मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 20 अनु... द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 20

पुढे...

"कुछ किस्से कहाणीयां मिटाये नही जाते,
कुछ लोग बिछड कर भी भुलाये नही जाते।"

गैरसमजाच्या चक्रव्युव्हात नातं भरकटलं तर त्या नात्याचा प्रवास संपतो...आपल्या ढासळणाऱ्या भावनिक नात्याची बांधणी पुन्हा करण्यासाठी लागतो तो संवाद, आणि तोही वेळेवर...माझ्या हातून ती वेळ आणि ते नातं दोन्हीही निघून गेलं...उरली ती पोकळी...कधीही भरून न निघणारी... कोणाच्या जाण्याने आयुष्य संपत नाही किंवा थांबतही नाही पण ती एक खास व्यक्ती निघून गेली तर आयुष्य पूर्ण ही होत नाही...आपल्याला आवडणारी व्यक्ती अनपेक्षितपणे दूर जाण्यासारखं मोठं दु:ख नाही... मनाच्या हळव्या कोपऱ्यात त्या व्यक्तीला स्थान द्यावं; आणि नियतीच्या एका खेळीने ती जागा रिकामी करण्याची वेळ आली तर ते दुःख असहनिय होतं... असं घडल्यावर खरंतर जगण्याला अर्थ उरत नाही; पण तरीही आपण त्याच व्यक्तीच्या आठवणीत जगत असतो, हेही तितकच खरं... अतुलच्या आठवणी वेळोवेळी त्यांच्या हक्काचे अश्रु घेऊनच जातात...खरं तर आमच्या निरागस प्रेमाचा असा करुणामय अंत मला सहनच झाला नाही, आणि मी सगळं सोडून जाण्याचा निर्णय घेतला...

मी आणि अतुल किती रागवलो, किती चिडलो एकमेकांवर आणि तितक्याच उत्कटतेने प्रेम आणि काळजी ही केली, पण जसा राग दाखवता आला तशी त्या प्रेमाला ओळख नाही देता आली...इंदोरला जाऊन नवा जॉब, नवीन लोकं, नवीन जागा यांनी मला खूप व्यस्त करून टाकलं, पण अजूनपर्यंत एकही गोष्ट अशी सापडली नव्हती जी माझ्या मनाला व्यस्त करू शकेल, या मनातून अतुलच्या आठवणी बाहेर काढू शकेल...नाहीच झालं असं...मग काय?? इंदोर वरून, जमशेदपूर मग दिल्ली...किती जागा बदलल्या पण अतुलच्या आठवणी ही त्याच्या सारख्या हट्टी निघाल्या, जसं त्याने मागून वळून पाहिलं नाही, तसं त्याच्या आठवणींनीही मनातून काढता पाय घेतला नाही... कालांतराने मला हे कळून चुकलं होतं की या आयुष्यात माझं मन कोणाचंही होऊ शकत नाही, आणि आता त्यात मला समाधान ही मिळत होतं... त्याने केलं असेल 'मूव्ह ऑन' पण आपलं प्रेम इतकं कमजोर नाही, त्यामुळे एकदा अतुलवर जडलेला जीव दुसऱ्या कोणावरही लावता येणार नव्हता...

बरंच काही बदललं होतं...कीपॅड वाल्या मोबाईल ची जागा आता अँड्रॉइड ने घेतली होती, फ्री एसएमएस च्या जागी व्हाट्सएप आलं होतं, कॉइन बॉक्सच्या ऑडिओ कॉलची जागा आता विडिओ कॉल झाले होते...पण मी मनाने मात्र अजुनही त्याच जागेवर होती जिथे मला अतुल सोडून गेला होता... चेतनने लग्न केलं होतं, तो आणि साक्षी आता एमएस करायला दिल्लीला होते... मी मात्र त्याच्या लग्नाला ही गेली नाही...त्याने लग्नाला बोलवून ही मैत्री टिकवण्याचा शेवटचा प्रयत्न केला होता आणि मी तोही पूर्ण होऊ दिला नाही... त्यांनंतर आमच्या मैत्रीचे धागे तुटले, ते कायमचेच...खरं तर त्याच्या लग्नाला न जाण्यासही माझा स्वार्थीपणा आडवा आला...तिथे अतुल असेल त्याची बायको असेल आणि त्याला मी दुसरीसोबत बघण्याची माझी हिम्मत नव्हती, त्यामुळे कामाचं कारण सांगून तेही टाळलं मी...शेवटी काय तर, माझं पहिलं प्रेम हे माझं शेवटचं प्रेम झालं होतं...

दिवसांमागून दिवस वर्षांमागून वर्षे जात होते, पण माझं अतुलवरचं प्रेम सुतभरही कमी व्हायला तयार नव्हतं आणि माझ्या घरचे माझ्या लग्नासाठी मागे हटायला तयार नव्हते... माझं हे सतत जागा बदलत राहाणं, फिरतीचा जॉब यामुळे आईबाबांच्या चिंतेत वाढच होत होती...प्रत्येक वेळी घरी गेलं की आई एक नवं स्थळ घेऊन माझ्यापुढे उभी राहायची आणि तिने तसं केलं की मी लगेच घरातून निघून यायची...एकदा तर आईने भांडणचं केलं, मला सरळ सरळ विचारूनच टाकलं की माझ्या मनात कोणी आहे का आणि जर असेल तर तो ही मान्य आहे त्यांना... पण त्यावर ही त्यांना नकारार्थीच उत्तर मिळायचं... खरं तर मी अश्या नात्यामध्ये गुंतली होती ज्याचा काही चेहराच नव्हता, त्यामुळे त्या नात्यासाठी वाहणारे अश्रू मी कोणाला दाखवू ही शकत नव्हती... ते नातं फक्त एक कल्पना बनून माझ्या सोबत जगत होतं....

माझ्या अन आईच्या भांडणात मात्र बाबांची फरफट व्हायला लागली आणि नको ते झालं...बाबांना पहिला अटॅक येऊन गेला...आता माझ्याकडे घरी परतण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता... सगळं सोडून मी घरी परत आली, आणि थोड्याच दिवसांत 'ट्रान्समिशन' जॉईन केलं...
हा जॉब जॉईन करून दोन वर्षे झाली होती आणि आता माझी पोस्टिंग मी माझ्याच शहरात करून घेतली होती आईबाबांसाठी... अतुल आयुष्यातून निघून गेल्यापासूनचे सात वर्षे अचानक कसे गेले याच विचारांत मी डोळे बंद करून बसली होती आणि इतक्यात...

"खर्रर्रर्रर्रर्रर्र.........."
गाडीचे ब्रेक करकचुन लावल्या गेले, सीटबेल्ट न लावल्यामुळे मला एक सौम्य झटका बसला आणि सीट वरून थोडी पुढे होऊन मी डॅशबोर्ड ला आदळनार इतक्यात त्याने त्याचा डावा हात माझ्यासमोर आडवा केला मला वाचवण्यासाठी आणि बोलला,

"ओहहहह...सॉरी... तू ठीक आहेस ना??...मला वाटते मागचा टायर पंक्चर झालाय...त्यामुळे असा अचानक ब्रेक लाव...."

माझ्याकडे पाहून त्याने अचानक बोलणं थांबवलं... विचारांची तंद्री अशी अचानक भंगल्यामुळे माझी धडधड वाढली आणि भेदरलेल्या नजरेने मी त्याच्या कडे पाहिलं... अतुल...हो, अतुलचं...आज इतक्या वर्षांनी अशी अचानक ऑफिसमध्ये आमची भेट होईल हे स्वप्नांत ही वाटलं नव्हतं...आणि का म्हणून मी याच्या गाडीत बसली, थोडी पावसात भिजली असती तर गळून गेली असती का..???

मी माझ्या विचारात त्याच्याकडे पाहत होती आणि माझ्या डोळ्यात पाहत असताना त्याच्या पापण्यांची उघडझाप ही बंद होती...मागच्या अर्ध्या तासापासून त्याच्या गाडीत बसलेली असून सुद्धा त्याच्यावर एक नजर टाकली नव्हती मी, आणि आता मात्र त्याच्यावरून नजर हटत नव्हती... तसाच होता तो, त्याच्या गोऱ्या गालावरची ती खळी, त्याचे कपाळावर येणारे भुरभुरणारे केस, आजही मला त्याच्यात अडकवण्यासाठी सज्ज होते...हं, थोडा पेहरावा बदलला होता, अर्थातच प्रोफेशनलिसम मेंटेन करण्यासाठी, आणि वयानुसार थोडा राकट वाटत असला तरी तेज तेच होतं... इतक्यात मागून येणाऱ्या गाडीच्या हॉर्नने आम्हाला त्रास दिला आणि आमचे गुंतलेले डोळे सुटले...

त्याने गाडी थोडी बाजूला केली, मी गाडीतून उतरायचं म्हणून दरवाजा खोलताना त्याच्याकडे न पाहताच बोलली,

"थँक्स सर लिफ्ट साठी... पण मी जास्त थांबू शकत नाही, ऑटो घेऊन जाईल मी घरी...."
मी दरवाजा उघडलाच होता इतक्यात त्याने माझा उजवा मनगट घट्ट पकडला आणि माझ्याकडे बघत बोलला,

"मी...सोडतो ना तुला...कुठे सोडायचं ते सांग...."
त्याच्या या प्रश्नावर मनातून आवाज आला, "कुठेही जिथे तू मला फक्त माझा होऊन भेटशील...." पण मनातल्या गोष्टी आजपर्यंत ओठांवर आल्या नव्हत्या मग हे तरी कसं तोंडातून निघणार होतं...त्याचे डोळे मात्र अजूनही माझ्यावरच अडकले होते, मनातल्या भावना लपवत, मी एक नजर त्याने पकडलेल्या माझ्या हातावर टाकली आणि पुन्हा नजर उचलून त्याच्याकडे पाहिलं अन बोलली,

"सोडून तर खूप आधीच दिलं होतं ना तुम्ही मला... सर..??""

माझ्या अश्या उपहासात्मक बोलण्याने त्याने पटकन त्याचा हात मागे घेतला, आणि थोडीशी नजर खाली झुकवत हाताकडे बघुन बोलला,

"आय एम रिअली सॉरी फॉर धीस..."

त्याने एक हात कपाळाला लावला आणि मोठा श्वास घेऊन बोलला...मी फक्त "हम्म" केलं आणि गाडीतून उतरणार इतक्यात पुन्हा गहिवरलेल्या आवाजात तो बोलला,

"माफ नाही करू शकत का कधीच मला तू..??? "

मी मागे वळून पाहिलं तर त्याने खाली घातलेली मान उचलून माझ्याकडे पाहिलं...त्याचे डबडबले डोळे पाहून पुन्हा एकदा मी विरघळून गेली, तसा माझा त्याच्यावरचा राग तर तेंव्हाच शांत झाला होता जेंव्हा निखिलने मला त्याची बाजू समजवून सांगितली होती, पण हे माझं दुर्दैव होतं की मला त्याला माझ्या आयुष्यात थांबवण्याची संधी नशिबाने दिली नाही... जे काही थोडी बहुत चिडचिड होती ती पण माझ्या न पूर्ण झालेल्या अपेक्षांमुळे होती...पण आता त्याला बघून ती चिडचिडही शांत झाली होती...खरं तर त्याच्यावर राग करण्याचा काही प्रश्नच नव्हता म्हणा..त्याने मला कोणतेही वचन दिले नव्हते किंवा आश्वासनं दिली नव्हती, मग कोणत्या अधिकाराने मी राग करायचा... हं, ही गोष्ट असेल कदाचित की, त्याच्या न सांगितलेल्या आश्वासनांनी मला त्याच्यात बांधून ठेवलं असेल, त्यामुळेच तर माझा त्याच्यावरचा राग शांत झाला...

"मला कोणतीच तक्रार नाहीये सर तुमच्याकडून, त्यामुळे माफीचा ही प्रश्न येत नाही...माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणताही राग नाही.."
मी माझ्या गंभीर चेहऱ्यावर थोडं हास्य आणत बोलली,

"हो का, तक्रार नाहीये का?? त्यामुळेच मगाचपासून मला सर सर म्हणत आहेस होय?? तुझ्या तोंडून माझं नाव ऐकण्यासाठी सात वर्षे वाट पाहिली आहे, आता हे फॉर्मलिटी नको करू प्लिज..."

"तसं काहीही नाहीये, पण आता परिस्थिती वेगळी आहे, तुम्ही माझे बॉस आहात... त्यामुळेच...."

"बॉस मी आता झालो असेन पण वयात आल्यापासुन आपण आधी एकमेकांचे..."
आणि बोलता बोलता तो अचानक थांबला...त्याचं वाक्य मी पूर्ण करत बोलली,

"....आपण एकमेकांचे कोणीही नाही...असो, मला निघायला हवं..."
मी असं बोलताच त्याने एकाएकी मला त्याच्या कवेत घेतलं, त्याच्या अश्या हरकतीने मी गोंधळली, पण तरीही मी झोकून दिलं स्वतःला, कारण आज इतक्या वर्षांनंतर मला पुन्हा तीच शांतता मिळत होती जी कॉलेजमध्ये तो जवळ असताना मिळायची... असं वाटत होतं या आयुष्याचं सगळं सुख फक्त याच एका क्षणात आहे... माझ्या डोक्यावरून हात फिरवत त्याने माझा चेहरा त्याच्या ओंजळीत धरला आणि बोलला,

"आज तुला इतक्या जवळ पाहून असं वाटत आहे गेल्या कित्येक वर्षांचं ओझं मनावरून दूर झालंय.. या सात वर्षांत एकही दिवस समाधानाने झोप लागली नाहीये, सतत तुझ्या आठवणी माझ्या आजूबाजूला रेंगाळत राहायचा...खूप तगमग झाली तुझ्यासाठी...."

मी हळूच त्याच्या कवेतून बाजूला झाली आणि त्याच्या नजरेला नजर न देताच बोलली,
"हो का, म्हणून एवढा वेळ लावला भेटायला, अन तेही सात वर्षांचा कालखंड...मला भेटायची इच्छा खरंच होती का तुला की माझी आठ..."

माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच तो बोलला,

"तसं नाहीये...पण ज्या परिस्थितीत आपण असे दूर गेलो, मला वाटलं तुझ्या आयुष्यात पुन्हा माझ्या येण्याने काही वादळ नको निर्माण व्हायला..तसही तू कुठे आहेस, कशी आहेस याची फारशी माहिती नव्हती मला...आणि विचारणार तरी कोणाला अन कुठल्या अधिकाराने... एक चेतन होता जिवाभावाचा... पण माझ्या मुर्खपणामुळे मी त्यालाही दूर केलं..त्याच्या लग्नातही नाही गेलो..घरचे खूप रागावले, खूप बोलले मला... पण खरं सांगू तू तिथे असशील आणि कोणत्या तोंडाने तुझा सामना करावा याच विचाराने हातपाय गळाले होते माझे...तुझ्याविना आयुष्य म्हणजे,

किताब के कुछ खाली पन्ने हो जैसे,
जिंदगी तुम्हारे बिन गुजरी है ऐसे। "

तो जसाजसा बोलत होता माझ्या डोळ्यांच्या कडेला पाणी साचत जात होतं, मी ते अजूनपर्यंत तरी डोळ्यातच जमा केलं होतं... पण जेंव्हा पापण्यांना तो भार सोसवला नाही मी हळूच मान वळवली आणि गाडीच्या विन्डोतुन बाहेर पाहिलं... आमच्या थोड्याश्या नासमजीने कुठे येऊन थांबलं होतं आयुष्य?? आणि चेतन....तो बिचारा सतत आम्हाला एक करण्याच्या प्रयत्नात होता, त्याचा तर विचारच केला नाही आम्ही...प्रेम इतकं स्वार्थीही असतं का? नाही सांगू शकत काही...मी माझ्याच विचारात असताना तो बोलला,

"गाडीचा पंक्चर काढायचा आहे, थोडं पुढे गॅरेज दिसतंय... तोपर्यंत चहा घेऊयात का??अम्म्म म्हणजे, संध्याकाळी चहा नाही भेटला की डोकं दुखते माझं...."
ओठांवर थोडं मिश्किल हसू आणत तो बोलला, माझाही चेहरा खुलला थोडा... बरं वाटलं हा विचार करून की अजूनही माझ्या संध्याकाळच्या चहाच्या सवयीबद्दल तो विसरला नाहीये...उगाच नव्या अपेक्षा मनात जन्म घेत होत्या...

त्याने गाडी गॅरेजवर दिली आणि आम्ही चहाच्या टपरीवर असलेल्या मोडक्या तोडक्या बेंच वर बसलो...चहा बनायला वेळ होता, आणि मला आमच्यातली शांतता बोचत होती...त्यात अतुल राहून राहून माझं निरीक्षण करत होता...मला कळत नव्हतं, असा प्रश्नार्थक नजरेने तो का पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहत आहे...नेहमीप्रमाणे थोडी उशिरानेच डोक्याची ट्यूब पेटली... आज ट्रेनिंगसाठी म्हणून साडी नेसली होती मी, आणि मला साडीत पाहून त्याच्या मनात खुप प्रश्न घोळ घालत असावे...त्यामुळे त्याची नजर कधी माझ्या साडीवर, कधी माझ्या गळ्यावर तर कधी पायांच्या बोटांवर जात होती...आणि शेवटी जेंव्हा मंगळसूत्र, जोडवी यांचं अस्तित्व त्याला जाणवलं नाही, त्याच्या ओठांवरचं दबलेलं हसू, चेहऱ्यावरचं समाधान, आणि त्याने नकळत व्यक्त केलेला आनंद माझ्या नजरेतून सुटू शकला नाही...वेडा कुठला... कसं कळत नाही या मुलांना, साडी नेसलेली प्रत्येक मुलगी विवाहित असते का??

हे बरं आहे हं... म्हणजे मुलींकडे पाहून हे ओळखू शकतो की तिचं लग्न झालंय की नाही, पण मुलांना कसं ओळखायचं..?? आणि अतुलला का आनंद झाला असेल, तो तर आधीच खुश असेल ना...'प्रियाबरोबर'... तरीही मला जाणून घ्यायचं होतं त्याच्या तोंडून, मनात खुप सारे प्रश्न होते...त्याने लग्न केलं होतं, तो शिकागोला निघून गेला अन मग असा अचानक इथे कसा आला?? यावेळी सगळी उत्तरं हवी होती त्याच्याकडून...त्यामुळे मुद्दामच त्याला विचारलं,

"बाकी...? काय चाललंय तुझं?? म्हणजे घर, ऑफिस सगळं ठीक ना...?"

"हम्मम...ठीकच...तेच रुटीन..."
त्याचं मोजकंच उत्तर...बरोबर आहे, नाही बदलला हा अजूनही...तसाच आहे, आतल्या गाठीचा, कधीच खुलून सांगणार नाही मनात काय आहे, आणि चेहऱ्यावरून तर अंदाजचं नाही लावू शकत की काय चाललंय मनात... विचार केला याला आता सरळ वाक्यात विचारते प्रियाबद्दल,

"हो ते ठीक आहे...पण मला विचारायचं होतं की प्रि..."
मी बोलत असताना टपरीवरचा छोटा मुलगा चहा घेऊन आला...अतुलने त्याच्या शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड करण्यासाठी हात वर केला, त्याची हात वर करण्याची वेळ आणि त्या मुलाचा मला चहा द्यायची वेळ एकच झाली आणि याच्या हाताने चहाच्या ग्लासला धक्का लागून ग्लास खाली पडला, त्यातला थोडा चहा माझ्या साडीवर पडला...आणि माझा प्रश्न अर्धवटच राहिला...

"ओहह शीट...सॉरी...तू ठीक आहेस ना?? सॉरी, माझ्यामुळे तुझी साडी खराब झाली..."
अतुल तळमळत बोलला,

"अरे ठीक आहे, जे व्हायचं ते होतेच...तसाही आजचा दिवसच मला बरोबर वाटत नाहीये...."
मी दुसरा चहा सांगितला आणि पाण्याने साडीवरचा चहाचा डाग साफ करत बोलली,

"का ग?? काय झालं??" अतुलने विचारलं,

"अरे सकाळी आईची कटकट नुसती... ऑफिसला नको जाऊ म्हणून, त्यात घरातून निघाली तर चप्पल तुटली, कशी तरी धावत पळत ट्रेनिंग करून सुट्टीचा अर्ज करायला ऑफिसला पोहोचली तर स्कुटी खराब झाली...तुझ्या गाडीने घरी जाऊ म्हंटलं तर ती पंक्चर आणि आता ही साडी..."

माझी बडबड सुरू होती आणि अतुल त्याच्या डाव्या हातावर हनुवटी टेकवून माझ्याकडे मिश्किल डोळ्याने पाहत होता... माझं लक्ष गेलं आणि मला वाटलं मी जरा जास्तच लांबलचक स्पष्टीकरण दिलं...मला ओशळल्यागत झालं आणि अतुल हसून बोलला,

"हम्मम्म... इतकं सगळं झालं तर... पण माझ्यासाठी तर आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहण्या सारखा आहे.."
त्याच सूचक बोलणं मला कळलं, त्याला असं माझ्याकडे बघतांना मला लाजवून गेलं आणि मी लगेच नजर वळवली...इतक्यात आमचा चहा आला...चहाचा पहिला घोट घेत काहीतरी आठवत तो पुन्हा बोलला...

"अरे हो...पंधरा दिवसांची सुट्टी टाकलीयेस ना तू...का?? अम्म्म म्हणजे, काही विशेष कारण... सहज विचारतोय हं... बॉस म्हणून नाही हां...." हसत हसत तो बोलला,

मी माझा चहा पीत पीत बोलली,

"हम्म...लग्न आहे...."

आणि इतक्यात अतुलला इतका जबरदस्त ठसका लागला की त्याच्या डोळ्यांतून पाणी यायला लागलं...मी लगेच आमचे चहाचे ग्लास बाजूला ठेवले आणि त्याच्या पाठीवरुन हात फिरवला, पण त्याचा खोकला आणि डोळ्यातलं पाणी काही बंद झाला नाही...
*********************

क्रमशः

(Dear readers,
पुढच्या भाग शेवटचा असेल...आतापर्यंतचा या सायलेंट लव्हस्टोरी चा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा...तुमच्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत...

तुमचीच,
अनु...🍁🍁)