Tomorrow may not be there books and stories free download online pdf in Marathi

कल हो ना हो

काल रात्री दीडच्या सुमारास मोबाईलची रिंग वाजली. एक डॉक्टर असल्यामुळे मला असं रात्री अपरात्री येणाऱ्या फोन कॉल्सची सवय आहे.. कोणीतरी पेशंट असणार, असचं मनात आलं..

फोन हातात घेतला तर स्क्रीनवर अगदी जवळच्या मैत्रिणीचं नाव, मनात शंकेची पाल चुकचुकली. थोड्या अनामिक भीतीनेच फोन हातात घेतला..

"स्वाती , सुमन आपल्याला सोडून गेली गं..."

"काय ? केंव्हा ? असं कसं अचानक ? गेल्या आठवड्यातचं माझं नि तिचं बोलणं झालं होतं . तेंव्हा तर छान बोलली की माझ्याशी "

अलका माझी मैत्रीण, रडत रडतच सांगू लागली..

"काल संध्याकाळी अचानक तिच्या छातीत खूप दुखायला लागलं म्हणून घरच्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं . डॉक्टरांनी तिला तीव्र हृदय विकाराचा झटका आला आहे, असं निदान केलं.डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण काही उपयोग झाला नाही...."

माझं मन एकदम सुन्न झालं.. आठ दिवस असेच विचार करण्यात आणि सुमनच्या आठवणीत गेले..

आज परत अलकाचा फोन आला.. तिने सांगितलेली माहिती माझ्यासाठी धक्कादायक होती..

सुमनला एक वर्षापासून मध्ये मध्ये छातीत दुखत होतं. पण सतत घरातील कामात व्यस्त असणारी आमची सुमन , तिनं हे दुखणं अंगावर काढलं. कधी एखादी वेदनाशामक गोळी घे तर कधी अँसिडीटी असेल, असं स्वतःचं गूगल वर शोधून ही आमची मैत्रीण घरीच औषधं घ्यायची.
एक दिवस चक्कर येऊन पडली तेंव्हा तिला जबरदस्तीने तिच्या मुलाने डॉक्टरांकडे नेलं तर ब्लड प्रेशर वाढलं होतं. सगळ्या तपासण्या करून तिला योग्य त्या गोळ्या सुरू झाल्या..
आमच्या मॅडम, दुसऱ्याचं पथ्यपाणी नीट सांभाळतील ,पण स्वतःच्या बाबतीत कधीच औषधं वेळेवर घेतली नाहीत आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला.. तीव्र हृदय विकाराचा झटका..

कधी आम्हा मैत्रिणींबरोबर फिरायला आली नाही की कधी मोकळा वेळ काढून फोन वर गप्पा नाहीत .. कधी निवांत माहेरी जाऊन राहणंही नाही..

"अगं, मी फिरायला आले, माहेरी गेले तर माझं घर कोण बघेल? सासूला डायबिटीस आहे.. त्याचं पथ्यपाणी कोण करेल?मुलांचं जेवण, त्यांचा अभ्यास ,नवऱ्याचा रोजचा डबा,कोण बघणार..???" नेहमी तिचा हाच धोशा...

आम्ही तिला खूप समजवायचो,"अगं एखादी बाई ठेव हाताखाली.कधी तरी मैत्रिणींबरोबर आलीस तर घरचे घेतील की एखादा दिवस सांभाळून.. थोडा वेळ स्वतःला दे!"

बरं .. इथपर्यंत ठीक होतं..पण घरच्या कामासाठी आणि घरातील लोकांसाठी तिने स्वतःच्या तब्बेतीकडे येवढं दुर्लक्ष करावं. हे तर अजिबातचं पटलं नाही..

एवढी खप खप खपली सगळ्यांसाठी आणि स्वतःची काही हौसमौज न करताच निघुन गेली.

चूक तिचीच होती म्हणा..

तिच्या जाण्यानंतर काय झालं? तर घरातील लोकांना वाईट वाटलं पण किती दिवस?.. आता त्यांनी घरकाम आणि स्वयंपाकासाठी दोन कामवाल्या बायका ठेवून स्वतःचा प्रश्न सोडवून घेतलाय . सगळ नीट चालू आहे. फक्त तिथे सुमन नाही ..


बाबूमोशाय, ज़िन्दगी और मौत ऊपरवाले के हाथ है ,

कब, कौन, कैसे उठेगा यह कोई नहीं बता सकता है !


असच अजून एक उदाहरण. माझा एक कॉलेजपासूनचा मित्र .. सतत काम आणि काम व पैसे कमावणे,एवढंच त्याला माहीत ...
बरं , घरी आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे असंही नाही.. कसलं कर्ज नाही. स्वतःचं घर, गाडी,नोकर चाकर..
तरीही हा माणूस कधी सुट्टी घेत नाही. ना कुठे फिरणे,ना मित्र,ना फॅमिली विकेंड.. अगदी कामाचं व्यसन असणारा....

मी नेहमी त्याला गंमतीने म्हणायचे..
"बस, कर रे आता, तुझ्या सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा कमावला आहेस.. मेल्यावर तुझ्याबरोबर यातलं काही येणार नाही.. आयुष्य जग आता थोडंतरी.. वहिनी,मुलं, मित्र यांना वेळ दे. स्वतः ला वेळ दे. कॉलेज मध्ये असताना किती छान गाणं म्हणायचास, संगीत म्हणजे तुझा प्राण होता, लिखाण करायचास. सगळं सगळं विसरलास या पैश्याच्या नादात.."

"अगं,अजून दोन तीन वर्षे ..मग मी रिटायरमेंटचं घेणार आहे, कामातून स्वेच्छा निवृत्ती आणि राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण करणार. पूर्ण भारत भ्रमंती करायची आहे मला. खूप सारी गाणी तुम्हा सर्वांना ऐकवायची आहेत.. मस्त मैफल जमवू..पण अजून दोन तीन वर्ष थांब "....

गेल्या वर्षी.. त्याला अचानक ताप आला काय , त्याच कोरोना निदान झालं काय आणि बघता बघता एवढा सीरियस झाला की मुंबईतील सर्वोत्तम हॉस्पिटल आणि सर्वोत्तम डॉक्टर सुद्धा त्याला वाचवू शकले नाहीत..

अशीच माझ्या मनाची हळहळ त्यावेळीही झाली ....

सारासार विचार केला तर आपल्या लक्षात येईल,आपणही कायम तेच करत असतो. स्वत: काटकसर करत दुसऱ्यांसाठी जगत राहतो. समाजासाठी जगत नसलो तरी स्वतःच्या कुटुंबासाठी- लायक/ नालायक मुलांसाठी खस्ता खात राहतो- कमावतो.खर्च करताना पण विचार करत राहतो, मरेपर्यंत कायम कमवतच राहतो आणि एक दिवस हे सर्व काही मागे ठेऊन अनंतात विलीन होतो. कुठं थांबावं हे माणसाला शेवटपर्यंत कळत नाही. कमवलेलं सगळं इथं ठेऊन एक दिवस स्वतःला आणि कुटुंबाला न समजता हे जग सोडुन जातो. अनामिकासारखं....

अशी बरीच उदाहरणे आहेत आजूबाजूला... माणसं पैसा, प्रतिष्ठा , मान - सन्मान मिळवण्याच्या धडपडीत जगणं विसरून जातात..
प्रत्येकाला आयुष्याचा समतोल साधता यायला पाहिजे. ते शिकायला पाहिजे.
मी असं म्हणत नाही की , पैसा कमवू नका,काम करू नका,पण हे सगळं करत असताना स्वतःसाठीही वेळ काढा, स्वतःच्या शरीराची आणि मनाचीही काळजी घ्या. स्वतःचे छंद जोपासा... मनाचं समाधान महत्वाचं ...

हरवलेल्या वस्तू सापडू शकतात , पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली ती कोणत्याही उपायानं ती पुन्हा मिळू शकत नाही ते म्हणजे आपलं "आयुष्य " .पुढचा प्रवास आपल्या हातात नाही .माणसाचे सगळं आयुष्यच गुढ आहे . म्हणून भूतकाळ व भविष्यकाळ - सोडून वर्तमानात आनंदाने जगायला शिका ..

हर घड़ी बदल रही है रूप ज़िंदगी
छाँव है कभी कभी है धूप ज़िंदगी
हर पल यहाँ जी भर जियो
जो है समा कल हो ना हो !!

डॉ. स्वाती अनिल मोरे
कांदिवली पूर्व

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED