देवकुंड : एक अनुभव Dr.Swati More द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देवकुंड : एक अनुभव



इतर लोकांसारख देवकुंडला रुळलेल्या वाटेवरून भेट देणं बहुधा आमच्या नशिबात नव्हतं.. भगवान शंकराच्यासुद्धा मनात असावं की , आम्ही त्याच्या पवित्र स्थानाला भेट देण्यासाठी परिश्रम करावेत. त्यामुळेच तीन वेळा अगदी सगळी तयारी होवून सुद्धा आमची देवकुंड ट्रीप रद्द झाली होती..
आणि एक दिवस ‘महाराष्ट्र देशा ट्रेकिंग ग्रुप’ वर देवकुंड रॅपलिंग बाबत जाहिरात आली. त्याच वेळी मनात नक्की केलं, आपण यावेळी जायचच. मग काय.. सगळी माहिती घेण सुरू केले.. जसं की,या वयात आपल्याला रॅपलिंग जमेल का ? यू ट्यूब वरती व्हिडिओ बघून, आणि ग्रुप लीडर्स बरोबर बोलून बऱ्याचशा शंकांचे निरसन करून घेतले आणि आम्ही देवकुंड रॅपलिंग आणि देवकुंड धबधबा ट्रेक करण्याचे नक्की केले.
तरीही अगदी निघेपर्यंत धाकधूक होतीच की आपल्याला जमेल का आणि ट्रीप रद्द तर नाही होणार ना!
पण असं काही झाल नाही आणि आम्ही संजय गांधी नॅशनल पार्क च्या गेट कडे आमच्या ग्रुपला जॉइन झालो. सुरवात तर छान झाली. ग्रुप चे इतर ट्रेकर्स ही सगळी तरुण मुलेच होती ! खूप मनमिळावू होती. आम्हा, काका काकूंना त्यांनी सहज त्यांच्या ग्रुपमध्ये सामावून घेतले.
रात्री १०:३० च्या सुमारास प्रवासाची सुरवात झाली. आम्ही पहाटे ४:३० च्या सुमारास पाटणुस गावी पोहचलो. तिथे हरिनिवास या घरी आमच्या ग्रुप ची चहा, नाष्टा आणि फ्रेश होण्याची सोय केली होती. काकूंनी पोहे खूप छान बनवले होते. येवढ्या सकाळी खायची सवय नसताना पण आम्ही मनसोक्त पोहे खाल्ले.थोडा वेळ आराम करून, आमचा ग्रुप ताम्हिणी घाटाकडे रवाना झाला. तिथून प्लस व्हॅली पार करून देवकुंड धबधबा ज्या कड्यावरून खाली कोसळतो तिथपर्यंत ट्रेक करायचा होता.
साधारण ३० किलोमीटर प्रवास करून आम्ही प्लस व्हॅली च्या सुरवातीस पोहचलो. आमचे ट्रेक लीडर्स किरण, अक्षय, सागर, केतन, मयुरेश, अर्जुन, यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या .आम्ही व्हॅली उतरण्यास सुरवात केली. जसजशी व्हॅली उतरत होतो तसतसा या ट्रेकचा कठिणपणा जाणवत होता. प्लस व्हॅली उतरण्यासाठी आपण जी वाट वापरतो ती दुसरं काही नसून सुकलेल्या ओढ्याच पात्र आहे. त्या पात्रातून तुम्हाला वाट काढत खाली उतरायचं असतं. साहजिकच, मोठमोठे दगड, निसरड्या वाटा, झाडेझुडपे, पाण्याची डबकी तुमचे स्वागत करतात.पण आमचे ट्रेक लीडर्स एवढे कसलेले आणि अनुभवी होते की त्यांनी खूप सहजपणे, हव्या त्या वेळी प्रोत्साहन व आधार देत आम्हाला व्हॅली उतरण्यास मदत केली.
अडीच तासाच्या परिश्रमानंतर आम्ही रॅपलिंग पॉईंट जवळ आलो. ट्रेक करताना थकवा येतो पण प्लस व्हॅली ला देवाने भरभरून निसर्ग सौंदर्य दिले आहे. ते पाहिले की तुमचा थकवा कुठल्याकुठे पळून जातो. निर्मनुष्य व पूर्ण एकांत असणारा - A totally Untouched Nature !
आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली. त्यात काही जणांनी नदीच्या नितळ पाण्यात पोहण्याचा आनंद घेतला, काहींनी छान फोटोशूट केलं, काहीजण गप्पा मारत बसले.
आता वेळ होती, रॅपलिंगला सुरवात करण्याची, आमच्या लीडर्स नी , आम्हाला, रॅपलिंगसंबंधी बेसिक माहिती दिली.
हरनेस, डिसेंडर, कॅराबिनरस म्हणजे काय आणि रॅपलिंग करताना काय काळजी घ्यावी याबाबत. जसजसा रॅपलिंगचा क्षण जवळ येवू लागला तसे माझ्या आणि अनिलच्या ह्रदयाचे ठोके वाढू लागले.पण कितीही भीती वाटतं असली तरी रॅपलिंग करून खाली उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
मयुरेश ने , अनीलचे हरनेस, लॉक , नीट चेक केलं, सगळ्या महत्वाच्या सूचना केल्या आणि अनिलने पाठी पाठी जात , कडा उतरायला सुरुवात केली. अनिल, खाली पोहचेपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता कारण एक तर त्याला उंचीची भीती आहे आणि आम्हा दोघानाही रॅपलिंगचा अनुभव नव्हता. पण हिम्मत दाखवत, तो 130 फुटाचा कडा उतरून गेला. केतन ने मला सांगितले, सर खाली पोहचले.
आता माझी रॅपलिंग करण्याची पाळी होती. माझी सुरवात छान झाली पण माझ्या नशिबात काही वेगळंच होते. मी काही अंतर रॅपलिंग करत पाठी गेल्यावर, अगदी कड्याच्या टोकावर बॅलन्स जावून मी पडले. माझा एक शूज पायातून निघून खाली पडला. पण चेतनने खूप छान मॅनेज केलं . मला धीर दिला आणि परत उठून उभं रहायला सांगितलं. मी दुसरा शूज पण काढून टाकला, हे सगळं, तिथेच, कड्याच्या टोकावर. प्रयत्न करून परत उभी राहिले आणि तो कडा रॅपलिंग करून खाली उतरले. खाली आल्यावर, जेंव्हा मी त्या कड्याकडे बघितले तेंव्हा मला जाणवलं की आपण काय करून आलो. त्या 130 फूट कड्याचं रौद्र रूप मी वर पाहिल्यावर जाणवलं.
पहिला टप्पा यशस्वीपणे पार केल्यावर आमच्यापुढे अजून एक आव्हान होत ते म्हणजे दुसरा टप्पा .
किरण, आमचा ट्रेक लीडर, कड्याच्या टोकाशी उभा राहून सगळ्यांना खाली जाण्यास मदत करत होता. किरण ज्या ठिकाणी उभा होता तो सरळसोट 250 फुटाचा उभा कडा होता आणि दोन पाय ठेवण्या येवढीच जागा होती. पण किरण ज्या निर्भयतेने तिथे उभा होता त्याची ती निडरता बघून, आमची भीती थोडी कमी झाली.
आम्ही दोघंही तयार झालो, अगोदर अनिल खाली गेला मग मी. दुसऱ्या टप्प्याचा अनुभव, अनपेक्षित होता. काही फुटाचा कडा रॅपलिंग केल्यावर आपल्याला अधांतरी दोरीच्या साहाय्याने देवकुंड धबधब्याच्या प्रवाहातून खाली यायचे असते. विश्वास ठेवा, ज्यावेळी धबधब्याचे पाणी आपल्या अंगावर पडते आणि त्या पाण्यातून आपण हळू हळू खाली येत असतो, तो अनुभव, तो क्षण निव्वळ अविस्मरणीय !!
अश्या प्रकारे, आम्ही धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचलो. तिथले निथळ आणि निळ्या रंगाचे पाणी बघून ट्रीप सार्थकी लागल्या सारखं वाटलं. तिथे थोडा वेळ विश्रांती घेवून तुम्ही धबधब्याचे अमाप सौंदर्य अनुभवू शकता.
धबधब्याच्या पायथ्याशी शंकराचे छोटेसे मंदिर आहे , त्याला हात जोडून आणि धबधब्याचे सौंदर्य मनात साठवत आम्ही परतीच्या ट्रेकला निघालो. परतीचा ट्रेक त्यामानाने सोप्पा आहे. सरळ वाट आहे. अडीच तास चालल्यानंतर आम्ही बसजवळ पोहचलो. थोडी पोटपूजा करून, देवकुंडच्या आठवणी मनात घेवून आम्ही मुंबईकडे रवाना झालो.

डॉ. स्वाती अनिल मोरे
कांदिवली पूर्व