Kans Maj Balachi - 2 books and stories free download online pdf in Marathi

कंस मज बाळाची - भाग २

वैभव हळूच उठला आणि फोन घ्यायला दुस-या खोलीत गेला. त्याची चाल अगदी गळून गेल्यासारखी दिसत होती.मेहतांचा दवाखाना नेहमीच गर्दीने गजबजलेला असायचा. त्यांच्या हाताला यश होतं. म्हणून बाळाच्या ओढीनी पेशंटला त्यांच्या दवाखान्यापर्यंत खेचून आणत असेल. त्यांच्याबद्दल वैभवला त्याच्या मित्रानी सांगीतल होतं म्हणूनच ती दोघं कालचे रिपोर्ट घेऊन त्यांच्याकडे आले होते. आपल्या नावाचा पुकारा होईपर्यंत बसल्या बसल्या तिथे आलेल्या प्रेग्नंट बायकांच्या पोटाचं अनघा निरीक्षण करत होती. प्रत्येकीच्या पोटाचा आकार वेगवेगळा होता. कोणी सोफ्यावर सहजपणे बसली होती तर कोणाला बसणं अवघड जात होतं तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. हे सगळं आपल्या आयुष्यात घडावं असं वाटत असतानाच हा खेळ सुरू झाला होता. त्याचा शेवट काय आहे हे अनघाला माहित नव्हतं.ती अस्वस्थपणे बसली होती.वैभवही अस्वस्थच होता. अनघापेक्षा वैभव ची अवस्था काही फार वेगळी नव्हती पण त्यानी काहीही ऐकण्याची मनाची तयारी केली होती. त्याला खंबीर राहणं खुप आवश्यक होतं नाहीतर अनघा कोसळली असती. ' अनघा वैभव पांगारकर कोण आहे?' नावाचा पुकारा होतास वैभवनी अनघाला म्हटलं


"उठ अनघा त्यांनी आपलं नाव पुकारलं." दोघेही उठले आणि डॉक्टरांच्या केबीनमध्ये शिरले."नमस्का डॉक्टर मी वैभव पांगारकर आणि ही माझी बायको अनघा पांगारकर." अनघाने पण डॉक्टरांना नमस्कार केला. त्यांच्या हसर्‍या चेहर्‍याकडे बघताच अनघाच्या मनातील भीती दूर पळाली. आपल्या गोंधळलेल्या मनस्थितीत डॉक्टर नक्कीच मदत करतील याचा तिला विश्वास वाटला."बोला काय झालं? डॉक्टरांनी त्यांना विचारलं.


"अनघा ते रिपोर्ट्स दे." वैभव कडे लक्ष जाताच अनघानं पर्समधून रिपोर्ट काढून डॉक्टरांकडे दिले. डॉक्टरांनी रिपोर्ट शांतपणे बघून टेबलवर ठेवले. डॉक्टर काही बोलायच्या आत अनघाने विचारलं,


"डॉक्टर नेमकं काय झालं?" तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. डॉक्टर शांतपणे बोलू लागले,


"हे बघा रिपोर्टनुसार तुम्ही प्रेग्नेंट नाही पण दोन महिने झाले तुम्हाला पाळी आली नाही म्हणता."


"हो.म्हणूनच टेस्ट केली."


"तुम्ही योग्य केलत.पण या रिपोर्टनुसार तुम्ही प्रेग्नंट नाही. तर आता हे का आणि कसं घडलं हे आपण बघायला हवं त्याकरता तुमच्या काही टेस्ट करायला हव्या पहिले आपण तुमची सोनोग्राफी करू. मी तुम्हाला डॉक्टर शहा यांच्या केअर सोनोग्राफी सेंटरचा पत्ता देतो डॉक्टर शहा यांच्या नावाने लेटरही देतो. सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन तुम्ही पुन्हा या."डॉक्टरांनी डॉ. शहांच्या नावे लेटर लिहून दिलं आणि त्यांच्या क्लिनीकचा पत्ता पण दिला. या गोष्टी घेऊन दोघही मेहतांच्या क्लिनीकच्या बाहेर पडले. आता दुस-या डॉक्टर कडे जायचं आणि सोनोग्राफी करायची म्हणजे आपण पुन्हा एक दिवस अधांतरी लटकत राहणार असं अनघाला वाटलं दोनच दिवस झाले रिपोर्ट निगेटीव्ह येऊन पण किती ताण आला आहे आपल्या मनावर. कितीही ताण घ्यायचं नाही ठरवलं तरी आपल्या आयुष्यातील हा वाईट काळात कधी संपणार हा प्रश्न तिला अस्वस्थ करू लागला.घरात शिरताच अनघा सोफ्यावर कोसळल्या सारखी बसली.वैभवनी शांतपणे दार लावलं बूट काढले हातपाय धुऊन जेवायला काय करावं याचा विचार करू लागला. अनघा सध्या तरी भान वर येणार नाही हे वैभव च्या लक्षात आले होते रात्रीच्या जेवणाची सोय त्यालाच करावी लागणार होती. बाहेरून काही मागवलं तरी ते अनघा खाईल याची खात्री देता येत नव्हती.


अनघा जेवायला तयार होणार नाही हेही त्याला पक्कं माहिती होतं. तिला बळंबळंच भरवावं लागणार होत. वैभवनं फ्रीज उघडून बटर, कोथींबीर टोमॅटो काढले. कांदा चिरून घेतला. अंडी मस्त फेटून घेऊन छान ऑमलेट केलं. ब्रेड भाजली. एका प्लेटमध्ये ऑमलेट ब्रेड घेऊन वैभव बाहेरच्या खोलीत आला. अनघा तिथे नव्हती.


अनघा बेडरुममधे जाऊन झोपली होती. झोपली कसली. तिनी स्वत:ला पलंगावर फेकल्यासारखं टाकून दिलं होतं. डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते.तिच्या चेह-याकडे बघून त्याला भडभडून आलं.आपल्या डोळ्यातलं पाणी अनघाला दिसू नये म्हणून वैभव पाण्याचा ग्लास आणण्याच्या निमीत्ताने स्वयंपाकघरात गेला. डोळ्यातील पाणी त्यानं हळूच पुसलं आणि आपला चेहरा नीट दिसेल याची काळजी घेत वैभव पाण्याचा ग्लास घेऊन बेडरूममध्ये आला.


"हे घे पाणी"


अनघाने स्वतःहून समोरच्या प्लेटमधील काहीच खाल्लं नव्हतं. तिला कसं बसं समजावत वैभवनी तिला भरवण्यास सुरुवात केली. खाताखाता अनघानी विचारलं


"वैभव किती दिवस चालतील या टेस्ट?" अनघाने विचारलं.


"हे आत्ताच कसं कळेल उद्या सोनोग्राफी करून त्याचा रिपोर्ट आल्यावर डॉक्टर सांगतील पुढे काय करायचं ते. चल फार विचार करू नकोस. जेवून घे नऊ वाजले."


"कसा विचार करू नको वैभव आयुष्यातील किती सुंदर वळणावर मी उभी होते कोणीतरी दुष्टपणाने मला खोल दरीत फेकून दिलं असं वाटतंय मला वैभव."


अचानक अनघाचा चेहरा घाबराघुबरा झाला. तिला अशी भेदरलेली बघून वैभवला अचानक तिला काय झालं कळेना.


"वैभव जर मी आईच होऊ शकले नाही तर..?"

वैभव बोलला


"असलं काहीतरी वेडेवाकडे विचार मनात आणू नकोस. असं काहीही होणार नाही."


रडण्याचा उमाळा न आवरून अनघा उशीत तोंड खुपसून रडू लागली वैभवने शांतपणे तिच्या पाठीवरून हात फिरवला.


"अनघा आता जेवून घे."वैभव म्हणाला बर्‍याच वेळाने अनघा शांत झाली. अंगातलं त्राण निघून गेल्यासारखी ती उठून बसली. लहान मुलाला जसं भरवावं तसं वैभव तिला भरवू लागला. सगळीकडे शांतता पसरलेली होती ती सहन होत नव्हती


वैभवला. कधी ही जीवघेणी रात्र संपते असं त्याला झालं होतं. अनघा निट जेवली ही त्याच्यासाठी समाधानाची गोष्ट होती. तो हळूच थोपटत तिला म्हणाला,


"झोप आता शांत. उद्या बघू."


*****


आजची सकाळ अनघासाठी खूपच वेगळी होती अंगात त्राण निघून गेल्यासारखी तिला वाटत होतं. सगळं अंग आंबून गेल्यासारखं वाटत होतं. तिच्या चेहरा एखाद्या मोठ्या आजारातून उठला सारखा दिसत होता.


वैभवनं चहा केला आणि तिला उठवलं. तिला चहा घ्यायला लावला. आपण ऑफिसमध्ये गेल्यावर अनघा काय करेल हा प्रश्न वैभवला सतावू लागला. वैभवने आज घरीच थांबायचं ठरवून तसं फोन करून ऑफिसमध्ये कळवलं की तो आज येऊ शकत नाही.वैभव च्या कानाशी सतत गुण-गुण करणारी अनघा परवापासून वाचा गेल्यासारखी बसून होती. वैभवला खरं तर घरातलं हे सगळं वातावरण असंह्य झालं होतं पण त्याचाही त्याला इलाज नव्हता. आज संध्याकाळी सोनोग्राफी केल्यावर उद्या त्याचा रिपोर्ट येईल त्यावर सगळ ठरणारं होतं.वैभवने टी.व्ही.लावला उगीचच रिमोटनी चॅनल बदलत कार्यक्रम बघत होता. तसंही कुठं काही कार्यक्रम चालू असता तरी त्यामध्ये काय चाललंय हे त्याला कळलंच नसतं. कारण तो त्या मनस्थितीतच नव्हता. मालिकांवरून वैभव अनघाला नेहमी खूप चिडवत असे. त्यावर त्या दोघांची वादावादी पण व्हायची. तेव्हा वैभवला हसू यायचं पण आज ते आठवून सुद्धा त्याला हसू आलं नाही. त्याने कंटाळून टीव्ही बंद केला.

कधीतरी सोफ्यावर बसल्याबसल्या त्याला झोप लागली.


***


काल अनघाची सोनोग्राफी करून झाली होती. रिपोर्ट आज मिळणार होता. कालची अख्खी रात्र जीवघेण्या विचारांच्या सावल्या घेऊन आली आहे असं अनघाला वाटलं होतं. त्या सावल्यांच्या अंधारानी आपण घुसमटून जाऊ अशी भीती तिला वाटू लागली होती. या सगळ्यानी उगाच डोकं खूप दुखत होतं. ती रडत रडत म्हणाली


"वैभव खूप डोकं दुखतं आहे."


"फार विचार करू नकोस त्यामुळे तुलाच त्रास होईल. वैभव म्हणाला."खूप विचार करायचा नाही असं ठरवते मी पण जमतच नाही. या सगळ्या तपासण्या आपाल्याला कुठे घेऊन जाणार आहेत कळत नाही. या तपासणीनंतर आपल्याला होकारार्थी उत्तर मिळणार आहे का? या सगळ्याचा विचार करून मनाला खूप वेदना होतात."वैभवनं तिचा हात हातात घेऊन तो हळूच थोपटला. इतका वेळ अशीच सचिंत बसलेली अनघा वैभवच्या मायेच्या स्पर्शान स्वतःला सावरू शकली नाही आणि ढसाढसा रडू लागली. तिचं रडण थांबेपर्यंत तो तिच्या केसातुन हात फिरवत होता. तो शांत होता."वैभव डॉ. असं का बोलले असतील. ज्यांना वर्षानुवर्षे तपासण्या करूनही मूल होत नसेल त्या बायका कसं करत असतील? हा जीवघेणा वेळ कसा सहन करत असतील. मी तर दोनच दिवसात इतकी निराश झाले. तुला माहिती आहे आईच्या शेजारी भागवत म्हणून राहतात त्यांच्या सुनेला बारा वर्षांनंतर बाळ झालं.


तिने ही बारा वर्ष कशी काढली असतील? तेव्हा मी तिला बघायची न तेव्हा ती इतरांशी हसून बोलायची.पण जेव्हा एकटी बसलेली असायची तेव्हा खुप उदास दिसायची. तिची ती वेदना आज मला कळतेय. जेव्हा तिला मी बघायचे तेव्हा मी कॉलेज मध्ये होते.तिचं दु:ख किती तीव्र होतं ते तेव्हा नाही कळलं.अनघा भावनाविवश होवून बोलली आणि डोळे मिटून आपले हात डोळ्यावर गच्च दाबून धरले.

-------------------------------------------

क्रमशः पुढे काय झालं? पुढील भागात वाचा.

'आसं मज बाळाची' भाग तिसरा.

लेखिका.. मीनाक्षी वैद्य.

___________________________


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED