आरोग्यम धनसंपदा संदिप खुरुद द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आरोग्यम धनसंपदा

मुलगी पहायला जाण्याची ही वैभवची सोळावी वेळ होती.आई-वडील व आपल्या जवळच्या मित्रासोबत तो आज नगरला मुलगी पहायला आला होता.जेवण झाल्यानंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी इतकी विलक्षण सुंदर होती की,तिच्यापुढे सुंदर हा शब्दही फिका पडावा. पौर्णीमेच्या पूर्ण चंद्राचे तेजही तिच्या मुखचर्येवरील तेजापेक्षा गौण भासावे.तिचे गुलाबी ओठ, मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात, रेखीव भुवया, चाफेकळी नाक व गौर वर्ण हेच तिचे सौंदर्य अलंकार होते. या सौंदर्याला नजर लागु नये म्हणूनच की काय, देवाने तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर ओठांच्या खाली काळया तिळाची मोहर उमटवली होती.तिचा साचेबद्ध,रेखीव बांधा तिच्या दैवी सौंदर्यात आणखीनच भर घालत होता. म्हणूनच वैभव तिला पाहिल्यापासून बेचैन झाला होता.

चप्पलच्या निर्मीतीची मोठी कंपनी त्याच्या नावावर होती.जवळपास दिडशे कामगार त्याच्या कंपनीमध्ये कामाला होते. तीस एकर बागायती शेती होती, बँक बॅलंस पण भरपूर होतं.पण तो कसलेच काम करत नव्हता. आजही हा सर्व व्याप त्याचे वडीलच सांभाळत होते. जवळ सर्व असतानाही त्याला पाहुण्यांकडून नकार येत होता.त्याचे कारण त्याची किरकोळ शरीरयष्टी होती.दिसायला गोरा असला तरी अंगावर मुठभरही मास नव्हतं. जिथे-तिथे हाड वर आल्याचे दिसत होते. एखाद्या सापळयावर कातडी पांघरल्यासारखे त्याचे शरीर दिसत होते. तो नेहमी आजारी असायचा. ‍सिगारेट, दारु यांचे अति प्रमाणात व्यसन, वेळेवर जेवण न करणे, रात्री उशीरा पर्यंत मोबाईल पाहत जागरण करून सकाळी उशिरा उठणे.या कारणांमुळे तो त्याचे आरोग्य बिघडवून बसला होता. त्याच्याकडे भरपूर पैसा असूनही तो सुखी-समाधानी नव्हता.कारण त्याच्याकडे आरोग्य ही धनसंपदा नव्हती.

पाच दिवस होत आले तरी मुलींकडच्यांचा निरोप आला नव्हता. एके दिवशी अचानक मुलीच्या वडीलांचा फोन आला.त्यांनी अपेक्षेप्रमाणेच नकार कळवला. त्यावैही वैभवच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कारण सोळा वेळा त्याला नकार ऐकायला मिळाला होता ते ही अमाप संपत्ती जवळ असताना. फक्त किरकोळ शरीरयष्टी असल्यामुळे.त्याला पाहुण्यांनी का नाकारले हे माहित होते. तरीही त्याला तेच त्या मुलीच्या तोंडून ऐकायचे होते.जिला त्याने पाहिल्यापासून मनोमन आपली जीवनसाथी मानले होते.

तो ‍नितीनला घेवून ‍नगरला गेला. मुद्दाम तो तिच्या घराबाहेर थांबला. ती तिच्या मैत्रीणींसोबत कॉलेजला जायला निघाली. ते दोघेही तिचा पाठलाग करत तिच्या मागे गेले. कॉलेजमध्ये जाताच त्याने तिला थांबवले. क्षणभर हा अनोळखी मुलगा आपल्याला का थांबवतोय हे तिच्या लक्षात आले नाही. पण थोडया वेळात तिच्या लक्षात आले.

तो, "मला ओळखलेस का?"

ती ओळखूनही न ओळखल्यासारखे करत, "नाही,कोण आहात आपण?"

"मी गेल्या आठवडयात तुला पहायला आलो होतो."

"अच्छा ! तुम्ही होय."

"हो मीच.मला तुला एक विचारायचे आहे.?"

"विचारा ना?"

"खरं तर तुला पाहिलं त्याचवेळी मला तु आवडलीस.पण लग्नासाठी नकार दिलास.मला फक्त नकाराचे कारण जाणून घ्यायचे आहे. मला राग येणार नाही. जे असेल ते स्पष्ट सांग."

ती त्याच्या किरकोळ शरीरयष्टीकडे तुच्छतेने पाहत, "तसं तर मला स्पष्टच बोलायची सवय आहे. तुम्ही खूप किरकोळ दिसता, तुमचे आरोग्य चांगले नाही. त्यामुळेच मी नकार दिला आहे."

तो तिच्या बोलण्यावर नाराज होत, "ठीक आहे.पण माझ्याकडे इतकी संपत्ती आहे की, तु राणी सारखी राहिली असतीस."

ती,"आरोग्य हीच सगळयात मोठी संपत्ती आहे. आरोग्यच नसेल तर संपत्तीचा काहीच उपयोग नाही. त्यामुळेच तुमच्याकडे सर्व काही असताना केवळ आरोग्य नसल्यामुळे मी नकार ‍दिला आहे.नाहीतर माझे आई-वडील मला म्हणत हाते, चांगले स्थळ आहे.परत असे स्थळ मिळणार नाही. पण जो स्वत:ची रक्षा करू शकत नाही तो माझी काय करणार? त्यामुळेच मी नकार दिला.मला क्लासला जायला वेळ होत आहे मी निघते." असे बोलून त्याच्या उत्तराची वाट न पाहताच ती गेली देखील.

त्याला तिच्या उत्तराचा खूप राग आला. ती निघून गेल्याचे पाहून थोडया अंतरावर उभा असलेला नितीन त्याच्याजवळ आला.

"बघ ना.किती घमंडी मुलगी आहे ही." वैभव नाराजीच्या स्वरात बोलला.

"मित्रा! तिचे काहीच चुकले नाही. कोणत्या मुलीला वाटेल की आपला होणारा नवरा दुबळा असावा. मी तुला हिनवत नाही. पण तुझा जवळचा मित्र असल्यामुळे तुला स्पष्ट बोलतो आहे."

"काय करु? तुच सांग." वैभव प्रश्नार्थक नजरेने नितीनकडे पाहत बोलला.

"मित्रा, मला माहित आहे. तु किती जिद्दी आहेस ते. तु निर्णय घ्यायला वेळ लावतोस, पण एकदा निर्णय घेतलास तर ते काम पूर्ण होईपर्यंत थांबत नाहीस.तु शरीर कमवण्याचं मनात पक्क कर.मग बघ असल्या छप्पन पोरी तुझ्या पाठीमागे लागतील."

वैभवने नितीनच्या हातात हात देवून शरीर कमवण्याचा निश्चय केला.वैभवच्या होकाराने नितीनला आनंद झाला. कारण त्याला माहित होतं. आपला मित्र कच्चा नाही. त्याने एकदा मनावर घेतलं की मग ते काम होणारच.ते दोघेही आपल्या गावी परतले.

दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर पाच वाजता नितीनला वैभवचा फोन आला. नितीनने डोळे चोळत मोबाईल पाहिला. तो ताटकन उठला. दोघेही व्यायामला मैदानात गेले. पहिला दिवस असल्याने आज हलकाच व्यायाम केला. सकाळच्या रम्य प्रहरी प्रसन्न वाटत होते. वैभवला तर आज कितीतरी दिवसांनी पहिल्यांदाच खूप ताजंतवानं वाटत होतं.

वैभवने सहा महिन्यात शरीर कमवण्याचं ध्येय निश्चीत केलं. त्यासाठी काय करणं आवश्यक आहे याचं नियोजन केलं.त्याप्रमाणे काम करायला सुरुवात केली. आपल्या आरोग्यासाठी काय खावे व काय खावू नये हे त्याने जाणून घेतले. आपले शरीर व्यवस्थित तर सगळं ठिक. हे त्याला कळून चुकले होते.जीवनसत्व,कार्बोदके, कॅल्शीयम, प्रथीने आपल्या शरीरासाठी किती प्रमाणात आवश्यक आहेत, व ते कोणत्या फळांमधून, पदार्थामधून,कडधान्यांमधून मिळतात याचा त्याने बारकाईने अभ्यास केला. महत्त्वाचे म्हणजे शरीर कमवण्यासाठी बाजारात मोठया प्रमाणावर उपलब्ध असलेले औषधे, स्टीरॉईड घेणे त्याने टाळले. कारण त्याला माहित होते.त्याचा तात्पुरता परिणाम होतो व कालांतराने शरीरावर वाईट परिणाम जाणवू लागतो. त्यामुळे नैसर्गीक पदार्थ व फळे खावूनच शरीर सुधरायचे असा त्याने निर्णय घेतला. व्यसन सोडले. चांगल्या विचारांची पुस्तके वाचायला सुरुवात केली, कंपनीतील व शेतातील कामात लक्ष घातले. थोडयाच ‍दिवसात त्याचे नैराश्य कुठल्या कुठे पळून गेले. तो इतक्या दिवस नैराश्याचे कारण शोधत होता ते कारण त्याला आता सापडले होते. तो काहीच काम करत नसल्यामुळे निराश राहायचा. पण आता आपण काही तरी काम करतो आहोत या विचाराने त्याला समाधान लाभत होते. त्यामुळे त्याची चिंता कुठल्या कुठे पळून गेली होती. तो आता लवकर झोपायचा, लवकर उठायचा,व्यायाम करायचा, वेळेवर जेवण करायचा, समतोल आहार घ्यायचा आणि विशेष म्हणजे त्याने आता चिंता करणे सोडले होते. त्यामुळे त्याच्या शरीरावर आता हळूहळू मांस चढू लागले होते. त्याचा चेहराही आता तेजस्वी दिसू लागला होता.

नितीनही त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करायचा. जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्यासोबत फक्त आपले शरीर असते आणि आपण आपल्या आरोग्याकडेच दुर्लक्ष करतो. हे त्याने कोठेतरी वाचले होते. ते सत्यच आहे हे ही त्याच्या लक्षात आले होते. पाहता-पाहता त्याने ठरवलेली वेळ जवळ आली होती. आता लोकही त्याला तब्येत सुधारली म्हणत होते. त्यामुळे तो मनोमन खुष होत होता. कारण पुर्वी त्याला तेच लोक किती खराब झाला? असे म्हणून हिणवत होते.

आता त्याचे शरीर बलदंड झाले होते, तो आता रुबाबदार दिसु लागला होता. गौर वर्ण, प्रमाणात उंची, पिळदार स्नायु,भेदक नजर यामुळे आता कोणतीही मुलगी त्याला पसंद करणार होती. तो नितीनसोबत त्याला आवडलेल्या व त्याने मनोमन जिला जीवनसाथी मानलं आहे त्या मुलीला भेटायला गेला. तेथे गेल्यावर त्याला कळले तिचे लग्न झाले आहे.त्यावेळी त्याच्या पायाखालील जमीन सरकल्यासारखे त्याला झाले.जिच्यासाठी आपण एवढी मेहनत घेतली तीच आज परकी झाली यामुळे त्याला खूप वाईट वाटले.ते दोघेही परत आले.

दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता नितीनला वैभवचा फोन आला. नितीन मनाशीच हसला. कारण त्याला वाटलं होतं, आता वैभव व्यायाम सोडून देईल. पण वैभवचा व्यायामसाठीच त्याला फोन आला होता.

वैभव त्याला म्हणाला,"आता मी व्यायाम कधीच सोडणार नाही.उलट तिचाच विचार मनातून सोडून दिला आहे."

थोडयाच दिवसात वैभवसाठी स्थळ आलं. पाहुण्यांना मुलगा पसंद पडला. मुलगीही नक्षत्रासारखी सुंदर होती.

वैभव नितीनला म्हणाला, "खरं तर ती मला भेटली नाही त्यावेळी मी खूप दु:खी झालो होतो. पण मला आता कळलं, तिचीच माझ्यासोबत लग्न करण्याची लायकी नव्हती.आयुष्यात ती मला असंच संकटसमयी सोडून गेली असती. पण जाऊ दे. आज तिच्यामुळेच मी आरोग्य संपन्न आहे. व माझ्या आरोग्यामुळेच मला तिच्यापेक्षाही सुंदर मुलगी मिळाली आहे."

एवढे बोलून तो व्यायाम करू लागला.नितीन स्वत:च्या मनाशीच हसत आपल्या जिद्दी मित्राकडे पाहु लागला.त्याला माहित होतं. आता शेवट पर्यंत कितीही कंटाळा आला तरी आपल्याला व्यायामासाठी वैभव सोबत रोज सकाळी उठावंच लागणार होतं.

तात्पर्य:- आरोग्य हीच मोठी संप्पती आहे. जवळ कितीही संपत्ती असेल आणि आरोग्य नसेल तर त्या संपत्तीचा उपभोग घेता येत नाही.ज्यावेळी माणूस आजारी असतो, त्याचवेळी आरोग्याचे महत्त्व कळते. आरोग्याचा नाश करणारे मित्र दूर करून आरोग्य कमवण्यासाठी जे मित्र चांगले आहेत, त्यांच्याशी मैत्री करायला हवी.