नक्षत्रांचे देणे - ९ siddhi chavan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नक्षत्रांचे देणे - ९

'एक मारुती भरधाव वेगात निघाली होती. मागोमाग एक काळी ह्युंदाई कार तिचा पाठलाग करत होती. पाठलाग जवळजवळ संपणारच होता एवढ्यात भरधाव वेगाने दुरून येणाऱ्या लाल-निळ्या ट्रकने मारुतीला खोल दरीत उडवून लावले. तो आपली ह्युंदाई जागीच थांबवून विद्युत वेगाने धावत सुटला, तिच्यापर्यंत पोहोचेपर्यंत फार उशीर झाला होता. कारमधून बाहेर रस्त्यावर फेकली गेलेली ती मात्र रक्ताच्या धारोळयात गतप्राण झाली होती. त्याही अवस्थेत तिला आपल्या दोन्ही हातांनी उचलून तो गदागदा हलवू लागला होता. मैथिली, मैथिली ... मैथिली डोळे उघड प्लिज.'

अंगातील शर्ट पूर्णपणे घामाने भिजला होता. बाजूला असणाऱ्या फोनची रिंग वाजली आणि क्षितिज शुद्धीवर आला. तसाच फोन कानाला लावत त्याने, आजूबाजूला लक्ष दिले.

''हैलो किर्लोकार बोलतोय. मैथिलीची तब्ब्येत अचानक बिघडली आहे, ताबडतोब मुंबईला निघून ये.''

मैथिलीच्या बाबा आणि S. K. ग्रुप ऑफ कंपनीज चे पार्टनर किर्लोस्कर यांनी उत्तराची वाट न बघता पलीकडून रागारागाने फोन ठेवला होता.

तोपर्यंत क्षितिजच्या लक्षात आले होते, की मगाशी आपण स्वप्नात होतो. बेडवरुन उठून त्याने हॉटेल रूमच्या खिडकीचा पडदा दूर केला. घड्याळात रात्रीचे तीन वाजले होते. कपाळावर जमा झालेला घाम पुसत तो तयारीला लागला. सकाळच्या सहाच्या पहिल्या फ्लाईटने मुंबई गाठायची. इमर्जन्सी बुकिंग करण्याचा मेसेज स्टाफला पाठवून तो बाथरूमच्या दिशेने निघाला.

*****

हॉस्पिटल मध्ये मैथिलीची तब्ब्येत फारच बिघडली होती. इमर्जन्सी वॊर्डमध्ये तिला दाखल करण्यात आले आणि तातडीची ट्रीटमेंट सुरु झाली. खरंतर सारं आहे-नाही मध्ये जमा झालं होत. फक्त एक वेडी आशा होती. तिने जगावं म्हणून, त्या आशेवरच मिस्टर अँड मिसेस किरलोस्कर रात्रभर हॉस्पिटल बाहेर डोळे लावून उभे होते. एवढी वर्षे फक्त तिच्या जगण्याची आस लावून बसलेले ते आईबाबा आतून मात्र आपल्या लेकीच्या भयंकर आकस्मित अपघाताने पार नाउमेद झाले होते.

*****

'भूमीला सांगून निघावे म्हणून क्षितिज तिच्या रूमकडे निघाला. खरंतर एवढ्या पहाटे तिला उठवावे हे त्याला पटत नव्हते. पण न सांगता तरी कसे जाणार? कंपनीच्या लीगल कागद्परांची ओरिजनल फाइल तिच्याकडे होती. ती सोबत घेणे गरजेचे होते, म्हणून त्याने बेल वाजवली. पलीकडून दरवाजा उघडला होता, पण भूमी आणि निधी तिथून एक तास आधीच चेक आऊट करून गेली होती. असे आतल्या वेटर्सने सांगितले. क्षितिजचा विश्वास बसेना. अशी अचानक का गेली? आधीच मैथिली सिरिअस असल्याची बातमी आणि आता भूमीचे असे न सांगता जाणे, त्याला काही पटले नाही. मागचा पुढचा कसलाही विचार न करता तो एअरपोर्ट कडे निघाला. निघताना फोन लावून त्याने मेघाताई म्हणजेच आपल्या आईला फोन लावला.'

'' बोल क्षितिज. एवढ्या पहाटे फोन? ऑल ओक ना?'' झोपेतून उठून त्यांनी फोन घेतला असला तरीही त्यांच्या आवाजात काळजी जाणवत होती.

''आई कोर्लोस्कर अंकलचा फोन होता. मैथिलीची तब्ब्येत बिघडली आहे. शी इज सिरिअस.'' त्याने पटकन गोष्ट त्यांच्या कानावर घातली.

''ओह, मी निघते आणि हॉस्पिटलमध्ये जाते. तू निघ आधी तिथून. लवकरात लवकर मुंबई गाठ.'' मेघाताईंनी बेडवरुन उठत उठत हॉस्पिटलमध्ये जाण्याची तयारी सुरु केली.

''मी निघालो, दुपारी पोहोचतो. तू आत्ताच निघ. प्लिज.'' टॅक्सी गाठून तो एरपोर्टकडे रवाना झाला.

'' हो निघते. बाय. नंतर फोन करते.'' म्हणत फोन ठेवून त्या गडबडीने तयार होऊ लागल्या होत्या.

*****

'रात्रीच निघाल्याने भूमी घरी पोहोचली सुध्या होती. निधीला तिच्या घरी ड्रॉप करून भूमी आपल्या घरी आली. माईंची तब्येत कशी काय बिघडली आणि अचानक? हेच तिला कळेना. गावावरून फोन येताच, तातडीने भूमी चंदिगढ वरून निघाली होती. 'क्षितिजला आपण सांगायला हवं होत. पण एवढ्या रात्री कसं सांगणार? तरीही त्याच्या रूमची बेल वाजवली होती आपण पण त्याने दरवाजा उघडलेच नाही. तेव्हा तो कदाचित झोपेत असावा.' तो स्वतःच्याच विचारात असताना समोर माई आणि नाना उभे असलेले तिने पहिले. तिच्याच प्रतीक्षेत होते ते दोघे. तिने सरळ जाऊन माईना मिठी मारली आणि नानांच्या पाय पडून ती त्या दोघांच्या बरोबर घरात आली. खरतर माई अगदी व्यवस्थित दिसत होत्या आणि नाना देखील. काहीतरी नक्कीच गडबड आहे हे तिने ओळखले होते. त्याशिवाय एवढ्या तातडीने तिला बोलावून घेतला होत. थोडं फ्रेश होऊन ती हॉलमध्ये आली. नाना तिचीच वाट बघत बसले होते. न राहवून तिने विचारले.

'' माई काय होतंय तुम्हाला? आता कशी आहे तब्येत?'' .

माईंना काय बोलावे ते कळेना. त्या अगदी ठणठणीत होत्या हे दिसताच होते. ''मी बरी आहे.'' एवढंच त्या बोलल्या.

'' ती अगदी बारी आहे गं. पण तुझं काय? तू आणि विभास एवढे दिवस काय लपवत आहात आमच्या पासून?'' नानांनी अगदी विषयाला हात घातला होता.

अचानक नानांनी विचारलेल्या प्रश्नाने भांबावलेल्या भूमीला काय बोलावे कळेना. ''कुठे काय नाना. काही तर नाही.'' एवढेच बोलून तिने मन खाली घातली.

''आपल्या बाजूचा समीर कालच आला आहे लंडनवरून. विभासच्या बरोबर काम करतो तो. त्याने सार काही सांगितलं आहे आम्हाला.'' नाना तिच्या शेजारी बसत म्हणाले.

''होय गं, खरं आहे का हे? आणि तुझी यात काय चूक म्हणा.'' माई तिला समजावत बोलत होत्या.

''हे बघ तू आम्हाला आमच्या मुलासारखी आहेस. तुझी तरी यात काहीही चूक नाही हे आम्हाला माहित आहे, त्यामुळे सारं काही खरंखरं सांग.''

माई आणि नानांचे बोलणे ऐकल्यावर भूमीने ओळखलं की याना समीरकडून सार काही समजलं आहे. आपण तरी का लपवून ठेवायचं. तिने देखील झाली घटना आणि त्यामुळे तिच्या आयुष्याची झालेली फसवणूक त्यांना सांगून टाकली.

'लंडनमध्ये असताना विभासने तेथील एक मुलीबरोबर गुपचूप लग्न केले होते. माई-नाना त्याला विरोध करतील या भीतीने त्यांना देखील त्याने काहीही कळू दिले नाही. एवढेच नाही तर दोन-तीन वर्षांपूर्वी इथे आल्यावर माई-नानांनी ठरवलेली मुलगी म्हणजेच भूमी तिच्याशी देखील लग्न करून तो सरळ लंडनला निघून गेला. इथे आईबाबांना सांभाळण्याचा प्रश्न आपोआप सुटणार होता. त्यामुळे त्याने भूमीची फसगत करताना मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही. वैदिक पद्धतीने लग्न झाले, त्याच दिवशी भूमीला त्याच्या पहिल्या लग्नाची गोष्ट समजली होती. माई त्यावेळी आपल्या दम्याच्या आजारावर ओषधोपचार घेत होत्या त्यामुळे नाना आणि माईंना काहीही न सांगता भूमीने शांत राहण्याचा निर्णय घेतला. आईच्या मागे अनाथाश्रमात वाढलेल्या भूमीवर माईंचा फार जीव होता. लग्न ठरल्यापासूनच त्या तिची मुलीप्रमाणे काळजी घेत होत्या. अनाथ असलेली भूमी सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून त्या घरी घेऊन आल्या. त्यामुळे आईबाबांचे अर्धवट राहिलेले प्रेम भूमीला इथे मिळाले होते. विभासच्या फसवणुकीपेक्षा ते कितीतरी पटीने मोठे होते. त्यामुळे खरी गोष्ट सांगून त्या मायेला आणि आपुलकीला मुकण्यापेक्षा भूमीने थोडं शांत राहून, उचित वेळेची वाट बघण्याचे ठरवले.'


क्रमश

https://siddhic.blogspot.com/