दिवाना दिल खो गया (भाग १३) preeti sawant dalvi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दिवाना दिल खो गया (भाग १३)

(सिलूला तर त्याच्या कानांवर विश्वास होत नव्हता. इतक्या सहजासहजी अम्मा मुग्धाला अॅक्सेप्ट करेल असे सिलूला कधीच वाटले नव्हते. त्याने अम्माला घट्ट मिठी मारली. अप्पाने ही त्याच्या डोक्यावरून हात फिरविला. आता पुढे..)

त्याला हे सगळे कधी मुग्धाला सांगतोय असे झाले होते. पण त्या आधी त्याला साहीलची खबर घ्यायची होती. रात्री साहील जेवायला सिलूच्या घरी आला. मस्तीमजा करत सगळ्यांची जेवणे झाली आणि सगळे गप्पा मारायला बसले. काहीवेळाने अप्पा झोपयला निघून गेले. मग हॉलमध्ये फक्त अम्मा, सिलू आणि साहील बसले होते. साहील हा सिलू भारतात आल्यापासून त्याच्याशी एकदाही मोकळेपणाने बोलला नव्हता. काहीतरी चुकीचे वागल्याचे भाव सिलूकडे बघताना त्याच्या चेहऱ्यावर असायचे. सिलूने ते अचूक टिपले. तो गालातल्या गालात हसला. त्याने साहिलची गंमत करायचे ठरविले.

तो अम्माला म्हणाला, “अम्मा जर मी तुला विश्वासाने एखादी गोष्ट सांगितली आणि ती तुझ्यापर्यंत सीमित ठेव असे म्हणालो तर तू कोणाला सांगशील का ती”
थोडा पॉज घेऊन अम्मा म्हणाली, “कधीच नाही. जर असे केले तर मी तुझा विश्वास कायमचा गमावून बसेन”.
अम्माने काढलेले उद्गार ऐकल्यावर साहीलने आवंढा गिळला आणि मी घरी निघतो असे म्हणत तो निघायला उठला.

तेव्हा सिलू म्हणाला, “साहील कुठे जातोस बसना थोडावेळ.”, असे म्हणत सिलूने त्याचा हात पकडून जबरदस्तीने त्याला खाली बसविले व सिलू म्हणाला, “साहील तुझा चेहरा असा काय झालाय जसे तूच एखाद्याचा विश्वास तोडला असशील असे दिसतय.” असे म्हणून सिलू मान खाली घालून हसू लागला.
सिलूला बघून अम्मा ही हसायला लागली. दोघांना असे हसताना बघून बिचारा साहील त्याचा चेहरा पाहण्यासारखा झालेला.

मग अम्मा सिलूला आणि साहीलला गुड नाईट करून हसत हसत तिच्या खोलीत झोपायला गेली. अम्मा गेल्यावर साहील चक्क सिलूच्या पायावर पडला आणि म्हणाला, “सॉरी सिलू, मी तुझे प्रॉमिस तोडले. पण प्रसंग असा होता की, मला तुझ्या आणि मुग्धा बद्दल अम्माला सगळे सांगावे लागले. प्लीज मला माफ कर”.

सिलूने साहीलला उठविले आणि त्याला घट्ट मिठी मारली आणि तो म्हणाला, “मित्रा सॉरी काय बोलतोस. आज तुझ्यामुळे अम्मा मुग्धाला ह्या घराची सून बनवायला तयार झाली. जर तू अम्माला आमच्याबद्दल सांगितले नसतेस, तर आजचा हा आनंदाचा दिवस मी कधीच पाहू शकलो नसतो.”
हे ऐकल्यावर साहीलच्या मनावरचा ताण हलका झाला. आता साहीलला त्याने केलेल्या कृत्याचा अभिमान वाटायला लागला.

(दुसऱ्या दिवशी सकाळी)
अम्माने ब्रेकफास्टसाठी इडली आणि सांबार केले होते. सिलू आणि अप्पा नाश्ता करीत होते. अम्माने सिलूला आज दिवसभर काय काय करणार आहेस असे विचारले. तर सिलूने अजून काही ठरविले नाही असे म्हणाला. मग अम्मा सिलूला म्हणाली की, “आज रात्री मी मुग्धाला जेवायला बोलविले आहे. त्यामुळे तू संध्याकाळी घरीच रहा”.

सिलूला थोडे आश्चर्य वाटले. पण मुग्धा घरी येणार म्हणून तो मनातल्या मनात खूप खुश झाला. त्याने मुग्धाला फोन केला पण दोनदा रिंग वाजूनही तिने फोन उचलला नाही. सिलू थोडा वैतागला. पण लागलीच त्याच्या लक्षात आले की, मुग्धा आता ऑफिस मध्ये असेल. म्हणून ती फोन उचलत नाहीये. मग सिलूने तिला मेसेज केला की, फ्री झाल्यावर मला फोन कर. मेसेज सेंड होऊन डिलीवर सुद्धा झाला तरीही मुग्धाचा काहीच रीप्लाय येत नव्हता. सिलूला आज दिवसभर करायला काहीच नव्हते. कारण तो सुट्टीवर जो होता. अमेरिकेत तर त्याला एक दिवस ही फुरसत नसायची. सुट्टीच्या दिवशी ही तो कधी कधी काम करत असे. आज साहील सुद्धा बिझी होता त्यामुळे त्यालाही फोन करता येणार नव्हता. मग सिलू हॉलमध्ये बसून टीव्ही बघू लागला. तरीही त्याचे मन कशातच रमत नव्हते. तो सारखा सारखा फोन बघत होता. पण मुग्धाचा काहीच रीप्लाय येत नव्हता. दुपारची जेवणे झाली. मग सिलू त्याच्या रूम मध्ये थोडावेळ झोपायला गेला. पण झोप काही लागत नव्हती. एकतर दिवसभर मुग्धाशी काहीच बोलणे झाले नव्हते आणि आज अम्माने तिला घरी जेवायला बोलविले होते. अम्मा काय बोलेल याचा विचार सिलू करत होता. कारण मुग्धाला माहीत नव्हते की, अम्माला त्या दोघांबद्दल सगळे कळले आहे ते.

थोड्यावेळाने मुग्धाचा मेसेज आला की, ती आज खूप बिझी आहे. म्हणून ती ऑफिस सुटल्यावर सिलूला कॉल करेल. सिलूने ओके असा तिला रीप्लाय दिला आणि तो संध्याकाळची वाट पाहू लागला.

आज अम्माने जेवणाचा चांगलाच बेत केला होता. घरभर नुसता खमंग वास दरवळत होता. अम्मा आज खूप आनंदात दिसत होती. तेवढयात सिलूला मुग्धाचा फोन आला. ती नॉर्मली रोज ७ वाजता ऑफिसवरून सुटत असे. पण आज तिला निघेपर्यंत ८ वाजले होते. सिलूने फोन उचलला. तो काही बोलणार तेवढ्यात मुग्धा सिलूला म्हणाली, “सॉरी सिलू आज खूप काम होते ऑफिसमध्ये फोन घ्यायला ही फुरसत नव्हती. आज नेमके अम्माने जेवायला बोलविले आणि मला उशीर झालाय. अम्मा काय विचार करत असेल माझ्याबद्दल. मला तर बाई टेंशन आलंय. सिलू मी थोड्यावेळात पोहोचेन घरी. मी ऑटोमध्येच आहे.” असे म्हणून चक्क मुग्धाने फोन ठेवला.

सिलूला आता मुग्धाची वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. काहीवेळाने दारावरची बेल वाजली. सिलूने दरवाजा उघडला तर समोर मुग्धा होती. आत येताच तिला जेवणाचा खमंग वास आला. तिने सिलूकडे दुर्लक्ष केले आणि ती वॉशरूम मध्ये गेली. फ्रेश होऊन आल्यावर मुग्धा सरळ किचनमध्ये गेली आणि पाहते तर काय. अम्माचे सगळे जेवण बनवून झाले होते. अम्मा थोडी आवराआवर करीत होती. मुग्धा खाली मान घालून तिथेच उभी होती. तिला काय बोलावे तेच सुचत नव्हते. अम्माने तिच्याकडे बघितले आणि तिची थोडी गम्मत करण्याची हुक्की अम्माला झाली.

अम्मा खोट्या रागात मुग्धाला म्हणाली, “उशीर होणार होता तर एक फोन तरी करायचास. मी किती वाट बघितली तुझी. सगळे जेवण मलाच करायला लागले. आजकालच्या तुम्ही मुली पण ना”
मुग्धा काहीतरी बोलणारच होती की, अम्मा तिला म्हणाली, “आता अशीच बघत राहणार आहेस की, जेवायला पण वाढणार आहेस. का ते पण मीच करू”
अम्माचे असे बोलणे ऐकून मुग्धा म्हणाली, “अम्मा आय एम सॉरी. आज खूप काम होते ऑफिसमध्ये म्हणून उशीर झाला. तुम्ही अप्पाना बोलवा मी तोपर्यंत सगळे जेवण आणते बाहेर.” असे म्हणत मुग्धाने सगळे जेवण व्यवस्थित टेबलावर ठेवले आणि सगळ्यांसाठी ताटे वाढायला घेतली.

अम्मा अप्पाला बोलवायला खोलीत गेली व आतापर्यंत दाबलेले हसू तिने मोकळे केले. आज काय होणार आहे याची कल्पना अम्माने अप्पाला आधीच दिली होती. त्यामुळे अप्पा सुद्धा अम्माबरोबर हसायला लागले. पण हळू आवाजात.
इथे मुग्धाला खूपच टेंशन आले होते. सिलू तिला वाढायला मदत करायला गेला तर तिने खुणेनेच त्याला बसायला सांगितले. तिला अजून काही चुकी करून अम्माचा रोष वाढवून घ्यायचा नव्हता. त्यामध्ये तिच्या मते अजून अम्माला त्या दोघांबद्दल काहीही माहीत नव्हते. त्यामुळे तिला थोडे जपून वागावे लागत होते.

सगळे जेवायला बसले. आज सगळे जेवण मुग्धाच्या आवडीचे होते. सिलूला सुद्धा साऊथ इंडियन टच असलेले महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवण पाहून थोडे आश्चर्य वाटले. यावरून मुग्धाला अम्माने पूर्णपणे अॅक्सेप्ट केले आहे हे जाणून तो मनातल्या मनात आनंदी झाला. मुग्धा सुद्धा जेवणात असलेले तिचे आवडीचे पदार्थ पाहून खुश झाली. तिचे डोळे भरून आले, कारण सगळे जेवण आज अम्माने केले होते. ते पण खास तिच्यासाठी.

मुग्धाला असे भावुक झालेले पाहताच अम्मा मुग्धाजवळ गेली आणि तिने मुग्धाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरविला आणि मग ताटातला घास तिला भरवला. अम्माचे आज सिलूकडे लक्षच नव्हते आणि अप्पाकडे सुद्धा. दोघे बाप-बेटे एकमेकांना काय हवे ते स्वत:च वाढून घेत होते.

काहीवेळानंतर सर्वांची जेवणे झाली. मग मुग्धाने अम्माला किचन आवरायला मदत केली. मग सर्वजण गप्पा मारत बसले. अम्मा मुग्धाला म्हणाली, “थॅंक यू मुग्धा तू आमच्या आयुष्यात आलीस आणि घरातले वातावरण आनंदमय झाले. आता काही दिवसात सिलू पुन्हा अमेरिकेत जाईल आणि मग आम्ही दोघे पुन्हा एकटे पडू. म्हणून मी सिलू अमेरिकेला जायच्या आधी त्याचा साखरपुडा उरकून घ्यायचे ठरविले आहे. मुलगी मी बघितली आहे आणि मला माहीत आहे की, सिलू सुद्धा माझ्या शब्दाबाहेर नाही. मी जी मुलगी पसंद करेन तिच्या गळ्यात तो न बोलता माळ घालेल. पण इतक्या कमी वेळात मला साखरपुड्याची तयारी झेपेल असे वाटत नाही. त्यात अप्पा पण अजून पूर्णपणे बरे झाले नाहीत. त्यामुळे मला ह्या सगळ्यात तुझी मदत हवी आहे. तुला वेळ असेल तर उद्या माझ्याबरोबर खरेदीला येशील का? मी आणि अप्पाने तुला स्वत:ची मुलगीच मानले आहे. म्हणून सिलूच्या होणाऱ्या बायकोसाठी सगळे तुझ्या पसंतीचे घ्यायचे आहे.” असे बोलून अम्माने मुग्धाकडे बघितले. मुग्धाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

(सिलू आणि मुग्धाच्या प्रेमाची साक्ष देणारी ही कथामालिका वाचत रहा. तसेच हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. हा भाग आवडल्यास त्याला लाइक, कमेन्ट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद)

@preetisawantdalvi