मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 6 अनु... द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 6

पुढे...

प्रत्येकच गोष्ट लपवता येते का?? मनात दाबून ठेवता येते का?? माहीत नाही...पण ज्या खऱ्या भावना असतात त्या मात्र आपल्याला धोका देऊन चेहऱ्यावर त्यांचे रंग सोडूनच जातात...मग आपण कितीही प्रयत्न केले खोटं बोलण्याचे तरी ओठांची भाषा आणि डोळ्यांची भाषा जुळतच नाही...मनातले सगळे भाव डोळ्यांत उतरतात आणि मग डोळे मात्र शब्दांची साथ सोडतात...असंच काहीसं माझ्या आणि अतुलच्या बाबतीत होत होतं...जे चेहऱ्यावर झळकत होतं ते लपवण्याचा अतोनात प्रयत्न करत होतो आम्ही...आणि त्यातल्या त्यात मी तर सगळं काही मनात अगदी तळाशी गाडून ठेवण्याचा प्रयत्न करायची, कारण भीती वाटायची जर चुकून माझ्याकडून काही चुकीचं झालं किंवा चुकीचं बोलल्या गेलं अतुल समोर तर आमच्या मधात जे थोडं काही निनावी नातं आहे ते ही पुसल्या जाईल...त्यामुळे मी फक्त वाट पाहत राहिली की अतुल स्वतःहून कधी काय काय कबूल करतो...पण दुर्दैवाने सगळा वेळ त्याने माझी आणि मी त्याची वाट पाहण्यातच घालवला...

त्यादिवशी अतुलच्या काही शब्दाने माझ्या मनात सुकत चाललेला भावनांना संजीवनी मिळाली होती, आणि त्याचेच अश्रू आनंदाच्या रूपाने पडत होते...अतुल माझ्यामागे तेच जाणून घ्यायला येत असावा आणि मी पुढे चालत असताना मात्र त्याला वळून बघत होती, आणि तेवढ्यात मी समोर चेतनला धडकली...

"आऊच..." आणि जोरदार टक्कर झाल्यामुळे आम्ही दोघेही कळवळलो..

"अरे देवा...डोळे कुठे दिलेत देवाने तुला??? आहेत का जागेवर...माझं डोकं फोडायचा विचार होता का???"
समोर पाहिलं तर चेतन आपलं कपाळ चोळत बोलत होता...

"ओहहहह...सॉरी..माझं लक्ष नव्हतं..."

"कुठे होतं लक्ष मग?? आंधळी कुठली..."

"येssss... बस झालं ना..सॉरी बोलली ना मी.. एवढी काय नाजूक नार आहेस का तू?? आणि काय रे शहाण्या, माझं लक्ष नव्हतं, पण तुझं तर होतं ना..तू व्हायचं ना बाजूला माझ्या रस्त्यातून..."

"वा रे वा... उलटा चोर कोतवाल को डाटे.. थांब तुला तर दाखवतोच मी..." आणि आमचे नेहमीप्रमाणे भांडणं सुरू झाले...आमच्या तू तू मै मै मध्ये अतुल मागे उभा आहे हे विसरलीच मी...माझी बकबक ऐकून चेतनने माझ्या तोंडावर हात ठेवला...

"बस्सस माझी आई...चुकलं माझं, मी बघून चालायला हवं होतं...ठीक आहे...आता खुश" आणि त्याचं लक्ष अतुलकडे गेलं, अतुलला बघत चेतन मजेशीर पणे बोलला,

"काय यार पोरगी आहे ही... डाकू फुलनदेवी आहे..कोणाला काही बोलूच देत नाही.." पण अजूनही त्याचा हात माझ्या तोंडावरच होता...अतुलला बघून मी घाईघाईने चेतनचा हात दूर सारला आणि बाजूला जाऊन उभी झाली...अतुलवर एक नजर टाकली तर तो तिरकस नजरेने माझ्याकडेच बघत होता आणि बोलला,

"हो...तुझ्यासमोरच शब्द बाहेर निघतात तिचे..बाकी लोकांना तर बोलणं दूर, बघतही नाही...अम्म्म, म्हणजे तुमचं जास्त पटते ना..त्यामुळे..."
अतुलचं उपहासात्मक बोलणं कळलं मला, पण तो दरवेळी चेतन आला की अचानक का बदलतो हे माझ्या समजण्यापलीकडे होतं, त्याची ती तिरकस नजर माझं हृदय चिरत होती...तेवढ्यात चेतन बोलला,

"हो..अरे पटते म्हणजे काय?? प्रश्नच नाही...जिगरी आहे आपली..हो ना गं पोरी..."
माझ्या खांद्याला खांदा लावत चेतन बोलला...माझं सगळं लक्ष मात्र अतुलकडेच होतंच पण त्याने आता माझ्याकडे पाहिलं ही नाही आणि असं दाखवत होता, जसं माझं तिथे असणं नसणं त्याच्यासाठी एक समान आहे...

"तू आज येणार आहेस हे माहीत नव्हतं मला, आणि तू काही तसं सांगितलं ही नाहीस...दोन दिवसांनी येणार होतास ना तू??" अतुल चेतनला बोलला...

"तुला बोलायला तू आधिसारखा बोलतो कुठेस मला?? आणि माझ्याही बहिणीचं लग्न आहे, विचार केला दोन दिवस आधीच जावं...आपण सगळे मिळून धमाल करू काय?? "
अतुलचं आणि चेतनचं बोलणं सुरू होतं, आणि क्षणभरात अतुल ला काय झालं, त्याचे चेहऱ्यावरचे रंग का उडाले मला काहीही कळत नव्हतं त्यामुळे मी तेथून निघून आली...काय करावं काही सुचेना मला त्यावेळी... पण अतुलला कसं कळत नसावं की सगळं काही अबोल्यातून नाही पटवून देता येत, कधी कधी कृती करणं ही गरजेचं असतं... बोलणं ही गरजेचं असतं... पण जे त्याच्या माझ्या मनात होतं ते ओठांपर्यंत आलंच नाही आणि आलं तरी ते बोलता आलंच नाही...

अतुल माझ्यासाठी एक प्रवासच होता...फक्त प्रवास...नुसतं चालत राहायचं सोबतीने...पण कुठे पोहचायचं किंवा या प्रवासाचा अंतिम टप्पा आहे तरी काय, हे काहिही माहीत नव्हतं...आणि कुठे पोहचायचं हेच माहीत नव्हतं तेंव्हा तो शेवटपर्यंत सोबत असेल का हे तरी कसं सांगू शकणार होती मी..?? त्यामुळे तो सोबत असताना त्याच्या आठवणी जेवढया ओंजळीत सामावून घेता येतील तेवढ्या घेण्याचा प्रयत्न करत होती मी...
एक मात्र नक्की होतं की अतुलच्या वागण्याचा मला कितीही त्रास होत असला तरी चेतनच्या हसण्या खिदळण्यात मला सगळं विसरायला व्हायचं..तसा तर माझ्यापेक्षा तीन वर्षे मोठा होता पण वागण्याने मात्र रश्मी पेक्षा ही लहान होता...पण मनाने तेवढाच हळवा होता...माझ्याशी कितीही भांडला तरी माझ्या अडचणीत तोच उभा राहायचा...मैत्री हे नातंच असतं इतकं खास...!!! हो ना??
***********************

अतुल आणि माझ्यातला अबोला रहस्यमय वाटत असला तरी त्यात निरागसता होती...एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टी मनावर खूप खोल परिणाम करून जायच्या पण समोरच्याचं मन आपल्यामुळे विचलित आहे हा विचार करून आम्ही स्वतःचं मन ही बैचेन करून घ्यायचो...हां, पण बोलण्याची मात्र बोंब होती आणि आता यात आमचा 'इगो' नावाचा शत्रू आडवा येत होता.. त्यामुळे कमीतकमी मी तर हाच विचार करायची की त्याचे 'मूड स्विंग' मी का सहन करायचे?? माझी काय चूक आहे?? मी काय केलंय? आणि मीच का स्वतःहून बोलू वैगरे वैगरे...त्या दिवशी तर मोठा बोलत होता 'तुम्हारे रुठने से मेरा दिल दुखता है' वैगरे वैगरे आणि आला का लगेच झटका?? हे पोरं पण खूप खडूस असतात...त्यांना ना जास्त भाव दिला की डोक्यावर चढतात...त्या दिवशी त्याने थांबवल्यावर मी थांबायलाच नको होतं... मग कळलं असतं त्याला...हं... माझी बालिश बुद्धी त्यावेळी आपल्या कुवतीप्रमाणे विचार करत होती पण अतुलच्या डोक्यात काय आहे हे त्यालाच माहीत होतं....

साखरपुड्याच्या दोन दिवस आधी माझी एन्ट्रान्स ची परीक्षा होती नागपूरला...बाबा येणार होते सोबत पण ऐनवेळी त्यांना ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम आलं आणि ते येऊ शकले नाही...ताई माझ्यासोबत चेतनला पाठवणार होती पण त्याचे असाईनमेंट होते पूर्ण करायचे...पण तरीही तो तयार होता सोबत यायला, पण माझ्यामुळे त्याच्या अभ्यासाचं नुकसान होईल हे मला पटत नव्हतं...आता घरात सगळे लग्नाच्या कामात गुंतले होते त्यामुळे जीजू बोलले की अतुल जाऊ शकतो माझ्यासोबत...आणि सगळयांना हे पटलं ही...जेंव्हा चेतनने अतुलला हे सांगितलं तेंव्हा त्या खडूस मुलाने चक्क नकार दिला...माझी तर एवढी तळपायाची मस्तकात गेली पण तरी चेतन बोलला,
"अरे भावा, ती एकटी जाईल का मग?? आपल्याकडे पाहुनी आहे रे ती..आपण असं केलं तर वहिनीला, तिच्या बाबांना किती वाईट वाटेल...आणि इथल्या इथे परीक्षा असती तर ती एकटी गेली असती पण नागपुराला आहे रे, इथून तीन तासांचा प्रवास आहे, मग एकट्या मुलीला कसं पाठवणार...?"

"मी कुठे तिला एकटीला जायला बोललो..तू जा ना..तसही तुझ्यासोबत जास्त सोयीस्कर जाईल तिला...आमची काही जास्त ओळख नाही..."

"अरे, लहानपणापासून तर बघतो आहेस तिला अजून काय जास्त ओळख पाहिजे तुला...आणि ती तशीही खूप बकबक करते, तुला बोर नाही होऊ देणार..हीहीही..."
तेवढ्यात अतुल ला फोन आला आणि त्याने बोलणं थांबवत फोन घेतला...आमच्या समोर न बोलता, तो बाहेर जाऊन बोलत होता..दोन मिनीटांनी तो परत आला तर चेतन त्याच्याकडे पाहून नुसतंच हसत होता...मला कळत नव्हतं काय चाललंय.. चेतन अतुल ला धक्का देत बोलला,

"मग भाई...कधीपासून चाललंय हे..अम्म्म..."

"काय?? कुठे काय चाललंय?" अतुल प्रश्नार्थक भाव चेहऱ्यावर आणून त्याला विचारत होता...

"तेच ते...प्रिया...तुझ्या मोबाईल वर नाव पाहिलं आता मी..तिचाच फोन होता ना...मैत्रीण आहे का??"

"हो...मैत्रीण आहे...काही नाही कामाचं बोलत होती जरा.."

"हो..ते कळलं..कामाचं होतं त्यामुळेच तू बाहेर जाऊन बोलला ना...चालूद्या चालुद्या...प्रगती आहे भावाची...हिहीहीखिखीखी..."
आणि चेतन हसत सुटला..
अरे हा चेतन काहीही बोलतो, म्याड आहे का जरा?? मला रागच आला त्यामुळे मी चेतनला बोलली,

"ए..चेत्या...माझी मी जाईल रे एकटी..नाहीतर नाही जाणार.. माझं मी बघेन काय करायचं.. माझ्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास झालेला मला आवडणार नाही..." आणि एवढं बोलून मी जायला निघाली... मला कळत नव्हतं, का माझी चिडचिड होत आहे मला नक्की राग कश्याचा आलाय?? अतुलने माझ्यासोबत येण्यास नकार दिला याचा की त्याला कोणीतरी मैत्रीण आहे याचा??? आणि जर त्याला कोणी मैत्रीण असेलही तरी मला का फरक पडतोय...त्याचं आयुष्य आहे, तो ठरवेल त्याला कोणाशी मैत्री करावी कोणाशी नाही..पण मी त्रास करून घेतेय..??
मी माझे पाय आपटत निघालीच होती की अतुल बोलला,

"चेतन...ही परीक्षा किती महत्त्वाची आहे याची जाणीव मलाही आहे, आणि माझ्यामुळे कोणाचं भविष्य खराब होत असेल तर ते मलाही आवडणार नाही...त्यामुळे मला त्रास झाला तरी चालेल, पण सांग तुझ्या मैत्रिणीला की मी जाणार उद्या तिच्या सोबत..."
त्याचे शब्द ऐकून मी मागे वळली, चेतनला वाटलं की मी रागात आता काही बोलेल तेवढ्यात तो मधात येऊन बोलला,

"ये बाई, आता तू गरम नको होऊ..येतोय तो उद्या, तू जाऊन अभ्यास कर...आणि तू रे...सांग ना जरा प्रिया काय बोलली??" अतुलला चिडवत चेतन बोलला,

"काही नाही....प्रोजेक्टचं बोलली." अतुलनेही टाळाटाळी केली सांगायला पण मलाही ऐकून घ्यायचं होत की असं काय बोलली ती जे अतुलला बाहेर जावं लागलं बोलायला....

"फक्त प्रोजेक्टचे?? बस्सस...अजून सांग ना काही?? " मला कळलं नव्हतं ह्या पागल डोक्याच्या चेतनला का एवढी पडली आहे..?? जर तो बोलतो की कामाचं बोलली तर कामाचं असेल काही...पण तसं नसेल तर??? माझ्या मनाने आता मलाही द्विधा मनस्थितीत टाकलं होतं..पण माझी ही मनस्थिती अजून खराब होणार होती जेंव्हा अतुलने माझ्यावर एक नजर टाकत बोलला,

"कुछ ना कहना भी एक जरिया है बहुत कुछ कहने का,
दिल से जुडने वाला समझ जाता है मतलब हर बात का।"

******************
क्रमशः