अचूक वेध मेघराज शेवाळकर द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अचूक वेध



एंकाउंटर स्पेशालिस्ट, कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर म्हणून ख्याती असलेला समर जाधव.. आपल्या पत्नीसोबत रहात होता. दिसायला देखणी.. वसुधा सकाळी उठली अन अंगणात आली.. पेपर उचलून घेत माघारी वळाली.. पण काहीतरी असल्यासारखं वाटल्याने परत वळाली.. एक कागदी बोळा पडलेला दिसला.. तीने तो उचलून हातात घेतला.. तो उघडून बघताच ती घाबरली अन जोरात किंचाळली.. तिचा आवाज ऐकताच शेविंग करणारा समर धावतच बाहेर आला.. समोर वसुधा बेशुद्ध अवस्थेत होती. त्याने तिला उचलून घरात आणले.. बेडवर झोपवले.. तोंडावर पाणी शिंपडले..
" वसू.. वसू.. " समरने आवाज दिला.
वसुधा शुद्धीत आली.. समरने तिला पाणी पाजलं..
" काय झालं वसू? किंचाळलीस ? " समरने तिचा चेहेरा ओंजळीत घेतला.
" ती.. ती.. ती चिट्ठी !" भेदरलेली वसुधा उत्तरली.
" कसली चिट्ठी? " समर म्हणाला अन बाहेर आला.
वाऱ्यामुळे पेपर अस्ताव्यस्त पडला होता.. समरने पेपर गोळा केला.. त्याने चिट्ठीसाठी सर्वत्र नजर फिरवली.. झाडाच्या फांदीवर एका चुरगळलेला कागद दिसला.. "वाऱ्याच्या झोताने उडाला असेल! " समरच्या डोक्यात विचार आला. त्याने तो कागद घेऊन वाचला..
" इन्स्पेक्टर १० दिवस .. फक्त १० दिवस बायको सोबत सुखात जगून घे.. ११ वा दिवस पहाणार नाहीस."
चिट्ठीतील मजकूर वाचून तो विचारात गढून गेला.. तो वसुधा जवळ आला.. ती अजूनही धक्क्यातून सावरली नव्हती..
" समर... दहा दिवस कुठेही जाणार नाहीस... विषाची परीक्षा पहायला नको.. " वसुधा म्हणाली.
" वसू ज्याचं नाव घेताच गुन्हेगाराच्या मनात धडकी भरते अशा ऑफिसरची बायको आहेस.. अशा धमक्या येतंच असतात.. मला सवय आहे.. " समजावत समर म्हणाला.
" ते मला काहीही माहिती नाही.. मी तूला कुठेही जावू देणार नाही.. " वसुधा म्हणाली.
" एक ऑफिसर छोट्याशा गुन्हेगाराला घाबरुन घरात बसला.. डिपार्टमेंट.. कलीग्ज ह्यांच्यात काय इज्जत राहिलं माझी..!" समर म्हणाला.
वसुधाने आपल्या भात्यातून ब्रम्हास्त्र बाहेर काढलं.. तिचे अश्रू बघून समरने तिला मिठीत घेतले..तिच्या पाठीवरुन हात फिरवत म्हणाला.. " तू काळजी नको करुस.. तुझ्यासाठी पोलीस प्रोटेक्शन मगवतो.. अन माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे.. इथे पाहऱ्यावर शिपाई असल्यावर तूला कसलीही भीती रहाणार नाही. "
आता वसुधा सावरली होती.. प्रोटेक्टशन चं ऐकुन तिला हायस वाटलं.
समरने हि गोष्ट वरिष्ठाच्या कानावर घातली.. त्यांचही तेच मत पडलं की समरने दहा दिवस घरीच थांबावं.. पण समरने नकार दिला.. घरी मात्र चार पोलीस पहाऱ्यावर नेमले. सात दिवस उलटून गेले.. समर ड्युटीवर जातच होता.. वसुधाच्या मनात धाकधूक होती.. पण तिचा आपल्या नवऱ्यावर त्याच्या कर्तृत्वावर विश्वास होता..

सकाळी समर अंगणात पेपर वाचत बसला होता.. गेटवर पोलीस उभे होते.. वाचताना त्याच लक्ष बाहेरच्या रस्त्यावर गेले.. नेहमीसारखी वर्दळ सुरु होती.. गेट समोर एक भिकारी ठाण मांडून बसला होता.. तो टकलावून समरकडेच पहात होता.. समर उठला.. तसा तो भिकारी तिथून निघून गेला.. समर आवरुन पोलीस स्टेशनला गेला.. नेहमी प्रमाणे त्याच्या दिवस घामघुमीत गेला.. चोरी, घरफोडी.. त्यांचा तपास.. रिमांड साठी कोर्टात ने आण.. सारं पारं पाडून तो घरी आला.. गाडीतून उतरुन आत आला.. दरवाजा उघडेपर्यंत त्याचं लक्ष रस्त्याकडे गेलं.. सकाळचाच भिकारी तिथे बसला होता.. दरवाजा उघडला गेला म्हणून तो आत आला.
" तूला म्हणालो होतो.. अशा धमक्या येतचं असतात.. त्यात घाबरण्यासारखं काही नसतं.. " बेल्ट काढत समर म्हणाला.
" आम्हां बायकांचं मन नाहीच कळायचं पुरुषांना अन तुझ्यासारख्या दगडाच काळीज असणाऱ्याला तर अजिबातच नाही.. " वसुधा म्हणाली.
" माझं दगडाचं काळीज काय? थांब दाखवतोच तूला.. " खट्याळपणे समर म्हणाला.
" फाजीलपणा पुरे.. तिकडे गॅसवर चहा उकळतोय.. " त्याला दूर करत वसुधा किचनकडे गेली.
" अशात अजिंक्य आलाच नाही? " समरने विचारले.
त्याच्या प्रश्नाने वसुधा गडबडली.. हातातील कपबशी वाजू लागली.
" अं.. नाही.. तो नाही अन त्याचा फोन पण नाही.. " वसुधा अडखळत म्हणाली.
" का गं? काही अडचण आहे का? तसं असलं तर आपण मदत करु.. " समर म्हणाला.
हयावर वसुधा काहीही न बोलता निघून गेली.
दुसऱ्या दिवशीही समरला तोच भिकारी त्याचं जागेवर बसलेला दिसला... समरने त्याला निरखून पाहिले.. खिशातील दहाची नोट त्याला दिली, अन निघून गेला.
रात्री आला तेव्हाही तो भिकारी तिथेच होता.. आता मात्र त्याच्या मनात शंकेची पाल चुकचूकली..
" हा भिकारी आहे.. तर येणाऱ्या जाणाऱ्याला भीक मागताना दिसतं नाही? " त्याच्या मनात आलेल्या शंकेच निरसन करण्यासाठी तो बाहेर आला.. पण तो भिकारी तिथे नव्हताच.. सकाळी चौकशी करता येईल म्हणून तो आत गेला..

समर बाहेर आला.. रस्त्यावर तो भिकारी दिसतो का? तो पाहू लागला.. तो भिकारी कुठेच दिसतं नव्हता.. आज एक विक्रेता तिथे बसला होता.. समर बाल्कनीत आला.. तिथे खुर्चीत बसला.. अचानक एक जण समोर आला.. समरच्या कपाळावर रिव्हालवर ताणल गेलं.. समरने नजर उचलून पाहिलं.. तो तोच भिकारी होता..
" सांगितलं होतं दहा दिवसांनी.. " तो म्हणाला .
समरने शिपायांना आवाज दिला..
" काहीही उपयोग नाही.. त्यांना आधीच बेहोश केलंय.. " तो म्हणाला. समरने समोर नजर टाकली.. शिपायी बेशुद्ध पडले होते..
समरने हलण्याचा प्रयत्न केला..
" मुकाट्याने बसून रहा.. माझ्या साथीदाराने तूझ्या बायकोवर बंदूक ताणलेली आहे.. गडबड केलीस.. तिचा मुडदा पडेल.. " तो म्हणाला अन त्याने स्ट्रीगर दाबला. समरने आपले डोळे मिटले.. गोळीचा आवाज झाला.. काही क्षण गेले.. समरने डोळे उघडले.. तो समोर नव्हता त्याने खाली पाहिले.. त्याचा मुडदा पडलेला होता... गोळीचा आवाज ऐकुन वसुधा धावत आली.. समोर पडलेल्या भिकाऱ्याच्या हातातील रिव्हॉल्वर घेऊन ती समरवर ताणली..
डोळ्याचं पात लवत न लवत तोच पुन्हा आवाज आला.. वसुधा जमिनीवर कोसळली..
" वसू.. वसू.. " समरने आवाज दिला.. तिचे प्राण गेलेले होते..
समरने रस्त्यावून धावत येणाऱ्या विक्रेत्याला पाहिले.. तो आत आला..समर समोर येताच त्याने समरला सॅल्यूट केला.. सोबत चार शिपाई सुद्धा आले होते.
" सब इन्स्पेक्टर.. अविनाश.. गूड जॉब.. पण वसूधाला का मारलंस?.. " समर म्हणाला.
" सर हया भिकऱ्याकडे निरखून पहा.. हा तुमचा फॅमिली फ्रेंड अजिंक्य पाटील.. " अविनाश म्हणाला.
समरने त्याला निरखून पाहिले.. अजिंक्यच होता..
" कमिशनर साहेबांनी तुमच्या सुरक्षेसाठी मला ऑनड्युटीवर ठेवलं होतं.. दहा दिवस मी शोध घेत होतो.. तेव्हा अजिंक्यच्या प्लॅनची माहिती कळली.. " अविनाश म्हणाला.
" हो.. पण वसुधा? तीने मला मारण्याचा प्रयत्न करावा? का केलं असेल तीने? ती जिवंत असती तर विचारलं असतं.. आता सारं अनुत्तरीत राहिलं.. " समर म्हणाला.
" सर तुमच्या मिसेस अन अजिंक्य.. दोघांत अनैतिक संबंध होते.. तुम्हाला संपवून लग्न करण्याचा कट होता त्यांचा.. " अविनाश म्हणाला..
सारे सोपस्कार करुन दोन्ही डेडबॉडीज पोस्टमॉर्टम साठी नेण्यात आल्या.. समरचा जबाब नोंदवून.. सबइन्स्पेक्टर अविनाश निघून गेला.

टेबलवर व्हिस्की, सोडा च्या बॉटल्स ठेवलेल्या होत्या.. समरने ग्लास मध्ये व्हिस्की ओटली.. जवळ असणाऱ्या ओपनरने सोडाबॉटलचं झाकण उघडलं.. तो सोडा ग्लासमध्ये ओतला.. आईस क्यूब टाकले.. ग्लास उचलत एक घोट घेतला.. समोर ठेवलेल्या डिश मधील खारवलेले काजू तोंडात टाकले..

" अजिंक्य.. पुरे आता.. माझ्याच्याने समर सोबत खोटं खोटं प्रेमाचं नाटकं नाही करणं होणार!" अजिंक्यच्या मिठीत विशावलेली वसुधा म्हणाली.
" त्याने तूला स्पर्श केलेला मलाही सहन होतं नाही.. असं वाटतं रिव्हॉवर मध्ये असणाऱ्या सर्वच्या सर्व गोळ्या त्याच्या छातीत घालाव्या.. " अजिंक्य तिच्या गोऱ्या पाठीवर हात फिरवत म्हणाला.
" मग वाट कसली पहातो आहेस.. लवकरात लवकर संपव त्याला.. " वसुधा म्हणाली..
" ठिक आहे.. आज पासून येत्या काही दिवसात तो या जगात नसेन.. " अजिंक्य म्हणाला.

" वसू तू मला धोका देशील असं वाटलं नव्हतं.. मनात आलं होतं.. त्याक्षणी दोघांना गोळ्या घालव्यात.. पण तुमच्या चुकीच्या शिक्षेमुळे मी का फासावर जावू.. मग ठरवलं तुम्हां दोघांना संपवायचं.. पण हुशारीने.. मग मीच रक्ताने लिहिलेली चिट्ठी अंगणात टाकली.. मला खात्री होती.. तुम्ही दोघे हया संधीचा फायदा घेण्यासाठी पुढे याल.. त्या अजिंक्यला वाटलं भिकाऱ्याच्या वेषात माझ्यावर पाळत ठेवतो.. मला कळणार नाही... अरे घारीची नजर आहेत या समरची.. पाहताक्षणीच ओळखलं होतं. कमिशनरला ते पत्र दाखवून प्लॅन बनवला.. त्यादिवशी त्या अविनाशच्या साथीने हल्ला करणाऱ्याचा एंकाऊनर केला.. माझा काम झालं.. ते सुद्धा कायदेशीर.. तू बरोबर म्हणाली होतीस.. माझं दगडाच काळीज आहे.. " समरने हातातील ग्लास उंचावत हार घातलेल्या वसुधाच्या फोटोकडे पाहिलं..
" अविनाशचा नेम चांगला आहे.. अचूक वेध घेतला त्याने.. " मनातल्या मनात समर म्हणाला.. अन त्याच्या ओठांवर हसू फुलले..

|| समाप्त ||

मेघराज शेवाळकर