“ लिहिताना मी एक हातबॉम्ब तयार करीत आहे याची मला कल्पना ही नव्हती” – विभावरी शिरूरकर (प्रस्तावना -कळ्यांचे निःश्वास)
स्त्रियांचे हक्क आणि त्यांची हतबलता यांचे वास्तव चित्रण करताना त्यांनी हे वाक्य लिहिलं होतं ,वर्ष साधारण 1933 असावं. आज शतकोत्तर मी हेच वाक्य केवळ स्त्रियांसाठी नव्हे पण संपूर्ण मानव प्रजातीविषयी मत मांडताना लिहीत आहे. जो पीडित,उपेक्षित आहे असे कुणीही.समानतेचा मानवतावाद विस्तारणारा आत्मोन्नतीसाठीचा हा संदेश असेल.एका विशिष्ट समूहाला केवळ जन्माधारे कृतक सहानुभूती दाखवून ,वाहवा किंवा वादंग माजविण्याचा आणि त्यातून फुटकळ लाईक्स आणि स्टिकर्स कलेक्ट करण्याचा मला छंद नाही. अत्यंत तटस्थ राहुन कोणत्याही व्यक्ती व प्रजातीचा पक्षपात न करता, केवळ नीतीची (न्याय)बाजू अग्रगणी ठेवणार आहे.
आजही स्त्रियांवर खुलेआम अमानुष अत्याचार होतात, ज्यांचा मी एक माणूस म्हणून तीव्र निषेध करते. जेव्हा कोणावरही अत्याचार , अन्याय होतो, त्या अपराधांमागे विकृत मानसिकता असते. सगळेच पुरुष काही मदांध आणि विकृत मानसिकतेने बरबटलेले नसतात. घरगुती हिंसाचार घडतो तेव्हा ,स्त्री हीच स्त्री ची शत्रू असते अशी कालबाह्य विधाने निषेधार्थ फेकली जातात.(यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीला ठेवणे,टाळी एक हाताने वाजत नाही वगैरे मला ह्या कालबाह्य म्हणी वाटतात) माझ्या मते एक अन्याय करणारा आणि एक पीडित असतो. तेथे स्त्री पुरुष असे निकष न लावता केवळ माणूस म्हणून पहावे. (कायद्याच्या दृष्टीने सर्व समान आहेत येथे व्यवहारात असा अर्थ आहे) खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या कृतीचे माणूस म्हणून मूल्यमापन व्हावे. नैसर्गिकरित्या स्त्री पुरुष यांच्यामध्ये भेद असणारच आहेत. पण म्हणून कुणीही जन्माधारे श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही. मनुष्य देहाची रचना करणाऱ्या रचयित्याने कमी अधिक असा पक्षपात केलेला नाही अशी माझी खात्री आहे.(humam bodyही perfect रचना आहे,हे विज्ञान सुद्धा मान्य करते)
शौर्य ,स्वातंत्र्य, बुद्धिमत्ता, भावनिकता( हळवं होणे,आधाराची गरज भासण) यावर कुणाही प्रजातीचा अधिकार नाही. तो मनोव्यापार आहे. तसेच अन्याय , अत्याचार करणे ही सुद्धा एक मनातील अपप्रवृत्ती आहे. वंश ,प्रजाती(स्त्री /पुरुष) या चष्म्यातून न पाहता तटस्थपणे पाहावे.
शालीनता ,संवेदनशीलता, सज्जनपणा आदी गुण ,कोणतेही अवगुण हे जन्माधारे प्राप्त होत नसतात. आपले विचार,संस्कार, आदर्श वर्तन यांमुळे मनुष्य आदरणीय ठरतो. स्त्री शिक्षण, समान अधिकार, कुप्रथा निर्मुलन यांसाठी लढणारे पुण्यात्मे श्री राजा राम मोहन रॉय,डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे हे थोर पुरुषच होते आणि त्यांना जन्म,संस्कार देणाऱ्या थोर माता ह्या स्त्रिया होत्या. पण त्यांनी कोणत्याही प्राथमिक भेदापलीकडे जाऊन मानवता हे मूल्य जपले.
मनामध्ये असणारी भेद प्रवृत्ती ,द्वेष हा मनुष्याचे अंतर्मन दुर्बल बनवितो. त्याचा हरवलेला विवेक त्याच्या पतनास कारणीभूत ठरतो . तर स्त्री ,पुरूष, अन्य कुणीही स्वतः ला अन्यायग्रस्त, असहाय्य म्हणून पाहणे, सहानुभूतीची अपेक्षा करणे यांमुळे आपले मनः सामर्थ्य कमकुवत होते. लढण्याची प्रेरणा ही बाह्य असू शकते पण मनोबल हे स्वतः तयार करावे लागते. अधिकार, प्रेम यांच्या आधारे ,कुणीही कुणाचं दमन करणे ही अमानुषता. प्रभुता (वर्चस्व) दाखविण्यात खरे सामर्थ्य नाही, निर्बल असणाऱ्याला त्याचा उचित अधिकार देण्यात, त्याला सशक्त करण्यात आदीशक्ती आणि पुरुषार्थ आहे.
माझी वैयक्तिक धारणा म्हणजे ,कोणता वंश ,जाती ,प्रजाती मध्ये जन्म घ्यावा ,हे माझ्या हातात नव्हते. त्यामुळे त्याद्वारा प्राप्त होणाऱ्या बऱ्या/वाईट बाबींबद्दल मी दूषण वा भूषण मानत नाही.त्या प्राथमिक अवस्थेवर मी केव्हाच मात केली आहे.परंतु जे स्वयं प्राप्त आहे ते मात्र अलांछनिय(ज्याची मला लज्जा वाटू नये),शुद्ध असावे असे मला वाटते, जे आपल्या नियंत्रणात असते. माझं जीवन काही सुखनैव नव्हते, नाही. मी जो मनुष्य देह धारण करते त्यातून होणाऱ्या भाव भावनांचे सहर्ष वहन करते. त्यातून मला उणेपण येत नाही. कोणत्याही वृथा दाक्षिण्याचा लाभ घेण्यात मला संतोष नाही. अन्यायाचा सामना करताना समोरच्या व्यक्तीकडे अन्यायी प्रवृत्तीची व्यक्ती म्हणूनच पाहते. त्यासाठी माझ्या स्त्रीत्वाला मी दोष देत नाही. माझे वैयक्तिक अनुभवाचे निकष सार्वत्रिक करून कुणा समस्त प्रजातीला सुष्ट / दुष्ट ठरवत नाही. माझे पुर्व ग्रह माझी दृष्टी कलुषित वा प्रभावित करीत नाहीत.
खरं तर ,मनुष्य असणे हेच एकमेव मूलभूत अस्तित्व मी मानते. अन्याय ,उत्पीडन न करणं किंबहुना पर दुःखाची समअनुभूती हेच माणसातले माणूसपण असे मी मानते.
# पूर्णा गंधर्व