आयुष्यात बऱ्याच गोष्टी अचानकपणे कोणतीही चाहूल न देता घडतात, त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे प्रेम. ते सहजपणे होतं आणि अगुष्यभरासाठीच्या आठवणी देऊन जातं. आता प्रेमप्रकरण जेवढं गुलाबी गुलाबी वाटतं तेवढंच त्यामध्ये काही बिनसलं, वाद झाले की मग ब्रेकअप होतं. ज्याचं दुःख हृदयावर झेलून कितीतरी जण आपले आयुष्य कंठत असतात. पण माझ्यामते आयुष्यात एकदातरी ब्रेकअप व्हायला हवंच. आता हे मी का म्हणत आहे, हे तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचल्यावर कळलेच. असं म्हणण्यामागे नक्की कारण तरी काय आहे, जाणून घ्या!
१. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन
ज्यांचं ब्रेकअप होतं ती लोकं मनाने खूप हळवी होतात. बाहेरच्या जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलतो. ते अधिक संवेदनशील होतात. व्यावहारिक दृष्टीने निर्णय घेतात. अधिक सजग राहून ते काम करायला शिकतात.
२. भावनिकदृष्ट्या आत्मनिर्भर
नात्यात असताना एकेमकांच्या प्रेमात असल्याने भावनांची तीव्रता एकमेकांवर अवलंबून असण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा ब्रेकअप होतं तेव्हा तुम्ही तुमच्या भावनांना अधिक महत्व द्यायला सुरुवात करता. झालं गेलं विसरून जाऊ, असं म्हणत भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता अधिक वाढीस लागते. आपल्या भावनांवर ताबा ठेवण्यासाठी तुम्ही स्वतः सक्षम होता.
३. करिअरमध्ये गुंतवणूक
जसे तुमचे ब्रेकअप होते तसे तुम्ही अधिक वास्तविक जीवनाकडे पहायला सुरूवात करता. स्वतःसाठी नव्या संधी शोधता, निर्माण करता. इतकंच काय, आपल्याला आयुष्यात आता नेमकं काय करायचं आहे, याबद्दल जास्त सजग राहता. तुम्ही सगळ्यात जास्त लक्ष तुमचे करिअर चांगले करण्यामध्ये देऊ लागता.
४. मोकळीक मिळते
आपल्यावर कोणी सतत लक्ष ठेवायला किंवा छोट्या मोठ्या गोष्टीत टोकायला नसते. त्यामुळे आपल्याला हवं ते आणि हवं तसं वागण्याची मुभा असते. आपल्या मर्जीचे मालक याप्रमाणे स्वातंत्र्य अनुभवता येते. तुम्ही तुमच्या त्या स्थितीवर मात केल्यावर तुमच्या लक्षात येते की, एकटे जीवन जगणे देखील किती छान आणि मजेशीर असते.
५. खरे मित्र कळतात
एकाच व्यक्तीमध्ये गुंतून राहिल्याने तुम्हाला आजूबाजूच्या जगाचे काहीच भान नसते. जसे ब्रेकअप होते तसे तुम्हाला आजूबाजूचे लोक दिसू लागतात. तुम्ही खऱ्या अर्थाने जगात येता आणि मग तुम्हाला मित्रांची गरज भासू लागते. अशावेळी तुमची मदत करणारे, तुमची भावनिक स्थिती ओळखून आधार देणारे, मानसिकता समजून घेऊन त्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी मदत करणारे खरे मित्र तुम्हाला समजतात.
६. उत्तम व्यक्ती बनता
आधीपेक्षा तुमच्यामध्ये खूप सारे भावनिक, शारीरिक, मानसिक बदल होतात. जे खऱ्या अर्थाने तुमचे आयुष्य योग्य मार्गावर नेतात आणि तुम्हाला उत्तम व्यक्ती बनवतात. एक माणूस म्हणून तुमची प्रगती होती. तुमचे विचार अधिक प्रगल्भ होतात.
७. समाधानी राहता
तुमच्यामध्ये जे बदल घडून येतील त्याबद्दल तुम्ही ब्रेकअप केल्याचे आभार मानाल. एक नव्या व्यक्तीत तुमचे झालेले रूपांतर निश्चितच तुम्हाला एक सकारात्मकता देईल. स्वतःचा खरा शोध, स्वतःचे अस्तित्व समजल्याने तुम्ही समाधानी राहाल.
८. संयमी व्हाल
ज्या दुःखातून तुम्ही बाहेर आला आहात ते दुःख तुम्हाला अधिक संयमी बनवायला मदत करेल. गोष्टीसाठी वेळ घ्यायला शिकाल. लगेच निर्णय घेऊन पाऊल उचलणे थांबवाल.
९. जागृत राहाल
ब्रेकअप नंतर डोळे झाकून नाही तर डोळे, कान सगळेच उघडे ठेवून गोष्टीकडे पाहायला सुरुवात कराल. आपल्यासाठी काय चांगले, काय वाईट याकडे लक्ष द्याल. जागृत राहून आजूबाजूला पहाल आणि मगच निर्णय घेण्यावर भर द्याल.
१०. धाडसी व्हाल
नवनवीन गोष्टी करून पाहण्यासाठी तुमच्यामध्ये धाडस येईल. कोणाचाही विचार न करता तुम्हाला जे वाटेल ते करण्यावर तुमचा भर असल्याने तुम्ही धाडसाने योग्य निर्णय घेऊन वाटचाल करत राहाल.
तुम्हालाही आयुष्यात एकदातरी ब्रेकअप का व्हायला हवं यामागची ही दहा कारणं नक्कीच पटली असतील. अर्थात यासाठी नात्यात असणाऱ्यांनी लगेच ब्रेकअप करायची गरज नाही. पण हो, ज्याचं नुकतंच ब्रेकअप झालं असेल आणि ते याबाबतीत खूप दुःखी असतील, स्वतःला दोष देत असतील त्यांनी मात्र या गोष्टी जाणून घ्या. आहे ती गोष्ट स्वीकारा आणि स्वतःला बदलण्यासाठी वेळ द्या. तुम्हाला हा लेख कसा वाटला तेही आम्हाला जरूर कळवा.