खेळ जीवन-मरणाचा - 1 बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

खेळ जीवन-मरणाचा - 1

खेळ ? जीवन- मरणाचा
अमित सावंत चौवीस वर्षांचा एक साहसी युवक होता. डोबिंवली पश्चिम भागात एका जुनाट बिल्डिंग मधल्या फ्लॅटमध्ये राहायचा.घरची परिस्थिती बेताचीच. वडील रिटायर्ड पोस्टमन..तुटपुंजी पेन्शन.घरात दोन बहिणी... दोघींची लग्न व्हायची होती. आईला दम्याचा त्रास होता. अमितला हे सारं दिसत होत पण तो काहीही करू शकत नव्हता. गेली दोन वर्ष तो नोकरीच्या शोधात होता. ना वशिला ना पैसा त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हाती नकारघंटा येत होती. पदवीपर्यंतच शिक्षण वाया गेलं असच त्याला वाटत होत.अश्या परस्थितीमुळे तो अधिक बेडर आणि निडर झाला होता. परिसरात कुठेही साप आला की अमितला बोलावल जायचं. अत्यंत विषारी सापाना तो नुसत्या हातानं पकडायचा. मोटरसायकलवर स्टंट करायचा.अरेला कारे म्हणत मारमारीही करायचा.कोणत्याही धाडसी कामात तो पुढे असायचा.भीती हा शब्दच त्याला माहित नव्हता.घरात त्याच्या शब्दाला किंमत नव्हती. बेकार हा शिक्का त्याच्यावर बसला होता.वडील त्याला नेहमी हिणवायचे ' एक पैसा कमवायची अक्कल नाही अन चाललाय जगाच्या उठाठेवी करायला. '
आपला काहीच उपयोग नाही असा न्यूनगंड त्याच्या मनात निर्माण झाला होता.काहितरी अचाट कराव व बक्कळ पैसा कमवावा असच त्याला वाटत होत.दोन दिवसांपूर्वी त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता.
मेसेज असा होता.
' साहसाची आवड असलेल्यांसाठी पैसे कमावण्याची सुवर्णसंधी...साहसी खेळात भाग घेवून लाखो रुपये कमवा...'
त्या मेसेज खाली एक ऑनलाईन लिंक दिलेली होती.ती लिंक ओपन करून एक फाॅर्म भरायचा होता. सिलेक्शन झाल्यास पुढच्या सूचना ऑनलाईन मिळणार होत्या. खर म्हणजे असले मेसेज फसवण्यासाठी असतात अस म्हणत त्याने त्याकडे दुर्लक्ष केल पण तो मेसेज सतत त्याच्या डोक्यात रुंजी घालू लागला.त्याने यापूर्वी टिव्हीवर असे थरारक खेळाचे लाईव्ह कार्यक्रम बघितले होते.हे तसच असेल तर पैसा कमावण्याची संधी सोडू नये अस त्याच मन त्याला सांगू लागल. अखेर त्यानं ती लिंक ओपन केली....फाॅर्म भरला.त्यातल्या शेवटच्या वाक्याने तो क्षणभर थबकला....तिथे नमूद केल होत की या खेळात जीवाच बर वाईट झाल्यास पूर्ण जबाबदारी खेळाडूची राहिल व त्यापुढे सहीचा रकाना होता. पण जीवाला वैतागलेल्या अमितने सही स्कॅन करून फार्म भरला.
------------*--------*--------*---------*------
ईलियास शेख हा औरंगाबाद मधला तरूण. व्यवसायाने रिक्क्षाचालक वय अवघ एकोणीस वर्षे. वेगाच जबरदस्त वेड. सगळी वाहन चालवायचा. गर्दीतही गाडी तूफान वेगान चालवायचा पण कधी कोणाला गाडीचा स्पर्शही झाला नव्हता. चाकू- सूरे घेवून दादागिरी करायचा .पण शब्दाचा पक्का. औरंगाबादेत वातावरण तंग झाल की पोलीस पहिल्यांदा त्याला उचलून नेत.
त्याच्याही मोबाइलवर सहासी खेळाचा मेसेज आला.
' साला आपूनको पैसा नै मंगता पर गेम खेलना और औरोंका गेम करना अपुनका शौक है!' अस म्हणत त्यानेही जास्त विचार न करता फार्म भरला.
------*------*--------*---------*----------*-----*----
शायना परेरा ही गोव्यातल्या कळंगूट गावातली. कळंगूट बिचला लागूनच तिच्या डॅडचा बंगला होता.तिथेच त्यांचा कॅसिनो होता. लहानपणापासून डोळ्यासमोर सतत हिप्पी व देशी - विदेशी पर्यटकांना समोरच्या किनार्यांवर मौजमजा करताना तिने पाहिले होते.सतत गर्दी गडबड यात ती वावरली होती.हायस्कूल मध्ये असताना ती कराटे
चॅम्पियन बनली होती.त्यानंतर तिने जीम जाॅईन केला होता.काॅलेजमध्ये असताना तिने स्वतःची गँग तयार केली होती.म्हापसा- पणजीच्या रस्त्यांवरून ती चारपाच टवाळ पोरांना घेवून उघड्या जीपमधून दंगा करत जायची. पोलिसही तिला समज देवून थकले होते.कधी हिप्पींच्या टोळक्यासोबत सारा गोवा मोटरसायकलवरून भटकायची .बापाचा पैसा दोन्ही हातांनी उधळून टाकायची.तिच्यावर बंधन अस नव्हतच.तिने बाॅटनी विषय घेवून बीएस्सी केल होत.एकदा एका तरूणाने तिला प्रपोज केल म्हणून म्हापश्याच्या गार्डनमध्ये अस धोपटल होत की त्याला गाडीत घालूनच न्यावे लागले होते.डॅडी व्यतिरिक्त तिची मम्मी व छोटा भाऊ घरी होते. तिच्या मम्मीला घरकामाशिवाय दुसर्या कशातही रस नव्हता.
तिलाही साहसी खेळाचा मेसेज आला होता व तिने फारसा विचार न करता फार्म भरला होता. पैशांचा तिला हव्यास नव्हता पण साहसाचं वेड व आवड याचाच तिन विचार केला होता.
-------*--------*--------*-----------*-----------*---------
शिवम दुबे उर्फ़ शिवा हा बिहारच्या राणीगंज परीसरातला मुलगा. एकवीस वर्षांचा....तगडा पण अतिशय भडक डोक्याचा.चार भावंडातला सर्वात लहान....वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने एक गुंडाच्या डोक्यात भलामोठा दगड घातला होता...एवड्यावरच तो थांबला नव्हता तर त्या गुंडाचे दोन्ही गुडघे हाॅकीच्या स्टीकने फोडले होते. कारण होत त्या गुंडाने त्याच्या बहिणीची छेड काढली होती.भडकलेल्या शिवाने वयाचा व ताकदिचा विचार न करता त्या गुंडावर हल्ला केला होता.तो गुंड मेला अस समजून शिवाने तिथून त्वरीत पलायन केल .तो थेट महाराष्ट्रात नागपूरला पोहचला. एका बिल्डरकडे कामाला राहिला. त्या बिल्डरला त्याने दोन वेळा जीवावरच्या संकटातून धाडसान वाचवलं होत. बिल्डरच्या गळ्यातला तो ताईत बनला होता.आपल्या भावाप्रमाणे तो त्याला वागवत होता. पण त्याला आता या मिळमिळत जीवनाचा कंटाळा आला होता.काहीतरी थरारक कराव अस त्याला वाटत होत. म्हणूनच 'साहसी खेळाचा ' मेसेज बघून त्याने त्यात सहभागी होण्याच ठरवलं.
-----*-------*----------*--------*-----------*--------*----
पंधरा दिवसांनी अमित, ईलियास,शायना व शिवाला पुन्हा एक मेसेज आला. त्यांची या खेळासाठी निवड झाल्याचं कळवण्यात आल होत.त्यांना त्यासाठी मॅगलोर( कर्नाटक) येथे दहा दिवसात म्हणजे विस फेब्रुवारी पर्यंत पोहचायच होत.प्रवास खर्चासाठी प्रत्येकाच्या खात्यात पुरेशी रक्कम जमा करण्यात आली होती. शायनासाठी हा जवळचा प्रवास होता.तर शिवासाठी सर्वात लांबचा! खर म्हणजे या चौघांपैकी कोणच एकमेकांना ओळखत नव्हते.त्यांची कधीही भेट झाली नव्हती.
काही गोष्टी स्पर्धकापैकी कुणालाच माहित नव्हत्या.
एक म्हणजे
चौघांना मँगलोरात वेगवेगळ्या ठिकाणी हजर व्हायच होत. दुसरी गोष्ट म्हणजे चौघांची जन्मतारीख अठ्ठाविस फेब्रुवारी होती. हा योगायोग होता की आणखी काही? याची कल्पना कुणालाही नव्हती.नव्या सहासाच्या कल्पनेने चौघेही रोमांचित झाले होते.पण त्यांना माहित नव्हतं की भविष्यात त्यांच्या समोर काय येणार होते ते!
-------*-----------*----------*-----------*----------
अमितने निघण्याची सारी तयारी केली होती.त्याला बॅग भरताना बघून आईने त्याला हटकले.....
" काय रे, कुठे जायची तयारी करतोयस? काही भानगड तर नाही ना?"
" अग मित्रांसोबत मँगलोरात चाललोय. आठवडाभरात येईन."
" आता हे नसते धंदे कुणी सांगितले याला." .नेहमीप्रमाणे बाबा वैतागले.
अमितने त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्याने अठरा फेब्रुवारीला मुंबई मँगलोर रेल्वे पकडली साधारण दिड दिवसाचा प्रवास होता. सायंकाळची रेल्वे होती. स्लिपरकोचचे आरक्षण होत. प्रवासात मस्त झोप काढायची अस त्याने ठरवले.
दुसर्या दिवशी दुपारी तिन वाजता तो मँगलोर रेल्वे स्थानकावर उतरला.त्याला मिळालेल्या सूचनेनुसार त्याने मोबाईलवरून दिलेल्या नंबरवर फोन लावला. या गडबडीत तो कुणाला तरी धडकला.
" ईडियट....कित्येरे...दिसाना तुका?"
आवाज स्रीचा होता पण धारदार आणि चिडलेला. अमितने समोर बघितल.टि शर्ट व जीन परिधान केलेली....हातात तांब्याच कड असलेली एक तरुणी त्याच्यासमोर उभी होती.ती संतापाने त्याच्याकडे पाहत होती.तिचा एकंदर अवतार स्री पेक्षा पुरुषी जास्त होता.
" चुकून धक्का बसला...." तो ओशाळून म्हणाला.
" चुकून? परपझली धक्का द्यायचा वर चुकून झाल म्हणायचं. मूर्ख कुठचा!"
" हे बघ तू काय समजायचे ते समझ. मला वेळ नाहिय." अमित वैतागून म्हणाला. तो गर्दीतून वाट काढत गेट मधून बाहेर पडला. बाहेर त्याच्याठी कार उभी होती.फोनवर त्याला कारचा नंबर व ती कुठे पार्क केलीय त्याची सूचना त्याला मिळाली होती. बाहेर येताच त्याला उजव्या बाजूच्या कोपर्यात सांगितलेल्या नंबरची वॅगनॅर कार उभी असलेली दिसली. तो येताच ड्रायव्हरने मागच दार उघडल अमित आत बसताच कार सूरू झाली.
संतापाने घुमसत असलेल्या त्या तरूणीने तावातावाने हात झटकले.
"पुन्हा सापडला तर...दात घशात नाही घातले तर नाव शायना परेरा नाही लावणार. " ती तरूणी बडबडली.
होय ! ती शायना परेरा होती. तीसुद्धा स्पर्धक म्हणून मँगलोरात आली होती. तिच्यासाठी सुध्दा एक कार बाहेर वाट पाहत होती.कारचा नंबर व जागा तिला फोनवरून कळली होती.
त्याच रेल्वेतून शिवा व ईलियास शेख हे सुद्धा मँगलोरात दाखल झाले होते. त्यांच्यासाठी सुध्दा वेगवेगळ्या कार स्टेशनबाहेर उभ्या होत्या. नव्या साहसाच्या कल्पनेने रोमांचित झालेल्या या सर्वांना माहित नव्हतं की कुणीतरी त्यांना चक्रव्यूहात अडकवल होत.मरणाच्या तोंडात ते स्वतःहून दाखल झाले होते.
चौघांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं होतं.त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली होती. स्पर्धेतील अट म्हणून त्यांच्याकडचे मोबाईल त्यांना जमा करायला सांगितले होते. प्रत्येकाला एवढंच सांगितलं होत की दुसर्या दिवशी सकाळी त्याना स्पर्धेच्या ठिकाणी नेलं जाणार होत व तिथे गेल्यावर त्यांना खेळाचे स्वरूप व अटी सांगितल्या जाणार होत्या.
-------*---------*भाग एक समाप्त--------*---------*----