Gift from stars - 1 books and stories free download online pdf in Marathi

नक्षत्रांचे देणे - १

{क्षितिज आणि भूमी...

जी भेटूनही न भेटणारी, एकत्र असूनही विभक्त. अशी दोन टोक. पण या विशाल पोकळीतील नक्षत्रांनी त्यांच्या नशिबी एक भेट लिहिलेय. खूप दूर गेल्यावरही त्यांचे स्टार्स त्यांना पुन्हा पुन्हा एकत्र आणतात. इथे नक्षत्रांनी घडवून आणलेल्या अशाच अनपेक्षित भेटीमुळे सुरुवात होते एका प्रेमकथेची, या दोन व्यक्तिरेखांची एक हळुवार गुंतलेली प्रेमकथा घेऊन येत आहे, माझी हि दीर्घ कादंबरी...'नक्षत्रांचे देणे.'}


गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे

माझ्या पास आता कळया, आणि थोडी ओली पाने….

'दूर कुठे, क्षितिजापलीकडे कर्णमधुर सूर उमटू लागले होते. अगदी दूरवरून... अस्पष्ट आणि अर्धवट... जणू अस्ताला गेलेला तो सोन्याचा गोळा आणि त्याच्या विरहाच्या कल्पनेने तांबूस लाल झालेली ती धरणीमाय, हे दोघे मुद्दामहून हे गाणं ओढून आणून मला ऐकवण्यात प्रयत्न करत असावेत. माझ्या आयुष्यातील न उमललेल्या कळ्या तर मी केव्हाच फेकून दिल्या, पण ओली पाने... त्यांचं काय करू? इथेच कुठेतरी अर्पण करावी ती… या ओघळणाऱ्या दवबिंदूंच्या साक्षीने आणि मग मुक्त हस्ताने परतून जावं, आपल्या वाट्याला आलेल्या विवंचनेत.'

'ती शेवटची आठवण होती. बाकी सारे दुवे तर आपसूकच मिटून गेले होते. फोटो ऑल्बम मधील एकेक फोटो काढून त्याचे तिच्या मनाला समाधान होईल इतपत असंख्य तुकडे-तुकडे करून तिने ते समुद्रात फेकून दिले. आपल्यामध्ये सामाहूनही त्या जलाशयाला त्याच्या विनाशापर्यंत ते फोटोंचे तुकडे एकत्र करणे शक्य होऊ नये. जणू आठवणींच्या चिंधड्याही तिला जिवंत ठेवायच्या नव्हत्या. सारे जुने दुवे, जुन्या व्यथा आणि साऱ्या आठवणींची गाथा तिने कायमची विलीन केली.'

'खाली पांघरलेले मऊशार पुळण त्यावर डाव्या हाताची उशी करत ती तिथेच आडवी झाली. लुकलुकणारी नक्षत्रे कायमच तिच्या सोबतीला असायची. बाबा लहानपाणीच गेले, आईने तर तिच्या मांडीवर डोळे मिटले. म्हणाली होती, "जाते मी आता, बाळ काळजी घे ह."

लहानगा जीव तो. तिने प्रश्न विचारला, "आई कुठे जातेस?"

तेव्हा जाता-जात ती सांगून गेली होती. "मी दूर कुठेतरी, अगदी वर, ज्याला न शेवट ना सुरुवात अश्या पोकळीमध्ये विलीन व्हायला जाणार आहे. तुला आठवण येईल तेव्हा वर पहा. असेन मी, पण दिसणार नाही. एवढे दिवस आपन दोघी एकत्र राहायचो. तिथे बाबा एकटेच राहतात ना. आता मी त्यांच्या जवळ जाते."

तिने परत विचारलं, "आई, मी येते ना तिथे तुझ्यासोबत."

" नको. तू इथेच राहा. बाबा म्हणायचे ना, 'दूर कुठून, त्या नक्षत्रातून तुला न्यायला कोणी राजकुमार येणार.' तू आमच्या सोबत आल्यावर तो काय एकटाच राहणार इथे. तू त्याच्या सोबत राहा." म्हणत आईने तिच्या तोंडावरून मायेने हात फिरवला , तोच शेवटचा हात गालावरून फिरला. नंतर मात्र असा मायेचा हात फिरवणारे कोणी मिळाले नाही. मग तिला वाटायचं आई खोटं बोलायची वाटत.

'त्याच अगाध पोकळीकडे पाहून ती आज आईला शोधत होती, नेहमीप्रमाणे. मग ठरलेलं असायचं, एकमेकांच्या अगदी जवळ चमकणारे दोन तारे शोधून त्यांच्याशी तिच्या मूक गप्पा रंगल्या. फक्त हातांचा सवांद आणि मनाची भाषा ती देखील एकतर्फी. बाकी शेवट ठरलेला असायचा. डोळ्याच्या कडांमध्ये दोन-चार समाधानाचे अश्रू चमकले नाही तोच फोनची बेल वाजायची." भूमी| कोठे आहेस? खूप उशीर झाला ग."

"माई मी निघतेच आहे."

"संपलं का ग नाटक? कोणतं होत?" माईचा ठराविक प्रश्न आणि तिचे ठरलेले उत्तर, "नक्षत्रांचे देणे."

माईची स्मुर्ती जाऊन दोन वर्षे झाली. त्यांना काय कळणार ते. त्या आपल्या फोन ठेवून द्यायच्या आणि त्यांना काही कळल नाही, या आनंदात भूमी घराकडे यायला निघायची.

*****

'लाकडी फाटक ओलांडून भूमी घराकडे परतली. आयुष्यात कितीही दुःख असो, कितीही यातना पण एकदा अंगणात प्रवेश केला कि तिला प्रसन्न वाटे, बाजूच्या जाई-जुईच्या फुललेल्या बागा आणि अनंताचे घोसच्या घोस मनाला मोहून टाकत. इथे आल्यापासून स्वतः देखभाल करून वाढवलेली हि फुलझाडं तिच्या आनंदाचे एकमेव कारण होते. समोरच्या पडवीत असलेल्या लोखंडी झोपाळ्यावर माई आणि नाना वाट बघत बसलेले होते. त्यांना पाहून हसत भूमीने घरात प्रवेश केला. हातातील भाजके चणे आणि खरे शेंगदाणे याच्या पुड्या नानांच्या हातावर टेकत ती आत वळली.

" माई जेवण लावते, या आत."

" रोज रोज कशाला आणते ग ते चणे शेंगदाणे? त्यासाठी त्या चौपाटील जाव लागत असेल ना? म्हणून उशीर होतो तुला." माई दटावत म्हणाल्या.

"असुदेत ग. मला आवडतात म्हणून माझ्यासाठी आणते ती. तू नको खात जाऊ." मिष्कीलपणाने हसत-हसत नाना आपल्या चष्म्याच्या कडांमधून माईकडे बघून खोटं-खोटं रागावले. माईही तोंड वाकड करून मान वाळवून फुगून बसल्या. त्यांना मनवून हाताला धरून आत नेऊन जेवायला बसवताना भूमीला त्या दोघांचा खूप हेवा वाटे. ६०-७० च्या घरातही एकमेकांवर राग-लोभ आणि रुसवे-फुगवे, यालाच तर प्रेम म्हणतात. एकमेकांची साथ देत, आयुष्यात आलेले प्रत्येक क्षण ते आंनदाने जगत होते. अजून काय पाहिजे आयुष्यात? हेच तर खरे सुख आहे.

वाजणाऱ्या फोनमुळे भूमीची तंद्री भंग झाली. तिले उठून रिसिव्हर कानाला लावला. आणि दुसऱ्याच क्षणी काही न बोलता नानांच्या हातात दिला. परदेशातून विभासचा फोन होता. आपल्या मुलाची काळजीपूर्वक चोकशी करत करत नाना आणि माई जेवू लागली.

"अजून रागावलेस का ग त्याच्यावर? काही बोलली नाहीस फोनवर." म्हणत माईंनी फोन ठेवला आणि जेवता जेवता भूमीला जोराने ठसका लागला.

"नाही माई, असं काही नाही."

" आपल्या समोर लाजते गं ती. त्यांचं फोनवर बोलणं होतच असणार. आपल्याला सांगणार आहे का." नाना उगाचच भूमीला चिडवू लागले आणि माई देखील हसू लागल्या. आता हसण्याला पार्याय नाही, म्हणून भूमी देखील त्यांच्या हास्य मैफिलीत सामील झाली. कधीकधी अशाच प्रसंगी, आपण कशावर हसतोय? स्वतःवर कि नशिबावर? याचा विचारही न करता ती हसत असे.

------------------------------------------------------

क्रमशः
( कथा कशी वाटते? हे आपल्या प्रतिसादातून नक्की कळवा. पुढील प्रत्येक भाग दोन दिवसाआड प्रकाशित केला जाईल.)

'' मनाचिये गुंती ''

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED