Premgandh - 22 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमगंध... (भाग - २२)

आपण मागच्या भागात पाहीलं की अजयची आई सगळ्यांना अजयच्या बाबांची सगळी गंमत सांगत होती. आणि श्रीरामपूरमध्ये राधिकाची आत्या कुसूम आणि तीचा मुलगा गोविंद यांचं राधिकाच्या घरी जाऊन तिला लग्नाची मागणी घालण्याविषयी त्यांचं बोलणं होते. राधिकाच्या घरी खूप आनंदी वातावरण असते. तिच्या बाबांची तब्येत बरी होते आणि ते कामाला जाण्याविषयी बोलतात.... आता बघूया पुढील भागात काय होते ते.....

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

राधिकाच्या बाबांची तब्येत पण आता एकदम बरी झाली होती. ते पण आता नियमितपणे त्यांच्या कामावर जात होते. राधिकाचे शाळेचे दिवस पण छान चालले होते. आज सकाळपासूनच राधिकाच्या घरात मेघा मीराचा गोंधळ चालू होता. दोघीही एकमेकींना कोणत्याही गोष्टीवरून चिडवत होत्या. आणि सगळे दोघींची गंम्मत बघून हसत होते.

मेघा -: "मीरू, तू किती भित्री भागूबाई आहेस गं..... थोडासा अंधार पडला तरी घरातून बाहेर निघत नाहीस तू. जशी काय बाहेरची सगळी भूतं येऊन तूझ्यावरच उडून पडणार आहेत की काय? एवढी घाबरतेस..." ती हसतच म्हणत होती.

मीरा -: "मी नाही घाबरत अंधाराला कळलं ना. मी एकटीपण येऊ शकते अंधारातून. तूच तर एक भूत आहेस आणि एक भूत सोबत असताना दुसऱ्या भूताची भिती कसली. तूला बघूनच भूत पळून जाईल..." तीचं ऐकून सगळे खूप हसू लागले.

मेघा -: "काय बोललीस तू, मी भूत? आणि अंधारात कशी माझ्याच हाताला घट्ट पकडून ठेवतेस...? मेघू मला अंधाराची खूप भिती वाटतेय गं. चल ना लवकर घरी. घरी येईपर्यंत तीचा हात सुटत नाही माझ्या हातातून एवढी घाबरतेस आणि मलाच भूत म्हणतेस? थांब बघतेच तूला आता मी... " आणि ती घाबरण्याची अ‍ॅक्टींग करून तोंड वेडंवाकडं करून बोलत होती आणि मीराच्या मागे पळत होती. मीरा धावतच राधिकाच्या मागे जाऊन लपली.

मीरा -: "ताई, वाचव ना मला. बघ ना मेघू मारतेय मला."

राधिका -: "किती मस्ती करताय गं तुम्ही. लहान आहेत का आता मस्ती करायला?"

मेघा -: "ताई, हिला सांग ना तू, हिच मला भूत बोलतेय."

आई -: "दोघी बहीणी भूतच आहेत तुम्ही. तुम्हाला दोघींना बघूनच भूत पळून जाईल. इथे आम्हीच घाबरतो तुम्हाला दोघींना तिथे भुताची काय बिशाद... आणि सकाळीच मस्ती चाललंय दोघींची. रोजचंच झालंय हे तुमचं दोघींचं. चला जा आवरून घ्या पटापट दोघींनी पण, नाहीतर पाठीत धपाटे देईन दोघींना पण..." आई दोघींना ओरडतच म्हणाली.

बाबा -: "अगं कशाला ओरडतेस दोघींना. करतात मस्ती करू दे.... अशा त्यांच्या गमतीजमतीमुळे तर घर भरलेलं वाटते... असू दे करू दे मस्ती त्यांना."

मेघा -: "हो ना बाबा खरंच ना. तुम्हीच आमचे लाड करतात. नाहीतर आई नुसती ओरडतच असते आम्हांला."

आई -: "मग काय तुमच्या दोघींची आरती ओवाळू का? कधी कोणाची काय मस्करी करतील तुमचं दोघींचं काही सांगता येते का? काही नेम नाही तुमच्या दोघींचा कधी काय करतील ते..."

बाबा -: "जाऊ दे गं, झालं ते झालं. अजयरावांची पण काही तक्रार नाही ना यांच्याबद्दल मग झालं तर... उगाच कशाला पोरींना ओरडतेस ?"

आई -: "हो तुम्ही तुमच्या पोरींचीच बाजू घ्या. काही केलं तरी ओरडू नका त्यांना..."

मेघा -: "आई, तूच फक्त ओरडतेस आम्हाला. बघ बाबा पण आमच्याच बाजूने बोलतात आणि आता अजय जीजूपण आमच्याच बाजूने बोलतील बघ तू..." ती हसतच म्हणाली.

आई -: "हो का? ये अशी माझ्यासमोर ये, देते एक पाठीत धपाटा तुझ्या, मग बरोबर कळेल तूला..." तशा मेघा मीरा पळतच सुटल्या आणि धावताधावता मेघाने मीराचे केसच ताणले.

मेघा -: "आता यापुढे तूला बघतेच मी कशी काय एकटीच अंधारात येते ते... तूला एकटीलाच टाकून धावतपळतच घरी येणार आहे मी. मग नेतील सगळी भूतं तूला पकडून. मग रहा तिथेच जोरजोरात ओरडत, मेघू मला भूतांपासून वाचव, मेघू मला भूतांपासून वाचव, असं ओरडत..." ती हसतच म्हणाली.

मीरा -: "मी बाबांना बोलवेन ना मग मला घ्यायला..."

मेघा -: "बाबा येईपर्यंत ती भूत तूला कुठेतरी दूर परग्रहावर घेऊन जातील. मग काय करशील?" ती चिडवतच म्हणाली. त्यांची दोघींची पुन्हा मस्ती चालू झाली.

आई -: "परत चालू झाली का तुमची मस्ती? चला निघा दोघींनी आवरून घ्या पटापट." आई त्यांच्यावर हात उगारतच पुढे गेली. आईला बघून दोघीही आवरायला निघून गेल्या.

आई - "खरंच दोघींची मस्ती इतकी वाढलंय ना आता, की यांना ओरडूनच माझा घसा सुकतो. पण या दोघी काही ऐकत नाहीत." राधिका, सोनाली, बाबा आईच्या बोलण्यावर हसत होते.

आई - "हो तुम्ही फक्त हसायचंच काम करा बस..."

राधिका - "अगं आई, कशाला उगाच त्रागा करून घेतेस. त्या दोघींची मस्ती चालूच असते घरात माहीती आहे ना तूला."

बाबा - "हो ना... तेच तर समजावून सांगतोय कधीशी तुझ्या आईला... पण ती ऐकतेय कुठे ?"

राधिका -: "आई, जाऊ दे चल... त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तू आणि आता मला पण उशीर होतोय. मी पण निघतेय आता... बाबा येते चला मी..."

बाबा - : "हो सवकाश जा आणि काळजी घे स्वतःची..." आणि राधिका शाळेत यायला निघाली.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗

अजय आणि अर्चना दोघेही बाईकवरून येत होते. रस्त्याने शाळेची मुलं पण चालत येत होती. त्यांच्यामध्येच एक आजीबाई डोक्यावर टोपलं घेऊन हळूहळू चालत येत होती. त्यांच्यामागूनच जोराचा कर्कश्श हाॅर्न वाजवत एक सफेद रंगाची स्काॅर्पिओ भरधाव येत होती. हाॅर्नच्या आवाजाने सगळी मुलं रस्त्याच्या कडेला जाऊन उभी राहिली आणि अजयने पण आपली बाईक साईडला घेतली. तो त्या गाडीला बघू लागला. त्याने पाहीलं तर ती आजी हळूहळू चालत होती आणि बरोबर तिच्या मागेच येऊन ती गाडी तीला काॅर्नरला थोडीशी टच करून पुढे गेली. आजी जोराची ओरडली आणि त्या धक्याने आजी रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली. हे बघून अजय जोराचा ओरडला.

"अरे ऐऽऽऽ डोळे फुटलेत का रे तुझे. दिसत नाही का रे तूला. आंधळा झालायस का?" अजय हात वर करून त्या गाडीवाल्याला ओरडूनच बोलत होता.

तो आणि अर्चना धावतच त्या आजींजवळ गेले. आजी तिथे विव्हळत पडली होती. तिच्या हातापायांना, डोक्याला लागलं होतं. अर्चनाने पटकन त्या आजींना उठवून पाणी पाजलं.
पण पाणी पीता पीता ती आजी बेशुद्धच पडली.

अर्चना - "अजय, यांना आपल्याला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल."

अजय - "हो चल पटकन घेऊन जाऊया..." आणि त्याने आजीला उचललं. आजूबाजूला बरीच गर्दी जमली होती. त्यांतल्या काही माणसांनी अजयला मदत केली. आणि एका गाडीत आजींना बसवलं. आणि ते आजीला हॉस्पीटलमध्ये घेऊन जायला निघाले.

पण तेवढ्यांत मागून अजयला कोणीतरी पकडलं आणि खेचलं.

"काय रे फार माज आलाय का रे तूला... कोणावर एवढा ओरडून बोलतोस तू.... माझ्यावर....? किती ओळखतोस रे तू मला...? मी कोण आहे तूला माहीती तरी आहे का?"

अजयने पाहीलं तर एक भरपूर दाढीमिशा वाढलेल्या, लालभडक डोळे, बोलताना तोंडाचा दारूचा वास येत होता.... अजयला तो माणुस गुंड प्रवृत्तीचा दिसत होता.
अजयने त्याचा हात जोराचा झटकला.

"कोणी कोण का असेना तू? मला काय गरज आहे तूला ओळखायची? रस्त्याने येणारी जाणारी माणसं दिसत नाहीत का रे तूला? डोळे फुटलेत का रे तुझे? दारू पिऊन चालवतोस का तू गाडी? तुमच्या अशा वागण्याने निरपराध लोकांचे जीव जातात.... थोडीतरी लाज बाळगा जरा..." अजय चिडूनच म्हणाला.

"कोणाची लाज काढतोस रे तू? लायकी आहे का तुझी माझी लाज काढायची? अशा म्हातार्‍यांना गरज काय आहे बाहेर फिरायची... बसायचं ना घरात गपचूप... आणि या म्हतारी वरून मला एवढा बोलतोस का रे तू? रातोरात तूला या शहरातून गायब करेन लक्षात ठेव तू... माझ्या नादाला लागू नकोस तू.... मी कोण आहे कळेल तूला लवकरच... आता जरा मी घाईत आहे म्हणून निघतोय.... आता सोडतोय तूला... पुढच्या वेळेस परत आलास ना माझ्या वाटेत तर जिवंत सोडणार नाही तूला लक्षात ठेव...." तो माणूस रागारागाने बोलत होता.

"नंतरची कशाला वाट बघतोस? आत्ताच सांग तू कोण आहेस ते? कोणत्या मंत्र्याचा, की कोणत्या महाराजाचा मुलगा आहेस तु सांग चल.... आणि ठार मारण्याच्या धमक्या कोणाला देतोस रे तू? दाखव चल माझ्या केसांना हात तरी लावून दाखव तू.... नाय तूला इथेच आडवा पाडला ना तर नावाचा अजय नाही मी..." तो पण रागातच पुढे जात म्हणाला.

अर्चना खूपच घाबरली. तीचे हातपाय पण थरथरू लागले होते. तिने अजयला मागेच खेचलं.

"अरे अजय, जाऊ दे ना प्लीज, तू कशाला त्या माणसांच्या मागे लागतोस? चल तू आजीला दवाखान्यात न्यायचं आहे आपल्याला." अर्चना थोड्या रडक्या आवाजातच म्हणाली.

त्या माणसाला पण त्याची दोन माणसं पकडून घेऊन जात होती.

"भाई, चलो ना, ऐसे छोटे छोटे झगडे तो रोज के होते रहते है। सुबह सुबह क्यो खालीपीली दिमाख खराब कर लेते हो आप। और पता है ना अपून को किसी इम्पाॅर्टंट काम से जाना है। चलो निकलते है। इस को बाद में देख लेंगे।" आणि ती माणसं त्याला खेचतच घेऊन गेली.

"नंतर हिशोब करतो तुझा सगळा एकदाच..." तो रागातच अजयला बोलत निघून गेला.

"बरं बघू कोण कोणाचा हिशोब करतो तो?" अजय पण रागानेच बोलला. अर्चनाने त्याला गाडीत नेऊन बसवलं. आणि ते आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

पण या माणसांच्या गर्दीमध्येच उभी राहून राधिका हे सगळं बघत होती. त्या माणसाला बघून तिची पुढे जाण्याची हिम्मतच होत नव्हती. म्हणून ती तिथेच उभी राहून सगळं बघत होती. आज पहिल्यांदाच अजयला तिने एवढं चिडलेलं पाहीलं होतं. नेहमीच शांत, समजदार दिसणारा अजय आणि आजचा अजय तिला खूप वेगळा भासत होता. तीला त्याचं हे रूप बघून मनात खूप सारे विचार घोंघावत होते. हळूहळू सगळे आपापल्या मार्गाने निघून गेले. ती पण शाळेत निघून आली.

अजय आणि अर्चना आजीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डाॅक्टरने त्यांच्यावर व्यवस्थित उपचार केले. आज दोघेही काळजीपोटी त्या आजीजवळच थांबले होते. त्या शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांच्या घरच्यांबद्दल विचारपूस करून त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. सगळ्या नातेवाईकांनी आणि त्या आजीने दोघांनाही भरभरून आशिर्वाद दिले. अजय आणि अर्चना शाळेत यायला निघाले. पण अर्चना त्याच्याशी काहीच बोलत नव्हती. अजयच्या ते लक्षात आले.

"आज माझ्या बहिणाबाई माझ्यावर रूसल्यांत का?" तो हसतच म्हणाला.

"अजय, आज तू पुन्हा तीच चूकी करायला जात होतास. जी काही वर्षांपुर्वी केली होतीस..." बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणीच आलं. अजयला तीच्या असं डोळ्यांत पाणी बघून खूप वाईट वाटलं.

"साॅरी अर्चू, त्यावेळी मी काही करू शकलो नाही गं. माझ्यामुळे आपल्या घरामध्ये खूप काही गोष्टी घडून गेल्यांत, विसरलो नाही मी... पण आता वेळच तशी होती गं म्हणून बोलावं लागलं मला.... नाहीतर तुमच्या सगळ्यांच्या मनासारखंच वागतो ना मी... तसं वागणं मी सोडुन दिलंय माहीती आहे ना तूला.... बदललोय गं मी आता आईबाबांसाठी, तुमच्यासाठी...." तो तिला समजावत म्हणत होता.

"बरं ठिक आहे.... पुन्हा असं करू नकोस प्लीज.... आईबाबांना आणि राधिकाला माहीती पडेल तर काय उत्तर द्यायचं ते तूझं तू ठरव.... याबाबतीत तुझी मी काहीच मदत करणार नाही..." अर्चना त्याला रागवतच म्हणाली.

"बरं बहिणाबाई, त्यांना काय, कसं बोलायचं ते बघतो मी..." अजय म्हणाला.

दोघेही शाळेत येऊन पोहोचले. सगळे शिक्षक त्यांच्याकडे सगळी चौकशी करू लागले. पण राधिका मात्र दोघांशीही न बोलताच आपल्या वर्गात निघून गेली. अजय आणि अर्चनाने ते पाहीलं. तिच्याशी नंतर बोलू हा विचार करून तेही दोघं आपापल्या कामाला लागले. आज राधिकाचं कशातच मन लागत नव्हतं. सारखा तो सारा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येत होता.

क्रमशः-

(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)

[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]

🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹

💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - २२

➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED