प्रेमगंध... (भाग - २८) Ritu Patil द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

प्रेमगंध... (भाग - २८)

(आपण मागच्या भागात पाहिलं की, अजयचं लग्न लवकरात लवकर व्हावं असं त्याच्या आईला वाटत असते. राधिका मात्र शाळेच्या सहलीला जाऊ की नये याचा विचार करत असते. तीच्या आईचा पुर्ण पणे नकार असतो पण बाबा मात्र तुम्ही बिनधास्त जा, कोणालाही घाबरुन राहायचं नाही असं बोलत असतात... कुसुम आणि सावित्रीमाय गोंविंदला सुधरवायचं कसं यावर चर्चा करतात.... आता बघू पुढे काय होते ते....)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

--श्रीरामपूर-- भालेकर वाडा---

आज कुसुमने त्यांचे ओळखीचे वकील मी. चांदेकर यांना बोलावून घेतलं होतं... तीला तीच्या संपूर्ण संपत्तीच्या सगळ्या कागदपत्रांमध्ये (वसीयतनामा) काही बदल करून घ्यायचा होता... सकाळचे अकरा वाजून गेले होते, गोविंदचा अजूनही उठायचा पत्ता नव्हता... कुसुमने बादलीत थंडगार पाणी घेतलं आणि ते गोविंदच्या अंगावरच फेकलं. तो एकदम धडपडूनच उठला.... ओरडू लागला...

गोविंद - "अंगावर पाणी कोणी टाकलं माझ्या...." तो ओरडतच बोलला.

कुसुम - "दिवसभर झोपून राहणार आहेस का? बारा वाजत आले, साहेब उठा आता..."

गोविंद - "आई वेड लागलंय का तुला? काय चालवलंस तू हे?"

कुसुम - "पटकन उठ आणि आवरून खाली ये... वकील चांदेकर साहेब आलेत. आज काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत मला. पटकन खाली ये...." गोविंद एकदम उठूनच बसला.

गोविंद - "काय, वकील? कशाला? मला न विचारता तू काय निर्णय घ्यायचं ठरवलंस?"

कुसुम - "अजूनही संपुर्ण संपत्ती माझ्या नावावरच आहे गोविंद माहीती आहे ना तूला? मग माझी मीच स्वतंत्र आहे सर्व निर्णय घ्यायला. तूला का विचारत बसू? ते निर्णय घेत असताना तू फक्त माझ्या समोर हवा आहेस... मी काय निर्णय घेणार आहे ते तूला कळायला नको का? आणि काय करायचं... काय नाही ते माझं मी ठरवेन? तू फक्त खाली ये पटकन...." ती कडक आवाजातच त्याच्याशी बोलत होती. ती खाली निघून गेली.

एवढ्या वर्षात कधीच त्याने तीला त्याच्याशी तसं बोलताना पाहीलं नव्हतं. काहीही केलं, कसंही वागलं तरी आई नेहमीच त्याच्याशी प्रेमाने वागत असते, हे त्याला ठाऊक होतं... आज अचानकच तिचं असं कठोर वागणं बघून त्याला थोडं आश्चर्यच वाटलं आणि वकील पण बोलवले होते म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील हे त्याच्या लक्षात आलं. तो पटापट आवरून खाली आला.... तिथे चांदेकर वकील, कुसुम, सावित्रीमाय आणि अजून दोन तीन माणसं बसली होती. तो पण तीथे येऊन बसला....

कुसुम - "चांदेकर साहेब, आला माझा मुलगा... चला आता कामाला सुरुवात करायची का?"

वकील चांदेकर - "हो ताई, तुम्हाला तुमच्या मुलासोबत बोलून काही ठरवायचं असेल तर ते तुम्ही ठरवू शकता... मग काय काय बदल करायचा आहे ते सांगा, आम्ही ते करतो..."

कुसुम - "नाही, त्याच्याशी बोलून काही ठरवायचं नाही मला... काय निर्णय घ्यायचा तो माझा मलाच घ्यायचा आहे. फक्त तो समोर असावा म्हणून त्याला बोलवलंय...."

वकील चांदेकर - "बरं ठिक आहे.... जशी तुमची इच्छा..."

गोविंद - "आई काय चालवलंय तू हे सगळं? आणि असं अचानकच एवढे कसले महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत तूला? ते ही मला न विचारता?"

कुसुम - "गोविंद, तूला विचारून निर्णय घेण्यासाठी मी काय तूझी बांधिल नाही... मी आता जे काही निर्णय घेणार आहे ते सर्व तूला मान्य करावेच लागतील, कळलं..." ती कडक आवाजातच बोलत होती.

गोविंद - "पण आई आपलं ठरलं होतं ना की राधिकासोबत माझं लग्न झालं की सर्व संपत्ती तू माझ्या नावावर करून देणार आहेस असं..."

कुसुम - "हो तसं ठरलं होतं, पण आता ते शक्य नाही... राधिकासोबत तूझं लग्न नाही होऊ शकत...."

गोविंद - "म्हणजे? तूला काय म्हणायचं आहे?"

वकील चांदेकर - "हे बघा गोविंद साहेब, तुमचे काही वैयक्तिक मतभेद आहेत, त्यांवर तुम्ही नंतर चर्चा करू शकता, आता सध्या आपल्याला तुमच्या प्राॅपर्टी विषयी काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत ते काम आपण पुर्ण करूया...." ते खूप शांतपणे बोलत होते.

कुसुम - "गोविंद त्या विषयावर मी तुझ्याशी नंतर बोलते, आता जे काम करायचं आहे ते करू,..." गोविंद शांत बसला.

वकील चांदेकर - "हे तुमच्या प्राॅपर्टीचे कागदपत्र, एकदा बघून घ्या..." कुसूमने ते कागदपत्र सगळे तपासून पाहीले.

कुसुम - "चांदेकर साहेब, खरं तर ही सगळी संपत्ती माझा लहान भाऊ नामदेवरावांची आहे... खरं तर माझा कींवा माझ्या मुलाचा काहीच हक्क नाही या संपत्तीवर... काही वर्षांपूर्वी माझा भाऊ इथून घरदार, शेतीवाडी सगळं सोडून दुसरीकडे राहायला गेला आणि मी स्वतःच सर्व संपत्ती नावावर करून घेतली होती, पण आता ह्यातलं मला काहीच नकोय... ही सर्व संपत्ती मी स्वखुशीने माझ्या भाऊच्या नावावर करायची आहे...." हे सर्व ऐकताच गोविंदच्या तळपायाची आग मस्तकात गेली, तो ताडकन उठला आणि आईवर चिडला....

गोविंद - "आई काय चाललंय तुझं हे? वेड लागलंय का तूला? एवढे वर्ष फक्त माझ्यासाठी जपून ठेवलेली संपत्ती तू अशीच नाम्या मामाच्या नावावर करून देणार आहेस का? काय झालंय तूला? त्याच्या नावावर सगळं करून देणार मग मी काय करणार? वाडगं घेऊन दारोदारी भिक मागत फिरू का?" तो ओरडूनच बोलत होता...

कुसूम - "गोविंद, आवाज खाली करून बोलायचं... इथे ओरडायचं काम नाही... आणि तूझ्यासाठी आहे ना ती नदिकाठची जमीन जिथे तू दारूचा बार चालवतोस.... ती पण भरपूर जागा आहे. तिथे तू स्वतःसाठी चांगलं घरदार बांधून शेतीवाडी पण करू शकतोस आणि ती जागा तर तूझ्याच नावावर आहे.... त्या जागेवर काय करायचं ते करू शकतोस तू. पण ह्या संपत्तीवर तुझा किंवा माझा काहीच अधिकार नाही, हे सगळं आहे ते फक्त आणि फक्त नाम्या मामाचं आहे आणि ते फक्त त्यालाच मिळणार... कळलं...."

गोविंद - "एवढे वर्ष तर कधी तूला नाम्या मामाचा विचार नाही आला आणि आता असं अचानकच त्याचा इतका पुळका का आलाय तूला? तू काय डोक्यावर पडलयंस का?" तो रागातच म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून कुसुमने जोरातच त्याच्या कानाखाली मारली. त्याने गालावर हातच ठेवला.

कुसुम - "आधी पडली होती डोक्यावर पण आता माझं डोकं पुर्णपणे ठिकाणावर आलंय... काय उपयोग आहे तुझ्यासाठी एवढं करून तरी? तू एक गुंडमवाली, दारू पिऊन धिंगाणा घालणारा बेवडा आणि तुझ्या हातात ही सगळी संपत्ती देऊ का? तुझ्यावर आता मला अजिबातच विश्वास राहिलेला नाही. तुझं आता खुपच अती व्हायला लागलंय... ज्या आईने तुझ्यासाठी एवढं काही केलं, तीलाच तू धमक्या देतोस... आणि दारूच्या नशेत आणखी पुढे तू काय करशील याचा भरवसा नाही तुझा... म्हणून ही सारी संपत्ती योग्य हातात जाणे गरजेचे आहे... या संपत्तीचा जो खरा वारसदार आहे त्याला सारी संपत्ती मिळाली की माझ्या जबाबदारीतून मोकळी होऊन जाईन..."

गोविंद - "आई त्यादिवशी मी तुला रागात बोललो होतो. आणि इतके वर्ष झाले दारू पितो मी तेव्हा तर काही बोलली नाहीस तू, आताच का अशी बोलतेस?"

कुसुम - "गोविंद माझा तूला गुंडगिरी, दारू पिणे आणि जो तू नदीकाठी बार टाकलायस ना त्या सगळ्याच गोष्टींना माझा नेहमीच विरोध होता. पण तू काही सुधरत नाहीस... आता खूप अति होत चालंलय म्हणून आता योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ आलेली आहे..."

गोविंद - "आई हा निर्णय घेण्याअगोदर आणखी एकदा विचार कर आणि नंतर काय तो निर्णय घे."

कुसुम - "मी पुर्ण विचार करूनच निर्णय घेतलाय हा."

गोविंद - "एवढं सगळं नाम्या मामाच्या नावावर करत आहेस पण तोच तुझा भाऊ लोभापायी तूला तुझ्याच घरातून हाकलून काढेल... भीक मागायची वेळ आणेल तूझ्यावर..."

कुसुम - "संपत्तीचा लोभ कोणाला आहे आणि कोणाला नाही हे मला चांगलं ठाऊक आहे. आणि अजून आता मला तुझ्याशी वाद घालत बसायचा नाही... शांत बसायचं असेल तर बस नाहीतर चालता हो इथून..."

गोविंद - "आज स्वतःच्या पोटच्या पोराला घराबाहेर काढत आहेस, ज्या भाऊचा एवढा पुळका येतोय ना तूला उद्या तोच तूझा भाऊ तूला घरातून हाकलून काढेल... तेव्हा येशील माझ्याजवळच रडत रडत...." तो रागातच बोलत होता.

कुसुम - "एकवेळ तू पोरगा असून मला संपत्तीच्या लोभापायी मला घरातून हाकलून काढेल पण माझ्या भावाला चांगलं ओळखते मी... आयुष्यभर पायाशी बसून माझी सेवा करेल आईसारखी पण तो नखभर पण मला दुखावणार नाही..."

गोविंद - "वाह... वाह... स्वतःच्या पोराला सोडून भावावर एवढा विश्वास...? कर तुला काय करायचं ते. मी पण बघणार आहे, तो तूझा भाऊ या घरात पाय कसा ठेवतो ते? आणि काय म्हणालीस राधिकाशी माझं लग्न होणं शक्य नाही असं ना? भ्रम आहे तो तुझा... बघच मी काय करतो ते... हि सगळी संपत्ती पण माझी असेल आणि राधिकापण माझी बायको असेल... बघच तू मी काय करतो ते..." कुसुमला त्याचं ऐकून रागच आला. तीने रागानेच त्याच्या कपड्यांनाच पकडलं आणि त्याला खेचतच घराबाहेर घेऊन गेली आणि जोरात ढकलूनच दिलं... त्याने पडतापडताच स्वतःला सावरलं....

कुसुम - "चालता हो इथून, परत या घराची पायरी चढायची नाहीस तू... या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झालेत लक्षात ठेव..." ती रागातच म्हणाली.

गोविंद - "आई खूप चुकीचं पाऊल उचललंस तू... भाऊप्रेमाचं भूत चढलंय ना डोक्यावर तुझ्या, उतरेल लवकरच... सोडणार नाही मी कोणालाच... तू माझी आई आहेस हे पण आता विसरून जाईन मी..." तो रागात लालबुंद होऊन बोलत होता आणि रागातच गाडी घेऊन निघून गेला..."

कुसुमने सगळी संपत्ती राधिकाच्या बाबांच्या नावावर करून टाकली... आलेले वकील वैगरे सगळे निघून गेले.

कुसुम - "सावित्रीमाय, आज मन आणि शरीर पण खूप हलकं हलकं वाटतेय बघ... डोक्यावरचा सगळा भार कमी झाल्यासारखा वाटतोय मला... माझ्या कर्तव्यापासून आता मोकळी झाली मी... खूप बरं वाटतेय मला..."

सावित्रीमाय - "हो खरं आहे तुझं कुसमे... तू अगदी योग्य तेच केलंस... या संपत्तीवर ज्याचा खरा अधिकार होता, त्याच्या नावावर केलंस तू सगळं... खूप छान केलंस तू कुसमे... नाम्या आपल्या गावात यायला नाही नाही म्हणतोय पण आता नाम्याला एक न एक दिवस आपल्या मायदेशी परतावंच लागेल..."

कुसुम - "हो माय, आणि त्या दिवसाची मी खूप आतूरतेने वाट बघत आहे..." तीच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

सावित्रीमाय - "मी पण त्याच दिवसाची वाट बघत आहे... ते सगळे आले की घराला खरं घरपण येईल बघ कूसमे... घराला जिवंतपणा येईल...."

कुसुम - "किती लाखमोलाची गोष्ट बोललीस गं माय तू..."

-------------------------------------------------------------

गोविंद रागातच गाडी चालवत गोविंद बार समोर येऊन थांबला... कुसुमचा सक्त विरोध असतानाही नदीपासून काही अंतरावर त्याने स्वतःच्या नावावर काही एकर जमीन घेऊन तिथे बार रेस्टॉरंट बांधलं होतं... कुसुमला ते अजिबातच आवडलं नव्हतं... पण तिचं न ऐकता तो हे बार चालवत होता.

तो रागातच गाडीतून खाली उतरला... तिथून एक वेटर ग्लास बाॅटल घेऊन जात होता. चालता चालताच गोविंदचा त्याला धक्का लागला... त्या वेटरच्या हातातून तो वेटर खालीच पडला. बाॅटल ग्लास फुटले... तो वेटर घाबरला. तो अगोदरच खूप चवताळला होता... गोविंदने त्याला रागातच पकडलं आणि रागातच मारमारमारलं. त्याच्या माणसांनी त्याला कसंतरी सावरायचा प्रयत्न केला... पण रागातच तो त्यांच्यावर पण हात उचलू लागला...भीम्या त्याला दुरूनच बघत होता. भीम्या त्याचा खास माणूस आणि लहानपणापासूनचा लंगोटी यार... त्याचं गोविंद सगळं ऐकायचा... भीम्या धावतच आला आणि त्याला समजावून पकडून घेऊन गेला... त्याला वरती रूममध्ये घेऊन गेला आणि शांततेने काय झालं ते विचारलं... गोविंदने रागारागातच भीम्याला सगळं सांगितलं, भीम्याने सर्व शांतपणाने ऐकून घेतलं..."


क्रमशः-

(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)

[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]

🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹

💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - २८

➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀