श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 7 - अंतिम भाग Chandrakant Pawar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 7 - अंतिम भाग

लोकं अनेक प्रकारच्या निंदा करतात. नावे ठेवतात. अशी लोकं समाज बिघडवण्याचे कार्य करतात. अशा लोकांमध्ये राहून सेवेचे कार्य पूर्ण करण्यासाठी श्री विठ्ठल कृपेने अनेक लोकांची योजना विठ्ठल कृपेने तिकडे झाली. समाज, मनुष्य आणि जीवन यांची सांगड घातली गेली.

विठ्ठलाच्या कीर्तनाचा आणि प्रवचनाचा आश्रय घेऊन अनेक लोकांनी आपली मुक्ती घडवली .मोक्ष घडवला. त्यांच्यामध्ये भेदभाव राहिला नाही. नुसते विठोबाचे कीर्तन ऐकले तरी त्यांच्या डोळ्यासमोर साक्षात विठोबा येऊन उभा राहतो.विठ्ठल कीर्तनाच्या आठवणी त्यांच्या मनात येतात. त्यांच्या मनात दुसऱ्या कसल्याही विचार आस्था निर्माण होत नाही. विठ्ठलमूर्ती त्यांच्या मनामध्ये स्थिर राहते . त्या कारणाने अनेक लोकं गळ्यात तुळशीच्या माळा घालून विठ्ठल विठ्ठल असा एकतारी वर जप करतात. आपला रिकामा वेळ आहे तो वाया न दवडता विठ्ठलचरणी अर्पण करतात. उदासपण, दुःख यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात.

जन्म आणि संसाराचे त्रास, कष्ट भोगावे लागू नयेत म्हणून अनेक जण देव ओळखतात . त्यांच्यावर लोक जळतात .त्यांच्या अनेक समस्या, अनेक संकटे यातून त्यांना एकतरी मार्ग सापडतो. परंतु अनेक लोक बाह्यात्कारी भक्तीचे दर्शन घडवतात .त्यांच्या अंतकरणात वेगळे असते . बाहेर वेगळे असते अशा लोकांपासून समाज नेहमीच सावध राहिला आहे. स्वतःला विठोबाचे भक्त दाखवायचे आणि इतरांना फसवायचे असे काही लोकं करतात विठोबाच्या नावाने सज्जन होतात, साधी होतात. त्यांच्या मनात वेगळे विचार असतात. त्यात त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. अशी लोक ओळखण्यासाठी विठ्ठलाच्या भक्तीमध्ये दंग राहून त्यांना ओळखता येते .असे लोक फारच निर्दयी असतात. ते स्वतःच्या तुंबड्या भरतात. आणि इतरांना गंडवतात.

मनुष्याच्या शरीरातील भक्तिभावा मुळे त्याच्या देहाला देवपण आहे. विठ्ठलाने आपल्यावर उपकार केले याची आठवण त्याला होत राहते .तो मग इतरांना प्रेम देण्याचा प्रयत्न करतो.
विठ्ठलाच्या नामस्मरणाने मनातील भय निघून जाते. संकोच निघून जातो . चोखंदळपणा येतो .शोकपणा निघून जातो याची प्रचिती अनेकांना झालेली आहे. त्याचा अभिमान त्यांना आहे. हरीच्या प्राप्तीचे भान आणि ज्ञान त्यांना निर्माण होते. मनातील वाईट विचार निघून गेल्यामुळे मन निर्मळ बनते .त्याचा लौकिक वाढत राहतो . अनेक दुर्गुण शरीरातून निघून जातात. मनातून निघून जातात सगुण शरीरामध्ये प्रवेशतात अशी आश्चर्यकारक घटना विठ्ठलाच्या भक्तीने अनेकांच्या मनामध्ये निर्माण होते. त्याचे समाधान त्यांना लाभते. तीच श्री विठ्ठलाची भक्ती आहे .हीच जीवनाची इच्छा आहे. ते भक्तीचे दास बनतात. त्यांचे शरीर जरी त्यांना साथ देत नसले तरी मनाने ते चांगल्या मार्गाकडे वळते.

जीवनाने स्वीकारलेले विठ्ठल ब्रीद शरीराच्या हाती देणे असे प्रकटपण निर्माण होते . शरीर हे भक्तीचे आश्रित आहे. त्याच्यामध्ये दया असते. भक्ती असते. इच्छा असते .त्याची ओळख माणसाला होते. जीवनाचा भरोसा वाढतो . श्रीविठ्ठल योगाने त्याचा उद्धार करतो. शरीर विठ्ठलाशी एकरूप होते .त्याचा सन्मान वाढतो. मालकपणा जाऊन सेवक भाव तयार होतो. समाजाविषयी आदर निर्माण होतो .दुसऱ्या व्यक्तीविषयी प्रेम निर्माण होते. अज्ञान निघून गेल्यामुळे त्याच्या आयुष्याचे चिंतन वाढते.

हे सर्व जे आहे ते समाजसुधारकाचे गुण आहेत.
प्रज्वल प्रबोधनाचे सुख आहे. समाजाविषयी मन अनुकूल होते समाजाची सेवा करण्यासाठी बुद्धी सुदृढ बनते. शरीर दुबळे झाले असले तरी अनेक जण समाज सेवा करत करत आपला देह सोडतात. चांगले नाव कमावतात .दीर्घकाळ त्यांची कीर्ती राहते . ही ओळख त्यांना पांडुरंग शिकवतो.

पांडुरंग भक्ति ने जे विकार देहातून बाहेर पडले ते पुन्हा आपल्या स्पर्श करतील की काय या भीतीने ते सर्व दोष पिटाळून लावण्यासाठी मनुष्य पुण्याचे काम करत राहतो. सांसारिक गोष्टीला घाबरुन तो त्यामध्ये आणखीन आणखीन गुंतत राहतो. प्रपंच करत राहतो. कुटुंबाचे लाड करतो. मुलांचा सांभाळ करतो. पत्नीची इच्छा पूर्ण करतो. गावाला घर बांधतो. नातेवाईकांमध्ये मिरवतो. परंतु हरीची प्राप्ती ही त्याची भक्ती आहे हे तो विसरत नाही . विठ्ठल तत्त्व नीट लक्षात ठेवले की अनेक लोकांच्या अंगी परोपकार शक्ती निर्माण होते. दुसऱ्यावर दया करणे, दुसऱ्याला मदत करणे. हे चांगल्या माणसाचे भांडवल आहे .त्या भांडवलाने मनुष्याला किर्तीचे भरपूर वैभव प्राप्त होते .अनेक लोक असे असतात की दुसर्‍या माणसाचे विघ्न हरण करतात. त्यांना मदत करतात. त्यांना संकटाचे भय अजिबात नसते. ते स्वतःला त्या प्रवाहात वाहून टाकतात अशी लोकं प्रबोधनाच्या साह्याने निर्माण होतात.

प्रबोधन आणि सुधारणा , श्रद्धा आणि नियम यांची आराधना जी बुद्धी करते अशी माणसे मोठी होतात. त्यांचे व्यवहार आणि उपासना समाज साक्षर ठरते. तो पुरावा त्यांना फारच उपयोगी ठरतो .सज्जन लोकांनी परमार्थाचे दुकान चालवायला घेतले. तर परमेश्वर त्यांचा ग्राहक बनून येतो. भक्ता जवळचा हरिभक्तीचा साठा आहे. तो स्वतःकडे घेऊन पुन्हा त्याचे दान त्या भक्तांना व त्या संतांना देतो. असे भांडार विठ्ठलाकडे भरपूर आहे. त्या भांडारगृहाचा मालक समाज आहे.
शरीराचा अभिमान प्रबळ होईल अशी अपेक्षा असते ती जेव्हा निर्माण होते तेव्हा इतरांची निंदा आणि मत्सर घडतो याचा विसर ज्या लोकांना पडतो ते लोक दुय्यम ठरतात. तिथे सज्जनाला जाण्याला रस्ता मिळत नाही. त्याच्या हृदयात प्रेम, चिंता आणि तळमळ तिथल्यातिथे नष्ट होते. मग अनेक लोक वाममार्गाला लागतात .बिघडतात . तो संगतीचा परीणाम असतो. विठ्ठलाचे नामस्मरण विसरले जाते . अशी लोकं आयुष्याच्या शेवटी स्वतःला दोष देतात . मी संगतीने बिघडलो. मला नशिबाने वाचवले नाही. असा दोष स्वतःच्या नशिबाला देतात. आणि आयुष्यभर रडत बसतात.

समाजामध्ये अनेकांना आनंदाचा भोग गीता येत नाही. ती जाणीव त्याला निर्माण होते तेव्हा त्यांना दुःख होते. त्यांच्या चुकाकडे ते बघत बसतात . आपल्या संकुचित मनाला ते साद घालीत नाहीत. त्यांचे शरीर ज्ञानाच्या अग्नीने पेटत नाही. त्यांना अमृत संजीवनी मिळत नाही.अशावेळी ते देवाला दुषणे देतात. तुझ्यामुळे झाले. तू मला मदत केली नाहीस. असे निरर्थक रडगाणे ते गातात. यातून सुटण्यासाठी अनेकदा विठ्ठलाच्या महावाक्य रुपी शब्दांचा कैवार घेतात. विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. भक्तांच्या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी करत काम, क्रोध ,मत्सर हे विकार हरण करीत विठ्ठलाच्या मूर्ती पर्यत पोचतात. विठ्ठलाच्या चरणाला हात लावतात. ते भक्तीमार्गात असतात. परंतु त्यांचे लक्ष सगळं वाईट मार्गाकडे असतं .ते देह
रोगी असतात. सज्जना प्रमाणे नसतात .अशा लोकांना सुबुद्धी नसते. दुर्बुद्धी असते. याचं भान त्यांना नसतं आणि मग ते उदास म्हणून जगतात.

अशी लोकं इतरांना सांगत असतात की देव माझं काम करत नाही. तो माझं ऐकत नाही. ते मंदिरांमध्ये हेलपाटे घालत राहतात. देवाने आपले काम करावे. पण त्यांच्या शरीराने देवाची सेवा करावी. असे त्यांच्याकडून घडत नाही. पांडुरंगाची शब्दाने स्तुती केल्याने पांडुरंग प्रसन्न होतो अशी त्यांची समजूत असते. परंतु मनुष्य ईश्वराच्या सेवेत चूक करतो हे त्याला समजत नाही. तरीपण विठ्ठल त्यांच्या चुकांना माफ करतो. त्याला शिक्षा देत नाही. देवाचा हा दैवी गुण अशा सर्वांचा उद्धार करतो. दुष्ट लोक असे असतात . वाईट लोक सुद्धा तसे असतात. त्यांची दुर्बुद्धी जी असते ती त्यांना वाईट कार्य करण्याची प्रेरणा देते. म्हणून दुर्जन जे आहेत. ते समाजाला ओझे झाले आहेत ते ओझे वाहण्याचा भार आहे तो इतरांवर येऊन पडतो .म्हणून अशा समाजाला प्रबोधन देण्यासाठी श्री विठ्ठल भक्ती रूपाच्या सहाय्याने भक्तांच्या सानिध्यात येऊन त्यांना मार्गदर्शन करतो. त्यांचे विकार हरण करतो. वाममार्गाला जे त्यांचे शरीर लागलेले आहे ते उत्तम मार्गाला घेऊन येतो. त्यांना माणूस म्हणून घडवतो. विठ्ठलाला कोणाचा राग येत नाही .त्याला कितीही कष्ट पडले तरी तो स्वतःच्या शक्तीचा विचार करत नाही.
तो सर्वांना समान दर्शन देतो .विठ्ठलाचे चरण हे समचरण आहेत. सर्वांना समान न्याय देणारे आहेत. त्याची नजर सर्वांसाठी समान आहे. त्यामध्ये दुबळा, गरीब असेल त्या मनुष्याच्या अन्नाची सोय तो करतो. त्यांना जेवायला घालतो. त्या बदल्यात मनुष्य वाटीभर नैवेद्य तयार करतो आणि आपल्या हातून विठ्ठलाची सेवा घडली म्हणून तोरा मिरवतो. दुसऱ्याची सीमित चूक झाली तरी दुसऱ्याकडे बोट दाखवतो. पण स्वतःची मोठी चूक झाली तर तो ती लपवून ठेवतो.

पांडुरंग सेवा अनेकांच्या वाट्याला येत नाही. केवळ शब्दांनी देवाची स्तुती केल्यामुळे देव त्यांच्या पदरात काहीच टाकीत नाही असं होत नाही. अनेक लोक देवाकडे रोज मागणे मागतात. मला देवा हे हवे आहे. देवा मला ते दे. पण देव काही त्याला काही देत नाही. मग ते देव रागवतात . ते त्याला दुषणे देतात . ते पुढे पुढे पुढे नास्तिक सुद्धा बनतात. त्यांचे संसाराकडे लक्ष लागत नाही. त्यांचे भक्तिमार्गाकडे लक्ष राहत नाहीत. अशी लोक समाजामध्ये अफवा पसरवतात. अशा लोकांचे निर्दालन किंवा त्यांना योग्य मार्गावर नेण्यासाठी विठ्ठलाच्या प्रबोधनाची त्याच्या समाज सुधारणा स्वभावाची गरज आहे.

मनुष्य अंधश्रद्धेने बुवाबाजी कडे जातो . भगताकडे जातो. खोट्या श्रध्देने परमेश्वराकडे येतो. ज्ञानाच्या अभिमानामुळे तो ईश्वराकडे जात नाही तर तो अंधश्रद्धेकडे वळतो. त्यामध्ये त्याचा अधिक ऱ्हास होतो. अशा अज्ञानाने भक्तीचा नाश होतो . वाईट शक्तीचा उदय होतो समाजातील अनेक लोक अपराध , गुन्हे करतात .त्या अपराध्यांना शिक्षा करण्यासाठी नव्हे तर त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी, त्यांची शुद्ध भावना निर्माण होण्यासाठी, त्यांची श्रद्धा शुद्ध होण्यासाठी, ज्ञानाचा अभिमान निर्माण होण्यासाठी ,विठ्ठलाच्या प्रबोधन शक्तीचा उदय होतो. तो समाजाला खरोखरच मार्गदर्शक ठरतो. एकंदरीत मनुष्य श्रद्धेने भक्तीकडे वळतो. मूर्तीच्या ज्ञानावरील विश्वासाने तो त्या मूर्तीकडे त्याचे मागणे मागतो. मी मनुष्य आहे अशी कल्पना तो करतो स्वतःला जी काय इच्छा असेल. ती त्याच्या समोर ठेवतो .ती इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी तो मुर्तीवर टाकून मोकळा होतो. त्या मूर्तीमध्ये देवत्व असेल तर त्याच्या भावनांचा आदर होतो. नाहीतर काम मनुष्याची इच्छा अपूर्ण राहते.तशी समाज रचना होत राहते.

विठ्ठलाच्या इच्छेशिवाय झाडाचे पान सुद्धा हलत नाही. मानवी संकल्प आणि विठ्ठल संकल्प जुळतात. तेव्हा प्रबोधनाचे सामाजिक कार्य यशस्वी होते. अशा प्रबोधनाचे कार्य करण्याची संधी किंवा सेवा आपल्या हातून पूर्ण होण्यासाठी अनेक भक्त धडपडतात. त्यांना ती शक्ती प्राप्त होते. ते तसे प्रयत्न करतात सुद्धा. सुबोध मार्गाने समाजाची सेवा करतात. त्या समाज सेवेचा लाभ समाजातील सामान्य जनांना होतो. असे सज्जन कधी रागवत नाहीत. समदृष्टीने ते सर्वांसाठी कार्य करतात. समाजकार्य प्रारंभ होते.

समाजात पसरलेल्या दोषांना नियंत्रित करण्याचे काम संतांचे आहे .भक्तांचे आहे. आयुष्यातला वेळ फुकट जातो ही खंत अनेक लोकांना वाटत राहते. समाजात अजूनही भेदाभेद आहेत .जातीभेद आहे. धर्म भेद आहे. उच्चनीच भेद आणि श्रेष्ठ कनिष्ठ ,गरीब-श्रीमंत भेद आहे .वर्णभेद आहे कार्यभेद आहे. नुसती भेदाभेद आणि बजबजपुरी समाजात माजलेली आहे. पैशाच्या आणि वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मनुष्य निष्ठुर होत आहे. माणूस माणसाला ओळखेनासा झालाय. ही अनेक वर्षांपूर्वीची स्थिती आजही तशीच आहे. समाजाला प्रगती करायची असेल. जीवनात जर मोठे कार्य करायचे असेल ,आयुष्यातला वेळ फुकट घालवायचा नसेल ,तर मनुष्याने श्रम करावे. फावला वेळ मिळत गेला पण कष्ट करायला पाहिजेत. नोकरी धंदा करायला पाहिजे. रोजच्याप्रमाणे आपलं मन एका चांगल्या गोष्टीमध्ये रमवायला पाहिजे. तरच तेजस्वी आयुष्याचा प्रकाश त्याच्या आणि समाजाच्या कार्यावर पडेल.

उपासना ,श्रद्धा ,सत्संग, सात्विक भाव, भक्ती सोडून अनेक लोक भोंदू बाबांच्या मागे लागतात.त्यांना गुरु करतात. त्यामुळे शुद्ध नैतिक आचरणावर कोणाचा विश्वास राहिला नाही. विठ्ठल आणि ज्ञान साधनेने उच्च विचार आणि शुद्ध आचरणाने समाजाचे नेतृत्व करण्याचे कार्य स्वतःच्या हातात घेतले . लोकांना परमार्थ सांगितला. लोकांच्या विचारांना चालना दिली. ती संतांनी भक्तांनी समाजापर्यंत कीर्तनातून प्रवचनातून लोकापर्यंत पोहोचवली. त्याचे समाजकार्य बनले. त्याचे प्रबोधन बनले .समाज सुधारणा झाली. एकता, साधुता, समता ,ममता ,कष्टता,श्रद्धा या बाबी बाजूला राहून अंधश्रद्धा, दांभिकपणा, कल्पना बुरसटलेल्या परंपरा, ढोंगी विचार यासारख्या समाज विघातक गोष्टी आजही जनमानसाच्या हृदयामध्ये आहेत. त्या नष्ट होणे गरजेचे आहे. आजचा समाज शिक्षित आहे. अनेक लोकं शिकलेली आहेत. उच्चशिक्षित झाले आहेत. तरीही बुरसटलेले विचार अनेकांच्या मनामध्ये आहेत. त्यांची श्रद्धा , समाज भक्ती मध्ये परावर्तित व्हायला पाहिजे. तरच एखादा मनुष्य मोठे नाव कमावेल. कार्यकर्ता घडेल. नेता होईल. समाज सेवक होईल. शेवटी शेवटी समाज उपासक बनेल. त्यांच्या कार्यामुळे प्रेरीत होऊन अनेक जण समाज उपासना करतील. विठ्ठलाचे कार्य दूरवर जाईल. त्यासाठी कितीही युगे गेली तरी चालतील. मात्र समाज सुधारला पाहिजे. समाज सुधारणा झाली पाहिजे. समाज प्रबोधन व्हायला पाहिजे. त्याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी. त्याची दिशा, त्याचं मार्गदर्शन विठ्ठलाच्या शक्तीमध्ये, भक्तीमध्ये, कृतीमध्ये आढळून येते.

आषाढी एकादशीला देहू येथे श्रीमंत श्री तुकोबाराय महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा करण्यात येतो. देहूतून तुकोबांची पालखी पंढरीच्या वाटेने निघते. अनेक वारकरी देहू इथून तुकोबारायांची पालखी पंढरीला घेऊन येतात विठ्ठलाच्या भेटीला...
आळंदी वरून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते त्यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पंढरपूरच्या दिशेने निघतो तिकडचे वारकरी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी घेऊन पंढरपूरला येतात....

पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी निघते. ती सुद्धा पंढरपूरला विठ्ठलाला भेटण्यासाठी येते. तिकडचे वारकरी एकनाथ महाराजांची पालखी घेऊन पंढरीला विठ्ठलाच्या ओढीने येतात...
अशा विविध प्रकारच्या संतांच्या पालख्या वर्षानुवर्ष तीनशे वर्ष पंढरपूरला येत आहेत. त्यांची प्रथा अखंड चालू आहे .त्यांची विठ्ठल सेवा अविरत चालू आहे. तिच्यामध्ये कधीही खंड पडत नाही. विठ्ठल भक्ती अप्रतिम आहे...

रोगराई ,साथरोग या विविध समयी संतांचा पालखी सोहळा पंढरीला येण्यासाठी उत्सुक असतो. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्यांच्यामध्ये एखादेवेळी खंड सुद्धा पडतो. म्हणून पंढरीचा राया त्यांच्यावर नाराज होतो असं नाही. तो खूपच समजूतदार आहे. तो भक्त प्रेमी आहे. वेळप्रसंगी पंढरीचा राया भक्तांच्या भेटीला त्यांच्या गावाला सुद्धा येतो....

विठ्ठलाची अनेक नावं आहेत विठ्ठल ,विठोबा ,हरी, पांडुरंगा, पंढरीनाथा ,पंढरीराया. त्याचे भक्त अनेक नावाने त्याला साद घालतात. त्याला कोणत्याही नावाने साद घातली तरी तो त्या हाकेला ओ देतो.

पंढरी म्हणजेच वारकऱ्यांची काशी. वारकऱ्यांची देवभूमी... भगवान श्रीकृष्णांनी विठोबाचा अवतार घेतला अशी मान्यता आहे. श्रीकृष्ण म्हणजेच श्री विठ्ठल.

युद्ध न करता केवळ विठ्ठयोगाने समाजाला उपयोगी पडेल असे विठ्ठज्ञान व अधिकार वर्षानुवर्ष सतत विठ्ठलाने प्रदान केले. तो विठ्ठलयोग जीवनाला खूपच उपयोगी आहे. अनिष्ट गोष्टींचे नियंत्रण त्या मार्फत करता येते . विशिष्ट गोष्टींचे प्रारंभ त्यात शक्तीने करता येतो.

सामाजिक आर्थिक प्रगतीचे कारण जरी धार्मिक क्षेत्र नसली तरी अध्यात्मिक प्रगतीचे कारण मंदिर, देवळे आहेत. शरीराला अध्यात्मिक ऊर्जा देण्याचे काम अशा ठिकाणी होते. थकलेली, भागलेली ,निराश झालेली माणसे अशा ठिकाणी चार घटका जाव्यात म्हणून येतात . थोडावेळ बसतात. नामस्मरण करतात .जप करतात. चिंतन करतात. मनन करतात. तिथेच ईश्वर नावाशी तल्लीन होतात. अशा प्रकारच्या नावातले एक नाम विठ्ठल आहे. विठ्ठल हे नाव खूपच तादात्म पाहण्या सारखे वाटते.

विठ्ठलाचे नाव घेतले की त्याच्यापुढे रुक्मिणीचे नाव येते .त्याच्यापुढे त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सत्यभामा असे येत नाही. विठ्ठल रुक्मिणी असा जोडा किंवा असे आदर्श नाम नजरेसमोर चटकन येते. रुक्मिणी विठ्ठलाची प्रेमिका पत्नी होती. त्या दोघांचा प्रेमविवाह होता. आठशे वर्षांपूर्वी होऊन गेलेला प्रेम विवाह. त्या प्रेमविवाहाला भक्तांची आणि संतांची मान्यता लाभली होती. पुरातन काळच्या प्रसंगाला त्यांनी मान्यता दिली होती.

अशा समाज सुधारक आणि प्रबोधनकार असणाऱ्या विठ्ठलाला साष्टांग दंडवत . विठ्ठल नामाचे गारुड आठशे वर्षे वारकरी संप्रदायाच्या मनावर ,त्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. मग त्याला कोणी विठ्ठल नामाचा टाहो म्हणतो किंवा विठ्ठल नामाची साद म्हणतात. विठ्ठल नामाची हाक म्हणतात .ती हाक प्रत्येक वारकऱ्याला ऐकू येते . ती साद ऐकू आली की त्याला आमंत्रणाची गरज पडत नाही .तो वारकरी संप्रदाय कुणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता पंढरीची वाट धरतो. पाऊले चालती पंढरीची वाट...
अनेकांची हृदये पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेली राहतात .त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं भक्तीप्रेम पाझरू लागते. मुखाने हरिनाम बोलत ते घर सोडतात. वाजत गाजत पंढरीच्या दिशेने कूच करतात. तेव्हा त्यांना ऊन पाऊस थंडी-वारा याची अजिबात चिंता किंवा भय वाटत नाही. तोंडाने विठ्ठल विठ्ठल असे म्हणत अनेक वारकरी, अनेक स्त्रिया ,अनेक लहान थोर माणसे पंढरपूरच्या दिशेने आषाढी एकादशी कार्तिकीचा मुहूर्त गाठण्यासाठी एक दोन महिने आधी आपल्या घरातून बाहेर पडतात .खांद्यावर विठ्ठलाची पालखी असते. खांद्यावर विठ्ठलाची पताका असते. मुखी विठ्ठलाचा गजर असतो. टाळ मृदंग चिपळ्यांची साथ असते. भजन असते. प्रवचन असते. अनेक प्रकारच्या साधनाने वारकरी आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहाने पार पडतात. तेव्हा अख्ख जग तोंडात बोट घालून तो उत्सव सोहळा पाहते. त्याच्याशिवाय जगाकडे दुसरा मार्ग नसतो.
धन्य धन्य तो विठ्ठल... आद्य समाज सुधारक आणि महान समाज प्रबोधनकार...

पंढरीचा विठोबा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती संतांची मांदियाळी ज्ञानोबा-तुकाराम नामदेव संत श्रेष्ठ मंडळीचा गोतावळा म्हणजे परमात्मा विठ्ठल यांचा संसार भक्तिमय परिमळ. भक्तांचा अनुभव घ्यायचा असेल तर श्री पंढरपूर क्षेत्र सारखे दुसरे ठिकाण नाही. विठोबाचे मंदिर सर्वांना स्फूर्ती आणि प्रेरणा देते .जिद्द, चिकाटी, विश्वास, संयम देते. भक्तमंडळी तिथे एकत्र येतात. त्यामधून संतांची मांदियाळी निर्माण होते.

संकट परिस्थितीमध्ये अनुकूल परिस्थिती कशी करायची हे संतांनी जगाला शिकवले. जगाला आनंदाची प्राप्ती करून द्यावी यासाठी श्री विठ्ठलाला विशेष आनंद होत असेल. श्री विठ्ठल आणि संत मंडळींच्या दिव्य विचारांचा स्पर्श बुद्धीला झाला की अज्ञान आपोआप निघून जाते. संतांची आणि विठ्ठलाची संगत म्हणजे मोठ्या पुण्याईची गोष्ट . विठ्ठल महिमा म्हणजे साक्षात सदैव सत्संग आहे... महाराष्ट्रा मध्ये संतांची मांदियाळी आहे पंढरपूर .....
महाराष्ट्राची सत्संग राजधानी आहे. श्री विठोबाने लोकांना एकात्मतेचे तत्त्वज्ञान दिले, समता, प्रेम दिले. संसारात राहून परमार्थ कसा साधायचा याचे ज्ञान दिले .संतांनी विठ्ठलाचे तत्वज्ञान लोकांपर्यंत आणले ,लोकांना सुखी जीवन जगण्याचा बोध त्यांनी केला .कर्मकांडात गुंतलेला समाज जागा केला. विठ्ठल भक्तीच्या पुण्याईने महाराष्ट्रात अनेक संत निर्माण झाले. विठ्ठलाच्या प्रबोधनशक्तीची ही जागृत पोचपावती आहे.

जय जय हरी विठ्ठल.... राम कृष्ण हरी.....
ज्ञानबा तुकाराम जय हरी विठ्ठल...
ज्ञानोबा माऊली विठ्ठल विठ्ठल...

पंढरीनाथ महाराज की जय...
तुकाराम महाराज की जय...
ज्ञानेश्वर महाराज की जय...

चंद्रकांत पवार: ७४००२१७२१५
टिटवाळा ( ठाणे ) कल्याण,