सकारात्मक ऊर्जा संदिप खुरुद द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सकारात्मक ऊर्जा

अजीतने पटकन गाडीला कीक मारली,आणी तो वेगाने अमरच्या खोलीकडे निघाला कारण दोन मिनीटांपुर्वीच अमरचा मेसेज आला होता. ‘मी आत्महत्या करत आहे.’अजीत आणी अमर खुप जवळचे मित्र होते. त्यामुळे अजीतला अमरची सगळी माहिती होती. अमरची आणी त्याची सहा महिन्यांपुर्वीच मैत्री झाली होती. अमर एका खेडेगावातून शहरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आला होता. त्याची घरची परिस्थीती खुपच हलाकीची होती. गावाकडे मोलमजुरी करुन त्याचे आई-वडील त्याला पैसे पाठवायचे. अमरही अभ्यासात खुपच हुशार होता. तो ही खुप मेहनत घेत होता. त्याची हुशारी आणी मेहनत पाहूनच अजीतने त्याच्या सोबत मैत्री केलेली होती. अजीत त्याला वेळोवेळी आर्थीक मदत करत होता. त्या दोघांची प्रगाढ मैत्री होती. अगदी काही दिवसांपुर्वी अमरचा चांगला अभ्यास चालला होता आणी अचानक त्याच्या जीवनात एक मुलगी आली. ‘वृषाली’ नाव तिचं. ती मुलगीही क्लासमध्ये अमरची हुशारी पाहून त्याच्या प्रेमात पडली होती. आणी तिनेच आपणहून त्याच्याजवळ प्रेम व्यक्त केले होते. काही दिवस खुपच छान गेले. आणी एके दिवशी अचानक तिचा फोन आला. आणी ती म्हणाली, “माझ्या भावाने माझा मोबाईल तपासला आणी त्याला आपल्या नात्यांविषयी माहीत झालं. त्याने वडीलांना सांगीतले आणी वडीलांनी खुपच टेंशन घेतले. त्यांना दवाखान्यात ॲडमीट करावे लागले याला मीच कारणीभुत आहे. त्यांनी माझ्यासाठी मुलगा पाहूनच ठेवलेला आहे. ज्यावेळेस मी त्यांना होकार दिला त्यावेळेसच त्यांच्या जीवात जीव आला. त्यामुळे मला माफ कर मी तुझी नाही होऊ शकत.” आणी..... ‍तिने फोन ठेवून दिला.


त्या घटनेला आता जवळ जवळ दीड महिना होवून गेला होता. ‍तिचे लग्नही झाले होते. पण ती त्याच्या मनात कायमच होती. त्याला सगळीकडे तीच दिसत होती. आता तिच्याविना जगणे त्याला नकोसे झाले होते. त्यामुळे त्याचा अभ्यासही सुटला होता. दिवस रात्र तो तिच्याच ‍विचारात असायचा. त्याला त्या एका व्यक्तीमुळे दुनियेचा विसर पडला होता. त्याला त्याच्या घराचा विसर पडला होता. आई-वडीलांचा विसर पडला होता. तो न भेटणाऱ्या फळाची अपेक्षा करत होता. आणी अशातच दोन दिवसांपुर्वी त्याच्या बाजूच्याच रुममध्ये रात्री दरोडा पडला होता. आणी त्या दरोडेखोरांनी त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा खुन केला होता. दोन लहान मुले आणी त्याची बायको उघडयावर आले होते. त्यामुळे तर अमरच्या मनात सर्व जगाविषयी तिरस्कार ‍निर्माण झाला होता. कालच तो अजीतला म्हणाला होता. “हे सगळं जग मला निरस वाटु लागलं आहे. येथील प्रत्येक माणूस स्वार्थी आहे. कोणी कोणाचा नाही.” त्याच्या मनामध्ये जगाबद्दल तीरस्कार निर्माण झाला होता. तो फक्त अजीत जवळ व्यक्त व्हायचा आणी त्याची अशी दशा पाहून अजीतचंही हदय ‍पिळवटून निघायचं.


अजीत आता त्याच्या खोलीजवळ आला होता. त्याची खोली दुसऱ्या मजल्यावर होती. त्याचे रुम पार्टनरही गावाला गेले होते. आणी अमर एकटाच रुममध्ये होता. अजीतने लांबूनच पाहीले खोलीचे दार बंदच होते.मात्र ‍खीडकी उघडी होती. अजीतला तिथ पर्यंत यायला दहा मिनीटे लागली होती. अमरने जीवाचं बरं-वाईट केले नसेल ना या कल्पनेनेच त्याच्या अंगावर शहारे आले. त्याने खीडकीतून डोकावून पाहीले. वर दोर बांधलेला होता, जवळ चाकु होता आणी अमर खाली मान घालून रडत होता. अमरने अजून पर्यंत काही केले नव्हते ते पाहून अजीतच्या जीवात जीव आला.


त्याने बाहेरूनच त्याला हाक मारली. त्याला पाहून अमर आणखीनच जोरात रडु लागला. अमरने दरवाजा उघडला. अजीतने त्याला घट्ट मीठी मारली. अमर म्हणाला, “ मरण्याचा प्रयत्न केला पण माझी हिंमत होत नाही. पण मला मरायचं आहे, जगायचं नाही?”


अजयला माहीत होतं या चार भींतीच्या आत राहून अमरचं मन हलकं होणार नाही. त्याने त्याला आवरायला सांगीतले, आणी म्हणाला, “चल बाहेर जावून बोलुयात आपण.” आता ते दोघेही बाहेर आले होते. दुपारचीच वेळ होती. श्रावण महीना चालु होता. सगळीकडे हीरवळ होती. महादेवाची मंदिरे गजबजलेली होती. अजय अमरला घेवून अशाच एका डोंगरातल्या महादेवाच्या मंदिराकडे निघाला. वाटेत जाताना हिरवळ पाहून अमरच्या मनाला उल्हास आला. डोंगरातून वाहणारे अवखळ झरे पाहून त्याच्या कोमेजलेल्या मनाला आनंद होत होता. दोघेही महादेवाच्या पाया पडले. थोडावेळ अमर तेथे रमला पण तेथील गर्दीतही त्याला एकटेपणा जाणवला. अमरचे हे भाव त्याच्या जीवलग मीत्राने अजीतने ओळखले. ते दोघेही दूर एका झाडाखाली बसून लांबूनच गर्दी पाहु लागले.


तेव्हा अजीतने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, “ तु आज आत्महत्या करणार होतास. तुला जर काही झालं असतं तर तुझ्या आई-वडीलांनी कोणाकडे पाहून जगायचं होतं? लक्षात ठेव लहान मुलाचे आई-वडील त्याच्या लहाणपणी वारणे आणी आई-वडील म्हातारे असताना त्यांचा तरुण मुलगा जाणे हे जगातील सर्वात मोठे दु:ख आहे. ती गेली तुला सोडून. कदाचीत तुझ्या नशीबात तिच्यापेक्षा सुंदर, सुशील मुलगी असेल म्हणूनच ती तुला भेटली नाही. तुला तीच्यापेक्षा सुंदर मुलगी भेटेल पण एकदा तु गेलास तर तुझ्या आई-वडीलांना कोण आहे? जीवनात येऊन तु तुझ्या आई-वडीलांना समाधान नाही देवु शकलास तर तुझा काय उपयोग?” त्यांना समाधानी करण्यासाठी तुला फक्त यशस्वी व्हायचयं कारण कोणत्याही आई-वडीलांना आपला मुलगा यशस्वी झाला यातच समाधान असतं.”


अजीतचे बोलणे ऐकून त्याच्या मनातील भाव बदलु लागले. त्याच्या लक्षात आले आपण खुप मोठी चुक करत होतो. आपण जर असे करुन आपल्याच जन्मदात्या आई-वडीलांना आयुष्यभरासाठी दु:खाच्या खाईत लोटलं असतं तर हे पाप कोठे फेडलं असतं.


तेवढयात अजीत उठला. अमर म्हणाला, कोठे चाललास?”


अजीत म्हणाला, “थांब मी आपल्याला खायला काकडी घेवून आलो.”


अजीत दहा-पंधरा पावले चालत गेला तोच त्याला चक्कर आल्यासारखे झाले आणी तो खाली पडला. तो पडलेला पाहताच अमर त्याला उठवण्यासाठी पळाला. तेवढयात तेथील आसपासचे लोक त्याच्याकडे पळत आले. कोणी त्याला हवा घालु लागले, तर कोणी त्याच्या चेहऱ्यावर पाणी शींपडले. एक जणाने त्याला पाणी पाजले. अमर आपल्या मीत्राला उठवण्याचा प्रयत्न करत होता. थोडया वेळाने अजीत उठला. लोक त्याची आस्थेवाईकपणे चौकशी करत होते. त्याच्या आईच्या वयाच्या एका अनोळखी बाईने त्याला विचारले, “बाळा, कुठे लागले तर नाही ना तुला? अजीतने त्या माऊलीकडे हसत पाहत नाही म्हटले. अमरच्या काहीच लक्षात येईना आपल्या मीत्राला अचानक काय झाले?


आता अमर गाडी चालवत होता.आणी अजीत त्याच्या पाठीमागे बसला होता. ते दोघे मंदीरापासून त्या गर्दीपासून खुप दूर आले होते. अमरने त्याला विचारले, “तुला अचानक काय झाले होते? त्यावर अजीत म्हणाला, “मी मुद्दामच पडलो होतो. तु लोकांना नाव ठेवत होतास ना? तुला जगा बद्दल तिरस्कार निर्माण झाला होता ना? आता पाहीलेस का जग? मी ज्यावेळेस पडलो त्यावेळेस मला उठवायला किती जण आले? त्यापैकी एकही माझ्या किंवा तुझ्या ओळखीचा नव्हता. फक्त माणुसकी जपली त्यांनी. जगात दोन प्रकारचे लोक आहेतच. पण वाईट माणसांपेक्षा चांगल्या माणसांची संख्या जगात जास्त आहे. आणी त्यामुळेच जग ‍टिकून आहे. पण आपण जगातील फक्त वाईटच पाहतो.”


अजीतच्या या उत्तराने अमरच्या डोक्यात प्रकाश पडला. अगदी काही वेळापुर्वी त्याच्या मनात असणारे नकारात्मक भाव कुठल्या कुठे पळून गेले. तो आता पूर्णपणे सकारात्मक झाला. त्यादिवसापासून त्याने आपल्या सर्व कमजोरी विसरुन आपल्या आई-वडीलांसाठी सकारात्मकतेने मनापासून अभ्यास करु लागला.


तात्पर्य:- अमरच्या दु:खाच्या वेळी त्याचा जीवलग मीत्र अजीत त्याच्या साथीला त्याचा ऊर्जा स्त्रोत बनून राहीला. तुम्हीही तुमच्या जीवनात दुसऱ्याच्या दु:खात त्याची प्रेरणा बना आणी स्वत: दु:खाच्या खाईत असाल तर सर्व दु:ख विसरून आपली ताकद ओळखून आपल्या माणसांसाठी जगा. संघर्ष करा, मेहनत घ्या, नकारात्मकता दूर सारून सकारात्मक व्हा. आणी झुंजार वृत्तीने आपले जीवन संपन्न करा.