मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 14 अनु... द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 14

पुढे...

कधी कधी नात्यातील ओलावा सुखद क्षणांना आत्मिक समाधान देऊन जातो. या ओलाव्यामुळेच जर गैरसमज होतही असतील तरी ते दूर होतात, जास्त दिवस दुरावा राहत नाही....सहवासातून बहरणारं नातं चांगल्या गोष्टी घडवून आणल्यास अजून फुलतं. कोणावर प्रेम करताना आपल्याला सुख किंवा समाधान केंव्हा मिळतं?? हा प्रश्नही आपल्याला बऱ्याचदा पडतो. मला तरी वाटतं, आपल्यामुळे जवळच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद आपल्याला सुखाच्या क्षणाची विलक्षण अनुभूती देऊन जातो. जेंव्हा स्टेशन वर मी अतुलच्या हातात हात दिला, मला जो आनंद झाला तो वेगळा पण त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटलं होतं ते मला माझ्या आनंदापेक्षाही मोठं होतं....

खरं तर प्रेमात खूप कमी क्षण येतात सुखाचे नशिबात आणि जेंव्हा असे क्षण जगायला मिळतात आपल्या प्रिय व्यक्तीसोबत तेंव्हा त्या व्यक्तीच्या सोबतीतील तो सुवर्णकाळ असतो, असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. त्या काळात घडणाऱ्या प्रत्येक घटना आपल्याला मंत्रमुग्ध करतात. त्या व्यक्तीच्या सहवासातील ते क्षण मनात एक निरागस आठवणींचा कोपरा तयार करीत असतात.. प्रेमाचा परमोच्च बिंदू काय असायला हवा असावा माहीत आहे, जेंव्हा आपली आवडती व्यक्ती स्वच्छंदपणे आपल्या सोबत असेल....हा परमोच्च बिंदू मला मिळाला असं मी म्हणणार नाही आणि नाही मिळाला हे पण सांगणं चुकीचं आहे, कारण मी आणि अतुल असं मुक्तपणे एकमेकांसोबत सगळ्यांसमोर कधी येऊच शकलो नाही...तरीही समाधान होतं... आणि त्या दिवसांनंतर तर आता आमच्या दोघांत बोलणंही सुरू झालं होतं, पण आता मला हे जाणून घ्यायचं नव्हतं की आमच्या मधात काय आहे, कोणतं नात आहे, मला त्या भानगडीत पडायचं नव्हतं...मला फक्त जितका वेळ, जे क्षण अतुलच्या सोबतीत मिळत होते ते जगायचे होते....

"जरी टाळते आता तरी गुंतने माझे,
तुझ्या सोबतीने का असे चालणे माझे।"

असंच काहीसं माझ्यासोबत घडत होतं...मी जेवढा त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला तेवढ्या वेळी नशिबाने आम्हाला सोबत आणलं, त्यामुळे मी आता माझे प्रयत्न सोडले होते, मी आता अतुलच्या बाबतीत माझी दोर नशिबाच्या हाती सोपवली होती...

कॉलेज म्हटलं की त्यात जितक्या चांगल्या गोष्टी येतात तेवढे थोडेफार त्रासही होतात, काही अडचणींचा सामना ही करावा लागतो...ट्रेनिंग प्लेसमेंट मध्ये दर आठवड्याला फायनल इयर च्या स्टुडंट्स साठी अँप्टीट्यूट सेशन व्हायचे आणि त्यावर त्यांच्या टेस्ट ही व्हायच्या...त्या स्टुडंट्स ला अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून सर पेपर सेट करून आम्हाला त्यांना वाटायला सांगायचे... सरांनी जबाबदारी आमच्यावर सोपवली होती की वेळच्या वेळी ते पेपर सोडवून त्यांच्याकडे सुपूर्द करावे...काही मेकॅनिकल ची मुलं होती जी नेहमीच उशिरा यायची आणि त्यांची वर्तवणूक ही फार वात्रट होती...पण उगाच नको त्या भानगडीत कशाला पडायचं म्हणून मी कधी सरांना किंवा कोणाला बोलली नाही...

एकदा संध्याकाळी सहा वाजता जेंव्हा सगळे घरी जाण्याचा तयारीत होते तेंव्हा त्यांनी येऊन मला टेस्ट पेपर मागितला आणि नेहमीप्रमाणे यावेळी ही उशिरा येऊन त्यांनी अरेरावी सुरू केली म्हणून मी त्यांची तक्रार संरांकडे केली... सरांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केली पण त्यांच्या डोक्यात राग अजूनही होताच...एका ज्युनिअर ने त्यांना रोखलं यामुळे त्यांचा इगो दुखावल्या गेल्या असेल...दुसऱ्या दिवशी जेंव्हा संध्याकाळी मी आणि ऋता कॉलेजमधून होस्टेलला परत जात होतो त्यांनी येऊन आमचा रस्ता अडवला...हिवाळ्याचे दिवस होते त्यामुळे अंधारही लवकर पडला होता.. आम्ही दोघी चांगल्याच फसलो होतो... तरी मी हिम्मत दाखवत ऋताचा हात धरला आणि झपाट्याने चालायला लागलो दोघी, तर एकाने येऊन माझा हात पकडला...ते फक्त आम्हाला घाबरवण्यासाठी सगळं करत होते, आणि ज्याने माझा हात पकडला तो बोलला,
"तुझा फर्स्ट इयर ला असताना इन्ट्रो व्यवस्थित घेतला नाही आम्ही, त्यामुळे आज तू आमच्या डोक्यावर बसली आहेस, आज तुला दाखवतोच इन्ट्रो काय असतो..."

मी तर इतकी घाबरली होती, मला कळत नव्हतं काय करू..मी त्यांना सॉरी बोलूनही ते ऐकत नव्हते...ऋताने इतक्यात निखिल आणि अनिमिष ला फोन केला पण त्यांना यायलाही उशीर होत होता... इतक्या वेळेत मात्र मी काय परिस्थितीतुन गेली हे माझं मलाच माहीत...तो मुलगा माझा हात सोडायला तयार नव्हता, आणि ऋताने कोणाला तरी फोन केला म्हणून त्यांनी तिलाही धमकवायला सुरू केलं आणि लगेच तिथून निघून जायला बोलले....त्यांनी जेंव्हा ऋता ला जायला सांगितलं तेंव्हा मला तर रडूच कोसळलं...ती जायला तयार नव्हती पण माझ्यामुळे ती काही गोत्यात येऊ नये म्हणून मी खूप सांगितल्यावर ती जायला निघाली.... आता मी मात्र भीतीने थरथर कापत होती, कंठ दाटून आला होता त्यामुळे गळ्यातून आवाजही निघत नव्हता....पण इतक्यात निखिल आणि अनिमिष धावत पळत आले...त्या दोघांना बघून त्याने माझा हात सोडला...निखिल ने मला पाहिलं आणि लगेच होस्टेलला जायला सांगितलं...मी इतकी घाबरली होती की धावत पळत कुठे जात आहे काहीच कळत नव्हतं.. आणि या चलबिचल परिस्थितीत मी जाऊन कोणाला तरी आदळली,

"अग अग...हळू, सावकाश...मॅरेथॉन धावत आहेस का..?"

भीतीने काही कळतही नव्हतं की कोणाला जाऊन टक्कर दिली आहे मी, पण जेव्हा आवाज ओळखीचा वाटला तेंव्हा पाहिलं तर समोर अतुल होता... त्याला बघून माझा बांध फुटला आणि मी जाऊन त्याच्या गळ्यात पडली... माझा घाबरलेला चेहरा आणि मला असं रडताना पाहून त्याने मला सौम्य शब्दांत समजवण्याचा प्रयत्न केला....

"ऐक ना...शांत हो आणि बाजूला हो, कोणी पाहिलं तर चुकीचा अर्थ काढतील...."
तो असं बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की मी अजूनही त्याला बिलगून आहे आणि लगेच बाजूला झाली आणि त्याला सॉरी बोलून हॉस्टेलकडे जायला निघाली तर वाटेत ऋता माझ्याच दिशेने येत होती...मी होस्टेलला पोहोचली पण माझ्या डोक्यातून ती घटना मात्र काही केल्या जात नव्हती...राहून राहून हाच विचार डोक्यात येत होता की जर ऋताने निखिल अन अनिमिष ला फोन केला नसता आणि ते दोघं वेळेवर आले नसते तर काय झालं असतं... त्या रात्री मला जेवणही गेलं नाही, घरी मी ही गोष्ट सांगितली नाही कारण उगाच घरचे घाबरले असते...पण त्यादिवशी जेंव्हा चेतनाचा फोन आला, त्याने माझ्या अवाजावरूनच ओळखलं की काहीतरी नक्की झालंय...जेंव्हा त्याला मी सगळा घटनाक्रम सांगितला त्याला खुप राग आला, तो बोलला,

"जाऊदे...काही झालं नाही ही चांगली गोष्ट आहे, त्यामुळे तू विचार सोडून दे आता तो...पण आई शपथ सांगतो, जर मी असतो ना, त्या नालायकाचा हातच तोडून टाकला असता...अम्म्मम... मी अतुलला सांगू का?? तुला जर अजूनही त्रास झाला त्या मुलांचा तर..?"

चेतनने अतिशय काळजीने मला विचारलं, त्याची आत्मीयता त्याच्या शब्दांतून झळकत होती...पण मी आज अतुलला धडकली आणि त्याने साधी त्याची दखल ही घेतली नाही हे मात्र मी चेतनला सांगायचं टाळलं...जर मी काही सांगितलं असतं तर चेतन माझ्या काळजीने अतुलला काही बोलला असता आणि उगाच त्यांच्यात गैरसमज झाले असते, जे मला नको होते...त्यामुळे मी त्याला नकार देत बोलली,

"नाही...नको रे..कशाला त्याला सांगायचं...म्हणजे, तसही आम्ही संरांकडे तक्रार केलीच आहे ना..सर ऍक्शन घेतील.. नको काळजी करू तू.."
माझ्या बोलण्याने चेतनला खात्री तर झाली नव्हती पण मग त्याने जास्त जोर देऊन विचारलं ही नाही...

आता अजून एक गोष्ट मला त्रास देत होती, ती म्हणजे, मी निघून आल्यानंतर अतुलने एकदाही माझी चौकशी केली नाही किंवा खबर घेतली नाही की मला काय झालं होतं... त्याला काही चिंता वाटली नसेल का?? आणि मला ही गोष्ट सगळ्यांत जास्त त्रास देत होती...पण मी विचार केला की त्याला नाहीच पडत फरक काही, त्याला तर त्याच्या इमेज ची जास्त चिंता होती.. त्यामुळे तर बोलला तो की 'बाजूला हो, कोणी पाहिलं तर काय विचार करतील'....मी पण स्वतःला समजावलं की अडचणीच्या वेळी जे कामाला येतात तेच खरे मित्र असतात आणि अतुल माझा कोणीच नाही... मित्रही नाही....

"समेटा नही कभी भी तुमने बिखर जाने पर,
लेकीन, तेरा हमे तोडनेका अंदाज हम याद रखेंगे।"
*********************

निखिलने त्या मुलांची तक्रार डायरेक्ट डीन सरांना केली होती आणि त्यांची ही चूक पाहता, त्यांचा मागचा रेकॉर्ड पाहता, त्यांना प्रिंसिपल सरांनी कॉलेजमधून एक महिन्यासाठी सस्पेंड केलं होतं...दोन तीन दिवसांनी मी पण ते सगळं विसरून पुन्हा कॉलेजला जायला लागली... मी पुन्हा माझ्या अभ्यासात लक्ष केंद्रित करत होती, माझ्या मित्र मैत्रिणीबरोबर स्वतःला इंव्हॉल्व करत होती पण मनातून मात्र ते जात नव्हतं की अतुल का असा वागला असेल?? त्यादिवशी तर स्टेशन वर बोलला की आपण मित्र आहोत, पण मग तो कशाला काळजी करेल माझी?? जाऊदे...सोड...नको त्याचे विचार म्हणून मी पण तो विषय सोडला...त्याच दिवशी एलआर रूममध्ये मी आणि ऋता जेंव्हा लिहीत बसलो होतो, तिथे प्रिया दिसली... तिने मला आणि ऋताला बघून स्माईल दिली, तिच्या हातात बरंच सामान दिसलं म्हणून ऋताने तिला मदत केली आणि विचारलं,

"हे इतकं पार्सल खाण्याचं??? एकटी कशी नेशील?? मी येऊ का सोबत???"
ऋता बोलली आणि मला मात्र तिला बोलण्याची इच्छा झाली नाही....

"नको नको....माझा फ्रेंड येतोय...खरं तर हे माझं नाही...अतुलसाठी घेऊन जात आहे, त्याला बरं नाही ना.."
आणि असं बोलून ती निघून गेली... मला मात्र काळजात चर्रर्र झालं...अतुलला बरं नाही म्हणून मी बैचेन झाली होती आणि ती प्रिया का इतकी काळजी करते अतुलची म्हणून ईर्ष्या ही वाटत होती...मला आता तिथे प्रिया समोर थांबायची इच्छा नव्हती त्यामुळे मी ऋता ला घेऊन कॅन्टीनमध्ये गेली...आमच्या मागोमाग निखिल आणि अनिमिष ही आले...आमच्या गप्पा सुरु असताना ऋता बोलली,

"फ्रेंड्स, मागे बघा ना, तोच मुलगा..ज्याने आम्हाला त्रास दिला होता... काय सॉलिड धुलाई केली यार निखिल तू याची...डायरेक्ट हात फ्रॅक्चर केलास...."
आणि ऋता काय बोलत आहे म्हणून मी अन निखिलने मागे वळून पाहिलं तर खरंच तो मुलगा बिचारा प्लास्टर झालेला हात गळ्यात टाकून बसला होता...

"लाथा बुक्क्यांचा प्रसाद दिला होता ग फक्त, हात तुटेल इतकं मारलं नव्हतं...पण कसं झालं माहीत नाही...मी शक्तिमान झालोय का ग ऋता...हाहाहा"
आणि निखिल च्या बोलण्यावर आम्ही सगळे हसायला लागलो,

"पण बरंच झालं रे....याच हाताने त्याने माझं मनगट पकडलं होतं... त्यालाही कळू दे त्रास काय असतो..."
मी बोलली....आणि पुन्हा आमचा हशा पिकला...

त्यादिवशी होस्टेलला परत आल्यावर माझ्या डोक्यात सतत हेच घुमत होत की कसं काय त्या मुलाला इतकं लागलं असेल...आणि विचार करता करता मला काहीतरी आठवलं...प्रिया काय बोलत होती की अतुलला बरं नाही...काय झालं असेल अचानक त्याला ..?? इतक्या वर्षात तर मी त्याला कधीच आजारी पडताना पाहिलं नाही...मग काय झालं असेल आणि माझी ट्यूब पेटली...अचानक एक गोष्ट माझ्या डोक्यात चमकून गेली आणि मी लगेच फोन उचलुन अतुलला मेसेज केला...

"हाई...वेळ असेल तर उद्या भेटशील प्लिज... कॉलेज झाल्यावर...??"
मी मेसेज तर केला होता खरा पण तो रिप्लाय देईल का किंवा काय विचार करेल ही धाकधूक होतीच... आणि अर्ध्या तासाने त्याचा रिप्लाय आला...

"हो नक्की...कॅन्टीनमध्ये..संध्याकाळी कोणी नसतं तिथे.."
आणि त्याचा रिप्लाय वाचून मनाला थोडी शांती मिळाली की त्याने लगेच भेटायचं कबूल केलं म्हणजे थोडी फार होईना त्याला माझी कदर आहे....

दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसभर माझं कॉलेजमध्ये, लेक्चर्स मध्ये लक्ष लागलं नाही..कधी एकदाची संध्याकाळ होते आणि कधी अतुलला भेटते असं झालं होतं... संध्याकाळ व्हायला आली पण माझ्या मित्रांची फलटण काही माझा पिच्छा सोडेना त्यामुळे मी बहाणा केला की मला लायब्ररीत जायचं आहे, आणि लायब्ररीचं नाव ऐकून सगळ्यांना काही काही कामं आठवायला लागले...मी विचार केला बरं झालं, आज लायब्ररी ने वाचवलं मला...ते सगळे निघून गेल्यावर मी कॅन्टीनमध्ये जाऊन बसली, अगदी कोपऱ्यात असलेल्या टेबलवर आणि अतुलची वाट पाहत होती... थोड्याच वेळेत तो येतांना दिसला मला...पण हे काय, तो असा लंगडत लंगडत का चालतोय? आणि त्याच्या हातालाही खरचटलेलं दिसतंय... काय झालं असेल नक्की...आणि मी विचारांत मग्न असतांना तो येऊन माझ्या पुढे बसला...

"बोल...काय झालं???"
आणि त्याच्या बोलण्यावर माझी तंद्री भंगली...पण त्याला काय झालंय यामुळे माझी बैचेनी वाढत होती आणि मी त्याला प्रतिप्रश्न केला,

"तुला काय झालंय?? हे हाताला, पायाला कसकाय लागलं?"

"तुला संध्याकाळी चहा हवा असतो ना, मी चहा घेऊन येतो लगेच..." माझ्या प्रश्नांचं उत्तर न देता त्याने विषय वळवण्याचा प्रयत्न केला...आणि चहा आणण्यासाठी तो उठून उभा झाला...पण माझाही पारा खूप चढला होता... मी रागातच बोलली,

"हे बघ...ते चहा वैगरे जाऊदे खड्यात, मला आधी उत्तर दे तुला काय झालंय...आपण इतक्या वेळा भेटतो, तू मला हवं ते उत्तर का देत नाहीस?? का बोलत नाहीस तुझ्या मनातलं...?"

चिंतेने माझे डोळे डबडबले होते पण रागाने माझा आवाज चढला होता आणि कॅन्टीनचे अण्णा आम्हाला संशयाच्या नजरेने बघत होते...अतुलने त्यांच्याकडे बघितलं आणि पुन्हा माझ्यावर नजर टाकत बोलला,


"जब भी ठहरें तेरे मोड पर,
मुलाकात तो हुई कई दफा।
बाते बहूत होती रही है वैसे तो,
पर तू सून तो सही जो मैने ना कहा।"


आणि त्याचं ऐकून मी पुन्हा मान खाली घालून, डोक्याला हात लावून बसली... त्याच्या ह्या बोलण्यावर काय उत्तर द्यावं काही कळत नव्हतं...दोन मिनिटं शांततेत गेल्यावर त्याने हळूच माझा हात हातात घेतला आणि बोलला,

"टेन्शन नको घेऊ...ठीक आहे मी...."

"ठीक...?? काय ठीक??? सरांनी सस्पेंड केलं ना त्या मुलाला, मग काय गरज होती तुला ही मारामारी करायची?? बरं केली ते केली, मला सांगितलंही नाहीस... हं, तसंही तू कुठे काय सांगतो मला...मीच मूर्ख आहे जे नको त्या अपेक्षा ठेवते तुझ्याकडून..."
अतुलसाठीची काळजी रागाच्या स्वरूपात माझ्या तोंडून निघत होती...

"मी बोललो ना...ठीक आहे मी...बघ इकडे, चांगला फिट अँड फाईन बसलो आहे तुझ्यासमोर..."

"कळत कसं नाही तुला...तुला काही झालं असतं तर काय केलं असतं मी...माझं तुझ्यावर.."
आणि बोलता बोलता मी माझ्या भावनांना आवर घातला आणि त्याच्या हातातून माझा हात सोडवून घेतला...

"...आणि तुला काही झालं असतं तर ?? तसही कोणी तुझ्यावर वाकडी नजर टाकलेली सहन होत नाही मला..जाऊदे सोड... आता सगळं ठीक आहे त्यामुळे काही चिंता नको करू... पण माझी इतकी काळजी का आहे तुला?? काही स्पेशल रिजन त्यामागे...??"
त्याने अचानक विचारलं मला आणि मी गोंधळली,

"अरे...म्हणजे.. असणारच ना...आणि तू का माझ्यासाठी इतक्या रागात त्या मुलाला भांडायला गेला?? त्यामागे काही स्पेशल रिजन???"
मी पण त्याला त्याचाच प्रश्नात अडकवलं...त्याने त्यावर एक स्मित दिलं आणि बोलला,

"कसं आहे, कळतं तुला सगळंच पण ऐकायचं असतं... हो ना?? पण त्यात तुझी तरी काय चूक.. मी पण कधी काही स्पष्ट केलंच नाही, ते असं झालंय ना की,
"कुछ तुम्हें टूटकर बरसने का सलीका न आया,
कुछ हमने भी खुलकर बरसात नही की।"

त्याच्या अश्या बोलण्यावर माझे डोळे आपोआप खाली झुकले..कधी कधी शब्दांपेक्षा जास्त चेहऱ्यावरचे हावभाव बरच काही बोलून जातात...

कॅन्टीनमधून निघता निघता थोडा अंधारच झाला होता, पण यावेळी अतुल सोबत होता त्यामुळे मी बेफिकीर होती... तो मला हॉस्टेलपर्यंत सोडवायला आला... कॅन्टीनपासून हॉस्टेलपर्यंत तो माझा हात हातात घेऊन चालत होता आणि मी पण तो सोडवून घेतला नाही... पूर्ण रस्ताभर आमच्यात शांतता होती पण मला ती हवीहवीशी वाटत होती...अतुलच्या जखमा पाहून मला दुःख नक्कीच होत होतं, पण त्याने जे माझ्यासाठी केलं, त्याच्या डोळ्यांत माझ्यासाठी जी काळजी दिसत होती त्यामुळे मी खूप भारावून गेली होती... त्यामुळे आता ज्या काही गोष्टी अव्यक्त होत्या आमच्या मधात त्यांना शब्दांची साथ मिळावी ही अपेक्षा मी सोडून दिली होती...अतुलचं माहीत नाही पण मला आज खऱ्या अर्थाने जाणीव झाली होती की मी अतुलच्या प्रेमात किती आकंठ बुडाली आहे...हो, आज चार वर्षानंतर माझ्या मनाने हे मान्य केलं होतं...
*********************

क्रमशः
(Dear Readers,

माझी तुम्हा सगळ्या वाचकांना मनापासून विनंती आहे की तुम्हाला लिखाण आवडत असेल, नसेल तरी निःसंकोचपणे मला ते तुमच्या समीक्षेतून मेसेजमधून कळवा...तुमची समीक्षा मला लिहिण्याला प्रोत्साहन तर देतेच देते, पण माझ्या काही उणिवा असतील लिखाणात तेही दूर करायला मदत करते...तुमच्या रेटिंग ही कथा जास्तीतजास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल त्यामुळे रेटिंग देऊन ही कथा लोकांपर्यंत पोहीचवण्यास मदत करा ही कळकळीची विनंती...

तुमचीच,
अनु...🍁🍁)