मराठी नितीकथा ५
-----------------------
"सद्गुणाचे नाटक" मच्छिंद्र माळी,
पडेगांव,औरंगाबाद.
एका गावात शांताबाई आणि कांताबाई अशा दोघी शेजारी शेजारी रहात होत्या. शांताबाई नावाप्रमाणे सुशिल, शांत वृत्तीची पतिसेवा परायण होती याउलट कांताबाई नव-
-याशी सतत भांडून आकांत करणारी.शेजारणीचे सत्वशील वर्तन पाहून तीही तिच्या वागण्याची नक्कल करुन आपणही काही कमी नाही असं नाटक करायची. त्याकरिता ती सतत शांताबाईवर पाळत ठेवून असायची.
एके दिवशी दुपारी शांताबाई मुसळाने भात कांडत होती.तितक्यात तिचा पती बाहेरगावाहून आला व त्याने बाहेरुनच पाणी मागितले. त्यावेळी तिच्या हातातले मुसळ वर गेलेले होते. पतिसेवेत तत्पर शांताबाईने पतिसेवा करणेसाठी मुसळ तसेच वर अधांतरी सोडून ती ताबडतोब उठली पण पातिव्रत्त्याचा प्रभाव म्हणुन मुसळ तसेच वर अधांतरी लटकून राहिले. हा चमत्कार शेजारच्या कांताबाईने पाहिला व या प्रकाराचे कारण विचारले असतां " पतिव्रतेच्या सामर्थ्याचा हा प्रभाव असतो" हे तिला समजले.
दुसरे दिवशी तिलाही वाटले आपणही पतिसेवेचे नाटक करून आपले हातातील मुसळही अधांतरी ठेवून दाखविण्याचा चमत्कार करून दाखवावा म्हणुन तिने पतिसेवा करायला सुरूवात केली. पतिला दुपारी कोठेतरी बाहेर जाऊन या व दारातूनच हाक मारून पाणी मागवा, मी पाणी घेऊन येईल. असे बजावलं. पती बाहेर गेला तोवर भात आणुन मुसळाने कांडत बसली.थोड्याच वेळात बाहेर गेलेला तिचा पती परत आला व तिला हांक मारली. तिने हातातील मुसळ वर फेकलेव ती पाणी घेणेसाठी उठू लागली.पण ते मुसळ वर अधांतरी राहिले की नाही? हे पाहण्यासाठी तिने वर पाहिले इतक्यात ते मुसळ धपकन तिच्या तोंडावर आदळले. तेव्हा तिचे समोरचे दोन दात पडले. तिला भयंकर राग आला.ती पतिला पाणी देण्याऐवजी शिव्याच देऊ लागली.
तात्पर्यः- " कर्तव्यात एकाग्रता व श्रध्दा हवी. दुसऱ्यांच्या सद्गुणांचे नकली सोंग आणुन चमत्कार करता येत नाही. सद्गुण हे प्रयत्नपूर्वक मिळवावे लागतात."
*******************************************
मराठी नितीकथा ६
--------------------
" सोडवणूक " मच्छिंद्र माळी
पडेगांव, औरंगाबाद
साधू संन्याशी हे लोकांताऐवजी एकांत का पसंत करतात ? हा प्रश्न सतत मला पडत असे पण प्रसंगाने माझ्या प्रश्नाचे ऊत्तर आपोआप मिळाले.
मी प्रापंचीक असलो तरी साधु-संतांचा ब-यापैकी लळा होता.
एके दिवशी मला परिचित आसलेले मठाधिपती श्री ज्ञानानंद महाराज संन्याशी मुक्कामी आले होते.मी त्यांची माझे परिने शक्य होईल तशी बडदास्त ठेवली होती.त्यांचा माझेवर नेहमी कपाशिर्वाद असायचा.
सकाळी ज्ञानानंद महाराज ओट्यावर खाटेवर बसले होते.मीही त्यांचेजवळच ओट्यावर खाली बसलो होतो. एव्हढ्यात दारूच्या व्यसनात बुडालेला,दुःखी झालेला पण हे व्यसन सुटावे अशी आता तीव्र ईच्छा निर्माण झालेला, रात्रीची नशा उतरलेला गुजराचा नाम्या दारु सोडण्याचा उपाय विचारण्यासाठी आला.त्याने ज्ञानानंद महाराजांचे पाय धरून म्हणाला,"महाराज दारुचे व्यसन काही केल्या सुटेना कृपया मला काहीतरी मार्ग दाखवा.मला या व्यसनाच्या बंधनातून सोडवा."अशी विनती करु लागला. त्यावर महाराज काहीही न बोलता पटकन खाटावरुन उठले व समोर असलेल्या लींबाच्या झाडाजवळ गेले. झाडाच्या खोडाला घट्ट मिठी मारून मोठमोठ्याने ओरडू लागले "सोडवा हो सोडवा,मला कोणीतरी सोडवा.हे झाड मला सोडतच नाही. "महाराजांची ही कृती पाहुन नाम्या म्हणु लागला,"अहो महाराज झाडाने तुम्हांला पकडलेले नाही तर तुम्हीच झाडाला मिठी मारली आहे.तुमची पकड तुम्ही सोडवा म्हणजे आपोआप झाडापासून बंधनमुक्त व्हाल."ज्ञानानंद महाराजांना हेच अपेक्षित होते.नाम्याला उपदेश देण्याची हीच योग्य वेळ आहे.ते नाम्याला म्हणाले,"अरे नामदेवा मला झाडाने पकडले नाही हे तुला पटकन समजले पण दारुने तुला धरले नसुन तु दारूला धरले आहे हे तुला का समजत नाही?"तुकारामांनी देखिल सांगितले कि,'आपली आपण करा सोडवण| संसारबंधन तोडा वेंगी||' अर्थात त्या तेव्हापासून "नाम्याचा नामदेव"झाला.
तात्पर्यः"माणसाला कळते पण वळत नाही.मनाचा ठाम निश्चय झाल्यास भयंकर व्यसनही सहज सोडू शकतो".
*********************************************