Manachya vaatevarti Avyakt to an mi - 16 books and stories free download online pdf in Marathi

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 16

पुढे...

या जगात प्रत्येकाला प्रेमाचे पूर्ण रूप जपण्याचे भाग्य लाभत नाही, प्रत्येकाला ते प्रेम आयुष्यभर जगता ही येत नाही...काही लोकं जन्माला येतात, ते फक्त त्या प्रेमाचा संक्षेप अनुभवण्यासाठी...जसं की मी आणि अतुल...!!
आपण सतत बोलत असतो की आयुष्याचा काही भरवसा नाही, कधीही काहीही होऊ शकतं; आयुष्य कितीही अनिश्चित असलं तरी आपण ते जगणं सोडत नाही... मग प्रेमाचंही तसंच असावं ना...जर आपण आयुष्याची साथ सोडत नाही तर छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेऊन प्रेमाला बगल का द्यायची..?? प्रेम आयुष्यात स्थिरता आणतं आणि त्या एका क्षणानंतर ते स्थैर्य आपल्याला टिकवून ठेवता आलं पाहिजे....आपल्या जीवनाप्रमाणे प्रेमही खूप असुरक्षित, अनिश्चित आहे. ते नकळत आपल्या जीवनात येते, फिरते आणि आपल्या अंतःकरणात त्याचे मधुर स्थान व्यापुन घेते, पण ते प्रेम सदैव तिथेच राहील याची हमी कोणीही देऊ शकत नाही, आणि म्हणूनच प्रेम इतकं मौल्यवान असावं...त्यामुळेच कदाचित अतुलला भीती असावी की त्याच्या आयुष्यातलं प्रेम हरवून जाईल...जिथे भीती असते, तिथे विश्वास नसतो आणि विश्वास नसेल तर प्रेम कसं टिकेल, याचा विचार त्याने केला नाही...

ऑक्टोबर महिना सगळा दिवाळी आणि सबमिशन मध्ये गेला, आता सेमिस्टर एक्साम जवळ आल्या होत्या आणि आम्ही सगळे अभ्यासाला लागलो होतो...मी, ऋता, निखिल, अनिमिष कॉलेजमध्ये गृप स्टडी करायचो त्यामुळे अतुलशी बोलणं, भेटणं सगळं बंद होतं...ज्या दिवशी आमचं शेवटचं भेटणं झालं होतं, तेंव्हापासून मी त्याला स्वतःहून बोललीच नव्हती खरं तर...तो त्यादिवशी मला वाईट वाटेल असं काही बोलला नव्हता, पण तरीही त्याचे शब्द आठवून आठवून मी अस्वस्थ व्हायची...तो का बोलला असेल की 'भावनांची गुंतागुंत चांगली नसते', 'आकर्षनापोटी निर्णय घेऊ नये'...काय असावा याचा अर्थ??? आणि मला काय हवंय हे मला माहीत आहे, तरीही का मला 'विचार कर' असं सांगून गेला...काहीच कळत नव्हतं...त्यादिवशी ही अचानक बोलता बोलता गप्प झाला, ओठांपर्यंत आलेले शब्द त्याने गिळून घेतले...आणि आता पुन्हा दोन महिने होत आले होते, आमच्यातली शांतता संपत नव्हती...

"बातों के बिच मे खामोशी का दौर चलता रहा,
बस यही लम्हा मुझे बार बार खलता रहा। "

....आणि मी??? मी पुन्हा अतुलला मनात ठेवून घुसमटत राहिली...तिकडे अतुल ही जरा त्रासलेलाचं होता...त्याची परीक्षा ही सुरू होती आणि चार कंपन्या येऊन गेल्या होत्या पण त्याचं प्लेसमेंट अजून झालं नव्हतं...२००८ चा तो काळ रेसेशन ने झपाटलेला होता, कुठेही प्लेसमेंट मिळत नव्हतं, आणि ज्यांना मिळालं आहे त्यांना ही जॉइनिंग मिळेल याची शाश्वती नव्हती...त्यामुळे अतुलच चिंताग्रस्त राहणं सहाजिक होतं.... त्याचं टेन्शन मला कळत होतं पण मी जाऊन बोलावं आणि त्यामुळे त्याने आणखी विचलित व्हावं हे मला नको होतं...भरपूर वेळा आपण स्वतःच गृहीत धरतो की आपण आपल्या प्रिय व्यक्तीला डिस्टर्ब करतोय किंवा त्याच्यासाठी अडथळा निर्माण करतोय, पण त्याच्या मनात असं काहीही नसतं; तो उलट वाट पाहत असतो की आपण कधी जाऊन त्याला दिलासा देऊ...

अतुल सध्या जो ताण सहन करत होता त्यात त्याला प्रेरणा देण्याची गरज होती....कोणी कितीही हुशार असला तरी दोन तीन अपयश पाहिल्यावर थोड्या बहुत प्रमाणात त्याचा आत्मविश्वास ढासळतोच...आणि अश्यावेळी जर त्या व्यक्तीला आपण त्याची सकारात्मक बाजू नाही दाखवून दिली तर तो नेहमीसाठी खचू शकतो... पहिल्या सेमिस्टर ला माझी जी परिस्थिती झाली होती ती मला आठवली आणि मला ते अतुलसोबत घडू द्यायचं नव्हतं, त्यामुळे मी त्याला भेटण्याचा, बोलण्याचा निर्णय घेतला...सगळ्यांच्या परीक्षा होत्या त्यामुळे कॅन्टीन रिकामं होतं, कॉलेजच्या कॅम्पसमध्येही जास्त गर्दी नव्हती त्यामुळे त्याला भेटू शकते हा विचार करून मी त्याला फोन केला... आणि त्यानेही ते लगेच मान्य केलं... संध्याकाळी कॅन्टीनमध्ये मी त्याची वाट पाहत होती आणि काही क्षणांतच तो आला...तो येऊन माझ्यासमोर बसला, पण त्याचा चेहरा एकदम मलूल, निस्तेज दिसत होता... तो काही बोलत नाही म्हणून मीच पुढाकार घेतला...

"अम्म्म...चहा...चहा घेशील?? आणू??"

"तू थांब...मी घेऊन येतो.." आणि असं म्हणत तो लगेच उठून गेला... चहा घेतल्यावर काही क्षण असेच शांततेत गेले. चिंतेने ग्रस्त तो, चहाच्या कपावर बोट फिरवत असताना खूप गहन विचारात बुडाला होता आणि माझं सगळं लक्ष त्याच्यावर होतं, त्याला बोलतं करण्यासाठी मी बोलली,

"कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना।
सिर्फ हार देखने वालोने तुम्हारा लढना कहाँ देखा। "

...आणि त्याने लगेच नजर उचलून माझ्याकडे बघितलं, मी त्याला आश्वस्त करत पुन्हा बोलली

"फक्त चार कंपन्या येऊन गेल्या, आणि अजून चार महिने बाकी आहेत तुझं इंजिनिअरिंग संपायला... अजून बरेच लोकं येतील प्लेसमेंट साठी, आणि जर तुझ्यासारखा ऑलराऊंडर असा चेहरा पाडून बसला तर आमच्या सारख्या साधारण ज्युनिअर्सने कोणाकडे पाहून प्रेरणा घ्यावी मग...? बोल...हे बघ, तुझं प्लेसमेंट ही होईल आणि सगळ्यात जास्त पॅकेजही तुलाच मिळेल..."

माझं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तो बोलला,
"एवढा विश्वास आहे माझ्यावर???"

"हो मग...मला तर हे पण वाटतं की 'बेस्ट आऊटगोईंग स्टुडंन्ट' ही तूच असशील यावर्षी चा...आणि तसही ही निराशा बरी नाही वाटत तुझ्या चेहऱ्यावर... "

"एवढं सगळं कसं ओळखलंस?? म्हणजे लास्ट टाईम मी तुला जे काही बोललो, त्यांनंतर आजपर्यंत तू वळूनही बघितलं नाही माझ्याकडे, त्यामुळे मला वाटलं की तुझा काहीतरी निर्णय झाला असावा..मला टाळण्याचा...."
आणि बोलता बोलता त्याची नजर येऊन माझ्यावर थांबली.. किती प्रश्न मला त्याच्या डोळ्यांत दिसत होते, ज्याला मी आमच्या मधातली शांतता समजत होती, ती शांतता नसून प्रश्नांचा भडिमार होता...

"मला वाटलं की माझ्यामुळे तू डिस्टर्ब होशील...आणि राहिला प्रश्न माझ्या निर्णयाचा तर तुझ्याशिवाय माझा कोणताही निर्णय होऊ शकत नाही....पण आता सोड सगळा विचार आणि सगळी मरगळ झटकून पुढच्या प्लेसमेंट वर लक्ष दे...यावेळी तुझं नक्की होणार ही खात्री आहे मला..." माझं असं बोलल्यावर त्याने चहाचा कप बाजूला सारत माझा तळहात त्याच्या दोन्ही तळहातांच्या मध्ये ठेवत बोलला,

"मेरे टूटने के बाद मुझको मुझिसे जोडे रखता है,
है एक शख्स जो मुझे हर मुश्कील का हल देता है।"

तो माझ्याकडे बघत असतांना मी उगाच चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव आणून त्याची मज्जा घेत विचारलं...

"हो का....कोण रे??"

"अस्सं... माहीत नाही तुला??? आहे कोणीतरी...वेळ आली की सांगेन, संदर्भासहित स्पष्टीकरण देत, फक्त त्यादिवशी कॉम्प्युटर डिपार्टमेंट ला जसा माहोल मिळाला तसा मिळायला हवा...सगळंच सांगेन..."

आणि त्याची मज्जा घेणं पुन्हा मलाच अडकवून गेलं, आणि तो दिवस आठवून माझ्या पोटात फुलपाखरं गिरक्या घालायला लागले...मी माझ्या ओठांवरचं हसू दाबत खुर्चीवरून उठली आणि जायला निघाली.. इतक्यात अतुलही माझ्या मागे आला अन हळूच बोलला,

"मग...निघेल ना दम तोपर्यंत... पाहशील ना वाट...?"

मी फक्त मान हलवली, पण मनात तर आलं हे सांगावं की 'तू जर फक्त माझाच होणार असशील तर मी आयुष्याभर वाट पाहायला तयार आहे..' पण नाही बोलली, कारण मी पण त्याच्या योग्य वेळेची वाट बघणार होती...
*********************

आपल्याला आयुष्यात प्रेम कोणत्याही वळणावर होऊ शकतं असं म्हणतात, पण माझ्या मते जे प्रेम आपल्याला आपल्या कोवळ्या वयात स्पर्शून जातं ते सगळ्यात खास आणि निरागस असतं... आणि ते खास यासाठी असतं की त्या प्रेमात आपण समोरच्याला तो जसा आहे तसाच त्याचा स्वीकार करतो...त्याच्यात काय जास्त आहे, कश्याची कमतरता आहे, आणि त्याने स्वतःला आपल्यासाठी कसं बदलायला पाहिजे या सगळ्यांच्या पुढे जाऊन आपण फक्त त्या व्यक्तिमत्तावर प्रेम करतो... आणि खूप कमी लोकं अश्या प्रेमाच्या संज्ञेला आयुष्याच्या शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकतात...

माझं आणि अतुलचं बोलायचं झालं, तर मी अतुलला तो जसा आहे तसाच त्याला आपलं मानलं होतं... त्याने माझ्यासाठी बदलावं किंवा त्याने माझ्यासाठी काही गोष्टी सोडाव्या हे मला कधीच वाटलं नाही..पण त्याला भरपूर काही वाटत होतं, त्याने खूप काही अपेक्षा केल्या होत्या माझ्याकडून, जे मला अचंबित करण्यारे होते... आता त्याला असं वाटणं हा पण प्रेमाचाच एक रंग असावा...आणि बरोबर ही आहे ना, जर मी त्याला सगळे हक्क द्यायला तयार होती तर त्याने काही अपेक्षा माझ्याकडून ठेवल्या ही होत्या तर त्यात काही चुकीचं नव्हतं... पण चूक कधी होते जेंव्हा आपण आपली गोष्ट चुकीच्या पद्धतीने मांडतो...

नवीन वर्षाची सुरवात माझ्यासाठी आणि अतुलसाठी खूप खास होणार होती...आज माझा तिसऱ्या सेमिस्टर चा रिझल्ट आला आणि या सेमिस्टर मध्ये मी पहिल्या तीन मध्ये होती त्यामुळे मला मला खूप आनंद होत होता... शेवटी मी माझं एव्हरेज ग्रेडींग सुधरवण्यात यशस्वी झाली होती...पण तरीही मला समाधान अजून नव्हतंच, कारण आज अतुल प्लेसमेंट च्या फायनल राऊंड साठी गेला होता आणि संध्याकाळ होत आली होती तरीही अजून त्याची सिलेक्शन लिस्ट लागाली नव्हती...मी धावत पळत ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल ला पोहोचली... सगळे जण तिथे सिलेक्शन लिस्ट ची वाट पाहत उभे होते.. अतुलही त्याच्या मित्रांसोबत तिथे उभा होता, त्याची चिंता त्याच्या नजरेतून दिसत होती...मी जाऊन थोड्या लांबच उभी होती...त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्याला नजरेनेच शांत राहण्याचा सल्ला दिला...

थोड्यावेळाने सर लिस्ट घेऊन आले आणि यावेळी जेंव्हा त्यांनी नावं घेतली, त्यात सगळ्यांत पहिलं नाव अतुलचं होतं आणि विशेष म्हणजे सगळ्यात जास्त पॅकेज घेऊन सिलेक्ट होणारा तो एकटाच होता...त्याने इतक्या जल्लोषात माझ्याकडे धाव घेतली पण सगळ्यांकडे जेंव्हा मी नजर फिरवली त्याने त्याचे पाय जागेवरच थोपवले... त्याचा आनंद पाहून मला तर आनंदाने नाचावसं वाटत होतं... त्याचं सगळं लक्ष माझ्यावर होतं आणि मलाही असं वाटत होतं की कधी एकदा मी त्याला भेटते पण त्याचे मित्र त्याला काही सोडायला तयार नव्हते...

मला माहीत होतं की तो काहीही करून मला भेटायला येणार त्यामुळे त्याला एक मेसेज टाकून मी कम्प्युटर डिपार्टमेंट ला जाऊन त्याची वाट बघत बसली... सगळं डिपार्टमेंट रिकामं झालं होतं, आणि मी एकटी त्याची वाट बघत कॉरिडॉर मध्ये उभी होती...पंधरा वीस मिनीटांनी अतुल धावत पळत आला आणि अचानक येऊन त्याने मला घट्ट मिठी मारली...

"मी खूप खुप खूप खुश आहे...त्यादिवशी तू नसतीस तर काय झालं असतं माझं...थँकू यू...."
आनंदाच्या भरात तो मला बोलत होता...त्याचा आनंदच इतका होता की त्याच्या प्रत्येक कृतीतून तो झळकत होता... तो इतका खुश होता की मला त्याला काय बोलावं काहीच कळत नव्हतं, मी फक्त त्याचा स्पर्श अनुभवत होती..इतक्यात तोच भानावर येत बाजूला झाला आणि बोलला,

"सॉरी... ते मला कळलं नाही कसं रिऍक्ट करावं... "

"अरे ठीक आहे...तू खुश आहेस ना???" मी त्याच्याकडे बघत बोलली,

"खुsssप...आणि तू??? "

"मी पण सुपर खुश...."

चेहऱ्यावरचा आनंद, सोबत असल्यावर होणारी धडधड, काय बोलायचं याची उत्कंठा ह्या सगळ्या मिश्र भावना आमच्या उचंबळून येत होत्या...अतुल माझ्या जवळ आला आणि माझ्याकडे बघत बोलला,

"इतके वर्षे जे सांगण्यासाठी मी वाट पाहत होतो, आणि तुही त्याच प्रतीक्षेत होतीस कदाचीत... "

तो पुढे काय बोलणार हा विचार करूनच माझे हातपाय थंड पडले होते, हृदयाची गतीच थांबली होती आणि मी डोळे मिटून तो पुढे काय बोलणार याची वाट पाहत असताना एका मुलीचा आवाज कानावर पडला आणि मी अन अतुल दोन दोन पाऊलं मागे झालो...मी डोळे उघडून पाहिलं तर प्रिया होती...आम्हाला बघून ती बोलली,

"हे...तुम्ही इथे काय करताय??? आणि अतुल, तुला मी कुठे कुठे शोधत आहे...अभिनंदन डिअर..."
आणि तिची ती गळ्यात पडून अभिनंदन करण्याची पद्धत मला काही आवडली नाही... इतका चांगला मोमेंट ह्या बया ने येऊन खराब केला म्हणून मी मनातच तिच्यावर नाराज होती...पण काय करू शकणारा होती मी??

"पण तुम्ही इथे काय करत आहात??? " तिने प्रश्न केला,

"अग ते फेस्ट सुरू होणार आहेत ना...तर माझ्या स्पॉन्सरशिप टीम मध्ये ही पण आहे, तीच चर्चा सुरू होती आमची...हो ना ग??"
आणि अतुल सावरासावर करत माझ्याकडे बघून बोलला आणि मी पण त्याच्या शब्दांवर फक्त मान हलवली...मी थोडी नाराजच झाली होती मनातून, त्यामुळे मी तिथून जायला निघाली तर अतुल डोळ्यानेच मला जाऊ नको म्हणून सांगत होता, पण मला प्रिया त्याच्या जवळ असलेली अजिबात सहन होत नव्हती त्यामुळे मी त्याचं न ऐकता निघून आली...त्यारात्री अतुलचा मेसेज आला,

"नाराज आहेस?? सॉरी.. उद्या जिमखान्यात मीटिंग आहे फेस्ट च्या स्पॉन्सरशिप बद्दल, नक्की ये प्लिज..मी वाट पाहीन...बोलायचं आहे..."
....आणि त्याचा मेसेज पाहून माझं मन पुन्हा हवेत उडायला लागलं...आता तर मला कधी उद्याचा दिवस उगवतो असं झालं होतं...

माझ्या सोबत ऋताचं येणं अटळ होतं त्यामुळे मला अडचण ही होती की माझं अतुलसोबत बोलणं कसं आणि कधी होईल..कधी कधी तर या 'सिक्रेट लव्ह स्टोरी' चे फायदे ही खूप वाटायचे की कोणाला काही कळत नव्हतं पण कधी कधी हाच फायदा तोटा वाटायला लागायचा कारण मनभरून कुठे बोलता ही येत नव्हतं आणि भेटताही येत नव्हतं....

दुसऱ्या दिवशी सगळे जिमखान्यात जमले, कुठुन कुठून स्पॉन्सर्स मिळू शकतात याची लिस्ट काढून झाली, सगळ्या टिम्स तयार झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून सगळे कामाला लागणार होते...अतुलने त्याच्या बॅगेतून कॉन्टॅक्टस ची लिस्ट काढली आणि तो सगळ्यांना देणार इतक्यात कोणीतरी बोललं,

"अरे वा...रोझ डे च्या दिवशी अतुलच्या बॅगेतून गुलाब निघालं, आणि तेही लाल...कोणी दिलं...?"
आणि सगळे त्याला चिडवायला लागले, शेवटी तो कंटाळुन बोललाच

"अरे कोणी नाही दिलं...ते मीच आणलं होतं..." आणि बोलून झाल्यावर त्याला कळलं की असं बोलून तो कोणत्या संकटात फसला आहे, कारण आता त्याने ते गुलाब कोणासाठी आणलं आहे, याच उत्तर न देता मुलं त्याला सोडणार नव्हतीच... आणि पुन्हा सगळे त्याला चिडवायला लागले...आणि सगळ्यांचा हट्ट पाहून तो बोलला,

"बरं बरं... सांगतो, सांगतो...लक्ष देऊन ऐका हं नाव..."
आणि तो असा बोलल्यावर तर त्याच्या वेडेपणावर मला राग ही येत होता, लाजही वाटत होती, काळीजही धडधडत होतं, मला तिथे थांबणं शक्य नव्हतं, त्यामुळे मी उठून उभी राहिली आणि बहाना करत बोलली,

"म्म्म मला तहान लागली आहे, मी पाणी पिऊन येते..."
आणि मी जायला निघाली तर ऋता मला जबरदस्ती हात पकडून थांबवण्याचा प्रयत्न करत होती, आणि त्यात भरीस भर म्हणजे अतुल हातातली पाण्याची बॉटल ऋताला देत तिला बोलला,

"ऋता...तुमच्या मैत्रीणीला सांगा, पाणी आहे इथेच.. कुठे जायची गरज नाही..." ..माझी कावराबावर बघून अतुल आणि ऋता मज्जा घेत होते...आणि अतुलने बोलायला सुरुवात केली,

"हम्म, तर लक्ष देऊन ऐका, त्या व्यक्तीचं नाव जिच्यासाठी मी हे फुल आणलं आहे...."
आता माझा घसा खरंच कोरडा पडायला लागला होता... मुर्ख आहे का हा मुलगा?? सगळ्यांसमोर असं बोलतात का?? वेडा कुठला, आणि हे विचारचक्र माझं सुरू होतं, इतक्यात अतुल माझ्याकडे बघत बोलला,

"जब भी जिक्र हो हमारा,
आँखो में उसकी हमारा अक्स देख लेना।
उसका नाम लेकर बदनाम करनेका,
रिवाज हमारी मोहब्बत नही जानती।"

...आणि असं बोलून तो हसायला लागला, त्याच्या ह्या उत्तरावर सगळ्यांचा हिरमोड झाला होता, त्यामुळे सगळे नाक मुरडत बाहेर निघून गेले..ऋताला फोन आला ती फोनवर बोलायला बाहेर गेली आणि अतुल माझ्या जवळ येऊन मला चिडवत बोलला,

"काय झालं?? तहान लागली खूप... पाणी पी ना मग.."
तो असं बोलल्यावर मी फक्त रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्यावर त्याला अजून हसू येत होतं, तो पुन्हा बोलला,

"असं सगळ्यांसमोर ही खाजगी आणि इतकी खास गोष्ट सांगून, माझ्या आणि तुझ्या भावनांचा अपमान करणाऱ्यातला मी नाही...पण आता खरंच खूप झालं.. आता जास्त उशीर न करता सगळं सांगून मोकळं व्हायचं आहे...तीन दिवसांनी प्राईझ डिस्ट्रीब्युशन आहे, ते झालं की संध्याकाळी सात वाजता कॉम्प्युटर डिपार्टमेंट च्या थर्ड फ्लोर वर ये..."

आणि त्याचे हे शब्द ऐकून मला जो आनंद झाला तो गगनात ही मावणार नव्हता, मला काय बोलावं काही कळत नव्हतं..मी फक्त त्याच्याकडे पाहत होती आणि मला धक्का देत तो पुन्हा बोलला,

"....आणि हो, निळा रंग घालून येशील..."
आणि असं बोलून तो निघून गेला...मी अतुलच्या भावना ऐकून घेण्यासाठी चार वर्षे वाट पाहिली तेंव्हा माझं मन इतकं अधीर नव्हतं पण आता हे तीन दिवसही मला तीन जन्मासारखे वाटत होते...माझ्यातंल आणि अतुलमधलं अंतर संपत जात होतं...पण काय माहीत का एक अनामिक भीतीही मनात घर करत होती... कदाचित हे माझ्या मनाचे खेळच होते...पण एक नक्की होत की, जसं जसं अंतर कमी होतं तेवढीच दृष्टी अस्पष्ट होत जाते... आणि कधी कधी जास्त जवळ आल्यानेही जे चित्र आहे ते धूसर होत जातं, अंधुक होत जातं...पण मी तरी तेंव्हा खूप आनंदी होती, पण प्रेम असो वा आनंद, चिरकाल टिकवणं महाकठीण काम आहे... हो ना??
***********************

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED