प्रेमगंध... (भाग - ३३) Ritu Patil द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमगंध... (भाग - ३३)

(आपण मागच्या भागात पाहिलं की अजयला डिस्चार्ज देण्यात येतो आणि कुसुम सगळ्यांना आपल्या घरी घेऊन जाते.... वाड्याचा थाटमाट बघून सगळेच अवाक होतात... कुसुम अजयच्या घरच्यांना राधिकाचे बाबा आणि तिच्याबद्दल सगळं सांगते... अजयची आई आल्यापासून खूप शांत शांत असते... अजयचे बाबा तिला जाऊन समजावतात... आता पुढे...)


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


दुपारच्या जेवणाची सगळी तयारी झाली होती... कुसुमने सगळ्यांना जेवण करण्यासाठी बाहेर बोलवलं... सगळे येऊन जेवायला बसले... जेवणाचा सगळा घमघमाट पसरला होता... कुसुम, राधिकाची आई आणि राधिका सगळ्यांना आग्रह करून वाढत होत्या...


कुसुम - "आज घाईघाईत साधंच जेवण बनवून वाढलं तुम्हाला... गोड मानून घ्यावं सगळ्यांनी..."


अजयचे बाबा - "अहो ताई, हे साधं जेवण म्हणावं का...? खरंतर खूपच सुंदर जेवण झालंय..."


अजय - "हो आत्या, खरंच जेवण खूप सुंदर झालंय..."


कुसुम - "पोरा, तू बोललास ना मग छानच असणार बघ... आणि पोट भरून जेवायचं बरं का आणि लवकर लवकर बरं व्हायचं आहे तूला..."


अजय - "हो आत्या, तुमच्या हातचं असं रोजचं जेवण भेटणार असेल तर पोटभर जेऊन लवकरच एकदम जाडजूड होऊन जाईल मी..." तो हसतच बोलला... त्याचं ऐकून सगळेच हसू लागले...


राधिकाचे बाबा - "ताई आज खूप वर्षांनी तुझ्या हातचं जेवण जेवलो बघ मी... आजही अगदी तशीच चव आहे तुझ्या हाताला, जशी आधी बनवून खाऊ घालायची अगदी तशीच..."


कुसुम - "नाम्या एवढी वर्षे झाली पण अजूनही बहीणीच्या हाताची चव विसरला नाहीस तू..."


राधिकाचे बाबा - "अगं ताई, आईबाबा गेले तेव्हापासुनच तू किती मायेने बनवून खाऊ घालायचीस मला... मग अशी मायेची चव सहजासहजी विसरता येते का...?"


अजयचे बाबा - "खरंय दादा तुमचं... मायेची चव सहजासहजी विसरता येत नाही..."


कुसुम - "सावित्रीमाय, तू का गं जेवत नाहीस...? अजून एक घास पण उचलला नाहीस तू... काय झालं तुला...?"


सावित्रीमाय - "कुसुमे आज तुम्हा सगळ्यांना असं एकत्र बघून माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं बघ... आज खूप खुश आहे मी आणि त्याच आनंदाने माझं पोट भरलंय आज..."


राधिकाचे बाबा - "अगं माय, आता जेवून घे ना तू मुकाट्याने... कशाला त्या तूझ्या आनंदाची आठवण काढतेस आता...? येईल दारू पिऊन कटकट करत बसेल तुझ्यामागे आणि मग राहील खाली पडून लोळत तूझा आनंदा..."


ते हसतच म्हणाले... सगळ्यांच्याच चेहर्‍यावर हसू फुटत होतं...


सावित्रीमाय - "नाम्या तुझी सवय नाही गेली हा अजून या मायची मस्करी करायची... आणि माझ्या आनंदाचं काय सांगतोस, त्याचा सगळीकडे फक्त आनंदच आनंद आहे... सुधरायचं नाव नाही घेत तो..." सगळ्यांचं हसतखेळतच गप्पा मारत जेवण उरकून झालं होतं... सगळे बाहेर गप्पा करत बसले होते...


गेटमधून एका लहान मुलासोबत एक बाई आली... तो लहान मुलगा सावित्रीमायकडे धावतच आला आणि तीला बिलगला...


कुसुम - "ओळखलं कि नाही तुम्ही दोघींनी एकमेकींना...?" ती राधिका आणि त्या बाईकडे बघत बोलली... राधिका तिच्याकडे बघत होती आणि ती बाई राधिकाकडे बघून हसत होती...


"कशी ओळखणार नाय मी आत्या...? बघताक्षणीच ओळखलं तिला मी, पण माझी मैत्रीण मात्र मला विसरली आत्या..." ती बाई बारीक तोंड करून म्हणाली... सगळे तिलाच बघत होते...
राधिका तिला एकटक बघत होती...


राधिका - "सुमे..." त्या बाईने जाऊन तीला मिठी मारली...


"हो मी तुझी मैत्रीण सुमी... मला वाटलं विसरलीस तू मला पण आठवण आहे तुला या वेड्या मैत्रीणीची..." -- सुमीने राधिकाचे दोन्ही गाल खेचले...


"अगोदर खरंच ओळखलं नव्हतं तूला मी सुमे... पण हे तूझे कुरळे केस लहानपणी जसे भांडी घासायच्या घासणीसारखे दिसायचे ना अजूनही तसेच दिसत आहेत... आणि म्हणून लगेच ओळखू आलीस तू..." राधिका हसतच म्हणाली... तीचं ऐकून सगळेच हसू लागले....


"हो का तू ना माझ्या एवढ्या सुंदर केसांवरून तेव्हापण चिडवायची आणि आता पण चिडवतेस..." -- सुमी नाक मुरडतच म्हणाली.


"अजूनही अगदी तशीच आहेस... गाल खेचायची सवय काय तुझी गेली नाही सुमे..." राधिका हसतच म्हणाली...


सुमीने सगळ्यांची चौकशी केली, राधिकाने तीची अजयच्या घरच्यांसोबत ओळख करून दिली... सुमी मेघा मीराला बघू लागली....


"राधी, या दोघी मेघा आणि मीरा ना गं... पण यातली मेघा कोण आणि मीरा कोण? नावं सांगा गं तुमची पटापट..."


तीघींनी पण आपली नावं सांगितली... सुमीने तिघींचे पण जोराचे गाल खेचले... तिघीपण आपले गाल चोळत होते... सगळे तिला हसत होते...


"अर्चना, राधी तुझ्यासोबत भांडते का गं...? लहान तेव्हा आमच्यासोबत खूप भांडायची..." -- सुमी.


"नाही गं... माझ्याशी तर नाही भांडत कधी... आणि अशी कशी माझ्याशी भांडेल ती? मी तिची होणारी नणंद आहे ना आणि नंदेचा मान कसा मोठा असतो ना... तेवढा दबदबा आहे माझा तिच्यावर कळलं का..?" -- अर्चना.


"बघ, बघ... कशी लाजते माझी मैत्रीण..." सुमी. सगळेच हसू लागले...


"दाजी..., राधी तुमच्याशी भांडली ना की लगेच मला फोन लावत जा तुम्ही... मी येतेच मग शेतातला ऊस उपटूनच आणते तीला ऊसाचे रट्टे द्यायला..." -- सुमीच्या तोंडून दाजी हा शब्द ऐकून अजयला खूप छान वाटते... तो हसू लागतो...


"अजून तरी भांडली नाही माझ्याशी तूझी मैत्रीण... पण राग मात्र तीचा अगदी नाकावरच बसलेला असतो..." अजय हसतच म्हणाला.


"मग त्यांत मी काहीच करू शकत नाही दाजी... तुमचं ते पर्सनल मॅटर आहे, तुम्ही तुमचं बघून घ्या..." सुमी हसतच म्हणाली...


"हिचा तोंडाचा पट्टा चालू झालाय ना तर आत्ता काय बंद व्हायचं नाव नाय घेणार, तोंड लाकडाचं असतं तर आख्खा भुस्साच पडला असता हिच्या तोंडून..." सावित्रीमाय डोक्याला हात लावतच बोलली... सगळेच हसू लागले....


"राधी हा माझा मुलगा कृष्णा... राधिकाचा कृष्णा... लहान तेव्हा तूला मी नेहमी बोलायची ना की माझ्या मुलाचं नाव मी कृष्णा ठेवेल आणि तूला माझी सून करेल... बघ आता हा तूझा कृष्णा, आता होशील का माझ्या कृष्णाची राधा आणि माझी सूनबाई..." -- सुमीच्या या बोलण्यावर सगळेच हसू लागले... राधीने त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या दोन्ही गालावर मुके घेतले... आणि त्याच्या दोन्ही गालावर मायेने हात फिरवले...


"गोंडू तुझं नाव काय सांग मला...?" राधीने त्याला प्रेमाने विचारलं...


"किसना..." तो म्हणाला...


"अले माझा शोनू तुला बोलता पण येतं... तुझी आई तूला मालते का... हं, तिने तूला मारलं ना की मला सांग हा आपण दोघं मिळून तुझ्या आईची मस्त धुलाई करू..." कृष्णा हसू लागला...


"तूझ्या मावशीचं काही ऐकू नकोस तू... तूला शाळेत काही लिहीता वाचता आलं नाही ना की तीच तूला पाठीत धपाटे देईल आणि येशील रडत रडत माझ्याकडे..." ती हसतच म्हणाली. सुमी स्वभावाने खूप नटखट आणि बडबड करणारी होती...


सगळे बोलतच होते आणि समोरून भीम्या आला...


सावित्रीमाय - "काय रं मुडद्या, आता कोणाच्या डोक्यांत दगड आपटाय आलास... तोंड काळं कर तुझं इथून... परत तोंड नको दाखवू तुझं..." ती चिडूनच म्हणाली... भीम्याने राधिकाच्या बाबांचे पाय पकडले आणि पायावर डोकं ठेवून माफी मागू लागला... सगळे त्याच्याकडे रागानेच बघत होते...


"मामा, चूक झाली माझी माफ करा मला... मला माहीत नव्हतं की हे तुमचे होणारे जावई आहेत असं... चुकलो मी, तुम्ही जी सजा द्याल ती सजा भोगायला तयार आहे मी..." -- भीम्या.


"तूला जर माफी मागायचीच असेल तर अजयरावांची आणि त्याच्या घरच्यांची माग... आणि काय सजा द्यायची ती तेच देतील तूला..." राधिकाचे बाबा म्हणाले. भीम्याने अजयच्या आईबाबांसमोर हात जोडले... आणि माफी मागू लागला... सगळे त्याला रागातच बघत होते... अजयच्या आईचा राग अनावर झाला. ती रागातच उठली आणि तीने भीम्याच्या दोन कानाखाली लावून दिल्या...


"तूला लाज कशी वाटली नाही रे, माझ्या मुलाला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केलास तू...? सगळे माफ करतील तूला... पण हे आईचं काळीज कधीच माफ करणार नाही तूला... लक्षात ठेव तू..." अजयची आई रडतच बोलली... सगळ्यांचे डोळे भरून आले... अजयच्या बाबांनी तीला सावरलं ...


"काय रं मुडद्या, आता समजतंय ना तूला आईचं काळीज काय असतं ते... आख्खी दुनिया माफ करेल तूला पण ही माऊली कधीच माफ करणार नाही तूला... आता तरी सुधर मुडद्या... तूझ्या अशा वागण्याने स्वतःच्या आईचा जीव गमावलास तू... बायकोपोराला लांब केलंस... राक्षस आहेस तू राक्षस..." सुमी त्याला ओरडूनच बोलत होती.


"सुमी, परत असं नाय वागणार मी... माफ कर मला... हवं तर पोराच्या डोक्यावर हात ठेवून शप्पथ घेतो मी... असं परत नाय करणार मी..." त्याने कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवला, पण रागाने सुमीने त्याचा हात झटकून दिला...


"खबरदार जर माझ्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतलीस तर... स्वतःच्या पोराच्या जीवावरच उठलास का तू... लाज कशी वाटत नाही तूला..." सुमी रागातच म्हणाली. सगळे तिच्याकडे आश्चर्यानेच बघत होते...


"काय रे भीम्या... इथे येऊन काय नाटकं लावलीस तू...?" सावित्रीमाय चिडूनच बोलली...


"नाय गं माय नाटकं नाय करत मी. विश्वास ठेवा माझ्यावर. एक शेवटची संधी द्या मला... मला परत पुर्वीसारखा तुझा लाडका भीम्या व्हायचं आहे... कृष्णासाठी, तुझ्यासाठी, सुमीसाठी सुधरायचं आहे मला... शेतात कष्ट करेन आणि बायकोपोरांचं पोट भरेन पण त्या वाईट मार्गाला परत नाय जाणार मी, वचन देतो तूला माय मी...." भीम्या खूप पश्चातापाने बोलत होता.


कुसुम - "सावित्रीमाय, एवढं तो काकुळतीने बोलतोय ना... एकदा माफ कर त्याला... आणि सुधरण्यासाठी एक शेवटची संधी देऊन बघ त्याला..."


"बरं ठिक आहे, मग माझी पण एक अट आहे... दारू सोडायची, गुंडागर्दी करून पैसा कमवायचा नाही, आपली शेती कसायची, त्याच्यावरच पोट भरायचं... पोटाला अर्धी भाकरी खा... चालेल... पण परत तो बेईमानीचा पैसा घरात येता कामा नये..." सावित्रीमाय बोलली.


"हो माय, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत... तू आणि सुमी जसं बोलतील तसंच ऐकेन आणि करेन मी..." -- भीम्या...


"नाम्या, ओळखलं असशील ना तू ह्याला... गंगी आणि आनंदाचा पोरगा हा भीमा... आणि सुमीचा नवरा..." --कुसुम.


"हो ताई कधीच लक्षात आलं ते माझ्या..." राधिकाचे बाबा.


"राधीताई माफ कर मला. लहानपणी ज्या हातावर राखी बांधलीस त्याच हाताने तुझं दुर्भाग्य लिहित होतो मी... आणि तुमचा खूप मोठा अपराधी आहे मी... मला माफ करा असं नाही म्हणणार मी पण यापुढे कधीही कोणतंही संकट तुमच्यावर आलं ना तर एक हाक द्या मला... एका हाकेवर तुमच्यासाठी धावून येईन मी, हे माझं वचन आहे तुम्हाला..." भीम्या अजयचे पाय पकडून म्हणाला.


"माझं तुझ्यासोबत काहीच वैर नाही आणि काही तक्रारही नाही, बस फक्त एवढंच सांगेन की ह्या वाईट गोष्टी सोडून दे आणि चांगल्या मार्गाला लाग बस..." अजय शांतपणे म्हणाला...


"हो मी तुमचं नक्की ऐकेन. आतापासूनच सगळे वाईट धंदे, दारू सगळं सोडून देईन मी... नाय परत त्या मार्गाला जाणार मी..." -- भीम्या.


"सुमी, आता जर भीम्या परत दारू पिऊन घरी आला तर मला सांग, मग मी आहे आणि तो आहे... त्याचं काय करायचं ते मग मी बघते..." -- सावित्रीमाय.


"नाय गं माय आता मी तूला ना सुमीला त्रास होईल असं काहीच वागणार नाही..." -- भीम्या.


"माझ्या पोराच्या वाईट धंद्यातून एकाची तरी आज सुटका झाली." हा विचार करून कुसुमला आज मनाला खूप समाधान वाटत होतं





क्रमशः-


(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)


[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]


🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹


💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - ३३


➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀