सा य ना ई ड - (भाग ६) Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सा य ना ई ड - (भाग ६)

सा य ना ई ड

प्रकरण ६

पोलीस स्टेशन मधे आल्यावर खून,हत्या, वध अशा विषया संबंधित विभागात पाणिनी आला.दार ढकलले आणि आत आला. “ इन्स्पे. तारकर आहे का आत? दारावरच्या हवालदाराला त्याने विचारले.इन्स्पे. तारकर आणि पाणिनी जिवाभावाचे मित्र होते पण दोघांचे कामाचे स्वरूप परस्परांशी विरोधी असल्याने,त्यांच्यात कायम वाद होत असत. दोघेही आपल्या कर्तव्यात कसूर करत नसत. तत्वाचा प्रश्न येई तेव्हा मैत्री बाजुला ठेऊन भांडणे करीत. पाणिनीने स्वतःच्या हुशारीने सोडवलेल्या अनेक प्रकरणात यशाचे श्रेय तारकर ला दिले होते पण त्याचा बोभाटा केला नव्हता. याची सुप्त जाणीव तारकर ला होती आणि त्या मुळे पाणिनी विषयी त्याला आदर होता आणि त्याच वेळी नको त्या प्रकरणात पाणिनी स्वतःला अडकूवून घेतो आणि पोलिसांना सहकार्य करत नाही अशी त्याची पाणिनी बद्दल तक्रारही होती.

“ बघतो मी.” हवालदार म्हणाला. “ काय नाव आहे तुमचे? ... अरे, तुम्ही आहात होय !“

“ हो मीच आहे ! “ आणखी कोण असणार? “

“ थांबा जरा “ हवालदार म्हणाला आणि आत गेला.

एक साध्या कपड्यातील पोलीस आतून लगबगीने बाहेर आला ऑफिस ओलांडून दारातून बाहेर गेला,पण दुधी काचेतून त्याची प्रतिमा दिसत होती त्यावरून तो निघून गेला नसून दारातच वाट अडवून उभा होता असे दिसत होते.

थोड्या वेळाने,आत गेलेल्या हवालदाराने दार उघडले. “तारकर आहेत आत, तुम्हाला भेटू इच्छितात ते. जा आत.”

पाणिनी आत गेला. इन्स्पे. तारकर उंचपुरा,तरतरीत माणूस होता.काहीसा त्रस्त दिसत होता. “ बस पाणिनी”

खुर्ची कडे निर्देश करत म्हणाला.

“ कसं चाललंय तुझं तारकर ? “

“ बर चाललंय. सो सो. मी आलोच एका मिनिटात “ असं म्हणून बाहेर गेला.

पाणिनी बसला होता.तब्बल तीन मिनिटांनी तारकर परत आला तेव्हा त्याच्या बरोबर जाडजूड आणि एखाद्या पिंपासारख्या रुंद छातीचे, राज्य सरकारी वकील हेरंब खांडेकर होते. अगदी सहज आल्याचे ते भासवत होते.

“ अरे, पाणिनी, नमस्कार! या इमारतीत मी आलो होतो. समजलं की तू आला आहेस इथे. त्या अनन्या गुळवणी ची आणि त्या विषाच्या बाटलीची काय भानगड आहे? “

“ तेच काय आहे ते शोधायचा मी प्रयत्न करत होतो.”

खांडेकर यांचा चेहेरा रागाने लाल झाला. “ या वेळी तू फारच डोळेझाक केलीस पाणिनी”

“ केल्ये का मी?”

“ तुला माहिती आहे ते.”

पाणिनी ने खांदे उडवले.

“ पूर्णपणे ओळख पटे पर्यंत मी कायदेशीर कारवाई चालू करणार नाहीये.” खांडेकर म्हणाले, “ पण लौकरच मी ओळख पटवणार हे नक्की.”

अचानक दार उघडले गेले पोलिसांनी एका स्त्री ला दारातून आत आणले.

“ या, या आत या मिसेस परकार“तारकर म्हणाला” तुला मी सांगतो, या पाणिनी पटवर्धन कडे एक नजर टाक आणि सांग आम्हाला......”

“ हाच तो माणूस.” ती बाई म्हणाली.

“ धन्यवाद,” तारकर म्हणाला. “ या तुम्ही आता.”

ती बाई गेली. पाणिनी ने हसून सिगारेट पेटवली. तारकर ला उद्द्शून म्हणाला, “ गंमत करतो आहेस? “

“ अगदी खरं सांगायचं तर मी गंमत करत नाहीये. मला हे सर्व आवडलं नाहीये. माफ कर , पण तू जे काय केलं आहेस ते केलं आहेसच.”

हवालदाराने परकारला आत आणले. “ ज्याने तुला आधी पन्नास रुपये आणि नंतर दोनशे रुपये दिले तो हाच माणूस आहे?”

“ हो हाच आहे.” त्याचे मोठाले डोळे घाबरे झाले होते.कोणत्याही क्षणी अश्रू येतील अशी स्थिती झाली होती त्याची.

‘ काय घडले ते नेमके आम्हाला सांग.” आवाजात खोटा दयाळूपणा आणि वडीलकीचा भाव आणत खांडेकर म्हणाले.

‘पाणिनी पटवर्धन ने आम्हा प्रत्येकाला, बुडी मारून बाटली शोधायचा प्रयत्न करण्याबद्दल पन्नास रुपये , आणि बाटली जो शोधेल त्याला दोनशे रुपये दिले.”

“ आणि कुणी शोधली शेवटी?”

“ मी”

“ मग काय झालं”

“मग त्याने सांगितले की मी त्याच्या बरोबर जायचे आहे.मी त्याला सांगितले की माझ्या घराच्या माणसाना मी कोणा अनोळखी माणसा बरोबर गेलेले चालत नाही , तर त्याने स्वतःची ओळख करून दिली आणि माझ्या घरी जाऊन आईची परवानगी घेऊन मला केमिस्ट कडे घेऊन गेला आणि पुन्हा लगेच आणून सोडले घरी.”

“ आणि बाटली? “ खांडेकर ने विचारले.

“ तो म्हणाला मी ती माझ्याच कडे कायम ठेवायची आहे. मी तसेच केले.”

“ किती वेळ पर्यंत?”

“ त्या केमिस्ट कडे जाई पर्यंत.”

“केमिस्ट चं नाव काय? आठवतय का?

“ कोरगावकर नावाचा कोणीतरी “

“ हुशार आहेस तू मुला.” खांडेकर म्हणाले.” तुझ्या मनात कोणतीही शंका नाही ना की तो हाच आहे?”

“ नाही अजिबात नाही.हाच आहे तो.” खांडेकर नी त्या हवालदाराला खूण केली, त्याने त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला.आणि त्याला बाहेर नेले. खांडेकर . तारकर कडे वळून म्हणाले,” मला वाटत एवढे पुरेसे आहे.”

“ काय पुरेसे आहे? “ पाणिनी ने विचारले.

पाणिनी चे बोलणे अजिबात आवडले नाही खांडेकर ना, आणि तसे स्पष्टपणे दाखवत त्यांनी उत्तर दिले, “ गुन्हेगाराला मदत करण्याचा आरोप तुझ्यावर ठेवायला.”

“ खरंच ? “ पाणिनी त्यांना खिजवत म्हणाला.

“ खुनाच्या गुन्ह्यात.” खांडेकर ने अधिक स्पष्टीकरण केले.

“ ओह , हो हो हो , माझी उत्कंठा वाढवलीत तुम्ही. कुणाचा खून झाला?” पाणिनी ने विचारले.

“ हर्षल मिरगल. तुला अधिकृत रित्या नाव हवं असेल तर घे. तू म्हणू शकणार नाहीस की तुला मी तुझ्या विरुद्ध कोणते आरोप आहेत त्याची कल्पना दिली नाही. ‘’ खांडेकर म्हणाले.” तुला मी सांगतोय की तुझ्यावर मी गुन्ह्याचा आरोप ठेवणार आहे. यावर तुला काही विधान करायचं नसेल तर करू नको;आणि केलंस तर ते तुझ्या विरुद्ध वापरले जाऊ शकते. आता बोल तुला काय म्हणायचय? “

पाणिनीने सिगरेट चा मोठा झुरका घेतला.” मला म्हणायचय की तुम्ही सगळे मूर्ख आहात. कोणाचाही खून वगैरे झालेलाच नाहीये. मिरगल चा मृत्यू नैसर्गिक पणे झालाय.”

“ त्याचा खून झालाय.” खांडेकर निक्षून म्हणाले.

“ तुम्हाला कसे कळले की त्याचा खून झाला?”

“ जिने खून केला, त्या बाई चा टेप रेकोर्ड केलेला कबुली जबाब आहे आमचे कडे.”

“आश्चर्य कारक आहे ! मला वाटत की त्याचा पुरावा म्हणून उपयोग करताना , खांडेकर,तुम्हाला थोडी अडचण येणार आहे.” पाणिनी त्यांना आणखीनच खिजवत म्हणाला.

“ संवादातील गोपनीयतेचे तुझे जुने अस्त्र तू वापरणार असशील तर त्याबाबत माझ्याकडे एक कायद्याचा संदर्भ आहे जो तुला चकित करेल पाणिनी! “

पाणिनी ने तोंडातून सिगरेट काढली,धूर बाहेर सोडला,हात पाय आरामात लांब ताणले आणि अधिकच आरामात खुर्चीत बसला.

“ तुम्ही तो कबुली जबाब केव्हा वापरणार आहात खांडेकर ? “

“ कोर्टात प्रकरण दाखल झालं की लगेचच.”

“ मी अगदी एवढ्यात वाचला नाहीये कायदा पण मला जे आठवते त्या नुसार तो कबुली जबाब वापरण्यापूर्वी तुम्हाला आधी गुन्हा घडला आहे असे सिद्ध करावे लागेल.”

“ मी करीन सिद्ध , गुन्हा घडल्याचे.” खांडेकर कडाडले.

“ कसं काय बुवा? “ पाणिनी ने त्यांना अधिकच उचकावले.

“ ते तुला सांगायला मी बांधील नाही.”

“ ओह, आहात तुम्ही बांधील. खून झाला आहे हे जो पर्यंत तुम्ही सिद्ध करत नाही तो पर्यंत खुनाच्या गुन्ह्यात, गुन्हेगाराला मदत करण्याचा आरोप तुम्ही माझ्यावर ठेवूच शकत नाही.अनन्या गुळवणी च्या टेप रेकॉर्डिंग वरील कबुली जबाबाचे आधारे तुम्ही खून झाला आहे हे सिद्ध करू शकत नाही.तिने ती कबुली दिली तेव्हा ती औषधाच्या अंमलाखाली होती. आणि..”

“ हा मुद्दा पुरावा म्हणून मान्य करायचा की नाही हे ठरवण्यासाठी ग्राह्य धरला जाणार नाही.पुरावा भक्कम आहे का हे ठरवताना ग्राह्य धरला जाईल.” खांडेकर पाणिनी ला मधेच तोडत म्हणाले.

“ एवढी खात्री बाळगू नका.ती तरुणी त्यावेळी पात्रच नव्हती कबुली द्यायच्या दृष्टीने.तिला साक्षीदार

म्हणून बोलावलेच जाऊ शकत नव्हते.जर तिला त्या अवस्थेत साक्षीदार म्हणून पिंजऱ्यात उभे केले असते तर कोर्टाने तिला साक्ष द्यायची परवानगीच दिली नसती. टेप रेकोर्ड वरील शब्दाना कोर्टात दिलेल्या साक्षी पेक्षा जास्त महत्व कोर्ट कधीच देणार नाही.” पाणिनी म्हणाला.

“ बघू आम्ही त्याचे काय करायचे ते “ खांडेकर भांडकुदळ पणा करीत म्हणाले.

“ तेव्हा मग तुम्हाला सिद्ध करावे लागेल की मिरगल ला नैसर्गिक मृत्यू आला नाही.त्याच्या डॉक्टरांनी म्हणतात की रक्ताच्या गुठळ्या होऊन तो गेला.आता मोठाली वक्तव्य करत बसण्यापेक्षा वास्तवात या. तुम्ही गुळवणी वर अटक वॉरंट काढणार आहात का?”

“ आधीच तू स्वतः, गुन्ह्याला मदत करणारा ठरला आहेस. जर गुळवणी तुझी अशील होणार असेल तर तिला फरार व्हायला लाऊन तू तुझी बाजू कमकुवत करणार नाहीस. मी आज्ञा देतो तुला की अनन्या गुळवणी ला तू तातडीने हजर कर.” खांडेकर कडाडले.

“अटक वॉरंट आहे तुमच्या कडे ?”

खांडेकर काहीतरी बोलणार होते पण स्वतःला आवरले.

“ आहे वॉरंट ? “ पाणिनी ने पुन्हा विचारले.

“ नाही.”

“ काढणार आहात का वॉरंट ? “

“ हे प्रकरण मी मला हवे तसे हाताळीन.तुझ्याशी कशाला चर्चा करू मी? अनन्या गुळवणी ला हजर कर असे तुला मी सांगितलंय.”

“अटक वॉरंट बजावा तिला आधी मग ती तुमच्या स्वाधीन होईल असे मी बघीन.”

“ मला , तिला प्रश्न विचारायचे आहेत.”

“ छान, तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर माझ्या ऑफिस मधे पूर्व नियोजित भेट घ्या.मी तिला तिथे आणीन.”

“ मला तिला खाजगीत प्रश्न विचारायचे आहेत.मला तिच्या कडून उत्तरं हवी आहेत, तुझ्या कडून नकोत.”

“ तसे करायचे असेल तर मग मला जेवढा कायदा समजतो,त्यानुसार,तुम्हाला प्रथम तिच्यावर खुनाच्या आरोपाचे वॉरंट बजावायला लागेल. तिला अटक करावी लागेल. तसे तुम्ही केले रे केले. की वकील म्हणून मी तिला सल्ला देईन की मी तिथे हजर असल्या शिवाय कोणत्याही प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत.”

पाणिनी उठला.आळोखे पिळोखे दिले, सिगरेट ची राख विझवली. “ ठीक आहे , निघतो मी. भेटू आपण.”

“ तू मला अत्ताच भेटणार आहेस.” खांडेकर ओरडले.

“ तुम्हाला काय म्हणायचंय, मी जाऊ शकत नाही? “

“ तेच म्हणायचय मला.”

“ का नाही जाऊ शकत?”

“ तुझ्यावर गुन्ह्याचा आरोप ठेवण्यात येणार आहे.”

“ गुन्हेगाराला मदत केल्याबद्दल ? बरेचदा बोललाय तुम्ही मगाच पासून हे. त्या आरोपाखाली मला थांबवायच असेल तर आधी वॉरंट घ्या माझ्या नावाचे.तुम्हाला माझ्यावर तो आरोप ठेवताना त्रासदायक ठरेल. ”

“ इतरही काही आरोप आहेत तुझ्यावर.”

“ कुठले?”

“पुरावा नष्ट करणे. त्यात हस्तक्षेप, ढवळाढवळ करणे.”

“ कोणता पुरावा?”

“विषाची बाटली.”

“ आणि मी त्यात काय लुडबूड केली म्हणे? “

“ त्या पुराव्याला हात लावायचा तुला काहीही अधिकार नव्हता,खुनाच्या या प्रकरणात, ज्या क्षणी तू बाहेर पडलास आणि पुरावा मिळवलास,....”

“ परमेश्वरच तुम्हाला शांती देवो ! मी कोणताही पुरावा मिळवला नाही किंवा पुराव्यात ढवळाढवळ केली नाही.मी पोलिसांना मदतच करत होतो. झुल्पीपरकारहाच तुम्हाला पहिल्यांदा सांगेल की त्या बाटलीला मी स्पर्श सुद्धा केला नाही. मी त्याला शेवट पर्यंत ती बाटली त्यालाच हातात धरून ठेवायला सांगितली. ज्याच्या प्रामाणिक पणाबद्दल कोणालाच शंका येणार नाही आणि ज्याची सल्लागार म्हणून मोठी पत या क्षेत्रात आहे अशा केमिस्ट कडे मी त्या मुलाला घेऊन गेलो आणि बाटलीत काय आहे हे शोधून काढायला मी त्याला सांगितले.ती बाटली पुरावा म्हणून वापरता यावी यासाठी जेवढी म्हणून काळजी घेता येईल तेवढी मी घेतली. नंतर मी सरळ इथे पोलीस स्टेशनात आलो, तुम्हाला हे सांगायला की पुरावा मिळवण्यासाठी तुम्ही कुठे जायला पाहिजे.”

“ तू काय केलेस? पुन्हा सांग ! “ खांडेकर अति आश्चर्याने ओरडले.

“ तुम्हाला पुरावा कुठे मिळेल हे सांगायला मी इथे आलो.” नाहीतर मी इथे कशाला आलोय असं तुम्हाला वाटतंय?”

तारकर आणि खांडेकर यांनी एकमेकांकडे पाहिले. “ तुला समजलं होत की आम्ही कोरगावकर कडे गेलो होतो आणि पुरावा मिळवला होता.” तारकर ने आरोप केला.

पाणिनी हसला.” त्यामुळे परिस्थितीत फरक पडत नाही. मी इथे एकाच हेतूने आलो की पुरावा कुठे मिळेल हे तुम्हाला सांगावे आणि तो पुरावा सुरक्षित ठेवण्यासाठी मी काय काय केले हे तुम्हाला कळवावे.”

“ त्या पुराव्या बद्दल तू एवढा विचार केला होतास आणि काळजी घेतली होतीस तर ती बाटली तुला मिळता क्षणीच पोलिसांकडे देण्याचे तुझे कर्तव्य होते.”

पाणिनी ने मान हलवून नकार दिला. “ त्या परिस्थितीत माझ्यावर अब्रू नुकसानी चा आरोप लावला गेला असता.मी तुमच्या कडे येवून असे म्हणू शकलो नसतो की ही विषाची बाटली मला तळ्याकाठच्या घाटाच्या टोकाला फेकलेली सापडली. मला हे कसे कळणार होते की त्यात विष आहे? मला हे कसे कळणार होते कीती कधी फेकली आहे? कोणी फेकली आहे?

तुम्हाला आणि मला दोघांनाही सुरक्षित करण्यासाठी जे जे करावे लागेल ते मी केलंय. तुम्हाला कळवण्यापूर्वी त्यात विषच होते याची खात्री मला करून घ्यायची होती.”

पाणिनी ने तारकर च्या फोन कडे बघून विचारले,” मी हेमंत कोरगावकर शी बोलू का या फोन वरून? “

तारकर जरा घुटमळला.त्याने रागावलेल्या खांडेकर कडे पहिले.त्याच्या डोळ्यात खटयाळ भाव चमकले.” बाहेरचा फोन लावायचा आहे असे सांग आणि नंबर फिरव.” पाणिनी ने तसे केले.” हॅलो हेमंत, पाणिनी बोलतोय मी. तुला काय आढळलं त्यात ? “

“ त्याने काहीही शोधून काढले नाही. सगळा पुरावा आपणच घेऊन आलोय.” खांडेकर पुटपुटले.

पाणिनी ने खांडेकर ना गप्प बसायची खूण केली.” हं हेमंत बोल पुढे. पुन्हा एकदा हेमंत बोलायला उतावळा झालेला दिसला.” अर्थात मला हे कळायला मार्ग नव्हता की त्या बाटलीत असलेल्या सर्व गोळ्या सारख्याच होत्या किंवा नाही.मी त्यातल्या एकाच गोळीचा नमुना घेतला.”

“ हो,हो मला माहित आहे.” पाणिनी म्हणाला.

‘’ माझ्याकडे तो नमुना आहे , पोलिसांना ते माहीत नाहीये.”

“ माहित्ये मला, बोल पुढे.”

“ तू विषाबद्दल बोलला होतास.मी तो नमुना सायनाईडसाठी तपासाला. ते सायनाईड नाही., आर्सेनिक ही नाही.नमुना म्हणून एकाच गोळीचे आणि खूप कमी माप माझ्याकडे होते.तेवढ्यात मला आठवले की त्या बाटलीवर साखरेला पर्यायी गोळ्या असे लिहिले होते. मग मी त्याच्यावर ‘ स्पेक्टो ग्राफ ‘ नावाची चाचणी घेतली. ही चाचणी एवढी अचूक असते की बाटलीतल्या इतर गोळ्यांमधे इतर दुसरे कोणतेही विष असते तर घासल्यामुळे ते नमुन्याच्या गोळीला सुद्धा चिकटले असते आणि या चाचणीत ते सूक्ष्म घटक सुद्धा स्पष्ट पणे कळले असते. परंतू तसे काहीच झाले नाही याचा अर्थ केवळ नमुना म्हणून घेतलेली गोळी साखरेला पर्यायी गोळी होती असे नाही तर बाटलीतल्या सर्वच गोळ्या तशाच होत्या.एकही गोळी सायनाईड किंवा आर्सेनिक ची नव्हती.”

पाणिनी ने फोन जरा वेळ हातात धरून ठेवला आणि हेमंत काय म्हणाला याचा नीट विचार केला.एक मिस्कील हास्य त्याच्या चेहेऱ्यावर पसरले. “ ऐकतो आहेस ना तू ? “ हेमंत ने विचारले.

“ हो आहे.”

“ तू ऐकलंस ना मी काय बोललो ते?, त्या सर्व गोळ्या साखरेला पर्यायी गोळ्याच आहेत.”

“ छानच , मस्त. धन्यवाद.” पाणिनी म्हणाला. “ मी तुला फोन करीन नंतर.त्या नमुन्याची नीट काळजी घे.तू काढलेल्या निष्कर्षाची पुन्हा खात्री कर. कदाचित तुला साक्षीला यावे लागेल.”

पाणिनी ने फोन खाली ठेवला आणि मिस्कील पणे खांडेकर कडे पाहिले.

“ तुमच्या कदाचित लक्षातच नाही आलं की तुम्ही कोरगावकर ने गोळ्यांची चाचणी करू नये म्हणून त्याला पोलिसांच्या घोळक्यात अडकवून बाटली हिसकावून घेतलीत त्यापूर्वी हेमंत ने नमुन्यादाखल त्या बाटलीतून एक गोळी काढून घेतली होती.”

“ मी चांगल्या हेतूनेच वागत होतो.कोरगावकर चा अहवाल आल्यानंतर,त्यानुसार गोळ्यात विष आढळलं तर पोलिसांना कळवण्याचा माझा विचार होता. मला आता जाहीर करायला आनंद होतोय की कोरगावकर चा मला फोन आला की त्या बाटलीत विष नव्हतंच साखरेला पर्यायी गोळ्याच होत्या त्यात, बाटलीवर लिहिल्या प्रमाणेच ! “

“ आता या माहिती नंतर मला बाहेर जाण्यापासून थांबवायचं असेल तर पुढे या आणि मला थांबवून दाखवा.” पाणिनी ने आव्हान दिले.

पाणिनी उठून दाराकडे गेला.दार ढकलले.साध्या वेषातील एक पोलीस वाट अडवून उभा होता. मागील बाजूस पाणिनीने उत्तेजित स्वरातील खसखस ऐकली.नंतर त्या पोलिसाशी तारकर बोलताना पाणिनीने ऐकले,

“ जाऊ दे त्याला. “

६ समाप्त