एक अविस्मरणीय शिक्षक vinayak parab द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक अविस्मरणीय शिक्षक


शीर्षक जरा विचित्र वाटतंय ना वाचायला दिन आणि दीन यातला फरक आपल्याला माहितीच आहे दिन म्हणजे दिवस आणि दीन म्हणजे लाचार गरिबी . मी दीन हा शब्द जाणूनबुजून वापरलाय . अगदी तशीच माझी नि माझ्या मित्राची मनाची आणि शरीराची अवस्था झाली होती दीनवाणी . लहानपणी जवळपास ८वी ९ वी च्या सुमारास मी विजय क्लास मधून आल्यावर डिसकव्हरी बघायचो त्यावर एक सुंदर कार्यक्रम लागायचा " आय शुडन्ट बी अलाइव्ह " त्यात माझ्या चांगलाच लक्षात राहिलेला एक प्रसंग होता . तो म्हणजे एक माणूस एका जंगलात हरवला आणि तब्बल २८ दिवसांनी तो कसाबसा मानवी वस्तीत पोचला . त्या काळात त्याच्या कुत्र्याला त्याला मारून खावे लागले स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी !!! त्याला डेंगू मलेरिया झाला आणि बरच काही . त्याच्या सोबत जे घडलं ते प्रचंड भीतीदायक होत . ते माझ्यासोबत घडू नये असं मला तेव्हा वाटलं होत . अगदी तसेच नाही पण त्याच्या २८ पटीने कमी असलेला प्रसंग माझ्या आयुष्यात शिक्षक दिनी घडला . त्याची सुरुवात झाली अशी कि -
माझा मित्र प्रथमेश जंगम आणि मला भटकायची खूप खाज . जरा नवीन वाट दिसली कि लाग चालायला अशी आम्हा दोघांना सवय . २९ ऑगस्ट ला आम्ही सायकल चालवायला भेटलो . पावसाळा होता म्हणून त्याने देवकुंड ला जाऊया का असं विचारलं . मी तेव्हा स्पष्ट काही सांगितलं नाही . बोललो एक दोन दिवसात सांगेन . पुढच्या शनीवारी म्हणजेच ४ सप्टेंबरला माझी आई गावी जाणार होती म्हणून मी चालढकल केली आणि आमचा प्लॅन फसला . मला जरा स्वस्तातला ट्रेक हवा होता . त्यानेच पुन्हा एकदा मला विचारलं तुला दुसरी कोणती जागा माहित आहे का ? तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता मी त्याला बोललो कि कामण दुर्ग ला जाऊया . तस तर लॉकडाऊन च्या खूप आधी पासून मला त्या किल्ल्यावर जायची इच्छा होती पण काहींना काही कारणाने हि योजना पुढे ढकलली गेली . तो पण लगेच ट्रेकसाठी तयार झाला . मी एका अनुभवी ट्रेकर कडून ऐकलेलं कि कामणदुर्ग अजिबात सोप्पा नाही . अनुभवी व्यक्तीशिवाय अजिबात जाऊ नको . पावसाळ्यात झाडांमुळे त्याच्या वाटा बंद होतात . चकवा लागतो . पण युट्युब वर काही विडिओ बघून मला वाटलं तो ट्रेकर स्वतःचे कस्टमर मिळावेत म्हणून बोलत असावा . कारण त्याचा स्वतःचा ट्रेकिंग चा व्यवसाय होता .
मी धनंजय आणि त्याची मैत्रीण प्रियंकाला विचारले येणार का ट्रेक ला ती तयार झाली . पण धनंजय बोलला ती येणार तर मी नाही येणार मेरे उसूल मेरे आदर्श ! प्रियांका रविवारी यायला तयार होती म्हणून आम्ही आमचा प्लॅन शनिवारी रद्द करून रविवारी ठेवला . ५ वाजता दहिसर नाक्यावर भेटायचं ठरलं . ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत येणार होती . मी तिला बोललो तुझा आवाज प्राचीसारखा आहे सेम तू पण डच्चू देणार माझ्या प्लॅनला मला नक्की वाटत आहे . तू आलीस काय कि न आलीस काय आम्ही दोघे जाणारच आहोत आणि ५ चा टाईम सांग बॉयफ्रेंडला म्हणजे ५.३० ला तरी येईल . सुका खाऊ आन खूप खायलां मला(पुढे मला त्याचीच गरज खूप लागणार होती ) . ती हो बोलली आणि फोन ठेवला . मी बोरिवलीला राहायला आणि प्रथमेश दहिसरला . मी प्रथमेश च्या स्कुटीवरून जाणार होतो सायकल ने अर्धा तास लागनार मग लवकर उठाव लागणार कुत्रे मागे लागणार हा सगळा विचार करून मी आदल्या दिवशी जेवून प्रथमेशकडे झोपायला गेलो . त्याच्या वडिलांनी नको जाऊस म्हणून बजावलेलं का त्रास घेतोस सुट्टीत जीवाला आराम कर ना मस्तपैकी . पण फिरायची हौस त्याला स्वस्थ बसू देत नव्हती . त्याची आई झोपण्यापूर्वी बोलली सुद्धा एक पार्ले जि चा किंवा गुड डे चा पूडा तरी घेऊन जा . माझे पण बाबा बोललेले जास्त निसरड्या जागी जाऊ नकोस . पण आपण सगळे जसे तरुण वयात आई वडिलांचं ऐकणं सोडून देतो तसेच आमच्या दोघांचं झालं .
माझ्या घरून बोरिवली स्टेशन पर्यंत बसने नंतर बहिणीने दिलेल्या ट्रेनच्या तिकिटावर दहिसर स्टेशनपर्यंत मग दहिसर स्टेशन पासून त्याच्या घराकडे पण जायला २०८ नंबरची बस होती ती मिळेल न मिळेल असा विचार करून मी चालत निघालो . त्याच्या घरी पोचायला मला साडे दहा झाले . अंथरून तयार होत . मी गेल्या गेल्या लोळू लागलो . ११ ला सगळे खतरोके खिलाडी बघून झोपलो (कदाचित आम्ही दोघे पण खतरोके खिलाडीच खेळणार होतो पुढचे १२ तास नियती आम्हाला दाखवून देणार होती ते ). ५ च्या दरम्यान प्रथमेशच्या आईने आम्हा दोघांना उठवलं . खूप वर्षांनी मी बोटाने पेस्ट लावून दात घासले . ५.३० पर्यंत आम्ही दोघे पेट्रोल पम्पावर पोचलो २०० रुपयांचं पेट्रोल टाकलं . प्रियंकाला ५-६ वेळा कॉल केला पण तिने उचललाच नाही . तिचा व्हाट्सअप लास्ट सीन १. ५५ चा होता . मी ती येण्याची आशाच सोडून दिली .माझा मोबाईल प्लास्टिक पिशवीत टाकला . तो सरळ खाली पडला . पिशवीला मोठं भोक होत . प्रथमेशच्या मोबाईलमध्ये गुगल मॅप वर कामणदुर्ग टाकलं आणि आम्ही स्कुटी वरून प्रवास चालू केला . मॅप वर वज्रेश्वरी चा फाटा पकडून मग एका गावात जावं लागणार होत . असं दाखवलं होत मग तिथून चालत जावं लागणार होत . वज्रेश्वरीला वळून आम्ही ५,६ किलोमीटर आत गेलो आणि दुसरा एक फाटा लागला . तिथे नाक्यावर आम्ही कामणदुर्ग ला जाण्यासाठी एका रिक्षेवाल्याला विचारलं तर तो बोलला इथून अजिबात रस्ता नाहीय . मागे चिंचोटी फाटा आहे तिथे वळायला हवं होतात तुम्ही लोक. तिथला एक दुकानदार पण तसेच बोलू लागला . त्या जागेपासून चिंचोटी फाटा २० किलोमीटर मागे होता !!! थोडं योग्य दिशेला जाताच पावसाची एक सर आली . आम्ही दोघे दुकानाच्या कडेला उभं राहून युट्युब व्हिडीओ बघितली . पाणी जाऊ नये म्हणून पिशवीत मोबाइलला नीट जपून ठेवले . आमची नियती आम्हाला वाचवायला बघत होती . नका जाऊ सांगत होती . पण आपलीच लाल करायची सवय काही केल्या जात नव्हती . कधीही गुगल मॅप पेक्षा जी लोक गेली आहेत त्यांचे पोस्ट व्हिडियो बघावेत हा धडा त्या दिवशी आम्हा दोघाना मिळाला .
युट्युब व्हिडिओमध्ये किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाचं नाव देवकुंडी होत . चिंचोटी फाट्यावरून भिवंडीला जाणाऱ्या रोड ने आम्ही निघालो फाट्यावर एक दोघांना विचारलं देवकुंडी कुठे आहे एक जण बोलला ३ किलोमीटर . जेव्हा माहित नसत तेव्हा ३ किलोमीटर पण ३० किलोमीटर वाटतात . तेच झालं आमचं आम्ही दर २ मिनिटाने दिनाच्या माणसाला देवकुंडी कुठे आहे विचारत सुटलो . कारण एकदा बेपर्वाईचा तडाखा आम्हाला बसलेला . तब्बल ४० किलोमीटरचा . वाटेत भजनलाल डेअरी लागली . निसर्गावर अतिक्रमण करून कशीही वेडीवाकडी बांधलेली किवा अर्धवट बांधलेली दुकान, हॉटेल त्या पावसाळी कुंद वातावरणात भयानक भेसूर दिसत होती . त्यात खाच खळग्यांनी भरलेल्या रस्त्याची भर पडलेली . एक अनामिक हुरहूर वातावरणात होती . शेवटी एकदाच देवकुंडीला जाणाऱ्या फाट्यावर स्कुटी वळली रस्ता अत्यंत सुमार दर्जाचा होता अनेक खड्डे होते . ते कसेबसे पार करत प्रत्येक नवीन फाट्यावर येणाऱ्या जाणाऱ्याला विचारत कसेबसे देवकुंडीला पोहोचलो . एक मात्र नशीब आमचं कि दरवेळी कोणी ना कोणी वाट दाखवणार आम्हाला पूर्ण प्रवासभर भेटत गेलं .
वालीव पोलीस चौकी चा एक पिवळ्या रंगाचा सूचनाफलक होता तिथे एक कार आणि २ स्कुटी जिथे पार्क करून ठेवल्या तिथेच आमची स्कुटी आम्ही पार्क करून निघालो . सकाळची ८ वाजताची वेळ असूनपण पावसाळी कुंद वातावरण होत . मधेच वेगवेगळ्या आकाराचे तलाव लागत होते . त्यात आम्ही आधी झालेली निराशा निसर्गरम्य वातावरणात पूरती झटकून टाकली . प्रथमेशच्या पायाला जबरदस्त वेग होता मी त्यामानाने रमतगमत चालत होतो . एक वयस्कर गावकरी माणूस सुद्धा चालत होता . तो आमच्या बऱ्याच पुढे गेला . एक आदिवासी शेतकरी जोडपं शेतात राबायला जात होत . त्यांना अधून मधून येणाऱ्या फाट्यावर आम्ही रस्ता विचारायला सुरुवात केली . त्यांनी आम्हाला सांगितलं कि झाडाला लाल रंगाची कापड गुंडाळली असतील त्या पायवाटेने जावा . आम्ही त्यांचं ऐकलं आणि नंतर आम्हाला तो वयस्कर ग्रामीण माणूस दिसला आम्ही त्यांच्या मागे जाऊ लागलो . त्यांना विचारल्यावर ते बोलले अरे मागच्या फाट्याने जायचं होतात उगाच माझ्या मागे आलात . पुन्हा मागे वळलो आणि चालू लागलो . तिथे काही शहरी तरुण तरुणींचा घोळका झऱ्याचा आनंद घेत हुंदडत होता . गुडघाभर पाण्यातून जात पुन्हा मार्ग पकडला . आणि त्या ग्रामीण माणसाने सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघे झाडांना बांधलेली लाल फडकी शोधात पायवाट तुडवू लागलो. प्रथमेशचं जास्त लक्ष पायवाटेकडे होत आणि माझं लाल कापडाकडे त्यामुळे त्याला तशी खूप कमी कापड दिसली पण माझं लक्ष नसल्याने मी रस्त्यात बरेच वेळा धडपडलो . मनुष्य वस्ती जसजशी मागे पडत चालली तसतशी झाडांची दाटी वाढत गेली . एक साधी टेकडी चढल्यावर माझं हाशहूश होऊ लागलं . पण आधी बरेच ट्रेक केल्याने मी दुर्लक्ष केलं . अश्या बऱ्याच जागा होत्या जिथे अक्षरश वाट दिसत नव्हती पण जरा झाडातून चालत गेलो तिथली झाड जरा बाजूला केली कि वाट सापडायची . अनेकदा बांधलेली कापड मदतीला धावून आली . एकदा तर निळ्या रंगाचं कापड ३ दगडांचा मनोरा रचून त्यात अडकवला होता . ते कापड होत म्हणून त्या दिशेला आम्ही दोघांनी कूच केली . एवढ्या निबिड अरण्यात आम्ही दोघेच एकमेकांना साथीला होतो . पायाखालून अक्षरशः हजारो वेळा खेकडे गेले . खेकडे मुख्यतः २ रंगाचे होते काळे आणि पांढरे . केळ्याची खूपशी झाडं रस्त्यात आम्हाला लागली . २-३ टेकडया चढून उतरून झाल्यावर माझ्यातली शक्तीच संपल्यासारखी झालेली . मी शक्तिहीन झालेलो २ऱ्या टेकडीच्या वेळी तर प्रथमेशच्या दोन्ही बुटांचा तळवाच निघाला. त्याने लेस ने तो तळवा बांधला. तो थांबायचा तेव्हा आराम मिळायचा मला म्हणून जीवाला बर वाटायचं . सारखं थांबून थांबून मला आरामाची चटक लागायला लागली . ट्रेकर लोकांसाठी ट्रेक अडीच ते तीन तासांचा आहे असं लिहिलेलं म्हणून मला वाटत होत २ वाजेपर्यंत आपण घरी पोहोचू . पण कसलं काय नि कसलं काय ११ वाजले तरी दूर दूर पर्यंत आम्हाला किल्ल्याचा कि पण दिसेल तर शपथ . प्रथमेशला तर एक दोनदा शंका पण आली कि असा किल्ला आहे तरी का . पण मी थांबलो कि तो बोलायचा अरे माणसात खूप स्टॅमिना असतो २ दिवस न जेवता तू जगू शकतोस वगरे बोलून तो मला धीर देऊ लागला . तो बोलत होता त्यात तथ्य आहे ते मला पण माहित होत . पण कस काय माहित एक एक पाऊल उचलन कष्टदायक होत होत .
३री टेकडी चढायला घेतली तेव्हा झाडात एकदोनदा कुजबुज ऐकू आली . मला वाटलं भुकेने आणि तहानेने भास होत आहेत . पण थोड्याच वेळात एक वरळीचा ४ जणांचा ग्रुप आमच्या दृष्टीला पडला . खूप हायस वाटलं. त्यांच्यातला मोहनीश जरा जास्त फ्रेंडली होता . लगेच आम्ही ओळख झाली आणि आम्ही पुढे उत्साहाने वाटचाल करू लागलो . तो ग्रुप अगदी वेळेत आम्हाला नजरेला आला कारण तिसऱ्या टेकडीवर खूपच कमी मानवी अस्तित्वाच्या खुणा सापडल्या . एकदोन प्लास्टिकच्या फरसाण चिप्स च्या (रिकामी ) पुड्या आणि दगडावर रंगवलेले एक दोन सफेद बाण . पुढे तर झाडांमुळे रस्ता चुकलोच असा आम्हा लोकांचा पक्का विश्वास बसला २००-३०० पावलं मागे येऊन आम्ही लोक मुख्यतः मोहनीश आणि प्रथमेश नवीन शक्यतेचा विचार करण्यात गुंग झाले . जागा उंचीवर असल्याने रेंज मिळाली . यूट्यूब , ब्लॉग यांचा अभ्यास सुरु झाला . ( मोहनिशच्या मते किल्ल्याच्या मागच्या बाजूने एक रस्ता जातो जो दीड तास चालून तुंगारेश्वर ला पोचतो . मग तिथून टॅक्सी वगरे करून पुन्हा देवकुंडीला येत येईल असा त्याला अंधविश्वास होता पण माझं मन मला सांगत होत हे सगळं खोट आहे. हे लोक पैसे वाले हे जातील आपलं काय आपल्याला पुन्हा याच जंगलातून कमीतकमी ३ तास तंगडतोड करायची आहे ). पुन्हा जिथे रस्ता संपला तिथे गेलो . आणि एक किंचित दिसणारी पाऊलवाट पकडून चालायला पुन्हा सुरुवात केली . आणि उतार सुरु झाला मोहनीश सगळ्यात पुढे होता त्याच्या मागे मी मग प्रथमेश . ( मोहनीश पुढे जाऊन हाक मारत होता पण त्याच्या हाकेला एकदोनदा ओ देऊन नंतर मात्र स्वतःची शक्ती वाचवण्याचा मी निर्णय घेतला . मी मोहनिशच्या २०-३० पाऊलच मागे असेंन . पण मला तो अजिबात दिसत नव्हता . नंतर मला बिस्किटाचा वास येऊ लागला नक्कीच मोहनिशने बिस्कीट खाल्ले असणार पण त्याला ते विचारण्याची पण मला इच्छा नव्हती ) .
पुढे जाऊन मोहनिशने झेंडा दिसल्याची आरोळी ठोकली आणि सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आलं . माझा पण उत्साह शिगेला पोचला पण तो १०० पाउलातच भराभर आटला . कारण माझ्यात आता अजिबात शक्ती नाहीय हे मला पूर्णपणे कळून चुकलं होत . मन सांगत होत अजून ५०% प्रवास नाही झाला आता तू घरी कसा पोचणार . भुकेने पोटात नुसते कावळे नाही गिधाड पोपट उंदीर सगळेच ओरडत होते . २-३ निसरडे खडक फक्त झेंडा अथवा किल्ल्याची जागा दिसल्यामुळे पार केले. मला आणि मोहनीशला खडक चढताना जास्त त्रास नाही झाला पण मोहनिशच्या ग्रुप मध्ये एक बाई होती ती एक निसरडा खडक चढताना घसरली . तिला थोडं खरचटलं . ती खूपच घाबरी घुबरी झाली . ती घसरल्यामुळे प्रथमेशच्या चेहऱ्यावर १२ वाजलेले मी पहिले . मागचे यायला वेळ लागायचा तेव्हा मी थांबून आराम करून घ्यायचो . भुकेने जीव अगदी मेटाकुटीला आलेला . म्हणून मी केळ्याच्या झाडाचं पान थोडंसं तोडलं आणि चघळू लागलो . अत्यंत कडवट चव होती त्याची . पण थोड्या वेळाने कडवटपणा निघून गेला . पाणी पिऊन तरतरी आली . पुढे असंच एक गुलाबी फुल तोडलं आणि खाऊन बघितलं . विचार केला कि मध असेल तर तितकं खराब नाही लागणार . अजिबात कडवट नव्हतं ते माझी भुकेलेली जीभ त्यात मधाचा गोडवा शोधत होती . किंचित गोड लागताच तो पोटात स्वाहा केलं . ( असाच पुढे बसून आराम करताना मोहनिशने एक संत्र आणलं होत मला भूक लागलेली असून सुद्धा मागायला लाज वाटत होती . त्यानेच स्वतःहून ते संत्र अर्ध केलं आणि मला दिलं . मी त्या संत्र्याला अर्ध केलं आणि प्रथमेशची वाट बघू लागलो त्याला दिल्याशिवाय खाण मला नैतिक दृष्ट्या चुकीचं वाटत होत . मोहनीश बोलला खाऊन टाक माझ्याकडे एकच होत . मला प्रथमेश येताना दिसत होता आणि मागून बाकीचे येत होते उगाच वाद नको म्हंणून मी ते संपवलं . मोहनीशची आई बोललेली ६ तरी संत्री घेऊन जा पण त्याने तीच ऐकलं नव्हतं जस मी बाबानी सांगितलेलं निसरड्या खडकावर जाऊ नकोस ते ऐकलं नव्हतं आणि प्रथमेशने बिस्किटाचा पुडा ने हे ऐकलं नव्हतं अगदी तस्सच !!! ) कसाबसा शेवटचा डोंगर चढलो आणि समोर दीड दोन मजली उंच काळाकुळकुळीत सरळसोट उभा कातळ लागला . मोहनीश ,मी आणि प्रथमेश असे आम्ही तिघेच तिथपर्यंत पोचलो . बाकीचे तिघे बरेच हळू चालत होते किंवा जवळपास थांबलेच होते मागून हाक मारून विचारत होते जमेल का आम्हाला येऊ का पुढे वैगरे . तो कातळ अजिबात चढू नये याबद्दल माझं आणि प्रथमेश च एक मत झालेलं . पण मोहनिशच्या सो कॉल्ड तुंगारेश्वर थेअरी मुळे म्हणा किंवा आता एवढं आलो आणि थोडक्यासाठी का परत जायचं या विचारामुळे म्हणा आम्ही तिघे (मी , मोहनीश , प्रथमेश ) कसाबसा तो निसरडा कातळ चढलो . इथे प्रथमेशला मोहनीश त्याच्या ग्रुपला पण तुंगारेश्वरच्या टॅक्सिचा आणि ढाब्यावरच्या जेवणाचा मोह दाखवून पुढे चालण्याचा आग्रह करत होता . पण त्या कातळाच्या पुढे त्या सर्वानी गुडघे टेकले .
मी आणि प्रथमेश थोडस उरलं हे बघून पुढे गेलो पण मोहनीश त्याच्या ग्रुप मुळे पुन्हा पिछाडीला गेला . जाताना आम्हा दोघांचे नंबर घेऊन गेला . म्हणाला जर तुंगारेश्वरची वाट सापडली तर मला कॉल करा मला म्हित होत हे शक्यच नाहीय . नुसत्या रस्त्याने तुंगारेश्वर २६ किलोमीटर आहे दीड तासात चालत पोचायला टेलीपोर्टरच हवा . शरीराने जरी मी दुर्गाच्या दिशेने चाललो होतो तरी मन तो कातळ कसा उतरायचा याच विचारात होत . बाबांचे शब्द कानात घुमत होते निसरडा कातळ वैगरे . किल्ल्यावर पोचायला १०० -२०० पावलं बाकी असतील तर अचानक रस्ताच सापडेना जो सापडला तो जीवघेण्या दरीकडे जाणारा निघाला . पुन्हा एकदा विचार स्थिर केले आणि झाडी बाजूला केली आणि हुश सापडलाच शेवटी ! पोचलो आम्ही एकदाचे . जो नॉर्मल लोकांना ४ तास सांगितला होता त्यासाठी आम्हा दोघांना तब्बल ५ तास लागले होते , केवळ पावसाळा आणि झाडी असल्यामुळे . मी शक्तिपात होऊन बसून राहिलो त्या झेंड्यासमोर . सुन्नपणे... मक्खपणे... विचारशून्य अवस्थेत... !!!
प्रथमेश त्या झेंड्याच्या पाय पडला . त्याच्या अंगात नवीन जोश संचारला . मी भुकेला खूप पाणी पिऊन मारून टाकली . मी त्याला संत्र न दिल्याबद्दल सॉरी बोललो . त्याने जास्त काही मनावर ते घेतलं नाही . पुढे उतरताना तो बोलला सुद्धा आरडाओरडा करून काही फायदा तरी आहे का ? मला त्याच म्हणणं पुरेपूर पटलं . आता आपण या अवस्थेत दोघेच एकमेकांना साथीदार/ आधार . असं मी म्हणलं आणि तेवढ्यात मनात एक शिसारी येणारा विचार तरळून गेला . आय शुडन्ट बी अलाइव्ह सारखं मला पण याला मारून याच यकृत खावं लागणार कि काय !!! तेवढी तरी माझ्यात ताकद आहे काय ? उलट तोच मला अशा अवस्थेत मारू शकेल . म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती ती गत झाली . मी सरळ तो विचार झटकून टाकला आणि एक वाजता उत्तरायला घेतल. दोघांच्या मनात एकच विचार तो दीड-दोन मजली निसरडा खडक उतरायचा कसा . त्या विचारातच मघाशी जिथे रस्ता संपलेला तिथेच पुन्हा चिबलो . मी मुद्दाम ती जागा लक्षात ठेवल्यामुळे परत जाण्याचा रस्ता सापडला . उतरताना नितंबाचा पुरेपूर ब्रेकसारखा वापर करून कसेतरी घसटत घरंगळत उतरू लागलो .( उतरताना प्रथमेश बोलत होता लिहून काढ हे सगळं . खरतर डोंगर चढताना पण २-३ वेळा तो हेच बोलला मी तेवढी ताकद नसल्याने हे सगळं शब्दांकित करण्याच्या मुळीच मूड मध्ये नव्हतो . ) तो निसरडा खडक उतरताना तेव्हडा धोकादायक वाटला नाही . खाली दरी होती . पण आम्ही दोघेही अगदी सुखरूप उतरलो . माझ्या मनात परत विचारांचं काहूर माजलं . परत तेवढे डोंगर चढून उतरायचे . जवळपास ४ डोंगर तर नक्कीच उतरायचे होते . हतबल होणे, ससेहोलपट होणे म्हणजे काय ते मी स्वतः अनुभवू लागलो . मला भुकेमुळे चक्कर येऊ लागली. पाय वाकडे पडू लागले , तोल जाऊ लागला . कित्येक वेळा झाडे ओढून चालू लागलो . प्रथमेश शरीराने आणि मनाने माझ्यापेक्षा खूपच तंदुरुस्त होता आहे फक्त त्याच्या बुटांची त्याला साथ नव्हती . त्याने त्याही अवस्थेत मला प्रेरित केलं . तो बोलला तू अजून स्वतःची ४० % ऊर्जा वापरली आहेस खूप आहे तुझ्यात ताकद . त्याच्या शब्दांनी मला थोडा हुरूप आला . त्याने माझ्या पाठीवरची बॅग घेतली . मला बोलला तुझा रेनकोट काढ आणि चाल नीट जमेल तुला . त्याच म्हणणं खरं ठरलं उष्णतेमुळे मी कमजोर झालो होतो . रेनकोट काढून ,पाणी पिऊन मला तरतरी जाणवली . आम्ही दोघे वेगाने उतरू लागलो . उतरताना विचार बंद पाय आणि डोळे चालू . कोणतेच अवयव मला जानवत नव्हते . रोबोट/ झोंबी सारखा फक्त चालत होतो . स्वतःला आणि प्रथमेशला बटर चिकन खाऊ असं मोटिवेशन देत होतो . श्रावण मोडण्यासाठी तयार झालो होतो . प्रथमेश मला सुरुवातीला मोटिवेशन देऊन नंतर स्वतः मात्र शांत झाला होता . त्याला त्याचे शूज खूप त्रास देत होते . त्याच्या काकांनी त्याला ते घेऊन दिले होते . त्याने माझ्या सांगण्यानुसार शूजचा तळ काढला आणि बॅगेत ठेवला . त्याला खालचे दगड टोचू लागले . मग त्याने ते पुन्हा निघालेले शुजचे तळवे बुटाच्या लेस ने बांधले . तेवढ्यात आम्हाला एक झरा लागला पाणी बाटलीत भरून घेतले . थंड पाण्यात अंघोळ केली. ( लक्षात ठेवा जंगलात खूप थकला असाल आणि झरा सापडला तर ते पाणी प्या त्यात जसे क्षार असतात जिवाणू विषाणू सुद्धा असतात पण तुमची इम्युनिटी ते वाढवतात आपले मनोबल वाढते ते पाणी पिऊन तसेच चालून गरम झालेल्या पायांवर ते खूपच उपयुक्त असते ) ताजेतवाने होऊन पुन्हा वाटेल लागलो . जस नर्मदा परिक्रमेत खायला काही मिळालं नाही तर पाणी पिऊन पोट भरतात तसंच आम्ही पोटभर ते पाणी प्यालो . आणि अत्यन्त स्वछ ऊर्जेचा स्रोत पोटात गेला . आमचा रस्ता चुकला . एक टेकडी चढून उतरायची राहिली . अचानक रस्त्यात ओढा लागला . तस तर २-३ वेळेला ओढा लागलेला पण यात प्रथमेशने बसकण मारली तोंडावर पाणी मारले . आम्हाला अचानक मानवी वस्तीच्या खुणा, शेती दिसू लागली . आम्ही दोघे पाणी उताराला जातंय त्या दिशेने चालू लागलो . एका शेतात एक टुमदार घर होत तिथे रस्ता विचारावा म्हणून वळलो . सरळ वाट नव्हती म्हणून वाट वाकडी करून गेलो बाहेरून आवाज देऊन बघितला ओ नाही कि ठो नाही पुन्हा एकदा भ्रमनिरास . मूळ वाटेकडे परत जायला निघालो शेतातून चालताना पीकाची हानी होणार नाही याची दक्षता घेत होतो पण जागा असूनही माझी पावलं वाकडी पडत होती आणि भाताचं पीक थोडंफार पायाखाली येत होत . २ तरुण मुलं चालताना दिसली त्यांना थांबवून वाट विचारली . त्याच्या आणि आमच्या मध्ये काटेरी कुंपण होत . परत फिरून येण्या एवढी इच्छा अजिबात उरली नव्हती कसबस पाय देऊन कुंपणावरून आम्ही दोघे पलिकडे गेलो . त्यांच्या मागोमाग चालू लागलो . त्यांच्या पेक्षा वयाने मोठ्या २ बायका त्यांच्या मागून चालत होत्या . त्या पोरांना सांगत होत्या याना नीट वाटेवर सोडा वैगरे . त्या पोरांनी एका फाट्यावर वेगळी वाट धरली . आम्हाला दुसऱ्या रस्त्याने जा बोलले आमच्या वाटा वेगळ्या झाल्या .एक फाटा आला . चुकीचा निवडला . पुन्हा एकदा वाट चुकलो . आणि एका मोठ्या डबक्याच्या काठाशी आलो . पुन्हा ती २पोर मागून आली त्यांनी वाट दाखवली . एकाच्या हातात बेचकी होती . तो दगड न पकडताच उगाच बेचकी ताणून नेम लावल्याचं नाटक करत होता . त्याचे पुढचे केस त्याने सोनेरी रंगात रंगवले होते . मुंबईत कुठे भेटला असता तर कुर्ल्याचा छपरी निब्बा म्हणून सहज खपला असता पण कामण ला तो देवापेक्षा पण मोठा वाटत होता . वाटेत एक ऐतिहासिक भिंत दिसली . पण ती भिंत कसली कोणत्या काळातली हे सगळं विचारायचं त्राण आमच्या दोघात अजिबात नव्हतं . भिंतीनंतर त्यांना मी रस्त्यावर जायची वाट विचारली . तर ते बोलले तुम्ही दुसरीकडून यायला हवं होत . आमच्या थकलेल्या चेहऱ्याकडे बघून त्यांना आमची दया आलेली असावी बहुतेक . त्या बायकांनी पोरांना रस्त्यावर नीट सोडायला बजावलं . मी भुकेने वेडापिसा झालेलो म्हणून त्याही अवस्थेत त्यांना इथे जेवणाची सोया आहे का असं विचारलं . तशी सोय नव्हती जवळपास . वाटेत एक ओढा लागला मी प्रथमेशचा हात धरला कारण गुळगुळीत दगडावरून मला घसरायच नव्हतं . पण त्याने पुढे जा असं सांगितलं मी कसाबसा न पडता ओढा पार केला . ती पोर आम्ही ओढा पार करायची वाट बघत पलीकडे उभी होती . मागे वळून बघितलं तर प्रथमेश ओढ्यात बसलेला दिसला . मी त्याला नंतर विचारलं सुद्धा पडलास कि बसलास ओढ्यात . तो बोलला कि तो घसरला . त्या पोरांनी आम्हाला रस्त्याला आणून सोडलं .
मी त्यांना हायवे ला जायचा रस्ता कोणता आणि गडावर जाण्याचा रस्ता कोणता हे आलटून पालटून विचारू लागलो . त्याच्या जरा जवळ असल्याने मला दारूचा वास आला . वाटलं हि लोक नशेत चुकीचं नको सांगायला . तरी त्यांनी न कंटाळता मला विचारलं ते परफेक्ट सांगितलं . प्रथमेशच आणि माझं नीट काही ठरत नव्हतं . नेमकं कुठे जायचं ते . माझं म्हणणं होत कि गडाच्या दिशेनं आपण जावं त्याच म्हणणं होत उलट दिशेने हायवेकडे . मला माझी बाजू मांडायची पण ताकद उरली नव्हती . आणि आम्ही चुकीच्या दिशेने म्हणजेच हायवे च्या दिशेने पोरांना निरोप देऊन चालू लागलो . तेवढ्यात एका दुचाकीवर बसलेले दोन तरुण आले . मागच्याने काळ्या रंगाचा शर्ट तर पुढच्याने सफेद रंगाचा शर्ट घातला होता . मागच्याच्या हातात सिगरेट होती .त्यांना वाळिव गाव किंवा पोलीस ठाणे कुठे आहे असं विचारलं . त्यांनी दुचाकी थांबवली आमचं म्हणणं ऐकलं आणि बोलले इथे अजिबात अशा नावाचं गाव नाही . आम्ही त्यांना कामणदुर्ग चा रस्ता विचारला . त्यांना किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर सोडायची विनंती केली . मागच्याने बाजूच्या झुडुपात पेटती सिगारेट भिरकावली . प्रथमेशला ट्रिपल सीट घेऊन ते लोक गडाच्या पायथ्याला जिथे आम्ही स्कुटी ठेवली असण्याची शक्यता होती तिथे त्याला नेले . मी रस्त्यात बसकण मारली एकसुद्धा पाऊल चाललो नाही .
मागून ३ गायी आणि समोरून एक कार येतेय असं दिसताच मी उभा राहिलो . गायीच्या मालकाने गायींना रस्त्याच्या कडेला हाकले . कारसाठी वाट काढून दिली. ती कार जाताच मी पुन्हा बसलो . एक आदिवासी / शेतकरी कुटुंब सजूनधजून कुठेतरी जात होत . त्यांना बघून पण मी तसाच बसून राहिलो . मनात लाज, उदासी ,चिंता ,काळजी, भीती अशी कोणतीच भावना नव्हती . किंबहुना जेव्हा माझा ट्रेक ३०% पण झाला नव्हता आणि माझी सगळी ताकद तेव्हाच संपलेली तेव्हापासून मला भूक आणि आरामाशिवाय कोणतीच भावना नव्हती . तेवढ्यात दूरवरून मघासचा तो सफेद शर्टवाला मुलगा एकटाच बाईक वरून आला . आणि म्हणाला तुमची स्कुटी सापडली आहे . फक्त चावी विसरला तो जी तुझ्याकडे आहे . माझ्या कडे असलेल्या दप्तरात ती चावी होती . त्याने मला सुद्धा प्रथमेश च्या इथे आणून सोडले . प्रथमेशच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता . तिथे आरडाओरडा करणारे पोलीस आमच्या स्कुटीचा फोटो काढत होते . आम्हा लोकांना दंड बसणार होता कदाचित . पोलिसांची अरेरावीची भाषा होती . पण आमच्या डोक्यात ती शिरत नव्हती .
अर्थात पोलिसांची तरी काय चुकी . त्या जागेवर म्हणे आदल्या दिवशी एक अक्खा ग्रुप पाण्यात खेळताना चक्क वाहून गेला होता . पोलीस आम्हाला हाकलत होते . तो काळ्या शर्टातला मुलगा त्यांना आमची परिस्थिती समजावून सांगत होता. त्यांना विनंती करत होता कि दंड लावू नका म्हणून . त्यालासुद्धा पोलीस हाकलून लावत होते . प्रथमेशला नवीन चिंता सतावू लागलेली कि हा दंड जबरदस्त असतो . त्यांनी दंड केला तर काय होणार . मी बोललो जर दंड केला तर नक्की सांग किती केला अर्धा मी पण भरेन . ती बाइक्वली पोर जेव्हा गाडीचा नम्बर विचारत होती तेव्हा प्रथमेशला स्वतःच्या स्कुटीचा नम्बर सुद्धा आठवत नव्हता . असं त्यान मला सांगितलं . आम्ही दोघे मास्क घालण्यासाठी पुढे जाऊन जरा थांबलो . मास्क घालत होतो तेवढ्यात तेच २ पोलीस मागून बाईकवरून आले . निघा म्हणून ओरडू लागले . बाईक चालवणाऱ्याने तर पोकळ बांबू काढून माझ्या मांडीवर मारला . मला त्या क्षणाला त्याचा रागसुद्धा आला नाही . कोरड्या नजरेने मी त्याच्याकडे फक्त पहिले . तो निघ बोललो ना मादरचोद एवढंच बोलला आणि आम्ही निघालो . त्यांनी आम्हा दोघांना ओव्हरटेक केलं पुढे एका बाइकवाल्याला थांबवून त्याला ओरडले . तिथे एक पिवळ्या टी शर्टवर एक अंदाजे ३० वर्षाचा युवक चालत होता त्याला लिफ्ट द्या असं आमच्यावर खेकसले . त्यानेच आम्हाला एक ग्रुप वाहून गेला काल अशी खबर दिली . तो वीट भट्टीकडे उतरला . माझी बटर चिकन ची इचछा पण मेली . फक्त जिवंत घरी पोचायचं आणि मस्त लोळायचं . जाताना चा रस्ता हायवे पर्यंत बराच खराब होता . कंत्राटदाराला शिव्या घालण्यातला रस पण माझा संपलेला . भजनलाल डेअरीकडे स्कुटी थांबवून आम्ही लस्सी घेतली .लस्सी शेवटला खूपच घट्ट आणि दाट होती . लस्सीचे डब्बे मस्त होते म्हणून मी ते कचऱ्यात न फेकता दप्तरात ठेवले . तिथे एक तरुणी आमचा भिकार्यासारखा अवतार बघून कावरीबावरी झाली .
प्रथमेशला दहिसरच फेमस बटर चिकन माहित होत म्हणून अधलमधल काहीच न बघता सरळ दहिसर गाठलं . माझी बटरचीकन ची इचछा मेलेली असल्याने मी आधीच्या दिवशी शेफ नसल्याने राहिलेली मिसळ खायला गेलो . तो शेफ त्या दिवशी पण नव्हता म्हणून साधी मिसळ मागवली ती पण अप्रतिम होती. अशी आमची कामणदुर्गची साठा उत्तराची कहानी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली . ती जशी आम्हाला लाभली तशी तुम्हाला अजिबात न लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना