साक्षीदार - 17 Abhay Bapat द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

साक्षीदार - 17




प्रकरण १७
कनक ओजस च्या ऑफिसात दोघे बसले होते.
“ पाणिनी, मानलं तुला, फार मस्त डाव टाकलास.तू तर सुटलासच आणि खुनी अशिला कडून लेखी जबाब घेण्यात ही यशस्वी झालास ! तू नेहेमी अशील निवडताना तो निर्दोष असल्याची खात्री असेल तरच निवडतोस पण पहिल्यांदाच तुझ्या अशिलाने तुला दगा दिला पाणिनी.” कनक म्हणाला. “ पण मला सांग पाणिनी, तुला अंदाज होता, काय झालं असावं याचा?”
“ मला होता अंदाज, पण अंदाज असणं आणि पुरावा मिळवणं या वेगळ्या गोष्टी आहेत. पण आता मात्र तिला वाचवायचं आव्हान आहे समोर.” शून्यात पहात पाणिनी पुटपुटला.
“ विसरून जा ते आता. पाहिली गोष्ट म्हणजे ती त्या लायकीची नाहीये.दुसरी गोष्ट म्हणजे तिने गोळी मारल्याची कबुली दिल्यामुळे ती आता फक्त सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी त्याला मारलं असा खुलासा देऊ शकते पण ती लंगडी सबब आहे कारण तिने लेखी जबाबात म्हटलंय की त्याच्याशी बोलताना खोलीच्या दुसऱ्या टोकाला उभी होती.म्हणजे त्याने तिला मारायचा प्रयत्न केलं म्हणून तिला बंदूक वापरावी लागली असा बचाव करू शकत नाही ती.”
“ न्यायाधीश जोवर तिला गुन्हेगार ठरवत नाही तो वर ती दोषी नाही.” पाणिनी म्हणाला
“ अरे बाबा, तिने लेखी दिलंय लिहून.” कनक म्हणाला.
“ ते लेखी निवेदन हे फक्त तिच्या विरुध्द सरकारी पक्षाने जमा केलेल्या अनेक पुराव्या पैकी एक पुरावा आहे. एवढंच. ” पाणिनी म्हणाला
“ मला वाटत नाही पाणिनी, ती आता तुला वकील म्हणून इथून पुढे ठेवेल.या खुनाच्या प्रकरणात ती दुसरा वकील ठेवेल.” कनक म्हणाला.
“ कनक, मला त्या मंगल वायकर बाई ची जन्मा पासून ची माहिती हव्ये.” कनक च्या मता कडे दुर्लक्ष करून पाणिनी म्हणाला.
“ म्हणजे ती मोलकरीण?”-कनक
“ ती आणि तिची मुलगी सुषुप्ती.दोघींची.सगळंच कुटुंब.” पाणिनी म्हणाला
“ ती काहीतरी दडवत्ये असं वाटतंय तुला?”-कनक
“ वाटत नाहीये, मला माहित्ये ते.”

“ठीक आहे मी त्या मोलकरणीचा शोध घेण्यासाठी माझी काही माणसं तिच्यावर सोडतो त्या चेन्नई मधल्या माहितीचा तुला काय उपयोग झाला?” कनक नं विचारलं.
“हो खूपच. पाणिनी पटवर्धन म्हणाला.
“त्या मोलकरणी बद्दल नेमकं काय माहिती काढून देऊ”-कनक
“सगळी. जेवढी तुला मिळेल तेवढी सगळी. आणि तिच्या मुली बद्दल पण. सगळे शोध. एकही मुद्दा, माहिती, सोडू नकोस.” पाणिनी म्हणाला.
“तू माझ्यापासून काही तरी लपवतोय आहेस का? कनकने विचारलं.
“ मी तिला यातून बाहेर काढणारे” पाणिनी म्हणाला.
“ तू कसं करणार आहेस ते? तुला काही कल्पना आहे का स्वतःला?” कनकने विचारलं “माझ्या मनात एक कल्पना आहे”
“तिने तुला खुना च्या आरोपात ओढले तरीसुद्धा तू सोडवणार आहेस तिला?”
“ हो तरीसुद्धा सोडवणारे”
तू तुझ्या अशिलाच्या फारच प्रेमात असतोस पाणिनी” कनक म्हणाला आणि त्याने पाणिनी पटवर्धन कडे रोखून बघितलं.
पाणिनी पटवर्धन पुढे बोलत राहिला, “हे बघ कनक, जे अशील अडचणीत असतात, त्यांची मी वकिली घेतो आणि त्यांना मदत करतो आणि त्यांना त्या अडचणीतून बाहेर काढायची माझी मानसिकता असते. ते कसे आरोपी आहेत हे मी न्यायाधीशांना दाखवत नाही ते कसे नाहीत ही बाजू मी न्यायाधीशांना नेहमी दाखवतो आणि शेवटी काय ते न्यायाधीशाच्यावर अवलंबून आहे. जर सरकारी वकील न्यायाची बाजू मांडत असतील तर माझा त्यांन विरोध नसतो पण आपल्याकडे तसं होत नाही ते न्यायाची बाजू मांडण्यापेक्षा वैयक्तिक रित्या आपली हुशारी कशी दाखवता येईल आणि कसे जिंकता येईल याचा प्रयत्न करतात. मी मात्र तसं करत नाही माझा प्रयत्न असतो की न्यायाची बाजू नेहमी मांडली जावी आणि ती मांडूनच आरोपीला सोडवता यावं.”
“अर्थात माझे सगळे अशील हे चांगले असतात असं नाही, अनेक जण चक्रम असतात पण शेवटी ते आहेत तसे मला स्वीकारावे लागतात. ते गुन्हेगार आहेत की नाही हे ठरवण्याचा मला अधिकार नाही, ते ठरवायचा अधिकार कोर्टाचा आहे. मी मात्र माझा अशील निवडताना ते गुन्हेगार नाहीत ना याची सकृद्दर्शनी तरी खात्री करूनच निवडतो आणि ते गुन्हेगार नाहीत असं गृहीत धरूनच माझा खटला चालवतो” पाणिनीम्हणाला.
“ तू त्या बाईला वेडी आणि चक्रम आहे असं सिद्ध करणार आहेस का? कनक ने विचारलं. पाणिनी ने आपले खांदे उडवले. “मी एकच करणारे न्यायाधीशांना गुन्हेगार म्हणून तिला सिद्ध करण्यापासून दूर ठेवणारे.”
“ ते बरोबर आहे तुझं पाणिनी, पण तिने लेखी जबाबात आपण गुन्हेगार असल्याचे कबूल केलय” कनक ने त्याच्या नजरेला आणून दिलं.
“ अरे लेखी जबाब असो वा नसो जोपर्यंत न्यायाधीश तिला दोषी ठरवत नाही तोपर्यंत ती दोषी नाही.” पाणिनी त्याला म्हणाला.
“ तुझ्याशी वाद घालण्यात काही अर्थ नसतोच. माझ्याकडे आता वेळ ही नाही. तू सांगितल्या प्रमाणे मी त्या मंगल वायकर बाईच्या मागे माझी माणसं लावतो आणि तुला कळवतो काय होतं ते.” कनक त्याला म्हणाला.
“ तुला सांगायची गरज नाही, की मी मिनिट आणि मिनिट माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. लवकरात लवकर मला हवा असलेला पुरावा तू मिळून दे फटाफट काम कर ”. पाणिनी म्हणाला
त्याने आपल्या ऑफिसचं दार उघडलं. सौम्या सोहोनी टायपिंग करत बसलेली होती. तिने त्याच्याकडे मान वर करून पाहिलं आणि पुन्हा आपलं काम करायला लागली.पाणिनी ने आपल्या मागे दार लावून घेतलं. तो तिच्याकडे गेला गेला.
“ तुझा माझ्यावर विश्वास नाहीये?” त्याने तिला हळुवारपणे विचारलं. सौम्या ने चमकून मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. “असं का म्हणता सर? अर्थात माझा तुमच्यावर विश्वास आहे.” ती म्हणाली.
“ नाही, तुझा नाहीये विश्वास माझ्यावर.”
“ तसं नाहीये सर, मला फक्त आश्चर्य वाटतय आणि माझा थोडा गोंधळ उडाला एवढंच “
ती म्हणाली.
तो तिला तसेच न्याहाळत थोडा वेळ उभा राहिला. “ठीक आहे तो म्हणाला
“सौम्या माझ्यासाठी एक काम कर, जरा नेटवर जाऊन एक माहिती शोध. त्या मंगल वायकर बाईची मुलगी म्हणजे सुषुप्ती वायकर , तिचं लग्न झालंय का? माझा अंदाज असा आहे की तिचे लग्न झाल असावं. आणि मला अजून असं ही हवय की तिचा घटस्फोट झालाय का?”
सौम्या सोहोनी ने चमकून त्याच्याकडे बघितलं. “सर लग्नाचा आणि घटस्फोटाचा या खुनाशी काय संबंध आहे” तिने विचारलं
“ ते जाऊ दे. त्याचा विचार करू नको. मंगल वायकर हे तिचं बहुतेक खरं आडनाव असावं म्हणजे तिच्या आईचं म्हणजे तिच्या लग्नाच्या दाखल्यावर तेच असावं. अर्थात अशी ही शक्यता आहे की तिचं लग्न झालं नसेल किंवा या राज्यात तिचं लग्न झालं नसेल. काही म्हण तिच्यात काही तरी विचित्र गमतीशीर बाब आहे हे नक्की. मला तरी तसं वाटतं. आणि असं वाटतय की तिच्या भूतकाळात काहीतरी घडलं असावं आणि ती काहीतरी लपवत असावी. म्हणजे हा माझा अंदाज आहे. एकंदरीत मी तिच्याशी बोलल्यावर मला असं वाटतंय आणि मला ते माहीत करून घ्यायचे आहे की ते नेमकं काय आहे.”
“ तुम्हाला असं वाटत नाहीये ना सर,की ती सुषुप्ती वायकर या सगळ्यात कुठेतरी अडकली असावी?” सौम्या नं विचारलं.
पाणिनी चे डोळे एकदम थंड होते आणि चेहरा निश्चल होता. “हे बघ सौम्या, मला हे सगळे एवढ्यासाठी हवंय, की न्यायाधीशांच्या मनात थोडासा संभ्रम आणि थोडी शंका उत्पन्न व्हायला हवी. तसं झालं तर मी ईशा ला नक्की याच्यातून बाहेर काढू शकतो. पाणिनी म्हणाला. एवढं बोलून तो ऑफिसातल्या आतल्या भागात गेला. आणि पुन्हा त्याने दार लावून घेतलं विचारात गुंतून त्याने इकडे तिकडे येरझार्‍या घालायला सुरुवात केली. जवळ जवळ अर्धा तास तो अशा पद्धतीने ऑफिस मध्ये येरझार्‍या घालत होता. अर्ध्या तासाने दार उघडून सौम्या आत आली. “सर तुमचा अंदाज बरोबर ठरला.” ती म्हणाली.
“ कसा काय ?आणि काय अंदाज?” त्याने विचारलं.
“ तिचं लग्न झालंय. सहा महिन्यापूर्वी. लोटलीकर नावाच्या माणसाशी. पण घटस्फोट झाल्याचं मात्र काहीही रेकॉर्डवर नाहीये” सौम्या ने त्याला माहिती पुरवली.
हे ऐकताच पाणिनी जवळ जवळ पळतच त्याच मजल्यावर असलेल्या कनक च्या ऑफिसात गेला.
“ कनक, आपल्याला ब्रेक मिळालाय. सुषुप्ती वायकर चं लग्न झालं होतं.”
“ बरं मग? त्याचं काय?” थंड पणे कनक ने विचारलं.
“ अरे तिचा कुणाल बरोबर साखरपुडा झालाय.” पाणिनी म्हणाला
“ ते वाचलं मी पेपरात. तिने घटस्फोट घेतला असू शकतो आधीच्या नवऱ्या पासून ” कनक म्हणाला.
“ तिच्या नवऱ्याचं नाव लोटलीकर आहे. त्याच्या शी घटस्फोट झाल्याचं कुठेही रेकोर्ड नाहीये.घटस्फोटासाठी वेळच नव्हता , फक्त सहा महिन्यापूर्वीच लग्न झालंय त्यांचं. ” पाणिनी म्हणाला
“बरं, तुला काय हवंय? ”
“ मला तिच्या नवऱ्याची इत्यंभूत माहिती हव्ये.ते एकमेकांपासून वेगळे का झाले? केव्हा? विशेषत: मला हवंय की सुषुप्ती , ईशा च्या घरी रहायला येण्यापूर्वी पासून कुणाल ला ओळखत होती की इथे आल्यानंतर त्यांची ओळख झाली.दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मला असं हवंय की अत्ता सुषुप्ती तिच्या आईला म्हणजे मंगल वायकर ला भेटायला आल्ये, त्या आधी ती आईला भेटायला कधी आली होती का ? ” पाणिनी म्हणाला
“ बापरे ! पाणिनी, मला वाटतंय की ईशा ला वाचवण्यासाठी तू या माहितीचा वापर कोर्टावर भावनिक दबाव टाकण्यासाठी करणार बहुतेक ” कनक ओजस उद्गारला.
“ तू ही माहिती काढायला लगेचच सुरुवात करशील का कृपा करून?”
“ तो याच शहरात असेल तर मला अर्ध्या तासात सुध्दा मिळेल माहिती.”
“ जेवढं लौकर होईल तेवढं बरं, मी ऑफीसलाच थांबतोय.”
एवढे बोलून तो तिथून बाहेर पडला आणि आपल्या ऑफिसमध्ये शिरला. सौम्या कडे त्याने वळूनही पाहिले नाही. तिला ही आश्चर्यच वाटलं. “ हृषिकेश बक्षी चा फोन आला होता.” ती म्हणाली.
पाणिनी ने बुवया उंचावल्या. “ कुठे आहे तो?”
“ त्याने सांगितलं नाही , तो म्हणाला मी नंतर पुन्हा फोन करीन.” सौम्या म्हणाली.
“ केस मधल्या नव्या प्रगती बद्दल त्याने वाचलं असेल पेपरात.”
“ तसही तो काही म्हणाला नाही.” सौम्या म्हणाली.
पुन्हा फोन वाजला.
“ त्याचाच असेल बहुतेक.” सौम्या म्हणाली.तिने फोन उचलला. “ हेलो, एक मिनिट मिस्टर बक्षी. ” ती म्हणाली आणि पाणिनी ला तिने खुणेनेच विचारलं की फोन घेणार का.पाणिनी ने मानेने हो म्हणून सुचवताच ती फोन मधून बक्षी ला म्हणाली, “ मिस्टर पटवर्धन आहेत इथेच , बोलतील ते, त्यांना देते.”
“ हेलो, बक्षी, काय म्हणताय?” पाणिनी म्हणाला
“ भयानक आहे हे पटवर्धन, मी पेपर मधे वाचलं ”
“ तुम्हाला वाटतं तेवढ हे कठीण नाही. तुम्ही खुनाच्या प्रकरणातून बाहेर पडला आहात आता. तुम्ही ईशा चे कौटुंबिक मित्र आहात असं सांगू शकता पोलिसांना. अर्थात हे काही सोपं नसणार पण खुनात अडकण्या पेक्षा बरं.”
“ पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावर माझ्या विरोधात प्रचार करतील.”.
“ कोणता मुद्दा?” पाणिनी म्हणाला.
“ ईशा शी असलेल्या मैत्रीचा” हृषिकेश म्हणाला.
“ त्याला माझा इलाज नाही पण मी अशी काही क्लुप्ती लढवणार आहे की सरकारी वकील, तुला अरोरा च्या खुनाचे कारण होते हे सिध्द करू शकणार नाहीत. ” पाणिनी म्हणाला
“ मला नेमकं हेच तुमच्याशी बोलायचं होत.प्राथमिक सुनावणी झाल्या शिवाय सरकारी वकील मला गुंतवूच शकणार नाहीत. तुम्ही अस काही जुगाड करा की प्राथमिक सुनावणीच होणार नाही.” हृषिकेश म्हणाला.
“ काय जुगाड करावं मी असं वाटत तुला? ”
“ म्हणजे ईशा ने त्याला जखमी करण्याच्या हेतूने गोळी झाडली.ठार मारावं असा तिचा हेतू नव्हता असं काहीतरी. म्हणजे तुमच्या वकीलांच्या भाषेत, सेकंड डिग्री मर्डर. सरकारी वकिलांशी मी बोललोय.ते तुम्हाला , हा मुद्दा बोलण्यासाठी म्हणून भेटायची परवानगी देतील.तुम्ही तिचे वकील आहात अजूनही.”
“ असलं काहीही मी करणार नाही.” पाणिनी त्याला झिडकारत म्हणाला. मी तुला वाचवीन पण ते माझ्या पद्धती प्रमाणे.तू अजूनही काही दिवस लपूनच रहा.” पाणिनी म्हणाला
“ पटवर्धन, तुम्हाला यात खूप चांगली फी देईन मी. खूप मोठी रक्कम.” हृषिकेश म्हणाला.
पाणिनी ने चिडून फोन ठेऊन दिला. त्या नंतर पंधरा वीस मिनिटं विचारात पडून पाणिनी येरझऱ्या मारत राहिला.
फोन वाजला.पलीकडून कनक ओजस बोलत होता. “ पाणिनी, तुला हवा होतं तो माणूस शोधून काढलंय आम्ही. लोटलीकर. श्याम लोटलीकर. बिल्व दल अपार्टमेंटमध्ये राहतो.आम्हाला समजलंय त्यानुसार त्यांची बायको त्याला आठवड्यापूर्वी सोडून गेल्ये आणि तो सध्या त्याच्या आई जवळ राहतोय.त्याला भेटायचंय तुला लगेच?”
“ शंभर टक्के.तू माझ्या सोबत येशील का? मला साक्षीदार लागेल ” पाणिनी म्हणाला
“ लगेच निघू. माझी गाडी बाहेरच आहे.”कनक म्हणाला.
“ आपण दोघांच्या गाड्या घेऊ.कदाचित दोघांच्या गाड्यांची गरज लागेल मला.” पाणिनी म्हणाला
( प्रकरण १७ समाप्त)