राधिका Vaishu Mahajan द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

राधिका

सकाळपासूनच राधिकाच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते. संपूर्ण रात्र ती वेदनेने विव्हळत होती. आजपर्यंत इतके रडून रडून आता तिच्या डोळ्यातले अश्रू देखील संपले होते. रात्री खूप उशिरा शरीराच्या आणि मनाच्या त्या जखमा पांघरून तिला झोप लागली.

सकाळी जाग आली आणि पुन्हा या नरकात असल्याची जाणीव होताच ती घाबरली. दारावरची कडी उघडून तो कधीही आत येईल आणि एखाद्या जनावराला मारावे इतक्या क्रूरपणे पुन्हा मारहाण करेल, त्याचा तो त्याच त्याच प्रश्नांचा भडिमार सुरू होईल आणि पुन्हा सारे तेच ते आणि तेच ते! राधिका आता या रोजच्या मरणाला कंटाळली होती. या त्रासातून आणि जाचातून तिला कायमचे सुटायचे होते. यावर आत्महत्या हाच उपाय तिला दिसत होता. पण आत्महत्या केल्यावर या नराधमाचा आणि त्याच्या कुटुंबाचाच फायदा होणार हाही विचार तिच्या मनात येत होता.

इतक्यात दारावर कुणीतरी आल्याची चाहूल तिला लागली आणि तिचे संपूर्ण अंग थरथरले. धाडकन दरवाज्यावर लाथ मारून त्याने त्या खोलीत प्रवेश केला.

" काय ठरवलंस आहेस ? बोल लवकर , सांग आणणार आहेस की नाही तुझ्या बापाकडून पैसे? बोल लवकर ? नाहीतर आज तुझा कायमचा सोक्षमोक्षच लावतो. "

त्याचे आग ओकणारे शब्द तिच्या कानात गरम गरम तेल ओतल्यासारखे तिला वेदनादायक वाटत होते पण तिने एक चकार शब्दही काढला नाही तोंडातून. त्याच्या रागाचा पारा वाढतच होता. तो तोफेसारखा तिच्यावर शिव्यांचा मारा करीत होता आणि ती एखाद्या गतप्राण देहासारखी शांत.

इतक्यात काही कळायच्या आत त्याने त्या खोलीत असलेला एक दांडा उचलला आणि तो तिच्या सर्वांगावर प्रहार करू लागला. तिच्या रक्ताने तो दांडा लाल झाला तरी त्याने मारणे काही थांबवले नाही. ती बेशुद्ध झाली.

तिला जाग आली तेव्हा ती एका हॉस्पिटलमध्ये होती. पापण्यांची थोडीशी उघडझाप होत होती.

" मी इथे कशी? कोणी आणले मला इकडे ? " स्वतःला प्रश्न विचारत ती निपचीत पडून होती. तक्यात एक नर्स त्या खोलीत आली.

" अरे , वाह ! तू शुद्धीवर आलीस. खूप छान झाले. थांब हं , मी तुझ्या नातेवाईकांना कळवते." असे म्हणून नर्स वळणार इतक्यात तिच्या अंगात कुठून बळ आले कुणास ठाऊक ? तिने नर्सचा हात घट्ट पकडला आणि मानेने नकारार्थी मान हलवली.

नर्सला काही कळले नाही. " काय गं ? कळवू ना तुझ्या नातेवाईकांना ? " नर्सने विचारले. तिने पुन्हा नकारार्थी मान हलवली.

नर्सने विचारले , " काय गं ? काय झाले ? नको कळवू का ? " राधिकाने मान हलवली पण यावेळी होकारार्थी.

" सिस्टर मी इथे कशी आले ? कोणी आणले मला ? " राधिकाने विचारले .

" एक तरुण मुलगा तुला इथे घेऊन आला , " नर्सने सांगितले.

तो मुलगा म्हणजे शेखर भावोजीच असतील असा अंदाज राधिकाने लावला. नर्सने तिला इंजेक्शन दिले आणि थोड्याच वेळात तिला झोप लागली.

बऱ्याच वेळाने तिला जाग आली. वॉर्डमधून थोडा आवाज ऐकू होता. थोड्याच वेळात एक प्रसन्न व भारदस्त व्यक्तिमत्वाची स्त्री आणि तिच्यासोबत दहा बारा जणांनी राधिकाच्या खोलीत प्रवेश केला. त्या महिलेने राधिकाच्या हातात मिठाई आणि साडी दिली. राधिकाच्या देखण्या रूपाकडे ती स्त्री एकटक पाहतच राहिली. चेहऱ्यावर इतक्या जखमा असूनही ती जर इतकी सुंदर दिसत आहे तर प्रत्यक्षात किती सुंदर असेल ही ? असा विचार त्या महिलेच्या मनात आला. तिने राधिकाची चौकशी करण्यासाठी काही प्रश्न विचारले पण राधिका उत्तर देण्याच्या मनःस्थिती नव्हती. त्या स्त्रीने आपले कार्ड राधिकाच्या हातात दिले. त्यानंतर तिने नर्सला काहीतरी विचारले आणि ती स्त्री निघून गेली.

दुसऱ्या दिवशी शेखर हॉस्पिटलमध्ये आला.

" वहिनी का सहन करतेस तू हे सगळं ? तुझ्यासारख्या प्रतिभावान मुलीच्या वाट्याला हे असले आयुष्य यावे यापेक्षा दैवदुर्विलास तो काय! मला खरंच खूप लाज वाटते कि मी या अशा लोभी माणसांच्या कुटुंबात जन्माला आलो.
त्यादिवशी मी वेळेवर आलो नसतो तर दादाने आणि माझ्या आईने तुला मारूनच टाकले असते. मी परदेशी गेल्याने त्यांना अधिक चांगली संधी मिळाली तुला छळण्याची. वहिनी , अजूनही वेळ गेलेली नाही. मुक्त कर स्वतःला या जाचातून. तुझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर ती केव्हाच सोडून गेली असती. माझा तुला पूर्ण पाठींबा आहे . घटस्फोट मिळविण्यासाठी मी तुला मदत करेन. तुझे हे हाल मला बघवत नाहीत गं. तुझ्या या भावाची विनंती समज आणि हो कणखर.

राधिका फक्त ऐकत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा वाहणाऱ्या अश्रूंनी शेखरचेही हृदय हेलावले.

" वहिनी , आता पुरे झालं. आता मलाच काहीतरी करावं लागेल.

इतक्यात नर्स त्या खोलीत आली. तिने शेखरला बाहेर बोलावले आणि काल हॉस्पिटलमध्ये आलेल्या त्या महिलेबद्दल शेखरला सांगितले.

शेखर त्वरीत राधिकाजवळ गेला. त्या बाईने दिलेले व्हिजिटिंग कार्ड घेतले आणि फोन केला. फोनवरील संभाषणानंतर शेखरचा चेहरा थोडा प्रफुल्लित झाला. दोन दिवस उलटून गेले तरी राधिकाची सासू आणि नवरा साधी विचारपूस करायला सुद्धा आले नव्हते. येणार तरी कशाला ? त्यांना राधिकाकडून फक्त पैशांचीच अपेक्षा होती बाकी कशाशीच त्यांचे देणे घेणे नव्हते.

दोन दिवसांनी राधिकाला डिस्चार्ज मिळाला. निघताना राधिकाने त्या नर्सचे आभार मानले. या ४-५ दिवसांत तिने अगदी आपल्या धाकट्या बहिणीसारखी तिची सेवा केली होती. दोघींमध्ये एक वेगळे नाते निर्माण झाले होते.

शेखरने गाडी सुरू केली. राधिका आपल्याच तंद्रीत शून्यात नजर लावून बसली होती. गाडी थांबली तेव्हा तिच्या लक्षात आले की आपण एका अनोळखी जागी आलो आहोत.

एक प्रशस्त, आलिशान बंगल्यासमोर ते उभे होते. शेखरने गेटवर उभ्या असलेल्या वाचमेनला सांगितले. त्याने फोन केला आणि बंगल्याच्या आत दोघांना सोडले. आत गेल्यावर त्यांचे छान आदरातिथ्य झाले.

इतक्यात एक महिला त्यांच्यासमोर येऊन बसली. राधिकाने लगेच ओळ्खले. ही तीच बाई होती जी तिला हॉस्पिटलमध्ये व्हिजिटिंग कार्ड देऊन गेली होती.

" मग राधिका , राहणार ना माझ्यासोबत ?" ती बाई म्हणाली.

क्षणभर राधिकाला काहीच कळले नाही. तिने शेखरकडे पाहिले.

" होय वहिनी , आजपासून तुला यांच्यासोबतच राहायचे आहे. या आहेत सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका आणि निर्मात्या राणी सरकार . त्यांनी तुला हॉस्पिटलमध्ये पाहिले आणि आपल्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी निवडले. त्यांनी त्यादिवशी नर्सला याबाबत सर्व सांगितले. नर्सने मला सांगितले आणि मी यांना फोन केला. हीच ती सुवर्णसंधी आणि योग्य वेळ आहे तुझ्यासाठी, सर्व प्रकारच्या जाचातून सुटण्याची आणि स्वतःचे अस्तित्व सिध्द करण्याची." शेखर राधिकाला समजावत होता.

"मी अधूनमधून तुला भेटायला येईन. काळजी घे आणि बिनधास्त रहा इथे. " असे म्हणून शेखरने राधिकाचा निरोप घेतला. निघताना दोघांच्याही डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.

राणी सरकार राधिकाला म्हणाल्या , " राधिका , घाबरू नकोस. इथे तुला हवं तसं वाग. " बरं , मला तू काय म्हणशील ?"

राधिका म्हणाली , " मॅडम ! ".

" नको गं , तू नं मला राणी ताई म्हण. चालेल ?"

राधिका गोड हसली आणि हो म्हणाली.

" आता आपण मस्त गप्पा मारूया ". राणी ताई म्हणाली.

राधिका सांगू लागली, " मी पूर्वाश्रमीची राधिका गोखले. आईवडिलांची एकुलती एक मुलगी. मध्यमवर्गीय कुटुंबात अत्यंत लाडात वाढलेली मी अभ्यासात आणि अभिनयात फारच अग्रेसर होते. अगदी लहान असल्यापासूनच मला नाटकात काम करण्याची भारी हौस.

कॉलेजमध्ये असताना अशाच एका नाटकात माझी आणि राजेशची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि मग लग्नात. सुरुवातीला नव्या नवलाईचे नऊ दिवस फारच आनंदात गेले. राजेश आणि त्याचे आईवडील माझ्यावर खूप प्रेम करत होते. शेखरच्या रूपाने तर मला एक भाऊच मिळाला. पण वर्षभरातच राजेशने माझ्या आईवडिलांकडे हुंड्यासाठी तगादा लावला. माझ्या आईवडिलांनी देखील सुरुवातीला त्याचे सगळे हट्ट पुरवले. पण त्याची हाव दिवसेंदिवस वाढतच गेली. माझ्या आईवडिलांचे एकमेव आधार असलेले राहते घर देखील तो विकायला सांगत होता आणि मी विरोध करायला सुरुवात केल्यावर मला मारझोड करू लागला. अलिकडे तर मला जीवे मारण्याची धमकीही देऊ लागला. त्यादिवशी मला इतके मारले की मला आत्महत्याच करावीशी वाटत होती.

राणी ताई , मला माझे करियर अभिनय क्षेत्रात करायचे होते. आपल्याला आपल्या आवडत्या क्षेत्राची आवड असलेला मुलगाच जीवनाचा साथीदार म्हणून लाभला म्हणून मी खूप भाग्यवान समजत होते स्वतःला पण सर्व उलटेच झाले. मी याच्याशी लग्न का केले असा विचार करण्याची वेळ राजेशने माझ्यावर आणली. आज इथे येऊन पुन्हा नवी आशा निर्माण झाली , जगण्याची नवी उमेद मिळाली. राणी ताई , खरंच खूप खूप आभार तुमचे! "

दुसऱ्या दिवशी राणी ताई राधिकाला घेऊन एका मोठ्या ब्युटी पार्लरमध्ये गेली. सहा तासांनी बाहेर पडलेली राधिका एका अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. राधिकाचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तब्बल दोन वर्षांनी तिने स्वतःचे इतके सुंदर रुप पाहिले होते. राधिकाने राणी ताईला मिठीच मारली.

आता राधिका फार व्यस्त झाली होती. चित्रपटाचे शुटींग जोरात सुरू होते. राणी ताई राधिकाच्या कामावर आणि मेहनतीवर प्रचंड खूश होती. एक - दीड वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर राधिकाचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत होता. राणी ताईंनी फारच मेहनत घेतली होती. या चित्रपटावर राधिकाचे पुढील करियर अवलंबून होते त्यामुळे तिला फारच उत्सुकता लागली होती. या दरम्यान राधिकाची हुंड्यासाठी छळवणूक केल्याप्रकरणी राजेश विरुद्ध कोर्टात केसही सुरू होती.

अखेर आज तो दिवस उजाडला. प्रमुख अभिनेत्री राधिका असे होर्डिंग्ज जागोजागी लागले होते. चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत राधिका प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहचली. तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आता तिची गणना नंबर 1 वर होत होती. हे सगळे राधिकाला स्वप्नवतच वाटत होते.

सहा महिन्यानंतर एके सकाळी चहा पिताना रोजच्याप्रमाणे राधिकाने वर्तमानपत्र वाचायला घेतले. पहिल्या पानावर मोठी बातमी होती. ती वाचताच राधिका उडालीच. तिला काय करू अन काय नको असे झाले. ती बातमी होती '

यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री राधिकाला ! '

राधिकाने लगेच राणी ताईला फोन केला आणि ती फोनवर फक्त रडतच होती. फक्त हे अश्रू सुखाचे होते. फोन खाली ठेवताच शेखरचा फोन आला. तिने फोन उचलला. समोरून

' अभिनंदन वहिनी ! तू दादा विरुद्ध केस जिंकलीस आणि दादाला शिक्षाही झाली.

आज खऱ्या अर्थाने राधिकाला मुक्त होऊन आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पक्ष्याप्रमाणे वाटत होते.

राधिकाने मनोमनी ठाम निर्धार केला , " राणी ताईंनी एक नवीन राधिकेला जन्म दिला आणि मी देखील त्यांचा हा वारसा पुढे चालवित हुंड्यासाठी बळी पडणाऱ्या असंख्य राधिकांना नवीन जन्म देईन. आता हेच माझे खरे स्वत्व आणि खरे अस्तित्व ! "

कथेतील राधिका प्रमाणे या खऱ्या आयुष्यात कितीतरी अशा राधिका आहेत .ज्या आपले स्वप्न आपले छंद हे दैनंदिन जीवन जगताना विसरून जातात . कितीतरी स्त्रिया दररोजच्या घरेलू हिंसाचाराला बळी पडतात . त्यांना गरज असते ती कथेतील राणीसरकार या व्यक्तीची..

ही कथा पूर्णपणे काल्पनिक असू कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतूने लिहिण्यात आलेली नाही . जानते अजानतेपणी कोणाच्या भावना दुखावल्या गेल्यास माफी असावी .🙏🙏
आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असावी . आवडल्यास नक्की लाईक शेअर अंड कमेंट करून रेटिंग करा..