आईपण आणि आई पण... siddhi chavan द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आईपण आणि आई पण...

" आई! माझे केस बांध ना ग." तिने अस्ताव्यस्त पसरलेले आपले केस बेजुला करून, आपल्या डोळ्यावरचा चष्मा नीट करत विजूकडे पहिले.

"हो."
सदा चा डब्बा भरून विजू त्याचा नाश्त्याची तयारी करू लागली.

"आई, भावे काकांना सांग ना, 'मला गार्डन मध्ये घेऊन जायला.' "
कपाटातली लाल बाहुली, थोडी तुटकी-मुटकी खेळणी आणि आपल्या मेकपचा छोटा किट घेऊन, ती आता भातुकली खेळायला बसली होती.
विजू वरती न पाहताच "हो " म्हणाली .

"सदा ! तू नाश्ता करून घे, आठवणीने डबा देखील बॅग मध्ये भर रे. मी तिला भरवून घेते. "

पोह्यांच्या दोन प्लेट्स भरून विजूने त्यावर कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा यथेच्छ शिडकारा केला. थोडीशी बारीक शेव आणि खारे शेंगदाणे पसरून प्लेट्स घेऊन ती भातुकलीच्या खेळात सामील झाली.

" चला नाश्ता करा, नंतर खेळ हा दिवसभर."

" नाही आई. मला पोहे नकोत. दूध बिस्कीट पाहिजे. दूध बिस्कीट... " ती नाक ओढत विजूशी हट्ट करू लागली होती.

" माऊ, रोज दूध-बिस्कीट नाही खायचं, पोहे खाऊन घे, मग ग्लासभर दूध घे."

" नाही. मी नाही, जा! पाय आपटत ती जाऊन भिंतीला टेकून बसून राहिली."

" माऊ, डॉक्टरांनी काय सांगितल ' रोज बोस्कीट चालणार नाही. नाहीतर तू मोठी कशी होणार?' आणि परत आजारी पडलीस तर, ते पुन्हा तुला मोठ्ठ इंजक्शन देणार. "

"डॉक्टर, नको ना ग आई. मी खाते हे पोहे."

इंजक्शनच्या भीतीने ती पटकन येऊन बसली, आणि पोह्याने बकाने भरू लागली. आर्धी डिश पोहे तर अंगावरील कपड्यांवर सांडले होते. तिचा गुढग्यापर्यंत आलेला गाऊन सरळ करून विजूने गोळ्यांची पाकीट उघडली. एव्हाना सदा तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी बाहेर आला होता.

"कशी आहे आई, तिच्या तब्येतीत काही सुधारणा होते का? " विजूच्या कानात हळूच पुटपुटत त्यांना विचारले.

"जैसे थे !" विजूही हळू आवाजात उत्तरली.

"जयवंत ला काय सांगू मग? ते लोक तुला पाहायला यायचं म्हणत आहेत."

" नको एवढ्यात. " विजूने नकारार्थी मान हलवली.

"ताई असं काय करतेस. आईसाठी तू अजून किती वर्षे थांबणार आहेस. आता तुला तुझा विचार करायला हवा."

"तू लग्न कर. तुझी बायको आली ना घरी, की मग माझं पाहुया." विजूने आपली थंड झालेली पोह्यांची डिश हातात घेतली. एक-एक घास तोंडात टाकत त्याबरोबरच पाकिटातून काढलेली एक-एक गोळी ती आईला देऊ लागली.

" ताई मी आत्ता ग्रॅज्युएट झालोय. माझ्या लग्नाला खूप वेळ आहे ग अजून , बघ तू विचार कर. "

"आधी तू विचार कर रे, माझं लग्न झाल्यावर आईच काय. ती बिना आईची राहील का? आपण लहानपणी आईशिवाय एकही दिवस राहायचो नाही. आता तिचं लहानपण आहे, मग तिला अशी वाऱ्यावर सोडायची. पटत का ते तुला? "

विजूच्या या नेहमीच्याच उत्तरावर हिरमुसलेला सदा न सांगताच बाहेर पडून ऑफिसला निघून गेला. आईही आपल्या भातुकलीच्या राजा बरोबर तिच्या खेळात रमून गेली.

विजूच्या मनात विचार आला,
'खरचं, डॉक्टरानी सांगितल्याप्रमाणे आईच्या डोक्याची सर्जरी केली तर, ती बरी होईल का? त्याचे चान्सेस पण ५०-५० आहेत. तसे झाले तरीही यातून तिला काय मिळणार? त्या जुन्या आठवणी.... पुराच्या पाण्यात वाहून गेलेले बाबा, आणि त्यामुळे डोक्याला मर लागून तिला येणारे वेडाचे असह्य झटके, त्यामुळे झालेला स्मृती संभ्रम, पैश्याच्या पायी मोडलेला माझं लग्न.

भारी भारी तर तिला आठवेल की, ती दोन मुलांची आई आहे, म्हणजे एक मोठया जबाबदारीच ओझं... दुसरं काहीच नाही.
मग... मग कशाला हवं ते मोठ होणं. ती लहानच बरी आहे, त्यात तिचा भातुकलीचा राजा आहे. कसलीही चणचण नाही. की उद्याची चिंता नाही. नुसतं दिवसभर खेळायचं. अगदी... अगदी मनसोक्त.

"उगाच म्हणतात ते, लहानपण देगा देवा." म्हणत उठून विजूने आईच्या अंघोळीची तयारी करायला घेतली.
"चला माऊ, अंघोळीला. "

आई देखील आज्ञाधारक मुलाप्रमाणे तिच्या मागून न्हाणीघराकडे निघाली.

समाप्त.

{https://siddhic.blogspot.com}