She is still remembered today books and stories free download online pdf in Marathi

आजही तिची आठवण येते...

आज प्रसेन वाफाळलेला चहा आणि कागद पेन घेऊन खूप दिवसांनी बसला होता. घरच्यांसाठी तो त्याच्या खोलीत काही तरी लिहित बसला होता, पण त्याच्यासाठी ते फक्त लिखाणं नव्हतं. मनात चाललेला कोलाहल शांत करण्याचं त्याच्याकडे असलेलं ते एकमेव माध्यम होतं. वेगवेगळ्या विषयांवरच्या डॉक्युमेंट्री पाहणं, मित्रांना एकत्र घेऊन शॉर्ट फिल्म्स करणं यात तो रमायचा. एकदा का शॉर्ट फिल्म करण्याचे विचार त्याच्या मनात सुरू झाले की मग बाकीच्या विचारांना त्याच्या मनात फारसं स्थान नसायचं. नोकरी ही फक्त पैसा कमवण्याचं एक माध्यम आहे त्याचा खरा आनंद लिखाण, डॉक्युमेंट्री, शॉर्ट फिल्म्स यातच दडलेला होता.
प्रसेनच्या बहिणी त्याला अनेकदा विचारायच्याही की या सगळ्या गोष्टींचा तुला फायदा काय होतो. यावर त्याच्याकडे ठराविक असं उत्तर कधीच नसायचं. पण त्याला याची पूर्ण जाणीव होती की काही गोष्टी या जगण्यासाठी करायच्या असतात, तर काही गोष्टी जगणं सुकर करतात. तो करत असलेली नोकरी त्याचं आयुष्य सुकर करत होती. मात्र त्याच्या या छंदामुळे तो खरा जगत होता. नेहमीच हॅपी गो लकी असणारा प्रसेन आज मात्र थोडा खिन्न होता.
नकोसा वाटणारा भूतकाळ अचानक समोर आल्यावर माणूस जसा बैचेन होतो तसंच काहीसं प्रसेनच्याबाबतीत आज घडलं होतं. आज ऑफिसमधून घरी येताना त्याला खूप वर्षांनी शाळेतला एक मित्र सौरभ भेटला होता. शाळेत असताना प्रसेन आणि सौरभ अगदी जिगरी दोस्त… इतक्या वर्षांनी सौरभला पाहून प्रसेन सुरूवातीला थोडा सुखावला. पण जसजशा त्यांच्या गप्पा रंगू लागल्या तसा प्रसेनला सौरभला भेटल्याचा आनंद ओसरू लागला.
प्रसेनचं शिक्षण बॉईज स्कूलमधलं. त्यामुळे अर्थातच तिथल्या प्रत्येक मुलाला मुलींबद्दलचं कुतूहल होतंच. त्याला प्रसेनही काही वेगळा नव्हता. आपल्या शाळेतल्या जुन्या आठवणींना सौरभ उजाळा देत होता. ‘तेव्हा आपण कसे होतो यार…किती अफलातून गोष्टी केल्या आपण…’ आजही आपले शिक्षक आपल्या नावाने धसका घेत असतील. प्रसेननेही तोवर आपल्या शाळेतल्या दोन तीन आठवणींना उजाळा दिला होता.
काहीही बोल पण प्रसेन तू तेव्हा फारच अबोल होतास आणि घाबरटही.. प्रसेनला सौरभचं दुसरं वाक्य फारसं पटलं नाही. मी मान्य करतो की मी अबोल होतो पण प्लीज मी काही घाबरट वगैरे नव्हतो. घाबरट होतास म्हणून तर तुला त्या क्लासमधल्या मुलीला प्रपोज करायला सांगितलं होतं. आठवतंय ना… आपली तशी पैजही लागली होती. हो आठवतंय ना चांगलंच आठवतंयतीन मुलींपैकी जी त्यातल्या त्यात सामान्य मुलगी असेल आणि जी सहज मला हो बोलेल अशाच मुलीला आपण हेरलं होतं. ‘तिचं नाव काय होतं रे?’ सौरभने अगदी सहज प्रश्न विचारला. प्रसेनने मोठा उसासा टाकत रुपाली असं उत्तर दिलं. प्रसेनच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव सौरभच्या नजरेतून काही सुटले नाहीत. कदाचित आपण प्रसेनच्या दुखत्या जखमेवर मीठ चोळलं असं त्याला थोडा वेळ वाटलं पण प्रसेनने लगेच विषय बदलत ते जाऊ दे बाकी बोल.. जॉब कसा सुरू आहे? काय करतोस सध्या? लग्न वैगेरे काही केलंस की नाही? अशा भूतकाळातून वास्तवाकडे आणणाऱ्या प्रश्नांचा भडीमार केला.
प्रसेनचा स्वभाव तसा समजायला कठीण होता. वरकरणी उत्साही, आनंदी वाटणारा प्रसेन आतून समजायला तेवढाच कठीण होता. असं असलं तरी व्यक्तिमत्वाचे दोन मुखवटे घेऊन तो कधी फिरला नाही. जे आहे ते समोर आहे याच मताने त्याला त्या त्या वेळी जे योग्य वाटलं त्याने ते केलं. काहीवेळा यशस्वी झाला तर काही वेळा अयशस्वी. पण आपल्या प्रत्येक चुकांमधून तो शिकत गेला. रुपालीसोबत केलेली चूकही त्याला फार वर्षांनंतर कळली. सौरभशी वरकरणी गप्पा मारुन झाल्यावर पुन्हा कधीतरी निवांत भेटू या प्रॉमिसवर दोघंही आपआपल्या घरी जायला निघाले.
प्रसेन घरी आला आणि त्याने सरळ आईला चहा द्यायला सांगितला. आईचा चहा होईपर्यंत तो स्वतःचं आवरून बसला होता. हातात खूप दिवसांनी कागद- पेन घेतलं होतं. आज त्याच्या मनात पुन्हा एकदा खूप काही भरुन आलं होतं जे त्याला कागदावर उतरवायचं होतं. रुपालीचा विषय अगदी सहज निघाला खरा, पण त्यामुळे भूतकाळातल्या अनेक व्यक्ती, परिस्थिती आणि जीवघेणे विचार मनात फेर धरू लागले होते.रुपाली आणि प्रसेन दोघंही समवयस्कर. शाळेतल्या मित्रांसोबत लागलेल्या पैजेमुळे त्याने जोशात येऊन रुपालीला प्रपोज केलं होतं. रुपालीसाठी मात्र ते पहिलं प्रेम होतं. आपल्याला कोणीतरी प्रपोज केलं या भावनेनेच ती सुखावली होती. त्या अल्लड वयात काय चूक काय बरोबर याची फारशी माहिती नसते आणि माहिती असले तरी त्याची पर्वा कोणीही करत नाही. प्रसेनच्या बाबतीतही काहीसं असंच झालं. मित्रासोबत लावलेल्या पैजेची झिंग इतकी होती की त्याने दुसरा काही विचार केलाच नाही. रुपालीने त्याच्या प्रेमाचा स्वीकार त्याचक्षणी केला होता. पण प्रसेनच्या आयुष्यातली अडचण त्यामुळे वाढली होती. मुलीला प्रपोज करेपर्यंतचीच पैज लागल्यामुळे आता पुढे काय करायचं असा प्रश्न त्याला पडला. त्याचे रुपालीवर प्रेम नव्हतेच. पण तिला हा सगळा प्रकार सांगितला तर वाईट वाटेल या विचाराने त्याने काही दिवस जाऊ दिले. या दिवसांमध्ये तो तिला कधी फोन करायचा तर कधी रुपालीच त्याला फोन करायची. रुपाली जेव्हा प्रसेनला भेटण्यासाठी बोलवायची तेव्हा तो काही ना काही कारण सांगून भेटणं टाळायचा. काही दिवस रुपालीला तो खरंच अभ्यासात बिझी असेल असे वाटले पण नंतर मात्र तो तिला टाळत असल्याचे तिच्या लक्षात आले. एक दिवस रुपालीने त्याला भेटून तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे ना? असा थेट प्रश्न विचारला. यावेळी मात्र प्रसेनने खरे सांगायचे ठरवले आणि त्याने रुपालीला जे आतापर्यंत घडले ते सर्व सांगितले.
प्रसेनकडून त्या सर्व गोष्टी ऐकताना रुपालीच्या पायाखालची जमीन हलत होती. आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम केले, त्याचे आपल्यावर कधीच प्रेम नव्हते. या विचारानेच तिला घेरी आली. प्रसेनने घडल्या प्रकाराबद्दल तिची माफी मागितली आणि तिथून निघून गेला. त्यानंतर आजतागायत ते दोघं एकमेकांना कधीच भेटले नाही.
शाळेतले दिवस संपून कॉलेजचे दिवस सुरू झाले होते. बी.कॉमच्या फर्स्ट इयरला असताना उनाड मुलांच्या यादीत प्रसेनचं नाव अग्रणी होतं. कॉलेजच्या कॅण्टिनमध्ये सुतळी बॉम्ब ठेवणे, एकाचवेळी दोन- तीन ठिकाणी सुतळी बॉम्ब लावणे, रस्त्यावर स्टंट करणे, कॉलेज कॅम्पसमध्ये मारामारी करणे यासाठीच प्रसेन ओळखला जायचा. या सगळ्या गोष्टींसाठीच त्याला वेळ पुरायचा नाही तर मुलींकडे पाहणंच सोडा. पण या सगळ्यात त्याला एक खूप साधी सरळ आणि अभ्यासू मुलगी आवडू लागली होती. स्नेहाच्या प्रेमात तो कसा पडला हे त्याचं तोही सांगू शकत नव्हता. पण त्याला स्नेहा आवडू लागली होती हे मात्र नक्की. स्नेहा आणि प्रसेन एकाच वर्गात होते. तिच्याशी मैत्री करावी म्हणून कित्येक महिन्यांनी प्रसेनने वर्गाचं तोंड पाहिलं होतं. आता तो तिच्यासाठी का होईना वर्गात बसू लागला होता. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली. तिच्या सांगण्यावरुन तो अभ्यासही करु लागला होता. त्याचं कट्ट्यावर बसणं कमी झालं असलं तरी पूर्णपणे बंद झालं नव्हतं. स्नेहालाही त्याचा तो रावडी स्वभावच आवडला होता. चांगल्या मुलींना नेहमी रावडी मुलं का पसंत पडतात हा प्रश्न त्यांच्या आजूबाजूच्यांनाही पडला होता. पण या दोघांना त्याची काही पर्वा नव्हती. हे दोघंही एकमेकांची कंपनी चांगली एन्जॉय करत होते. बघता बघता फायनल इयरची परीक्षाही जवळ येऊन ठेपली होती. परीक्षेला काही महिनेच राहिले असताना प्रसेनला काविळ आणि टायफॉईड झाला. या आजारात प्रसेन फारच कृष झाला होता. डॉक्टरांनी त्याला अॅडमिट करण्याचा सल्ला दिला होता. १५-२० दिवस रुग्णालयात गेल्यामुळे तो फार थकला होता. घरी आल्यावर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे त्याने ठरवले. या दरम्यान त्याने स्नेहाला अनेक फोन करण्याचा आणि तिला भेटण्याचा प्रयत्न केला पण स्नेहाने त्याच्या कोणत्याच कॉलचे उत्तर दिले नाही. आपण असे नेमके काय केले की स्नेहा रागवली? या प्रश्नाचे उत्तर तो आपल्यापरिने शोधत होता. पण तरीही त्याला त्याचे उत्तर मिळाले नव्हते. प्रिलिमदरम्यान त्याने स्नेहाला कॉलेज बाहेर गाठले आणि थेट विचारले, ‘नक्की झालंय काय स्नेहा? तू अशी का वागतेस?… किमान मला तरी कळू दे…’ यावर स्नेहाने ‘मला तुझ्याशी काहीच बोलायचे नाही. प्लीज मला कॉल करु नकोस मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करु दे…’ अभ्यासाच्या ताणामुळे कदाचित स्नेहा अशी वागत असेल असे प्रसेनला सुरूवातीला वाटले. परीक्षेनंतर सगळे नीट होईल या आशेवर त्याने प्रिलीमचा तो वेळ जाऊ दिला.
प्रिलीमनंतर त्याने पुन्हा तिला तेच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याकडून कोणतंच उत्तर आलं नाही. प्रिलिमनंतर कॉलेजमध्ये जाणं बंद होत असल्यामुळे त्यांचं भेटणंही बंद झालं होतं. प्रसेनच्या मनातून तिचा विचार काही केल्या जात नव्हता. असं काय झालं असेल की ती माझा एवढा राग करायला लागली या प्रश्नाचं उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हतं. आधीच आजारपणामुळे तब्येत खराब झाली असताना त्याच्या डोक्यात सतत हेच विचार असल्यामुळे त्याची तब्येत जास्तीच खराब होत चालली होती. पर्यायाने त्याला बी.कॉमच्या फायनल एक्झामला मुकावे लागले होते. प्रिलिमच्या परीक्षेनंतर स्नेहा त्याला कधीच भेटली नाही आणि तिने अचानक बोलणं का टाकलं? तिने काहीही कारण न देता नातं का तोडलं? या प्रश्नांची उत्तरं त्याला शेवटपर्यंत मिळाली नाहीत.
स्नेहाच्या त्या धक्यातून सावरायला प्रसेनला बरीच वर्षे लागली. या मधल्या काळात त्याच्या आणखीही गर्लफ्रेण्ड झाल्या पण आजही स्नेहा तसं का वागली हा प्रश्न त्याला सतावतो. प्रसेन आजही स्नेहामध्येच गुंतला आहे असं नाही. तो केव्हाच पुढे निघून गेला पण निरुत्तर राहिलेले प्रश्न जास्त सतावतात. प्रसेनच्या बाबतीतही तेच झाले. रुपालीचे मन दुखावले तेव्हा प्रसेनला त्या गोष्टीची जाणीव नव्हती. पण जेव्हा स्वतःचेच मन दुखले गेले तेव्हा त्याला रुपालीचं दुःख सर्वार्थाने कळलं. त्यामुळेच जेव्हा जेव्हा रुपालीचा विषय निघतो तेव्हा प्रसेनला स्नेहा आठवते आणि स्नेहाची आठवण झाली की रुपालीचं ते दुःख त्याच्या समोर येतं.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED