योगेश परत बोलला, "आता बायकोच्या बदल्यात मला एका रात्रीसाठी तुझी बायको द्यावी लागेल."

आता मात्र विकास चिडला. योगेशची गचांडी धरून तो त्याला बोलला, "जीव घेईन तुझा असं परत बोलशील तर."

त्याच्या रागावर हसत त्याचा हात झटकून योगेश बोलला, "मग मी पण तुझा जीव घ्यायला पाहिजे. पण मी तसं करणार नाही. तुझा जीव घेवून माझा बदला पूर्ण होणार नाही. त्यासाठी मला तुझ्या बायकोचे चारित्रहरण करावे लागेल. विचार कर. मी माधुरीला समजावून सांगीतले आहे. प्रेमाच्या जाळयात तु तिला ओढून तिची फसवणूक केलीस म्हणून मी पोलीस मध्ये तक्रार करणार आहे. बघ आता तुला काय मंजूर आहे." एवढे बोलून तो निघून गेला.

आता मात्र विकासच्या तोंडचं पाणी पळालं. माधुरीच्या सौंदर्याची भुरळ पडून आपण आपल्या प्रेमळ पत्नीलाही विसरलो याचा त्याला पश्चाताप झाला. तो घरी गेला.रुपा जेवणासाठी त्याची वाटच पाहत होती. त्याची इच्छा नसताना तिने त्याला बळेच जेवायला बसवले,प्रेमाने घास भरवला. तिच्या प्रेमाने त्याला गहिवरून आले. जेवण होतं का नाही तोवर योगेश विकासच्या घरी आला. त्याला पाहताच विकासच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. पण तो काहीच करू शकत नव्हता. कारण सगळी चूक त्याचीच होती.

"नमस्कार!मी पाहुण्यांच्या घरी चाललो होतो. म्हणलं जाता-जाता तुमच्या घराकडून जावं." विना परवानगी आत येत योगेश बेरकी हसत म्हणाला.

विकासने उसणं हसु चेहऱ्यावर आणत त्याला आत बोलावलं.

योगेश आत येवून बसला. विकासने रुपाला नाईलाजाने त्याच्यासाठी चहा करायला सांगीतले. चहा करण्यासाठी रुपा आतमध्ये गेली. वीर जवळच खेळत होता.

"वहिणी खुप सुंदर आहेत." विकासकडे हसत पाहत खोचकपणे योगेश बोलला.

विकासला त्याचा खुप राग आला. पण तो काहीच करू शकत नव्हता.

तितक्यात रुपा चहा घेऊन आली. रुपाने योगेशच्या हातात चहा दिला. त्यावेळी त्याने अत्यंत अश्लीश नजरेने तिच्याकडे पाहिले. त्याची ती जालीम नजर रुपा आणि विकासच्याही लक्षात आली. रुपा कामाच्या बहाण्याने किचनमध्ये गेली.

माधुरीच्या पतीने चहा पिवून कप टेबलवर ठेवला. आणि तो जाता-जाता मुद्दाम रुपाला म्हणाला,"वहिणी येतो परत."

तो गेल्यावर रुपा बाहेर आली. विकासला म्हणाली, "काय माणूस आहे हा? किती पापी नजर होती त्याची? आता त्याला कधी आपल्या घरी येऊ देवू नका."

विकासने फक्त मान डोलावली.

रात्रीचे एक वाजले होते. रुपा आणि वीर झोपले होते. विकासला झोप येत नव्हती. तो उठून बसला. त्याने मोबाईल नेट चालू केले. व्हॉटसअप पाहिले. योगेशने त्याच्या व्हॉटस्अपवर माधुरी व विकासच्या चॅटींगचे स्क्रीनशॉट पाठवले होते. आणि आता उद्या मी वहिणीला पाठवणार आहे. असा मेसेज केला होता.

विकास उठून घराच्या टेरेसवर आला. झालेल्या गोष्टीचा त्याला पश्चाताप होत होता. आपल्या डोळया देखत आपल्या पत्नीवर कोण्या पर पुरुषाने प्रेम करावे,ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती.

मग आपण काय केले? आपणही एका परस्त्रीवर तिचा पती असताना आणि आपणही विवाहीत असताना प्रेम केले. प्रेम कसले? फक्त वासना होती ती. आपल्या प्रेमळ पत्नीला आपण धोका दिला आहे. आपल्या पत्नीनेच आपल्याला धोका देवून कोण्या पर पुरुषा बरोबर प्रेम संबंध ठेवले असते तर आपण जगु शकला असतो का? तिला जर आपल्या लफडयाविषयी माहित झाले तर तिला काय वाटेल? हे विचार आपण आधीच करायला पाहिजे होते. पण आपल्याला माधुरीच्या सौंदर्याची भुरळ पडली होती. तिच्या सौंदर्यापुढे आपल्याला आपला सुखी संसारही दिसला नाही.या विचारांनी तो व्याकुळ झाला. आता सर्व संपलं आहे. या विचाराने त्याने मन घट्ट केले. तो टेरेसवर अगदी कडेला उभा होता. त्याने खाली पाहिले. चौथ्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर आपण वाचणार नाही. हे त्याला माहित होतं. त्याने मनाचा निगृह केला. आणि स्वत:ला खाली झोकून दिलं. क्षणार्धात तो जमिनीवर धाडकन आपटला. आणि त्याने तडफडत जगाचा निरोप घेतला.

दुसऱ्या दिवशी पोलीस आले. पंचनामा झाला. पोलीसांच्या तपासात विकास व माधुरी यांचे प्रेम संबंध असल्याचे निष्पन्न झाले. तसेच विकास,माधुरी व योगेशच्या मोबाईलचे व्हॉटसअप मेसेज व संभाषणावरून योगेशनेच विकासला आत्महत्त्या करण्यासाठी परावृत्त केल्याचे सिद्ध झाले.

दोन्ही कुटुंबाचा सुखी संसार चालू असताना एखाद्या जोडीदाराच्या चुकीच्या पावलामुळे त्याच्यासहीत कुटुंब उद्ध्वस्त होतं हे पुन्हा एकदा जगाच्या समोर आले.

-संदिपकुमार