‘हे’ आहेत कृष्णाचे ‘पाच’ महान भक्त… शिना ब्लूपॅड द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

‘हे’ आहेत कृष्णाचे ‘पाच’ महान भक्त…

कृष्णाचे रूप, त्याच्या लीला, त्याचे प्रेम, ज्ञान सारेच कसे मोहवणारे आहे. असं कोण आहे जो या मनोहर बासरीवाल्याच्या प्रेमात पडणार नाही! त्याच्या भक्ती रसात अनेक भक्त कृष्णमय झाले. जात पंथ धर्म यापल्याड गरीब कबीर संत झाला तर राज वैभवाची राणी मीरा कृष्णाची दासी झाली. कृष्णाच्या देवात्वाने या या व्यक्ती सुद्धा महान आणि वंदनीय ठरल्या. अशाच पाच महान कृष्णभक्तांविषयी जाणून घेऊयात आजच्या लेखात.

१) मीरा

मेरे तो गिरधर गोपाल दुसरो न कोई।
जाके सिर है मोर मुकुट मेरो पति सोई॥
कृष्ण भक्तीचा अगाध गोडवा म्हणजे मीरा. मीरा ही सोळाव्या शतकात होऊन गेलेली कृष्ण भक्त. ती जोधपूरचे रतनसिंह राठोड यांची कन्या होती. घरात धन वैभवाची काहीच कमी नव्हती. लहानपणी घरा शेजारी लग्नाची वरात आली असताना तिने आईला प्रश्न केला की माझा पती कोण आहे. तेव्हा तिच्या आईने कृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखवले. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी त्यांचा पती, सखा, सर्वस्व हे कृष्णालाच मानले. तिचा विवाह महाराणा सांगा यांचा मुलगा भोजराज सोबत झाल्यानंतर सुद्धा मीरा कृष्णभक्तीत लीन होती. मीरेने आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडल्या असल्या तरी तिचे मन संसारात कधीच लागले नाही. तिचा संसार आणि सुख केवळ कृष्ण होता. समाजातून अनेक आरोप झाले, विषप्रयोग झाले पण मीरा त्यातून वाचली. पुढे उत्तर भारतात गेल्यावर तिला गुरू संत रोहिदास यांचे शिष्यत्व लाभले.

२) सूरदास

कृष्णाच्या भक्तीमध्ये रममाण होऊन ज्यांनी सुरसागर लिहिले असे कृष्णभक्त म्हणजे सूरदास. त्यांचा जन्म मथुरा येथील रूनकता येथे झाला. त्यांचे नाव मदनमोहन असे होते. त्यांचे वडील रामदास हे गायक होते. त्यामुळे लहानपणीच त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले होते. यमुनेच्या किनाऱ्यावर बसून ते गीत लेखन करायचे. एके दिवशी यमुनेच्या तीरावर गीत लेखन करताना त्यांना एक सुंदर युवती दिसली. सूरदास तिच्या प्रेमात पडले. पण ती विवाहिता आहे कळल्यावर सूरदास यांना स्वतःची लाज वाटली. त्यांनी तापलेली सळईच आपल्या डोळ्यात घालून डोळे फोडले. त्यांना अंधत्व आले. वल्लभाचार्यांनी त्यांना दीक्षा देऊन कृष्ण लीला भजन गायनासाठी प्रोत्साहित केले. नंतर त्यांनी सुरसागर, सूरसारावली, साहित्य-लहरी असे प्रसिद्ध साहित्य लिहिले.

३) राधा

जिथे कृष्ण तिथे राधा ही आलीच. राधा ही कृष्णाची परम आणि श्रेष्ठ भक्त होती. तिला महालक्ष्मीचा अवतार असेही म्हणतात. राधेचा विवाह यादव कुळातील एका अनय ह्या सामान्य तरुणाशी झाला होता. तिने आपल्या सर्व सांसारिक जबाबदाऱ्या नेटाने सांभाळल्या. कृष्णाच्या ६४ कला ह्या गोपिका होत्या. तर त्या गोपिकांची महाशक्ती राधा होती असं म्हणतात. गर्ग संहितेत दोघांच्या लीलांचे वर्णन आढळते. राधा ही कृष्णाचा आत्मा होती. कृष्णाला दोनच गोष्टी खूप प्रिय होत्या एक म्हणजे बासरी आणि दुसरी राधा. भारतीय प्रेमाचे प्रतीक म्हणून राधा ही पूजनीय आहे.

४) उद्धव 


भागवतानुसार उद्धव हा कृष्णाचा परम मित्र आणि देवगुरू बृहस्पतिचा शिष्य होता. कृष्णाचे चुलते देवभाग यांचा हा मुलगा होता. त्याची कृष्णावर अपार भक्ती होती. कृष्ण मथुरेला गेल्यानंतर गोपिका, नंद, यशोदा, सर्व गोकुळवासी अत्यंत दुःखी होते. गोपिकांचा वियोग, आई वडिलांचे दुःख कमी करण्यासाठी कृष्णाने उद्धवला गोकुळात पाठवले होते. यादव कुळाच्या विनाशानंतर कृष्ण अवताराचा त्याग करतताना उद्धवाने कृष्णा बरोबर येण्याची विनंती केली होती. परंतु कृष्णाने त्याला "योग मार्ग" सांगून उपदेश केला. हाच उपदेश उद्धव गीता म्हणून प्रसिद्ध आहे.

५ )जयदेव


संस्कृत साहित्यात कृष्णलीला आणि कृष्णगान करणाऱ्या महाक‌वी जयदेवाचे स्थान खूप मोठे आहे. जयदेव सदैव कृष्ण भक्तीत डुंबून कृष्णाचे नाम स्मरण करायचे. जयदेव गावाबाहेर एक पर्णकुटी बांधून रहात होते. त्याच गावात देवशर्माची मुलगी पद्मावतीसोबत त्यांचा विवाह झाला. जयदेव यांनी जगन्नाथपुरी येथे राहूनच तिच्यासह आनंदाने संसार केला. कृष्ण भक्त जयदेवाने गीतगोविंद हे पहिले रसकाव्य लिहिले.

आयुष्याचे सार प्रेम आहे अस सांगणाऱ्या कृष्णाचा मार्ग या भक्तांनी अनुसरला आणि त्यांचे जीवन धन्य झाले. मनुष्य जेव्हा जीवनात दुःखांना सामोरे जातो तेव्हाच भक्ती, आध्यात्माकडे तो धाव घेतो. भक्ती परंपरेत असे अनेक संत महंत होऊन गेले ज्यांनी मनुष्याला भक्तीचा, शुध्द आचार विचारांचा मार्ग दाखवला. आपणही ह्या मार्गावर चालून आपले आयुष्य भक्तिमय करू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा.

https://www.bluepad.in/article/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%95-125916