खेळ ?जीवन -मरणाचा (भाग -2)
सुलेमान करोल या नावाचा दबदबा मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये गेल्या पंधरावर्षापासून निर्माण झाला होता.
'सनकी' या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला सुलेमान अत्यंत क्रूर होता. अपहरण.....खून....अमली पदार्थांची तस्करी...खंडणीवसूली असे नाना उद्योग त्याने केले होते.त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.आज करोडोंच्या संप्पत्तीचा मालक असलेल्या सुलेमानच्या गुन्हेगारीच जाळ भारतातल्या प्रमुख शहरात पसरलं होत. त्याच्याशी विश्वासघात करणार्या लोकांच्या हातांची बोट तो तोडून टाकत असे.रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत विव्हळणार्या माणसांना बघून आनंदाने खदाखदाखदा हसत बसणे हा त्याचा आवडता खेळ होता.
तो मूळचा हैद्राबाद मधला.बालपणात त्याला खूप हाल अन वेदना सोसाव्या लागल्या होत्या . त्याचा बाप हैद्राबाद मधला
नामवंत उद्योगपती ...अतिशय थंड डोक्याचा...धंद्याच्या निमित्ताने त्याने अनेकांशी वैर पत्करले होते. बाहेर जेवढा थंड वागे तेवढाच तो घरात भडक डोक्याने वागे. साध्या-साध्या कारणांवरून तो बायकोचा पाणउतारा करी .हाती येईल ते फेकून तिच्यावर मारी...काही वेळा तर लाथा बुक्यांनी मारी.बिचारी आयेशा बेगम हे सारे निमूटपणे सहन करी.लहानगा सुलेमान भेदरून आपल्या अम्मीला होणारी मारहाण बघत असे. सुलेमान थोडा मोठा झाल्यावर बापाने त्यालाही सोडलं नाही. आई सोबत त्यालाही तो मारत असे. एकदा तर त्याने सुलेमानच्या गालावर जळत्या सिगारेटचा चटका दिला होता.बिचारा सुलेमान आईला बिलगून ढसाढसा रडला होता.आजही त्याच्या उजव्या गालावर तो डाग तसाच होता. त्यामुळे त्याचा गोरापान चेहरा विद्रूप दिसत होता.आजही आरश्यात पाहताना तो काळपट डाग दिसला की त्याचा चेहरा संतापाने आक्रसत असे.सुलेमान दहा वर्षांचा असताना त्याच्या अम्मीने ,आयेशाबेगमने मृत्यूला कवटाळले. त्यावेळी सुलेमान मनसोक्त रडला ..ते ही शेवटचे. यापुढे आपण रडायचे नाही....तर इतरांना रडवायचे. त्याना रडताना बघून आपण हसायचे असच त्याने ठरवले.
आयेशाबेगमच्या मृत्यूनंतर घरात सावत्रआई आली.खरतर कुजबुज अशी होती की आयेशाबेगमवर होणाऱ्या अत्याचारच कारण ही नवी बेगमच होती.तिच्याशी लग्न करण्यासाठी सुलेमांनचा बाप आयेशाचा छळ करत होता.सावत्रआई आल्यापासून सुलेमानच्या त्रासात भर पडली.पण आता सुलेमान निगरगट्ट झाला होता. बाप व सावत्रआई यांच्याविषयी त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला होता. तो बेभान झाला होता.चोऱ्या...मारामाऱ्या..पासून सुरुवात झाली.पुढे दरोडे .. लूटमारी...अपहरण इथपर्यंत त्याची प्रगती झाली.वयाच्या सतराव्या वर्षी त्याने पाहिलं खून केला तो ही आपल्या सख्खा बापाचा!
तो दिवस होता अठ्ठावीस फेब्रुवारी...त्याच्या बापाचा वाढदिवस...त्यांच्या बंगल्यात सुरू होता. बापाचा प्रचंड द्वेष करणाऱ्या सुलेमानने..बापाला संपवण्यासाठी तोच दिवस निवडला.मित्र व बेगमच्या सोबत केक कापणाऱ्या बापाला घरात घुसून सुलेमानने गोळ्या घातल्या.याच क्षणापासून सुलेमानचा ' सनकी ' डॉन बनला.त्या दिवसापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. मुंबई...हे त्याच्या काळया कारवायांच केंद्र बनले.साऱ्या भारतभर अन परदेशातही त्याने आपले हातपाय पसरले. देशभरातले पोलीस त्याच्या पाळतीवर होते.मोठ्या हुशारीने त्याने आपला धंदा पसरवला होता.तो स्थानिक गुंडांना हाताशी धरी त्यांना भरपूर पैसे देऊन काम करून घेई.तो आपला ठाव ठिकाणा सतत बदलत असे.काही विश्वासू माणसांशिवाय कोणालाच माहीत नसे तो कुठे आहे तो ? नामवंत वकील त्याच्यासाठी काम करत. बरेच राजकारणी लोक त्याचे मिंधे होते.देशातल्या प्रमुख शहरात त्याचे आलिशान बंगले होते.
२००५ सालात झालेल्या सूनामीत अरबी समुद्र व हिंद महासागर यांच्या मध्ये एक भूभाग समुद्रातून वर आला. साधारण बारा किलोमीटर परीघ असलेल्या या अंडाकृती बेटावर कुठच्याही देशाची मालकी नव्हती. याचा फायदा उठवत 'सनकी सुलेमानने ' त्यावर कब्जा केला.
स्वतंत्र राष्ट्र घोषित केले.स्वतःला त्याचा प्रमुख म्हणून जाहीर केले.हे सारे धंदे अवैध होते.पण कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही.या बेटाला त्याने ' चमन बेट ' म्हणजे ' स्वर्गीय बेट ' अस नाव दिले. पण प्रत्यक्षात ते त्याच्या काळया कारवायांचे केंद्र बनले होते.याच बेटाच्या पूर्व दिशेला त्याने एक अत्याधुनिक सोयी असलेलं ठिकाण बनवलं होत. बेटाच्या इतर भूभागावर छोट्या टेकड्या.. प्रवाळ खडके... दऱ्या.. .पाण्याचे प्रवाह....अंधाऱ्या गुहा दलदलींनी भरलेली फसवी तळी होती.गेल्या बारा- तेरा वर्षात विविध झाड झुडपे बेटावर तयार झाली होती.
सनकी सुलेमानच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली.रिॲलिटी शो प्रमाणे ' मौत का खेल ' हा खेळ प्रायव्हेट चॅनलवर दाखवून करोडो रुपये कमावण्याची ती कल्पना होती.मनात एखादी गोष्ट आल्यावर ती पूर्ण करण्यासाठी तो झपाटून कामाला लागे.त्याने आपल्या तंत्रज्ञांना कामाला लावलं. बेटावर अनेक ठिकाणी शक्तिशाली कॅमेरे बसवले. कुठलाही आवाज टिपणारे मायक्रोफोन बसवले.बेटावर कुठे काय चाललंय ते बसल्या जागी दिसावं याची त्याने सोय केली. खर म्हणजे बेटावर तोपर्यंत कोणत्याही प्राण्याचा वावर नव्हता.पण या खेळासाठी त्याने बेटावर नरभक्षक वाघ ... आफ्रिकन मगरी....अजगर...अती विषारी साप.....विषारी विंचू..... काही क्षणात जिवंत प्राण्याला खाणाऱ्या..मांसभकक्ष लाल मुंग्या... त्याने सोडल्या. क्रूर मानसिकतेच्या सुलेमानने कोणताही स्पर्धक जिवंत राहू नये याची पूर्ण खबरदारी घेतली होती. माणसांची जगण्यासाठीची धडपड....आकांत...त्यांची असाहयता....रडणं... बघायला त्याला आवडायचं. लोकांची ही धडपड ... लाईव्ह दाखवून पैसेही कमावता येतील हेही त्याने लक्षात घेतले.
त्याची कल्पना अशी होती की बेटावर काही माणसांना सोडायचे ...मर्यादित अन्न व पिण्याच पाणी उपलब्ध ठेवायचं. स्पर्धकांनी एकमेकांशी झगडून...अन्न ...पाणी मिळवायचे...जगण्याच्या या लडाईत जो एकमेव स्पर्धक राहील तो विजेता! या साठी त्याने विजेत्याला एक कोटी रुपयांचे आमिष ठेवले होते. दोन महिन्यांपूर्वी त्याने या जीवघेण्या खेळाचा पहिला भाग सादर केला होता. एकूण बारा स्पर्धक त्याने बेटावर सोडले होते.उपासमारीने त्रस्त झालेल्या या स्पर्धकांनी एकमेकांचा निर्दयपणे जीव घेतला होता. अखेर एक स्पर्धक शिल्लक राहिला होता. तो ही ..जखमी अवस्थेत. हा स्पर्धक जिंकला...अस घोषित करून त्याला एक कोटीचा चेक दिल्याचा लाईव्ह कार्यक्रम दाखवल्यावर त्याने त्याला गोळ्या घालून ठार केलं होत. या बेटावरून कुणीही बाहेरचा माणूस जिवंत जाऊ नये हाच विचार त्याच्या डोक्यात होता.
या वेळा दुसरा भाग सादर करताना...सुलेमानने ज्यांची जन्म तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी आहे असे दहा स्पर्धक निवडले होते.बापाचा राग त्याच्या मनात आजही होता.त्याच्या बापाची जन्मतारीख अठ्ठावीस फेब्रुवारी होती व याच दिवशी त्याने बापाला ठार मारले होते.आताही अठ्ठावीस फेब्रुारीला जन्मलेल्या माणसांना तडफडत मरताना त्याला बघायचे होते.या दिवशी जन्मलेल्या सर्व माणसांबद्दल त्याच्या मनात घृणा होती.अमित,इलियास, शायना व शिवा यांच्या शिवाय सहा विदेशी इसम या स्पर्धेत उतरले होते. ते सारे निर्वाढलेले गुंड होते.कुणाचाही गळा कापताना त्यांचा हात जराही थरथरत नव्हता.हे सारे मांजर जसे उंदराची शिकार करते तसे एकमेकांचे जीव घेणार होते.या खुनी खेळाची गंम्मत सुलेमान बंदिस्त रूममधे बसून घेणार होता.क्रूर प्राणी माणसांचे लचके तोडताना....किंवा मूठभर अन्नासाठी एकमेकांचे गळे कापणारी माणस बघून विकृत आनंद मिळवणारी माणस या जगात काही कमी नव्हती. या खेळात अंतिम विजेता कोण? यावरही लाखो डाॅलरचा सट्टा लावला जाणार होता.अठ्ठावीस फेब्रुवारीला या खुनी खेळाचा अंत स्वतः सुलेमान करणार होता.
त्याचा उजवा हात समजला जाणार रामनाथ मूर्ती साऱ्या तांत्रिक बाजू सांभाळत होता.खोटे ईमेल अकाऊंट तयार करून त्यावरून मेसेज पाठविणे. ईमेल करणे...प्रवासासाठी...पैसे पाठविणे हे सारे त्यानेच केले होते. एवढच नव्हे तर सुलेमाननच्या डोक्यात हा भयानक खेळ आल्यावर याची पूर्ण आखणी मूर्तीनेच केली होती. अगदी आताही मँगलोरात तो ठाण मांडून होता. दहाही स्पर्धकांवर तो लक्ष ठेवून होता.
सुलेमानने त्याला सक्त सूचना दिली होती की साऱ्या स्पर्धकांना ते भारतात असे पर्यंत खुश ठेवायचे. बकऱ्याला कापण्यापूर्वी त्याला खूप खाऊ घालून धष्टपुष्ट करतात अगदी तसेच! एकवीस तारखेला सायंकाळी मँगलोरातून दहा स्पीडबोटीतून सर्वाँना वेगवेगळ्या ठिकाणावरून घेऊन ' चमन बेटावर ' वेगवेगळ्या ठिकाणी उतरवल जाणार होत. तो पर्यंत त्यांना कसलीच कल्पना द्यायची नव्हती.
सुलेमान भल्या मोठ्या स्क्रीन समोर बसून साऱ्या स्पर्धकांची हालचाल पाहत होता.तगड्या विदेशी स्पर्धकांसमोर चार कोवळे तरुण कितीवेळ टिकतील हे त्याला पाहायचे होते.अमित, इलियास, शायना व शिवा यांना बघून सुलेमान खुश झालं होतं. या कोवळ्या तरुणांना जगण्यासाठी धडपडताना पाहण्यात मजा येणार होती. जीवनाच्या लड्यात सर्वोत्तम तोच टिकतो...या वैज्ञानिक सत्याची पडताळणी सुलेमान चवीने घेणार होता. आणि हो; त्या सर्वोत्तमला सुलेमान संपवणार होता.
या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ चार तरुण स्पर्धक निवांतपणे आपापल्या खोलीत आराम करत होते.पुढे काय घडणार ते काळच ठरवणार होता.
-----*----------*----------*--------*----------*--------*-----
भाग-2 समाप्त