सुखाच्या शोधात संदिप खुरुद द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सुखाच्या शोधात

सुखाच्या शोधात

दुपारच्या वेळी विकी आज बाईकवर शहराच्या बाहेर निघाला होता. तो कुठे चाललाय? याचे त्याला भान नव्हते. तशी त्याने अमली पदार्थांची किंवा मदिरेची नशा केलेली नव्हती. पण त्याच्या मनामध्ये निराशेची नशा चढली होती.निराशेने त्याचं मन काळयाकुट्ट ढगांनी आकाश झाकोळून जावं अगदी तसंच झाकाळून गेलं होतं. एखाद्या बेभान,बेफाम वादळा सारखे विचार त्याच्या मनात घोंघावत होते. त्या विचारांच्या वादळात त्याचे मन खचून चालले होते.त्याचे मन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते.त्याच्या बाईकच्या वेगापेक्षाही त्याच्या मनातील विचारांचा वेग जास्त होता.गाडीला तरी ब्रेक लावता येतं पण कधी कधी मनातील विचार चक्राला ब्रेक लावणं अशक्य होवून जातं. त्याचंही तसंच झालं होतं. तो आता शहरापासून खूप दूर आला होता. अंगावर येणाऱ्या ट्रॅकमुळे तो भानावर आला. ती ट्रॅक त्याच्या बाईकच्या अगदी समोर आली होती. आता ती ट्रॅक त्याला चिरडणारच...... तेवढयात विकीने बाईक रोडच्या खाली घातली.बाईक एका खड्डयामध्ये उतरली. सुदैवाने त्याला कुठे जखम झाली नाही. अपघात होण्यापासून तो थोडक्यात बचावला होता. त्याने एकदा ट्रॅककडे पाहिले. तो ट्रॅक भरधाव वेगात निघून गेला होता. खरं तर त्या ट्रॅक चालकाची काहीच चूक नव्हती. विचारांच्या तंद्रीत वळण रस्त्यावर विकीकडून बाईक राँग साईडला गेली होती.तो राँग साईडलाच रस्त्याच्या बाजूच्या खड्डयात बाईकसह पडला होता. झालेल्या प्रसंगाला पाच मिनिटे झाली होती. तरी त्याचे सर्वांग थरथरत होते. जवळपास कोणीच नव्हते. त्याने जोर लावून बाईक खड्डयाच्या बाहेर काढली. ऊन असल्यामुळे व बाईक काढण्यासाठी श्रम करावे लागल्यामुळे त्याच्या घशाला कोरड पडली होती.कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते.त्याने उजव्या हाताने कपाळावरील घाम पुसत पाण्याच्या शोधात जवळपास नजर ‍फिरवली. एका शेतात थोडया अंतरावर त्याला एक दगडी कठडा असलेली विहीर दिसली. त्या विहीरीकडे जाणाऱ्या पाऊलवाटेने तो त्या विहीरीजवळ आला.

विहीरीच्या बाजूलाच आंब्याचे डेरेदार झाड होते.त्या भल्यामोठया झाडाची थंडगार सावली पडली होती. विकीने सावलीमध्ये गाडी स्टँडवर लावून विहीरीमध्ये डोकावून पाहिले. विहीर पाण्याने अर्धी भरलेली होती. संपूर्ण विहीरीचे दगडी बांधकाम केलेले होते. विहीरीमध्ये उतरण्यासाठी एकाला एक चिटकून मोठमोठया दगडी पायऱ्या होत्या. तो विहीरीमध्ये खाली उतरु लागला. त्याची चाहूल लागताच पायरीवर बसलेल्या बेडकाने पाण्यात उडी मारली. त्याने मारलेल्या उडीचा 'डुबुक' असा आवाज आला. विकीने थंडगार पाण्याचे सपकारे चेहऱ्यावर मारले. शीतल पाण्याच्या थंडगार स्पर्शाने बराच वेळापासून आळसलेला त्याचा चेहरा खुलला. त्या विहीरीचे गोडे पाणी पिऊन तो तृप्त झाला. थोडयावेळापुर्वी डुबकी घेतलेला तो बेडुक आता विहीरीच्या दुसऱ्या काठावर येऊन एका खडकावर ध्यानस्थ ऋषी प्रमाणे बसला होता.

विकीही विहीरीच्या काठावर येऊन कठडयावर पाय खाली सोडून आरामात बसला. त्याची नजर त्या बेडकावर स्थिर झाली. बाजूला आलेला एक किडा त्या बेडकाने गिळला. ते पाहून विकी मनाशीच हसला. त्याच्या मनात विचार आले. आपल्यापेक्षा या बेडकाचे जीवन चांगले आहे. ना कमाईची चिंता, ना खायचे टेंशन, ना संसार, ना कामाचा ताण, ना गाडी, बंगल्याची आशा, ना प्रेमाची विफलता, ना भुतकाळाचे दु:ख ना भविष्याची चिंता, फक्त वर्तमानात जगायचे. ते पण आरामात.

त्याला सकाळचा प्रसंग आठवु लागला. एका क्षुल्लक कारणावरून त्याच्या बॉसने त्याला कंपनीमधून काढून टाकले होते. कंपनीतील सर्व सहकाऱ्यांसमोर त्याला अपशब्द वापरले होते. खरे तर त्याला काढून टाकण्याचे कारण वेगळेच होते. त्याच्या बॉसला स्वत:च्या नात्यातील एका व्यक्तीला विकीच्या जागेवर घ्यायचे होते. पण विकी कामाला प्रामाणीक व कष्टाळू होता. त्याच्याकडे वेळेत काम पूर्ण करण्याची हातोटी होती.त्याचा बॉस फक्त त्याच्या एका चुकीची वाट पाहत होता. आणि आज ती वेळ आली होती. एक प्रोजेक्ट विकी वेळेत पूर्ण करू शकला नव्हता. तसा तो प्रोजेक्ट आणखी पाच दिवसांनी पूर्ण झाला असता, तरी कंपनीचे काही नुकसान होणार नव्हते. पण बॉसने पुर्वगृहदुषीत बुद्धीने त्याला कंपनीमधून बाहेर काढले होते. आणि त्याच निराशेत आत्महत्या करण्याच्या इराद्याने विकी बाईकवर निघाला होता. आणि अनावधानाने तो या विहीरीजवळ आला होता.

तो बेडुक त्या खडकावर शांत बसून आणखी दुसऱ्या शिकारीची वाट पाहत होता. तितक्यात काही कळायच्या आत त्या बेसावध बेडकाच्या पाठीमागच्या बिळातून एक धामण जातीचा तांबुस तपकिरी रंगाचा भलामोठा साप बाहेर आला. त्या सापाने त्या बेडकावर झडप घालून त्याला आपल्या जबडयात पकडले आणि त्या बेडकाला हळूहळू गिळंकृत केले.काही वेळापुर्वी त्या बेडकाचा विकीला हेवा वाटला होता. तो बेडुक आपल्यापेक्षा सुखी आहे असा त्याचा समज झाला होता. आणि आता त्या बेडकाचा असा अचानक मृत्यु झाला होता.

आपणही आताच मरता-मरता वाचलो. हे त्याला आठवले. आपल्याला माहित पण नसतं. आपण आणखी किती काळ जगणार आहोत? तरी भविष्याचा विचार करून आपण आपला सोनेरी वर्तमान दु:खात घालतो, ही किती मोठी शोकांतिका आहे. याचा तो मनाशीच विचार करत होता. याच विचारात तो त्या झाडाजवळ आला. रात्री एका प्रोजेक्टवर त्याने उशीरापर्यंत काम केले होते.व ‍विचार करण्यांमुळे त्याच्या मेंदुवर ताण आला होता.त्यामुळे त्याला झाडाच्या थंडगार सावलीत लगेच गाढ झोप लागली.

थोडया वेळात लहान मुलांच्या गोंगाटाने त्याला जाग आली. त्याने गोंगाटाच्या दिशेने पाहिले. चार-पाच मुले पोहण्यासाठी विहीरीवर आले होते. त्यातील एका मोठया मुलाने मेलेल्या सापाचे धुड एका लाकडी काठीवर धरले होते. आणि तो मुलगा तो मेलेला साप इतर मुलांच्या अंगावर टाकण्याची भिती दाखवत होता. त्या भीतीपोटी ते मुलं ओरडत पळत होते. थोडयावेळा पुर्वी त्या बेडकाला गिळंकृत करणारा तांबुस तपकिरी रंगाचाच तो साप होता. त्या सापावर मुलांनी वरून दगड फेकले होते. बेडकाला गिळल्यामुळे त्या सापाच्या पोटाचा आकार वाढला होता. त्यामळेच त्या सापाला चपळाईने बिळात शिरता आले नव्हते. मुलांनी मारलेले दगड त्या सापाच्या वर्मी लागले होते.त्यामुळे तो साप गतप्राण झाला होता.

काही वेळापुर्वी त्या बेडकाने एका किडयाला आपले भक्ष बनवले होते. त्या बेडकाला सापाने गिळंकृत केले होते.आता त्याच सापाला या मुलांनी मारले होते.मुलांचा दंगा चालूच होता. आणि विकीच्याही मनात विचारांचा दंगा चालू होता.अगदी काही वेळापुर्वी नोकरीवरून काढल्यामुळे आपण निराशेच्या गर्तेमध्ये अडकलो होतो. गाडी चालवताना आपले मन थाऱ्यावर नव्हते. आपण अपघात होण्यापासून बालंबाल बचावलो होतो. जर आपले काही बरे-वाईट झाले असते तर आपल्या म्हाताऱ्या आई-वडीलांनी कोणाकडे पाहून जगायचे होते? आपल्या पत्नीने कोणाच्या आधारावर उरलेले अर्धे आयुष्य काढायचे होते? आपल्या चिमुकल्या दोन पाखरांनी कोणाला पप्पा म्हणून हाक मारायची होती? आपण संपलो असतो तर आपले संपूर्ण कुटुंबही संपले असते. या विचारांनी त्याचे मन अस्वस्थ झाले.

त्याला शाळेतील विज्ञानाच्या पुस्तकातील 'अन्नसाखळी' आठवली. आजचा प्रसंग जवळपास त्या अन्नसाखळी प्रमाणेच घडला होता. त्या अन्नसाखळीमध्ये वनस्पती सुर्यप्रकाशाच्या सहाय्याने आपले अन्न तयार करतात, वनस्पतींना खावून कीटक, नाकतोडा, विविध कीडे आपली भुक भागवतात. त्या किटकांना, किडयांना खावूनच उंदीर, बेडुक आपले पोट भरतात. उंदीर, बेडकांनाच साप आपले भक्ष्य बनवतात. तसेच गरुड, बहिरी ससाणा हे सापांना खातात. काही कालांतराने गरुड, बहिरी ससाण्यासारखे पक्षी मृत पावल्यानंतर किडे, मुंग्या त्यांना खातात.अशा प्रकारे या जीवसृष्टीतील एक जीव स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी दुसऱ्याचे अस्तित्व नष्ट करत आहे. आज माणसासारखा भावनाप्रधान असलेला माणूस भावनाशुन्य होऊन आपल्या स्वार्थापोटी दुसऱ्याचे अस्तित्व नष्ट करायला पुढे-मागे पाहत नाही.आज ऑफीसमध्येही बॉसने तेच केले. स्वत:च्या नातेवाईकाला कामावर घेण्यासाठी त्याने आपल्याला कामावरून काढून टाकले.

आता आपण बॉसपुढे कितीही विनवणी केली तरी आपल्याला तो कामावर घेणार नाही. यामुळे जास्तीत जास्त काय होईल? काही दिवस आपण बेरोजगार राहू. पण काही दिवसात आपल्याला काही ना काही काम मिळेल. नाही मिळाले तरी आपण काहीही कष्ट करू. पण आपल्या कुटुंबाला असे उघडयावर पडु द्यायचे नाही. बरं झालं आपल्या मनात आत्महत्येचा आलेला विचार आपण मनातून काढला. नाहीतर आपल्या मृत्यमुळे आपले संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले असते.आपल्यासाठी नाही तरी किमान आपल्याला आपल्यांसाठी जगलं पाहिजे.

दिवस मावळता तो घरी आला. झोपाळयात बसून त्याचे वडील आरामात चहा घेत होते. त्याची दोन्ही मुले त्यांच्याजवळ खेळत होती.स्वयंपाक घरात त्याची प्रेमळ आई व पत्नी स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या होत्या. त्याला पाहताच त्याची गोड पाखरं 'पप्पा' म्हणून ओरडत त्याच्याकडे पळाली. न कळत तो गुडघ्यावर बसला.ती गोड, गोजिरी पाखरं त्याला बिलगली. त्या दोन्ही लेकरांना त्याने आपल्या हदयाशी कवटाळले. नकळतपणे त्याच्या डोळयांतून अश्रु बाहेर आले. त्याने डोळयातून येणारे अश्रु लपवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. पण ते अश्रु त्याच्या अनुभवी वडीलांच्या नजरेतून सुटले नाहीत. त्यांनी त्याला जवळ बोलावून काय रडण्याचे कारण विचारले. विकीने सर्व प्रसंग आपल्या त्या आधारवडाला सांगीतला. त्यावर हसून त्याचे वडील म्हणाले,

"पोरा! मी कित्येक उन्हाळे-पावसाळे अनुभवले आहेत. आताची परिस्थिती खूपच बरी आहे. आमच्या वेळी आजचं जेवण झालं तर उद्याच्या जेवणाची काळजी असायची. त्या काळी आम्ही भौतीक सुखाच्या मागे लागलेलो नव्हतो. आजच्या जेवणाचे भागले तरी आम्ही खुष व्हायचो. एक नोकरी गेली तर काय झाले?तु शिकलेला आहेस, दुसरी नोकरी मिळेलच ना. मिळणारी गोष्ट मिळतच असते, फक्त आपण कष्ट करत रहायचे असते. पण त्या गोष्टीसाठी झुरत बसायचे नसते."

"तुमचं खरं आहे पप्पा.मी उगाचंच डिप्रेशनमध्ये आलो होतो.घरच्यांचा विचार न करताच मी जीवन संपवण्याचा विचार करत होतो.मला माफ करा."

असे म्हणून तो आपल्या वडीलांच्या गळयात पडला. त्यांनी त्याला आपल्या हदयाशी कवटाळले.वडीलांच्या समजावण्याचा त्याला कितीतरी आधार वाटला.

त्याचे वडील त्याला म्हणाले,"यापुढे लक्षात ठेव. जीवनात कोणतेही संकट आले, कोणतीही अडचण आली तर त्यातून शांत डोक्याने मार्ग काढयाचा प्रयत्न कर. जर मार्ग दिसलाच नाही तर फक्त एवढा विचार कर. या संकटाने, या आलेल्या अडचणीने आपले जास्तीत जास्त किती नुकसान होईल? आणि नुकसानामुळे होणाऱ्या परीणामांना स्वीकारण्याची मनःस्थिती तयार कर. कालांतराने ते संकट तुला क्षुल्लक वाटेल. बऱ्याच वेळी आपल्याला आयुष्यात संकट येतात. सुरुवातीला आलेले संकट आपल्याला खूप मोठे वाटते. त्यानंतर लगेच दुसरे संकट आले तर त्या पहिल्या संकटाचे आपल्याला काहीच वाटत नाही. जीवनात संकट येतच असतात.पण संकटांचा सामना करायचा असतो. कालांतराने ते संकट दूर होवून आपले जीवन पुर्ववत होते. आजकाल बरेचशे लोक सुख शोधत असतात. पण खरे सुख हे आपल्या विचार करण्यावरच अवलंबून असते. काही लोक थोडया कमाईमध्येही समाधानाने राहतात. तर काही लोकांना करोडोंची प्रॉपर्टी असूनही समाधान नसते. त्यामुळे लक्षात ठेव. सुख हे समाधानी राहण्यात असते. दु:ख असताना कधीही डगमगु नकोस आणि सुखाच्या शोधात कोठेही जाऊ नकोस.फक्त आपले काम प्रामाणीकपणे करत रहा,सुख तुझ्या पायांवर लोळण घेईल."

तेवढयात विकीच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला, विकी फोन वर बोलत बाहेर गेला.फोन ठेवल्यानंतर तो हसत घरात आला.घरच्यांनी काही विचारायच्या आतच त्याने सांगीतले.

"मला दुसऱ्या एका कंपनीत या कंपनीपेक्षा वाढीव पगाराने दुसरी नोकरी मिळाली आहे. मला त्या कंपनीमधून आता फोन आला होता.त्यांना मला कंपनीमधून काढल्याचे कोणीतरी सांगीतले. आणि त्यांना कळताच त्यांनी मला फोन केला. ते म्हणाले, आम्हाला तुझ्यासारख्या कष्टाळु माणसांची गरज आहे.तु उद्याच कंपनी जॉईन कर."

ते ऐकून परिवारातील सगळे खुष झाले. सुख खरंच आता पदरात पडलं होतं.विकीने जर आत्महत्या केली असती तर ..... या वेळचं हेच चित्र वेगळं दिसलं असतं. सुखाच्या ऐवजी दु:ख असतं. इतर लोकांनी काही दिवस हळहळ व्यक्त केली असती. पण त्याचं कुटुंब कायमचं दु:खाच्या खाईत कोसळलं असतं. त्यामुळे नसलेल्या गोष्टीबद्दल दु:ख न करणं व आहे त्यामध्ये सुख माननं हेच खरं जीवन आहे. सुखाच्या शोधात कोठे जाण्याची गरज नाही. सुख हे आपल्या मानन्यामध्ये आहे. थोडयाथोडया गोष्टीतही सुख मिळत असतं.फक्त ते सुख पाहण्याची नजर आपल्याकडे हवी.