सुंदर डोळे संदिप खुरुद द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सुंदर डोळे

सुंदर डोळे

सकाळचे नऊ वाजले होते. गणेशला महत्वाच्या कामासाठी बीडहून पुण्याला जायचे होते. तो गडबडीने बसस्थानकात आला. योगायोगाने बीड-पुणे बस उभीच होती. सुदैवानं गर्दीपण नव्हती. वाहकाच्या मागील दोन सिट सोडून तो खिडकीच्या कडेला बसला. चालक व वाहक गाडीमध्ये नव्हते. बहुतेक ते नाश्त्यासाठी कँटीनला गेले होते. हळुहळु माणसं गाडीमध्ये येत होती. दहा-पंधरा मिनीटानंतर चालक व वाहक आले, बस सुरु झाली. बसस्थानकाच्या बाहेर निघताना कोणीतरी हात केल्याने बस थांबली. गणेशने खिडकीमधून दरवाज्याकडे पाहिले. एक पंजाबी ड्रेस मधील कमनीय बांध्याची,चेहऱ्याला स्कार्फ बांधलेली मुलगी लगबगीने बसमध्ये चढली. तिनं आतमध्ये येताच रिकामी जागा शोधण्यासाठी नजर फिरवली. तिची आणी गणेशची नजरानजर झाली. तेव्हा तिच्या डोळयात त्याला ओळखीचे भाव दिसले. ते सुंदर, टपोरे, पाणीदार डोळे त्यानं यापुर्वी कोठेतरी पाहिले होते. तिच्या डोळयात विलक्षण चमक त्याला जाणवली. ती त्याच्या बाजूच्याच रिकाम्या सिटवर बसली.

बस बीड च्या बाहेर आली होती. गणेश तिच्याकडे पाहत होता. तीही अधून-मधून त्याच्याकडे पाहत होती. तो खुप वेळ हे सुंदर डोळे कोठे पाहिले आहेत? ते आठवण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला ते काही आठवत नव्हतं. त्यामुळे त्याचे मन बेचैन होवून गेले. तिला कोठे जायचे आहे? हे गणेशला माहित नव्हतं. पण आता वाहक जवळ-जवळ आला होता. त्यामुळे तिकीट काढताना ते कळणार होतं. तिचंही गणेशकडे लक्ष होतं. कदाचित तिलाही गणेश कोठे जाणार आहे? हे जाणून घ्यायचे होते. दोघांनीही पुण्याचंच तिकीट काढलं होतं. गणेश खुप खुष झाला. आता जवळ जवळ सहा-सात तास ते दोघे एकाच बसमधून प्रवास करणार होते.

बराच वेळ विचार केल्यानंतर गणेशला अचानक काहीतरी आठवल्यामुळे आनंद झाला. तो मनातच खुष झाला. कारण ते सुंदर डोळे कोठे पाहिले होते, ते त्याच्या लक्षात आलं होतं. साधारणत: तीन वर्षापुर्वी तो नोकरीच्या निमित्ताने त्याचे गाव नेकनुर ते बीड प्रवास करायचा. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत तो बीडच्या बसस्थानकामध्ये यायचा. बसमधून उतरुन बसस्थानकामागील रस्त्याने कार्यालयाकडे जायचा. कार्यालयाकडे चालत जाण्यासाठी पंधरा मिनीटे वेळ लागायचा. त्याच सुमारास ही सुंदर डोळयाची मालकीन तोंडाला स्कार्फ बांधून सायकल वरुन अगदी गणेशच्या विरुद्ध दिशेने समोरूनच यायची. प्रत्येक वेळेस तिची आणी त्याची नजरानजर व्हायची. त्याला तिचे ते विलक्षण सुंदर डोळे खुपच आवडले होते. तिची ती जादुई नजर त्याच्या नजरेतून थेट त्याच्या काळजात उतरत होती. बहुतेक ती महाविद्यालयीन शिक्षण घेत असावी. कुठल्यातरी शिकवणीला जात असावी,असा अंदाज त्याने मनाशीच बांधला होता. तो त्या रस्त्याला यायला, आणी ती समोरुन पाठीवर सॅक अडकवून सायकलवर यायला, एकच वेळ यायची. तिच्या विलक्षण सुंदर डोळयांनी गणेश तिच्या प्रेमात पडला होता. तीही नजरेने रोजच त्याला प्रतिसाद देत होती. पण तिने तोंडाला स्कार्फ बांधल्यामुळे त्याला तिचा चेहरा पाहता आला नव्हता.

त्यावेळी त्याला दुसरा व चौथा शनिवार आणी रविवार सुट्टी असायची. तो असाच एका शनिवारी मोटारसायकल घेवून गावाकडून बीडला आला. आज तो तिच्या मागे-मागे जावून ती कोठे राहते? हे पाहणार होता. तो त्या रस्त्याला तिचीच वाट पाहत उभा राहिला. कोणी ओळखीची व्यक्ती आली की, तो त्या व्यक्तीला पाहून न पाहिल्यासारखा करायचा. तेवढयात तिची गुलाबी सायकल आणी गुलाबी ड्रेसमधील गुलाबी स्कार्फ चेहऱ्याला बांधलेली ती त्याला दूरूनच दिसली. आज त्यानेही रोजचेच ऑफीसियल कपडे न घालता, लाल रंगाचा टिशर्ट आणी जिन्स पँट घातली होती. ती त्याच्या जवळजवळ आली. तो तिच्या डोळयांकडेच पाहत होता. तिनं त्याच्याकडे पाहिलं दोघांची नजरा-नजर झाली. त्यानं तिला थोडं पुढं जाऊ दिलं, नंतर तो हळु-हळु गाडी चालवत तिचा पाठलाग करु लागला. तो तिच्या घराजवळ आला. घराजवळच एक स्टेशनरी दुकान होतं. त्या दुकानावर पेन घेण्याच्या बहाण्याने त्यानं तिचं घर चांगलं पाहून घेतलं. तो परत गावाकडे आला. दुसऱ्या दिवशी रविवार होता. आजही तो त्या रस्त्याला आला. पण बहुतेक आज तिला सुट्टी होती. त्याने खुप वेळ तिची वाट पाहिली, पण ती आली नाही. तो तिच्या घराकडे गेला पण ती काही त्याला दिसली नाही. नविन ठिकाणी थांबणंही चुकीचं होतं, म्हणून तो तेथे न थांबता परत गावाकडे आला.

सोमवारी रोजच्या वेळेला तो बसस्थानका मागच्या रस्त्याला आला. तितक्यात, ती समोरून सायकलवर येताना त्याला दिसली. त्याला खुप आनंद झाला. जी व्यक्ती क्षणभरही नजरेसमोरून दूर जाऊ नये असं त्याला वाटत होतं, त्या व्यक्तीला पाहिलेलं जवळजवळ एक दिवसाच्या वर कालावधी उलटून गेला होता. ते दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत होते. दोघांमधील अंतर कमी-कमी होत होतं. ती त्याच्या जवळ-जवळ आली. तितक्यात एका मुलानं तिच्या सायकलला मोटार सायकल आडवी लावली. आणी तो उतरुन तिला काही तरी बोलणार, तेवढयात तिनं खाडकन एक चपराक त्याच्या गालावर मारली. या क्षणार्धात झालेल्या प्रकाराने गणेश गोंधळून गेला. तितक्यात गर्दी जमा व्हायला लागली. गर्दी पाहून तो मुलगा “तुला पाहून घेईन.” अशी धमकी देवून निघून गेला. तिनं चेहऱ्याला स्कार्फ बांधलेलाच होता. तिनं गणेशकडे एकदा पाहिलं, आणी ती निघून गेली. त्यालाही उशीर झालाच होता. तो ही आपल्या कामावर निघून गेला. त्याचं आज कामात लक्षच लागत नव्हतं. कारण तिनं ज्याच्या कानाखाली आवाज काढला होता, तो काही साध्या घरचा मुलगा नव्हता. प्रतिष्ठीत राजकारणी घराण्यातील मुलगा होता तो. त्याच्या कुटुंबातील जवळ-जवळ सर्वच सदस्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. त्याचा भर रस्त्यात अपमान झाला होता. म्हणजे तो नक्कीच त्याच्या अपमानाचा बदला घेण्याचा, तिला काहीतरी अपाय करण्याचा संभव होता. ‍

दुसऱ्या दिवशी गणेश त्या रस्त्याने चालत होता. त्यानं दूरवर नजर टाकली, पण ती आणी तिची सायकल त्याला दिसली नाही. कार्यालय जवळ आलं तरी त्याला ती काही दिसली नाही. त्याचं मन खिन्न झालं. नेमकं काय झालं असेल? याचाच तो विचार करत राहिला. कार्यालयीन कामकाजही सद्या जास्तच वाढलं होतं. त्यामुळे त्याला कार्यालयातून बाहेर यायलाच उशीर होत होता. तिला त्याने सोमवारी पाहिले होते. आज शुक्रवार होता, तेव्हापासून ती त्याला दिसलीच नव्हती.

रविवारी सुट्टीच्या दिवशी तो मोटारसायकलवर तिच्या घराकडे गेला. तेव्हा त्याला तिच्या घराच्या भिंतीवर जाधव आणी थोरात यांचा शुभविवाह दि.०३.०१.२०१५, वार शुक्रवार असे लिहिलेले दिसले. त्याचे सर्व स्वप्न धुळीस मिळाले होते. जिला त्याने जन्माची सोबती म्हणून मनातच स्विकारलं होतं. ती आता दुसऱ्याची झाली होती. या गोष्टीवर विश्वास ठेवायला त्याचं मन तयार नव्हतं. पण सत्य तेच होतं. त्याला सत्य स्विकारावंच लागणार होतं. त्या दिवसापासून त्याचं कामात कसलंच लक्ष लागेना, काम वेळेवर झालं नाही म्हणून त्याला अधिकाऱ्यांची बोलणे खावी लागली. त्याचं मन अस्थिर, अशांत झालं. त्याला जेवण जाईना, झोप लागेना दहा दिवसातच तो ओळखु येईना, इतकी त्याची तबीयत खराब झाली. त्याला कोणाशी बोलावं वाटेना, एकटं रहावं वाटु लागलं, सर्वस्व हरवल्यासारखं झालं. त्याने तिचा चेहरा सुद्धा पाहिलेला नव्हता. तरीही त्याला तिच्यावर इतकं प्रेम झालं होतं. त्याची घरात, मित्रांमध्ये सारखी चिडचिड होत होती. अगदी काही दिवसांपुर्वी तो ज्या व्यक्तीला ओळखतही नव्हता, कधी बोललाही नव्हता, त्या व्यक्तीमुळे तो जवळच्या व्यक्तींनाही टाकून बोलत होता. खरं तर अशा वेळेला त्याला कोणाच्या तरी खंबीर आधाराची गरज होती. एकतर त्यालाच सुरुवातीला त्याची का चिडचिड होत आहे? ते कळलं नव्हतं. काही मित्र त्याच्या अशा वागण्याने त्याच्यापासून दुरावले. जे जवळचे मित्र होते, त्यांनी आणी घरच्यांनी मात्र त्याची साथ सोडली नाही.

एके रात्री तो झोप न आल्यामुळे तळमळत छताकडे पाहत बिछान्यावर झोपून होता. त्या रात्री त्याने या प्रकरणाचा बारकाईने विचार केला. जन्मापासून आई-वडील आपल्या सोबत आहेत. बालपणा पासून जवळच्या मित्रांनी आपल्याला सगळया सुख-दु:खात साथ दिली आहे. आज आपली इतकी चिडचिड होत आहे. एका अनोळखी मुलीसाठी, जिचा आपण चेहरा सुद्धा पाहिलेला नाही तिच्यासाठी आपण सर्वांना टाकून बोलतो आहोत. आपल्याला ती भेटली नाही याचा अर्थ आपलं जीवन संपलेलं नाही. कदाचित तिच्यापेक्षा सुंदर दिसायला नसली तरी, विचारांनी सुंदर अशी कुणीतरी आपल्या नशीबात असावी. आणी म्हणूनच ती आपल्याला मिळाली नाही. केवळ एका व्यक्तीच्या न भेटण्यानं दुनिया निरस होत नाही. तिला आज, आत्ता या क्षणापासूनच विसरुन जायचं, पुन्हा नव्यानं आयुष्य जगायचं, दुरावलेले मित्र परत जवळ करायचे, अशी मनाला समज घालून त्याने तिच्या विचारांची मनातली मनात होळी करुन टाकली होती.

चालकानं ब्रेक दाबलं, तसा गणेश भुतकाळातल्या आठवणींमधून बाहेर आला. ती त्याच्याकडेच पाहत होती. पुन्हा तिची ती जादुई नजर त्याचं काळीज घायाळ करुन गेली.

वाहकानं सांगीतलं,

“इथे दहा मिनिटे चहा पाण्यासाठी बस थांबणार आहे. कोणाला चहा-पाणी, नाश्ता करायचा असेल तर करुन घ्या.”

गणेशने खिडकीतून बाहेर पाहिलं, आभाळ भरुन आलं होतं. पाऊस येण्याची दाट शक्यता होती. बहुतेक कुठंतरी पाऊस झालेला होता. मंद वाऱ्याच्या झुळकेबरोबर जगातील सर्वात भारी परफ्यूमचा सुगंध म्हणजेच भिजल्या मातीचा गंध दरवळत होता. गणेशला तिला चहा पिण्यासाठी चल म्हणावसं वाटलं, पण त्याने स्वत:ला आवरलं, असं चहा प्यायला बोलावलेलं तिला आवडेल का? या विचारात शेवटी तो एकटाच खाली उतरला. लाकडी बाकडयावर बसून स्वच्छंदी वातावरणात चहाचा आस्वाद घेऊ लागला. त्याने एकवेळ ती बसली आहे, त्या खिडकीकडे पाहिले.ती त्याच प्रेमभऱ्या नजरेनं त्याच्याकडे पाहत होती. त्याचं मन पहिल्या सारखंच तिच्यासाठी धडधडु लागलं. पण क्षणभरातच त्याच्या मनात विचार आला, आता तर तिचं लग्नही झालं आहे.आपण यापुर्वी एकदा बरबाद होण्यापासून वाचलो आहोत. आता या लफडयात परत पडायचं नाही. फक्त आज हिचा या सुंदर डोळयामागचा सुंदर चेहरा काहीही करुन पाहायचाच, असं त्याने मनोमन ठरवलं.

तो चहाचे पैसे देवून थोडा वेळ बाहेरच थांबला. चालक व वाहक यांचे पण चहा पिवून झालं. तो बसमध्ये चढला, त्यानं तिच्याकडे पाहिलं, ती स्कार्फ बांधत होती. बाजूलाच पाण्याची बाटली होती. याचा अर्थ तिने पाणी पिण्यासाठी स्कार्फ सोडला होता. तो मनोमन निराश झाला. त्याला वाटलं, चहा पिल्यावर लगेच बसमध्ये आलो असतो, तर तिचा चेहरा पाहता आला असता. पण आता ते शक्य नव्हतं. कारण तिनं परत स्कार्फ बांधला होता. बस अर्धा कि.मी.अंतरावर गेली असेल, तितक्यात जोरदार पाऊस सुरु झाला. ती बसली होती त्या बाजूने पाउुस होता. त्यामुळे खिडकी बंद केली तरी पाऊस आत येऊ लागला. तिच्या सिटवर वरुनही पाणी गळु लागलं. बसमध्ये गर्दी नसल्यामुळे सगळया सिटवर जवळ-जवळ एक एकच प्रवासी बसलेला होता. ज्यांच्या सिटवर पाणी गळत होतं, ते अलीकडील सिटवर येऊन बसत होते. ती पटकन उठून गणेशच्या सिटवर येवून बसली.त्याच्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या. जिच्या जाण्यानं काही काळ त्याचं मन करपलं होतं, तिच आज मनाला सुखद आनंद देणाऱ्या पडत्या पावसाच्या, गार वाऱ्याच्या साथीने त्याच्या बाजूला बसून त्याचं मन प्रफुल्लीत करत होती. धुंद वारा त्याच्या अंगाला स्पर्श करुन तिच्याकडे जात होता. बाहेरचं वातावरणही खुप सुंदर दिसत होतं.

तो तिला कसं आणी काय बोलावं? या विचारात असतानाच तिनेच त्याला विचारले, “कुठे चाललात?”

तो, “पुणे, तुम्ही कुठे चाललात?”

ती, “पुण्यालाच.”

तो, “तुम्ही बीडच्याच का?”

ती, “हो”

तो, “एक बोलु का? राग तर नाही ना येणार तुम्हाला?”

ती, “नाही, बोला.”

तो, “तुम्ही मला यापुर्वी पाहिलंय का?”

ती, “हो,पाहिल्यासारखं वाटतयं”

तो,“साधारणत: तीन वर्षापुर्वी मी बसस्थानकामागच्या रस्त्याने चालत यायचो त्यावेळेस बहुतेक तुम्ही कुठल्यातरी शिकवणीला जात होता. तुम्ही तुमच्या गुलाबी सायकलवर समोरुन यायचात? एवढे बोलून तो तिच्या उत्तराची प्रतीक्षा करु लागला.

ती थोडावेळ आठवल्यासारखं करून म्हणाली, “हो, त्यावेळेस मी बारावीला होते.”

तो, “एके दिवशी एका मुलाने तुमची सायकल अडवली, तो तुम्हाला काहीतरी बोलला. तुम्ही त्याच्या गालात चांगलीच चपराक ठेवून दिली. तो मुलगा आणी त्याच्या घरचे खुपच गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुमचं चार-पाच दिवसातच लग्न झालं आणी त्यानंतर आज आपण भेटलो. तेही फक्त तुमच्या डोळयांवरुनच मी तुम्हाला ओळखलं. तेव्हा मी तुमच्या डोळयात पाहायचो. तुमचे डोळे खुपच सुंदर आहेत. तुमचे सुंदर डोळे मला खुपच आवडायचे.माझी एकच इच्छा आहे आज पर्यंत मी तुमचा चेहरा पाहिलेला नाही.फक्त मैत्रीच्या नात्याने एकदा तुमचा चेहरा दाखवाल का?” असं अडखळतच बोलला.

त्याचं बोलणं शांतपणानं ऐकून घेतल्यानंतर तिने बोलायला सुरुवात केली. “मला माहित आहे, तुम्ही माझ्या मागे-मागे माझ्या घरापर्यंत आला होता. मलाही तुम्ही आवडू लागला होता. पण त्या दिवशी मी त्या मुलाच्या गालावर चपराक मारली, तो मुलगा मला धमकी देवून गेला. मी घडलेला प्रकार घरी सांगीतला. त्याच्या भितीनं घरच्यांनी चार दिवसातच माझा विवाह पुण्याच्या माझ्या मामाच्या मुलासोबत लावून दिला. काही दिवसांनी मी माहेरला आले. आई आणी मी खरेदीसाठी बाहेर आलो होतो. तितक्यात त्या मुलाने माझ्या चेहऱ्यावर ॲसीड फेकलं, माझा चेहरा विद्रुप झाला. त्यामुळे माझ्या पतीनेही मला सोडून दिलं. आता पुण्याला एका खाजगी कंपनीत मी काम करते.” एवढं बोलून ती शांत झाली. तिची कर्मकहाणी ऐकून तो शांतच राहिला. जवळ-जवळ तीन वर्षापासून तिचा चेहरा पाहण्यासाठी त्याच्या मनामध्ये जे कुतुहल होतं, त्या कुतुहलाची जागा आता तिरस्काराने घेतली. त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल असणारं आकर्षण कमी झालं.

त्याला शांत झालेला पाहून ती म्हणाली,

“तुम्हाला माझा चेहरा पाहायचा होता ना?”

तो काहीच बोलला नाही. सकाळी बसमध्ये बसल्यापासून प्रवासात हवीहवीशी वाटणारी तिची सोबत आता त्याला नको वाटायला लागली. कधी एकदा उतरण्याचं ठिकाण येतं असं झालं त्याला. कालच तो लग्नासाठी एक मुलगी पाहून आला होता. मुलगी सुंदर होती. त्याला ती आवडली होती. सगळं व्यवस्थीत झाल्यावरच हिला आपल्या आयुष्यात यायचं होतं का? ज्या वेळेस हिच्या विरहाने माझी वेडयासारखी अवस्था झाली होती. तेव्हा कुठे गेली होती ही? असे विचार त्याच्या मनात येत होते.

पुण्याचं शिवाजीनगर बसस्थानक जवळ आलं. साडेपाच वाजले होते. पाऊस येवून गेला होता. वातावरणात गारवा होता. आकाश ढगाळलेलच होतं. दोघांनाही शिवाजीनगरलाच उतरायचं होतं. तो तिला काही न बोलताच खाली उतरला, तीही उतरली. त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचे तिच्या लक्षात आले. दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निघाले. ती जस जशी दूर जाऊ लागली. तसं तसं गणेशचं मन बेचैन होऊ लागलं. त्याला तिची ओढ वाटु लागली. तीन वर्षापुर्वी त्याचं तिच्यावर प्रेम झालं होतं. ती प्रेमाची भावना आजपर्यंत त्याच्या मनामध्ये सुप्त अवस्थेमध्ये होती. ती प्रेमभावना ऊफाळून वर आली. त्याच्या डोक्यात विचार आला. माझं तिच्याबरोबर लग्न झालं असतं, आणी नंतर तिच्यावर ॲसीड हल्ला झाला असता, तर आपण तिला सोडून दिलं असतं का? नाही, नक्कीच नाही. मग आज तिला आपल्या आधाराची गरज असताना आपण तिला असं वाऱ्यावर सोडणं योग्य नाही. त्याच्या नकळत त्याची पावलं तिच्या दिशेने वळली. झपाझप पावलं टाकीत त्यानं तिला गाठलं.

तो, “थांब.”

ती, “कशाला आलात माझ्या मागे?”

तो, “मला तुझा चेहरा पाहायचा आहे.”

ती, “दाखवीन, पण एका अटीवर.”

तो, “कोणत्या अटीवर?”

ती, “तुम्हाला माझ्याशी लग्न करावे लागेल.”

तो ठाम निश्चयाने हो म्हणाला.

तिच्या सुंदर डोळयामागचा सुंदर नव्हे, आता असलेला विद्रुप चेहरा पाहण्यासाठी त्यानं मनाची पुर्ण शक्ती एकवटली.

तिने स्कार्फ सोडला. आणी…… त्यानं पाहिलं, सुंदर डोळयामागचा चेहराही तितकाच सुंदर होता. अगदी गुलाबांच्या पाकळयाप्रमाणे गुलाबी ओठ, नाजूक चेहरा, गोरा रंग, रेखीव नाक तो तिचं सौंदर्य पाहतच राहिला.

थोडया वेळाने तो भानावर आला. ती गोऱ्या गालात नाजूक हसत होती.

गणेश तिच्याकडे पाहत म्हणाला, “मला खोटं बोललीस तर.”

ती,“ हो. तुमचं माझ्यावर खरच प्रेम आहे का? ते पाहत होते.”

तिनं सुरुवातीला स्कार्फ बांधल्यामुळे तिचा गळाही झाकून गेला होता. तसंच तिच्या पायात लेडीज बुट होते. त्यामुळे तिच्या गळयात मंगळसुत्र आणी पायात जोडवे आहेत का? तेही त्याला पाहता आलेलं नव्हतं. आता त्याने ते पाहिले होते. तिच्या गळयात मंगळसुत्रही नव्हतं, आणी पायात जोडवेही नव्हते. याचा अर्थ तिचं लग्न सुद्धा झालं नव्हतं.

त्याने तिला विचारले, “म्हणजे तुझे लग्नही झाले नाही तर?”

ती हसतच म्हणाली, “नाही.”

बोलता-बोलता ते दोघे बाजूच्या हॉटेलमध्ये गेले, तेथे कॉफी ऑर्डर केली.

तो, “मग त्या दिवशी कोणाचं लग्न झालं होतं?”

ती, “खरं तर मी ज्या मुलाच्या कानाखाली मारली होती. तो माझ्या मागे आलाच नव्हता. तो आमच्या ताईच्या मागे लागला होता. माझी ताई आणी मी उंचीने आणी शरीराने दिसायला सारख्याच आहोत. मी तोंडाला स्कार्फ बांधला होता व त्या दिवशी ताईचाच ड्रेस घातला होता. त्यानं ताई समजून मलाच अडवलं. झालेला प्रकार मी घरी सांगीतला. ताईला स्थळ आलेलेच होते. त्यामुळे पप्पांनी तिचं तात्काळ लग्न जमवलं. घरी काम असल्यामुळे मीही क्लासला आले नाही. त्या दिवसात तुमची आठवण येत होती. पण लग्नाच्या कामामुळे मला बाहेर येता आले नाही. ताईचं लग्न झालं व नंतर पप्पांनीही मला त्या मुलाच्या भितीपोटी पुण्याला शिकायला पाठवले. नंतर काही दिवसांवरच निवडणुका जवळ आल्या होत्या. आमच्या पप्पांचा स्वभाव चांगला होता. कुठलीही अपेक्षा न करता पप्पा सर्वांना मदत करायचे. त्यामुळे बरेच लोक त्यांच्या बाजूने होते. हा विचार करुनच नंतर तो मुलगा व त्याचे राजकीय वडील आमच्या पप्पांचा त्यांना मतदानासाठी फायदा होईल, या विचाराने आमच्या घरी आले. आणी ‘झालेली गोष्ट आम्ही विसरलो, तुम्ही पण विसरा’ असं सांगून निघून गेले”.

तिचं बोलणं झाल्यावर त्याने विचारले, “बरं सध्या काय करतेस?”

ती, “सध्या मला एका मराठी मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. आमच्या मालिकेचा विषय हा ॲसीड हल्ल्या विषयीच होता. सध्या त्याच भुमिकेसाठी चित्रीकरण चालु आहे. मग तोच विषय वेगळया प्रकारे मांडून तुमचं माझ्यावर कितपत प्रेम आहे? हे पाहिलं. आता तुम्ही माझे जीवनसाथी बनु शकता यात शंकाच नाही”.

त्यावर गणेशही तिचं मन आजमावण्यासाठी खोटेच बोलला, “मी तुझे सुंदर डोळे पाहून तुझ्या प्रेमात पडलो. आणी त्या सुंदर डोळयामागचा सुंदर चेहरा पाहण्यासाठी मी तुला तुझ्याशी लग्न करतो असे म्हणालो,पण खरं तर माझं लग्न झालं आहे.तुला आवडेल का माझी दुसरी बायको व्हायला?”

त्यावर ती निराश झाली. गणेश तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत होता. तिचा चेहरा रडवेला झाला होता. तो तिच्या सुंदर डोळयात साचलेल्या मोत्यांच्या आसवांना पाहत हसत म्हणाला, “तुला काय वाटलं, फक्त तुलाच खोटं बोलता येतं का?”

गणेशचं बोलणं ऐकून तिला सगळं उमगलं,आणी तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. गणेश तिच्या सुंदर डोळयात पाहत भविष्यात रमून गेला.