Manachya vaatevarti Avyakt to an mi - 21 - Last Part books and stories free download online pdf in Marathi

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 21 (अंतिम)

पुढे...

"ये कैसा सिलसिला है तेरे मेरे दरमियाँ
फ़ासले बढते रहे पर मोहब्बत कम न हुई।"

आपण खरंच प्रेमात होतो किंवा आहे हे कसं ओळखायचं?? खरं तर ते प्रेम आहे हे कळायलाचं भरपूर वेळ जातो...अनेक चढउतार पाहावे लागतात, मोहाचे क्षण गाळून पाडावे लागतात, जेंव्हा सगळ्यांमध्ये असूनही दोन जीव विरक्त होऊन, त्यांच्यातल्या अंतराला न जुमानता मनाने एक होतात, तेंव्हा समजावं हे प्रेम आहे... अर्थातच यासाठी खूप वेळ आणि संयम लागतो...आणि मी अन अतुल अश्याच प्रकारच्या प्रेमात पडलो होतो.....
आयुष्यात जीवन जगण्याचे क्षण अतिशय कमी येतात आणि ते जीवन नष्ट करून टाकावे ही वेळ पाऊलोपावली येते, पण त्या मरणाच्या क्षणानांही आपल्याला जीवनात बदलता यायला हवं...आपलं जीवन हे आपलं एकट्याच नसतंच कधी, आपल्यावर अवलंबुन आपल्यावर प्रेम करणारे खूप लोकं असतात, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या प्रेमासाठी आपली वैयक्तिक दुःख बाजूला सारून जगावचं लागतं आपल्याला...मी अन अतुलने तेच केलं... आमच्यात विरह होता याचं दुःख कितीही असलं तरी त्याचा परिणाम आमच्या परिवारावर नको व्हायला ही काळजी घेतलीच..

मी माझं एक वेगळं विश्व निर्माण केलं होतं, ज्यात काही गोड आठवणी, थोडं प्रेम, आणि काही कटू सत्य होते... अतुल पुन्हा आयुष्यात येईल की आशाच नष्ट झाली होती माझी, पण आज असं अचानक तो समोर आल्यावर काय माहीत का, पण पुन्हा आयुष्य श्वास घेऊ पाहत होतं, सोबतच अनामिक भीती ही होती की हे आधीसारखं क्षणिक असू नये...पण एक सत्य हे आहे की, जुनं प्रेम नव्याने आयुष्यात येऊ पाहत असेल तर ते आधीसारखंच मन प्रफुल्लित करून टाकतं...जुन्या पाण्यात नव्याने सरी कोसळल्यावर जसं आपण त्याला नवं म्हणून त्याचा स्वीकार करतो, तसंच प्रेमाचं असतं...प्रेम ते प्रेमंच असतं, पण परिस्थिती मात्र बदलून जातात...

आज अतुलसोबत चहा घेतांना माझ्या जुन्या आठवणी पुन्हा उजळून निघाल्या होत्या...सगळ्यांच्या चोरून कॅन्टीनमध्ये घेतलेला तो चहा अजूनही आठवत होता, पण अचानक का त्याला इतका ठसका लागला असेल आज काय माहीत.??? यावेळी मात्र चहा पूर्ण घेताच आला नाही...ठसक्यामुळे अतुलच्या डोळ्यांतून पाणी वाहायला लागलं...त्याला बरं वाटावं म्हणून मी त्याची पाठ थोपटत होती... पाच मिनिटांनी त्याचा खोकला थोडा कमी झाला आणि त्याला बरं वाटलं....तो थोडा रिलॅक्स झाला,

"काय झालं अचानक?? तू ठीक आहेस ना आता..??" मी काळजीच्या स्वरात विचारलं,

"हम्मम...मी..ठीक आहे...मी जरा गाडी पाहून येतो..."
त्याला अचानक काय झालं काय माहीत, एकदम नाराजीच्या सुरात तो बोलला आणि गाडी बघायला निघून गेला...मी पण त्याच्या मागेमागे गेली...

"निघालं का पंक्चर...?" मी त्याच्या मागे जाऊन उभी राहिली आणि विचारलं....

"हं... हो, बस झालंच..." तो माझ्याकडे न बघताच बोलला,

पाच मिनिटांत गाडी मिळाली आणि आम्ही पुन्हा आमच्या वेगवेगळ्या वाटेला जायला निघालो...आज कोणतेच प्रश्न अनुत्तरित राहू नये असं वाटत होतं, पण त्या प्रश्नांवर समोरच्याचं मोजकच उत्तर आम्हाला निरुत्तर करत होतं... बाकी तर काय आधिसारखेच आम्ही 'आदत से मजबूर' होतो, मोकळं बोलायला अजूनही जमत नव्हतं... इतकं सगळं काही बदललं होतं पण आमच्या काही गोष्टी अजूनही तश्याच होत्या...

अतुलकडे बघण्याची हिम्मत होत नव्हती म्हणून मी उगाच गाडीच्या बाहेर नजरा वळवल्या...आज इतक्या वर्षांनी माझं मन मला हलकं हलकं वाटत होतं, असं वाटत होतं कितीतरी दिवसांपासून एका अनोळखी स्वप्नाचा पाठलाग करत होती आणि आज जाऊन ते सत्यात उतरत आहे... एवढ्या वर्षांच्या मनाच्या जखमेवर कोणीतरी थंडगार फुंकर मारल्यासारखी वाटत होती...मला माहित होतं की, ही सोबत थोड्याच वेळेपूरती आहे, पण एका अनामिक भीतीसोबत समाधान ही होतं... हा प्रवास संपूच नये असं वाटत होतं, गंतव्य मिळावं ही अपेक्षाच नव्हती ...रोज याच मार्गावरून येजा करत होती मी, पण आज जणू नव्याने ओळख झाली असावी इतके सुंदर ते भासत होते...आमच्यात पसरलेली शांतता भेदत अतुल बोलला,

"मग...काय करतात?? तुझे होणारे... अहो...??"
हे विचारताना त्याने घट्ट पकडलेली स्टेरिंग आणि त्यावर हलकेच हाताची मूठ आदळताना माझ्या नजरेतून सुटलं नाही... बाहेर बघत असताना त्याच्या ह्या प्रश्नावर मी एका झटक्यात मान त्याच्या कडे वळवली, आणि आता ह्याने काय हा विचित्र प्रश्न केला म्हणून मी जवळजवळ किंचाळतच बोलली,

"काय??? कोण अहो ??? कोणाचे अहो..?"
माझ्या ह्या तीव्र प्रतिक्रियेवर तो थोडा गडबडला आणि जरा सावरतचं बोलला,

"अग... ते नाही का, तेंव्हा तू बोललीस ना की तुझं लग्न आहे...त्यामुळे मी...."
बोलता बोलता त्याने लहान मुलासारखी मान खाली घातली, आणि मी कपाळावर हात मारून घेतला...

"इंजिनिअर साहेब..!! कसं होणार तुमचं??? कधीच कोणती गोष्ट पूर्ण ऐकून घ्यायची नाही ना?? म्हणजे उगाच आपल्या मनाला वाटेल ते तर्क लावायचे...हं, जुनी सवय... जाणार थोडीच आहे...."
मी कंटाळून मान हलवत बोलली,

"म्हणजे??? काय झालं???"
तो अजूनही गोंधळलेला होता,

"अरे..माझं लग्न आहे हे सांगितलं का मी?? मी बोलली लग्न आहे, त्यापुढे काही बोलणार तर तुला ठसका लागला... मी बोलणार होती ऋता अन अनिमिष चं लग्न आहे, तिथे जायचंय मला, पण माझं बोलणं पूर्ण करूच दिलं नाही तू... मिरचीचा ठसका लागताना पाहिलंय, चहाचा कोणाला लागतो...."
मी बोलतच होती अन त्याने इतक्यात गाडी बाजूला घेऊन उभीही केली आणि माझ्याकडे पाहून, आश्चर्याचे आणि आनंदाचे मिश्र भाव चेहऱ्यावर आणून तो बोलला,

"काय बोलतेस??? म्हणजे तुझं नाही ना..हुश्श..."
काय कमालीचा आनंद पसरला होता त्याच्या चेहऱ्यावर...त्याने एक हात गाडीच्या स्टेरिंग वर ठेवला अन एक हात छातीवर ठेवून त्याने थोडं वर पाहून एक उसासा टाकला... मी त्याला डोळे बारीक करून बघत आहे हे त्याच्या लक्षात आलं तेंव्हा बोलला,

"अग... म्हणजे...ऋता आणि अनिमिष... कसकाय?? त्यांच्याकडे पाहून वाटत नव्हतं कॉलेजमध्ये...?"

"हम्मम, पण मी ओळखलं होतं तेंव्हाच...प्रेम कुठे लपवता येतं का रे?"
मी सहज बोलून गेली, पण नंतर वाटलं उगाच बोलली,

"सगळंच ओळखून घ्यायचीस ना तू... फक्त मला सोडून... असो, कोणाची तरी कहाणी पूर्ण होत आहे... आनंदाची बाब आहे...नाहीतर बाकीच्यांना फक्त आठवणीतच जगावं लागतं...."

अतुलचं बोलणं ऐकून माझा चेहराचं उतरला, त्याने ते बरोबर हेरलं आणि विषय बदलवत बोलला,

"निखीलचं काय सुरूये??? कुठे असतो तो...?"

"मुंबईत असतो... त्याच्याच प्लॅन होता भेटायचा...खूप दिवस झाले ना, सगळे मित्र भेटलोच नाहीत आम्ही, ते काय आहे ना, यावे..."
मी बोलत असताना त्याने अचानक त्याचा तळहात माझ्या हातावर ठेवला आणि बोलला..

"तू लग्न नाही केलंस अजून??? का??"
त्याची नजर माझ्यावर अशी रोखलेली होती जणू माझं उत्तर त्याचा मनाला शांती देईल... त्याच्या प्रश्नाने मला विजेचा झटकाच दिला, मी त्याला निरखून पाहिलं आणि उत्तर देत बोलली,

"नाही केलं... वाट पाहत होती....तुझी..."
मी पापण्या न मिटता त्याच्या कडे पाहत होती, त्याने माझ्या हातावरची त्याची पकड अजून घट्ट केली, आणि पाणावलेल्या डोळ्यांनी बोलला,

"तू पण नाही विसरलीस अजून मला...तू खरंच अजूनही माझी वाट बघत आहेस....?"
तो पुढे अजून काही बोलणार या आधीच मी बोलली,

"हो...प्रयत्न खूप केले विसरण्याचे, पण विश्वास तुला आजही नसेल ही गोष्ट वेगळी...."
मी अविश्वासाने त्याचा हात बाजूला करत बोलली, माझं असं टोचून बोलणं कळालं त्याला, पण असा अविश्वासाने मी त्याचा हात बाजूला काढला याचा त्याला राग आला असावा म्हणून त्याने पुन्हा तेवढ्याच तीव्रतेने माझा तळहात त्याच्या दोन्ही तळहातात दाबला आणि बोलला,

"विश्वास मला तेंव्हाही होता आणि आजही आहे...पण तू बोललीस ना, पूर्ण ऐकून घ्यायची सवयच नाही मला... त्यामुळे नको ते गैरसमज करून बसलो...त्या दिवसांनंतर मी तुझ्यासाठी किती तडपलो आहे हे फक्त मलाच माहीत आहे...गेल्या काही वर्षांत मानसिक रित्या खूप खचून गेलो, खूप काही सहन केलंय...सतत वाटायचं, तू असतीस सोबत तर माझी हिम्मत बांधली असतीस आणि एक क्षण असा आला की सगळं सोडून तुझ्याजवळ यावं हा विचार केला, पण घरातल्या अडचणी कधीच कमी झाल्या नाही.. तुझ्यासाठी पुढे पाऊल टाकलं असतं तर मागे घरचे सुटले असते...विचार केला, आधी घरचे प्रॉब्लेम कमी करतो, मग तू आहेसच...माझं काय चुकलं माहीत आहे, मी सतत तुला गृहीत धरलं की जेंव्हा मला वाटेल तेंव्हा तू असणारच आहे माझ्यासाठी...आणि माझ्या चुकीने मी सतत तुला रडवलंच आहे, मग कोणत्या तोंडाने तुझ्यासमोर आलो असतो.. खूप दुखावलं आहे मी तुला त्यामुळे पुन्हा तुझ्या आयुष्यात येऊन तुला त्रास द्यायचा नव्हता मला...."
तो अजूनही माझा हात तसाच धरून बसला होता... त्याचे डोळे त्याचा प्रामाणिकपणा सांगत होते...

"...का नाही आलास रे?? तुझ्या जाण्याने त्रास झाला मला, तू परत आला असतास तर नसता झाला...तुझी वाट बघण्यात आजपर्यंत माझं आयुष्य गेलं आहे, पण आता दोघांचं आयुष्य खूप बदललं आहे, परिस्थिती भिन्न आहेत....आणि आता तर कदाचित तुझ्या मनात माझ्याबद्दल त्या फिलिंग्स ही नसव्यात...हाच विचार करून मनाच्या एका कोपऱ्यात जी एक आशा श्वास घेत होती ती पण मरून चालली आहे...थोड्या गैरसमजाने बघ माझं आयुष्य कुठे येऊन थांबलय अतुल...माझ्या हातात असतं तर हे जीवघेणं प्रेम मी कधीच केलं नसतं... आताही नाही सहन होत मला, पण घरच्यांचा ही अपेक्षा आहेत माझ्याकडून त्यामुळे त्यांच्यासाठी जगत आहे... तू सोडून आता हे माझं मन आणि माझं शरीर कोणाचंच होऊ शकत नाही...कधीच नाही...."

बोलता बोलता माझा कंठ दाटून आला होता, डोळे बरसत होते, इतक्या वर्षांच्या वेदना आज पहिल्यांदा बाहेर पडत होत्या... सगळ्यांपासून दाबून ठेवलेल्या भावनांना आज गती मिळाली होती... मी त्याच्या हातातून माझा हात काढला आणि माझ्या दोन्ही हातात माझा चेहरा लपवून हिरमसून रडायला लागली....त्याने माझे हात माझ्या चेहऱ्यावरून बाजूला सारले आणि मला मिठीत घेतलं... आज पहिल्यांदा मी पण त्याच आवेगाने दोन्ही हाताने त्याला विळखा घातला....

संध्याकाळची ती वेळ, थोडा अंधारच दाटून आला होता...हायवेवर रस्त्याच्या कडेला आमची कार उभी होती... पावसामुळे आधीच वातावरण थंडगार झालं होतं... अश्या वातावरणात कितीतरी वेळ आम्ही फक्त एकमेकांचा स्पर्श अनुभवत होतो, खूप वर्षांनी एकमेकांची सोबत अनुभवत होतो... आज मनाने जितकं जवळ होतो तेवढं कदाचित याआधी कधीच नव्हतो...एकमेकांच्या आयुष्यात आमची काय किंमत आहे याची जाणीव आज होत होती...या क्षणात माझं सगळं आयुष्य जगून होते की काय इतकं सुख मला मिळत होतं... प्रेमाच्या कळ्या नव्याने उमलत होत्या...डोळे बंद करून जे नवीन स्वप्न आकार घेत होतं त्यावर पुन्हा फोनच्या आवाजने मात केली...अतुलचा फोन वाजत होता... त्याने फोन उचलावा म्हणून मी बाजूला होण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला सोडलं नाही आणि एका हातानेच खिशातून फोन काढला...

मी त्याच्या इतक्या जवळ होती की फोन स्पीकर वर नसून सुद्धा फोन मधून येणारा आवाज स्पष्ट ऐकू येत होता...त्याने फोन रिसिव्ह करताच तिकडणं एका मुलीचा आवाज आला,

"हॅलो...कुठे आहेस तू...बाहेर जायचं होतं ना आपल्याला... हा बघ किती रडतोय तुझ्यासाठी..." आणि इतक्यात,

"मम्मा...मला पण बोलायचं आहे..."
हा आवाज एका लहान मुलाचा होता...तो आवाज ऐकून विजेचा झटका लागला असेल या गतीने मी अतुलपासून स्वतःला विलग केलं, माझ्या धक्क्याने त्याच्या हातातला मोबाईल ही पडला... तो गोंधळलेल्या नजरेने माझ्याकडे पाहत होता, त्याला माझ्या उत्तराची अपेक्षा होती...पण मी??? इतक्या वेळेत भावनेच्या आहारी जाऊन मी हे पण विसरली होती की हा तो अतुल नाही ज्याच्यावर माझं प्रेम आहे...हा एक विवाहित पुरुष आहे, ज्याचा एक छोटा मुलगा ही आहे... माझ्या डोळ्यांतून जितके अश्रू वाहत होते त्यापेक्षा जास्त माझं मन जळत होतं रागाच्या अग्नित... मी एकाएकी गाडीतून उतरली, तो पण घाईघाईने माझ्या मागे आला...

"काय.. काय झालं अचानक....?" तो घाबरत बोलला,

"का??? का नेहमी मला स्वप्न दाखवुन त्याचा चुराडा करतोस तू अतुल...कोणत्या गोष्टीची शिक्षा देत असतोस तू नेहमी मला...खोटारडा आहेस तू...धोका दिलास तू मला."

तो जसाजसा माझ्याकडे येत होता, तशी मी एक एक पाऊल मागे होत होती...तो तितक्याच काळजीने माझ्या जवळ येत बोलत होता,

"फॉर गॉड सेक...झालंय काय ते तरी सांग..कोणता धोका दिला मी तुला...काय खोटं बोललो..."

"अजिबात माझ्या जवळ यायचं नाहीस तू, मला हातही लावायचा नाहीस...."

"अग ऐक तर सही... प्लिज..."

"काहीच बोलू नकोस...खोटारडा आहेस तू...प्रेम माझ्यावर आणि लग्न दुसरीसोबत...."
आणि रागाच्या भरात मी कुठे जात होती माझं मलाही कळत नव्हतं...फक्त एक लक्षात होतं की मला अतुलपासून दूर जायचंय...मी रडत रडत रस्त्याच्या मध्यभागी येऊन पोहोचली, तेवढ्यात अतुलने माझ्या उजवीकडे पाहिलं आणि जोरात पळत असताना ओरडला,

"अमूल्याssssss......"
मी उजवीकडे पाहिलं तर एक भरधाव कार माझ्या दिशेने येत होती... मी भीतीने गच्च डोळे मिटून घेतले... इतक्यात माझ्या हाताला एक जोरदार झटका लागल्यासारखा झाला आणि...

"खर्रर्रर्रर्रर्रर्र.........."
कारच्या ब्रेकचा जोरदार आवाज आणि मी हळूच डोळे उघडून पाहिलं तर अतुलने मला रस्त्यावरून खेचून घेतलं होतं आणि मला घट्ट बिलगून होता तो... कारवाला बिचारा घाबरलेल्या अवस्थेत घाईघाईने कार मधून उतरून मला बघायला आला...मी ठीक आहे ना, कुठे लागलं का मला याची शहानिशा करत होता...अतुलने त्या माणसाला सॉरी म्हणून समजावून परत पाठवलं...रागारागात आता अतुलने माझा हात पकडला आणि फरफटतच मला त्याच्या कार जवळ घेऊन आला...दोन्ही हात कमरेवर ठेवत त्याने एक मोठा श्वास घेतला आणि एक हात उगारत रागात मला बोलला,

"देऊ का एक ठेवून तुला...? असं केलं तर पुन्हा त्यादिवशीच्या 'विश्वासाच्या' भाषणासारखं तुझं 'फेमिनिसम' वर लेक्चर सुरू होईल की मुलींवर हात उचलतात का वैगरे वैगरे...पण तुझ्या ह्या मूर्खपणावर तुझी आरती नाही ओवळणार मी...नो...काय प्रकार होता हा..? तुला काही झालं असतं तर...नेहमीच तुझा त्रास, तुझं दुःख, हेच पटवून देतेस...मी दगड वाटतो का ग तुला...?? आज तुझ्या जिवाचं काही बरं वाईट झालं असतं तर मी जगलो असतो का?? आपण सोबत नव्हतो, लांब होतो, दुरावा..सगळं काही सहन केलं कारण तू धडधाकट होती म्हणून...तू ठीक आहे, यातच समाधान मानायचो मी...पण आज तुझ्या जीवाला काही झालं असतं तर...."

".....तर...तर काय?? तुला काहीही फरक पडला नसता.. फरक पडला असता तर आज लग्न करून बायको मुलात मला विसरला नसता तू मला ...."
मी पण तितक्याच तीव्र वेदनेने त्याला उत्तर दिलं...माझ्या उत्तरावर दातओठ खात तो माझ्याजवळ आला, एक हात माझ्या कमरेत घालून मला जवळ ओढलं आणि एक हात माझ्या तोंडावर ठेवला.. मी घाबरून डोळे बंद केले, माझ्याकडे रागाने बघत कडक आवाजात तो बोलला,

"ए...डोळे उघड अन बघ इकडे माझ्याकडे... बस झाली हं तुझी बकबक...आता फक्त माझं ऐकायचं तू...स्वतःला खूप शहाणी समजतेस का ग?? मी अर्धवट गोष्टी ऐकतो, नको ते निष्कर्ष काढतो, मी नासमज...अन तू कोण मग??? कोणी सांगितलं तुला मी लग्न केलंय ते... मगाचंपासून हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की फोनवर मीनल ताई आणि तिचा छोटा मुलगा होता... विश्वास नसेल तर पुन्हा फोन करून विचार... आली मोठी विश्वासावर भाषणं देणारी....एक गोष्ट कायम लक्षात ठेव आता, प्रेम काय असतं हे ज्या वयात कळतही नव्हतं तेंव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय, करत आलोय... आणि मरेपर्यंत करणार...
तू ना मिले तो किसी और का हो जाऊ,
इतना कमजोर नही है ईश्क मेरा।"

एवढं सगळं बोलून त्याने एक आवंढा गिळला आणि लांब श्वास घेतला... अजुनही त्याने माझ्या तोंडावरचा हात काढला नव्हता, पण तो शांत होऊन आता माझ्या डोळ्यांत बघत होता... आज अकरा वर्षांनंतर तो ते बोलला होता जे ऐकण्यासाठी माझे माझे कान आतुर झाले होते, माझ्या मनाची तहान त्याने रागारागत भरून काढली होती...आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्याच्या तोंडून जेंव्हा माझं नाव ऐकलं तेंव्हा ते नाव सगळ्यात सुंदर आहे हे भासत होतं...त्याचं सगळं ऐकून मी जेव्हा समाधानाने माझ्या पापण्या हळूच मिटल्या, माझे आनंदाश्रू बाहेर पडत होते...माझी अवस्था पाहून तो हळूच बाजूला झाला आणि बोलला,

"आता पुन्हा का रडणं ग तुझं?? माझीच चूक आहे म्हणा...एवढीशी गोष्ट बोलायला मी इतके वर्ष घेतले... आणि सांगितलंही तर ते इतक्या रागाने...काय करू पहिलं अन शेवटचं प्रेम तूच आहेस त्यामुळे थोडा 'पसेसिव्ह' होतो...सॉरी.. खूप रागवलो का तुला?? त्यासाठी एवढं रडायला येत आहे का? तुला आवडलं नाही मी बोललेलं..."

त्याच्या इतक्या सगळ्या प्रश्नांवर मी फक्त नकारार्थी मान हलवत होती, आणि तो तितक्याच चिंतेत होता..

" आता बोल तरी काय झालं?? काही चुकलं का माझं??"
त्याने कंटाळून पुन्हा मला विचारणा केली...

मी स्वतःला सावरत, स्वतःचे हुंदके आवरत बोलली,
"नाही... तस काहीही नाही... पण आज आयुष्यात पहिल्यांदा तू मला...."
आणि बोलता बोलता पुन्हा मला हुंदका दाटून आला..

".....पहिल्यांदा मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे... हो ना.. त्यासाठीच हे अश्रू आहेत...आनंदाचे...???"
तो माझ्या जवळ येत माझ्या कानात बोलला, आणि मी हळूच मान झुकवली...किती अजब नातं होतं ना..!! कधी खुलून बोलणं नाही, एकमेकांसमोर येणं नाही, त्यात इतका मोठा काळ दुराव्याचा सहन केला तरीही आज मनीचे भाव ओळखण्यासाठी शब्दांची गरज भासली नाही... प्रत्येकवेळी प्रेमाची एक नवीच चव चाखायला मिळते... आज जे समाधान आम्ही दोघं अनुभवत होतो, गेल्या अकरा वर्षात ते कधीच भेटलं नव्हतं...शहराच्या थोडं बाहेर, त्या रम्य संध्याकाळी आमच्या प्रेमाची पहाट झाली होती...त्या निर्जन रस्त्यावर, एकमेकांची साथ अनुभवत आम्ही तिथेच दगडावर बसून होतो...मला घरी जायचं आहे हे मी विसरली होती...
अतुलने हळूच माझा हात हातात घेतला आणि माझ्या खांद्यावर त्याच डोकं टेकवत बोलला,

"इतके वर्ष आपण एकमेकांना ओळखतो, पण आज असं वाटत आहे की पहिल्यांदा तुला भेटलो आहे... खूप वेळा वाटलं की उधळून टाकावं सगळं तुझ्यावर...अगदी माझा जीवही...पण काही मर्यादा असतात...परिवाराच्या, समाजाच्या, नात्यांच्या... त्या बांधून ठेवतात आपल्याला.. त्यात तू नात्याने अशी जोडली आहे माझ्या परिवारासोबत की तुझी बदनामी व्हावी असं कधीच काही करायचं नव्हतं.. त्यामुळे कधी तुला सगळ्यांसमोर नावाने हाक मारायचीही हिम्मत झाली नाही...."

मी त्याच्या बोटांत बोटं गुंतवली आणि बोलली,
"इतकं प्रेम होतं.. अजूनही आहे, मग का गेलास सोडून..बरं रागही असेल माझ्यावर, पण तो राग एवढे वर्ष होता का?? मी वाट बघत असेल याचा एकदाही विचार नाही केला तू?"

त्याने मान उलचुन माझ्याकडे पाहिलं अन बोलला,

"असं नाहीये अजिबात... मी गेलो होतो रागात हे खरंच आहे... पण बंगलोर ला गेल्यावर सतत तुझाच चेहरा डोळ्यांसमोर असायचा...खूप वेळा वाटलं की तुला बोलावं पण मग ते आठवायचं की तू जे आयुष्य निवडलं आहेस त्यात मला शामिल नाही करून घेतलंस...दोन वर्षे घालवले तिथे...मग एकेदिवशी चेतनच्या लग्नाचं कळलं, तेंव्हा त्याच्या आयुष्यात साक्षी किती आधीपासून होती हे माहित पडलं... तू त्या रात्री मला तेच सांगणार होतीस, अन मी ते ऐकून घेतलं नाही याचा खूप पश्चाताप झाला..त्याच क्षणी विचार केला सगळं सोडून तुझ्याजवळ येतो.. आणि त्या आनंदात आलोही घरी...पण नियतीने कदाचित आपली भेटण्याची वेळ तेंव्हा निश्चित केलीच नव्हती... मीनल ताई ज्या परिस्थितीतून जात होती तिला सोडून कुठेही जाता आलं नाही..."

"मीनल ताई??? काय झालं तिला...? बरी आहे ना ती?"
मी काळजीने विचारलं...त्यावर अतुलने एक उसासा घेतला अन बोलला,

"आता बरी आहे...लग्न होऊन दोनच वर्षे झाली होती तिला आणि तिच्या नवऱ्याने तिला जॉब सोडायला लावला.. त्यांच्यात सततच्या कुरबुरी, भांडणं व्हायची... आणि कारण काय तर...संशय...तुला माहीत आहे ना, आमच्या घरात चेतन आणि मीनल ताई किती बोलके आहेत.. तिचा स्वभावच इतका मोकळा होता की हसून बोलून सगळ्यांना आपलं करायची...त्यामुळे मित्र मैत्रिणी ही खूप होते.. पण तिच्या नवऱ्याने त्या शुद्ध मैत्रीवर प्रश्न उपस्थित केले... तिचा जॉबही सोडवला...ती निमूटपणे सहन करत होती.. पण एक दिवस कहरच केला त्याने, जेंव्हा मीनल ताई दुसऱ्यांदा प्रेग्नंट होती त्याने त्या बाळाचा स्वीकार केलाच नाही...कारण तू समजू शकतेस त्याने असं का केलं असावं... आणि त्या क्षणाला आली ती सगळं सोडून... तिच्या टेन्शन मध्ये आजोबाही गेले, आईबाबा सतत टेन्शन मध्ये असायचे...मग कसं सगळं सोडून तुझ्याजवळ येऊ मी???"

इतक्या वर्षांच्या त्याचा वेदना डोळ्यांत साचत होत्या, मी त्याला नजरेनेच आश्वस्त केलं...आणि तो पुन्हा बोलायला लागला...
"जेंव्हा जेंव्हा मीनल ताईच्या डोळ्यांत बघायचो, तिच्या नवऱ्याबद्दल तिरस्कार दिसायचा.. एका मुलीसाठी तिचं चारित्र्य तिचा अभिमान असतो हे मला तेंव्हा कळलं..मला भीती वाटायला लागली की जर तोच तिरस्कार तुझ्या मनात माझ्याबद्दल असेल तर... तुझा राग मान्य होता माझ्यासाठी मला, पण तिरस्कार नाही... त्यात आईबाबांना कधीही सोडून जाणार नाही हे बोलणारी तू, इंदोरला निघून गेली, मग विचार केला माझं काही अस्तित्वचं नाही तुझ्या आयुष्यात... मग तुझ्याजवळ यायचं कशासाठी... मीनल ताई अजूनही तुझी आठवण काढते, तुझ्याबद्दल बोलत असते, मीच विषय टाळतो...हो पण, जसं तू मला विसरण्याचा प्रयत्न केला, तसा मी नाही केला...तुला कायम आठवत राहणं आवडायचं मला... एकांतात तुझे फोटो पाहून तुझ्याशी बोलणं आवडायचं मला...मी तुला माझ्या मनातून आयुष्यातुन कधीच काढलं नाही अमूल्या...कारण तू माझ्यासाठी खरंच अमूल्य आहेस..."

आज एकेक करून आम्ही इतक्या वर्षात आमच्या मनात साचलेला सगळा गाळ बाहेर काढत होतो...अकरा वर्षांत जेवढं बोललो नाही, ते सगळंच आज बोलून टाकायचं होतं... मीनल ताई बद्दल ऐकून मन हळहळून गेलं, वेदना झाल्या खूप... मोठ्या बहिणीप्रमाने माया लावली होती तिने मला, आणि आजोबा...किती लाड करायचे ते माझे...

किती अनिश्चित असते ना हे आयुष्य...! ज्या व्यक्तींसोबत आपण आनंदाने वेळ घालवतो ते एका घटनेने केवळ आठवण बनून राहून जातात...सगळ्या गोष्टी नव्याने उलगडत होत्या...हा अतुल मी आज पहिल्यांदा बघत होती...जेंव्हा त्याला मी त्याच्या आणि प्रियाच्या लग्नाबद्दल झालेला गैरसमज बोलून दाखवला किती खळखळून हसला तो...किती निरागस वाटत होता... माझ्या डोक्यावर हलकेच मारत बोलला,

"वेडी आहेस तू...अग आमचा गोतवाळा केवढा आहे माहीत आहे ना तुला, एकदा स्पष्ट त्या मुलाचं नाव विचारलं असतंस वहिनीला तर हे विरहाचे सात वर्षे सोसावे लागले नसते ना मला..."

"अच्छाजी...तू एकट्याने सोसले का??? मी तर मजेत होती ना खूप...?" मी नाटकी रागवत बोलली... इतक्यात तो उभा झाला आणि मलाही हात देत उभं केलं...मी उभी झाल्यावर मला बोलला,

"ठीक आहे, खूप सोसलं...दोघांनीही... आता बस..चल माझ्यासोबत..." माझा हात हातात घेऊन तो पुढे चालायला लागला,

"अरे पण कुठे जातोय आपण? सांग तरी...." मी बोलली,

"लग्न करू...आज, आता, याक्षणी...."
तो अस बोलल्यावर मी जागेवरच थांबली आणि त्यालाही थांबवत बोलली....

"अतुल थांब ना...वेडा आहेस का?? लग्न?? आता?? असं कसं अचानक..? घरी सांगावं लागेल रे...थोडा धीर धर ना..."

"माझ्यावर विश्वास नाही का??" तो शंकेने बोलला,

"अरे तसं नाही...पण आधी घरच्यांना विश्वासात घ्यायला हवं.. ते नकार देणार नाहीत, पण त्यांना सांगणं गरजेचं आहे ना.."
मी त्याला समजवत बोलली...

"बरोबर आहे तुझं...पण खरं सांगू...सात वर्षांपूर्वी जी भीती होती ती आजही आहे... म्हणजे तुझ्यावर विश्वास आहे माझा, पण सगळं चांगलं होत असताना आपण नेहमी वेगळं झालोय ना त्यामुळे... आता यावेळी तुला गमवायचं नाहीये मला... त्यामुळे भीती वाटते आपण पुन्हा वेगळं तर नाही होणार ना.."
यावेळी त्याच्या मनातली भीती तर मलाही जाणवत होती पण खूप काही वाईट झाल्यावर हे वाटणं सहाजिकच असतं हा विचार करून मी त्याला बोलली,

"अतुल...आता काहीही होणार नाही...आणि जर काही झालं तर हे माझं वचन आहे तुला, तू सोडून मी कोणाचीही होणार नाही...पण आता काही वाईट विचार नको...आणि तसही आपल्याला सगळ्यात आधी ही बातमी एका खास व्यक्तीला द्यायला हवी की नाही...?"

त्याने माझ्या मनातलं ओळखलं आणि चेहऱ्यावर स्मित आणून तो बोलला,

"माहीत आहे...चेतन शिवाय तुझा आनंद पूर्ण होणार नाहीये, पण तो माझ्याशी नाही बोलणार...माहीत आहे मला... त्याला खुप दुखावलय मी..."

"तूच नाही रे, मी पण खूप हर्ट केलंय त्याला...पण आपल्या माणसाला बोलायला काय संकोच??? काय करेल तो, जास्तीत जास्त शिव्या घालेल...पण आपण दोघेही ओळखतो त्याला...आपल्या बोलल्यावर त्याचा राग लगेच शांत होईल.."
मी समजवल्यावर आम्ही चेतनला फोन करण्याचा निर्णय घेतला... त्याला व्हिडीओ कॉल वर डायरेक्ट सरप्राईज करावं हा माझा विचार होता...खूप वेळ रिंग जाऊनही त्याने फोन उचलला नाही...मला माहीत होतं राग आहे त्याच्या मनात, तो सहजासहजी नाही उचलणार फोन...मी पुन्हा लावला, तर यावेळी शहाण्याने साक्षीला पुढे केलं...

"हे...अमूल्या... किती वर्षांनी फोन केलास... कशी आहेस... चेतन बाहेर गेलाय ग..."
मला माहित होतं तो तिथेच आहे... पण खोटं न बोलणाऱ्याने कधी खोटं बोलण्याचा स्टंट करू नये...त्यामुळे मी बोलली,

"त्याला जाऊदे ग कुठेही... मला तुला एक गुड न्यूज द्यायची आहे.. मी लग्न करतीये... आणि मुलगा कोण आहे बघायचं का तुला..."

आणि माझा तीर बरोबर निशाण्यावर लागला...चेतन साहेब बिळातून बाहेर निघत बोलले,

"ये साक्षी सरक ग बाजूला...काय उपद्व्याप करते ही मुलगी बघू दे मला... शोधला असशील ना कोणीतरी चम्पू... इतके वर्ष आठवण नाही आली माझी आणि अतुलचीही... हो ना?? दाखवंच कोण आहे तो जरा... सांगतो त्याला ह्या मुलीचा काही भरोसा नाही..." चेतन बोलला,

"ठीक आहे, सांगूनच दे त्याला आता..."
आणि मी अतुलकडे कॅमेरा टर्न केला...त्याला बघून चेतन अन साक्षी दोघंही कोमात जाण्याच्या तयारीत होते....

"काय झालं डॉक्टर साहेब...मुलगा आवडला नाही का??"
अतुलने हसत हसत विचारलं...

"तुम्ही दोघं ना....नालायक आहात... मला ना बोलायचंच नाही... आणि खबरदार जर मी यायच्या आधी लग्न केलं तर.."
तो आनंदाने नाचायचा बाकी होता...

"ऐक ना चेतन...तुझे पाय पकडून माफी मागायला तयार आहे आम्ही दोघं... पण आमच्या वर रागावू नकोस आता...तुला खुप दुखवलय आम्ही, पण तू नाराज राहिला तर अमूल्या अन मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार रे..."
अतुल हळवा होत चेतनला बोलला,

"अतुल...साल्या...पक्का जोरू का गुलाम होशील बे तू..किती ते अमूल्या प्रेम...हहहाखिखिखी..."

आज किती वर्षांनी चेतनला असं खळखळून हसताना पाहिलं होतं मी...माझ्या झोळीत मावणार नाही इतका आनंद देव एकाच दिवसांत देत आहे मला...हे सत्य आहे की स्वप्न हेच कळत नव्हतं... आता खरंच भीती वाटायला लागली होती, कारण गेल्या काही वर्षांत आनंदाने जणू पाठच फिरवली होती, आणि आता असं अचानक अकाली पाऊस माझ्या आयुष्यात बरसत होता... अकाली पाऊस थोड्या वेळेसाठी थंडावा निर्माण करू शकतो पण त्यापेक्षा जास्त नुकसानच करतो... याच विचारात असताना अतुलने मला धक्का दिला अन बोलला,

"काय ग?? आता कोणत्या विचारात आहेस?? नाऊ एव्हरीथींग इस सॉर्टेड...चल निघूया घरी... तुला सोडून मी पण जातो, भरपूर का..."
अतुलचं वाक्य मध्येच तोडत मी बोलली,

"...सोडून जातो म्हणजे?? काय बोलतोएस तू??"
आणि त्याच्या त्या वाक्याने माझं मन भरून आलं...त्याने एक नजर माझ्यावर टाकली आणि माझ्याजवळ येत बोलला,

"मिटाकर भी खुदको मै ये वादा ना तोडू,
बिच रास्ते तेरा साथ छोड दूँ ये मुंमकीन नही
अग राणी...तुला घरी सोडतो आणि मी पण घरी जातो हे बोललो मी.... तूच बोललीस ना, घरच्यांना सांगावं लागेल...मग त्यासाठी घरी नको का जायला?? आज रात्री मी पण आईबाबांना बोलतो आणि तू पण बोल...ठीक आहे...निघायचं आता...."
मला समजवून अतुलने कारच्या दिशेने पाऊलं उचलली, पण मला असं वाटत होतं की काहीतरी निसटय हातातून... तो माझ्या पासून एक क्षण ही दूर होऊ नये हे वाटत होतं आणि भावनेच्या भरात मी त्याच्या मागून जाऊन घट्ट मिठी मारली अन बोलली....

"भीती वाटते रे...माहीत नाही कशाची...थोडा वेळ थांबूयात का प्लिज?? मला नाही सोडून जावं वाटत आहे तुला...."
तो माझ्याकडे वळला, आणि दोन बोटांनी हळूच माझ्या गालांवर ओघळणारे अश्रू टिपत बोलला...

"मी तर बोललो चल आताच लग्न करू, लगेच घेऊन जातो तुला घरी...पण इतकं हळवं होऊन कसं जमेल...आणि आता थोड्याच दिवसांचा दुरावा ग...आणि हा दुरावा आधीच्या दुराव्यापेक्षा वेगळा असेल, हा दुरावा आपल्यात गोडवा निर्माण करेल....बरं ठीक आहे, आपण पंधरा मिनिटं थांबू आणखी, त्याबदल्यात मला काय मिळेल...?"
तो मिश्किलपणे डोळे मिचकावत बोलला...

"हं... हे काय आता?? काय हवंय तुला...?" मी विचारलं

"मी तुला सगळं कन्फेस केलं...आणि तू अजूनही बोलली नाहीयेस मला....माझ्या कडून ऐकून घेतलं, आता माझ्याही कानांना थोडं सुख मिळायला हवं ना...बोल ना..."
माझ्या चेहऱ्यावरची केसांची एक बट मागे करत तो बोलला,

"काय ??? काय बोलू?? माहीत तर आहे तुला सगळं...मला नाही बोलता येत...." मी शरमेने मान खाली घातली...

"ये...अशी काय करते..भांडतांना तर डोळ्यांत डोळे घालून मला खाऊ की फाडु अशी करते...मग प्रेम करतांना कशाची लाज...."

"तू डोळे बंद कर आधी...."

"करतो हं, पण मला डोळे बंद करायला लावून मगाचा राग म्हणून माझ्या कानाखाली नको वाजवू म्हणजे झालं...."
तो हसत हसत बोलला...

"गप रे... असं काही करणार नाही मी...तू कर ना डोळे बंद.."
आणि त्याने डोळे बंद केले...मी आधी त्याचा चेहरा, त्याचा निरागसपणा माझ्या डोळ्यांत समावून घेतला आणि हळूच त्याचा उजव्या गालावर माझे ओठ टेकवले... खरं तर आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा वाटत होता, पण रोखलं स्वतःला... इतक्यात अतुलने डोळे उघडले आणि बोलला,

"मी पुन्हा डोळे बंद करतो...जर अश्याप्रकारे तू प्रेम करणार असशील तर मी नेहमीसाठी डोळे बंद करायला तयार आहे.."

"काहीही नको बोलू...चल आता घरी...."
मी नजर चोरत बोलली,

"अंह...घरी तर जाऊ, पण त्याआधी तू डोळे बंद कर, मी तुला काय काय देतो बघ आता...आणि तेही ओठांवर...."
आणि तो मजेने माझ्याकडे येत बोलला,

"ये अजिबात नाही हं...ते तुला आताच मिळणार नाही..."
मी त्याला चिडवत त्याच्या पासून थोडी लांब पळत बोलली...

"ये यार ही चिटिंग आहे हं अमूल्या...थांब तू पकडतोच तुला मी आता..."
आणि हसत हसत त्याने माझ्या मागे धाव घेतली...मी कार ला एक गिरकी घेऊन पुन्हा दुसरी घेणार तर त्याने त्याची स्पीड वाढवली...मी साडीच्या निऱ्या हातात घेऊन माझा तोल संभाळत रस्त्याकडे धाव घेतली...

"दमवतेस यार तू...थांब जरा...." त्याने दोन्ही हात कमरेवर ठेवत, धापा टाकत बोलला....

"मला पकडणार होतास ना....इतक्यात दमलास...हाहाहा.."
आणि मी त्याच्याकडे बघत पुन्हा दोन पाऊलं मागे घेतले... त्याने ही पुन्हा माझ्याकडे धाव घेतली...तो माझ्यापासून दोनच पाऊलं लांब असेल इतक्यात एक भरधाव ट्रक आमच्या दिशेने आला आणि जोरदार आवाज झाला मी दूर फेकल्या गेली... एका जबरदस्त धक्क्यामुळे मी रस्त्याच्या कडेला फेकल्या गेली... माहीत नाही किती वेळ मी तशीच पडून होती.. अंगात त्राण तर नव्हता, पण चेतना अजूनही जागृत होती...जमिनीवर दोन्ही हात टेकवत मी उठण्याचा प्रयत्न करत होती पण उठल्या जात नव्हतं... आजूबाजूला पाहिलं अतुल कुठेच दिसला नाही... त्याच्या काळजीने काय शक्ती अंगात संचारली माहीत नाही, अतिशय वेदनेने मी कळवळून उठली, आणि रोडच्या दिशेने चालण्याचा प्रयत्न केला...डोळ्यांसमोर अंधारी येत होती, इतक्यात कानांवर आवाज पडला...

"अ..मु...ल्या..sss...."
आवाज अतुलचा होता...मी लंगडत लंगडत त्या दिशेने गेली...रोडच्या मध्यभागी अतुल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता...आता माझा उरला सुरला प्राणही निघतो की काय असं झालं...मी घाईघाईने जाऊन त्याच्या जवळ बसली, त्याचं डोकं माझ्या मांडीवर घेतलं...काय करू, काय नाही काहीही कळत नव्हत...त्याच्या रक्ताने माझी पूर्ण साडी माखली होती...मी थरथरणाऱ्या हातांनी कधी त्यांच्या केसांत हात फिरवायची तर कधी त्याच्या चेहऱ्यावर... डोळ्यांतून अश्रू तर निघत होते पण गळ्यातून आवाज येत नव्हता...मी पूर्ण शक्तीनिशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तिकडे अतुलची तडफड बघून काही सुचत नव्हतं,

"तत्त्ततू...ठीक ..आहे स... माझं तुझ्यावर...ख्खखुप प्रेम...तू फक्त..माझीच...."
त्याने त्याचा एक हात माझ्या गालावर ठेवला होता, आणि बोलता बोलता अचानक तो खाली गळून पडला, त्याचे शब्द ही अधुरेच राहिले...आणि हे पाहून माझा हंबरडा बाहेर पडला,

"अतुल....,उठ ना रे...तू पुन्हा असा नाही जाऊ शकत मला एकटीला सोडून..का..का वाचवलंस मला....अतुल... अतुल...."

मी ओरडत होती, रडत होती, तळमळत होती पण माझा आवाज त्याच्यापर्यंत कधी पोहोचलाच नाही, पहिल्यांदा हे जीवन मला मरणापेक्षाही जास्त वेदनादायी वाटत होतं...पुन्हा एकदा मी अतुलला जाण्यापासून नाही थांबवू शकली, त्याला सांगायचं होतं मला की माझं किती प्रेम आहे त्याच्यावर, त्याच्याशिवाय माझं आयुष्य एक असं वाळवंट आहे जिथे आता चुकूनही पाऊस पडणार नाही...मला जिवंत सोडून माझे प्राण ही घेऊन गेला तो.. माझं शरीराच्या हालचाली सुरू होत्या पण माझ्या जगण्याची आस घेऊन गेला तो...का भेट घडवली आज देवाने आमची?? का मी त्याच्या कारमध्ये बसली?? तो जेंव्हा घरी जायचं बोलला, का मी त्याला अडवलं..???? कितीतरी प्रश्न निर्माण करून गेला ज्याची उत्तर मला तीळतीळ मरूनही सापडणार नव्हती... जाता जाता माझी शेवटची संधी ही घेऊन गेला आणि माझ्या भावना मनाच्या वाटेवरती नेहमीच राहिल्या....अव्यक्त..!!!

"खडी हूं उस मोड पे, जहाँ तुझसे मुलाकात नही होती
सच कहते है लोग, सच्चे प्यार की मंजिल नही होती..!"
******************************
समाप्त.

( Dear readers,
माझ्या आयुष्यातल्या काही अनमोल आठवणी, काही कटू अनुभव या कथेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे...कथेचा शेवट कदाचित सगळ्यांना पटणार नाही, पण स्वानुभवातून हे बोलते की ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो, ती कधीच आयुष्याभर सोबत राहत नाही...मग मला असं वाटतं उगाच संधीची, वेळेची वाट पाहण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा बोलून मोकळं झालेलं कधीही चांगलं..न बोलण्याचे 'रिग्रेट्स' राहत नाहीत...पण एक सत्य हे ही आहे की नियतीचा कंट्रोल आपल्या हातात नसतो... असो, अतुल आणि अमूल्याची ही कहाणी कशी वाटली हे नक्की कळवा...कथेचा शेवट वाचून दुःख झालं असेल तर त्यासाठी मी मनस्वी माफी मागते... आशा आहे माझ्या कथेला आणि मला समजून घ्याल....
लवकरच भेटू नव्याने...नव्या कथेसह....)

तुमचीच,
अनु...🍁🍁


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED