हॉटेलच्या लॉबीत आम्ही स्थानापन्न झालो.. अनिलने रिसेप्शन काउंटरला जाऊन आमची ओळखपत्र जमा केली.. रिसेप्शनिस्टने हसून स्वागत केले आणि थोडा वेळ बसण्यास सांगितले..
लॉबी चांगलीच प्रशस्त होती.. एका बोर्डवर आजचा नाश्त्याचा आणि जेवणाचा मेनू लिहला होता.. मेनू बघून जेवण मस्तच असणार याचा अंदाज येत होता.. कमीत कमी पाच ते सहा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ नाश्त्यामध्ये होते.. दुपारच्या जेवणाचीही अशीच चंगळ दिसत होती.. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ आणि त्यात खूप सारे पर्याय... अस्सल खवय्ये लोकांसाठी तर पर्वणीच होती ही.. एकदम पैसा वसूल काम !! 😀😀..
बाजूच्याच बोर्ड वर .. संध्याकाळी कोणकोणते मनोरंजनाचे कार्यक्रम असणार आहेत याची लिस्ट होती.. त्यात संगीत खुर्ची, डी. जे. , डान्स आणि... बरंच काही. मला काही त्यात एवढा इंटरेस्ट नव्हता म्हणून मी जास्त वाचलं नाही..
तेवढ्यात माझे डोळे काहीतरी पाहून एकदम लकाकले..
पुस्तकांचं कपाट होतं ते.. अरे वा ! इथेही पुस्तकं, भारीच की !!
माझा एकंदर आवेश बघून , "आपण इथे आराम करण्यासाठी आणि फिरण्यासाठी आलो आहोत.." असचं काहीसं नवऱ्याची नजर मला सुचवत होती..
मी ही हळूच डोळे मिचकावून, नाही बाबा , नाही जात तिकडे असा त्याला डोळ्यांनीच प्रतिसाद दिला..
"सर, रूम तयार आहे "
रूम अतिशय नीट नेटकी आणि स्वच्छ होती.. टॉयलेटही स्वच्छ होते..
या ठिकाणी स्टँडर्ड ए. सी. रूम पासून ते डिलक्स, सुपर डिलक्स सर्व पर्याय उपलब्ध आहेत..
तुम्ही फक्त रूम घेऊ शकता किंवा रुम बरोबर जेवणाचे पॅकेज .. मला वाटतं, पॅकेज घेतलेलं परवडतं..
रूम मध्ये आल्या आल्या लेकीने घरच्या सारखा याही रूमचा ताबा घेतला.. सगळ्यांच्या बॅग्स नीट ठेऊन दिल्या.. गरजेच्या वस्तू टेबलावर व्यवस्थित मांडून ठेवल्या..
आम्ही दोघं मात्र , बेडवर अंग टाकून आडवे झालो.. प्रवासाचा शीण जाणवत होता.. थोडा वेळ एक डुलकी काढून मग बाहेर पडूया असं मी अनिलला सुचवलं..
माझं वाक्य संपवून मी त्याच्याकडे बघते तर स्वारी चक्क घोरायलाही लागलेली..
मला नी आर्याला हसायला आलं.. पण मी तिला खुणेनेच गप्प बसवले..
झोपु दे त्यांना..
माझेही डोळे आता पेंगुळले होते..
"ए मम्मी, भजी मागव ना.."
"बाळा ,तुला काय मागवायच ते रिसेप्शनला फोन करून मागव. आम्हाला आता झोपूदे " आणि मी निद्रादेवीच्या आधीन झाले..
तास दीड तास मस्त झोप काढून उठले तर बाळ टी. व्हीं वरती " तारक मेहता" बघण्यात गुंग होतं आणि बाजूलाच रिकामी भज्यांची प्लेट आणि चहाचा कप होता..
मी आशेने प्लेटकडे बघितलं ,काही ठेवलं आहे की नाही आम्हाला, पण त्यात भज्याच्या तुकड्यांचा साधा मागमूसही नव्हता..😁😁
"मम्मी, भजी काय सॉलिड होती गं"... जले पे नमक छीडकना इसे कहते हैं..🤨🤨
आमच्या संवादाने नवरा जागा झाला...
"चला फ्रेश होऊन थोडं मार्केट फिरून येऊया.."
मार्केट म्हटलं की माझा जीव की प्राण.. काहीतरी खरेदी होतेचं होते..
"चला चला.."
"तुम्ही दोघं जा, मी मस्त टी. व्ही. बघत बसणार आहे.. येताना मात्र मला खायला आणा आणि लवकर या.मला स्विमिंग पुल मध्ये जायचं आहे.."
"हो मॅडम, जशी आपली आज्ञा "..
मार्केट पर्यटकांनी फुलून गेलं होतं... काहीजण मस्त शॉपिंग करण्यात मग्न होते , काहीजण हॉटेल्समध्ये आणि टपरीच्या बाहेर उभे राहून खाण्याचा आस्वाद घेत होते..
तर काही जण माथेरान मधील पॉइंट्स बघण्यासाठी घोडेवाल्याशी पैशावरून घासाघीस करत होते..
आम्ही दोघं आरामात , रमत गमत पावसाळी वातावरणाचा आनंद घेत फिरत होतो..
मार्केट मध्येच "माधवजी पॉइंट" आणि एक गार्डन आहे.. तिथं जाऊन आम्ही दोघं शांतपणे बसलो.. गार्डनच्या समोरच खोल दरी होती.. मधूनच धुक्यात ती अदृश्य होत होती..
तिथंच बाजूला छऱ्याच्या बंदुकीने फुगे फोडायचा खेळ काहीजण खेळत होते.. अनीलचा आवडता खेळ हा..
त्यानेही घेतली बंदूक हातात..
"बघं हं .. हिरवा फुगा फोडतो आता.."
मी ही , फोडा बघू , अशा आवेशात त्याला आव्हानं दिलं..
आणि खरचं की , जो दाखवला तोच बरोबर हिरवा फुगा फोडला त्याने..
क्या बात है... मेरे शेर !!
आता शेरही जोशात आला होता .. बघता बघता एका मागून एक मी म्हणेन तो फुगा तो फोडत होता..
"अजून फोडू का.??."
"अहो नेमबाज ..बास झालं.. चला आता , लेकरू वाट बघत असेल.. "
आणि अशा प्रकारे.. पैसा वसूल खेळ दाखवत .. नवरोबाने बंदूक त्या स्टॉलवाल्याच्या हवाली केली..
हॉटेल वर आलो तर बाळ टांगा वरती करून मस्तपैकी बेडवर पसरलं होतं..
"मम्मी पप्पा , चला थोडा वेळ स्विमिंग पूल मध्ये जाऊया.. जेवण झाल्यावर तुम्ही काही येणार नाही.."
अर्धा, पाऊण तास पूल मध्ये मजा करून शॉवर घेतला..
तोपर्यंत दूपारच्या जेवणाची वेळ झाली होती.. स्विमिंग करून भूकही लागली होती.. आम्ही क्षणाचाही विलंब न करता भोजनाचा आस्वाद घ्यायला गेलो.. जेवण खरच चविष्ट आणि भरपूर व्हरायटी असणारं होतं..
मस्तपैकी झोप काढून संध्याकाळी सनसेट पॉईंटला जाऊया असं ठरलं..आम्हाला खूप सारे पॉइंट्स बघायचे नव्हते..
ज्यांना सगळे पॉइंट्स पहायची इच्छा असेल त्यांच्यासाठी घोडेवाले आणि डोलीवाले एकत्र पॅकेज देतात..
सनसेट पॉईंट मार्केट पासून साधारण चार ते पाच किलोमीटर वर आहे ..
आम्ही पाचच्या सुमारास निघून , रस्त्यात फोटो काढत काढत तासाभरात सनसेट पॉईंटला पोहचलो..
इथून सह्याद्रीचा विहंगम नजरा दिसतो.. अनिलने दूरवरचा पेब किल्ला आणि कड्यावरचा गणपती कॅमेरात कैद केला..
आरामात बसून , वडापाव खात सूर्यास्त एन्जॉय केला आणि परत हॉटेल वर आलो..
हॉटेल मध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू झाले होते.. तरुण वर्ग जरा जास्तच जोमात डान्स फ्लोअर वर थिरकत होता.. मला त्यात एवढा रस नसल्याने मी तिथं जास्त वेळ थांबले नाही..
अनिल होता थोडा वेळ..
"पप्पा, जायचं आहे का तुम्हाला नाचायला तर जा.. मी आहे ना तुमच्या बरोबर.."
पण बायको सोबत नाही म्हटल्यावर आमच्या कारभाऱ्याने तिथून काढता पाय घेतला..
रात्रीचे जेवण तर काय खाऊ आणि काय नको असं होतं.. इटालियन, पंजाबी, राजस्थानी , मुंबई स्पेशल पाव भाजी, पिझा आणि सोबत मांसाहारही..😋😋
तृप्त होऊन आम्ही आराम करण्यासाठी रूमकडे प्रस्थान केलं..
सकाळी चेक आउट असल्याने मी आवराआवर करायला घेतली..
त्यात बाळराजे पण लुडबुड करत होते.. तेवढ्यात माझं लक्ष मी माझा उद्या घालायाचा टॉप ज्या हॅंगरला अडकवून ठेवला होता तिकडे गेलं..
आर्याने त्या टॉपवरती ओला टॉवेल सुकायला अडकवला होता..
What is this nonsense !! मी जवळ जवळ किंचाळलेच आर्यावर..
आर्या आणि अनिल यांना आधी काय झालं तेचं समजलं नाही.. आणि नंतर समजलं तेंव्हा दोघं जे हसायला लागले..
मलाच कळेना , की ती दोघं माझा आवेश बघून हसत की माझं इंग्रजी ऐकून..🤔🤔
मम्मी, तुला काय होत गं ,मध्येच अशी इंग्रजी फाडतेस..!! 😁😁..
पण काहीही असो.. त्यांचं हसणं बघून.. मी ही हसायला लागले..😅😅
"सकाळी आपण सूर्योदय बघायला जाऊया का ग.."
"हो चालेल.."
"मम्मी, पप्पा झोपुद्या ना यार.."
"तुम्हाला सकाळी कुठं जायचं तिकडं जा, मला आठच्या आत उठवू नका.." अशी धमकी देऊन कन्यारत्न झोपलं एकदाचं..
सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली.. सहा वाजत आले होते..
यांना उठवलं ," जाऊया का बाहेर??.."
"चल.."
बाहेर मस्त धुकं पसरलं होतं. थोडावेळ एक फेरफटका मारून आणि गरम चहा पिऊन आम्ही रूमवर आलो..
बाळराजे अजून झोपले होते.. त्यांना उठवलं.. आंघोळ आटपून, नाश्ता करून आणि माथेरानच्या मजेदार आठवणी मनात साठवून दहा वाजता आम्ही मुंबईसाठी हॉटेलच्या बाहेर पडलो..
घरी आलो .. मी चपला दारातच टाकून टॉयलेटकडे पळाले..
बाहेर आले तर , त्या चपलेकडे बोट दाखवून,
What is this nonsense mummy??..
मला खिजवत दोघे बापलेक हसत होते... आता थोडे दिवस तरी ही दोघं मला असचं छळणार हे नक्की 😄😄