Dhukyat harvlelan Matheran - 2 books and stories free download online pdf in Marathi

धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 2



प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर तोबा गर्दी होती त्यातले बरेचजण पर्यटक वाटत होते. प्रवासाच्या बॅगा सांभाळत ट्रेनची वाट बघणारे एवढे पर्यटक बघितले आणि माझ्या मनात आलं, बापरे! सगळे माथेरानला निघाले की काय ? आपल्याला नेरळ स्टेशन येईपर्यंत ट्रेनमध्ये बसायला जागा मिळेल की नाही ??.

पण तेवढ्यात तेजस एक्स्प्रेसची घोषणा झाली.. मग समजलं की अरे ,हे सगळे तर गोव्याला चालले आहेत..
तेजस एक्स्प्रेस गेली आणि प्लॅटफॉर्म वरील गजबजाट थोडा कमी झाला..

कर्जत ट्रेनची वेळ होऊन गेली तरी ट्रेन यायचं नावचं घेईना..
माझा जीव परत वर खाली होऊ लागला.. कारण ही कर्जत ट्रेन आली नाही तर अर्ध्या तासाने असणाऱ्या खोपोली ट्रेनमध्ये आपल्याला काही चढायला मिळणार नाही आणि सकाळी अनिल जरी गंमतीने म्हटला असला तरी काय सांगावं आपल्याला इथचं माथेरान बघावं लागेल की काय 😲..

माझ्या विचारांचं चक्र सुरू असतानाच कर्जत ट्रेनची घोषणा झाली आणि माझा जीव भांड्यात पडला..

"मी पुढं होऊन जागा पकडतो.. तुम्ही दोघी पाठून या"

" पप्पा, फार हिरोगिरी करू नका, ट्रेन थांबल्यावर चढा "

" अगं आर्या, रोजची सवय आहे त्यांना लोकलच्या प्रवासाची, चढतील ते " मी आपली संधी साधून तेवढीच नवऱ्याची बाजू घेतली..

आता त्याची बाजू घेतली की त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं, माझं मलाचं कळेना 😀😀

तेवढ्यात ट्रेन आली.. बघता बघता आमचा जेम्स बाँड ट्रेन मध्ये घुसला सुध्दा.. आम्ही दोघी पाठून चढून आत गेलो तर "इकडे, इकडे या !!.. खिडकी पकडली आहे तुमच्यासाठी.." विजयी मुद्रेने आमचा हिरो आम्हाला बोलावत होता..

त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ( मग चढलो की नाही धावत्या ट्रेनमधे आणि पकडली की नाही खिडकी ) बघून..

"त्यात काय एवढं ,रिकामीच तर आहे ट्रेन.. आमच्या सोबत चढला असतात तरी जागा मिळाली असती.." मी एक सणसणीत टोला लगावला..

"जाऊद्या, तुम्हाला कदरच नाही माझी 😔😔"

"अहो, ऐका ना, मस्करी केली हो मी तुमची.. रागावू नका ना.."

मी येवढं बोलायचा अवकाश की स्वारीच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं..

"अहो, लैला - मजनू, बस करा आता तुमचं ! मम्मी खायला आणलं असशील तर दे , भूक लागली आहे " आणि अशा प्रकारे आमच्या बाळाने आम्हाला धाडकन जमिनीवर आदळलं..😅😅

मस्त खात खात, गाणी ऐकत दीड तास कधी गेला समजलंच नाही..

साधारण आठ वाजता नेरळ आलं..

नेरळ वरून माथेरान जाण्यासाठी शेअर टॅक्सी मिळतात.. शंभर रुपये प्रत्येकी ...स्वतःची कार घेऊन येणार असाल तरीही दस्तुरी नाक्यापर्यंतचं कार जाते.. तिथं कार पार्किंगची सोय आहे.. तिथून माथेरानला पोहचण्यासाठी आपल्याकडे , एकतर पायीच जा, घोडा किंवा डोली करा, असे पर्याय असतात..

टॉय ट्रेन हा अजून एक खूप चांगला पर्याय आहे.. अगदी नेरळ ते माथेरान पर्यंत टॉय ट्रेन जाते.. परंतु सध्या तिच्या फक्त अमन लॉज( दस्तुरी नाका ) ते माथेरान या दरम्यानचं फेऱ्या चालू आहेत.. साधारण दर एक तासाला एक फेरी..

आम्ही मात्र दस्तूरी नाका ते माथेरान हे अडीच किलोमीटर पायीच जायचं ठरवलं..

जसं आम्ही चालायला लागलो.. थोडं अंतर गेलो आणि मौसम एकाएक सुहाना होने लगा.. चारो ओर धुंद सी छा गई..

धुंद सकाळी काढत वाट
चालत होतो धुक्यात
गर्द धुके हे जणु उतरले
आकाशीचे नभ वनात..

कुठंतरी वाचलेल्या या चार ओळी अचानक आठवल्या..

मध्येच एखाद्या घोडेस्वाराचा"साईड साईड "असा आवाज आला की समजतं होतं.. कोणीतरी समोरून किंवा पाठून येत आहे... येवढं ते धुकं..

साऱ्या निसर्गाला जणु दिली आम्ही,
आमच्या आगमनाची वर्दी ..
तू आणि मी ,
सोबत धुक्याची गर्दी..❤️❤️ ( स्वरचित )

धुक्याची मजा घेत , मध्ये मध्ये फोटो काढत आणि व्हिडिओ शूटिंग करत आम्ही बाजारपेठेत येऊन पोहचलो..

"हॉर्सलॅंड हॉटेल" कुठं आहे, असं एका काकांना विचारलं..
"सरळ सरळ जा.. मज्जिद आली की पायऱ्यांनी वरती जा.. तिथेच आहे हॉर्सलॅंड हॉटेल.."

सकाळी दहाच्या सुमारास आम्ही हॉटेल हॉर्सलॅंड मध्ये दाखल झालो...

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED