चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 3 बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 3

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर३
३. संकटाशी सामना

चंद्राला जाग आली तेव्हा त्याला जाणवले की त्याचे हात-पाय बांधलेले आहेत. त्याने सभोवार नजर फिरवली. आजूबाजूला उंच झाडांची गर्दी होती. ती सारी झाडे वेलींनी वेढलेली होती. वेलींना पेल्यासारखी निळसर-जांभळ्या रंगाची फुले होती. त्याचे लांब पुंकेसर फुलाच्या बाहेर डोकावत होते. पुंकेसर पिवळसर सोनेरी रंगाचे होते. फुलपाखरे, भुंगे व पाखरे त्याभोवती रुंजी घालत होते. त्याला ज्या ठिकाणी बांधलेले होते त्या सभोवताली गोलाकार जागा मुद्दामहून साफ केलेलीहोती. मध्ये एक सरळसोट झाडाचे गुळगुळीत केलेले खोड खांबासारखे रोवले होते. पण त्याहीपेक्षा भीतिदायक गोष्ट त्याच्या नजरेत आली ती म्हणजे त्या खांबाच्या बाजूला असलेली दगडाची विचित्र आकाराची भयंकर मूर्ती. अशा प्रकारची मूर्ती त्याच्या बघण्यात कधीही आली नव्हती. त्या मूर्तीचे अंग रक्तासारखे लाल वाटत होते. डोळ्यांच्या जागी फक्त पोकळ

भोकं होती. त्या मूर्तीच्या पायाजवळ काही कवट्या पडलेल्या दिसत होत्या. हे सारे दृश्य बघून चंद्राच्या अंगावर काटा उभा राहिला. बापरे! बहुधा तो मानवभक्षक आदिवासींच्या तावडीत सापडला होता की काय? बहुधा आपण किनाऱ्यावर बेशुद्ध पडलेलो असताना त्यांनी आपल्याला उचलून आणले असणार! मग वाघ्या कुठे होता? की वाघ्याला त्यांनी ठार मारले? त्याच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. वाघ्याच्या आठवणीने तो व्याकूळ झाला. आपण आपल्याबरोबर वाघ्यालाही उगाचच संकटात टाकले असा विचार त्याच्या मनात आला. त्याचे डोळे पाणावले. कुठेही असू दे, पण सुरक्षित असू दे, अशी तो एकवीरेची आळवणी करू लागला. त्यातल्या त्यात समाधान एकाच गोष्टीचे होते की कंबरेला बांधलेला खंजीर तसाच होता. त्याने हात-पाय हलवून बंधनं ढिली होतात काय पाहिले. पण त्या वेली अतिशय दणकट होत्या. तुटण्याची वा ढिल्या होण्याची शक्यता नव्हती. त्याला आणखी एका गोष्टीचे अजब वाटत होते ते म्हणजे आतापर्यंत कुणाचाही चाहूल त्याला लागली नव्हती. सारे कसे शांत होते. जंगलावर चंद्रप्रकाश पसरू लागला. झाडे व आजूबाजूचा प्रदेश दिसू लागला. अचानक हृदय धडकावणाऱ्या मानवी आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. आजूबाजूच्या झाडीतून काळीकभिन्न माणसे एक-एक करून बाहेर येऊ लागली. काही माणसे आजूबाजूच्या उंच झाडांवरून सरसरत खाली उतरू लागली. म्हणजेच ती माणसे मघापासून आपल्यावर नजर ठेवून आहेत, हे चंद्राच्या लक्षात आले. चंद्रप्रकाशात निरखून बघताना त्याच्या लक्षात आले की त्या सर्वांनी अंगाभोवती झाडांच्या साली गुंडाळलेल्या होत्या. त्यांच्या डोक्यावर गव्याची दोन शिंगे बांधलेली होती. स्त्रिया, पुरुष व मुले मिळून सुमारे पंचवीस एक माणसे होती ती. त्यांच्यातला एक उग्र डोळ्यांचा, गळ्यात मानवी हाडांचा हार घातलेला माणूस झिंगल्यासारखा नाचत होता. तो नाचणारा माणूस त्याचा प्रमुख किंवा पुजारी असावा. त्याने जोरजोरात हातवारे करत ओरडत कोणत्या तरी अजब भाषेत काहीतरी सांगितले. त्याबरोबर मघापासनं आरडाओरडा करणारे सारे आदिवासी गप्प झाले.

चंद्रा श्वास रोखून त्या शिंगाड्यांकडे पाहात होता. त्यांच्या प्रमुखाने त्या मूर्तीच्या समोर चकमकीच्या साहाय्याने अग्नी पेटवला. त्यात लाकडं टाकून मोठा जाळ केला. आता आगीच्या लाल-पिवळसर ज्वाला चमकू लागल्या. त्यामुळे तो उग्र डोळ्यांचा माणूस अधिकच भयावह दिसू लागला. त्याचं गदागदा हलणे चालूच होते. आता तो मूर्तीसमोर उभा राहून विचित्र आवाजात ओरडू लागला. आता तो एका लयीत नाचू लागला. त्याच्याबरोबर त्या टोळीतील इतर माणसेही ओरडू लागली. प्रथम त्यांचा आवाज हळू होता. पण नंतर वाढत हळूहळू मोठा झाला. मध्येमध्ये त्या शिंगाड्यांचा प्रमुख कसलीशी माती त्या ज्वालांमध्ये फेकत होता. त्यामुळे ज्वाळांचा रंग जांभळट- हिरवा व्हायचा. तो प्रकार बराच वेळ चालला. कदाचित, ते आपल्या दैवाचा कौल मागत असावेत. पण चंद्राचे दैव बलवत्तर होते. .शिंगाड्यांना हवा असलेला कौल मिळेना. हळूहळू त्यांच्या आवाजात निराशा झळकू लागली. प्रमुख तर निराशेने हातपाय झटकू लागला. मग तो सर्वांकडे वळून काहीतरी पुटपुटला. तसे सारे शिंगाडे निराशेने चित्कारले. पण लगेचच त्यांनी गुडघे टेकून आपल्या देवाला नमस्कार केला. सारेजण प्रमुखाच्या पाठोपाठ झाडीत शिरून दिसेनासे झाले. चंद्राने सुटकेचा श्वास सोडला. किमान आणखी काही काळ त्याला जीवदान मिळाले होते. शिंगाड्यांचा देव शिंगाड्यांना न पावता चंद्राला पावला होता.

सुटकेचा काही मार्ग निघतो काय हे तो पाहू लागला. सकाळ होण्याअगोदर निसटू शकलो तरच आपले प्राण वाचतील हे त्याने ओळखले. काही वेळ असाच गेला. रातकिड्यांचे कर्कश आवाजात ओरडणे चालूच होते. अचानक त्याला पाठीमागे कुणाचीतरी चाहूल लागली. चंद्रा दचकला. एखादे रानटी जनावर त्याच्या वासाने आले असेल असे त्याला वाटले. या हातपाय बांधलेल्या स्थितीत आपण त्याची आयती शिकार होणार हे नक्की! याने त्याने मागे पाहिले आणि तो खूश झाला. तो वाघ्या' होता. नक्कीच तो वाघ्या होता. त्याचा लाडका वाघ्या जिवंत होता. एवढेच नाही तर तो त्याचा शोध घेत आला होता. म्हणजेच तो मघापासनं जवळपास होता. ते शिंगाडे जाईपर्यंत तो शहाण्यासारखा गप्प राहिला होता. हळूहळू वाघ्या त्याच्या अगदी जवळ आला.

"वाघ्या... वाघ्या... तोड ह्या वेली." तो दबक्या आवाजात म्हणाला.

पण चंद्राने सांगण्याअगोदरच वाघ्याने त्याच्या हातापायाला बांधलेल्या वेली तोडायला सुरुवात केली होती. आपल्या तीक्ष्ण दातांच्या मदतीने त्याने काही क्षणातच चंद्राचे हातपाय मोकळे केले. पूर्वी झाडावर चढून त्याच्यावर नजर ठेवणारे शिंगाडे आपल्या वस्तीत परतले असल्यामुळे वाघ्याचे काम





तोपर्यंत सारे बेट काळोखात बुडून गेले होते. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक! आजूबाजूचे काही दिसत नव्हते... पण रानटी जनावरांचे आवाज... वाऱ्यामुळे होणारी पानांची सळसळ... आणि दूरवरून येणारा लाटांचा अस्पष्ट आवाज त्याला अस्वस्थ करत होते. रात्री उशिरा साऱ्यासोपे झाले होते. थकलेल्या चंद्रामध्ये मुक्त झाल्यामुळे नवे बळ संचारले होते. त्याने समोरच्या जाळातील पेटते लाकूड उचलले.

“वाघ्या चल...लवकर. शिंगाडे ज्या बाजूला गेले होते त्याच्या विरुद्ध बाजूला ते दोघे दबकत दबकत निघाले होते. आता कुणी अडविल्यास त्याची लढण्याची पूर्ण तयारी होती. फक्त त्याचा तीरकमठा त्याच्याबरोबर पाहिजे होता. पण होडीला जलसमाधी मिळाली त्या वेळी तीरकमठा सुद्धा समुद्रात पडला होता. सावकाश व अतिशय सावधगिरीने चंद्रा चालत होता. पण त्या शिंगाड्यांचा कुठेही मागमूस नव्हता. ते आले कुठून व गेले कुठे हे समजायला काहीच मार्ग नव्हता. दाट झाडीतून चालताना अंगावर काटे ओरखडे काढत होते. पण त्याची तमा न बाळगता चंद्रा वाट काढत होता.

तोपर्यंत पहाट व्हायला आली होती. सारे बेट जागे झाल्यासारखे वाटत होते. पक्षी झाडांवर किलबिलाट करू लागले. बेट उजळू लागले. नुकत्याच उमललेल्या फुलांचा सुगंध वाऱ्याच्या हळुवार झुळकेबरोबर जाणवत होता. चंद्राने आजूबाजूला पाहून अंदाज घेतला. तो ज्या ठिकाणी पोहोचला होता तिथे खाली छोटी दरी होती, तर दुसऱ्या बाजूला एक पाण्याचा झरा वाहताना दिसत होता. आजूबाजूला घनदाट झाडी वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे फळांनी भरलेली दिसत होती. झाडांखाली ताजी फळे सुद्धा पडलेली दिसत होती. ती फळे बघताच त्याला भुकेची जाणीव झाली. त्याने काही फळे गोळा केली व तिथेच बैठक मारत ती मधुर फळे खाल्ली. कालचा पूर्ण दिवस तो उपाशी होता. शिवाय वेगवेगळ्या संकटांशी सामना करावा लागल्याने तो थकला होता. .

फळे खाऊन तो तिथल्या झाडाला टेकला. क्षण दोन क्षण जातात न जातात त्याला वाघ्याचा केविलवाणा आवाज ऐकू येऊ लागला. चंद्राझपकन उठला. वाघ्यावर निश्चित संकट कोसळले होते. एखाद्या रानटी जनावरानं वाघ्याला पकडलं असावं. कमरेचा खंजीर हातात घेऊन तो आवाजाच्या दिशेने धावला. समोरचे दृश्य पाहून त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. एका भल्या मोठ्या अजगराने वाघ्याच्या शरीराला विळखा घातला होता. तपकिरी, पिवळ्या रंगाच्या त्या अजगराच्या अंगावर गडद काळ्या रंगाचे सुंदर त्रिकोणी पट्टे होते. सुमारे पंधरा हात लांब व एक हात जाडीचा तो अजगर होता. त्याने आपल्या शेपटाने वाघ्याला विळखा घातला होता. आपला भला मोठा जबडा उघडून वाघ्याला मटकवण्यासाठी तो वळत होता. त्याची हालचाल शांत होती. कोणतीच घाई त्याला नसावी. पण एकदा का त्याने वाघ्याला आपल्या जबड्यात पकडले असते तर वाघ्याला वाचवणे अशक्य होते. त्वेषाने ओरडत चंद्राने दोन उड्यांतच मधलं अंतर पार केलं. तो अजगरासमोर उभा ठाकला. अचानक झालेल्या त्या व्यत्ययाने अजगर गांगरला. त्याची वाघ्यावरची पकड ढिली झाली. चंद्राने त्वेषाने अजगराच्या डोक्यावर खंजीराने वार केला. खंजीराचे धारदार पाते सरळ अजगराच्या शरीरात घुसले. अजगर भयावह आवाज काढीत थोडा मागे वळला. मिळालेल्या संधीचा फायदा उठवत वाघ्या अजगराच्या तावडीतून निसटला. त्याचा श्वास गुदमरला होता. धापा टाकीत तो काही क्षण उभा राहिला. बाजूला चंद्राला बघताच वाघ्यालाही अवसान चढले. जोरजोराने भुंकत त्याने अजगरावर चाल केली. त्याचवेळी चंद्राने सुद्धा ओरडत खंजीर परजित हल्ल्याचा पवित्रा घेतला. एकाच वेळी दोन शत्रू हल्ला करताहेत, हे बघून अजगराने काढता पाय घेतला. जखमी झालेला

तो अजगर वळून वेगाने झाडीत दिसेनासा झाला. .

अजगर दिसेनासा झाल्यावर घामाघूम झालेल्या चंद्राने सुटकेचा नि:श्वास सोडला. वाघ्या चंद्राच्या जवळ आला व कृतज्ञतेने चंद्राचे पाय. चाटू लागला. चंद्राला गहिवरून आलं. वाघ्याच्या डोक्यावर थोपटत चंद्राने त्याला कुरवाळले. आणखी किती संकटांना त्याला तोंड द्यावे लागणार याचा तो विचार करू लागला. या बेटावर येऊन एक दिवस झाला होता. आता त्याच्याजवळ होडी नव्हती. खंजीराशिवाय दुसरे शस्त्र नव्हते फक्त खाण्यापिण्याची चिंता नव्हती. इथे विविध फळे व कंदमुळे मिळणार होती. पाणीही भरपूर होते. इथे पावला-पावलांवर धोका होता. नरभक्षी आदिवासी, भयंकर प्राणी यांच्यापासून सुरक्षिततेसाठी एखादा चांगला आसरा शोधावा लागणार होता. किमान रात्रीच्या वेळी तरी निवांत झोपण्यासाठी एखादी जागा शोधावी लागणार होती.

वाघ्या व चंद्रा तसेच पुढे चालू लागले. मध्येच एक पिवळा धमक नाग सळसळत समोरून गेला. चंद्रा व वाघ्या जागवरच थबकले. त्या जातिवंत नागाचा डौलच तसा होता. थोडे पुढे गेल्यावर चंद्राला मोकळी जागा दिसली. तिथे थांबून त्याने सभोवार नजर फिरवली. बघावी तिकडे गर्द झाडी दिसत होती. बेटाचा आकार केवढा असावा त्याला अंदाज येत नव्हता. एवढ्यात त्याला डाव्या बाजूला थोड्या दूरवर एक विलक्षण दृश्य दिसलं. एका भल्यामोठ्या खडकावर त्यापेक्षा आकाराने खूप लहान असलेला गोलाकार दगड होता. व त्या दुसऱ्या गोल दगडावर पुन्हा एक मोठा गोलाकार खडक अलगद ठेवल्यासारखा राहिलेला होता. त्या तीन दगडांची रचना विलक्षण दिसत होती. निसर्गाची ती किमया होती. चंद्रा त्या खडकाजवळ पोहोचला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, ते खडक लांबून दिसत होते त्यापेक्षा खूपच मोठे होते. चंद्राने त्या दगडांना फेरी मारली. अगदी व्यवस्थित व मजबूतपणे खालचा खडक जमिनीवर रोवला होता. सुमारे दोन पुरुष उंचीचा तो दगड होता व त्याचा घेरही तेवढाच होता. मधल्या लहान दगडामुळे व वरच्या मोठ्या दगडामुळे मध्ये गुहेसारखी - खोबण तयार झाली होती. एक-दोन माणसे आरामात झोपू शकतील एवढी जागा तिथे दिसत होती. जंगली प्राण्यापासून सुरक्षित अशी ती जागा होती. चंद्राने पहिल्यांदा वाघ्याला वर चढवलं. दगडाला असलेल्या खाचांचा आधार घेऊन तो वर चढला. मधला दगड त्याच्या उंचीएवढा होता. त्यामुळे त्याला जेमतेम उभे राहता येत होते. किमान आजची रात्र इथे निवांतपणे झोप घेता येणार होती. थोड्या उंचीवर ते असल्याने प्राण्यांपासून सुरक्षित राहू शकणार होते. आजची रात्र तिथेच काढण्याचा निश्चय चंद्राने केला.

-----------------भाग३ समाप्त---------------------