धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 1 Dr.Swati More द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 1


धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 1
विजांच्या कडकडाटने अचानक जाग आली.. मोबाईल बघितला, तर पहाटेचे साडेतीन वाजले होते..
थोड्याच वेळात आम्हाला माथेरानसाठी निघायचं होतं..

तसा मी सव्वा चारचा गजर लावला होता पण "दामिनी मॅडमनी" थोडं अगोदरचं मला उठवलं..
बेडरूमचा पडदा बाजूला करून बघितलं तर मॅडम एकट्याच नव्हत्या त्यांच्या सोबत वरुण देवही आपलं अस्तित्व दाखवत होता..... मनात आलं आज काही खरं नाही आपल्या ट्रिपचं ...

तशीच थोडा वेळ पडून राहिले पण झोपच येईना मग उठून तयारीला लागले..
अनिलला उठवून अंघोळीला जायला सांगितलं.. फक्कडसा चहा बनवावा या विचाराने मी दुधासाठी फ्रिज उघडला..

अरेच्चा ! दुध कुठं गेलं. काल तर अगदी आठवणीने चहा पुरतं काढून ठेवलं होत.. आधी वाटलं माझी झोप उडाली नाही.. म्हणून डोळे चोळले पण काही उपयोग झाला नाही.. फ्रिज मधे खरचं दूध नव्हतं.. माझं लक्ष्य सिंककडे गेलं तर त्यात दुधाचा ग्लास मला वाकुल्या दाखवत होता ..

मला अंदाज आला काय झालं असणार, आम्ही दोन दिवस घरी नसणार आणि आहे ते दूध खराब होऊ नये म्हणून आमच्या घरच्या मांजरीने कधी नव्हे ते रात्रीच दूध पिऊन टाकलं होतं..( चाणाक्ष वाचकांनी मांजर कोण ते ओळखलं असेलचं 😀😀)

दुध नाही, मग चहाही नाही. माझ्या कपाळावर बारीकशी आठी उमटली.. माझ्या हुशार नवऱ्याच्या एव्हाना सगळ लक्षात आलं होतं..

"मी बघून येऊ का खाली जाऊन दूध"..

"आत्ता, एवढ्या सकाळी , कोण देणार तुम्हाला दूध ?? असं मी जमेल तेवढ्या सौम्य शब्दात त्याला ऐकवलं..

तोही समजून गेला, आता जास्त काही बोलणं योग्य नाही, नाहीतर ज्वालामुखीचा कधी उद्रेक होईल सांगता येणार नाही..😁😁

"ऐक ना, कांदिवली स्टेशन वर मस्त चहा मिळतो, आज तिथंच चहा पिऊया, तू पटापट तयार हो.."

मी त्याच्याकडे "बल्ली मेरे अंदरके जानवर को मत जगा".. असा जळजळीत कटाक्ष टाकून आंघोळीला गेले..

आंघोळीहून बाहेर आले तर नवरा बाहेरून येऊन दरवाजा बंद करत होता..

"कुठे गेला होतात.." मी नजरेनेच विचारलं..

"अगं! खालचे आणि वरचे दोन तीन फ्लोअर चेक केले.. कोणाच्या फ्लॅटच्या बाहेर दुधाची पिशवी आहे का.."

त्याचं हे बोलणं ऐकून मी जी हसायला लागले..🤣🤣

काय म्हणू याला आता !! आपकी यही अदा हमारा दिल जीत लेती है..

आणि अशा प्रकारे आमच्या साहेबांनी माझा मूड फ्रेश करून टाकला..❤️❤️

"मम्मी पप्पा किती बोलता तुम्ही, झोपूही देत नाही.. मग बोलू नका आर्या मुळे उशीर झाला निघायाला.."

"बाळा, तू उठ आणि आवर पटकन, नाहीतर तू जो रात्री दुधाचा पराक्रम केला आहेस.. मम्मी माथेरान तुला इथंच दाखवेल.."

लेकीच्याही बहुतेक लक्षात आलं , काय झालं असावं ते..

मॅडम पटकन उठून आंघोळीला पळाल्या...

आम्ही तयार होऊन स्टेशनसाठी रिक्षा पकडली.. पाऊस अजूनही कोसळत होता.. त्याच्या तडाख्यातून रिक्षाही सुटली नाही..

"बसा आता.. नाहीतर पुढची कर्जत ट्रेन मिळणार नाही.." नवऱ्याने सूचना केली..

थोडं अंतर गेलो आणि रिक्षातून काही तरी आवाज यायला लागला.. आता हे काय नवीन ?? रिक्षावाल्याने रिक्षाला एक सणसणीत शिवी हासडली आणि तशातही तो रिक्षा पुढं पुढं दामटवत नेत होता..

त्याचं हे वागणं रिक्षाला आवडलं नसावं बहुतेक.. तिनं असहकार पुकारला आणि एक मोठा आवाज करून ती जागीच उभी राहिली..

आम्ही तिघेही एकमेकांकडे पाहू लागलो. अजून कांदिवली स्टेशन बरंच लांब होतं..
आमचं नशीब, तेवढ्यात एक रिक्षा बाजूने आली. तिच्यात बसून आम्ही स्टेशनवर पोहचलो..

कांदिवली ते दादर ट्रेन प्रवास करून , कर्जतच्या ट्रेनसाठी आम्ही दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर उभे राहून ट्रेनची वाट पाहू लागलो..
दमदार ,धमाकेदार अशी ही ट्रिपची सुरवात झाली ...

क्रमशः