आर्थिक व्यवहार संदिप खुरुद द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आर्थिक व्यवहार

आर्थिक व्यवहार

अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून विराजने आपला फर्निचरचा व्यवसाय भरभराटीस आणला होता. काहीच दिवसात तो शहरातील एक नावाजलेला व्यावयायिक म्हणून सर्वांच्या परिचयाचा झाला होता. प्रेमळ स्वभाव व आपल्या गोड बोलण्यानं तो ग्राहकांचे मन लगेच जिंकायचा. एखाद्या ग्राहकाला एखादी वस्तू घ्यायची नसली तरी त्याच्या बोलण्याच्या जादूनं ती वस्तू तो ग्राहक विकत घ्यायचा. यामुळे त्याचा व्यवसाय अगदी कमी कालावधीमध्ये भरभराटीस आला होता.

एके दिवशी त्याचा मित्र धनंजय बऱ्याच दिवसाने त्याच्या दुकानावर आला. खूप दिवसांनी मित्र भेटल्यामुळे विराजला खूप आनंद झाला. त्याने लागलीच स्पेशल चहा मागवला. थोडावेळ जुन्या आठवणीतील गप्पा निघाल्या.दोघेही जुन्या आठवणीत रमून गेले.

थोडया वेळाने धनंजय म्हणाला,

"मित्रा! मला जरा पैशांची गरज आहे. तुला दोन महिण्यांनी परत देतो."

मोकळया स्वभावाचा विराज लगेच म्हणाला,

"किती पैसे हवेत ?"

"दोन लाख." धनंजय जरा कचरतच बोलला.

विराजने लगेच आपल्या कामगाराला चेक लिहून दिला व बँकेतून दोन लाख रु.काढून आणायला सांगीतले.नोकराने पैसे आणून विराजकडे दिले. विराजने धनंजयला पैसे दिले.

"एवढे पैसे लगेच दिलेस? मला वाटले नव्हते तु लगेच देशील.मला विचारलं पण नाहीस कशाला हवे आहेत."धनंजय काहीशा आनंदात व आश्चर्यातच म्हणाला.

"मग मित्र कशाला म्हणातात?" विराजने हसत त्यालाच उलट प्रश्न केला.

धनंजय पैसे घेवून गेला.काही दिवसांनतर आणखी त्याच्या एका मित्राला एक लाख रुपयांची गरज पडली.विराजने त्यालाही एक लाख रु.दिले.आपला मित्र पैशावाला आहे. तो मागीतले की पैसे देतो.त्यामुळे त्याच्याकडून उसने पैसे घ्यावे. या भावनेने बऱ्याच मित्रांनी त्याच्याकडून उसने पैसे नेले. आता जवळपास पंधरा लाख रुपये त्याचे मित्रांकडेच होते.

आणखी काही दिवसांनी विराजचा मित्र राहूल त्याच्याकडे दीड लाख रुपये मागायला आला. यावेळी मात्र विराजकडे पैसे शिल्लक नव्हते. विराजने त्याला पैसे नाहीत म्हणून सांगीतले. त्यावेळी राहूल नाराज झाला. याचे विराजला खूप वाईट वाटले. आपण आपल्या मित्राला पैसे देऊ शकलो नाहीत याचाच विचार करत तो दु:खी झाला.

दुसऱ्या दिवशी राहूलचा विराजला फोन आला.

"विराज! मला मोतीलाल सेठ पैसे देतो म्हणाले आहेत. पण मध्ये जबाबदारी घ्यायला कोणाला तरी घेवून ये म्हणाले आहेत. तु इकडे येतो का ?"

विराजने त्याला येतो म्हणून सांगीतले व तो मोतीलाल सेठच्या दुकानाकडे गेला.विराजला पाहून हसतच मोतीलाल सेठने विराजला नमस्कार केला व तो राहूलकडे पाहत म्हणाला,

"अरे ! विराज सेठ येणार आहेत हे मला आधीच सांगायचे ना. त्यांची यायची गरज नव्हती. फोनवर बोलले असते तरी चालले असते."

तीन महिन्यात दीड लाख रुपये व्याजासह परत करतो या अटीवर मोतीलाल सेठने राहूलला विराजच्या मध्यस्थीवर व्याजाने पैसे दिले.

काही दिवस असेच गेले. दिलेल्या मुदतीवर विराजला मित्रांनी पैसे परत दिले नाहीत. सरळ मनाच्या विराजला त्यांना पैसे परत मागु वाटेनात. काही मित्रांनी घेतलेले पैसे वेळेवर परत दिले. पण विराजने दिलेल्या पैशांपैकी अर्धे पैसेही वेळेवर परत आले नाहीत.त्यामुळे विराजला व्यापाऱ्यांचे मालाचे पैसे वेळेवर देता येईनात व त्यामुळे व्यापारी त्याला मालही देईनात व पैसे देण्यासाठी सारखा तगादा करु लागले.विराजने उधारीवर पण काही ग्राहकांना वस्तु दिल्या होत्या. ते ग्राहक पण त्याला पैसे देईनात. काही मित्र व काही ग्राहक तर विराजला पाहून आपला रस्ता बदलू लागले. काहींनी तर त्याला बोलणे सोडले. त्यामुळे विराज खूप मोठया आर्थिक संकटात सापडला.

असं म्हणतात अडचणी आल्या की, सगळया बाजूने एकदाच येतात. विराज सोबतही तसेच झाले. त्याच्या वडीलांचे अचानक दुखु लागले. डॉक्टरांनी बायपास सर्जरी करावी लागेल त्यासाठी चार लाख रु.खर्च येईल असे सांगीतले. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते. विराजचे जवळपास दहा लाख रुपये बाहेर अडकले होते. पण आज त्याच्या जवळ वडीलांच्या शस्त्रक्रियेसाठी पन्नास हजार रुपये सुद्धा जवळ नव्हते. काही मित्रांनी उसने घेतलेले पैसे परत आणून दिले. ते जवळपास तीन लाख रुपये भरले. आणखी एक लाख रु. कमी पडत होते. विराजने कसे तरी इकडून-तिकडून पैसे गोळा केले. त्याच्या वडीलांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली.

दोन-तीन दिवसांतच मोतीलाल सेठचा विराजला फोन आला.

"विराज सेठ ! काल आपली मुदत संपली,तीन लाख रु. कधी देणार ?"

विराजकडे आता पैसे शिल्लक नव्हते. त्याला मोतीलाल सेठचा स्वभाव माहित होता. मोतीलाल सेठला जर वेळेवर पैसे दिले नाही तर तो आपल्या दुकानातील सामान उचलून न्यायला कमी करणार नाही. व आपला भर माणसांमध्ये अपमान करेल.

"दोन-तीन दिवसात पैसे देतो." असे विराज अविश्वासानेच बोलला.

"काय विराज सेठ ? माणसानं बोललेल्या मुदतीत पैसे परत द्यायला पाहिजेत. तुम्ही आहेत म्हणून मी शांत बसतो. नाहीतर मी दुसऱ्याला एक दिवसाचाही जास्त वेळ देत नाही. मला दोन दिवसांनी व्याजासकट पैसे परत हवेत." असे म्हणून मोतीलाल सेठने रागातच फोन ठेवला.

आता मात्र विराजचे हातपायच गळाले. त्याने लगेच राहूलला फोन केला. दोन-तीन वेळा फोन करूनही राहूलने फोन उचलला नाही. त्यामुळे विराज राहूलच्या घरी गेला. त्याने बाहेरुन राहूलला आवाज दिला. राहूलचा मुलगा बाहेर आला. विराजने त्याला राहूलला बोलावण्यास सांगीतले. पण त्या मुलाने ' पप्पा घरी नाहीत म्हणून सांगीतले.' राहूलची चप्पल बाहेरच असल्याचे विराजने पाहिले. तो घरातच असणार. पण तरीही त्याने त्याच्या मुलाला घरी नाही म्हणून सांगायला सांगीतले. विराज खूप तणावात आला. तो आपल्या घरी गेला. त्याच्या बायकोने त्याला जेवायला वाढले. पण त्याचे जेवणात लक्ष लागेना.त्याला अन्न गोड लागेना. त्याने कसे बसे दोन घास घशाखाली उतरवले व हात धुतला. त्याचा दोन वर्षाचा मुलगा त्याला येऊन बिलगला.पण विराजने टेंशनमुळे त्याला बाजूला झिडकारले. व तो घराबाहेर पडला. तेवढयात त्याला पुण्याच्या व्यापाऱ्याचा पैशांसाठी फोन आला.

"विराज ! कधी पैसे देतो ? मी माल उचलून परत नेईन."

"थोडे थांबा शेटजी. देतो आपले सर्व पैसे.जरा अडचणीत आहे."

"मला अडचण-बिडचण काही माहित नाही. मला दोन दिवसात पैसे पाहिजेत." असे ठणकावत त्याने फोन ठेवून ‍दिला.

आता मात्र विराजला खूप मानसिक त्रास होऊ लागला. त्याला छातीवर दडपण आल्यासारखे जाणवू लागले. ज्यांना आपण त्यांच्या संकटसमयी पैसे दिले. त्यांनीच आज मला वेळेवर पैसे दिले नाहीत. आपले पैसे असून पैसे मागण्याची चोरी झाली आहे. पैसे मागावे तर समोरचा नाराज होत आहे. बोलणे सोडून देत आहे. राहूलच्या व्यवहारात तर उगाच मध्ये पडलो. तो सेठ आता आपल्याला काही सोडणार नाही. या विचारांनी त्याच्या छातीवर प्रचंड दडपण आल्याचे त्याला जाणवले.

आता रात्र झाली होती.तो एकटाच शहरापासून दूर एका निर्जन स्थळी येवून बसला होता.उशीर झाल्यामुळे त्याच्या बायकोचे फोनवर फोन येत होते.पण तो फोन घेत नव्हता. त्याची बायकोही काळजीत पडली होती.खूप वेळ विचार करून तो घरी आला. घरी त्याची बायको त्याची वाटच पाहत होती. त्याचा दोन वर्षाचा मुलगा शांत झोपला होता.‍विराज त्याच्या जवळ गेला.त्याने आपल्या त्या बाळाकडे पाहिले. आणि त्याला गहिवरून आले. हा बाळ किती शांत झोपला आहे?. त्याला भविष्याची चिंता नाही. त्याचं भवितव्यच आपण आहोत. आपलेच काही बरे वाईट झाले तर? या विचाराने त्याच्या डोळयातून अश्रु वाहु लागले. त्याच्या पत्नीने त्याला आपल्या छातीशी धरले. त्याचे अश्रू पुसले. तिच्या प्रेमळ स्पर्शाने त्याला खूप बरे वाटले.

"मी गेल्या काही दिवसांपासून बघते आहे. तुमची मानसिक स्थिती बरोबर नाही. तुम्ही थोडया-थोडया गोष्टीवर चिडचिड करत आहात. तुम्ही कोणत्या तरी प्रचंड दडपणात आहात. पण तुम्ही मला त्याबद्दल काहीच सांगीतले नाही."

त्यावर विराजने तिला घडलेली सर्व हकीकत सांगीतली.

त्याच्या बायकोनं योग्य नियोजन केले. आपले बाहेर किती पैसे आहेत? व आपल्याला देणे किती आहे? याचा ताळमेळ लावला. देण्यापेक्षा सात लाख रुपये येणे जास्त होते. व दुकानातील मालही नफयामध्येच होता.

तिने कपाट उघडले. व आपले सोने विराजपुढे ठेवत ती म्हणाला,

"हे घ्या सोने. हे कमीत-कमी तीन लाखाचे तरी भरेल.माझ्याकडे बचत केलेले एक लाख रुपये आहेत."

तिचे बोलणे ऐकून तो खूप खूष झाला. कारण तगादा लावणारांचे देणे तेवढयात देता येणार होते.पण त्याला तिचे सोने घेण्यास कमीपणा वाटु लागला.

तेव्हा ती म्हणाली, "घ्या. तुम्हीच माझं सोनं आहात. तुम्हालाच जर सुख नसेल तर मी हे सोनं घालून कशी सुखी राहील." तिच्या प्रेमळ बोलण्यानं त्याला आणखी हुरुप आला. 'पुरुष हा लढवय्या असतो तर त्याची पत्नी ही त्याची प्रेरणा असते.' याचा प्रत्यय त्याला त्यावेळी आला.

तेवढयात विराजला धनंजयचा फोन आला त्यानेही घेतलेले दोन लाख रुपये उद्या देतो म्हणून सांगीतले. त्यामुळे ते दोघेही पती-पत्नी खूप खूष झाले.

काही दिवसांत वसुलीबाबत विराजने योग्य नियोजन करून जवळपास सर्व उधारी व उसने दिलेले पैसे जमा केले व तो आता पुर्वपदावर आला. आता त्याला कळाले होते. आर्थिक व्यवहार ही पण एक कला आहे. जर आपण आर्थिक व्यवहार योग्य प्रकारे केला नाही तर आपण आपल्या सर्वस्वासह आपले सुखही गमावु शकतो.

तात्पर्य:- आपण कितीही पैसा कमावला व आपण आर्थिक नियोजन करण्यात चूक केली तर आपल्याला बर्बाद होण्यापासून कोणीच रोखु शकत नाही. पैसे उसने देण्यास किंवा वस्तु उधार देण्यास काही हरकत नाही पण त्याला मर्यादा हव्यात.कोणतीही गोष्ट मर्यादेच्या बाहेर गेल्यावर आपण अडचणीत येतो. आर्थिक नियोजन व्यवस्थित केले तर आयुष्याचे नियोजनही चांगले होते.