नगीबाचा माळ संदिप खुरुद द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नगीबाचा माळ

सचिनला शेतीची आणी गुराढोरांची लहाणपणापासूनच खूप आवड होती. तो अभ्यास करत करत शेतीच्या कामात आई-वडीलांना मदत करायचा. जनावरे चारायला नेणे हे तर त्याच्या आवडीचे काम. पण गेल्या एक वर्षापासून तो त्याच्या आवडीच्या कामापासून दूर गेला होता. कारण गेल्या वर्षीच त्याची प्राथमिक शिक्षक म्हणून रायगड जिल्हयात नियुक्ती झाली होती.

यंदा तो दिवाळीच्या सुट्टयात गावी आला होता. यावर्षी पाऊसकाळही चांगला झाला होता. त्यामुळे विहीरी, तलाव तुडुंब भरले होते. नद्या-नाल्या, ओढे खळाळून वाहत होते. जनावरांना मुबलक चारा होता. आज सकाळीच त्यानं न्याहरी केली आणी आईनं चिरगुटात बांधून दिलेली भाकरी अन् एक स्टीलचा डबा घेवून तो गोठयाकडे आला. गोठयात सात मोठया गाई, दोन खोंड, दोन बैल आणी तीन कालवडी होत्या. त्यानं सर्व गुरं सोडली. एका मागोमाग गुरं नित्याप्रमाणे आपल्या रोजच्या वाटेला लागली. गोठयातून बाहेर पडताच सचिनने आपल्या मोबाईलवर गाणे लावले. त्याला बालपणीचे दिवस आठवले तो असाच गुरं चारायला जायचा. आज कितीतरी दिवसातून त्याला ते जुने दिवस आठवले होते. आणी तो मनोमन सुखावला.

त्याला त्याचं गाव आणी रानापासून जवळ असलेला शिवापूर आणी हिरापूर च्या शिवेवरील नगीबाचा माळ खुप आवडायचा.त्या माळावर दोन उंचच उंच वडाची झाडं होती. ते झाड तो लहापणापासून पाहत होता. त्या झाडाखाली बसूनच तो जेवण करायचा, त्या झाडांच्या खाली आलेल्या मुळयांवरुन तो भरभर वर चढायचा. त्याच्या इतर सवंगडया सोबत तो त्याच झाडावर सुरपारंब्या खेळायचा. जनावरं चरायला सोडून त्याच झाडाखाली अभ्यास करायचा. त्या झाडापासून काही अंतरावरच एक विहीर होती. त्या विहीरीचं दगडाने बांधकाम केलेले होते. विहीरीमध्ये उतरण्यासाठी एकमेकांना चिटकून पायऱ्या होत्या. जेवण करताना त्याच विहीरीतील पाणी गाडग्यात आणून ते गाडगं झाडाखाली ठेवायचा. विहीरीजवळच्याच दगडी हौदावर गुरांना पाणी पाजायचा. येणारा जाणारा वाटसरु त्या विहीरीचं पाणी पिऊन तृप्त व्हायचा आणी त्या झाडांखाली थोडावेळ विश्रांती घेवून मार्गस्थ व्हायचा. ती विहीर आणी ते डेरेदार वृक्ष पाहून त्याचं मन आणखीनच आनंदून गेलं. क्षणभर तो त्याच्या बापलपणाच्या आठवणीत रमला.

तेवढयात गुरांच्या हंबरण्यानं तो भानावर आला. कोणाचे तरी वीस-बावीस गुरं चरत चरत तेथपर्यंत आले होते. गुराखी ओळखीचा आहे का म्हणून त्यानं मागे वळून पाहिले. तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला कारण गुराखी तो नसून ती होती. तो तिचे सौंदर्य पाहतच राहिला. नुकतीच वयात आलेली, भरदार अंगाची, रेखीव बांध्याची, गव्हाळ वर्णाची, मधाळ बाण्याची, गाबुळलेल्या चिंचेसारखी ती मुलगी पाहताक्षणीच त्याच्या नजरेत भरली.तिला पाहून तो भानच हरवून गेला. तीही त्याच्याकडे चोरटया नजरेने पाहत पुढे गेली. नगीबाच्या विस्तीर्ण माळ रानावर गुरं मुक्तपणे चरत होती. तो दुरून तिलाच न्याहळत होता. ती ही दूरून त्याच्याकडेच पाहत होती. ती त्याच्या गावाच्या विरुद्ध दिशेने आली होती. याचा अर्थ ती नक्कीच हिरापूरची होती असा त्याने मनाशीच तर्क बांधला.

दुपारची वेळ झाली तसं सचिन त्या वडाच्या झाडाखाली जेवायला बसला. त्याने आईने बांधून दिलेली चिरगुटातील भाकरी सोडली. ठेचा, बाजरीची भाकर,कांदा अन् त्या स्टिलच्या डब्यात लोण्याचा गोळा त्याच्या आवडीचंच होतं आज सगळं. ती ही त्या झाडाकडेच आली. त्याच्यापासून थोडया अंतरावर बसली. तिनेही चिरगुटातील भाकरी सोडली आणी तीही जेवण करुन लागली. सचिनची तिला बोलण्याची तिव्र इच्छा होती. पण ती अनोळखी असल्याने बोलायला कशी सुरुवात करावी हे त्याला कळेना. त्याचं जेवण झालं तो विहीरीकडे पाणी पिण्यासाठी गेला. पाणी पिऊन त्यानं गुरांना दगडी हौदावर आणलं. तिचेही गुरं त्याच हौदावर पाणी पिण्यासाठी आले. तिचंही जेवण झालं. ती पाणी प्यायला विहीरीकडे आली. बहुतेक तिला तिखट लागलं होतं. त्यामुळे तिचे लाल ओठ अधिकच लाल दिसत होते. सचिन तिच्याकडेच पाहत होता. तेवढयात तिनं सचिनकडे पाहिलं सचिनने लगेच नजर वळवली आणी तो थोडा दूर गेला. तेवढयात त्याला धप् असा आवाज आला. त्याच्या लक्षात आलं तिच विहीरीत पडली होती. तो पळत विहीरीकडे आला त्याने पाहिलं ती हातपाय हलवत होती.त्याच्या लक्षात आलं बहुतेक तिला पोहता येत नव्हतं. त्याने पटकन विहीरीमध्ये उडी मारली. आणी तिला बाहेर काढलं. तिचं भिजलेलं रुप पाहून तो वेडावून गेला. दोघेही एकमेकांकडे प्रेमळ नजरेने पाहत होते. तिची प्रेमळ नजर त्याच्या डोळयातून तडक त्याच्या काळजात घुसली.

फटफटीच्या आवाजानं ते दोघे भानावर आले. फटफटी फटफट आवाज करत फुफाटा उडवत वेगानं निघून गेली. ती लाजेनं गोरी-मोरी झाली होती.

त्याने नजर मिळवताच ती लाजून खाली पाहत होती.

सचिनने तिला विचारले, "लागलं तर नाही ना तुला?"

तिने नाही म्हणून मान डोलावली.

सचिनने परत विचारले, " तु कुठे राहतेस? आणी तुझे नाव काय?"

तिने खाली पाहतच उत्तर दिले, " मी हिरकणी हिरापूरची. इथंच शेत हाय आमचं."

सचिन म्हणाला, " हो आमचं पण शिवापुरात अलिकडूनच शेत आहे. तुमचे ते नदीच्या वरलंच शेत आहे का?"

तिने होकारार्थी मान हालवली.

"म्हणजे तु बबन मामाची आहे का?

"तिने परत होकारार्थी मान हालवली."

परत सचिन म्हणाला, "तुला लहाणपणीच पाहिलं होतं ना आता मोठी झाल्यामुळे ओळखु नाही आली."

त्याला काहीच उत्तर न देता तिने एकदा त्याच्याकडे पाहून स्मित हास्य केलं आणी ती परत गुरांकडे निघून गेली. तो तिची पाठमोरी आकृती पाहतच राहिला.

दोन-तीन दिवसातच त्या दोघांमध्ये जवळीकता निर्माण झाली. सचिन तिच्या विचारात रात्रभर जागायचा आणी सकाळ होण्याची वाट पाहत बिछान्यावर तळमळत राहायचा.रात्र त्याला वर्षासारखी भासायची. सकाळ झाली की, तो खुष व्हायचा. गुरं सोडून नगीबाचा माळ गाठायचा. तिला यायला थोडा जरी उशीर झला तरी बेचैन व्हायचा. ती दूरवरुन दिसताच आनंदून जायचा. आता ती त्याच्यावळच जेवायला बसायची. ते दोघेही एकमेकांना आपापल्या भाज्या द्यायचे. जेवण झाल्यावर तासन् तास गप्पा मारायचे. एखादा वाटसरु आला की, एकमेकांपासून दूर व्हायचे. तो माणूस निघून गेला की, परत गप्पा मारायचे. आता वाटसरु त्या विहीरीचं पाणी पिऊन त्या झाडाखाली पुर्वीसारखा थांबत नव्हता. ही गोष्ट त्या दोघांनाही चांगली होती. आता तो पूर्णपणे तिच्या प्रेमात पडला होता. तिच्यासाठी काहीपण करायची त्याची तयारी होती. त्याने तिच्याजवळ आपल्या मनातील प्रेम भावना व्यक्त केल्या.

तो म्हणाला, "मी तुझ्याशिवाय जगु शकत नाही. तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे मी."

तिचंही त्याच्यावर प्रेम झालच होतं. तिनेही गालात नाजूक हसूनच त्याच्या प्रेमाचा स्विकार केल्याचा संकेत दिला.

ती पुढे म्हणाली, " मी मेल्यावरही तु माझ्यावर इतकचं प्रेम करशील का?"

तो तिच्या प्रेमात अखंड बुडाला होता. तो म्हणाला,

" तु मेल्यावर मग माझा तरी जगून काय उपयोग? मी पण मरेन."

ती म्हणाली, "सहा महिन्यांपुर्वी आमचं शेत विक्रीच्या वेळेला मध्यस्थी तुझे वडील होते. आणी काही कारणाने सौदा फिस्कटल्यामुळे तुझ्या वडीलात आणी माझ्या वडीलांमध्ये भांडण झाले होते. त्यामळे ते दोघेही आपल्या लग्नाला परवानगी देणार नाहीत. तेव्हा आपण आज रात्रीच पळून जाऊ कारण माझ्यासाठी माझे वडील मुलगा शोधत आहेत."

तिच्या अशा अचानक बोलण्याने तो क्षणभर स्तब्ध झाला. पण त्याला आताच दिलेलं वचन आठवलं मी तुझ्यासाठी काही पण करेन.

तो मागचा पुढचा विचार न करता म्हणाला, "आज रात्री तु इथेच ये मी ही गुरं बांधून गाडी घेवून येतो. मग येथून पळून जाऊ."

आज दिवस मावळायच्या आतच ते दोघेही आपापल्या घराकडे निघाले. सचिनने गुरं दावणीला बांधले आणी वडीलांना म्हणाला, "आबा आज धार तुम्हीच काढा माझा जरा हात दुखतोय."

त्याच्या वडीलांनी होकार दिला.

त्याने कसंबसं जेवण आवरलं. नेहमी प्रमाणे लाईट गेलेलीच होती. भाकर तुकडा खावून माणसं लवकरच झोपली होती. सगळया गावात सामसुम झाली होती. आणी अकराच्या वेळेला सचिन नगीबाच्या माळाकडे निघाला होता. त्याला तिचीच काळजी वाटत होती. इतक्या अंधारात ती कशी येईल? एक तर तिच्या जवळ मोबाईल पण नव्हता. तो नगीबाच्या माळावर त्या वडाच्या झाडाजवळ आला. त्याने गाडीच्या उजेडात लांबूनच पाहिलं. ती तेथेच उभी होती. तिला पाहून त्याच्या जीवात जीव आला. तो गाडीवरुन खाली उतरला. तो जवळ येताच तिने त्याला मिठी मारली. याच स्वर्गीय मिठीची तो गेल्या कित्येक दिवसापासून वाट पाहत होता. तोही देहभान विसरुन गेला. त्यानेही तिला मिठीत घेतले.

सकाळी कोणाच्या तरी ओरडण्यानं त्याला जाग आली. पाहतो तर काय? सकाळ झाली होती. आणी तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता. तो ताटकन उठला. त्याची झोप कुठल्या कुठे पळाली. त्यानं पाहिलं तो पळणारा माणूस सावंताचा बाज्या होता. आता हा आपलं लफडं गावात जावून सांगणार त्या आधी त्याला अडवलं पाहिजे. या विचाराने तो त्याच्या मागे पळू लागला. पण बाज्या खूपच जोरानं पळत होता. सचिन मागून त्याला थांब म्हणून आवाज देत होता. पण बाज्या मागे न पाहताच जोराने पळत होता. तेवढयात इंगळयाचा बाबु समोरुन येताना त्याला दिसला. तो बाज्यापासून थोडयाच अंतरावर होता. आता बाज्याच्या मागे पळण्यात काही अर्थ नाही हे सचिनने ओळखलं. गाडी आणी हिरकणी तेथेच झाडाखाली आहेत हे त्याच्या लक्षात आलं. तो परत माघारी पळत सुटला. तो तिच्याजवळ आला आणी म्हणाला, "चल लवकर आता इथून पटकन निघावं लागेल. रात्री केव्हा झोप लागली ते कळालंच नाही."

ती त्याच्याकडे पाहत हसत होती.

तो चिडून म्हणाला, "हसतेस काय चल लवकर."

ती म्हणाली, "आता आपल्याला कुठे जायचं नाही कायमचं इथेच राहायचे आहे नगीबाच्या माळावर याच वडांच्या झाडावर. तिकडे बघ." म्हणून तिने बोट दाखवले.

तिने बोट दाखवले तिकडे त्याने वळून पाहिले. आणी त्याला धक्काच बसला. कारण वडाच्या खोडात त्याचंच रक्तानं माखलेलं मृत शरीर त्याला दिसलं."

ती म्हणाली, "सहा महिण्यांपुर्वी शेतीच्या सौद्यात तुझ्या वडीलांनी मध्यस्थी केली हे सगळं खोटं होतं. फक्त तु माझ्याविषयी घरात काही सांगु नये म्हणून मी मुद्दामच तसं सांगीतलं. सहा महिण्यांपुर्वी माझं लग्न जमलं होतं. पण चार-पाच दिवस आधीच तुझ्या वडीलांनी माझ्याबद्दल पाहुण्यांना काहीही सांगून माझं लग्न मोडलं. ती गोष्ट मला सहन झाली नाही म्हणून मी याच विहीरीत जीव दिला होता.त्या दिवसापासून मी एकटीच या ठिकाणी भटकत आहे. मलाही कोणाची तरी सोबत हवी होती. खरं तर मी तुझ्या वडीलांचा बदला घेण्यासाठी ही गोष्ट केली नाही. मी ज्या वेळेस तुला पाहिले त्याच वेळेस मला तुझ्यावर प्रेम झालं आणी तु पण माझ्यावर तितकच प्रेम करतोस हे मला कळालं. कारण तु ही माझ्यासाठी काहीही करायला तयार झाला होतास. मग मीच तुला काल आमावस्याच्या रात्री इथे बोलावलं आणी तुझा बळी दिला कारण तु कायम माझाच बनून रहावास म्हणून."

सचिन स्वत:च्या मृत देहाकडे पाहत होता तो मेला आहे याचा त्याला विश्वास वाटत नव्हता. पण त्याच्या लक्षात आलं, बाज्या त्याच्या मृतदेहाला पाहूनच घाबरुन पळाला होता. आता सत्य स्विकारावंच लागणार होतं. आता त्याला तिच्यासोबत नगीबाच्या माळावर कायमचंच राहावं लागणार होतं.

पुर्वी लोकांना तेथे कधी-कधी एकच भुत दिसत होतं. पण आता दोन भुतं दिसतात. आणी लोक आता रात्रीचं काय दिवसासुद्धा नगीबाच्या माळावर जाण्यास घाबरतात.