साधुसंत वाट्याला आलेल्या आयुष्याबद्दल कधी नाराजी करत नाहीत. त्यांना मिळालेले जीवन दयाळू विठ्ठलाची कृपा आहे अशी त्यांची धारणा असते. स्वतःची प्रत्येक कृती ही विठ्ठलाच्या रूपाने होत असते ती अशी साधुसंतांची दृढ श्रद्धा असते. जे आपल्याला मिळाले त्यात आपण समाधानी असावे. दुःखी गोष्टीचे बाऊ करत बसू नये .आयुष्यातील आनंदसुख हेच सत्य आहे असे समजावे ही शिकवण श्री विठ्ठलाने संत साधुसंतांच्या मार्फत समाजांमध्ये दिली.
संत तुकारामांचे आजोबा कन्हैया होते. त्यांचे वडील बोल्होबा होते. संत तुकारामाचा पिंड व्यापाऱ्याचा नव्हता. तर विठ्ठल भक्तीचा होता. हा त्यांचा स्वभाव होता. नामाचे स्मरण ही त्यांची सेवा होती.
संत तुकारामांचे स्वतःचे दुकान होते. ते स्वतः दुकान चालवत. विठ्ठलाच्या भक्ती सोबत ते स्वतःचा उदरनिर्वाह दुकान चालवून करत. विठ्ठलावर भरोसा ठेवून ते वागत. या प्रकारे त्यांनी समाजाला स्वतःचे उदाहरण घालून दिले. विठ्ठल विठ्ठल नामस्मरणात सतत रमून तुकाराम महाराजांनी लोकांना शिकवण दिली की पोटापाण्यासाठी उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम केले पाहिजे.
संत तुकाराम, सावजी आणि कान्होबा असे तिघे भाऊ होते .त्यांना दोन बहिणी होत्या. त्यांचा वाडा नदीकाठावर होता नदीकाठी लोकांची वर्दळ असायची. नदीला घाट होता .त्या घाटावर नदीच्या पाण्यात वाळूमध्ये पोरं खेळायची, बागडायची, मस्ती करायची स्त्रिया कपडे धुवायच्या. त्यांच्या दुकानांमध्ये वस्तू घ्यायला लोकं यायची. त्यांच्या राहत्या वाड्यातच त्यांच्या मालकीचे विठ्ठल मंदिर होते .ते तिथे नित्य भजन, कीर्तन, प्रवचन करत. संत तुकाराम महाराजांना पतंजली योग मार्गाची सुद्धा चांगली माहिती होती.
संत तुकारामांनी कर्ज काढून अनेक व्यापार करून पाहिले. पण सर्व बुडाले. एकेकाळी लोकांना कर्ज स्वतः तुकाराम महाराज देत असत. मात्र आता त्यांच्या कर्ज फेडीसाठी सावकाराचे तगादे सुरू झाले. त्यांना त्यांचे कर्ज फेडता येईना..
तेव्हा एका सावकाराने तुकारामांच्या दुकानातील सामान बाहेर काढले. दुकानाचे दिवाळे निघाले.. धंदा बुडाला .लोक उलटली अन्नपाण्याविना ते आता जास्त वेळ ईश्वरभक्तीत घालू लागले .घराचा आयुष्याचा सारा भार त्यांनी विठ्ठलावर सोपवला. तुकारामांच्या अध्यात्मिक ओढीमुळे त्यांची विठ्ठलभक्ती आणखीच वाढली. अचानक पडलेल्या दुष्काळाने त्यांच्या घरात असलेली लोकांची खतपत्रे, गहाणपत्रे कर्जाची कागदे तुकारामानी चंद्रभागेत निघून बुडवली. लोकांना खायला अन्न नाही. पैसा नाही. लोकं कर्ज फेडणार कसे .आपला पैसा परत देणार कसे . यासाठी त्यांनी त्याचा भाऊ कान्होबाला विचारले .
लोक जर पैसे देणारच नसतील तर खतपत्रे ठेवून काय अर्थ आहे. तेव्हा कान्होबाने सांगितले. तुकाराम त्या खतपत्रा मध्ये जो कर्जाचा पैसा आहे त्याच्यामध्ये अर्धा माझासुद्धा वाटा आहे. तुकारामांनी त्या खतपत्राच्या ढीगाचे दोन भाग केले .एक भाग स्वतःकडे घेतला .एक भाग भावाला दिला. ते म्हणाले.
हा तुझा हिस्सा तू घे. तुझा वाटा घे . ते स्वत: त्यांचा खतपत्राचा वाटा घेऊन नदीवर गेले. नदीवर जाऊन नदीच्या खोल पात्रांमध्ये त्यांचा खते पत्राचा वाटा त्यांनी सोडून दिला. नदीच्या पात्रात तो बुडून गेला. संत तुकाराम महाराज संसाराचा मोहपाशातून मुक्त झाले. त्यांचा धंदा बुडाला .कर्जाचा खतपत्राचा वाटा पोटापाण्याची सोय होती .ती सुध्दा हातची घालवून बसले .
आता त्यांच्याकडे घेणे देण्यासारखे काहीच नव्हते. त्यांचे मन वैराग्याने ग्रासून गेले. त्याच्या मनात आस शिल्लक राहिली नाही. ते भामरागडाच्या डोंगरावर गेले .तिथेच राहू लागले .पंधरा दिवस तिथे तपस्या केली .तिथे त्यांना हरी भेटला. त्यांच्याशी बोलला. त्यांना सर्वत्र विठ्ठल दिसू लागला. अध्यात्मिक तपसाधना करताना त्यांनी विठ्ठला शिवाय कोणालाच गुरु केले नाही. विठ्ठलाचे अखंड चिंतन ,नामस्मरण त्यांनी केले. शेवटी बाबाजी चैतन्य महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. तुकाराम महाराजांना गुरु भेटला. गुरुंनी त्यांना राम कृष्ण हरी मंत्र उपदेश केला. गुरूच्या सांगण्यावरून त्यांनी शतकोटी अभंग लिहिण्याचे ठरवले. नामदेवांनी त्यांना अभंग रचण्याची प्रेरणा दिली. तुकाराम महाराज देहूला राहत होते.त्यांच्या अभंगातून जीवनाचे स्वरूप जीवनाचे तत्त्वज्ञान. विठ्ठलाची मैत्री, विठ्ठलाची करुणा होती. विठ्ठलाशी त्यांनी भक्तीचे भांडण केले. त्यांच्या मुखातून, विठ्ठलाचे वर्णन विविध प्रकारचे अभंग बाहेर पडत. तुकाराम अभंग सांगत आणि त्यांचा लहानपणापासूनचा मित्र संताजी जगनाडे हा त्यांचे अभंग लिहून ठेवत असे या अभंग रचने मधून तुकारामांनी अभंग गाथा पूर्ण केली....
त्यांच्या स्वतःच्या अभंगा मुळे तुकारामाच्या स्वतःच्या विठ्ठल मंदिरात अभंग ऐकायला. लोकं गर्दी करू लागले त्यामुळे इतर साधुसंतांची लागले त्यांच्या वर जळणारे त्यांच्या कडून चे लोक निर्माण झाले त्या धर्मात तुकारामाची अनेक वेळा अनेक ठिकाणी अडवणूक केली त्यांची छळवणूक केली अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. दांभिक पंडितांनी त्यांचा छळ केला. परंतु तुकारामांनी आपले साधुत्व, नम्रता, शालीनता कधी सोडली नाही.. इंद्रायणी नदीत त्यांच्या अभंगाच्या वह्या बुडवल्यानंतर तुकारामांनी
तेरा दिवस विठ्ठला जवळ उपवास धरणे धरले.
मंबाजी भटाने तुकारामांना बाभळीच्या फांदीने झोडपले .तेव्हा हरिनामाच्या गजरा शिवाय त्यांच्या तोंडून दुःखाचा, वेदनेचा, रागाचा, द्वेषाचा एकही शब्द बाहेर पडला नाही. ते फक्त आणि फक्त विठ्ठलाचे नाव घेत होते.
पुरुषाप्रमाणे तुकारामांचा छळ एका स्त्रीने केला. ती स्त्री नर्तिका होती. तिने त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. मंबाजीने तीच्या सोबतीने त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. त्या स्त्रीला तुकाराम महाराजांनी आपली माता म्हणून संबोधले. तीला ते म्हणाले, तू माझी माता आहेस . कुठलाही मुलगा आईचे पतन बघू शकत नाही . त्या कारणाने तिला स्वतःचीच लाज वाटली. तिला स्वतःचाच राग आला. तिने तुकारामांचे पाय धरले. त्यांची क्षमा मागितली . ती रोज तुकारामाच्या किर्तनाला येऊन बसू लागली. त्यांच्या कीर्तनाचा आनंद घेऊ लागली.
तुकाराम महाराज अभंग करतात याविरुद्ध त्यावेळच्या पंडितानी तुकारामांच्या विरुद्ध खटला दाखल केला . त्या खटल्याचा निकाल रामेश्वर भटांनी दिला. त्यांनी तुकारामांच्या अभंगाची हस्तलिखिते पाण्यात बुडवून टाकण्यास सांगितले.
तुकाराम विठ्ठलाचे आवडते भक्त होते. रामेश्वर भटांनी तुकारामाचे शिष्यत्व पत्करले होते . वारकरी संप्रदायात घरोघरी म्हटली जाणारी तुकारामांची आरती नंतर त्यांनीच लिहिली.
दोन भक्तजीव एकमेकांना भेटतात. तेव्हा ते क्षेत्र तीर्थक्षेत्र होते . तिथे बोधाची देवाण-घेवाण होते. विठ्ठलाच्या कृपेने तुकारामांचे अध्यात्मिक सामर्थ्य सर्वांना कळून चुकले होते. तुकारामांनी मठ स्थापना केली नाही. कोणाला शिष्य दिक्षा दिली नाही. शिष्य शाखा निर्माण केली नाही . ते त्यांनी जाणीवपूर्वक टाळले. तरीही तुकारामांचे १४ पट्टशिष्य तयार झाले. एवढी त्यांच्या स्वत्वाची कीर्ती सर्वत्र पसरली होती.
ते लोकांना सांगत. लोक हो, तुम्ही श्री हरीचे नामस्मरण करा. त्याला वेळ द्यावा. दुसऱ्याचे दोष बघू नका. सगळ्यांशी गोड बोला. नेहमी परोपकार करा..
त्यांच्या किर्तनाला शेतकरी, व्यापारी, सैनिक, शिलेदार येत होते. ते त्यांना मानत होते. तुकारामांचे विठ्ठलाचे कीर्तन प्रचंड प्रमाणात सुरू झाले. त्यांनी पंढरपूर भेटीची आषाढी एकादशी ,कार्तिकी वारी सुरू केली. त्या वारीला जाताना त्यांच्यासोबत वारकऱ्यांचा घोळका असे. पंढरपूरला जाताना ते वाटेत मुक्काम करत ,कीर्तन करत, प्रवचन करत ते जात.
त्यांचे समाजरक्षण कार्य विठ्ठलाच्या साह्याने केले. महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला . त्याचा कळस तुकारामांनी चढवला. विठ्ठल भक्ती ही प्रभु पदी जाण्याचे एकमेव साधन आहे. अशी ही विठ्ठल भक्ती कोणीही करू शकतो. त्याची ओळख तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वरांनी जगाला करून दिली.
संत तुकाराम महाराजांनी स्वतःच्या जीवनाकडे स्पष्टपणे पहात अनेक अभंगात आपल्या जीवनाच्या प्रसंगाचे वर्णन केलेले आहे .त्या कारणाने संत तुकारामाचे जीवनचरित्र समजून घेता येते. त्यांचे जीवन खडतर दिव्य आणि पारमार्थिक आहे.
तुकाराम महाराज सतरा वर्षाचे झाल्यावर त्यांच्या घरात एका पाठोपाठ एक दुःखाचे प्रसंग आले. तुकाराम महाराज तेरा वर्षाचे झाल्यावर त्यांच्या वडिलांनी सावकारी व्यापार आणि इतर व्यवहार हळूहळू त्यांच्याकडे सोपवले. तुकारामानी ते व्यवहार जबाबदारीने राखले.
तुकारामांचे आडनाव अंबिले होते आणि कुळ मोरे होते. त्यांचा व्यवसाय वाण्याचा होता.
संत तुकारामांच्या अभंग गाथेला मराठी साहित्यात श्रेष्ठ स्थान आहे .त्यांची भाषा साधी, सोपी ,रसाळ ,ओघवती आहे . त्यांची अभंगवाणी सुभाषितांनी नटलेली आहे. त्यांची अभंगवाणी संत परंपरेचे शाश्वत आभूषण आहे .
तुकाराम महाराज साक्षात भक्ती आणि पारमार्थिक समता, बंधुता ,भक्तीशाही होते... वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी विठ्ठल भक्तीने संत तुकाबोरायांनी प्रचंड कीर्ती मिळवली . संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायामध्ये अमर झाले .त्यांची वाणी महाअभंग झाली. ते विठ्ठल चरणी लीन झाले.
जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचे बंधू कान्होबांची मुलगी संत भागुबाई होती. तीसुद्धा विठ्ठल भक्त होती. त्यांचे शिष्य निळोबाराय झाले. कान्होबा यांनी आपल्या अभंगाची रचना
" तुकायाबंधू " या नावाने केली . पांडुरंग म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तोच विष्णू. त्याच्याशी तुकाराम महाराजांनी अनेक वेळा भांडणे केली. भक्ती केली. वाद-विवाद केले. जगाचे गाऱ्हाणे मांडले .त्याची स्तुती गायली. पंढरीचा राजा पांडुरंग विठ्ठल, समाजाच्या हितासाठी जागृत होता. याची तुकारामांना खात्री होती.
ज्या विठ्ठलाने तुकारामांना घडवले. तो पांडुरंग..
तो विठ्ठल. धन्य धन्य होय.
जय जय राम कृष्ण हरी...
मार्च १६५० या दिवशी संत तुकाराम यांची इहलोक यात्रा समाप्त झाली. तुकाराम महाराजांनी मराठीप्रमाणे हिंदीतही अभंग रचना केलेली आहे. तुकारामांचे काही सुप्रसिद्ध अभंग पुढीलप्रमाणे आहेत.
१. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे..
२. खेळ मांडीयेला वाळवंटी काठी
३. कानडीने केला मराठा भ्रतार...
४. आधीच आळशी। बरी गुरूचा उपदेशी
५. आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी
६. आत हरी बाहेर हरी.
७. आले देवाचिया मना । तेथे कोणाचे चालेना
८. एकमेका सहाय्य करू। अवघे धरू सुपंथ
९. मन करा रे प्रसन्न ।सर्व सिद्धीचे कारण
१०. याज साठी केला होता अट्टाहास
११. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.
१२. हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा
१३. भेटी लागी जीवा ।लागलीसे आस
१४. भाव तैसे फळ। न चाले देवापाशी बळ
१५. भिक्षापात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे
१६. बोलावा विठ्ठल... पहावा विठ्ठल...
१७. प्रेमसूत्र दोरी। नेतो तिकडे जातो हरी
१८. पाषाण देव। पाषाण पायरी। पूजा एकावरी। पाय ठेवी
१९. वैद्य वाचन भीती जीवा । तरी कोण ध्याते देवा
२०. पहिली माझी ओवी...
२१. देव घ्या कुणी । देव घ्या कुणी
२२. न लगती सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण
२३. आम्ही जातो आमच्या गावा। आमुचा राम राम घ्यावा
२४. धन्य आजि दिन ।झाले संतांचे दर्शन
२५. तुझे आहे तुजपाशी। परी तू जागा चुकलासी
२६. दया क्षमा शांती। तेथे देवाची वस्ती
२७. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास
२८. तरुवर बीजापोटी। बीज तरुवर शेवटी
२९. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
३०. जे का रंजले गांजले
३१. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
३२. गाठ पडली ठका ठका। त्याचे वर्म जाणे तुका
३३. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ
३४. कन्या सासुरासी जाये। मागे परतुनी पाहे
३५. ऋद्धी-सिद्धी दासी। कामधेनु घरी। परी नाही भाकरी भक्षावया
३६. कर कटावरी तुळशीच्या माळा
३७. एकमेका सहाय्य करू। अवघे धरू सुपंथ
३८. आलिया भोगासी असावे सादर
३९. देव पहावयासी गेलो...।अन देवची होवोनी... ठेलो
४०. आनंदाचे डोही आनंद तरंग
४१. आम्हा घरी धन। शब्दांचीच रत्ने
४२. अनुरेणूया थोकडा । तुका आकाशाएवढा
४३. नाही निर्मळ जीवन। काय करील साबण
४४.रात्रं दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग
४५. भूकंती ती द्यावी भुंको। आपण नये त्यांचे शिको
४६.जाय जाय तू पंढरी.
४७. ठेविले अनंते तैसेची रहावे.
४८. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी
४९. तुका म्हणे तोचि संत सुशी जगाच्या आघात
५०. विठ्ठल गीती गावा। विठ्ठल किती घ्यावा। विठ्ठल उभा पहावा विटेवरी
अशा प्रकारचे अनेक अभंग संतश्री तुकारामांनी महाराजांनी लिहिले आहेत. इथे थोडे फार अभंग दिले आहेत. तुकाराम गाथा वाचताना अशा प्रकारचे अनेक अभंग त्या गाथेत सापडतात. तुकाराम महाराज थोर समाजसेवक होते. भगवान विठ्ठला प्रमाणे थोर समाज सुधारक होते. प्रबोधनकार होते. भगवंताच्या तोडीस तोड त्यांनी समाजसेवा केली. इतर संतांच्या पुढे जाऊन त्यांनी समाज उपयोगी अभंग रचना केली.
म्हणूनच ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस ।।
असे म्हटले जाते.
हरिनामाच्या जागरणाला तुकाराम महाराज सकाळ, संध्याकाळ स्वतःला वाहून घेत . कमरेवर हात, गळ्यात तुळशीच्या माळा, कटीला पितांबर अशा आगळ्या वेगळ्या रूपात पांडुरंग अनेक भक्तांना माऊली रूपात वाटतो. भगवंत विठ्ठलाची अनेक लोकांनी निंदा केली. त्याला नावं ठेवली .तरीसुद्धा श्री विठ्ठल भक्तावर रागावले नाहीत .त्यांना भवसागरातून तरून जाण्याचा मार्ग दिला. सदाचारा विषयी अनेकांना मार्गदर्शन दिले. दुर्जना पासून सज्जनांचे रक्षण केले. वाईट लोकांच्या तडाख्यात सापडलेल्या लोकांना भक्ती मार्ग दाखवला. विठ्ठलाच्या ठायी क्षमाशीलता योगाचे भाग्यशाली लक्षण होते. ते भगवंताने सर्वांना यथाशक्ति देऊन टाकले. तारतम्य नसलेल्या समाजाची त्यांनी संत , ओसाधू मार्फत व्यवस्थित घडी बसवली. लोकांच्या मनात हरिनामाचा जप निर्माण करण्यासाठी संतांची निर्मिती केली. त्यामध्ये सर्वांना एकत्र गुंफून ठेवले .भेदाभेद केला नाही. समाजापासून वंचित लोकांना तीर्थयात्रा घडवण्यासाठी सात्विक भाव दिला. गरीब नाडलेल्या लोकांच्या बाबतीतली तळमळ भगवान विठ्ठलांने वेळोवेळी दाखवून दिली.
भीमा , चंद्रभागा या नद्या मराठी माती सुपीक बनविणाऱ्या आहेत. त्या संतांच्या भक्तीला साक्ष आहेत. संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे अभिजात मराठी भाषा. मराठी संतपरंपरेत जीवनाशी प्रामाणिकता करणारे तुकाराम महाराज मोठे संत आहेत. विठ्ठल भक्तीचे संस्कार तुकाराम महाराजांवर लहानपणापासून झाले होते. गीता आणि भागवत ग्रंथाचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांची अनुभवाची शक्ती दिव्य होती. भामगड , भंडारा डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात चिंतन मनन, नामस्मरणाने तुकारामांना अभंग रचण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे अभंग प्रसन्न आणि प्रासादिक आहेत.
घार हिंडते आकाशी। तिचे लक्ष पिलापाशी यासारखे
अति उत्कृष्ट अभंग त्यांनी लिहिले. तुकारामांची सुवचने लोकांच्या बोलीभाषेत म्हणी आणि वाक्यप्रचार ठरली. तिचा उपयोग लोकांनी चांगलाच आपल्या व्यवहारात केलेला आढळतो.